रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

स्वर्गीय अनुभूती देणारा 'वाघवरंडा' !


पावसाला परतीचे वेध लागल्यावर सह्याद्रीतील बहरलेला निसर्ग डोळे भरून पाहण्यासारखा असतो. फोटोग्राफीसाठी तर दिसेल तो क्लिक ‘उत्कृष्ठ’ असण्याचा हा काळ. हिरव्यागार निसर्गाची मानवाने केलेली सारी वर्णने ‘याचिदेही याचिडोळा’ पाहायला मिळतात ती आत्ताचं ! सह्याद्रीतील कोणत्याही घाटात, पठारावर, सड्यांवर, खोलदऱ्यांत, पाउलवाटांच्या सभोवती हमखास हे दृश्य नजरेस पडतं. या स्वर्गीय सौंदर्याचा पृथ्वीवरील कालावधीही फारसा लांबलचक नसतो. ‘तो कधी बहरेल नि कधी लुप्त होईल ?’ हे सांगणंही तसं कठीण. सह्याद्रीत, निसर्गात सतत भटकंती करणाऱ्या भटक्यांना अशा लोकेशन्सचा चांगला अंदाज असतो. मागच्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस (२९ सप्टेंबर २०१९) सह्याद्रीतील अशाच एका शब्दात सहज पकडता न येणाऱ्या निसर्गात रममाण होण्याचा योग आला. नव्याने होऊ घातलेल्या शिवडाव-सोनवडे-घोटगे घाट रस्त्याच्या पठारावरील नाईकवाडीची स्वर्गीय अनुभूती असलेल्या अन् टच ‘वाघवरंडा’ विषयी !

    नाईकवाडीचा 'वाघवरंडा' परिसर दुर्लक्षित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीहून पाटगावला जाणाऱ्या रस्त्याने आपण प्रवास करायला लागलो की पाटगावच्या अलिकडे ४ कि.मी. अंतरावर शिवडाव लागते. तिथून उजवीकडे वळले की तो रस्ता आपल्याला नाईकवाडीला घेऊन जातो. आपण थेट नाईकवाडीचा शेवटचा स्टॉप असलेल्या धनगरवाड्यापर्यंत पोहोचायचे. हे अंतर साधारण १ कि.मी. असेल ! पुढचा प्रवास पायी किंवा काही अंतरापर्यंत मोटारसायकलनेही करता येतो. इथून चालायला सुरुवात केल्यानंतर मिनिटभराच्या अवधीतच आपल्याला भव्यदिव्य निसर्ग दर्शन होणार असल्याची जाणीव होते, ही सड्यावरच्या निसर्गाच्या वेगळेपणाची किमया ! कोकणातून वर पाहाताना सोनवडे-घोटगे (कुडाळ) गावातून सह्याद्रीचे जे विशाल दर्शन घडते, त्या सह्याद्री पर्वतरांगेच्या विस्तीर्ण पठारावर आपण असतो. सुरुवातीला आपल्याला बारकासडाभेटतो. इथे तसे सगळे सडेच भेटतात. सध्याच्या वातावणात हिरवाईने फुललेल्या या सड्यांमधून वाट काढत चालण्याचा, प्रसंगी वाट चुकल्यास ती हुडकण्यातला आनंद शब्दात काय वर्णावा ? तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा. तर बारक्या सड्यावरून पुढे निघालो की किरवीसडाभेटतो. इथे किरवी (खेकडे) आढळतात. आम्हालाही काही दिसले. किरवीचा सडा सोडून काही वेळात आपण आपले मुख्य लक्ष असलेल्या वाघ वरंडायेथे पोहोचतो. हे ठिकाण त्या सह्याद्री रांगेच्या अगदी टोकाला आहे. तिथला डोंगराचा तुटलेला आकार, त्यातून दिसणारी खोल दरी, या दिवसात ज्यांच्याकडे नीटसे पाहायची पण हिम्मत होणार नाही असे जवळून कोसळणारे धबधबे दिसतात. या परिसराला वाघवरंडा का म्हणतात ? ते तिथे पोहोचल्यावर समजते. सारेच अतिभव्य, डोळ्यात न मावणारे धबधबे जिथून सुरु होतात, आपण तिथे असतो. सोसाट्याचा वारा असेल तर पाटणनजीकच्या (सातारा) उलट्या धबधब्याची आठवण व्हावी. इथल्या निसर्गाचा गंध, निसर्गाचा आवाज सारं रम्य ! खरंतर हाही एक कडाच ! याच्या खोल दरीत आपल्याला गडनदीचे दर्शन होते. या नदीचा उगम रांगणा किल्याच्या परिसरात असला तरी इथल्या धबधब्याचं पाणीही तिलाच भेटायला जातं. ही नदी कोकणात मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करताना कणकवलीच्या पुढे भेटते. कदाचित वाघाच्या येण्याजाण्याच्या मार्गाच्या संदर्भामुळे या ठिकाणाला हे नाव पडलेले असावे. वाघाच्या नावाने सह्याद्रीत नेमक्या ठिकाणांना अशी नावे दिलेली आढळतात. नाईकवाडीच्या धनगरवाडीतून वाघ वरंडा येथे पोहोचायला जेमतेम अर्धा तास लागतो. गारगोटीहून नाईकवाडी हे ठिकाण ३४ कि.मी. आहे. पावसाळा संपल्यानंतरच्या हिवाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात फुलांचे वेड संपत नाही. माहित असलेली-नसलेली सृष्टीतील असंख्य झाडे, वेली फुलतात. त्यामुळे या भागातील आमचाही जंगलप्रवास अनोखा, चैतन्यदायी, गूढरम्य, भौतिकसुखाची विसर पडणारा ठरला. इतका की त्या जंगलातील पायवाटांवरून चालताना, संवेदनशील मन मातीत, झाडाझुडुपात, पाखरांत, रानवाटात गुंतून पडलं नि वेळेचं भानही राहिलं नाही. हा सारा परिसर सध्या तरी एका अद्भूत निसर्गशक्तीचे माहेरघर बनून राहिला आहे. त्या उंच कड्यावरून खोल दरीत पाहाताना नजरेला दिसणारे दृश्य निव्वळ विहंगम होते. पायाखालची हिरवाई आकाशातल्या निळाईशी स्पर्धा करत होती. त्यावर लक्ष ठेवण्यासाठीच जणू जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांची पळापळ सुरु होती. हा घाटमार्ग सुरु झाल्यास कोकण पर्यटनासह या भागातील पाटगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराज यांचा मठ, भद्रकाली मंदिर, मौनीसागर जलाशय, स्वयंभू मंदिर, भगवान शंकराची प्राचीन सिद्धगुहा, रांगणा किल्ला, शिवकाळात संदेशवहनासाठी वापरात असलेले ठिकाण जोगाधोंडा, नाईकवाडीचे धबधबे, सोनवडे गावाला लागून असलेला शिवकालीन सोनगड किल्ला ही ठिकाणे पर्यटकांसमीप येतील. वाघ वरंड्याच्या पुढे या परिसरातील उंच ठिकाण किल्ले भुदरगडाच्या उंचीशी स्पर्धा करणारा या भागातील टकमक कडा, वाघबीळ असून हाही भाग खोल दऱ्याखोऱ्यांनी नटलेला आहे.

   कोल्हापूरहून सिंधुदुर्गमार्गे गोव्याचे अंतर किमान ४० किलोमीटरने कमी करणारा गारगोटी मार्गावरील हा घाट अस्तित्वात यावा याकरिता गेली चार दशके स्थानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या पथकाकडून या घाटमार्गाचे सर्वेक्षण होऊन सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन मंत्रालयाकडून ना हरकत दाखले अलिकडेच प्राप्त झाले आहेत. कोकणाला जोडणारा हा मार्ग कोल्हापूरातील ३.८४ कि.मी. तर सिंधुदुर्गमधील ८.०३ कि.मी. असा एकूण ११.८७ कि.मी. अंतर वनविभागाच्या हद्दीतून जात आहे. यात काही ठिकाणी उड्डाणपुल, लहानमोठे ब्रीज प्रस्तावित आहेत. अत्यंत विपरीत भौगोलिक परिस्थितीमुळे शिवडाव-सोनवडे-घोटगे हा ११.८७ किलोमीटर लांबीचा घाटमार्ग तयार होण्यास प्रारंभापासून तीन वर्षाचा लागू शकतो,  असे तज्ज्ञांचे मत आहे. अंतर कमी असले तरी परिसर पाहाता हे काम आव्हानात्मक असेल. या रस्त्यामुळे राधानगरी राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्याचे परिक्षेत्र बाधित होत आहे. त्यामुळे वन्यजीव भ्रमण, रस्ता ओलांडणे याकरिता आवश्यक छोटेपूल, रबलींग स्पीडब्रेकर, रस्त्यावर रंगीत पट्टे, माहितीफलक, इ. गोष्टी या मार्गावर असतील. वन्यजीवांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये असा प्रयत्न असणार आहे. या रस्त्यावर टनेलऐवजी उड्डाणपुल, ओव्हरपासेस, जागोजागी मोरी बांधकामे करण्यामागचा हेतू हाच आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा घाटमार्ग रात्रीच्यावेळी वाहतुकीस बंद असणार आहे. या परिक्षेत्रात हॉटेल्स आदि व्यवसाय करण्यास बंदी असणार आहे. सी.सी. टीव्ही कॅमेऱ्याद्वारे वन्यप्राण्यांच्या वावराच्या नोंदी ठेवण्यात येणार आहेत. या घाटमार्गात टोलनाका प्रस्तावित आहे. रस्त्यासाठी सोनवडे (सिंधुदुर्ग) ते शिवडाव (कोल्हापूर) या हद्दीत वृक्षतोड होणार आहे. तेवढ्या झाडांची नव्याने लागवड करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. विकासाच्या रूपाने रस्ता व्हावा म्हणून आपण जितके आग्रही असतो तितकेच आग्रही आपण वृक्षलागवडीसंदर्भात होणे आवश्यक आहे. सन १९८५ साली प्रथमतः या मार्गाची मागणी करण्यात आली होती. पुढे सन १९९९ ला या घाटास मान्यता मिळून प्रत्यक्ष काम सुरु झाले. मात्र या भागातील वन्यजीवांच्या संचारामुळे काम थांबले होते.

 वाघवरंडा सारख्या उन्हाळ्यात ओसाड पडणाऱ्या असंख्य कड्यांवर पावसाळ्यात नंदनवन फुलतं. हे वैभव पुढे हिवाळ्याचा काही काळ टिकून असतं. खरंतर पाऊस पडायला लागला की जमिनीवर पडलेल्या बिया, जमिनीतले कंद फुलतात. जमिन हिरवीगार होते. पठारावर, डोंगर उतारांवर रानफुले फुलतात. विविध जाती, रंग, आकार यांमुळे ती लक्षवेधक ठरतात. सप्टेंबर अखेर पर्यंत या फुलांची सड्यांवर चादर पसरते. सह्याद्रीतील असं पुष्पवैभवी पठार म्हटलं की आपल्याला कासची आठवण येते. अर्थात यायलाच हवी. कास पठाराइतकं पुष्पवैविध्य सह्याद्रीत इतर नाही. तरीही रानफुले पाहाण्यासाठी कास एकमेव नाही. सहज पाहाता येण्यासारखी या दिवसातील स्वतःची नैसर्गिक श्रीमंती सांभाळणारी खूप ठिकाणे-सडे पश्चिम महाराष्ट्रात-कोकणात आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून साधारण ८/१२शे मीटर उंचीवर पठारे आढळतात. कोकणातही समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंचीपर्यंत मोठाले सडे आहेत. या खडकाळ पठारांवर मातीचा अगदी पातळ असल्याने त्यावर मोठे वृक्ष, झुडपे वाढू शकत नाहीत. हे सडे वर्षातील ८ महिने कोरडे असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत तर हे सडे तव्यासारखे तापतात. पावसाळ्यात यांवर पाणी साचते. तळी, डबकी बनतात. शेवाळे आणि दगडफुलाचे (lichen) आवरण इथे हमखास भेटते. या पठारावरील वनस्पतींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची फुले होतं. पिवळी, गुलाबी, निळी, पांढरी, जांभळी फुले पाहून परागीभवन करणारे कीटक, माशा, मधमाशा, भुंगे, फुलपाखरे तिथे पोहोचतात. याद्वारे बीजनिर्मितीला मदत होते. दुर्दैवाने सरकारी नकाशात आजही अशा अनेक पठारांची नोंद ‘wasteland’ म्हणजे पडीक, नापिक जमीन अशी आहे. त्यामुळे त्यावर अनेक प्रकल्प उभारले गेलेत, जाताहेत. कोकणात तर चिर्‍यांच्या खाणीत या सड्यांचे अस्तित्व संपले आहे. लाखमोलाच्या जैवविविधतेचे नुकसान झाले, आजही होत आहे. आपल्या महाराष्ट्रातील पठारे अमूल्य ठेवा आहे. यावरील विविधता महत्त्वाची आहे. त्यांच्या संरक्षणासाठी योग्य ते प्रयत्न आवश्यक आहेत. आपण पाचगणीचे टेबललँड (पठार/सडा), कोल्हापूरजवळचे मसाई पठार, पुरंदरचे पठार, कराडजवळील वाल्मिकी पठार, कोकणातील सडे पाहिलेले असतात. पावसाळा वगळून अन्य वेळी ते तपकिरी शुष्क, कोरडे, उघडे दिसतात. या सड्यांवर स्थळविशिष्ट विविधता असलेल्या वनस्पती, कीटक, प्राणी, अल्पकाळ पाणी असले तरीही मासे, सरिसृप, वटवाघळे, पक्षी, फुलपाखरे, गवारेडे, बिबटे यांचा वावर असतो. स्थानिकांची गुरेढोरे तेथे चरतात. धनगर समाज बांधवांची संस्कृती तिथे नांदते.

   सृजन हो ! वाघवरंडासारखी सौंदर्याची परिसीमा गाठणारी पुष्कळ ठिकाणं सह्याद्रीत आहेत. दीर्घकाळ रमलेला यंदाचा पाऊस परततोयं ! सह्याद्री हिरव्यागार रंगाची सर्वत्र बेमालूम उधळण करतो आहे. निसर्गातील हिरवाई आपल्याला जगण्याची नवी उर्जा प्रदान करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिथे पोहोचल्यावर मिळणारा आनंद केवळ स्वर्गीय असतो. हे दृश्य इथून पुढच्या काळात दिवसागणिक धूसर होत जाईल. त्याची नजाकत अनुभवण्यासाठी आपलीही पाऊलं घराबाहेर पडायला हवीत ! आपल्या सह्याद्रीचा पश्चिम घाटमाथा जितका जंगलसंपदेने समृद्ध तितकाच विस्तीर्ण पठारानेही समृध्द आहे. अशाच वाघवरंडाची ही सफर आपण अनुभवलीत. आपल्याही अवतीभवती असे पठार, सडे असतील. सध्याच्या मौसमात त्यांवर जात चला ! निसर्गाचा आनंद घ्या. सड्यांवर पाऊलं वळायला लागली की त्यांना महत्व येईल. त्यांच्या जोपासनेचे, संवर्धनाचे महत्व समाजाच्या लक्षात येईल. निसर्ग जपला जाईल.

धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, ग्रंथ चळवळ, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)
                            
नाईकवाडीचा वाघ वरंडा

वाघ वरंडा कडे जाताना वाटेत साठलेल्या पाण्यात उतरलेले ढग 

वाघ वरंडा कडे जाताना वाटेत भेटणारा बारका सडा 

वाघ वरंडा सड्यावर स्थानिकाशी संवाद साधताना ब्लॉगलेखक  

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

विलोभनीय 'वाघचोरा' ऑर्किड !


सह्याद्रीतील रविवारची (२९ सप्टेंबर) निसर्गरम्य सकाळ ! अगदी ठरवून आदल्या रात्री शेणगावला पोहोचलेलो. उजाडताच भटकायला बाहेर पडलो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या फये या निसर्गसंपन्न भागातील धरणाच्या दिशेने निघालो. काहीच मिळालं नाही तरी निसर्गाच्या आल्हाददायक चैतन्यदायी दुनियेत काही क्षण घालविल्यावर शरीर आणि मन तजेलतं. आजही तसचं झालं. नाही म्हणायला तुरेबाज चंडोलची जोडी भेटली. पाठीकडून गडद बदामी-मातकट रंग त्यावर तुटक रेषा, पोटाकडून पांढरा रंग आणि पिवळसर रंगाचे पाय असलेल्या चंडोलसोबत काही क्षण घालविले. निसर्गातील उर्जा पदरात पाडून परतत असताना एका वळणावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक उठावदार, सहज नजरेत भरणारं पांढरसं ऑर्किड उमलेलं दिसलं. अशा प्रकारचं ऑर्किड मी पहिल्यांदाच पाहात असल्याने उत्सुकता वाढली. तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेतली तेव्हा ते विलोभनीय ऑर्किड ‘वाघचोरा’ असल्याचं कळलं.

ऑर्किड कुळातील ‘वाघचोरा’चे बॉटनिकल नाव Pecteilis Gigantea आहे. सामान्यत: याला बटरफ्लाय ऑर्किड या नावाने ओळखतात. तर स्थानिक भाषेत मिशीवाला, वाघचौरा, वाघचोरा म्हणतात. भारतात, दक्षिण-पूर्व आशिया वाढणारे हे उंच ऑर्किड साधारणत तीन फूट वाढते. बटरफ्लाय ऑर्किडचे नाव त्याच्या पंखांसारख्या आकारामुळे पडले असावे. याला अत्यंत आनंददायक सुगंध जाणवतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान याच्या फुलांचा हंगाम असतो. ही फुले सजावटीत वापरली जातात. याचे कंद वन्यजीव भक्षण करतात. त्यामुळे वाघाचोरा दुर्मीळ बनले आहे. सध्या सह्याद्री पट्यात सर्वत्र रानफुलांचा फुलोत्सव अनुभवायला मिळतो आहे. कासपठार हे त्याचे जागतिक मान्यताप्राप्त सर्वात समृद्ध स्वरूप होय. पावसाळा संपताच सह्याद्रीत खूप प्रकारची फुले फुलतात. यातली काही रात्री फुलतात. काही दिवसा ! काही सुवासिक असतात. काहींना वास नसतो. नजरेचे पारणे फेडणारे हे दृश्य असते. रानतेरडा, उदीचिरायत, आभाळी, दालगोथडी, सोनटिकली, लाजाळू, गेंद, पानभोपळी, वायुतुरा, अग्निशिखा, जांभळी, मंजिरी, गोवाळी, रायतुर, सोनकी, पांढरी कोरांटी, कंदीलपुष्प अशी बरीच नावं सांगता येतील. सगळ्यांचीच नाव आपल्याला माहित असतात असंही नाही. मात्र थोडी जिज्ञासा बाळगली की नावही कळू शकतात. नाव कळल्यावर त्या फुलाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन अधिक सजग, भावूक बनतो. अंततः समाधान पावतो. ‘वाघचोरा पहिल्यापासून त्याच्या नावाची उकल होईपर्यंतचा आमचा अनुभवही असाच होता.

यंदाच्या सरासरीपेक्षा अधिकच्या पर्जन्यमानाने सह्याद्रीतील सृष्टीला विलक्षण चैतन्य आले आहे. या पुढचा काही काळ हे चैतन्य असेच टिकून असणार आहे. सध्याचे दिवस फुलोत्सवाचे आहेत. मिळेल त्या जागी, रस्त्याच्या कडेला रानफुले उमलत आहेत. वाघचोरा पाहात बराच काळ त्याच्या अवतीभवती आम्ही घुटमळत होतो. त्याचा दरवळणारा मंद सुवास नाकात गेल्यावर तन्मयतेने त्याच्याकडे पाहताना ते फूल अत्यंत आनंदी असल्याचे जाणवत होते. त्याच्या आनंदी असण्याने सभोवतालचा निसर्गही आनंदून गेला होता. पत्रकार मित्र सुभाष माने, फोटोग्राफर विजय पाटील, माझा सहकारी महेंद्र पाटील यावेळी सोबत होते.


(@ २०२१ ताजा कलम : यंदाच्या १६ सप्टेंबरला सह्याद्रीतील तिवरेमधून तर काल (२८ सप्टेंबर) आबलोलीतील प्रगतशील शेतकरी आणि समृद्ध आणि दुर्मीळ पक्षी वैभवाच्या आधारे कृषी पर्यटनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे मित्र सचिन कारेकर यांनी वाघचोराचा फोटो पाठवला. वाघाचोरा दुर्मीळ ऑर्किड आहे. हे ऑर्किड पाथर्डे (राजापूर) भागातही असल्याची नोंद कातळशिल्पांचे संशोधक-अभ्यासक धनंजय मराठे यांनी कळविली.)


धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८, ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)


दैनिक रत्नागिरी एक्स्प्रेस १३.१०.२०१९ 


रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

आदर्श प्राध्यापक हरपला !


आपल्या अवतीभवती जे घडते त्यातील महत्त्वाचे काही नोंदवायचे असते ही दुर्मीळ जाणीव जपणारे, आपल्या लिखाणातून सतत ती व्यक्त करणारे, या वाटेवरून चालणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना प्रोत्साहन देणारे चिपळूणच्या डी.बी.जे. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त, आदर्श प्राध्यापक मधू जाधव यांचे दिनांक २५ ऑगस्ट (रविवार) रोजी सोलापूर मुक्कामी दु:खद निधन झाल्याची पोस्ट वॉट्सअपवरून समजली. धक्काच बसला. लौकिकार्थाने सरांचा विद्यार्थी नसलेला मी अस्वस्थ मानसिकतेत थेट सन २००२ सालात पोहोचलो !

सन १९७४ ते २००९ इतका प्रदीर्घ कालावधी चिपळूणात प्राध्यापकीय जीवन जगलेल्या सरांची आणि माझी पहिली भेट झाली २००२ सालच्या मराठा साहित्य संमेलनात ! चिपळूणच्या ग्रामीण पत्रकारितेत काहीतरी करण्यासाठी धडपडत असलेल्या मला या संमेलनाच्या स्मरणिकेच्या संपादन समितीत काम करण्याची संधी मिळाली. विषय माझ्यासाठी नवीन होता. मार्गदर्शक होते, अर्थातच जाधव सर ! तेव्हापासून सरांसोबत संवाद सुरु झाला आणि असंख्य स्मरणिका, विशेषांकांचे संपादन, पुस्तकांचे लेखनही ! सन २०१८ साली आम्ही आमच्या ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ या जीवनकथेवरील अभिप्राय पुस्तिकेकरिता, चरित्रनायक परांजपे गुरुजींच्या सूचनेनुसार सरांशी संवाद साधला. त्यांना, आम्ही लिहिलेली काही पुस्तके भेटही पाठविली. सरांनी ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ यावर ‘बेस्ट वर्ड्स ईन बेस्ट ऑर्डर’ या शब्दात आपला अभिप्राय पाठविला. सर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आमची इतर भेट पुस्तकेही वाचली. त्यातल्या ‘कृतार्थीनी’ या मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांच्या चरित्र पुस्तकात आम्ही नीटशा माहिती अभावी ‘मोघम’ कॅप्शनसह छापलेला विद्यार्थी वसतिगृहाच्या कोनशीला अनावरण प्रसंगीचा फोटो पाहून, तात्काळ फोनवर ‘हा चिपळूणच्या डी.बी.जे. कॉलेजचा असून त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी केले होते’ असे सांगून उत्तम माहितीही दिली. आपल्या देशात गावागावात, कानाकोपऱ्यात विलक्षण काम करणारी माणसं आहेत. त्यांच्या जीवनाला शब्दबद्ध करायला हवं. या ठाम मताचे सर होते. आमची ती पुस्तके वाचून सरांनी आपली अलिकडची तीन पुस्तके भेट पाठविली, आवर्जून अभिप्रायही मागितला. त्याबाबत फोनवर बोलणंही झालं ! मात्र लेखी अभिप्राय द्यायचा राहिला तो राहिलाचं ! ती तीनही पुस्तकं सरांच्या आपल्या अवतीभवती जे घडते त्यातील महत्त्वाचे काही नोंदवायचे असते या भूमिकेशी सुसंगत आहेत. सोलापूरचे शिल्पकार पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद (रावबहादूर मल्लप्पा बसप्पा वारद), उद्योगरत्न श्री. ए. जी. पाटील ; एका संघर्षाची कहाणी आणि तिसरे आहे होनमुर्गीचे संत श्री सद्गुरू जंगली महाराज (मोहम्मदशाह उर्फ जंगलीशाह दाऊदशाह कादरी) यांचे ! पुण्याच्या जंगली महाराज रोडवर एक तपाहून अधिक काळ माझे जाणे-येणे आहे. मात्र त्या मूळ स्थानाची सरांनी दिलेली, सोलापूरच्या होनमुर्गी गावात आपल्याला घेऊन जाणारी माहिती यापूर्वी वाचलेली नव्हती.  

तीन तपाहून अधिक काळ सरांनी साहित्य, इतिहास, संत, समाजसुधारक या विषयांच्या अवतीभवती राहून आपला जीवनकाळ सफल केला. अलिकडेच सरांच्या २२ व्या कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांच्या जीवनावरील पुस्तकाचे २७ नोव्हेंबर २०१८ ला ना. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. ‘सोलापूर जिल्हा पर्यटन’ पाठोपाठ सध्या सर ‘अक्कलकोट दर्शन’ लिहित होते. चिपळूणातून, कोकणातून त्यांच्याकडे जाणाऱ्या स्नेहींना ते आपणहून अभ्यासपूर्ण अक्कलकोट दर्शन घडवितं. आम्हांलाही त्यांनी यायला सुचविले होते, पण तेही राहिले. या पुस्तकानंतर ‘संत गाडगेबाबा’ यांच्या जीवनावर विस्तारपूर्वक लिहायचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. खरंतर गाडगेबाबांविषयी आम्हांलाही अतीव आदर असल्याने आम्ही, ‘आपले पुस्तक वाचावयास उत्सुक आहोत’ असे त्यांना बोललो होतो, आता तेही राहिले. सरांचे विवेकवादी लेखन, आकाशवाणीवरील व्याख्याने इथल्याप्रमाणे सोलापूरातही सुरूच होती. सरांच्या भूत भानामती जादूटोणा आणि शोध भुताचा या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कारही मिळाले होते. आदर्श प्राध्यापक, प्रौढशिक्षण कार्यकर्ता, व्यसनमुक्ती कार्य, महाराष्ट्र शासनाचा ‘दलितमित्र’ पुरस्कार त्यांना मिळाला होता. आपल्या कामासोबतच ते कन्या भक्ती हिच्या जलचळवळ अभियानचे खंबीर पाठीराखे होते. स्वतःची पदरमोड करून सुरु असलेला भक्तीचा हा प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी ते सुरुवातीपासून गेली ८ वर्षे सोबत राहिले. परवाच्या ९ ऑगस्टला भक्तीने फेसबुकवर, ‘उजनीतील पाण्याने हिप्परगा तलाव भरणार, पप्पांचं - आमचं स्वप्न पूर्ण होतंय, धन्यवाद. सोलापूरला आल्याचे सार्थक झाले, लाखोंना पाणी मिळेल !’ अशी पोस्ट लिहून आपला आनंद व्यक्त केला. तो सरांनी सरांनी ‘याचि देहि याची डोळा’ अनुभवला आणि अवघ्या दोनेक आठवड्यात सर गेले ! हा सरांच्या कुटुंबियांवर मोठा आघात ठरला आहे.  
       
जेष्ठ संपादक, नानासाहेब जोशी यांनी, ‘चिपळूणला मिळालेले वैभव’ अशा शब्दात सरांचा गौरव केला होता. त्याचा अर्थ जाधव सरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेल्या ‘ज्ञान जान्हवीचा प्रवाह’ या डी.बी.जे. कॉलेजच्या साडेतीन तपाची वाटचाल सांगणाऱ्या ग्रंथाकडे पाहाताना कळतो. अशा प्रकारचे ग्रंथ सिद्ध करताना, यापूर्वी असे काम केलेल्यांचा संदर्भ समोर ठेवून काम करण्याची सरांची सवय, आपल्यालाही असल्याबाबत आम्हांला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले होते. असो ! सरांनी देहदान केले होते. त्यांचे अचानकचे जाणे सहृदयांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

धीरज वाटेकर  

२२ व्या पुस्तक प्रकाशन प्रसंगीचा क्षण !

दैनिक सकाळ रत्नागिरी २५ ऑगस्ट २०१९  

दैनिक सकाळ सोलापूर ३१ ऑगस्ट २०१९














सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

एक ‘संजय’ मलाही भेटला !



निश्चित तारीख नि वार डायरीत शोधावा लागेल ! पण पावसाळ्याचे दिवस होते. सायंकाळची चहाची वेळ ! ठिकाण बहुधा तृप्ती हॉटेल असावं ! लिहिलेलं मनाजोगं छापून येतं नसल्याच्या, नाराजीत वावरत असलेल्या मला त्या दिवशी संजय सहजच बोलून गेला. ‘कुठल्यातरी पेपरला जॉईन हो ! लिहिलेलं छापून यायला तेही आवश्यक असतं.’ झालं ! त्याच्या या वाक्याने पुर्वानुभावामुळे ‘पत्रकार’ होण्याची इच्छा नसलेला मी केवळ आपलं लिहिलेलं छापून येईल या एका आशेने पुन्हा पत्रकारितेकडे वळलो. त्यात रुळलो आणि जवळपास १२/१४ वर्षे वावरलोही ! आज या घटनेला, संजयच्या जन्मतारखेएवढी वर्ष पूर्ण होताहेत. ‘संजय’ स्वतः कसा आणि किती बहरला ? याबाबत आत्ताच एक्कावनीच्या उंबरठ्यावर मांडणं कदाचित घाई-घाईचं होईल. पण त्याच्या सहज स्वभावातून, बोलण्यातून, गुदगुदल्यांतून, माणूस जोडो अभियानातून अनेकांचं निभावल्याचं मी तरी पाहिलंय ! ही यादी मोठी आहे. या मागची कारणं शोधताना, का कुणास ठाऊक ? पण कायम मला महाभारतातला संजय आठवतो आणि मी म्हणतो, ‘एक संजय मलाही भेटला.’    
 
महाभारतातल्या संजयला सगळेच ओळखतात. हा संजय आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होता. तो धृतराष्ट्राला नेहमी सल्ला देत असे. अंध धृतराष्ट्राने महाभारत युद्धाची प्रत्येक घटना या संजयच्या वाणीने ऐकली होती. असो ! प्रस्तुतच्या गौरवांकाची गौरवमूर्ती असलेला आमचा संजय आज वयाची ५० वर्षे पूर्ण करून ५१ व्या वर्षात पदार्पण करतोय ! यशस्वी आयुष्याचा अर्धशतकी टप्पा त्याने पूर्ण केला आहे. आमचाही संजय आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. माझ्यासह अनेकांना त्याने आजवर अनेक उपयुक्त सल्ले दिलेत. आपल्या पोटापाण्याच्या ठिकाणावरील कामाचा, तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाचा बरोबर अंदाज घेत, त्याचा उपयोग करून स्वतःकडे, शिल्लक असलेला ‘वेळ’ दुसऱ्या कामात गुंतवून पदरात यश पाडून घेण्याचं फार कमी लोकांना जमलेलं कौशल्य संजयने जमवलंय ! यामागचं त्याचं तत्वज्ञानही खूप साधं, सरळ नि सोपं आहे. नोकरीच्या निमित्ताने तो गाणे-खडपोली एम.आय.डी.सी.तील जे. के. फाईल्स कंपनीत कामगार म्हणून रुजू झाल्यावर दुपारी साडेतीन नंतरचा वेळ शिल्लक असल्याचे त्याच्या लक्षात आले. सुंदर हस्ताक्षर असलेला संजय अधिकचे काय करता येईल ? याच्या शोधात असताना त्याला ‘पत्रकारिता’ हे क्षेत्र गवसले. कंपनीतील निळ्या कपड्यांचा त्याने त्याच्या मानसिकतेवर कधीही परिणाम होऊ दिला नाही, हे त्याच्या विनोदी जगण्याच्या पद्धतीचे सर्वात मोठे यश मानायला हवे. तो कार्यरत असलेल्या कंपनीत, पंचक्रोशीतल्या जवळपास साऱ्या गावातील सहकारी असल्याने गावोगावच्या ताज्या घटना त्याला एकाच ठिकाणी कळायच्या. बोलका, विनोदी स्वभाव असल्याने त्याचं तेव्हाही आणि आजही कुणाशीही जमतं. या मिळकतीच्या जोरावर संजयने पत्रकारिता यशस्वी केली. तेव्हा या भागात हा एकटाच पत्रकार म्हणून कार्यरत होता. शैलीदार बोलण्यामुळे तो हसतखेळत बातम्या मिळवायचा. त्याच्या या बातम्यांनी ‘तरुण भारत’ वृत्तपत्राच्या रत्नागिरी आवृत्तीचा सुरुवातीचा काळ गाजविलायं. कोयना प्रकल्प अस्तित्वात येत असल्याच्या कालखंडापासूनचा अलोरे पंचक्रोशीचा ‘संजय’ हा एक चालता-बोलता इतिहास आहे. आज सोशल मिडीयाच्या जमान्यात त्याच्या फेसबुकवरील पोस्ट वाचल्यावर प्रतिसाद म्हणून जो आठवणींचा पाऊस कमेंटमध्ये पडतो, तो पहिला की याची जाणीव व्हावी. आपल्याला कशाकशातलं किती कळतं ? यात अडकण्यापेक्षा आपल्याला जे काही कळतं, त्याचा सर्वोत्तम उपयोग करून आयुष्य सार्थकी कसं लावावं हे संजयकडून शिकावं !    
   
आता सोशल मिडिया अधिक प्रभावी झालायं ! मनातलं सगळं पेपरात छापता येतचं असं नाही. मग संजय या सोशल मिडियाचा सहज वापर करताना दिसतो. अलिकडच्या काळात अलोरेतील देवमाणूस असलेले डॉ. पी. डी. पांढरपट्टे यांनी वयोमानपरत्त्वे, निवृत्तीनंतरही सुरु असलेला आपला दवाखाना बंद करून मुलाकडे जाण्याचा निर्णय घेतला. संजयला कळले. त्याने ‘देवमाणूस दूर चाललायं, हे वेदनादायी आहे’ म्हणत आपल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचविल्या. अलोरे हायस्कूलने आपल्या सन १९७२ पासूनच्या विद्यार्थ्यांना एकत्र करायचं ठरवलं. त्यात याला आपला शालेय मित्र अनिल रायबागी भेटला. विप्रो या नामवंत उद्योग समूहाचा व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत असलेल्या मित्राशी संजय ज्या आत्मीयतेने एकरूप झाला ते कौतुकास्पद होते. शाळेनेही प्रत्यक्ष कार्यक्रमात रायबागींचा सन्मान संजयच्याच हस्ते केला. असंख्य राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या व्यंकटेशराव कररा यांच्यासोबत सुरुवातीच्या कठीण काळात उभे राहणाऱ्यांपैकी संजय एक जबाबदार घटक आहे. चिपळूणच्या पूर्व भागात असलेल्या दसपटीतल्या व्यक्तिमत्त्वांचा याला प्रचंड अभिमान ! तो त्याच्या लेखणीतूनही जाणवतो. याच अनुषंगाने त्याने दैनिक तरुण भारतमध्ये पूर्वी ‘बॉर्डर’ नावाचे सदर चालविले होते. आजही तो या भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वांविषयी लिहित असतो. पूर्वीचं हे सगळं लेखन त्यानं सांभाळलं असतं तर आज एक सुंदर पुस्तक झालं असतं. स्वतः गुणवंत कामगार ठरल्यानंतर त्याने इतरांना प्रेरणा दिली. कामगार कल्याण मंडळाचे उपक्रम समाजातील कामगारांपर्यंत पोहोचावेत म्हणून तो आजही धडपडत असतो. गप्पांच्या निमित्ताने घडलेला एखादा जुना गंमतीदार किस्सा जसाच्या तसा पुन्हा उभा करून सांगण्यात त्याचा हातखंडा आहे. सहजतेने मनातलं सगळं बोलून मोकळं होण्याचा त्याचा स्वभाव अनेकांना आवडतो. या स्वभावाने कधीकधी त्याचं नुकसानही होतं ! पण संजयला त्याची फारशी चिंता नसते. ‘पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेलं पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !’ असं म्हणणाऱ्या व. पु. काळेंच्या लिखाणाचा संजयवर मोठा पगडा आहे. वाचनाची गोडी लागायच्या सुरुवातीच्या कालखंडात त्याने त्यांचीच पुस्तके अधिक वाचलीत. हे त्याच्या बोलण्याच्या शैलीवरून कुणालाही लक्षात यावं. कुणाला पटो अथवा न पटो ! आपल्या साऱ्या कुटुंबियांसह जवळच्या अनेक मित्रांच्या अडचणींच्या प्रसंगी धावून जाणारा संजय अनेकांना माहिती आहे. किंचित उशीरा लक्षात आल्यानंतरही झपाटल्यासारखा तो श्रद्धा वहिनीच्या मागे उभा राहिला, तिचे शिक्षण त्याने पूर्ण होऊ दिले. अर्थात वाहिनीनेही त्याच्या विश्वासाचं चीज केलं. ‘शिक्षिका’ म्हणून वाहिनीची आजची असलेली ओळख निश्चित कौतुकास्पद आहे. त्याच्या दोनही गुणवान लेकरांच्या प्रगतीचा आलेख कुणालाही हेवा वाटावा असाच राहिला आहे. त्याचा आजचा गौरव सोहोळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला आईचं असणं जितकं आनंददायी आहे तितकंच अण्णांचं नसणं वेदनादायी आहे.        

मी व्यावसायिक, सामाजिक स्तरावर कार्यरत होतानाच्या कालखंडातल्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी ‘संजय’ एक आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातलं चांगलं-वाईट जवळून अनुभवलेल्या संजयने, वयाने तब्बल ११ वर्षांनी मोठा असूनही जसं माझ्यासारख्याला मित्र म्हणून सहज स्वीकारलं, तसं अनेकांना स्वीकारलेलं आहे. माझ्या लग्नाचा सन्माननीय निमंत्रक राहिलेल्या संजयविषयी सांगण्यासारख्या खूप काही आठवणी माझ्याजवळ आहेत, तशा त्या अनेकांजवळ असणार आहेत. आजपासून काळ जसजसा पुढे जात राहिलं तसतशा त्या उलगडत जातील ! उलगडणाऱ्या अनेकांच्या आठवणींमधून एक माणूस म्हणून ‘संजय’चे व्यक्तिमत्व समाजात अधोरेखित होईल ! या साऱ्या शुभेच्छांतून नवचैतन्याने भारलेले संजयचे व्यक्तिमत्त्व समाजाच्या प्रत्येक हाकेला ‘ओ’ देण्यासाठी अधिक क्षमतेने कार्यरत होईल, या विश्वासासह !

धीरज वाटेकर

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...