बुधवार, ४ मार्च, २०२०

माचणूरचा महाशिवरात्रोत्सव







देशभरातील श्रीशिव मंदिरात नुकत्याच (दिनांक २१ फेब्रुवारी २०२०) संपन्न झालेल्या महाशिवरात्रोत्सवाच्या निमित्ताने यंदा अचानक योगावर सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र माचणूरला पोहोचलो. पूर्वी कधीतरी महाराष्ट्राचा शिवकालीन इतिहास वाचताना माचणूर भेटलेलं ! ते मनात घर करून होतचं. महाशिवरात्रोत्सवाच्या निमित्ताने माचणूर जायचं निश्चित झाल्यावर गाव नीटसं समजून घेतलं. दरवर्षी माघ महिन्यात चंद्र मावळण्याच्या टप्प्यावर (कृष्णपक्ष त्रयोदशी) महाशिवरात्रीपासून पाच दिवस येथे हेमाडपंती श्रीसिद्धेश्वर मंदिरात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोव्यातून आलेल्या जवळपास लाख-दीड भाविकांच्या उपस्थितीत भव्य यात्रोत्सवात अध्यात्मिकता आणि निसर्गाचा संगम अनुभवता येतो. उत्सवादरम्यान दृष्टीस पडलेलं संस्मरणीय माचणूर गाव अनेक अर्थांनी मुद्दामहून पाहण्यासारखं असल्याचं जाणवलं. त्याचा आढावा...!
नुकतीच शिवजयंती संपन्न झालेली. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होताच रस्त्यात ठिकठिकाणी दिसणारे भगवे झेंडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजलेल्या मूर्ती, पळस फुलवून निसर्गाने केलेली केशरी रंगाची अधिकची उधळण मनाचा ठाव घेऊ लागली. दूरवर पसरलेली काळी जमीन हे या मंगळवेढा भागाचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेलं मंगळवेढा ! माचणूर गाव सोलापूरपासून ४३ कि.मी. तर मंगळवेढापासून १४ कि.मी., पंढरपूरपासून २१ कि.मी. अंतरावर आहे. प्रवासात ठिकठिकाणी रस्त्याच्या शेजारी असलेले बैल-म्हशींचे गोठे, सरळ छप्पराची घरं, चिंचेच्या झाडांच्या सावल्या, ज्वारीची शेतं, शुगर मिल, धुरळा उडवणाऱ्या रस्त्यांवरचीताळ्याची दुकानं बघतबघत सकाळी ११च्या सुमारास माचणूरला पोहोचलो. पंढरपूर-मंगळवेढा-सोलापूर मार्गावर असलेल्या माचणूरात पोहोचल्यावर मुख्य रस्त्याच्या उजव्या दिशेस असलेल्या रस्त्यावरील स्वागताच्या कमानीने लक्ष वेधून घेतलं. गावात पोहोचलो तेव्हा यात्रोत्सवाचं वातावरण हळूहळू आकार घेत होतं. उत्सवातील जबाबदार घटक, तरुण, बायाबापड्यांच्या रस्त्यावरच्या हालचाली, स्वतःहून पुढे होऊन अधिकची माहिती देण्याची सहकार्य भावना त्यांच्यातला उत्साह दर्शवित होती. नेहमीप्रमाणे इथल्याही रस्त्याची दुरवस्था जाणवली. रस्त्यावर खडी आणि धुळीचे साम्राज्य दिसले. शासकीय नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन व्यवस्थांनी हा रस्ता आपल्या कक्षेत येत नसल्याचे सांगून हात झटकल्याची वृत्तपत्रीय बातमी वाचनात आली. गंमत वाटली. अशा या कामसू कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा कमी व्हावा म्हणून महाराष्ट्रात ५ दिवसांचा आठवडा होऊ घातला असावा. असो !
मुख्य रस्ता सोडून थोडं पुढं गेल्यावर काही मिनिटातच रस्त्यावरच्या आडव्या बॅरिकेट्सनी आम्हाला थांबवलं. अगदी उजव्या बाजूला असलेल्या शेतात, यात्रेत आलेल्या दुकानांची गर्दी दिसली. सुरक्षा आणि पार्किंगच्या कारणास्तव पोलिसांच्या सूचनेनुसार गाडी पार्क केली. परिसरात पोहोचलो असलो तरी मंदिर अजूनही किंचित दूर होतं. इतक्यात जवळच्या मोठाल्या जंगली वृक्षांकडे लक्ष वेधलं. या जुन्या वृक्षांवर वाटवाघळांची वसाहत मुक्कामाला असल्याचे दिसले. वटवाघूळ ! उडणारा सस्तन प्राणी. अतिदुर्लक्षित जीव. सकाळची वेळ असल्याने आळसावलेली वाघळं आरडाओरड करीत जागी होत होती. एखादं-दुसरं वयस्कर वाघूळ थोडंफार उडून परत जागेवर बसताना दिसलं. या नववर्षारंभी आमच्या घराच्या टेरेसवरही दोन-तीन लहानशी वाटवाघळं काही दिवस मुक्कामाला होती, त्यांची आठवण झाली. झाडाच्या फांद्यांना एखादे काळसर फळ लटकावे तशी वाघळं दिसत होती. न चुकता ही वाघळं रात्रभर निसर्गात बिया लावण्याचे काम करीत असतात. पिकलेली फळं यांनाच पहिल्यांदा कळतात. आपल्यासारखी चुकीची विदेशी झाडं ही वाघळं लावत नाहीत, की सेल्फी घेत नाहीत. कॅमेऱ्यात त्यांचे फोटो घेतले.
यात्रोत्सवानजीक पोहोचलेलो. बाहेरच्या रिकाम्या शेतात जागा मिळेल तिथे अनेकांनी विविधांगी दुकानं थाटलेली. मेवा, मिठाई, हॉटेल, जनरल स्टोअर्स, नारळ, रसपानगृहे, खेळण्यांची दुकाने, आकाशपाळणे आदिंनी यात्रा परिसर फुलून गेलेला. यात्रोत्सव पाच दिवसांचा असल्याने इथे मला साबण, टूथपेस्ट आणि किरकोळ डाळ-भात-भाकरीसाठी लागणाऱ्या किरणा मालाचं दुकानही भेटलं. साबण नि टूथपेस्ट तशी मला नवीन होती. त्या दुकानदाराजवळ थोडं बोललोही. कोकणातून आलोय म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता जाणवली. होणारी गर्दी ओळखून मंगळवेढा, सोलापूर, सांगोला एस.टी. आगाराने जादा बसेस सोडलेल्या. दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था. जोडीला पोलीस आणि कमांडो यांचा बंदोबस्त. मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या सरळ रस्त्यावर उजव्या हाताला आणखी एका स्वागत कमानीच्या बाहेर श्रीसिद्धेश्वर अन्नछत्र चॅरिटेबल ट्रस्ट यांचा स्टॉल दिसला. स्टॉलची जागा मला आवडली. तिथे थोडी माहिती घेतली. कमानीतून आत गेलो तर समोरच्या दुकानात बेकरीत मिळणाऱ्या तयार फरसाणमधील सारे घटक पदार्थ वेगवेगळे बसलेले दिसले. यात्रेकरूंच्या मागणीप्रमाणे ते तागडीत काय ते एकत्र येतजात होते. कायम तयार फरसाण घेणारा मी एकत्र येतानाचे हे दृश्य पाहात राहिलो. इतक्यात कुठूनतरी कानावर आवाज आला, ‘यात्रेमध्ये आम्ही प्रथमच घेऊन येत आहोत, एटीएम कार्डाचं लेदर पाकीट’ आयडियाच्या कल्पनेनं दूरवर कोणीतरी पाकिटं विकत होता. आता नजरेसमोर मंदिराचे पहिले प्रवेशद्वार स्पष्ट दिसत होते. एरव्ही शांत असलेला हा सारा रमणीय आणि पवित्र मंदिर समूह परिसर आज कमालीचा गजबजलेला होता. पुढचे पाच दिवस असाच राहणार होता. यावर्षी आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे अधिक गर्दी जाणवत होती. मंदिरावरील विद्युत रोषणाई नजरेत भरणारी. पहाटे लवकर आलेली यात्रेकरू, भक्तमंडळी, दुकानदार लोकं, त्यांची लेकरं दर्शन आटोपून जवळच्या झाडांच्या सावलीला गोल करून न्याहारीला बसलेली. बहुतेकांच्या ताटात उपवासाचं काहीतरी होतंच.
नाथपंथी श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांच्या साधक निवास इमारतीवर भगवा झेंडा फडकताना दिसला. प्रथमत: नकळत, जवळच असलेल्या त्यांच्या समाधी मंदिरात पोहोचलो. तिथे उजव्या कोपऱ्यात समईची वात मंद प्रकाश देत जळत होती. भक्तांची येजा सुरू होती. भक्तच असले तरी प्रत्येकाच्या नतमस्तक होण्यात वेगळेपणा होता. भींतीवर लावलेल्या महितीफलकावर काहींची नजर स्थिरावायची. काही आपले असेच होते. असंख्य महात्म्यांच्या वास्तव्यामुळे आध्यात्मिकतेने स्पंदित असलेले हे श्रीक्षेत्र माचणूर सर्व पंथाच्या साधकांसाठी उत्तम साधनाक्षेत्र असल्याचं पूर्वी वाचलेलं होतंच, ते जाणवलं. स्वतःसोबत असलेला दिवा, अगरबत्ती प्रज्ज्वलित केली. काही काळाकरिता ध्यानाला बसलो. श्रीक्षेत्रमाचणूर येथून वाहणारी भीमा नदी ही तिच्या प्रवाहाच्या चंद्रकोराकृति दर्शनामुळे चंद्रभागा नावाने ओळखली जाते. या चंद्रभागेच्या नाभीमध्यावर व भूगर्भरेषेवर श्रीक्षेत्र माचणूर आहे. त्याच कारणाने तपस्येसाठी हे स्थान फार दुर्मीळ ! परमेश्वर, साधुसंत आदिंचे क्षणभर वास्तव्य लाभलेल्या भूमी ह्या तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात. माचणूराला अशा महासिद्धांचे दीर्घकाळ वास्तव्य लाभलेले तपस्याक्षेत्र आहे. नीरा-नरसिंहपूरपासून पुढे पंढरपूर, माचणूरपर्यंत पसरलेला भीमाकाठचा परिसर प्राचीन हरिक्षेत्र म्हणून ओळखला जातो. जगद्गुरू श्रीरेवणसिद्धांशी माचणूरचा संदर्भ जोडला जातो. यक्षमिथुनांचा उद्धार, विक्रमादित्याला खड्ग प्रदान, बारा हजार कन्यांचे बंध विमोचन या त्यांच्या लीला माचणूर संदर्भीय असाव्यात. इथल्या ‘सिद्धेश्वर’ नावाचा आणि त्यांच्या संचाराचा संबंध असल्याने हे देवालय जगद्गुरू श्रीरेवणसिद्धकालीन असावे. ही भूमी नाथपंथी सिद्धांचे ठाणे म्हणूनही ओळखली जाते. महायोगी श्रीगोरक्षनाथ, श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ, श्रीकाशिनाथ महाराज, श्रीशंकर महाराज, श्री बाबामहाराज आर्वीकर यांचे वास्तव्य या भूमीत होते. हा भाग पूर्वी जंगलमय असावा. श्रीशंकर महाराजांच्या बालपणीच्या श्री स्वामी समर्थांसोबतच्या कथांत इथल्या जंगलाचा उल्लेख येतो.
श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांनाही दीर्घ तपस्येअंती अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांनी, ‘माचणूर येथे श्रीसिद्धेश्वर मंदिराजवळ तुझी कर्मभूमी आहे तेथे जा व कार्य सुरु कर असा आदेश दिला होता. सन १९५५ पासून ते माचणूर येथे वास्तव्यास आले. या क्षेत्रात श्रीगोरक्षनाथ यांनी एकवीस दिवसांचे तपानुष्ठान करून एका गुप्तलिंगाची स्थापना केली होती, असे श्रीबाबामहाराज सांगत. अधर्माचा नाशकरून धर्मस्थापना करण्यास्तव या ठिकाणी श्रीसिद्धरामांचे आगमन झाल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या, ‘भूमीभार सारुनी ज्ञानदीप्ती पाजळी| धर्मवीर प्रसवले सिद्धराम ये स्थळी॥’ या काव्यात केला आहे. चंद्राकोराकृती चंद्रभागेचे विस्तीर्ण वाळवंट असलेल्या माचणूरला पुन:र्प्रकाशात आणून श्रीबाबामहाराज सन १९७१ साली वयाच्या ४७ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. शिर्डी संस्थानचे अधिकृत मासिक ‘श्रीसाईलीला’ च्या एप्रिल १९७२ ला प्रसिद्ध झालेल्या रामनवमी व सुवर्णमहोत्सव विशेषांकाचे (संपादक : का. सी. पाठक) संपादकीय आर्वीकर महाराजांच्यावर लिहिलेले आहे. त्यानुसार आर्वी (जि. वर्धा) येथील मोरेश्वर प्रभाकर जोशी हे बालपणापासून परमार्थाकडे ओढा, लहानपणी गृहत्याग, अज्ञातस्थळी तपाचरण, देशभ्रमण, स्थितीचे निरीक्षण, लोकसंग्रह, लोकोपादेश, लोकोद्धार या द्वारे जीवनात तत्कालिन सर्वश्रेष्ठ प्रवचनकार म्हणून गणले गेलेत. हरिहरांच्या मंगल मिलनाचे वरदान लाभलेल्या माचणूरबाबत श्रीगुरुचरित्र ग्रंथात श्रीनृसिंहसरस्वती यांनी आपल्या शिष्यांस तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा करून विविध तीर्थक्षेत्रांची माहिती दिली आहे. त्यात माचणूरचा (अध्याय १५. ओवी ५१. हरिहरक्षेत्र महाख्याती | समस्त दोष परिहरती | तैसीच असे भीमरथी | दहा गावे तटाकयात्रा ॥५१॥) उल्लेख आहे.
समाधी मंदिरातून मागे वळलो. मुख्य भव्य दगडी प्रवेशद्वारापाशी आलो. श्रीसिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या स्त्रीया हातात हळद, कुंकू, फुलं घेऊन चाललेल्या. कुणाजवळ एखादी पिशवी, कुणाजवळ लहान मुलं होतं. गर्दी वाढतच होती. माणसं आमंत्रणांनी बोलवावी लागत नव्हती. ती आपोआप येत होती. स्वयंभूपणा म्हणतात तो बहुदा हाच असावा ! खरंतर मला गर्दीत फारसं भटकायला आवडत नाही। पण आज नियतीने तसाच योग जुळलेला. पहिल्या प्रवेशद्वारातून आत येताच मंदिराच्या भव्यतेने लक्ष वेधून घेतलं. पहारेकऱ्यांच्या दोन देवड्यांनी स्वागत केलं. मंदिराचे प्रवेशद्वार उंचीवर आहे. आत देवड्यांपासून पायऱ्या उतरून आपल्याला दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचावे लागते. जवळच्या भिंतीत वीरगळ दिसले. दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी ओवऱ्यांच्या पुढे उतरत्या पायऱ्यांची रचना. डावीकडे हेमाडपंती बांधणीचे श्रीमल्लिकार्जुनाचं मंदिर. उतरत्या पायऱ्यांशेजारील रचना अशी की आपण सहज ओवाऱ्यांच्या छतावर पोहोचून सारा परिसर न्याहाळू शकू. छानसे क्लिक मिळणार या हेतूने पहिल्यांदा उंचीवरून मंदिर आणि भीमा नदीचा परिसर न्याहाळला. संपूर्ण बांधकामा मोठमोठया दगडांचा वापर केलेला आहे. तटबंदी, तटबंदीतील ओवऱ्या आजही ठीकठाक आहेत. अजूनही मी बाहेरच होतो. पण आतल्या गर्दीची जाणीव उंचावरून झाली. आत स्त्री-पुरुषांच्या स्वतंत्र रांगा दिसल्या. पोलीस आणि कमांडो अशी चोख व्यवस्था इथेही होतीच. भाविकांच्या रांगा दिवसभर टिकून असतात. नवसापोटी काही भाविक देवाला लोटांगण घालताना दिसले. यात्रेत चोरी होऊ नये म्हणून साध्या गणवेशातील पुरूष व महिला पोलीस, हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठीही वेगळा पोलीस कक्ष कार्यरत होता.
दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आलो. प्रवेशद्वाराजवळ उभे राहिल्यानंतर मंदिराचा संपूर्ण परिसर दिसतो. मंदिराच्या आवारात दिवे, पाने, सुगंधी फुले आदिंची सजावट केली होती. अन्नदान सुरु होते. या मंदिराच्या आणि तुळजापूर मंदिराच्या रचनेत साम्य आहे. सोबतच्या सहकाऱ्यांना शोधलं आणि हळूच त्यांच्या कळपात शिरलो. एव्हाना परिसरात येऊन आम्हाला दीड तास उलटलेला. स्त्रीयांची रांग पुढे सरकू लागली की पुरुषांची रांग थांबे. पुरुषांची रांग पुढे सरकू लागली की स्त्रीयांची थांबे. हे नजरेनं हेरलं. अजूनही मंदिरापासून खूप बाहेर असल्याने काय ते कळेना. त्यात पहिल्यांदाच आलेला. रांगेत चालत राहिलो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ चार दीपमाळा दृष्टीस पडल्या. एक दीपमाळ डाव्या बाजूस आणि बाकीच्या तीन उजव्या बाजूस. सभामंडपाला अठरा स्तंभ असून बरेचसे भिंतीत उभे आहेत. सभामंडपातून थोडेसे आत गेल्यानंतर गाभाऱ्यात श्रीसिद्धेश्वर महादेवांचे भव्य शिवलिंग आहे. चांदीचा मुखवटाही आहे. (आम्ही स्वयंभू लिंगाचे दर्शन घेतले.) मंदिर आवारात उजवीकडे श्रीस्वामी समर्थांनी स्थापन केलेल्या पाषाण दत्तपादुका दिसल्या. मुख्य मंदिराबाहेर पुराण पिंपळ वृक्ष असून भोवताली दगडीपार बांधलेला आहे. तेथे पिंपळपाराच्या सावलीत गायक मस्तान मुल्ला यांच्या भजन, कीर्तन आणि गौळणीचा संगीतमय कार्यक्रम रंगलेला होता. त्याला टाळसाथ करणाऱ्या सोबतीच्या हालचाली इतक्या लाजवाब होत्या की अनेक भाविक आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेत होते. पुराणपिंपळाच्या जवळ असलेल्या मुख्य हेमाडपंती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच तीन फूट उंचीच्या रेखीव नंदी, कोनाड्यांची रचना दृष्टीस पडली. मंदिराचं तोंड गंगेकडे (चंद्रभागा-भीमा) आहे. मंदिराची रचना गर्भगृह, सभामंडप, मुखमंडप अशी आहे. आतल्या गणपती बाप्पाच्या रेखीव मूर्तीकडे पाहून भगवान शिवशंभोसमोर नतमस्तक व्हायची इच्छा अधिक तीव्र झाली. तीव्र झालेली ही इच्छा अचानक औत्युक्यात बदलली जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दृष्टीस पडले. गाभाऱ्याचा पहिला दरवाजा साधारण पाच फूट उंचीचा. तर त्यातून आत गेल्यानंतर भेटणारा दुसरा मुख्य दरवाजा अगदी अडीच फूट उंचीचा. त्यामुळे एकावेळी एकच भाविक दर्शनाला गाभाऱ्यात जाऊ शकतो. मनुष्य कंबरेत वाकून नव्हे तर नम्र होऊनच श्रीसिद्धेश्वर चरणी जावा अशी व्यवस्था ! मीही तसाच प्रवेश केला. एका अद्भुत शिवलिंगाचे दर्शन घेतले. जवळपास अडीच तासांच्या रांगानंतर गाभाऱ्यात पोहोचलेलो. स्कंधपुराणानुसार हे दत्तपद क्षेत्रातील साक्षात भगवान श्रीशंकराचे ह्रदयस्थान आहे. गाभाऱ्यात प्रसन्न आध्यात्मिक लहरी जाणवल्या. एरव्ही अत्यंत शांत असलेल्या या परिसराच्या स्थितीच्या विचारानेच मनात प्रसन्नता उतरली. दर्शनाला इतका उशीर का होतो ? नि रांगा मध्येच शांत का होतात ? याचं उत्तर दरवाजाने दिलं होतं. दर्शन आटोपून बाहेर आलो तेव्हा दुपारचा दीड वाजलेला.
शिवलिंगाचे दर्शन होऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूस मंदिराच्या तटबंदीला लागून असलेल्या दरवाजातून बाहेर आलो. पन्नासएक प्रशस्त पायऱ्या उतरून भीमा नदीच्या छान बांधीव दगडी घाटावर पोहोचलो. भाविक दिवा प्रज्ज्वलित करताना दिसले. घाटाच्या कठड्यावर काही ठिकाणी व्याघ्र प्रतिमा कोरलेल्या आहेत. हा घाट दानशूर राणी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला. अर्थात तेव्हापासून हे तीर्थक्षेत्र निश्चित प्रसिद्ध असणार. समोर नदीपात्रात मध्यभागी श्रीजटाशंकराचे मंदिर दिसले. तसे ते समाधी मंदिराजवळून आणि छतावरून पहिले होते. इथून अधिक जवळून पहिले. या पात्रात फारपूर्वी देवमाशाचे दर्शन व्हायचे, म्हणतात. श्रीजटाशंकराचे मंदिर छोटेसे, सुबक व देखणे आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्यास मंदिरापर्यंत चालत अन्यथा बोटीने जाता येते. आज आम्ही पोहोचण्यापूर्वी काही काळ बोटिंग सुरु होते. श्रीजटाशंकराचे गाभार्‍यात ध्यानास बसल्यास एक गूढ अन विलक्षण शांतीचा अनुभव येतो. तो घेता आला नाही. सन १९५६ मध्ये भीमानदीला आलेल्या महापूरात श्रीजटाशंकर मंदिराचा कळस वाहून गेला. तेव्हा पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले होते. घाटाच्या पायऱ्या चढून श्रीसिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात सहा फूट उंचीपर्यंत पाणी आले होते. आजही पावसाळ्यात भीमा नदीला पूर आला की या सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात शिवपिंडीच्या बाजूने पाणी जमा होतं.
यात्रोत्सवात पाच दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं. पहिल्या दिवशी उपवास असतो. आम्ही असताना उपवासाची खिचडी, शेंगदाण्याचे लाडू असं वाटप सुरु होतं. पहिल्या सायंकाळी माचणूरमधून ग्रामदेवतेची सवाद्य पालखी मंदिरात येते. तिचं औक्षण केलं जातं. दुसऱ्या दिवशी पारणं असतं. त्या रात्री नामांकित शाहीरांचा पारंपरिक भेदिक गाण्यांचा (कलगीतुरा) कार्यक्रम रंगतो. तिसऱ्या दिवशी आमावस्या, कुस्तीच्या स्पर्धा होतात. कधीकधी पारणा आणि आमावस्या एकाच दिवशी येते. यातला चौथा दिवस हा विसाव्याचा असतो. चौथ्या आणि पाचव्या दिवशी देवाची पालखी सवाद्य परत नेण्यात येऊन यात्रेची सांगता होते. हे प्राचीन सिद्धेश्‍वराचं श्रीक्षेत्र माचणूर श्रावण महिन्यातही भाविकांनी फुलून जातं. ग्रामस्थ आपल्या जवळच्यांना श्रावणात आवर्जून माचणूरला बोलवितात. सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ब्रम्हपुरी, माचणूर, बेगमपूर या एकमेकांपासून जवळ असलेल्या गावांत कधीतरी जायला हवं, असं मनात होतंच ! यावर्षीच्या महाशिवरात्रोत्सवाला ते प्रत्यक्षात आलं.
शिवछत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर स्वराज्य काबीज करण्यासाठी स्वतः औरंगजेब महाराष्ट्रात आला. पण त्याचा मनसुबा छत्रपती श्रीसंभाजी महाराजांनी उधळून लावला. त्यांनाही दुर्दैवी होऊन कैद होऊन अत्यंत क्रूरपणे मृत्यूला सामोरे जावे लागल्याने महाराष्ट्रावर कब्जा मिळविण्याच्या औरंगजेबच्या आशा पुन्हा पल्लवित झालेल्या. मात्र औरंगजेब मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी पुरता त्रस्त झाला. वारंवार तो आपल्या छावण्या बदलू लागला. मराठ्यांची राजधानी सातारा आणि आदिलशाही राजधानी विजापूरच्या दरम्यानच्या मार्गावरून जाताना छावणीच्या थांब्याच्या दृष्टीने ठिकाणाचा शोध घेण्याची जबाबदारी सरदार गाझीऊद्दीन खानवर होती. त्यास छावणीसाठी पूरक ठिकाणाचा शोध ब्रह्मपुरीच्या माध्यमातून लागला. त्यावेळच्या पत्रव्यवहारानुसार गाझीऊद्दीन खानने ब्रह्मपुरीस छावणीच्या निवारणासाठी एक तात्पुरत्या स्वरूपाचा किल्ला बांधण्याची परवानगी मागितली होती. बादशाहने ती परवानगी दिली. सन १६९४-९५ ला ब्रम्हपुरी गावाजवळ संथ वाहणाऱ्या भीमा नदीकाठच्या प्रदेशात तात्पुरत्या वास्तव्यासाठी कच्च्या स्वरूपात किल्ला बांधण्यात आला. तो माचणूर किल्ला गावात सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेवटला आहे. सन १७०१ पर्यंत औरंगजेब येथे मुक्कामी होता. माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशव्दारासमोर भव्य तटबंदी आणि दोन बुरुजांचा आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशीदीच्या मागील बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली आहे. या किल्ल्यात मोघल सैन्याची मोठी छावणी होती. स्वतः औरंगजेब किल्ल्यात बसून न्यायदान करी. छत्रपती श्रीसंभाजी महाराजांच्या पश्चात महाराणी येसुबाई, छत्रपती श्रीशाहू महाराज (सातारा) हे औरंगजेबच्या नजरकैदेत २९ वर्षे आणि त्यातील १७ वर्षे महाराष्ट्रात छावणीत असताना ब्रह्मपुरी (सोलापूर) मुक्कामातील अखेरच्या दिवसात त्यांचे धर्मांतरण होण्याची वार्ता बादशाहाने पसरवली होती. तेव्हापासून प्रयत्नरत राहून बाळाजी विश्वनाथ (पहिले पेशवे) यांनी औरंगजेबच्या मोठ्या मुलीला विश्वासात घेऊन बादशाहाची ही चाल उध्वस्त केली. ह्या प्रसंगाची सुरुवात झाली होती ती ब्रह्मपुरीत आणि शेवट घडला होता दिल्लीत.
माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या पलीकडील किनार्‍यावर बेगमपूरमध्ये औरंगजेबच्‍या बेगमची कबर आहे. आपल्या काळात सिद्धेश्वर मंदिर नष्ट करण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न औरंगजेबने केले. मंदिरे फोडण्यासाठी त्याने स्वतंत्र तुकडीची नेमणूक केली होती. त्याची झळ पंढरीच्या पांडुरंगालाही बसली. भीमेच्या पाण्यातलं हे सिद्धेश्वर मंदिर वाहून जावं यासाठी मोठा चर खोदण्याची व्यवस्था त्याने केली होती. पण ती यशस्वी झाली नाही. प्रचलित मौखिक कथेनुसार काहीसे स्थिरावल्यावर औरंगजेबने आपल्या सैनिकांना थेट श्रीसिध्देश्वराचे प्राचीन शिवलींग फोडण्याचे, उध्वस्थ करण्याचे आदेश दिले. मात्र या कामगिरीवर आलेल्या सैनिकांवर तेव्हा भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला. नाईलाजाने जीव वाचविण्यासाठी सैनिकांना परतावे लागले. घडल्याप्रकारने औरंगजेब चांगलाच संतापला. त्या संतापातच भगवान श्रीशंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याने नैवेद्य म्हणून एका थाळीत गोमांस पाठवले. तेव्हा मात्र अतर्क्य घडले. सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात औरंगजेबने पाठविलेल्या थाळीवरील वस्त्र बाजूला होताच गोमांसाच्या जागी पांढरी फुले अवतरली. एका अर्थाने औरंगजेबने संतापात पाठविलेल्या मांसाचा नूर पालटला. म्हणून मासनूर पुढे याचाच अपभ्रंश माचणूर नाव प्रचलित झाले. अर्थात नंतर खजिललेल्या औरंगजेबाने या प्राचीन श्रीसिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये आणि ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. इथल्या उत्सवादरम्यान शासकीय पूजा प्रथम होते. आजच्या महाशिवरात्रीसही पहाटे ५ वाजता मंगळवेढा तहसिलदारांच्या शुभहस्ते ती संपन्न झाली. पहाटे ४ वाजल्यापासूनच भक्तांनी दर्शनाला रांगा लावलेल्या. गेल्यावर्षी नदीपात्रात पाणी अभावाने होते, यंदा भीमेचे पात्र तुडुंब भरलेले. पात्रात डुबकी मारून पहाटे ओलेते भाविक दर्शन घेऊन गेलेले.
वर्तमान माचणूर विलोभनीय आणि नयनरम्य भीमा नदीच्या तीरावरील पुरातन श्रीसिद्धेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सातवाहन काळापासून चिपळूण-कराड-मंगळवेढा-तेर हा व्यापारी मार्ग अस्तित्वात आहे. हा परिसर हजार वर्षांपूर्वी बिज्जल राजवटीच्या राजधानीचा भाग होता. डोळस पर्यटकांसह प्राचीन स्थापत्य, कला, संस्कृती आणि इतिहासाच्या अभ्यासकाला या परिसरात वावरण्याचा मोह आवरणे कठीण. फारपूर्वी या सिद्धेश्वराच्या तटबंदीला लागून लोकवस्ती असावी असं इतिहास अभ्यासकांचं निरीक्षण आहे. यापूर्वी इथे खोदकामात, जमीन नांगरताना जमीनदोस्त झालेल्या घरांच्या पक्क्या भाजलेल्या वीटा, विविध मातीच्या वस्तू, सोने, सोन्या-चांदीच्या मोहरा, देवदेवता, जुनी नाणी, निरनिराळ्या आकाराचे व रंगाचे मणी, अंगठीतील रंगीबेरंगी खडे अनेकांना मिळालेले आहेत. औरंगजेबच्या काळात इथल्या लोकांनी जमिनीत पुरुन ठेवलेली संपती तशीच राहून गेली असावी. याशिवाय देवदेवतांच्या निरनिराळ्या अवयवांचे घडविलेले अवशेष, शाळीग्रामच्या भग्नशिळा येथे सापडतात. औरंगजेबचा इथला प्रदीर्घ मुक्काम पाहाता त्याने मंदिरांच्या देवतांची तोडफोड केली असावी. या परिसरात तपश्‍चर्या केलेल्या साधू, संन्याशांच्या मते, सिध्दरायाच्या आसपास जगदंबा पार्वती मातेचे भव्य मंदिर, गणपती आणि विष्णुचे मंदिर होते. इथल्या बांधकामातील अनेक मोठमोठ्या शिळा किल्यातील इतर बांधकामात वापरल्या गेल्यात. अर्थात सध्याच्या मल्लिकार्जुन मंदिराची जागा, इतर रचना आणि संदर्भ पाहाता पूर्वी येथे अजून काही मंदिरे असावीत, या मताला दुजोरा द्यावासा वाटतो. श्रीक्षेत्र सिद्धेश्वर मंदिराचा प्राचीन बाज आजही टिकून आहे. त्याला रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्याची मागणी होते. ती चुकीची आहे. पुरातत्त्वीय निकषांच्या आधारेच वास्तूची आहे त्या स्थितीत कोणताही फेरफार न करता किमान स्वच्छता ठेवायला हवी.
मानवी समाजाचे भविष्य आणि वर्तमान इतिहासातील प्रेरणांच्या अन्वयार्थ आधारे उभे राहात असते. ‘मनुष्यामध्ये असलेल्या शक्तींचा विकास व्हावा अशी कल्पना साधनेच्या पोटी असते. माचणूर या कल्पनेचा पुरस्कार करत नाही. शक्तींवर आलेली आवरणे दूर सारावी लागतात. म्हणजे त्या शक्तीचे शुद्ध स्वरूप प्रकाशात येते. मनुष्य आपल्यामधील जेवढ्या शक्तींचा आपणास परिचय असेल तेवढीच शक्ती आपण वापरीत असतो. साधक म्हणून, उपासक म्हणून मनुष्याने निष्ठापूर्वक जीवनव्यवहार सुरू केला की, त्याचे जीवनातील प्रत्येक कर्म साधना होत असते. अशा कर्मांनी आपल्यातील उत्तमोत्तम शक्तींचा परिचय आपणास होऊ लागतो. या आत्मिक शक्तीचा उपयोग, दिव्यातिदिव्य कर्मासाठी आपण करू शकतो’, अशी भूमिका श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांनी ‘माचणूरचे हृद्गत’ या आपल्या प्रवचनातून मांडलेली आहे. मानवी शक्तींचा परिचय होण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे याची जाणीव स्वतःला करून देण्यासाठी एकदातरी ‘माचणूर’ला भेट द्यायला हवी. 

श्रीसिद्धेश्वर तीर्थक्षेत्र माचणूर हार्दिक स्वागताची कमान

पहिले प्रवेशद्वार

ओवऱ्यांंच्या छतावरून दिसणारे हेमाडपंती मंदिराचे दृश्य

यात्रेतील दुकाने

यात्रेतील दुकाने


यात्रेतील दुकाने

यात्रेतील दुकाने

यात्रोत्सव परिसरात न्याहारीला बसलेले भाविक

दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या दिशेने निघालेले भाविक

दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या दिशेने निघालेले भाविक

मंदिर परिसरातील भाविकांची गर्दी

मंदिर परिसरातील भाविकांची गर्दी

मंदिर परिसरातील भाविकांची गर्दी

श्रीसिद्धेश्वर

नंदी

मंदिराचे प्रवेशद्वार

श्रीसंत आर्वीकर महाराज

श्रीसंत आर्वीकर महाराज समाधी

प्रसादाचे वाटप

श्रीसिद्धेश्वरासाठी पुरणपोळ्यांचा नैवद्य 

     करताना कर्नाटकातील महिला भाविक

मंदिराची तटबंदी आणि घाट

श्रीजटाशंकर मंदिर आणि भीमा नदीवरील घाट

भीमा नदीचे चंद्रकोर पात्र आणि नदीवरील घाट

श्रीजटाशंकर मंदिर

श्रीजटाशंकर मंदिर

वाटवाघळे

वाटवाघळे

धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. 
मो. ९८६०३६०९४८,           
ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  
ब्लॉग  : https://dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

अलोरेत आज ‘दिल्ली स्टोअर्स’च्या आठवणींना मिळणार उजाळा (१० फेब्रुवारी)


 

सन १९८० च्या दशकात, पेढांब्याच्या ‘परशुराम सहकारी साखर कारखान्यात तयार झालेल्या ‘खांडसरी’ साखरेच्या पहिल्या पोत्याला लिलावात खरेदी करून प्रेमराज मित्तल यांनी हे पोतं पेढांबे साखर कारखान्यातून मिरवणुकीने वाजतगाजत अलोरेतील आपल्या ‘दिल्ली स्टोअर्स’ या दुकानात आणलं होतं.


विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या नीती आयोगातर्फे ‘अटल इनोव्हेशन मिशन’ अंतर्गत देशभरात निवडक शाळांमध्ये सुरु होत असलेली ‘अटल टिकरिंग लॅब’ आजपासून अलोरे (ता. चिपळूण) येथील मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय अलोरे येथे सुरु होते आहे. शाळेच्या इतिहासातील या एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी सन १९८४ बॅचचे माजी विद्यार्थी आणि नवी दिल्ली येथील ‘भारत पॉलिमर्स’ कारखान्याचे डायरेक्टर संजयकुमार प्रेमराज मित्तल आज (१० फेब्रुवारी) अलोरेत येत आहेत. सन १९६९ ते २००० पर्यंत अलोरेतील कोयना प्रकल्पीय जडणघडणीचे साक्षीदार राहिलेल्या प्रेमराज मित्तल यांच्या ‘दिल्ली स्टोअर्स’च्या पन्नास वर्षपूर्व आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळणार आहे.

संजयकुमार यांचे वडील, प्रेमराज चंदनालाल मित्तल यांचे मूळगाव हरयाणा राज्यातील सोनीपथ  जिल्ह्यातील रथधाना ! सन १९६४ च्या दरम्यान उद्योग-व्यापाराच्या निमित्ताने प्रेमराज हे देहूगाव (पुणे) येथे आले. महाराष्ट्रातील कोयना जलविद्युत प्रकल्प तेव्हा आकाराला येत होता. सन १९६८ साली ते पोफळीला आले. तिथे त्यांनी काही काळ किराणा दुकान चालविले. तेव्हा अलोरे, कोळकेवाडी परिसरात प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु झालेले होते. सन १९६९ साली त्यांनी कोयना जलविद्युत प्रकल्पातील अलोरे, भराडे येथे दुकाने सुरु केली. त्यांचे दुकान म्हणजे किराणा, हार्डवेअर, स्टेशनरी, कटलरी, मेडिसिन, फर्निचर आदि प्रकारच्या एकत्रित वस्तू मिळण्याचे आजच्या काळातील ‘मॉल’ होते. अर्थात ते अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. कालांतराने कोयना प्रकल्पाचा तिसरा टप्पा संपला आणि अलोरे पंचक्रोशीत शुकशुकाट पसरला. अशा परिस्थितीत फारसे विचलित न होता स्थिरावलेल्या प्रेमराज यांनी अलोरेत आपला व्यवसाय सुरु ठेवला. पुढे कोयना प्रकल्पात चौथ्या टप्प्याचे काम सुरु झाले. अलोरे, कोळकेवाडी येथे अधिकारी, कर्मचारी, कामगार वर्ग वाढू लागला. त्यामुळे वसाहत वाढली. व्यापार वधारला. ‘दिल्ली स्टोअर्स’ पुन्हा एकदा झळाळून निघाले. त्या काळात अलोरेत वावरलेल्या अनेकांच्या हृदयात ‘दिल्ली स्टोअर्स’च्या आठवणींचा एक कप्पा नक्की आहे. पन्नास वर्षांपूर्वी बाहेरून इथे आलेल्या अशा व्यापाऱ्यांना, स्थानिक व्यापारी कै. नारायणशेठ खेतले, कै. अरविंदशेठ कोलगे, कै. शंकरराव पालांडे, श्री. राजाराम पालांडे आदिंनी सहकार्याचा हात देऊ केला होता. मित्तल परिवारात आजही ही नावे आदराने घेतली जातात ती त्याचमुळे. अलोरेत त्याकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा व्हायचा. इथल्या शाळेचे मुख्याध्यापक आगवेकर सर स्वतः वर्गणी गोळा करण्यासाठी मार्केटमध्ये फिरायचे. प्रेमराजशेठ यांच्यासारखी असंख्य दानशूर मंडळी सढळ हस्ते मदत करायची.

पेढांब्याच्या उजाड माळरानावर सन १९८० च्या दशकात, राजाराम शिंदे यांच्या प्रयत्नाने ‘परशुराम सहकारी साखर कारखाना’ सुरु झाला. कारखान्यात तयार झालेल्या ‘खांडसरी’ साखरेच्या पहिल्या पोत्याला लिलावात ४ रुपये ७० पैसे असा भाव मिळाला. लिलाव बोली करून प्रेमराज मित्तल यांनी हे पोतं साखर कारखान्यातून मिरवणुकीने वाजतगाजत आपल्या दुकानात आणलं होतं. तिथे एक किलो साखरेची विधिवत पूजा करून विक्रीचा शुभारंभ केला होता.

अलोरे पंचक्रोशीतील कोणीही कितीही वाजता मदतीसाठी या परिवाराला हाक मारली तर ती तत्काळ मिळायची. सचोटीनं व्यापार करणं, समाजाच्या हितासाठी सदैव तत्पर असणं, दानशूरता, सहृदयता या गुणांमुळे चौथ्या टप्प्यातील अधिकारी यांचंही मन या मंडळीनी जिंकलं होतं. सन २००० नंतर चौथ्या टप्यातील काम संपल्यानंतर अलोरेतील वर्दळ पुन्हा कमी होऊ लागली. सन १९८७ ला संजय यांनी पुण्याला फार्मसीची डिप्लोमा पूर्ण केला. सन १९९० ला संजय दिल्लीला स्थलांतरित झाले. पाठोपाठ सन २००० साली संपूर्ण मित्तल परिवार आपल्या मूळगावी परतला. संजय यांच्यासह देवकीनंदन, डॉ. धनराज, मीरा, प्रदीप, बीना या त्यांच्या सर्व भावंडांचे शिक्षण अलोरेच्या शाळेत झाले आहे. त्यांचे शाळेशी आणि गावाशी विशेष ऋणानुबंध आहेत. अलोरेतील प्रसिद्ध श्रीशंकर मंदिरावरील श्रद्धेपोटी कुटुंबातील सदस्य श्रावण महिन्यात अलोरेत येत असतात. गतकाळात अलोरेत उभारी घेतलेला हा परिवार आज देशाच्या राजधानीत स्थिरस्थावर झाला आहे. संजयकुमार हे परिवारातील उद्योगांची धुरा समर्थपणे सांभाळून आहेत. ‘भारत पॉलिमर्स’ मधून ते प्रिंटेड पॅकिंग मटेरियल आणि प्रिंटेड पेपर बॅग यांची निर्मिती करतात. गतवर्षी (२४ जानेवारी २०१९) या परिवाराचे आधारवड आणि ‘दिल्ली स्टोअर्स’ची उभारणी करून ती वाढविणाऱ्या प्रेमजीभाई यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे कार्य पुढे सुरु ठेवणाऱ्या पिढीचे प्रतिनिधी संजय हे शाळेच्या ‘अटल टिकरिंग लॅब’च्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज अलोरेत येत आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कल्पकता वापरून नवीन संशोधन करावे यासाठी ‘अटल टिकरिंग लॅब’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नवनिर्मिती करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला चालना व प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात उद्योजक, शास्त्रज्ञ तसेच नवनिर्मिती करणारे चांगले व्यावसायिक घडू शकतात. यावर विश्वास असल्याने हा प्रकल्प सुरु होत आहे. आजच्या कार्यक्रमातील संजयकुमार प्रेमराज मित्तल यांच्या उपस्थितीने अलोरेतील कोयना प्रकल्पीय जडणघडणीचे साक्षीदार राहिलेल्या ‘दिल्ली स्टोअर्स’ या प्रसिद्ध दुकानाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.     

धीरज वाटेकर

संजयकुमार मित्तल 

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

आमच्या कृतार्थीनी या पुस्तकाबाबत, मराठी विश्वकोषाच्या समन्वयक डॉ. विजया सोमपूरकर-गुडेकर यांनी लिहिलेला परिचय लेख

मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या, सुरेश केशव मांगले संपादित ज्ञानशलाका पाक्षिकात, दिनांक १६-३१ जानेवारीच्या अंकात आमच्या कृतार्थीनी या पुस्तकाबाबत, मराठी विश्वकोषाच्या समन्वयक डॉ. विजया सोमपूरकर-गुडेकर यांनी लिहिलेला परिचय लेख। 

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

शहरी पर्यटन वातावरण अद्ययावत हवे !

उदारीकरणानंतर देशात विकासाचे वारे वेगाने वाहू लागल्याला तीन दशके पूर्ण होताहेत. या कालखंडात आपल्याला समृद्धीच्या नवनव्या वाटा खुणावू लागल्या. खुणावणाऱ्या वाटा आजमावून पाहण्यासाठी श्रीमंतांसह शहरी आणि ग्रामीण भागातील मध्यमवर्ग हळूहळू घराबाहेर पडू लागला. या बदललेल्या मानवी मानसिकतेचा नेमका अंदाज घेत ठिकठिकाणी बदल होत गेले. देशभरातील असंख्य शहरांत पर्यटन उद्योग जन्माला आला आणि वाढलाही. आपल्यालाही रत्नागिरी जिल्ह्यात शहरी पर्यटन विकासाची सुनियोजित गंगा आणण्यासाठी शक्य तितक्या नाविन्यासह पर्यटन वातावरण अद्ययावत करत समृद्धीच्या वाटा निर्माण कराव्या लागतील.
जगात ज्या देशांची अर्थव्यवस्था समृद्ध आहे त्यात गरीबांचा वाटा मोठा आहे. दुर्दैवानेगरीब लोकांची कमाई वाढलेली नाही. गेली अनेक दशके भारतात समृद्धीची वाट उद्योग, व्यवसायातून नव्हे तर सरकारातून जाते. सर्वांनाच तिथे प्रवेश मिळणे कठीण असल्याने या वाटेचा फायदा मर्यादित लोकांना मिळाला. मोठा समूह समृद्धीपासून वंचित राहिला. या पार्श्वभूमीवर विचार करता समृद्धीच्या बिगरसरकारी अनंत वाटा विकसित व्हायला हव्यात. पर्यटनअशा वाटांपैकी एक आहे. आपल्या जिल्ह्यात पर्यटनातून समृद्धीच्या वाटा शोधण्याच्या प्रयत्नांना सहकार्य मिळाल्यास गरीबांना आर्थिक समृद्धीची वाट गवसण्याची संधी आहे. वाढती विषमताबेरोजगारीमहागाईप्रादेशिक असमतोलपीडित बळीराजाअर्थव्यवस्थेला आलेली अवकळाकॉर्पोरेट विश्वातील मरगळगारठलेली गुंतवणूक याचे अनुभव आपण घेत आहोत. समृद्धीची वाट दाखवू शकणारा कोकणातला पर्यटन उद्योग गुदमरलेला आहे. आजच्या स्वभावात: उतावीळ परंतू शोधक वृत्तीच्या तरुणाईला समस्यांच्या चिकित्सा आणि विश्लेषणापेक्षा उपाय हवे आहेत. त्यांना अनुदानेसवलतीअर्थसाह्य यांपेक्षा संधींच्या मोकळ्या वाटा दाखविणारी धोरणदृष्टी हवी आहे. अडचणींचे निराकरण करीत आश्वस्थ  करणाऱ्या नेतृत्वावर तरुण मनपसंतीची मोहर उमटवत आहेत. आपल्या भागात पर्यटनातून त्यांचा आर्थिक, भौतिक विकास शक्य आहे. याची निश्चित जाणीव सध्याच्या सर्वस्तरीय राजकारण्यांनी करून घ्यायला हवी आहे. ‘भर पावसात रस्त्यावरून स्कूटर चालवत भिजत चाललेले चार व्यक्तींचे कुटुंब पाहून ‘नॅनोची संकल्पना स्फुरली’, असे रतन टाटा यांनी ‘नॅनोची जन्मकथा सांगताना नमूद केले होते. त्यांची भूमिका आणि प्रेरणा प्रामाणिक होती. वास्तवात ‘नॅनो’ मध्यमवर्गाच्या मनोविश्वाची जागा व्यापू शकली नाही. दोष ‘नॅनोत नव्हता. खुणावणाऱ्या समृद्धीच्या वाटा अजमावून पाहण्यासाठी सरसावलेल्या शहरी मानसिकतेला, ‘चारचाकीचे अन्य मॉडेल परवडत नाही म्हणून आम्ही नॅनो घेतलीहा शिक्का नकोसा वाटला. उत्पन्न मर्यादित असणाऱ्या समाजस्तराला परवडणारी गाडीहे ब्रँडींग नॅनोच्या मुळावर आले. पूर्वी ‘ब्रँडेडकपडे ही ठराविक वर्गाची मक्तेदारी होती. आज ते अनेकांच्या मुठीत आले आहे. आपल्याकडच्या शहरी पर्यटनाचेही तसेच आहे. त्यामुळे सगळं आपल्यालाचं कळतया भ्रमात न राहाता सहजपैसा खर्च करणाऱ्या शहरी मानसिकतेला नक्की काय हवंय ? ते समजून घेऊन शहर विकासाच्या आराखड्याला पर्यटनपूरक सकस बनविण्याची गरज आहे.
निसर्गाची मुक्तहस्त उधळणसागरकिनारेकिल्लेऐतिहासिक ठिकाणेगरम पाण्याची कुंडेधबधबेमंदिरेजैवविविधता, सातासमुद्रापार कोठेही न आढळणारी संस्कृतीपारंपारिक वैशिष्ट्यांची जोपासना करणाऱ्या कोकणातील ‘रत्नागिरी’ जिल्ह्यात जागतिक पर्यटन नकाशावर अग्रेसर होण्याची क्षमता ठासून भरलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, गुहागर ही दोन शहरे समुद्रकिनारी आहेत. चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, खेड नदी-खाडी-बंदरकिनारी वसलेले आहे. इथल्या बंदरांना मोर्य काळापासूनचा इतिहास आहे. आज किनारी भागात हे संदर्भ नव्याने मांडता येतील. लांजा, मंडणगड, दापोली शहराला सह्याद्रीची ओढ आहे. प्रत्येक शहराचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. तिथे काही पर्यटनस्थळे आपणहून उभीही आहेत. कोकण सोडून पोटार्थ मुंबईसह जगभर गेलेली मंडळी पुन्हा कोकणात येण्याच्या विचाराप्रत येताहेत. त्यांचे येणे घडण्यासाठी फक्त पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहावे लागेल. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत रत्नागिरी शहर पर्यटन विकास, पायाभूत सुविधेत पुढे आहे. याचेही कारण स्वातंत्र्योत्तर काळात आजवर येनकेन प्रकारे जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या एकूण पर्यटन विकास निधीच्या किती टक्के निधी एकट्या रत्नागिरी शहरावर आणि किती टक्के निधी उर्वरित जिल्ह्यावर खर्ची पडला ? हे तपासता लक्षात येईल. अर्थात तिथल्या गेट वे ऑफ रत्नागिरी (मांडवी बीच), भाट्ये बीच, स्वातंत्र्यवीर सावरकर कोठडी (राष्ट्रीय स्मारक), अठरा हाताचा गणपतीपतितपावन मंदिरकाळा-पांढरा समुद्रमिरकरवाडा बंदरभगवती आणि रत्नदुर्ग किल्लामत्स्यालयथिबापॅलेसथिबापॉईंटलोकमान्य टिळक जन्मस्थान आदि स्थळांचे महत्त्व पर्यटनात खूप आहे. ३० वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या रत्नागिरी येथील विमानतळाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम अपेक्षित आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरात आढळलेली किमान ३० हजार वर्षपूर्व कातळशिल्पे या तालुक्यांना जागतिक हेरीटेज टुरिझमचा दर्जा मिळवून देऊ शकतात. कसबा-संगमेश्वरात हेमाडपंथीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेलं जिल्ह्यातील सर्वोत्तम श्रीकर्णेश्वर मंदिर १९०० वर्षानंतर आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतं. संपूर्ण काळ्या पाषाणात कोरीवकाम केलेलं हे मंदिर आजही इथलं पौराणिक महत्त्व टिकवून आहे. दगडातील सुंदर नक्षीकामदेवतांची चित्रेमंदिराच्या चारही दरवाजांमधील वर्तुळाकार नक्षी, डोक्यावरील वितान (दगडात कोरलेला सुंदर झुंबर), प्रवेशद्वाराच्या डोक्यावर आठही कोनांमध्ये असलेल्या अष्टदिक्पालांच्या मूर्ती, कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर नक्षीकामाशी जुळणारे सभामंडपातील खांबांचे नक्षीकाम, कलात्मक नंदीबैल मूर्ती, गाभाऱ्यातील भगवान शंकराची एक फूट उंच पिंडी, खांबावर शीलालेख या माहितीची ठळक गरज पर्यटकांना आहे. त्यासाठी लागणारे भले मोठे ‘you are here’ फलक शेजारच्या कर्नाटक राज्याने आपल्या प्रत्येक पर्यटनस्थळी लावलेत. अशा फलकांचे नियोजन सध्या विकसित होत असलेल्या राष्ट्रीय चौपदरी मार्गावर व्हायला हवे. राजापूरमधील श्रीधूतपापेश्वर मंदिरउन्हाळेप्रसिद्ध गंगास्थान (ज्याकडे निसर्गरम्य ठिकाणी असूनही गंगा लुप्त झाल्यावर बघवतही नाही), मंडणगड मधील किल्ले मंडणगडगुहागरचा समुद्रकिनारा, दुर्गामाता, उरफाटा गणपतीश्रीव्याडेश्‍वरमोडकाआगर तलाव, चिपळूण, खेड शहरातील प्राचीनतेचा पुरावा असणारी बौद्धकालीन लेणी आदिंद्वारे पर्यटन विकासाला चालना देण्याची क्षमता इथल्या स्थानिकात आहे. त्यास वेग येण्यासाठी या पर्यटनस्थळांवर किमान मूलभूत सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. सागरी मार्गाची आवश्यकता पूर्ण व्हायला हवी. रस्त्यांची दयनीयता संपायला हवी. जिल्ह्यात सर्वदूर हिरवाई असल्याने उद्याने-बगीचे हवेत कशाला ? असे तर धोरण नसावे ना ? खरतरं पर्यटन सावरण्यासाठी जिल्ह्यातील साऱ्या शहरांत आकर्षक उद्याने हवीत, असलेली सुसज्ज करायला हवीत. रत्नागिरी वगळता इतर शहरातील नागरिकांना सायंकाळी फेरफटका मारायला रमायला जागाच शिल्लक नाही अशी स्थिती आहे, पर्यटक दूरच राहिला ! समृद्धीच्या वाटा इथे दडल्या आहेत.
पुतळेपर्यटन आम्ही जगभर पाहातो. स्टॅच्यू ऑफ युनिटीद्वारे आम्ही जगात उंच बनलो. चिपळूण शहरालगत परशुराम घाटात वाशिष्ठी वळणावर पर्यटन समृद्धीची वाट निर्माण करून देणारा कोकणचे स्वामीभगवान परशुरामांचा असाच भव्य पुतळा उभा राहाण्यासाठी चिपळूणकर विकासपुरूषाच्या शोधात आहेत. अपवाद वगळता दुर्दैवाने चिपळूण शहराला पर्यटन समज असलेल्या नेतृत्वाचाच अभाव राहिला आहे. इथल्या पर्यटन विकासासाठी गेली ६/७ वर्षे पदरमोड करून चाचपडणाऱ्या ग्लोबल चिपळूण पर्यटनसंस्थेला राजाश्रय मिळायला हवा अशी भूमिका पुढे येण्यामागेही राजकीय इच्छाशक्तीचा अभावहेच कारण आहे. पंतप्रधान पंडित नेहरूंकडे उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर जेव्हा कोयना धरणाचा प्रस्ताव मांडला होता तेव्हा वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडणाऱ्या पाण्याचा काय उपयोग करणार ? असा प्रश्न नेहरूंनी विचारला होता. आम्ही त्याचे उत्तर आजही शोधतो आहोत. या वाशिष्ठी खाडीत श्रीपरशुराम मंदिर परिसर ते गोवळकोट असा रोपवे, ‘बॅकवॉटरविकसित व्हायला हवे. इथल्या खाडीत सहजतेने पाहाता येणाऱ्या मगरी कोठेही आढळत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्याला काही दशकांपूर्वी विकासाचा पहिला ‘हप्ता’ ‘लोटे-परशुराम रासायनिक औद्योगिक विकास प्रकल्पद्वारे मिळाला. इथल्या लोकांना रोजगार मिळालापरंतु इथला निसर्गपारंपारिक व्यवसायजैवविविधता सारे संपले. आमची सरकारकडे पाहाण्याची मानसिकता नकारार्थी बनली. ज्या ‘सडक्या’ मेंदूतून हा विकास प्रकल्प साकारला त्याने रत्नागिरी जिल्ह्यावर अक्षरशः सूड उगवला असे म्हणावे इतकी भयावह स्थिती वाशिष्ठी खाडीची झाली आहे. या प्रकल्पाने ज्या नदीला-खाडीला प्रदूषित केले ती ‘वाशिष्ठी’ कोयना अवजलामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाणी असलेली नदी आहे. पर्यटनात पाण्यालाही खूप किंमत आहेच. अर्थात इतकं सारं होऊनही पाणीअनुषंगाने चिपळूण पर्यटन विकासाला मोठा वाव आहे.
कोकणी माणसाचा इतिहास आणि संस्कृती तपासण्यासाठी लोकसाहित्य हे सर्वात मोठे माध्यम आहे. मोबदल्याचा विचार न करता कमी मानधनात काम करणारे कलावंत जगात फक्त कोकणात आढळतात. जिल्ह्यातील या कलावंतांना आपलेसे केल्यास ते पर्यटन विकासास हातभार लावू शकतात. आपल्याकडील संकासूरजाकडीकोळीनृत्य आदींसाठी लागणाऱ्या पेहेरावांचे, कपड्यांचे दालन जिल्ह्यातल्या पर्यटन शहरात उभारून पर्यटनवृद्धी साधता येईल. राष्ट्रीय महामार्गावर, तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास कुठेतरी जुनं मातीचा धुरळा उडविणारं, मोबाईलची रेंज नसलेलं, निसर्गरम्य कोकणी खेडं आम्हाला जपता येईल का आमच्या पर्यटन व्यवसायाचं जागतिक पातळीवर उत्तम मार्केटिंग सरकारने करायला हवं. सरकारी पर्यटनाचे मंडळअसे मार्केटिंग करते. पण तिथे तयार होणारे साहित्य हे अभ्यासकविविध पर्यटन व्यावसायिकसंस्था हॉटेल्स, टूर ऑपरेटर्स यांकरिता नसते. ती एक शासकीय उपचार पद्धती वाटते. जिल्ह्यात, शहरात पर्यटन विकासासाठी असंख्य संस्था, व्यक्ती झटत आहेत. त्यांच्याशी सरकारी, प्रशासकीय समूहाचा अजिबात संपर्क, संबंध, समन्वय नसावा ? जिल्ह्यातल्या अनेक शहरात ‘पर्यटन महोत्सव’ भरतात, भरायला हवेत. त्यांचे एकत्रित मार्केटिंग करण्यासाठी कोणी पुढाकार घ्यायचा ? जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये ‘नॅरोगेज’ नेरळ-माथेरानची ‘टॉय ट्रेन’ वगळताहजारों वर्षांचा इतिहास असलेल्या कोकणातीलरत्नागिरी जिल्ह्यातील एकाही स्थळाचा समावेश नाही. आम्हांला कोकणची किमान रत्नागिरी जिल्ह्यातील जागतिक पुरातत्त्वीय स्थानेअशी यादी बनवून तसे फलक मार्गांवर लावत अद्ययावत मार्केटिंग करायला कुणाची परवानगी हवी आहे ? आपले पर्यटन जागतिक नकाशावर नेण्याचा हा खूप सामर्थ्यशाली मार्ग आहे. ज्यातून परदेशी पर्यटक, चलन आपल्याकडे येईल. पर्यटन हा शंभर टक्के नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. केरळगोवाहिमाचलउत्तराखंडअंदमान आदि देशी ठिकाणी फेरफटका मारला तर याची जाणीव होते. या तुलनेत कोकण, आपला रत्नागिरी जिल्हा कमी नाही. इथे येणाऱ्या पर्यटकाला शांतताचांगले खाद्यस्वच्छताकरमणूकराहाण्याची उत्तम व्यवस्था हवी आहे. ते न देता केवळ पर्यटन विकासाच्या गप्पा आणि न मिळणाऱ्या कोट्यवधींच्या विकासनिधीच्या आकडेवारीच्या बोंबा मारण्यात काय अर्थ आहे ? मध्यंतरी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ९६ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ६७०.५७ कोटी रुपयांचा स्वतंत्र पर्यटन आराखडा तयार करण्यात आला होताच की ! ‘निसर्ग वाचवा’, म्हणून जिल्ह्यात आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडतो. त्याच जिल्ह्यात गेली अनेक दशके काळोख्या रात्री रोज विविध घाटांतून ट्रकानि लाकूड तोडून नेले जाते. सध्या तर महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महामार्गही वृक्ष आच्छादनात भकासबनलाय ! तो शासकीय प्रयत्नातून झकासबनेल ? आजही बाहेरच्या पर्यटकांना, या न त्या कारणाने भेटी देणाऱ्यांना कोकण आवडते. त्यांना आपण शहरात रमण्यासाठी कोणत्या पायाभूत सुविधा देत आहोत ? देणार आहोत ? कोकणच्या सांस्कृतिक राजधानीची, चिपळूणची याबाबतची स्थिती तर आमची लाज काढणारी आहे. तरीही आम्ही रोजच्या वर्तमानपत्रात शहर स्वच्छतेचे मंत्र जपतो असतो. कोकण रेल्वेचे दुपदरीकरणसागरी महामार्गाचा प्रभावी वापरमुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हे पायाभूत सुविधेतील आशेचा किरण आहेत. पर्यटन विकासासाठी जिल्ह्य़ातील सुमारे आठ हजार किलोमीटर अंतर्गत रस्त्यांना सुस्थितीत आणायला हवे आहे.
डी-मार्टनावाच्या सवलतीच्या दरातील व्यावसायिक दुकानदारी व्यवस्थेने देशात क्रांती घडविली आहे. आपल्या जिल्ह्यात वर्षाकाठी लाखांनी पर्यटक येताहेत. त्याहून अधिक संख्येने लोकं मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करत असतात. इथे येणाऱ्या पर्यटकांत, प्रत्येकात कोकणी मेवासंकल्पनेची क्रेझ आहे. आपण प्रयत्नपूर्वक जर डहाणू-जव्हारच्या चिक्कूपासून सुरुवात करून सावंतवाडीच्या खेळण्यांपर्यंत आपले अस्सल कोकणी असलेले सारे पदार्थ, हस्तकौशल्यातून साकारलेल्या वस्तू डी-मार्टसंकल्पनेनुसार एकाच छताखाली आणू शकलो तर ? ...तर हमरस्त्यावरील साऱ्या मुख्य कोकणी शहरात खूप मोठी आर्थिक क्रांती करणे शक्य आहे. कोकणात गावागावातल्या हातांना काम मिळेल. निसर्गाकडे बघण्याचा हरित दृष्टीकोन वाढीस लागेल. कोकणात सन २०१० पासून इतिहास परिषद कार्यरत आहे. तिच्या दरवर्षीच्या अधिवेशनात नवे संदर्भ समोर येत असतात. ऐतिहासिक आणि प्राचीन खूणांची शास्त्रशुद्ध पद्धतीने जपणूक होत नसल्याने ही मंडळी कायम हळहळत असतात. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून कोकणात या विषयात काय करता येईल ? अशी शास्त्रीय विचारणा व्हावयास हरकत नसावी. शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठावरील ताण वाढला आहे. गेली अनेक वर्षे इथला माणूस स्वतंत्र कोकण विद्यापीठ, स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ मागतो आहे. पर्यटनावर याच्या असण्याचाही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पर्यटनस्थळातील अद्ययावता, समुद्रकिनाऱ्यावर महिलांसाठी टॉयलेट, पर्यटन पॅकेज जिल्ह्याला हवे आहे. जिल्ह्यातल्या याच व्यवसायात सर्वाधिक कोकणी मनुष्यबळ कार्यरत आहे. कोकणात रोजगार नाहीअशी ओरड होत असताना सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या पर्यटन उद्योगाला सुलभ परवानग्या, दीर्घ मुदतीची कर्जे, सबसिडी, भरीव अर्थसाहाय्य मिळायला हवे आहे. यांतून पर्यटकांचा प्रवास सुलभ झाल्यावर, शहरा-शहरांतून पर्यटन गाईडमहत्त्वाचे ठरणार आहेत. यासाठी स्थळांची माहितीसतत अभ्यासवाचन करण्याची तयारीसंभाषण कौशल्यभटकंतीची आवड आणि अपार मेहनत करण्याची तयारी, शारीरिक सक्षमता, इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाबाबतचा उत्साह आवश्यक राहाणार आहे. 
नवा भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षांच्या संकल्पनेला अपेक्षित बळ नवमतदारांनी (तरुण) एकगठ्ठा पाठीशी उभे केल्याने सलग दुसऱ्यांदा मोदींना लोकसभेत जबरदस्त मुसंडी मारता आली. कोकणसह रत्नागिरी जिल्ह्यात या बळाची परतफेड करण्यासाठी पर्यटन विकासात खोडा घालणाऱ्या पायाभूत सुविधा, विशेषत: राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण शक्य तितक्या लवकर व्हायला हवे आहे. सध्या देशात आणि राज्यात कमालीच्या परस्पर विरोधी विचारांचे सरकार कार्यरत आहे. अशा स्थितीत पर्यटन समृद्धीच्या वाटा नाविन्यासह अद्ययावत होण्यासाठी विकासाची कोणतीदिशा पकडतात ? यावरच सारं काही अवलंबून असून आगामी काळात हेही चित्र स्पष्ट होईल.

धीरज वाटेकर
पत्ता : विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी. 
मो. ९८६०३६०९४८,           
ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  
ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com
(वाटा समृद्धीच्या : दैनिक सकाळ वर्धापन दिन विशेष पुरवणीत प्रसिद्ध लेख : ३१ जानेवारी २०२०)

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

कोकणचे सामर्थ्य अधोरेखित करणारे ‘कलादालन’


देशातील ४५ भारतरत्नांपैकी ६ कोकणातील, रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. देशासाठी सर्वोच्च त्याग करणारी, देशाची किर्ती जगभरात पोहोचविणारी अनेक नररत्ने कोकणाने दिली आहेत. राज्यकारभार, लष्करी कामगिरी, वैचारिक नेतृत्व, समाजकारण, संस्कृती, इतिहास, संशोधन, शिक्षण, साहित्य, युद्धनीती, क्रीडा, अध्यात्म, नाट्य-संगीत, आदि विविध क्षेत्रात जगात नावलौकिक मिळविणाऱ्या, कोकणाचे सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या व्यक्तींच्या तैलचित्रांचे, चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारलेले ‘सुरेश भार्गव बेहेरे व्यक्तिचित्र कलादालन’ नुकतेच (१७ नोव्हेंबर) रसिक-जिज्ञासूंना पाहाण्यास खुले झाले. मुंबई ते गोवा दरम्यान अश्मयुगकालीन ठेवा असलेल्या एकमेव वस्तूसंग्रहालयाची (२४ नोव्हेंबर २०१८) उभारणी केल्यानंतर वर्षभरातच वाचनालयाने कलादालन खुले केले. कोकणाला स्वतःच्या आत्मविश्वासाची जाणीव करून देणारे, समाजसाहाय्यातून सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारले गेलेले ‘वस्तूसंग्रहालय आणि कलादालन’ हे दोनही भव्यदिव्य प्रकल्प आवर्जून भेट देऊन पाहावेत, पुढील पिढीला समजून सांगावेत इतके महत्वाचे आहेत.      

कोकणातील बुद्धिमत्ता हा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय असलेले भारत सरकारच्या नवी दिल्ली भटके विमुक्त जनजाती विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत पुणे डेक्कन अभिमत विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू आणि पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे यांच्या हस्ते सुरेश भार्गव बेहेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘व्यक्तिचित्र कलादालन’ प्रकल्पाचे उद्घाटन झाले. कोकणात बुद्धिमंतांची मांदियाळी आहे. इथली बौद्धिक शक्ती प्रचंड आहे. कोकणने अनेक महनीय व्यक्तिमत्त्व जगाला, देशाला दिलीत. त्याबाबतची माहिती येथे मिळते. प्रकल्पाची उभारणी होत असताना, सर्वांच्या सक्रीय सहकार्यातून स्वप्नपूर्तीचा आनंद’ अनुभवता आल्याची वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले यांची प्रतिक्रिया प्रकल्प उभारणीमागची कहाणी सांगते. याच उद्घाटन कार्यक्रमात डॉ. शिंदे यांना लो.टि.स्मा.च्या अरविंद तथा अप्पा जाधव उपरान्त संशोधन केंद्राचा पहिला अपरान्त भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हडप्पाकालीन स्थळ असलेल्या राखीगढी येथे मानवी सांगाडय़ातील डीएनएच्या शास्त्रीय अभ्यासावरून हडप्पा हीच वैदिक संस्कृतीअसल्याचा निष्कर्ष मांडणारे डॉ. वसंत शिंदे यांच्या हस्ते या कलादालनाचे उद्घाटन झाले. हडप्पा संस्कृतीला कोणा परकीय आर्यानी नष्ट करून स्वत:ची संस्कृती वसवली. या गेल्या दोन शतकातील विचारला छेद देणारे संशोधन डॉ. शिंदे यांनी पुढे आणले. मूळचे मोरवणे-चिपळूणचे असलेले डॉ. वसंत शिंदे गेली अनेक वर्षे हडप्पा संस्कृतीवर संशोधन करत होते. हरयाणा येथील राखीगढी या हडप्पा संस्कृतीच्या स्थळावरील उत्खननादरम्यान त्यांना ४५ वर्षीय हडप्पाकालीन महिलेच्या कानातील हाडात अखंड डीएनएचे काही नमुने मिळाले. प्रयोगशाळेतील चाचण्यांनंतर त्या स्त्रीची गुणसूत्रे आणि आज भारतीयांमध्ये आढळणाऱ्या गुणसूत्रांमध्ये कमालीचे साम्य असल्याचे पुढे आले. हे साम्य पडताळून पाहण्यासाठी डॉ. शिंदे आणि त्यांच्या सहसंशोधकांनी १४०० भारतीयांच्या डीएनएचे नमुने गोळा केले. आपण भारतीय त्या हडप्पाकालीन संस्कृतीचेच वंशज आहोत व आर्य कोणी बाहेरून आलेले नसून तेही याच संस्कृतीचा एक भाग असल्याचा दावा डॉ. शिंदे यांच्या टीमने केला. त्यांचा हा शोधप्रबंध सेल व सायन्स या दोन जागतिक दर्जाच्या प्रतिष्ठित संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला. याचा आधार घेत संग्रहालय आणि कलादालन प्रकल्पाचे ‘योजक’ वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी वाचनालयावर अनेकांचा विश्वास असल्याचे नमूद करून केलेले ‘वसंतराव शिंदे सरांनी वाचनालयाला मोठं व्हायला संधी दिली’ हे विधान डॉ. शिंदे यांच्या कार्याबद्दल खूप काही सांगून जाते. डॉ. वसंतराव शिंदे यांनी ‘आर्य भारतीयच होते’ हा मांडलेला सिद्धांत सन १९४६ ला आपल्या एका ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडल्याचे इदाते यांनी नमूद केले. इदाते यांनी आपल्या भाषणातून कोकणाची बौद्धिक संपत्ती उलगडली. त्या संपत्तीला कायमस्वरूपी तैलचित्रांच्या माध्यमातून कलादालनाच्या रूपाने उभारण्याचा वाचनालयाचा विचार अत्यंत अभिनंदनीय तितकाच अनुकरणीय आहे.
   
खरतरं कलादालन ही सुरुवात आहे. हे प्रवाही काम आहे. यात अजून बरीच नावे जोडता येण्यासारखी आहेत. आगामी काळात वाचनालयाच्या माध्यमातून ते होतही राहाणार आहे. मूळचे धामणीचे डॉ. हरिभाऊ वाकणकर हे रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांना डोंगरात चित्र दिसली. त्यांनी ट्रेन मधून उतरून पुढचे आठ दिवस अंगावरच्या वस्त्रानिशी तिथे काढले. ज्यातून जगातील सर्वात पुरातन ठेवा २ लाख वर्षांपूर्वीची शैलचित्रे जगापुढे आली. त्यांचे तैलचित्र येथे भेटते. आरे-गुहागरचे सीताराम केशव बोधे यांनी सन १९२३ साली ‘अस्पृश्यांना सार्वजनिक जागी जाता आलं पाहिजे’ असा डॉ. आंबेडकरांच्या चवदारतळ्याच्या सत्याग्रहाला पूरक ठरणारा ठराव विधिमंडळात मांडला होता. त्यांच्याबाबतची माहिती येथे मिळते. यासह कलादालनात आपल्याला लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, झांशीची राणी लक्ष्मीबाई, भागोजीशेठ कीर, बाळासाहेब ठाकरे, स्वामी स्वरूपानंद, टेंबे स्वामी, दादासाहेब मावळकर, भास्करराव जाधव, डॉ. हरिभाऊ वाकणकर, वासुदेव विष्णू मिराशी, हमीद दलवाई, श्री भी वेलणकर, गोळवलकर गुरुजी, अनंत कान्हेरे, त्र्यंबक शंकर शेजवलकर, नानासाहेब जोशी, रियासतकार सरदेसाई, वासुदेवशास्त्री खरे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, सेनापती बापट, बाळाजी विश्वनाथ, डॉ. आनंदीबाई जोशी, दुर्गाबाई भागवत, सचिन तेंडूलकर, गोविंद वल्लभ पंत, धोंडो केशव कर्वे, पां. वा. काणे, विंदा करंदीकर, बॅ. नाथ पै, नानासाहेब गोरे मधु मंगेश कर्णिक, राम मराठे, शंकर घाणेकर, डॉ. काशिनाथ घाणेकर, भार्गवराम विठ्ठल वरेरकर, एअर मार्शल हेमंत नारायण भागवत, डॉ. तात्यासाहेब नातू, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, विष्णुपंत छत्रे, वसंत देसाई, सुरेश भार्गव बेहेरे, नाना शंकरशेठ आदि ८० तैलचित्रे येथे आपल्याला पाहाता येतात. प्रत्येक चित्रामागे, आयुष्यामागे मोठं काम उभं आहे. त्याची आवश्यक जाणीव, अभ्यास वाचनालयाकडे आहे. म्हणूनच वाचनालयातर्फे आगामी काळात कलादालनातील व्यक्तिमत्त्वांची माहिती देणारे पुस्तिक प्रकाशित केले जाणार आहे. हे पुस्तक घराघरात पोहोचविण्याचा वाचनालयाचा मानस आहे. 


कोकणातील असामान्य व्यक्तिमत्वांच्या कर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, विविध क्षेत्रातील त्यांच्या अभिमानास्पद कार्याचा परिचय करून देण्यासाठी लोटिस्माने व्यक्तिचित्र कलादालन साकारले. अनेक दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहाय्यातून कोकणच्या सुपुत्रांची तैलचित्रे या कलादालनात साकार झाली आहेत. तीन वर्षांच्या मेहनतीतून साकारलेल्या या तैलचित्र कलादालनात आपल्याला रविंद्र धुरी, तुकाराम पाटील, सीताराम घारे, रामचंद्र कुंभार, एस. टी. शेट्ये, के. जी. खातू, विक्रम परांजपे या ख्यातनाम चित्रकारांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून साकारलेली चित्रे भेटतात. चित्राखालची माहिती वाचत, हॉलमधील भारून टाकणारे ऐतिहासिक वातावरण ‘याचि देहि याचि डोळा’ अनुभवत प्रत्येकाला विलक्षण क्षणाचे साक्षीदार होता येतं. पाहणाऱ्याला आपण आपल्या जीवनातील एक सर्वोत्तम क्षण जगत असल्याची निश्चित अनुभूती घेता येईल इतकी क्षमता या प्रकल्पांत आहे. हे संग्रहालय-कलादालन बुधवार, सार्वजनिक सुट्टी वगळता इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले (माफक शुल्कासह) असते. संपर्कासाठी पत्ता : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संग्रहालय, जुन्या बहिरी मंदिराजवळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, दूरध्वनी : ०२३५५ २५७५७३, मो. ९४२३८३१६६८.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
दैनिक तरुण भारत नागपूर दिनांक २६.११.२०१९
INCLUDES NAGPUR AKOLA WASHIM YAVATMAL
VARDHA  BHANDARA GONDIYA  CHANDRAPUR
GADACHIROLI BULDHANA AND KHAMGAON

दैनिक प्रहार दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ 

दैनिक तरुण भारत (संवाद पुरवणी) दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ 
दैनिक रामप्रहर रायगड (दिनांक २९ नोव्हेंबर २०१९)
वरील लेखाची लिंक : https://ramprahar.com/33256/

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...