शास्त्रीय वेगळेपणास पर्यटनात स्थान हवे !
चिपळूण तालुक्यातील मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या "त्या" अभियांत्रिकी नवल ठरलेल्या “रामचंद्र
वासुदेव मराठे न्यास” या हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील या वास्तूची आजची काठीण्यपातळी पाहता तिचे संपूर्ण नियोजन करणारी व्यक्ती त्या काळातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तद्य जाणकार असावी, या मताशी कोणीही सहज पोहोचेल इतकी सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा.
साडेसात एकर
जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची
अंतर्गत रचनेविषयी श्रीकांत बापट यांनी, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विलास महाडिक
यांच्या उपस्थितीत सविस्तर माहिती दिली. मुख्य दरवाजापासून अगदी पाठीमागील
दरवाजापर्यंत सरळ रेषेत मोकळी जागा ठेवण्यात आली असून (कॉरिडॉर) त्याच्या
दोनही बाजूला वास्तूतील खोल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या
मजल्यावर मोठा हॉल आहे. वास्तूच्या आतून
आणि बाहेरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडाचे स्वतंत्र दोन जीने आहेत. उंचीवरील
जीने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज पडणार नाही वा तो चढताना दमणार
नाही यानुसार या जीन्याची तंत्रशुद्ध रचना साकारण्यात आली आहे. जीना
पाहिल्यानंतर या वास्तूच्या शास्त्रीय व अभ्यासपूर्ण उभारणीची सहज कल्पना येते. वास्तूतील
काही खोल्या गरजेप्रमाणे एकमेकांना जोडल्या आहेत. जेवणासाठी
लागणारे मसाल्याचे मिश्रण बनविण्यासाठी, मिक्सर नसलेल्या काळातील घडीव “पाटा”
येथे आहे. पाण्यासाठी विहीर तसेच पाठीमागील बाजूकडील डोंगरात असलेल्या
झऱ्यांचे पाणी, विशिष्ठ उंचीवर १० बाय २० फूट आकाराचे मोठाले टाके बांधून साठविण्यात
आले आहे. आजही तब्बल नव्वद वर्षांनंतरही या वास्तूतील लाकडाला काही
झालेले नाही. त्या काळात या लाकडाला कोणतीतरी महत्वाची प्रतिबंधक
व्यवस्था केलेली असणार हे नक्की आहे.
वास्तूतील जवळपास
वीस-बावीस
खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन
खिडक्या, भिंतीतील दोन कपाटे आहेत. खिडक्यांना
चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर
सूर्यप्रकाश वास्तूतील प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. सायंकाळी
किमान सात वाजेपर्यंत वास्तूला वीजेची आवश्यकता भासत नाही.
प्रत्येक दरवाज्याला व्हेंटीलेटर्सची रचना आहे. कौलारू
बांधणीच्या या वास्तूतील आतील छताच्या रीपांचा भाग वास्तुसौन्दर्याचा विचार करून फळ्या
मारून बंद करण्यात आला आहे. ज्यामुळे
पावसाळ्यातील छोट्याश्या किरकोळ लिकेजपासून सुटका होते आहे. कौले
बदलावयाची असल्यास छतावर चढून बदलावी लागतात, आजच्या
काळात हे काम आपणास जिकीरीचे वाटत असले तरीही त्या काळात हे अवघड वाटणारे काम सहज
करण्याचे कौशल्य आणि क्षमता असणारी माणसे असतं, हे
यातून आपणास प्रतीत होते. छताच्या “लगी”
आज नव्वदीनन्तरही मजबूत असून त्यांना कोठेही बाक आलेला नाही. वास्तविकत: जेथे
दाब पडतो, तेथे लाकडाला बेंड येतो, पण
हे येथे घडलेले आपल्याला दिसून येत नाही. छप्पराच्या
९ इंच आय बीमची मजबुती नव्वद वर्षांनंतरही सहज नजरेत भरते. भिंतींचा
मूळ गिलावा अजिबात हललेला नाही व त्याचे तुकडे गळून पडलेले नाहीत. पहिल्या
मजल्याच्यावर पोटमाळा आहे. पूर्वी खेडेगावात
माणूस आजारी पडला आणि तो वैद्यकीय उपचारार्थ स्वत: चालत
जाण्याच्या स्थितीत नसेल तर त्याकरिता वापरावयाची “डोली”
येथे आहे. या वास्तूतील खोल्यांच्या सर्व दरवाजे-खिडक्या
उघडल्या तर त्या बंद करायला किमान ३० मिनिटांचा अवधी लागतो. घराच्या
एका कोपऱ्याचा छोटासा भाग पाया बांधून सोडून देण्यात आला आहे.
वास्तू परिसरात ८० आंब्याच्या
झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा,
खुरी (खूप
सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. या
फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही, तरीही येथील ही अशी
लागवड अभ्यासू मानवी मनाला बुचकळ्यात टाकते. शेतकऱ्याला आपल्या
फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते. त्यासाठी
भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती
शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण
होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा
आहे. स्त्रीकेसर
आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून
या सुगंधी झाडांची रचना येथे आहे. हे सारे नियोजन
करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाणकार होता.
आज यातील सर्व झाडे पाहण्यास मिळत नाहीत. पण अंदाज येऊ शकेल
इतकी ४० फूट उंच सोनचाफा आदि झाडे आहेत. कोकम, फणस, काजू,
औषधी गुणधर्म असणारी चवई केळी, साग आदि झाडे
परिसरात आहेत. झाडांकरिता चिरेबंदी पाटाच्या माध्यमातून, घराच्या
वापरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अगदी सुरुवातीच्या
काळात मधुकाका बर्वे यांच्यामुळे, विविध सेवाभावी
प्रकल्पांसाठी ही वास्तू विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रदेशास दान
मिळाली. या वास्तूचा
नोंदणीकृत “रामचंद्र वासुदेव मराठे न्यास”
१० मे १९८५ रोजी करण्यात आला. दानपत्र यशवंत
परशुराम मराठे यांनी केले होते. शिक्षण, वैद्यकीय
साहाय्य, दारिद्र्य निवारण, नैसर्गिक आपत्ती
परिहार, उपेक्षितांचा
उत्कर्ष, ग्रामविकास, नैतिक व सांस्कृतिक
प्रबोधन, संस्कृत भाषा शिक्षण हे या न्यासाचे मुख्य उद्देश आहेत. न्यासाचे
अध्यक्ष म्हणून प्रकाश साठे, सचिव श्रीकांत उर्फ
भाऊ बापट, विश्वस्त अनिरुद्ध भावे, श्रीनिवास
केतकर, दत्ताराम
केतकर, राजाभाऊ
जोशी, पिनाकिन
मराठे (मूळ
मालकांचे वंशज) काम पाहतात. सुरुवातीस येथे
सुमारे २० वर्षे बिरवाडी-महाड येथील डॉ. गोखले
यांनी आरोग्य प्रकल्प राबविला. छोट्यां-मोठ्या
वैद्यकीय शस्त्रक्रिया त्या काळात येथे होत. या वास्तूत काही वर्षांपूर्वीपर्यंत
महिलांच्या प्रसूती व्हायच्या. वास्तूत आजही
आपणाला “ऑपरेशन थिएटर” नावाचा फलक
आपल्याला दिसतो. तद्नंतर सुमारे १५ वर्षे हा भाग दुर्लक्षित राहिला. सध्या
येथे महान मुलांसाठी फिरते मोफत वाचनालय आणि मोफत संगणक प्रशिक्षण वर्ग चालतो. वाचनालयात
राष्ट्र पुरुषांची ५०० पुस्तके आहेत. परिसरातील गावात
वाडीनिहाय त्यांचे वितरण होते. पुस्तके आठवड्याला
बदलली जातात. सारिका मोरे या संगणक प्रशिक्षण वर्ग चालवितात. व्यवस्थापक
म्हणून रत्नागिरीचे सौ. व श्री. गजानन नारायण मुळ्ये
काम पाहातात. जोडप्यांना आवश्यक स्वतंत्र खोल्या, भरपूर
पाणी, निसर्गरम्य
परिसर, डांबरी
रस्त्यापासून अगदीजवळ, दूरचित्रवाणी, मनोरंजन
आणि खेळ या करिता वास्तूच्या चौफेर जागा आहे. गावात
वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे या
वास्तूत आपण उत्तम वृद्धाश्रम साकारू शकतो, असा मनोदय यावेळी
श्रीकांत बापट यांनी बोलून दाखविला. अगदी नुकतीच जून
महिन्यात नामवंत विचारवंत राजन खान यांनी या वास्तू वैभवाची भेट देऊन पाहणी केली
होती.
आधुनिकीकरणाच्या रेटय़ात जुन्या हेरीटेज वास्तू हळूहळू नष्ट होत
आहेत. आपल्या
पूर्वजांप्रमाणे वास्तू वैभव उभारणे आज आपल्याला शक्य नसले तरी जे आहे त्याचे
संवर्धन करणे गरजे आहे. सुदैवाने मराठे कुटुंबीयांनी मालदोली गावातील हा
ऐतिहासिक वारसा जपून
योग्य हाती सपुर्द केला आहे. त्यामुळे वास्तूशास्त्रीयदृष्टया या
हेरिटेज वास्तूचे संवर्धन होत असताना तिच्याकडे पर्यटकही आकृष्ट व्हायला हवा. “त्या” काळात
पुण्याच्या पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर काम करणारे रामचंद्र वासुदेव मराठे यांनी
आपल्या तत्कालीन अभ्यासू आणि विचारवंत अभियंता असलेल्या खूप जवळच्या मित्राच्या
मार्गदर्शनाखाली या वास्तूची उभारणी केली आहे. हे सारे वैभव त्या काळात मालदोली
सारख्या अगदी ग्रामीण भागात कसे उभारले गेले
? हे एक आश्चर्यच आहे. “त्या” अभियंत्याला आजच्या अभियंता दिनी मानाचा
मुजरा करायलाच हवा
!
अधिक माहिती...
मालदोलीतील “रामचंद्र वासुदेव
मराठे न्यास” या हेरिटेज वास्तूचा नकाशा आणि संपूर्ण काम हे विश्वविख्यात अभियंता भारतरत्न डॉ. विश्वेश्वररया यांनी आपले पुण्यातील
मित्र पोलिस खात्यातील वरीष्ठ अधिकारी रामचंद्र वासुदेव मराठे यांच्याशी असलेल्या त्यांच्या
मैत्रिखातर केले होते, अशी माहिती या संबंधात गेल्या 2-3 पिढ्यांपासून चर्चेत आहे.
याबाबतचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नसल्याने याबाबत अधिकाराने कोणी बोलू शकत नाही,
हे नक्की. मात्र नव्वद वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची
देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरितही ती वास्तू जशीच्या तशी
उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे आणि डॉ. विश्वेश्वरय्या हे मराठे
यांचे पुण्यात असताना मित्र असल्याची माहिती विचारात घेता यात तथ्य असावे. प्रत्यक्ष
वास्तू पाहिल्यानंतर हे सामान्य बुद्धिमततेचे काम नाही, हे आपल्याला स्पष्ट जाणवते.
धीरज वाटेकर
पर्यटन अभ्यासक - स्थापत्य
अभियंता