दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी
सायंकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने वंदनीय अटलजींचं निधन झाल्याची
बातमी आली आणि देशातल्या आमच्यासारख्या असंख्य संवेदनशील नागरिकांना जणू आपल्याच
घरातलं वडीलधारं गेल्यासारखं वाटलं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात संपूर्ण भारतीय
जनमानसावर ज्या मोजक्या नेत्यांनी आपली छाप सोडलेली दिसते त्यात अफाट विद्वत्ता, देवळाच्या गाभाऱ्यात पसरलेल्या सोज्वळ
प्रकाशासारखा सुसंस्कृतपणा आणि अजातशत्रुत्व लाभलेले पूर्व पंतप्रधान भारतरत्न
अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान फार वरचे आहे. अष्टपैलू
व्यक्तिमत्वाचे धनी राहिलेले अटलजी हे पत्रकार, कवी, लेखक, विचारवंत, राजकीय नेते तर होतेच परंतु त्यांची खरी ओळख सह्रदयी, दिलदार, निखळ मनाचा माणूस म्हणून अधिक होती. भारतीय राजकारणाचे
स्वातंत्र्यानंतरचे एक युग गाजवलेल्या, आपल्या पक्षाच्या विचारसरणीसह मर्यादेचे सजग समाजभान
असणाऱ्या, आपल्या विचारधारांशी समर्पित
राहिलेल्या राष्ट्रतेज अटलजींचे ‘मानवी
मूल्य’ कालौघात समाजाच्या अधिक
प्रखरतेने लक्षात येत राहील.
सोमवार, २४ डिसेंबर, २०१८
‘वंदनीय’ अटलजी...!
सन १९२४ च्या डिसेंबर
महिन्यातल्या २५ तारखेला, मध्यमवर्गीय कुटुंबात शिक्षक कृष्णबिहारी आणि
कृष्णादेवींच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शब्दांचं सामर्थ्य अटलजींकडे
त्यांच्या वडिलांकडूनच आलं होतं. आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी अशी इच्छा
असणाऱ्या त्यांच्या कुटुंबाला स्वप्नातही वाटलं नसेल की ग्वाल्हेरच्या मातीत
खेळणारा हा मुलगा एक दिवस आपल्या शब्द सामर्थ्याच्या बळावर देशातील कोट्यवधी
लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल ! खरंतर कॉलेजच्या दिवसापासूनच अटलजींच्या
शब्दांनी लोकांना वेड लावलं. त्यांच्या जीभेवरच्या सरस्वतीने अनेकांना मोहित केलं.
एका छोट्या शहरातला हा मुलगा, विद्यार्थी नेता म्हणून नावारुपाला येत असतानाच कर्तृत्व गाजवत होता.
त्यांचा संघाशी सर्वप्रथम संपर्क आला त्यावेळी ते आर्य समाजांतर्गत बालसंघटन
आर्यकुमार सभा ग्वाल्हेर या संस्थांशी संबंधित होते. ग्वाल्हेरच्या आर्यकुमार
सभेचे प्रमुख कार्यकर्ते भूदेव शास्त्री यांनी एक दिवस आर्य समाजाच्या साप्ताहिक
सत्संगाशिवाय संध्याकाळी रोजच्या शाखेत जाण्यासाठी प्रोत्साहित
केले व त्यातून अटलजी लहान असताना संघ शाखेत दाखल झाले. अटलजी ग्वाल्हेरला ज्या
शाखेत जात असत, त्या शाखेतील बहुतांश बाल स्वयंसेवक मराठीत बोलत असत. अटलजींना शाखेतील रोजचे
खेळ, साप्ताहिक बौद्धिकवर्ग विशेष आवडत. येथे संघदृष्ट्या बाल अटलजींवर प्रभाव पडला, तो संघ प्रचारक
नारायणराव तरटे यांचा. ‘आज मी जो काही आहे तो स्व. नारायणरावजींमुळेच’, असे अटलजी
मोठ्या आदराने व विनम्रपणे नमूद करीत असतं. संघदृष्ट्या अटलजींवर ज्या अन्य दोन
महनीय व्यक्तींचा प्रभाव पडला त्या म्हणजे पं. दीनदयाळ उपाध्याय व स्व. भाऊरावजी
देवरस. शाळेत दहावीत असताना ‘हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय’ ही चिरस्मरणीय रचना लिहिणाऱ्या अटलजींनी संघदृष्ट्या १९४१
मध्ये संघ शिक्षा वर्गाचे (अधिकारी शिक्षण वर्ग) प्रथम वर्ष, १९४२ मध्ये
द्वितीय वर्ष व १९४४ मध्ये बी.एच्या अंतिम वर्षाला असतानाच तृतीय वर्ष पूर्ण केले.
महाविद्यायलीन जीवनात संघशाखा स्तरावर काम करणाऱ्या अटलजी हे महात्मा गांधी
यांच्या ब्रिटीशांविरोधातील ‘चले जाव, भारत छोडो’ या आंदोलनात सक्रीय होते. १९४२ मध्ये त्यांना या आंदोलनाच्या
काळात कारावासाची शिक्षा झाली होती. पुढे कानपूरच्या डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये राज्यशास्त्रात
एम. ए. केल्यानंतर सन १९४६ दरम्यान अटलजींनी कायद्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलेलं
असतानाच ते संघाचे
पूर्णवेळ कार्यकर्ता (प्रचारक) बनले आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याच विचारधारेशी ‘अटल’ राहिले. सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रधर्म, वीर-अर्जुन, पांचजन्य या सारख्या नियतकालिकांमधून पत्रकारिता केली.
सन १९५१ साली तरुण अटलजींमधली गुणवत्ता पंडित दिनदयाळ
उपाध्याय यांनी हेरली. त्यांनी अटलजींना कानपूरहून लखनऊमध्ये बोलावून त्यांच्यावर 'राष्ट्रधर्म' या
साप्ताहिकाची जबाबदारी सोपवली. याच दरम्यान डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची
स्थापना केली होती. अटलजींच्या राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा इथेच झाला. १९५७ मध्ये
बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला जाताना कोणतेही रिझव्र्हेशन
नसलेल्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यात, जिथे सामान ठेवतात त्यावरच्या बाकावर झोपून ते बलरामपूरला
पोहोचले होते. त्यांच्या लालित्यपूर्ण शैलीत ‘अपनी अपनी बात’मध्ये या प्रवासाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे.
बलरामपूरच्या लोकांनी पहिल्यांदा विश्वास दाखवला आणि ते देशाच्या संसदेत पोहोचले.
त्याकाळी जनसंघाचे केवळ ४ खासदार होते. शब्दांचा हा ‘अटल’धनी राजकीय
पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू पाहात होता. १९५० - ६० च्या दशकात
अटलजी नेहरूंच्या पक्षात नसले तरीही त्यांना भारताचा दुसरा नेहरू असे म्हटले जात
होते. पंडित नेहरू हेही वाजपेयी यांच्या अत्यंत मुद्देसूद, अभ्यासपूर्ण
भाषणाने प्रभावित असत. वयाची तिशीही न गाठलेले अटलजी संसदेत परराष्ट्र खात्याच्या
मागण्यांवर भाषण करायला उभे राहात तेव्हा नेहरू सभागृहात नसले तरी पळत पळत लगबगीने
सदनात येत असत आणि या तरुण नेत्याचे भाषण केवळ लक्ष देऊन ऐकत, हातात वही घेऊन
त्या भाषणातले मुद्देही टिपून घेत असत. ‘इतकी विलक्षण वक्तृत्व प्रतिभा कशी निर्माण होते ?’ याचं उत्तर
देताना एके ठिकाणी अटलजी म्हणाले होते,
‘हा आमचा परंपरागत गुण आहे. माझे वडील उतम भाषणे
करीत असत. मात्र ते नेते नसल्याने त्यांच्या या गुणाचे कौतुक झाले नाही !’ तरुणपणातल्या
अटलजींनी अमोघ वाणीने संसदेत विरोधी पक्षाच्या बाकाला आणि विषयांना प्रतिष्ठा
प्राप्त करून दिली. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या सदस्याला, सत्ताधारी
पक्षाच्या बाकावरचे सदस्य किती सन्मानाने वागवतात आणि त्याचा कसा आदर करतात ? याचे उदाहरण
अटलजीच आहेत. सन १९५७ मध्ये त्यांनी परराष्ट्र खात्याच्या कारभारावर टीका करणारे
जे भाषण संसदेत केले ते ऐकून तेव्हाचे परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान पं. नेहरू यांनी
’प्रधानमंत्री पद के लिए अटलजी का एक दिन पक्का..’ असे भाकीत केले
होते. अटलजींनी नेहरूंचा तो शब्द आपल्या कर्तृत्वाने
पुढल्या चार दशकांत खरा करून दाखविला.
आपल्या राजकीय जीवनात कविमनाच्या अटलजींनी स्वतःतली संवेदना
कधी हरवू दिली नाही. कवितेनंच त्याचं राजकारण समृद्ध बनवलं. आयुष्याचं रोज नवं गाणं
लिहिणाऱ्या या कवीला अनेक अग्नीपरीक्षांना सामोरं जावं लागलं. दिनदयाळ उपाध्याय
यांच्यानंतर अटलजींच्या खांद्यावर जनसंघाची जबाबदारी आली. ही जबाबदारी लिलया पेलत
त्यांनी जनसंघ तळागाळात पोहोचवण्यासाठी जीवाचं रान केलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी
घेरलेल्या इंदिरा गांधींनी १९७५ साली देशावर आणीबाणी लादली. त्यात सरकारनं
अटलजींना जेरबंद केलं. सन १९७७ साली झालेल्या निवडणुकीत देशातल्या जनतेनं
आणीबाणीविरोधात कौल दिला. अटलजींनी आपल्या पक्षाचे विलीनीकरण जनता पार्टीत केले.
मोराजजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री बनले.
आपल्या मंत्रीपदाच्या काळात अटलजींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठारून
हिंदीतून भाषण करत भारताचा गौरव वाढवला. दुर्दैवाने अंतर्गत गटबाजीनं मोरारजींचं
सरकार कोसळलं नि इंदिरा गांधींना पर्याय देण्याचं स्वप्न भंगलं. अटलजी अस्वस्थ
झाले. १९८० साली
अटलजींनी त्यांच्या सहकाऱयांसोबत 'भारतीय जनता पक्ष' या नावाने नव्या सुरुवातीचा शंखनाद केला. सन १९८० च्या
दशकात जनता पक्षाचे नेते पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीची
स्थापना केली. पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेताना,
राजकारणातील सात्विक चेहरा अशी ओळख लाभलेल्या अटलजींनी
भविष्यवाणी केली, ‘सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा, कमल खिलेगा !’ पुढे सन १९९६ साली हे भविष्य खरं ठरलं. १९८४ च्या निवडणुकीत
मोठय़ा पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली. एकेकाळी ३० पेक्षा अधिक जागांवर आपले
अधिराज्य गाजवणाऱ्या पक्षाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. अनेक ठिकाणी
डिपॉझिट जप्त झालेले असतानाही त्यांनी धीर न सोडता आपल्या पक्षाचा चेहरा अधिक
तेजोमय करण्याचा अखंड यशस्वी प्रयत्न केला. सन १९८९ नंतर कोणत्याच पक्षाला केंद्रात
स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नव्हते. आघाडीच्या राजकारणाची चर्चा होत असताना
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने १९९८ ते २००४ अशी सलग
सहा वर्षे चालविलेल्या आघाडी सरकारचे आजही अनेकांना स्मरण होते. या काळात त्यांनी
आघाडी सरकार चालविण्याचा आदर्श निर्माण केला. यात देशभरातील जवळपास ३० छोटे-मोठे
पक्ष सहभागी झाले होते. सध्या यातील अनेक पक्ष भारतीय जनता पक्षाचे कडवे विरोधक
म्हणून ओळखले जातात. अटलजींनी या पक्षांना बरोबर घेत सरकार कसे चालविले असेल ? याची कल्पना
यावी.
सन १९९६ साली केंद्रात भाजपचं सरकार आलं. अटलजी पंतप्रधान
बनले. परंतु संख्याबळाच्या अग्निपरीक्षेला त्यांना सामोरं जावं लागलं. त्या
दिवशीचं संसदेतलं त्यांचं भाषण संसदीय इतिहासातलं एक सोनेरी पान होतं. त्यांना
संख्याबळ जमवता आलं नाही. त्यामुळे १३ दिवसात सरकार कोसळलं. पण अटलजींनी देशातील
जनतेची मनं जिंकली. पुन्हा निवडणुका झाल्या. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार
आलं आणि वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. देशाच्या चार दिशा जोडणाऱ्या स्वर्णिम
चतुर्भूज योजनेतून अटलजींचा द्रष्टेपणा, शत्रूराष्ट्र पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करत
दिल्ली-लाहोर बससेवा सरु करणाऱ्या अटलजींचा शांततेवर चा अटल विश्वास, जगाच्या
दबावाला झुगारत पोखरणमध्ये अणूचाचणी करत दाखवलेला कणखरपणा, देशातलं पहिलं
टिकलेलं गैरकाँग्रेसी सरकारं देणारं नेतृत्व, मूल्यांसाठी सत्तेला लाथ मारण्याची धमक दाखवणारी तत्वनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा
देशानं पाहिली. अटलजीचं व्यक्तित्व हे देशातील कोट्यवधी लोकांना कायम प्रेरक, आश्वासक आणि
मार्गदर्शक ठरून ते जात, पात, धर्म, पक्ष, पंथ या सगळ्यांच्या पलिकडचे आदर्श लोकनेता बनले. अटलजींच्या
जीवनातला मोठा काळ तीव्र संघर्षात गेला. राजकारणातही ते व्यासंगी, सृजन, लढवय्ये, तत्वचिंतक नि
बहुआयामी राहिले. अनेक चढ उतार त्यांनी आयुष्यात अनुभवले, सर्वोच्च
पदांपर्यंत पोहोचले. लोकमान्यतेच्या अन लोकप्रेमाच्या अमृतधारा अनुभवल्या. ममता बॅनर्जी अटलजींना
पितृस्थानी मानत. बिजू जनता दलाचे नविन पटनाईक हेही वाजपेयींना वडिलांप्रमाणे
मानत. पश्चिम बंगालचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री राहिलेले
ज्योती बसू यांनीही अटलजींसोबत राजकारणापलीकडची आपली मैत्री जपली. कॉंग्रेसचे
प्रवक्ते दिग्विजय सिंग हे त्यांना ‘गुरूजी’ म्हणून हाक मारत. अटलजी संघ परिवारापेक्षा अधिक देशात
लोकप्रिय होते. अटलजी संघाचे होते आणि त्याचवेळी साऱ्यांनाही ते आपले वाटत होते ही
गोष्ट पाहिली की त्यांच्या असामान्यत्त्वाची जाणीव होते.
रामभाऊ म्हाळगी आणि अटलजी यांचं नातं कायम अतूट होतं. सन २००३
मध्ये अटलजी पंतप्रधान असताना भाईंदरमधील उत्तन येथे ‘रामभाऊ म्हाळगी
प्रबोधिनी’चं लोकार्पण करण्यात आलं. लोकार्पणानंतर पंतप्रधान अटलजी आणि त्यांचे परममित्र
उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी प्रबोधिनीत मुक्काम केला. सामान्यत: पंतप्रधान
आणि उपपंतप्रधान सुरक्षेच्या कारणासाठी एकत्र प्रवास करत नाहीत, एकत्र राहत
नाहीत. तरीही हे दोघे म्हाळगी प्रबोधिनीत शेजारी शेजारी राहिले, हा एक दुर्मीळ
योग होता. अटलजींसारख्या मोठय़ा माणसाची ही छोटीशी कृती त्यांचं मोठेपण अधोरेखित
करणारी ठरली. लोकशाहीची जगभरातील सर्वात मोठी परंपरा असलेल्या भारतीय
राजकारणातील ‘भीष्म पितामह’ म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचेच एकमेव नाव घेता येईल, असे गौरवोद्गार
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी एकदा राज्यसभेत काढले होते. वर्षानुवर्षे राजकारणाच्या
खुर्चीला चिकटून बसण्याची परंपरा भारतात पक्की रुजलेली असताना अटलजींनी सन २००५
साली स्वतःहून राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. ४० पुस्तके प्रकाशित झालेल्या
अटलजींचा ‘मेरी एक्क्यावन्न कविताएँ’ हा काव्यसंग्रह विशेष गाजला. गीतकार साहिर लुधियान्वी यांचे
‘कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है या गाण्याची,
पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीची, पं. हरिप्रसाद
चौरासिया यांच्या बासरी वादनाची त्यांना विशेष आवड राहिली. अटलजी अशा काळात वाढले, जेव्हा राजकीय
पक्षाचे नेते आणि सामान्यजन यांच्यात फार मोठी दरी नव्हती. साहजिकच अनेक गावातल्या
अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. त्यांचा दौरा असला म्हणजे
आपलेपणाने वाट पाहाणारी अनेक कुटुंबं गावागावात दिसत. जेवणात त्यांना विशेष
आवडणारी पुरणपोळी हमखास असे.
पक्षहिताहून देशहिताला आणि राजकारणाहून राष्ट्रकारणाला
महत्त्व देणारी जी मोजकी माणसे देशाच्या नेतेपदावर आतापर्यंत आली त्यात अटलजी
अग्रेसर होते. मनाचा उमदेपणा हे अटलजींचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. वक्तृत्व आणि विद्वत्ता, कवित्व आणि
द्रष्टेपण व राजकारणपटुता आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व या साऱ्या गोष्टी एकाच
नेत्यात अभावाने आढळतात. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वात या गुणांचा मनोज्ञ संगम होता.
विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना विरोधी नेता कसा असावा ? याचा आदर्श
घालून देण्याबरोबरच देशाचा पंतप्रधान कसा असावा ?
त्याचाही परिपाठ त्यांनी आपल्या कारकिर्दीत साऱ्यांसमोर
ठेवला. आपल्या भाषणात ‘शुरु से
शुरुवात करू या अंत
से आरंभ करू’ असा नादमधुर
अनुप्रास साधणारे अटलजी काश्मीर समस्येबाबत बोलताना,
‘आँखो से रोशनी कैसी अलग हो सकती है ? होटों से मुस्कान
कैसी अलग हो सकती है ?’ असं काव्यमय रूपक मांडायचे. अटलजींची संघाबद्दलची
आत्मीयता जाणवणारे, निष्ठावंत स्वयंसेवकासारखे अनेक प्रसंग सांगितले जातात. ‘मी संघाच्या
संपर्कात आलो, दीर्घकाळ संघ संघटनेत राहिलो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मला रा.स्व.संघ मनापासून भावला.
मला संघ तत्त्वज्ञान तर आवडतेच ! पण त्याहून अधिक अशी मला आवडणारी बाब म्हणजे, संघाची
परस्परांच्या संदर्भातील व एकमेकांबद्दल जोपासली जाणारी धारणा.’ साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’ मध्ये प्रकाशित ‘आरएसएस इज माय सोल’ या आपल्या लेखात खुद्द अटलजींनी संघाशी असणारे संबंध, संस्कार यावर
विस्तृत व स्पष्ट विवेचन केले आहे.
अटलजी सभेसाठी श्रोत्यांची उत्सुकता ताणणारा उशीर फारच
क्वचित करत. गर्दीचा अंदाज घेऊन त्यांचं भाषण सुरु होत असे. शब्दांचा प्रपात, कधी तीव्र, कधी मध्यम, कधी वीज तळपावी
तसा तर कधी ऋजुता आणि पारिजातकाचा दरवळ भासे. त्यांची भाषणातली तन्मय मुद्रा लोभस
असायची. देशाच्या राजकारणात जवळपास ६० वर्षे अविरत उत्साहाने आणि
अतिशय सभ्यतेने अटलजी वावरले. पंतप्रधान होण्यापूर्वी अटलजींची जनसंघाचे संस्थापक
सदस्य, खासदार (१९५७, १९६२), जनसंघाचे अध्यक्ष (१९६८ ते १९७३), लोकसभेतल्या
जनसंघ गटाचे नेते (१९५७ ते १९७७), जनता पक्षाच्या सरकारात परराष्ट्रमंत्री (१९७७ ते १९७९), भारतीय जनता
पक्षाचे अध्यक्ष (१९८० ते १९८६), भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८० ते १९९६), भारताचे
पंतप्रधान,
(१९९६ आणि १९९८ ते २००४) अशी
प्रदीर्घ संसदीय कारकीर्द आहे. एकेकाळी ‘प्रधानमंत्री की अगली बारी,
अटलबिहारी अटलबिहारी’ अशा अनेक वेळा घोषणा दिल्या जात होत्या. त्या घोषणा केवळ
अटलजींच्या नेतृत्वामुळेच वास्तवात उतरू शकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे
अटलजींना गुरूस्थानी मानायचे. ‘ते वाजपयीच होते ज्यांनी माझ्या हाताला धरून मला अनेक
राजकीय गोष्टी शिकवल्या’, असे उद्गार मोदी त्यांच्या कार्यक्रमात अनेकदा बोलून
दाखवतात. अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी लिहिलेल्या विशेष ब्लॉगमध्ये मोदी
लिहितात, ‘अटलजी कधीही आडमार्गाने गेले नाहीत. त्यांनी सामाजिक आणि
राजकीय जीवनात नवीन मार्ग बनवले आणि निश्चित केले. ‘वादळातही दिवा पेटवण्याची क्षमता’ त्यांच्यात
होती. ते जे काही बोलायचे ते थेट जनमानसाच्या हृदयाला भिडायचे. आयुष्य कसे जगायचे, राष्ट्राची
सेवा कशी करायची हे त्यांनी आपल्या जगण्यातून इतरांना शिकवले.
अटलजी म्हणायचे,
‘आपण केवळ आपल्यासाठी जगू नये, इतरांसाठीही
जगावे ! आपण राष्ट्रासाठी जास्तीत जास्त त्याग करायला हवा. जर भारताची स्थिती
दयनीय असेल तर जगात आपला गौरव होऊ शकणार नाही. परंतु जर आपण सर्व दृष्टीने
सुसंपन्न असू तर जग आपला गौरव करेल’.
देशप्रेम ही भावना अटलजींच्या दृष्टीने सर्वोपरी होती. ते
म्हणतं असतं, ‘भारत ज़मीन का टुकङा नही है,
जीता-जागता राष्ट्रपुरुष है । हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा
है । कश्मीर किरिट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं । विनध्याचल कटि है, नर्मदा करधनी
है । पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जँघाए हैं । कन्याकुमारी उसके चरण हैं, सागर उसके चरण
पखारता है । पावस के काले-काले मेघ इसके कुंतल केश हैं । चाँद और सूरज इसकी आरती
उतारते हैं । यह वंदन की भूमि है, यह अर्पण की भूमि है, अभिनन्दन की भूमि है । यह तर्पण की भूमि है । इसका
कंकर-कंकर शंकर है, इसका बिंदु-बिंदु
गंगाजल है । हम जियेगें तो इसके लिये और मरेंगे तो इसके लिये।’ राष्ट्राप्रति
अटलजींच्या या जाज्ज्वल्य देशभक्तीने भारलेल्या भावना वर्तमानात आजच्या आम्हां
पिढीने जगणं म्हणजे अटलजी आपल्याला सदैव ‘वंदनीय’ असल्याच्या म्हणण्याचे सार्थक होईल.
धीरज वाटेकर
‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि.
रत्नागिरी.
मो. ९८६०३६०९४८
dheerajwatekar@gmail.com
(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक
जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)
रविवार, २३ डिसेंबर, २०१८
रविवार, १६ डिसेंबर, २०१८
पहिली मुलाखत
गेल्या १८
ते २० वर्षांच्या पत्रकारिता, पर्यटन आणि
चरित्रात्मक पुस्तके लिहिताना, काही
कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकदा अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचा योग आला.
परंतु कधीतरी आमचीही मुलाखत घेतली जाईल असे वाटले नव्हते. पनवेल मधून प्रकाशित
होणा-या इंद्रधनू या पर्यटन विषयाला वाहिलेल्या विजय पवार संपादित दीपावली
विशेषांक २०१८ मध्ये प्रा. सौ. अंजली बर्वे मॅडम यांनी घेतलेली आमची मुलाखत
प्रसिद्ध झाली. आमच्या आयुष्यातील प्रसिद्ध झालेली ही पहिलीच मुलाखत ! हा योग जुळवून आणल्याबद्दल इंद्रधनू चे संपादक विजय पवार आणि मुलाखतकर्त्या प्रा. सौ.
अंजली बर्वे मॅडम यांना मनापासून धन्यवाद.
धीरज
वाटेकर
मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८
फोटो स्टोरी - धीरज वाटेकर
फोटो स्टोरी - धीरज वाटेकर
'चिमणी वाचवा, त्याना घरटी बांधायला जागा द्या !' असे विचार आपण नेहमी ऐकतो. आपल्या बालपणी घरात, अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी भुर्र्र उडून गेली ती परत आलेली नाही. त्याची अनेक कारणे 'विकास' या एकाच मुद्याभोवती फिरत असतात. त्यामुळे या चिमण्यांना कधीकधी वीजेच्या पोलांचा आधार घ्यावा लागतो. जगप्रसिद्ध दाभोळ गावात टिपलेले हे दृश्य पाहिल्यावर आपण रोज चवीने चघळत असलेल्या पर्यावरण या विषयात आपण नक्की कशासाठी काय करतो आहोत, हेच कळेनासे होते.
सोमवार, १० डिसेंबर, २०१८
‘इंटरनॅशनल माउंटन डे’च्या निमित्ताने...
‘टायगर
नेस्ट मॉनेस्ट्री’ :
आनंददायी भूतानचा विस्मयकारक ठेवा !
सहा-सात महिन्यांपूर्वी आमचा भूतान पर्यावरण
अभ्यास दौरा निश्चित झाल्यापासून तेथील ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’ मनात घर करून
राहिली होती. भूतानची जागतिक ओळख असलेले टायगर नेस्ट मॉनेस्ट्री (तक्तसांग मठ - Taktsang
Monastery) हे पारो शहराच्या घाटीतील सर्वात पवित्र आणि अद्भुत बौद्ध
ठिकाण. समुद्रसपाटीपासून ३१२० मीटर (१०२४० फूट) उंच पर्वतावर एका कड्यात अत्यंत
कल्पकतेने बांधलेल्या या मॉनेस्ट्रीपर्यंत पोहोचणे सहजसाध्य नसल्याच्या जाणीवेतून
मनात निर्माण झालेल्या सा-या प्रश्नांना अखेर ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’चा
महत्वपूर्ण ट्रेक यशस्वी झाल्यावर (१५ नोव्हेंबर २०१८) उत्तरे मिळाली. आजच्या आधुनिक
काळात अशा पर्वतांचं महत्त्व जपण्याची गरज लक्षात घेऊन युनोने सन २००३ पासून दरवर्षी
११ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक पर्वत दिन’ घोषित केला. गिरीपर्वतांचा, निसर्गाचा आणि
वन्यजीवनाचा जवळचा संबंध आहे. आपल्याकडे बर्फाळ डोंगरभागातही पूर्वापार
मनुष्यवस्ती आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने दूर डोंगरी
राहणारे लोक त्यांच्या आदिम वस्त्या, त्यांच्या परंपरा, संस्कृती
याचं स्मरण करण्याचा, त्यांची स्थिती, समस्या जाणून घेण्याचा हेतू असतो. आजच्या
निमित्ताने आपण ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’ या आनंददायी
भूतानच्या विस्मयकारक ठेवा जाणून घेऊ या !
आपला सह्याद्री आणि पूर्वेकडील हिमालयासह
जगभरातील पर्वतांच आकर्षण सर्वांनाच आहे. सुमारे साडेतेवीस हजार फुटांपेक्षा अधिक
उंची असलेली १०९ पर्वतशिखरं पृथ्वीवर आहेत. त्यातली बरीचशी आपल्या हिमालयातच आहेत.
मानवी संस्कृतीच्या विकासात पर्वतांच्या अस्तित्वाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पर्वतांना मानवी, दैवी रूपातही चित्रित केलं गेलं आहे. या
पर्वतांत अनेकदा पूजनीय व्यवस्थाही आपण पाहतो. जगातील छोटय़ा- छोटय़ा जमातीही
प्राचीन काळापासून पर्वतांच्या आश्रयाने राहत आहेत. या लोकांची स्वतंत्र जीवनशैली, संस्कृती
असते आणि ती त्यांची वेशभूषा, दागदागिने, संगीत यातून व्यक्त
होत असते. पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या लोकांनी पिढय़ानपिढ्या पर्यावरणाचा समतोल
जपल्याचे आपल्याला भूतानमध्ये चांगलेच जाणवते. पर्वतांच्या अस्तित्वामुळे जगात
मोठय़ा, खोल नद्या निर्माण झाल्या. या नद्यांच्या काठावर विविध
संस्कृतींचा विकास झाला. पर्वतांनी काळे ढग अडवून पाऊस पाडून जगभरातील विशाल
नद्यांना पाणी पुरवलं आहे. आजच्या आधुनिक काळात जगातले सर्वच पर्वत ‘पर्यटनक्षेत्र’ झालेत.
अनेक टिकाणी पर्यटनाची शिस्त कमी-कमी होत गेली आहे. हिमालयातही प्लॅस्टिकचा कचरा
ढिगाने दिसू लागला आहे. स्वच्छ पाण्याच्या नद्या, अनेक औषधी
वनस्पतींची जंगलं वाढवणारे पर्वत आणि त्यावरील निसर्गतः संतुलित वन्यजीवन
विकासाच्या नावाखाली आपण बिघडवायला
सुरुवात केली. पर्वतीय मार्गाची गरज लक्षात घेऊन तिथे वाहनांच्या प्रदूषणाचा
त्रासही जाणवू लागला आहे. या साऱ्यांपासून काहीअंशी आजतरी टायगर नेस्ट दूर आहे.
अशा स्थितीत ते पाहण्याचे भाग्य मिळाले, हे महत्वाचे !
आज संपूर्ण जगभरात टायगर नेस्ट हे भूतानची
ओळख बनले आहे. पारो शहराच्या बाहेर एका उंच डोंगरावर ताक्तसांग वसलेले आहे. पारो
पासून येथे येण्यासाठी टॅक्सी ८०० ते १००० रुपये भाडे घेते. ताक्तसांग ही तिबेटी
बौद्ध धर्माची एक प्रसिद्ध मॉनेस्ट्री आहे. पारो व्हॅलीत ३१२० मीटर उंच टेकडीवर
ह्या मॉनेस्ट्रीपर्यंत जाणारा पदभ्रमणाचा मार्ग आव्हानात्मक आहे. शहरातील
रस्त्यापासून दूरवर या मॉनेस्ट्रीकडे नजर टाकली असता तिथे पोहोचणे अशक्यच वाटते. या
उंच धार्मिक स्थळावर पोहोचण्यासाठी पगडंडीनुमा मार्गे पायी चालत (ट्रेकींग) जावे
लागते. पारो शहरापासून पगडंडीनुमा हे ट्रेकिंगच्या बेसचे ठिकाण १२ किमी. असून
येथून ९०० मीटर खडी चढण चढावी लागते. आम्ही (धीरज वाटेकर) आमचे सहकारी पर्यावरणवादी
चळवळीतील कार्यकर्ते विलास महाडिक, महाराष्ट्र राज्य
पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारतीचे सदस्य बाळासाहेब चोपडे (पलूस-सांगली), गुरूवर्य
प्राथमिक शिक्षक मार्गदर्शक पुस्तिकेचे उपसंपादक- शिक्षक तुकाराम अडसूळ (पारनेर-अहमदनगर)
आणि मुक्त पत्रकार संतोष दिवे (संगमनेर-अहमदनगर) यांच्यासह दिनांक १५ नोव्हेंबर
२०१८ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत हा ट्रेक पूर्ण केला. या वेळेत परिसरात
सरासरी ६°से. तापमान होते. हा ट्रेक करू इच्छिणाऱ्यांनी शक्य तितक्या
पहाटे लवकर प्रवास सुरू करावा. पगडंडीनुमा येथे पायथ्याशी आपल्याला तिकीट काऊंटरवर
प्रतिव्यक्ती ५०० रुपये देऊन तिकीट घ्यावे लागते. हे तिकीट जपून ठेऊन पुढे मॉनेस्ट्रीच्या
मुख्य दरवाजावर तपासले जाऊनच प्रवेश दिला जातो. आपण जेथे आपल्या गाड्या थांबवून
ट्रेकिंग सुरु करतो त्या मार्गावर सुरुवातीला ‘पटरीबाजार’ आहे. येथे
हस्तकौशल्यातून साकारलेल्या कोरीवकाम केलेल्या बौद्ध संस्कृती दर्शविणाऱ्या लाकडी
वस्तू, छोट्या मूर्त्या, वज्राच्या प्रतिकृती मिळतात. चालायला सुरुवात करताना तेथे
पन्नास रुपये (सन २०१८) भाड्याने मिळणारी काठी अवश्य घ्यावी. ट्रेकिंग दरम्यान स्वच्छता
आणि शिस्त कमालीची जाणवते. पायथ्याशी खाद्यपदार्थ विकणारे लोक नाहीत. पटरीबाजारापासून
थोडं पुढे गेलं की ‘इथून पुढे दुकाने लावायला परवानगी नाही’ लिहिलेला
बोर्ड दिसतो. महत्वाची गोष्ट अशी की भूतानमध्ये बोर्डवरच्या सूचनांचा लोक आदर
करतात.
आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या सायप्रस, पाईन
वृक्षांच्या जंगलातून आमचा प्रवास सुरु झाला. थोडे पुढे गेल्यानंतर एक धबधबा आपले
स्वागत करतो. तेथे झ-याच्या पाण्याच्या मदतीने गोल फिरणारे बौद्ध प्रार्थना चक्र
पाहून विशेष वाटले. बौद्ध धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी पताका भरपूर दिसल्या.
हा संपूर्ण मार्ग कच्चा आहे काळजीपूर्वक चालणे शहाणपणाचे आहे. बऱ्याच ठिकाणहून पारो
व्हॅलीचे सुंदर दृश्य दिसते. अर्धा प्रवास पूर्ण केल्यावर एक मोठे प्रार्थना चक्र
दृष्टीस पडले. इथपर्यंत येण्यासाठी घोडे / खेचरे उपलब्ध असतात. प्रतिमाणसी त्यांचा
दर सहाशे रुपये इतका आहे. आपल्याजवळील वेळेच्या उपलब्धीनुसार आपण याबाबतचा निर्णय
घेऊ शकतो. मात्र यापुढचे दोन अत्यंत कठीण टप्पे आपल्याला आपल्याच पायाने सर करावे
लागतात. उतरतानाही आपल्याला आपल्याच पायाने संपूर्ण टायगर नेस्ट मॉनेस्ट्री उतरावी
लागते. काठीची गरज म्हणूनच असते. सायप्रस वृक्षांच्या दाटीवाटीतून आकाशाच्या
दिशेने जाणारी वाट आपल्याला चांगलीच दमवते. अर्धे अंतर पार केल्यावर प्लॅस्टिकच्या
बाटल्यांपासून बनविलेले प्रार्थनाचक्र त्याच्या रंगसंगतीमुळे लक्ष वेधून घेते. अति
उंची (हाय अल्टिट्यूड), विरळ हवा, थंडी आणि खडी चढण
यांचा सामना करीत लवकर दमछाक होणाऱा हा प्रवास करावा लागतो. रस्त्यात काही ठिकाणी
पिण्यासाठी झ-याचे पाणी (खनिजातील शुद्ध पाणी) आहे. पहिल्या टप्प्यावर मुख्य
रस्त्यापासून थोडा दूर खानपान व्यवस्था पुरविणारा एक कॅफेएरिया / रेस्टॉरंट आहे.
आपण आवश्यकतेनुसार येथे आराम करू शकता. कॅफेएरिया सामन्यात: महागडा आहे. पर्यटक
शक्यतो ट्रेकवरून परतताना येथे वेळ घालवितात.
इथून पुढे आपल्या प्रवासाचा दुसरा टप्पा
सुरु होतो जो आपल्याला टायगर नेस्ट ‘व्ह्यूपॉईंट’ पर्यंत नेतो. चालताना उजव्या
हाताला डोंगर उतारावर झाडंच झाडं नजरेस पडत होती. त्यांच्या विविध रंगाच्या शेड्स फोटो
क्लिक करायला भाग पाडत होत्या. कुणीतरी विचार करून गर्द आणि फिकट रंगाची झाडं
लावली असावीत, असंही वाटलं. व्ह्यूपॉईंट वरून आपल्याला मॉनेस्ट्री समोरच अगदी जवळ
दिसते. संपूर्ण मॉनेस्ट्रीचे देखणे फोटोज आपल्याला येथून टिपता येतात. आपण
इथपर्यंत आल्याच्या क्षणांनाही आपण कमेऱ्यात क्लिक करू शकता. ट्रेकिंग अनेकांना
चालून-चालून थकवा येऊन ते येथूनच फोटो घेऊन परत फिरतात. अशांसाठी सुरुवातीला
पहिल्या टप्प्यापर्यंतच्या प्रवासासाठी उपलब्ध असणारी खेचरे / घोडे आम्हाला उत्तम
पर्याय वाटतो. पारो रस्त्यावरून पाहाताना, जिथे पोहोचणे जवळपास अशक्य वाटते ते आता
इथे पोहोचल्यावर काहीसे सोपे वाटू लागते.
प्रवासाचा तिसरा पायऱ्या-पायऱ्यांचा टप्पा
येथूनच सुरु होतो. पहिल्यासह पुढील दोन्ही टप्पे आपले ट्रेकिंगचे कसाब पणाला
लावायला लावतात. अगदी शेवटच्या या टप्प्यात आपल्याला समोर मॉनेस्ट्री दिसत राहते
मात्र ती पलिकडच्या डोंगरावरील कड्यात असल्याने फूटभर उंचीच्या ४०० उतरून पुन्हा
३०० पाय-या चढण्याची कसरत करूनच मॉनेस्ट्रीत पोहोचता येते. तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या
४०० पायऱ्या उतरल्यावर आपण एक पूल पार करतो. पुलाच्या डाव्या हाताला मोठा धबधबा
कोसळताना दिसतो, याला पवित्र मानतात. पवित्र मानला गेलेला धबधबा, बौद्ध
धर्मात पवित्र मानल्या जाणा-या मंत्र लिहिलेल्या रंगीबेरंगी कापडी पताका आपले लक्ष
वेधून घेतात. येथून समोर पारो घाटीचे सौंदर्य तर डावीकडे कड्याला बिलगलेली ताक्सांग
मॉनेस्ट्री, डोळे मिटताक्षणी ध्यान लागावे इतकी शांतता, वातावरणात पवित्र
धबधब्याच्या कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून मानवी मन वेडं होऊन जातं. टायगर नेस्ट
मॉनेस्ट्रीच्या समीप पोहोचल्यानंतर समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट उंचीवरील ती
अनोखी शांतता आम्ही अनुभवली. रंगीबेरंगी पक्षी, वनराई यांनी युक्त
असलेल्या या ठिकाणी आम्हाला कायम थंडी जाणवली. इथपर्यंत आपण मोकळेपणाने,
काळजीपूर्वक फोटोग्राफी करू शकतो. पुढे प्रत्यक्ष ‘टायगर नेस्ट मॉनेस्ट्री’त
फोटोग्राफी करण्यास मनाई आहे. कॅमेरा, पिशव्या आणि मोबाईल सारख्या किमती वस्तू
सुरक्षित ठेवण्यासाठी बाहेर लॉकर उपलब्ध आहेत. सिक्युरिटी केबिन मध्ये तिकीट
दाखवून एन्ट्री केली की आपल्याला लॉकर मिळतं.
मॉनेस्ट्रीत पोहोचल्यावर समोरच्या दरीतले दृश्य
पहिले आणि मन प्रसन्न झाले. समुद्रसपाटी पासून १० हजार फुटावर पर्वताच्या एका कोपऱ्यात
आम्ही उभे होतो. नजरेसमोर धुक्याने भरलेली दरी होती. धुंद करणाऱ्या वातावरणात गारवा जाणवत होता. टेकडीच्या कड्यावर
बांधलेली मॉनेस्ट्री वरच्या दिशेने चार मुख्य भागांत विभागलेली आहे. या
मॉनेस्ट्रीबद्दल काही आख्यायिका आहेत. सर्वात प्रमुख मॉनेस्ट्रीत बौद्ध वज्रयान
पंथाचे गुरू आचार्य पद्मसंभवा यांचे स्थान आहे. एका लोककथेनुसार तत्कालिन सम्राट
पत्नी येशे सोग्याल स्वेच्छेने आचार्य पद्मसंभवा यांची पत्नी बनली. पुढे तिने
स्वतःला वाघीणीच्या रुपात बदलवून येथे आणले. या परिसरात एकूण आठ गुंफा आहेत. ज्या
वेगवेगळ्या गुरूंच्या नावाने ओळखल्या जातात. सन २००५ साली जपान सरकारच्या
सहकार्याने मॉनेस्ट्रीत सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. मंदिरात आचार्य पद्मसंभवा
यांच्यासह गौतम बुद्ध यांचे विशाल मूर्ती आहेत. मॉनेस्ट्रीच्या निर्मितीची कथाही आचार्य
पद्मसंभवा यांच्याशी संबंधित आहे. भूतानच्या लोककथांनुसार याच परिसरात ८ व्या
शतकात, आचार्य पद्मसंभवा यांनी ध्यानधारणा केली होती. तिबेटच्या
दिशेने एका वाघिणीच्या (काही लोककथांच्या नुसार ही वाघीण म्हणजे त्यांची पत्नी)
पाठीवर बसून या गुहेतील राक्षसाला मारण्यासाठी ते येथे आले होते. राक्षसाचा पाडाव
केल्यानंतर इथलं सुंदर वातावरण पाहून त्यांनी इथेच तीन महिने कडक तपश्वर्या केली. त्यानंतरही
त्यांनी तीन वेळा येथे तपश्वर्या केली होती. आचार्य पद्मसंभवा यांच्या आयुष्यात
त्यांनी असा मोठा मुक्काम फार कमी ठिकाणी केलेला असल्याने या ठिकाणाला अनन्यसाधारण
महत्व आहे. भूतानमध्ये बौद्ध धर्माची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. या
मॉनेस्ट्रीत भगवान गौतम बुद्ध आणि आचार्य पद्मसंभवा यांच्या मुर्त्या आहेत. प्रत्येक
मंदिरात प्रवेशद्वाराजवळील भिंतीनजीक बुद्धाची मूर्ती पाहिली. मंदिरात प्रवेश
केल्यावर सर्व प्रथम आसनास नमस्कार केला जातो. त्यानंतर मूर्तीस तीनदा गुढघे टेकून
नमस्कार करण्याची पद्धत आहे. मूर्तीस फुले / पाने / अक्षता / अगरबत्ती वाहण्याची
पद्धत नाही. प्रसाद म्हणून काहीही म्हणजे बिस्किट्स, मॅगी, वेफर्ससुद्धा
ठेवता येतात. सर्व प्रसाद एका मोठ्या फुलपात्रात ठेवला जातो. मूर्तीसमोर पातळ
केलेल्या डालडा तुपाचा दिवा लावतात. मूर्तींच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेल्या
रंगीत कमानी ठेवलेल्या पाहिल्या.
भगवान गौतम बुद्धांच्या २८ अवतारांपैकी
दुसरे बुद्ध ‘गुरू पद्मसंभवा’ यांनी भूतान मध्ये
बौद्ध धर्माचा प्रचार केला. यांच्या आणि बुद्धांच्या प्रतिमेत फक्त मिशांचा फरक
आहे, यांच्या चेहऱ्यावर पातळ मिशा असतात. यांना भूतानची संरक्षक
देवता मानले जाते. हिनयाना, महायाना आणि वज्रयाना या बुद्धिझम मधील ३
पंथांपैकी वज्रयाना पंथाला मानणारा हा देश आहे. यामध्ये नामस्मरण आणि शुद्धीकरणाला
महत्व आहे. प्रत्येक भूतानी माणसाने आयुष्यात कधीतरी एकदा या ठिकाणी यावं असा
भूतानमधला दंडक आहे. आचार्य पद्मसंभवा यांना स्थानिक भाषेत गुरु रिम्पोचे म्हणूनही
ओळखले जाते. गुरू पद्मसंभवा वाघिणीवरून ज्या गुहेतून या भागात आले त्या गुहेत
उतरल्यावर एका अवचित क्षणी हृदयावर प्रचंड दबाव आलेला जाणवला. कारण सुमारे १० हजार
फूट उंचीवर दोन मोठाल्या दगडांच्या कपारीत अरूंद मार्गाने खोल दरीत शिरून पारो
घाटीचा नजारा आणि टायगर नेस्ट पाहिल्याचा तो क्षण आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही.
हा सारा वारसा समजून घेतल्यावर आम्ही भगवान गौतम बुद्धांपुढे नतमस्तक झालो. सन
१६९३ मध्ये येथे मॉनेस्ट्री उभारण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी मॉनेस्ट्रीचे काम
होत राहिले. काही वर्षापूर्वी १९ एप्रिल १९९८ रोजी मॉनेस्ट्रीला आग लागल्याने रोपवेच्या
साहाय्याने आजची मॉनेस्ट्री नव्याने उभारली गेली. मूळ सांस्कृतिक ठेवा जतन
करण्यासाठी नंतर रोपवे काढून टाकण्यात आला. हे बौद्ध भिक्षूंचे विशेष वास्तव्याचे
ठिकाण आहे. मॉनेस्ट्रीच्या परिसरात भूतानची अद्भुत कला पाहाता येते. आपण पर्यटक
म्हणून फिरतो त्याच्या वरती विद्यार्थ्यांचे एक गुरुकुल आहे. हा सारा परिसर
पाहायला साधारणत २ तास पुरतात. ही मॉनेस्ट्री पूर्वेला असल्याने भर सकाळी
मॉनेस्ट्रीच्या मागून सूर्य उगवताना चांगले फोटो मिळवणे अवघड होते. परतीच्या
प्रवासात दुपारी सूर्य मॉनेस्ट्रीच्या बरोबर समोर आणि आपल्या मागे असतो तेव्हा
चांगले फोटो मिळू शकतात.
या ट्रेकिंग दरम्यान दिवसभर आम्हाला गार
वारा बोचत होता. डोंगरावरील चढाई हा एक विलक्षण
अनुभव असतो. आम्ही ताक्तसांग ट्रेकिंग दरम्यानही तो घेतला. गार वारा, गर्द झाडी, मळलेली
पायवाट आणि चढणीवर धापा टाकत उभे राहून, गुडघ्यावर हात ठेवून तर कधी झाडाच्या एखाद्या
बुंध्याला टेकून दम खाण्यातली मजा काही औरच ! टायगर नेस्ट मॉनेस्ट्री ट्रेकिंग
करताना खूप थकायला होतं. छातीतली हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येते. बागेत चालावं
इतक्या सहजतेने भूतानी बाया-बाप्यांना इथे चालताना पहिले की त्यांच्या मागे धापा
टाकत चालणाऱ्या आम्हाला आमच्या शारीरिक क्षमता समजतात. या जातायेताच्या ११
किलोमीटरच्या प्रवासात भूतानच्या सरकारने फक्त एकाच ठिकाणी पहिल्या टप्प्यावर
रेस्टोरेंटला परवानगी दिली आहे. ते वगळता इतर कोठेही कोणतीही खाण्याची व्यवस्था
नाही. त्यामुळे आपण आपल्याला आवश्यक ट्रेकिंग योग्य खानपान सोबत घेतलेले योग्य.
मात्र त्याचे रिकामे रॅपर्स मात्र रस्त्यात सोडू नयेत हेही तितकेच खरे ! या
मार्गावर आम्ही काही ठिकाणी रिकाम्या रॅपर्सचा कचरा पहिला, विशेष
म्हणजे तो आम्ही भारतीयांनीच केलेला होता. इथले स्थानिक मार्गदर्शक एकत्रितपणे
चढाईचा हा संपूर्ण मार्ग नियमित स्वच्छ करतात. पारोघाटीतील एका सरळ रेषेतील
सुळक्यावर टांगलेल्या अवस्थेत, पाहाताना आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास
बसणार नाही अशा ठिकाणी मॉनेस्ट्री उभी आहे. साहसी पर्यटन, ट्रेकिंग, दैनंदिन
चालण्याचा सराव असेल तर हा ट्रेक थोड्या श्रमाने आपल्याला यशस्वी करणे शक्य आहे.
भूतानमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर टायगर नेस्ट मॉनेस्ट्री अवश्य अनुभवा. तो
समृद्ध जीवनानुभव देऊन जाईल. त्यासोबतच भूतानमधील १६९ फूट उंच ग्रेटबुद्धा
डोरडेन्मा शाक्यमुनि मूर्ती, प्राचीन संस्कृती, परंपरा, उंचचउंच
डोंगररांगा, पर्यावरण, वास्तूंचे आर्किटेक्चर, येथील
खानपान अनुभवा. भूतानमध्ये २०० रुपयात तात्पुरत्या स्वरूपाचे पर्यटकांसाठीचे
मोबाईल सीमकार्ड उपलब्ध होते. ते फायदेशीर ठरते. पर्यटनासाठी मार्च ते मे तर
निसर्गाच्या संस्मरणीय अनुभूतीसाठी ऑक्टोबर ते जानेवारी हा कालावधी उत्तम आहे.
टायगर नेस्ट मॉनेस्ट्री भूतानमधील बौद्धधर्माचे
उगमस्थान आहे. "ओम मणि पद्मे हुम" या मंत्राच्या त्रिकोणी पताकासर्वत्र
पहिल्या. या पताका फडकल्याने मंत्रशांती हवेत दूरवर पोचते, अशी श्रद्धा आहे. टायगर
नेस्ट मॉनेस्ट्री हा जरा लांब पल्याचा अत्यंत कठोर ट्रेक आमच्या मानसिक आणि शारीरिक
क्षमतांची कठीण परीक्षा घेणारा ठरला. ९०० मीटर उंच चढून शिखर गाठण्याचा आनंदही
अवर्णनीय होता. भूतानच्या मॉनेस्ट्रीची भव्यता, भूतानची शिस्त,
परिस्थितीवर मात करून देशविकास करण्याची धडपड, हसरे चेहरे,
प्रदूषणमुक्त निसर्गसौंदर्य, डोळे दिपवणारी हिरवाई, स्वच्छ नद्या पाहून
मनाला जे समाधान लाभलं ते केवळ शब्दातीत.
धीरज वाटेकर
‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि.
रत्नागिरी.
मो. ९८६०३६०९४८
dheerajwatekar@gmail.com
(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत
पत्रकार आहेत.)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!
जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...
-
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष , वृक्षमित्र आबासाहेब मोरे हे सतत पर्यावरणाचा विचार करणारे एक अ...
-
कोकण पर्यटन विकास हा सातत्याने काम करण्याचा विषय आहे. अशी कामे करणाऱ्या अनेक कोकणी माणसांनी आपापल्या...
-
भारतीय आणि महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीच्या जडणघडणीत नाथपंथाचे खूप महत्वाचे स्थान आहे . संपूर्ण देशभरात हा समाज विखुरलेला आह...
-
ग्रामीण कोकणात आजही पावसाळ्यात असे नद्या-ओहोळ-नाले ओलांडावे लागतात कोकणच्या दऱ्याखोऱ्यातील माचाळसारख्या (रत्नागिरी) अनेक गावात आजही ‘पावसा...
-
मुंबईहून गोव्याला जाताना विश्रांतीचे पारंपारिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे चिपळूण. हाच विचार करून जगप्रसिद्ध हॉटेल ‘ताज’ने साधारणत सन १९८९ ते...