महाराष्ट्रातल्या जंगलात आणि डोंगरपट्ट्यात कोरोना लॉकडाऊन काळात मोठ्या
प्रमाणात प्राण्यांच्या शिकारीच्या घटनांची चर्चा सुरु झाल्यावर वनविभागाने शिकार्यांना
पकडण्यासाठी रात्रीची गस्त आणि देखरेख वाढविली होती. मुंबईच्या आसपास असलेल्या
जंगलावर ड्रोनच्या साहाय्याने गस्त घालण्याचे नियोजन केले होते. जंगल संवर्धन आणि
वन कर्मचाऱ्यांची सुविधा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काळानुरूप वापर आवश्यक
आहे. ‘संरक्षित वन आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जंगल क्षेत्र याचे संवर्धन झाले
पाहिजे. तेथे प्राण्यांचे मुक्त वास्तव्य राहिले पाहिजे. प्राण्यांची शिकार सहन केली
जाणार नाही.’ अशी भूमिका वनखात्याकडून मांडली जात असतानाही वन्यजीवांच्या हत्या
आणि तस्करीचे गुन्हे घडतात. जंगलगस्तीसाठी स्थानिक मजुरांची उपलब्धी महत्त्वाची आहे. जंगलगस्त घालताना
अवैध वृक्षतोड लक्षात येते. वनतस्करांना जंगलात अवैध वृक्षतोड करताना रंगेहाथ
पकडताना घनदाट जंगल आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार होत असतात. कधीकधी रात्री-अपरात्री जंगल हद्दीत बेकायदा तस्करी किंवा शिकार करणाऱ्या
टोळीला अडवण्याचा प्रयत्न केल्यास गस्त घालणाऱ्या वनरक्षकांवर, मजुरांवर हल्ले
होतात. मूळात रात्रीच्या अंधारात गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची प्रवृत्ती
आपल्याकडे बळावली कशी ? याचा विचार व्हायला हवा. नियमित जंगलगस्त घालण्याने हल्ल्याला आळा बसू
शकतो. अशा जोखमीच्या कामात योगदान देणाऱ्या, रोजंदारीवर काम करणार्या किनवट जंगल
क्षेत्रातील पाच मजुरांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वनपरिक्षेत्र
कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला होता. पर्यावरणाचा समतोल साधण्यासोबत
लाकूडचोरी, वन जमिनीवरील अतिक्रमणे, वणव्यांमुळे जंगल संपत्तीचे होणारे नुकसान
टाळण्यासाठी जंगलगस्तीचा उपयोग आंबोलीत करून घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात पाचेक वर्षांपूर्वी जंगलामधील
पदभ्रमंतीला (ट्रेकिंग) प्रोत्साहन, गावकऱ्यांना रोजगार, वनक्षेत्रात नियमित गस्त,
अवैध वृक्षतोड, अवैध चराई आणि वन्य
प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी पुणे आणि कोल्हापूर वन विभागाने गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींची
मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. जंगलातील गैरप्रकार शोधून काढत त्याला आळा
घालण्यासाठी निसर्गप्रेमींचा पुढाकार असतो. जंगलातील भटकंती दरम्यान ही मंडळी सतर्क असल्याने वनाधिकाऱ्यांना सतत
वन्यजीवांशी निगडीत घडामोडी कळत असतात. असे प्रयत्न आंबोलीत अधिक सक्रीय करता येतील. कोकणातील डोंगररांगांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची एक बाजू व्यापलेली आहे. या
भागात काही ठिकाणी परंपरागत शिकारी करणाऱ्या समूहाचे वास्तव्य आहे. तसेच येथे बेकायदा
वृक्षतोड करणाऱ्या टोळ्याही सक्रीय आहेत. दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या या
वनक्षेत्रात आणि सह्याद्रीतील कोकणात उतरणाऱ्या मार्गांवर वन्यप्राण्यांच्या शिकारी
होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. तस्करांपासून जंगल आणि वन्यजीवांचे
संरक्षण करण्यासाठी वनक्षेत्रात निसर्गप्रेमी, अभ्यासक आणि गिर्यारोहकांचा वावर
वाढल्यास चोरांवर नियंत्रण आणता येईल. मजूर आणि वनरक्षकांसोबत जंगलातील भटकंती
दरम्यान खूप काही नव्याने शिकायला मिळेल. निसर्गाचे आकर्षण वाढेल. जंगलाचे
व्यवस्थापन कळण्यास मदत होईल.
आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह या ५६९२ हेक्टर जंगलक्षेत्रात पट्टेरी
नर वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. कॉन्झर्वेशन रिझर्व्ह
कायद्यांतर्गत लोकांच्या सहभागातून, त्यांचे अधिकार कायम राखून वन्यक्षेत्राचे संवर्धन करणे अभिप्रेत
आहे. अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान संवर्धनाचे कडक पाहाता संवर्धन राखीवमध्ये
स्थानिकांना सोबत घेणे सोयीचे होते. पूर्वी पश्चिम घाट अभ्यासासाठी नियुक्त डॉ. माधव गाडगीळ समितीनेही
हे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्याची शिफारस केलेली होती.
आंबोली ते दोडामार्ग पट्टा ‘व्याघ्र कॉरिडॉर’ संरक्षित व्हावा म्हणून ‘वनशक्ती’ संस्थेने न्यायालयात प्रयत्न केले होते. या जंगलात गेल्या मार्च महिन्याच्या शेवटच्या
आठवड्यात पट्टेरी वाघाने मारलेल्या गव्याचे कुजलेले शरीर आढळून आले होते. वाघाच्या
पावलांच्या ठशावरून हा पूर्ण वाढीचा नर वाघ असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली
होती. फेब्रुवारी २०१८ मध्येही वसमंदिर-आंबोली-चौकुळ भागात
स्थानिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झालेले होते. या घटनेच्या तीन वर्ष अगोदर आंबोलीत
पट्टेरी वाघ दिसला होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटच्या आठवड्यात आंबोलीला लागून
असलेल्या कोल्हापूर हद्दीत वाघाचे दर्शन झाले होते. गेल्यावर्षी (२०२०) जून
महिन्यात आंबोली जंगलात वाघाने एका दुभत्या म्हशीची शिकार आणि दोन म्हशींना
तोंडावर पंजा मारून जखमी केल्याचे समोर आले होते. पावसामुळे शिकारी प्राण्याच्या
कोणत्याही खुणा शिल्लक न राहिल्याने वन विभागाने वाघाने शिकार केल्याच्या वृत्ताला
दुजोरा दिला नव्हता. स्थानिकांना मात्र वाघाच्या वावराच्या खुणा आढळल्या होत्या. या भागात एकदा जंगल
मार्गावर स्क्रेप (रस्त्यावरती मार्किंग करिता केलेली उकरण) आढळून आली होती. नुकतेच एका संवर्धन राखीव वनक्षेत्रात पट्टेरी वाघाने गाईला गळा
फोडून ठार मारल्याचे काही धनगर बांधवांनी पाहिले होते. घटनास्थळी इतर कोणतेही
पुरावे आढळून आलेले नसले तरी भक्ष्य ओढून नेण्याची आणि खाण्याची पद्धत ही पट्टेरी वाघाच्या
सवयीशी जुळते आहे. दरम्यान या ठिकाणी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नर वाघाचे
दर्शन घडले आहे. शेतकऱ्यांना अशा हल्याच्या घटनांनंतर नुकसान भरपाई देण्याच्या
दृष्टीने अशा घटनांची नोंद होणे आवश्यक आहे.
आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र सह्याद्री व्याघ्र
प्रकल्पासाठी अतिशय महत्वाचे आहे. गोव्यातील म्हादई आणि कर्नाटकातील भीमगड
अभयारण्य क्षेत्र याला जोडलेले असल्याने वन्यजीवांच्या आणि वाघांच्या भ्रमणमार्ग
आणि प्रजननाकरिता हा सलग पट्टा उपयुक्त आहे. भविष्यात वन्यजीवांच्या हालचाली
आंबोली, दोडामार्ग, तिलारी, चंदगड, आजरा, राधानगरी, चांदोलीपर्यंत आढळू शकतात. वाघ आणि इतर मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी कॉरीडोर कनेक्टिव्हिटी (भ्रमणमार्गाची
जोडणी) महत्त्वपूर्ण असते. हा भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ
हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा
स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात. राधानगरीपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली
अभयारण्यापर्यंतचे अंतर पूर्ण करणे वाघांसाठी सहजसाध्य आहे. या भागात मोठ्या
प्रमाणात मानवी वसाहत आहे. येथे सततची देखरेख आणि गस्त आवश्यक आहे. आंबोली जंगल
परिसराचा पट्टा नर वाघाच्या भ्रमंतीचा परिसर असल्याचे वाघांवर संशोधन करणारे
वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी यापूर्वीच शासनाच्या निदर्शनास आणले आहे. त्यांनी
२०१४-१५ साली वनविभागाच्या मदतीने तिलारी परिसरात ‘कॅमेरा ट्रॅप’ लावले होते. पहिल्यांदा तेव्हा या जंगलपट्ट्यात तीन वाघांची
नोंद झाली होती. तसेच सह्याद्री
निसर्ग मित्र आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने राबविलेल्या ‘ई-मॅमल’
प्रकल्पांतर्गत आंबोली-तिलारी पट्यात कॅमेरा ट्रॅपमध्ये पट्टेरी वाघाचे छायाचित्र
कैद झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे, वन्यजीव अभ्यासक
रोहन कोरगावकर यांनाही आंबोली जंगलात वाघाच्या पावलांचे ठसे, विष्ठा आढळली होती.
सह्याद्रीत संरक्षित नसलेल्या वनक्षेत्रात गेली
अनेक दशके वृक्षतोड सुरू आहे. यामुळे जैवविविधतेतील घटकांचा संपूर्ण अधिवास नष्ट
होत आहे. तरीही आंबोली ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ मासा, टॅरॅन्टुलाची (कोळी)
‘थ्रिगमोपीयस इग्निसिस’ प्रजाती आदी प्रदेशनिष्ठ जैवविविधता जोपासून आहे. २०१३
साली दिवाळीत आंबोली भ्रमंती करताना आम्हाला मोठ्या केसाळ कोळ्याची हॅप्लॉक्लास्ट्स
(Haploclastus) प्रजाती पाहायला
मिळालेली होती. आपल्या जवळचे मध्यप्रदेश राज्य आज ‘टायगर स्टेट
ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. तेथे वन्यजीवांचे संरक्षण, त्यांच्या अधिवासाचे व्यवस्थापन, लोकसहभाग, मानव
वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन उत्तम आहे. आपल्याकडे यासाठी अधिकाऱ्यांनी कडक उपाययोजना
अंमलात आणल्या पाहिजेत. सह्याद्रीत स्थानिकांना मध्यभागी ठेवून वनक्षेत्र संरक्षण
आणि संवर्धनाच्या संकल्पना झोकून देऊन राबवायला हव्या आहेत. वाघाचे जंगल हे आपल्या भूमीचे वैभव आहे. ते जपायला हवे. इथल्या झाडांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, संवर्धन व्हायला हवे. अशी जंगले
आपल्या भूमीची फुफ्फुसे असतात. ती आपल्याला शुद्ध हवा देतात. सह्याद्रीत वनक्षेत्राचा प्रदेश कमी आहे. असलेले
वनक्षेत्र लहान तुकड्यांमध्ये विभागलेले असल्याने ते राखण्याची जबाबदारी अधिक आहे. आंबोलीला सध्या रेंजर असलेले दिगंबर जाधव फिल्डवर सक्रीय
असलेले अधिकारी आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जंगल गस्त वाढविल्याचे
म्हटले आहे.
आंबोली परिसरातील जंगल भागात मागील काही
वर्षांपासून जाणवणारे पट्टेरी वाघाचे अस्तित्व जंगलप्रेमींना सुखावणारे आहे.
आंबोलीसारख्या कोणत्याही जंगलात जंगलाचा श्वास असलेल्या वाघाची (रॉयल बेंगॉल
टायगर) निर्मिती आपल्याला शक्य नाही. म्हणून त्याच्या अधिवासांचे संवर्धन आणि
संरक्षण आवश्यक आहे. यासाठी पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आलेल्या आंबोली जंगलात
नियमित कडक ‘देखरेख आणि गस्त’ घातली जायला हवी आहे. आपल्या दुर्लक्षामुळे वाघ
भरकटला, इतरत्र गेला किंवा गायब झाला तर कोणाला जबाबदार धरायचे ? सह्याद्रीत
शिकारीचे धोके आहेत. अशा शिकारींच्या समोर वाघ आला तर काय होईल ? यासाठी आंबोली सारख्या
जंगलांना मिळालेले संरक्षण तातडीने जमिनीवर दिसायला हवे आहे. यंत्रणा अधिक
सक्षमतेने कार्यरत व्हायला हवी आहे. गार्ड्सकडे वायरलेस कनेक्टीव्हिटी असायला हवी
आहे. हे काम राज्यात नव्याने संरक्षित झालेल्या सगळ्या जंगलक्षेत्रात आणि विशेषत: वाघाची
सक्रीयता असलेल्या आंबोलीच्या जंगलात व्हायला हवे आहे.
धीरज वाटेकर