रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

सांस्कृतिक राजधानीतील सुसंस्कृत नेतृत्व

 

क्षमता, गुणवत्ता आणि आकाराने ‘सह्याद्रि’ सारख्या विशाल शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि कोकणची सांस्कृतिक राजधानी ‘चिपळूण’सह संगमेश्वरचे आमदार शेखर निकम (सर) यांचा आज वाढदिवस आहे.शिक्षण, सहकार आणि राजकारणाच्या माध्यमातून जनविकासाच्या कामात कार्यरत राहिलेल्या खा. गोविंदराव निकम साहेबांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून चालताना काळानुरूप बदल स्वीकारीत शेखर सरांनी ‘पर्यटन आणि पर्यावरण’सारख्या विषयाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. समाजकारणातून द्वेषविरहित राजकारण साधताना समाजातील सर्वस्तरीयलोकांना प्रामाणिक सहकार्य केल्याचे आमदार होण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘पालखी विकासाची’ मधील समाजपयोगी कामांच्या यादीवरून लक्षात येते.अचूक वेळेत मदत करणाऱ्या, जनसामान्यांच्या मनात आपल्या दैनंदिन स्वाभाविक वर्तवणुकीतून ‘आपला माणूस’ अशी प्रतिमा तयार करण्यात यशस्वी ठरलेल्या आणि ती जपण्यासाठी मेहनत घेणाऱ्या शेखर सरांच्या कारकीर्दीचा आजच्या त्यांच्या ५६ व्या अभिष्टचिंतनदिनी घेतलेला हा आढावा.

स्व. आई अनुराधा आणि स्व. वडील गोविंदराव या दाम्पत्याच्या पोटी १ मार्च १९६६ रोजी जन्मलेल्या शेखर सरांचं आजचं शांत, संयत, मनमिळावू, अभ्यासू आणि जनतेच्या अपेक्षांना भिडणारं व्यक्तिमत्त्व संपूर्ण रत्नागिरी जिल्हावासियांना भावतं आहे. जनतेसाठी सदैव उपलब्ध राहण्याची सवय आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातल्या अभ्यासू वावरातून त्यांनी मागील दहा-पंधरा वर्षांच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात वेगाने आपले स्थान पक्के केले आहे. ते कार्याध्यक्ष म्हणून सह्याद्रि शिक्षण संस्थेचा ३३ माध्यमिक विद्यालये, १८ व्यावसायिक महाविद्यालये, ५ कनिष्ठ महाविद्यालये, ४ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, २ प्राथमिक शाळा असा भव्यदिव्य डोलारा सांभाळत आहेत. सह्याद्रि ही आज महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. तिचे कामकाज पाहण्यासाठी असंख्य मान्यवर सावर्डेत येत असतात. मागील ६५ वर्षांच्या या संस्थेचा, जणू मैलाचा दगड ठरावा असा अलीकडचा विस्तार साकारण्यात सरांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

चिपळूण संगमेश्वर मतदार संघ आकाराने मोठा आहे. तरीही आमदार म्हणून शेखर सर चिपळूण तालुक्यासह संगमेश्वरातील देवरुख-मार्लेश्वर पर्यंतच्या विशाल मतदारसंघात सर्वांना सहज उपलब्ध होत असतात. त्यांना भेटायला येणाऱ्यांचे प्रश्न व्यक्तिगत असोत, विकासाचे असोत किंवा शोषित-पिडीत वर्गाच्या हेळसांडीचे असोत अशा सर्वच प्रश्नांची प्रामाणिक उकल करण्याकडे त्यांचा कायम भर असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी चिपळूण–संगमेश्वर मतदारसंघाकडेही विशेषत्वाने लक्ष देत आपली ताकद वाढविली होती. तरीही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते थोड्या मताने पराभूत झाले. मात्रते निराश होऊन घरी बसले नाहीत. पाहिल्यासारख्याच जोमाने मतदासंघात वावरत राहिले. त्यांनी लोकसंपर्क वाढविला. लोकांच्या अपेक्षांना भिडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी पदरचे पैसे खर्च करून लोकविकासाची प्रलंबित कामे केली. यात विहीर बांधकाम, पाईप लाईन जोडणी, बौद्ध विहार, विंधनविहीर आणि पंप, पाण्याच्या तळ्यांचे बांधकाम, वीज कनेक्शन जोडणी, सभागृह बांधकाम आणि लादीकाम, प्लास्टरकाम, पिकअप शेड बांधकाम, मोऱ्या, पाखाडी, गणपती विसर्जन घाट, संरक्षक भिंत, मंदिर वॉल कंपाऊंड, स्टील मटेरियल पुरवठा, पेव्हर ब्लॉक, सौरउर्जा, मंदिर, ग्रील्स, अंतर्गत रस्ते दुरुस्ती, खडीकरण आदींसह अनेक ठिकाणी ग्रामदेवता मंदिरांच्या उभारणी व दुरुस्तीसाठी सहकार्य आदींचा समावेश आहे. कापशी नदीवर बंधाऱ्यांचे जाळे, स्वखर्चातून १७५ विंधन विहिरी त्यांनी बांधून दिल्या. यातून त्यांची ‘जलदूत’ अशी ओळख निर्माण झाली. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्या पाण्याचा शेतीसाठी वापर करण्याचा यशस्वी प्रयोग सरांनी राबविला. निवडून येण्यापूर्वीपासून त्यांनी शेती, फलोत्पादन, फळप्रक्रिया, पशूपालन आदी शेती आणि शेतीपूरक क्षेत्रातील अनेक कामांचा धडाका सुरु ठेवल्याने त्यांच्याकडे ‘भावी आमदार’ म्हणून बघायला सुरुवात झालेली होती. आमदार नसताना शेखर सरांनी केलेल्या कामांमुळे आज जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. यामुळेच मतदार संघासाठी ते करीत असलेल्या विकासाच्या प्रयत्नांचे रुपांतर जनतेच्या अपेक्षांच्या बदलांमध्ये होणे आवश्यक आहे. निवडून आल्यानंतर सरांनी आपल्या मतदारांना, ‘आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी अविरत प्रयत्न करत राहीन’ अशी दिलेली खात्री त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीतून निश्चित जाणवते आहे.

मागील वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेखर सरांनी कोकण विकासाशी निगडीत जवळपास सारे मुद्दे मांडले होते, भविष्यात त्यांचा पाठपुरावा करावा लागणार आहे. आपल्या या भाषणात बोलताना त्यांनी, ‘शासनाच्या दुर्लक्षामुळे कोकणात पर्यटन विकास होत नाही’ असे म्हटले होते.कोकणात नद्यांना पूर येतात. यावर उपाय म्हणून रोहा आणि कराड प्रमाणे नद्यांना दोन्ही बाजूंनी भिंती घालून संरक्षण करण्याची मागणी केली होती. कोकणातल्या छोट्या छोट्या खोऱ्यात पाझर तलाव व्हावेत. ‘सिरीज ऑफ बंधारा’ ह्या संकल्पनेची कोकणात आवश्यकता असल्याचे शेखर सरांनी आपल्याला आलेल्या अनुभवाच्या आधारे विधिमंडळात आवर्जून सांगितले होते. रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला नसल्याबाबत त्यांनी जाहीर मत व्यक्त केलं होतं.  खाजगी पडीक क्षेत्राचे वातावरण नैसर्गिक आहे. अशा जमिनींवर साग, बांबू, खैर अशी लागवड होण्यासाठी विशेष योजना हवी असा मुद्दाही मांडला होता. प्रक्रिया उद्योगाचे काम कोकणात होत नाही. यासाठी शासनाची भाग भांडवलाची स्कीम आहे. पण मागच्या ५ वर्षात त्याचे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यांनी यावेळी कोकण पर्यटन विकास महामंडळ, छोट्या मच्छिमारांच्या समस्या, कोकणात समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्सच्या अंतराचा मुद्दा, कोकण कृषी विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी १९९० पूर्वीपासून असलेली जागांची ६ ही संख्या वाढावी, मत्स्य विद्यापीठाची आवश्यकता, एल.ई.डी. मासेमारी बंद करावी, शासकीय ग्रामीण रुग्णालयांची अवस्था, रिक्त असलेली पदे, रुग्णालयांची चालू असलेली बांधकामे, काजू बागायतदारांच्या समस्यांसंदर्भात केसरकर समितीचा अहवाल अमलात आणावा, खैराच्या लागवडीची शेतीत गणना व्हावी, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग आदी मुद्दे मांडल्यावर कोकणातले लोक ‘आत्महत्या’ करत नाहीत म्हणून याकडे लक्ष द्यायचे नाही असे न करता याकडे गांभिर्याने पाहावे अशीही भूमिका मांडली होती.

समस्यांचा विचार करता, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघडोंगरी भागात वसलेला आहे. आजही इथे दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न, पायाभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना सर्वाधिक खराब रस्ता म्हणून कायम खेड ते संगमेश्वरकडे पाहिले गेलेले आहे. या स्थितीत बदल होतो आहे, तो अधिक वेगाने व्हायला हवा आहे. अलीकडचे देवरूख ते संगमेश्वर मार्गाचे झालेले डांबरीकरण अनेकांना सुखावणारे ठरले आहे. मागचं संपूर्ण वर्ष कोरोना संक्रमणाने व्यापलं होतं. अजूनही त्यातून आपली मुक्तता झालेली नाही. अशा स्थितीत शेखर सरांची संवेदनशीलता अनेकवेळा पाहायला मिळाली. प्रसंगी विरोध पत्करून, ‘कृपा करून गावी येण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा. आम्ही १४ दिवस क्वारंटाईन राहू’ या चाकरमान्यांच्या आवाहनाला दाद देत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता.

विदेशी वृक्षप्रजाती ही शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमातून वगळायला हवी अशी पर्यावरणप्रेमींची गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती. तिला शासनस्तरावर वाचा फोडण्याचे काम शेखर सरांनी केले. सामाजिक वनीकरण खाते अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्रभर विदेशी वृक्ष प्रजातींची शासकीय कार्यक्रमातून लागवड झाली आहे. विदेशी वृक्ष प्रजातींच्या लागवडीचे पर्यावरण, जीवसृष्टीवर गंभीर परिणाम दिसू लागलेत. या विदेशी प्रजातींशी जीवसृष्टी एकरूप होत नाही. यातील काही प्रजाती मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाणी शोषून घेतात. अशा जैवविविधता धोक्यात आणणाऱ्या विदेशी वृक्षांना शासकीय वृक्षारोपण कार्यक्रमातून तसेच निर्मितीतून वगळावे. देशी वृक्षांच्या प्रजातींना जाणीवपूर्वक प्रशासनाने प्राधान्य द्यावे. असा धोरणात्मक बदल शासनाकडून व्हावा, अशी विनंती शेखर सरांनी सप्टेंबर २०२० मध्ये शासनाला केली होती. त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याबाबतच्या सूचनाही महसूल आणि वन विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये प्रधान मुख्य वन संरक्षकांना दिल्या होत्या. कोकणात वणव्याची समस्याही मोठी आहे. चिपळूणातल्या पर्यावरणप्रेमींनी यावर काम करायला सुरुवात करताच शेखर सरांनी वणवा मुक्तगावांच्या विकासासाठी जादा निधी देण्याचे जाहीर केले.

मागच्या महिन्यात, किल्ले प्रचितगडच्या जीवघेण्या शिडीच्या दुरावस्थेतेबाबत शेखर सरांनी तातडीने दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत दाखविलेल्या तत्परतेची तमाम शिवप्रेमी नक्की दखल घेतील. आपल्याकडे किल्ल्यांसंदर्भात अनेकविध प्रश्नकायम आहेत. मागच्या शिवजयंतीला गोवळकोट बंदरावर मातीत उलट्या गाडलेल्या ४ तोफा गडावर नेण्याचे काम राजे प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी अनेकांच्या सहकार्याने पूर्ण केले. जिथे जिथे शिव छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारे किल्ले व इतर ऐतिहासिक वास्तू आहेत त्या त्या ठिकाणी आजच्या पिढीतले राजांचे मावळे संवर्धन कामासाठी कार्यरत आहेत. स्वच्छता आणि संवर्धनाचे काम हे मावळे मनापासून, कोणत्याही अपेक्षेशिवाय आणि स्वयंस्फूर्तीने करत असतात. शासकीय पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आदींनी त्यात्या ठिकाणी वर्षातून एखाद-दुसऱ्या वेळेला किमान एकत्र करून या कष्टाळू मावळ्यांसोबत चहा-पान घेण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची पद्धत सुरु करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची पद्धत सुरु झाल्यास गडकिल्ल्यांच्या स्वच्छता कामाला अधिक उत्साह येईल. याद्वारे चर्चा घडून आपोआप संवर्धन कामाला गती प्राप्त होईल.

आपल्या भागाचा विकासकरणे हे लोकप्रतिनिधींचे पहिले काम आहे आणि शेखरसर यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत.तरीही कालौघात आपल्या कामाचा ठसा उमटावा अशी भरीव कामेही त्यांच्याकडून व्हावीत, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.सकारात्मक राजकीय भूमिका आणि विकासकामांना प्राधान्य या कार्यपद्धतीद्वारे सरांना मतदारसंघात मोठे काम उभे करणे शक्य आहे. कोकणात आणि शेखर सरांच्या मतदारसंघात पुष्कळ देवराया आहे. अपवाद वगळता या देवरायांची आजची स्थिती भयावह आहे. ‘विज्ञानवादी’ युगात मंदिरांच्या निर्मितीसाठी किंवा इतर कारणांन्वये अनेक पुरातन देवराया मुळापासून तोडल्या गेल्या आहेत. यातल्या काही देवराया प्रातिनिधिक स्तरावर म्हणून पारंपरिक देशी वृक्षांच्या माध्यमातून पुन्हा वनसमृद्ध आणि पर्यावरणपूरक होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत. अशा विषयात काम करणाऱ्यांची कोकणात कमी नाही. त्यांना पाठबळ आवश्यक आहे. सांस्कृतिक राजधानीचे शहर असलेल्या चिपळूणच्या नाव लौकिकाला साजेसे उपक्रम होण्यासाठीही सर योगदान देत असतात. शहरातल्या सर्वात जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या विविध उपक्रमांना त्यांचे सहकार्य असते. वाचनालयाने पनवेल ते पणजी दरम्यानचे सर्वोत्तम वस्तूसंग्रहालय आणि कलादालन प्रकल्प उभारले आहेत. तालुकाभर आजही पुरातन भग्नावशेष इतरत्र विखुरलेले पाहायला मिळतात. हे अवशेष संग्रहालयात एकत्रित यायला हवे आहेत.

चिपळूण शहर आणि तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्था धडपडते आहे. चिपळूणला डेस्टीनेशन बनविण्याचे काम हे सर्वांचे आहे. ही संस्था अनेक वर्षे पर्यटन महोत्सव भरवते आहे. याला भरीव शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक पाठबळ मिळायला हवे आहे. चिपळूण हे कोकणातील महत्वाचे मध्यवर्ती केंद्र आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे, धबधबे आदी पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी शेखर सरांनी ‘The Happening Kokan’ नावाचा माहितीपट बनवला होता. महामार्ग चौपदरीकरणानंतर मध्यवर्ती ठिकाण म्हणून चिपळूणचे महत्त्व सर्वाधिक वाढणार आहे. कोकणात पर्यटनाच्या व्यवसायाचा विचार करता येथे अत्याधुनिक संपर्क यंत्रणा असलेलं ‘पर्यटन माहिती केंद्र’ तयार होणं आवश्यक आहे. चिपळूण तालुक्यात गेल्या पंचवीसेक वर्षांत रोजगारसमृद्धी साधणारा एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. इथल्या हातांना काम देण्याची क्षमता असलेला ‘पर्यटन’ हाच एकमेव व्यवसाय आहे. त्याच्या विस्तारासाठी पायाभूत सुविधा, प्रत्यक्ष पर्यटनस्थळी विविध सोयी उभ्या व्हायला हव्यात. कोयना अवजलाच्या बळावर बारमाही वाहणाऱ्या चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या किनारवर्ती भागात पर्यटनाचा अनोखा आधुनिक प्रकल्प आकाराला येऊ शकतो. महामार्गावरचे शहर असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळू शकतो. कोकण ही परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते. इथल्या महेंद्रगिरी पर्वतात भगवान परशुरामांचा भव्य पुतळा उभारल्यास ते कोकण पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरू शकते. पूर्वी इथल्या पर्यटनप्रेमींनी परशुराम ते गोवळकोट असा रोपवे व्हावा म्हणून सर्व्हे केला होता. त्याला गती मिळायला हवी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील या मध्यवर्ती शहरात छोटेखानी थिएटर आवश्यक आहे. अखिल भारतीय तालुकास्तरीय पहिले दैनिक वृत्तपत्र सुरु करणाऱ्या चिपळूणच्या भूमीत आजही माध्यमाच्या प्रतिनिधींसाठी एकत्रित बसायला जागा उपलब्ध नाही. समुद्रअभाव असलेल्या चिपळूण शहरातल्या नागरिकांना सायंकाळच्या वेळेस मनोरंजनासाठी घराबाहेर पडल्यावर कोठे जावे ? असा प्रश्न पडतो. इथल्या साने गुरुजी उद्यानाचे नूतनीकरण सध्या अंतिम टप्प्यात आहे. पण ते एकच उद्यान चिपळूणच्या लोकसंख्येला पुरेसे नाही. या शहराची आजची स्थिती ‘इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र’च्या अवस्थेवरून सहज लक्षात यावी.

जनसामान्यांच्या मनातील दैनंदिन विकासाचे प्रश्न मार्गी लावत असताना काळाच्या कसोटीवर टिकून राहण्याची क्षमता असलेले विषय शेखर सरांकडून मार्गी लागावेत, अशी अपेक्षा आहे. शेखर सरांना महाराष्ट्र शासनाचा ‘वनश्री’, सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचा भालचंद्र पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा पुरस्कार, दापोली कृषी विद्यापीठाचा ‘आबासाहेब कुबल’ पुरस्कार आदी पूर्वीच प्राप्त झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या, वास्तवाचे भान ठेवत कार्यरत राहणाऱ्या सरांना मतदारसंघात ‘ऑफबीट’ काम करणे अवघड नाही. कोकणातील खाड्यांतून जलवाहतुकीच्या भन्नाट कल्पना त्यांच्याही डोक्यात कायम घोळत असतात. आजच्या वाढदिवसाला दोन दिवस बाकी असताना सरांनी आपल्या मतदारांशी सोशल मिडीयावरून ‘दोन शब्द मनातले’ म्हणत संवाद साधला. त्यात त्यांनी कोरोना महामारी आणि आजपासून (१ मार्च) सुरु होणाऱ्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कारण देत जाहीर सार्वजनिक वाढदिवस कार्यक्रम टाळण्याबाबत निवेदन प्रसिद्ध केले, हे महत्त्वाचे आहे.

सुसंवादी शेखर सरांचा मूळ पिंड राजकीय नाही. त्यांची कार्यपद्धतीही राजकीय दिसत नाही. शेखर सरांच्या जगण्यात वायफळ बडबड किंवा उघड संताप भावना आढळून येत नाही, ही कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे नेतृत्व करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. स्वभावात, बोलण्यात कधीही त्रस्तता येऊ न देता व्यस्त राहाणं ही सरांची खासियतआहे. आपल्या याच स्वभावाने त्यांनी विरोधकांनाही आपलसं केलं आहे. त्यांची आजवरची ही ऊर्जादायी वाटचाल राजकारणात यशस्वी होऊ पाहणाऱ्या तरुणाईसाठी मार्गदर्शक आहे. सरांना त्यांच्या जीवनात पत्नी सौ. पूजाताई निकम यांची मिळालेली मोलाची साथ विशेषत्वाने नोंद घ्यावी अशीच आहे. ते कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचा कौटुंबिक आपुलकीचा प्रेमळ वरदहस्त सरांना लाभलेला आहे. त्याचा उपयोग कोकणच्या भल्यासाठी व्हावा. कोकणच्या सांस्कृतिक राजधानीच्या इतिहासात भरीव नोंद करता यावी असे अजोड काम शेखर सरांकडून घडो. त्यासाठी आई तुळजाभवानीने त्यांच्या हाताला यश द्यावे, अशी आजच्या शुभदिनी प्रार्थना करतो आणि शेखर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

धीरज वाटेकर

ई-मेल : dheerajwatekar@gmail.com

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

झुंबर वेलीचं सौंदर्य !

        


चिपळूण शहरातल्या खेंड भागात राहायला आल्याला आम्हाला एक तप पूर्ण होत आलंय. तेव्हाचं भकास वाटणारं इथलं पर्यावरण आता पूर्णत: बदललंय. निसर्गातल्या गुजगोष्टीत नि परसदारातल्या बाळंतपणात ते रममाण झालंय. याच वातावरणात गेल्या ७/८ वर्षांपासून असलेलं एक जीवंत आश्चर्य आम्हाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ पाहातंय ! पण याची आम्हाला फारशी कल्पना नव्हती. इतकी की एकदा तर ‘अनावश्यक वाढ’ म्हणून आम्ही त्यावर ‘ट्री कटर’ चालवून मोकळे झालो होतो. अर्थात पूर्ण उलगडा झाल्याशिवाय कोणतंही झाड समूळ तोडायचं नाही हा विचार जपलेला होताच ! गेल्यावर्षी कोरोना संक्रमण काळात लॉकडाऊन एकने परसदारी निरखून बघायला जो ‘डोळस’ वेळ दिला त्यात सध्याच्या थंडीच्या दिवसात, वर्षाखेरीस आणि नववर्षारंभ काळात फुललेल्या या ‘दुर्मीळ’ झुंबर वेलीनं आम्हाला आकर्षित केलं होतं. तसं तिचं या मौसमातलं बहरणं आम्हाला सवयीचं झालेलं होतं. पण का ? कुणास ठाऊक ? अधिक बारकाईनं निरखल्यावर यंदाही बहरलेल्या ‘झुंबर’ वेलीचं प्रभावशाली सौंदर्य अधिक लोभस वाटलं.



क्लेरोन्डेन्ड्रम स्मिथियनम (
Clerondendrum Smithianum) हे सहज उच्चारायलाही कठीण असं शास्त्रीय नाव असलेल्या या दुर्मीळ फुलझाडाचं डोळ्यांनी दिसणारं फुललेलं सौंदर्य मात्र अफलातून आहे. याच वेलवर्गीय झाडाला लाईटबल्ब (Light Bulb) किंवा चेन ऑफ ग्लोरी (Chains of Glory) असंही म्हणतात. मराठीत मात्र याला ‘झुंबर वेल’ असं छान साजेसं नाव असल्याचं आम्हाला सोशल मिडीयावरून समजलं. सध्याच्या हिवाळ्याच्या मध्यापासून ते वसंतापर्यंत या झाडाच्या फुलांच्या बल्बच्या आकाराच्या कळ्या उमलल्यावर नजरेस जाणवणारे परागकणयुक्त लांबलचक पुंकेसर असलेल्या पांढर्‍या फुलांचे झुंबरासारखे सौंदर्य पाहणाऱ्याला जागीच खिळवून ठेवते. पूर्ण वाढ झालेल्या झुंबर वेलीच्या फुलपाखराच्या आकाराच्या फुलांवर सूर्याची कोवळी किरणे पडल्यानंतर तिचे सौंदर्य अधिक खुललेले दिसते. हिरव्यागार पानांच्या सान्निद्ध्यात या वेलीवरचा अनेक घड्यांनी युक्त झुंबरासारखा दिसणारा फुलोरा जमिनीच्या दिशेला झेपावत असताना, हलक्याश्या वाऱ्याची मंद झुळूक मदतीला आली की परसदारी जणू नृत्य करीत असल्याचा आभास निर्माण होतो.


अन्यवेळी वेलीच्या खुललेल्या पांढऱ्या फुलांपेक्षाही तिच्या फिक्कट पांढऱ्या कळ्या अधिक मनमोहक वाटतात. जणू त्या भारतीय मण्यांप्रमाणे भासाव्यात. टोकाला हलकासा लाल रंगाचा स्पर्श असलेल्या या फुलांचा देठ तांबूस रंगाचा असतो. ४ फुटाची पूर्ण वाढ झालेलं फुलझाड सहज बहरत असलं तरी ते ६ फुटापर्यंत सुलभतेने वाढतं. कधीकधी याची वाढ १० फुटही असू शकते. आपल्या जैवविविधतेतील घटक असलेल्या फुलपाखरांसह छोट्या पक्ष्यांनाही (Humming birds) झुंबरवेल आपल्याकडे आकर्षित करते. मात्र इतक्या आकर्षक फुलाला अजिबात सुगंध नाही हे आश्चर्यकारक आहे. हे सदाहरित वेलवर्गीय फुलझाड मूळचे थायलंडचे असल्याचे आमच्या वाचनात आले. आशिया आणि आफ्रिकेमध्ये क्लेरोन्डेन्ड्रमच्या सुमारे ४००हून अधिक प्रजाती असाव्यात. जगभरात मोजक्या भागात उपलब्ध असलेले हे फुलझाड ‘अमेझॉन’वर विक्रीला असल्याचे पाहून तर आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.


आमच्यासोबत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळात कार्यरत असलेले पर्यावरणप्रेमी मित्र विलास महाडिक यांच्या नजरेला काही दिवसांपूर्वी आम्ही हे पूर्ण फुललेलं फुलझाडं आणलं. यापूर्वी कुठेही पाहिलेलं नसल्यानं त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी या फुलझाडाचा व्हिडीओ, सोशल मिडीयावरील दुर्मीळ फुलझाडांशी संबंधित एका ग्रुपवर पोस्ट केला. तेव्हा याच्या नावाचा आम्हाला उलगडा झाला. वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट, हेमंत ओगले, रोहन कोरगावकर, दत्तात्रय मोरसे, प्रा. आदित्य तांबे, राहूल सोनवणे, संजय परांजपे, आकाश बाखडे आदिंमुळे या वेलीचं नाव समजणंं सोपं झालं. १३ जानेवारी २०२२ रोजी मिलिंद गडकरी यांनी आपल्या फेसबुक वालवर फुलाचा एक फोटो पोस्ट केला होता, तो झुंबर वेलीचा होता. हे रोप त्यांना गणपतीपुळे मंदिराच्या समोर मिळालेलं होतं. नावानुसार आम्ही याची अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता फारसं काही हाती लागलं नाही. तेव्हा पुरेशा प्रकाशात फुलणाऱ्या आणि फारसे दस्तऐवजीकरण न झालेल्या झुंबर वेलीची दुर्मीळता आमच्या ध्यानात आली. हिवाळ्याच्या दिवसात आपल्या परसदारी बहरलेली जबरदस्त आकर्षक अशी ही ‘झुंबर वेल’ पाहाणं हे खरोखरच सुंदरतेचं प्रतिक आहे, असं वाटल्याने तिच्याविषयी लिहिलं.

 

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com   


'झुंबर वेल' फुलाची ही आणखी काही छायाचित्रे 








चांगभलं करणारं ‘पवतं’ !

    श्रावण शुक्ल त्रयोदशीचा दिवस होता. चार वर्षांपूर्वी (२०१६) आम्ही चिपळूण तालुक्यातील पालवण-ढोक्रवली गावच्या श्रीबाजी वाघांबर देवस्थानच्या देवराईमध्ये वृक्षारोपण करण्याकरिता हरडा, नीव, गुलमोहर, सोनचाफा आदी जातींचे साठेक वृक्ष घेऊन गेलो होतो. तेव्हा मंदिरात ग्रामदेवतेला ‘पवतं’ अर्पण करून उपस्थित ग्रामस्थांना मानाप्रमाणे ते पवतं बांधण्याचा कार्यक्रम सुरु होत होता. आमच्यासमोर ग्रामदेवतेला गुरवांनी ‘पवतं’ अर्पण करून, 'जसं हे ‘पवतं’ तुला घालतो आहे तसं तू आमचं रक्षण कर’ असं साकडं घातलं. ग्रामस्थांच्या हाती ग्रामदेवतेच्या नावाची पवत्याची गाठ हातावर बांधून बंधन केलं. उपस्थित ग्रामस्थांनी एकमेकांच्या हातावर पवतं बांधताना, ‘इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो. चांगभलं !’ असं म्हटलेलंही आम्ही ऐकलं. कुतूहलाने तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच हातावर ‘पवतं’ बांधलं. तेव्हापासून मनात ‘पवतं’ घर करून बसलं होतं. मानवी जीवनाचं ‘चांगभलं’ करलं अशी श्रद्धा असलेल्या ‘पवतं’विषयी लक्षात आलेलं काही म्हणूनच लिहावसं वाटलं.

कोकणसह महाराष्ट्रभर अनेक गावात ‘पवतं’ बांधण्याची परंपरा आजही सुरु आहे. त्यांचे उल्लेख वेगवेगळ्या पद्धतींसह आपल्याला भेटतात. कोकणात ग्रामदेवतेला ‘पवतं’ बांधण्याचा कार्यक्रम सर्वत्र नागपंचमी ते नारळी पोर्णिमेच्या दरम्यान होत असावा. पारंपरिक महाराष्ट्रीय लोकगीतातील स्त्रीधन समजल्या जाणाऱ्या उखाण्यात, ‘पंचमीचं पवतं, आलं गवरी भवतं, गवरीचं घेतें दोरं, आलं शिलंगान म्होरं’ अशा शब्दांनी पवतांना गौरविलं गेलं आहे. वरील उखाण्यातील उल्लेखानुसार पवतं पंचमीचं असलं तरी विविध ठिकाणी ते स्थानिक सोयीनुसार दिवस ठरवून बांधलं जाण्याची परंपरा आहे. ‘पवतं’ बांधण्याची आम्ही पाहिलेली पालवण-ढोक्रवली गावच्या श्रीबाजी वाघांबर देवस्थानची परंपरा ही श्रावण शुक्ल त्रयोदशीची आहे. फारपूर्वी या गावच्या खोत मंडळींवर हे पवतं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असायची. खोतांच्या घरी बसून कोष्टी (विणकर) समाजाचे मानकरी पवतं विणत असत. ही पद्धत आता बंद झाली. तेव्हा ग्रामदेवतेला पवतं अर्पण करण्याच्या आदल्या दिवशी देवाला ‘जागर’ व्हायचा. ‘जागर’ हा ग्रामदेवतेला रात्रभर जागवायचा कार्यक्रम होय. ही आदली रात्र जागविल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे देवाला रूपे (मुकुट) लावून सजवलं जायचं. या दिवसाला ‘जागर पोर्णिमा’ म्हणत. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला, नारळी पौर्णिमेच्या दोन दिवसपूर्व हे पवतं बांधलं जायचं. आजही असंच बांधलं जातं. फक्त रात्र जागविली जात नाही.

सध्याच्या काळात पवतं बनविण्याचा दोरा आणण्यासाठी कोष्टी समाजाच्या मानकऱ्यांना  गावाकडून पैसे दिले जातात. श्रीबाजी वाघंबर देवस्थान ग्रामदेवतेच्या पारंपरिक पद्धतीनुसार वर्षाच्या एकूण दिवसांइतकं बारीक पांढऱ्या दोऱ्याचं ढोपरांवर केलेलं ३६५ सलग फेऱ्यांचं एक अशी ७ पवतं (श्रीबाजी वाघंबर, श्रीसोमेश्वर, श्रीवाघजाई, श्रीकेदार, श्रीनवलाई, श्रीपावनाई, श्री चोपडाई) ७ देवतांसाठी कोष्टी समाजाकडून तयार करून घेतली जातात. ही तयार केलेली पवतं ग्रामदेवतेला अर्पण करण्यापूर्वी ‘गुरव’ विधिवत पूजा करतात. त्यानंतर गावाच्या उपस्थित खोतांकडून, ‘पवतं घालायला घ्यायची काय ?’ असा हुकूम मागितला जातो. हुकूम काढण्याची जबाबदारी अर्थात गुरवांची असते. ग्रामदेवतेला प्रत्यक्ष पवतं अर्पण करताना गुरवांच्या हातात धुपारती असते. त्यांच्या मागून पालवण-ढोक्रवली गावचे खोत, गावकर आदि ४/५ मंडळी ग्रामदेवतेला प्रत्यक्ष पवतं अर्पण करतात. देवाला अर्पण करून झालं की पवतं मंदिराच्या खांबाला, इमारतीला बांधलं जातं. उपस्थित सर्वांना बांधण्यासाठी स्वतंत्र पवतं आणलेलं असतं. ते घातलं जातं. गावकर मंडळी उपस्थित ग्रामस्थांना मानाप्रमाणे पवतं बांधतात. गुरव देवाची आरती करतात. सोबत परिटांच्या घरचा एक माणूस दिवा दाखवायला असतो. एकमेकांच्या हातावर पवतं बांधताना, ‘इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो. चांगभलं !’ असं म्हटलं जातं. ग्रामदेवतेला साकडं घातलं जातं. ‘आज जसं तुला हे पवतं घालतो आहे तसं तू आमचं रक्षण कर’ म्हणून देवाच्या नावाची दोऱ्याची गाठ हातावर बांधून बंधन केलं जातं. पवत्याचा हा दोरा काही ग्रामस्थांच्या हातात वर्षभर पाहायला मिळतो. नवा बांधायची वेळ आल्यावर जुना काढला जातो. हे पवतं हातात किंवा गळ्यातही बांधलं जातं. त्यादिवशी घरपट आलेला माणूस आपल्या घरातील व्यक्तींच्या संख्येप्रमाणे पवतं घेऊन जातो. पूर्वी गावचे गुरव पवतं वाटत घरपट फिरायचे. आजही कोकणातल्या काही गावात ही परंपरा कायम आहे. परंतु प्रस्तुतच्या ढोक्रवली आणि पालवण ग्रामदेवतेच्या मंदिरात नाही. पूर्वी हे मंदिर तीन गावचं होतं. इथे देवराई होती. तेव्हा या गावांना निवाचा कोंड (निवळी), पालाचा कोंड (पालवण) आणि ढोकाचा कोंड (ढोक्रवली) असं म्हटलं जायचं. कालांतराने निवळकरांनी आपलं श्रीनवलाई श्रीपावणाई ग्रामदेवतेचं स्वतंत्र मंदिर उभारलं. तर ग्रामदेवतेला पवतं बांधण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर मंदिरातला देव भंडारायला घेतला जातो. देवाची वस्त्रे आणि मुकुट उतरवून पेटीत पूर्ववत ठेवली जातात. ही पेटी गावकरांकडे पेटी सुपूर्द केली जाते. पूर्वी २/३ गावच्या ग्रामदेवतांची जबाबदारी असलेल्या गुरवांचा गळा यादिवशी पवतांनी भरून जायचा. मंदिरात न येऊ शकलेली मंडळी, लहान-लहान मुलं पवतं घ्यायला त्यांच्याजवळ यायची. गावोगावी हाती ग्रामदेवतेचं पवतं बांधलं गेल्यावर नारळी पौर्णिमेचं ‘रक्षाबंधन’ संपन्न व्हायचं, आजही होत असतं.

गेल्यावर्षी (२०२०) जिंतूरच्या (परभणी) प्रा. जी. एन. गडदे यांची नारळी पौर्णिमेला ‘पवती पुनव’ संबोधणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर आमच्या वाचनात आली आणि पुन्हा ‘पवतं’ आठवलं. मराठवाड्याच्या ग्रामीण भागात आजही जुन्या पिढीतील लोकं नारळी पौर्णिमेला ‘पवती पुनव’ म्हणतात. आजच्या पिढीला हा शब्द फारसा परिचित नाही. या दिवशी घरातल्या सर्वांच्या हाती पवतं बांधलं जातं. मराठवाड्यात ठिकाणी यालाच राखी म्हणूनही संबोधलं जातं. याच दिवसात कापसाला पातं लागायला सुरुवात होत असते. ते गळून पडण्याची शक्यता असते म्हणून एक दिवस शेतीची कामं बंद असतात. महाराष्ट्रातल्या काही ग्रामीण भागात ५० वर्षांपूर्वी ‘राखी पोर्णिमा’ हा शब्दच बहुदा रूढ नसावा. कदाचित गावोगावी दूरदर्शन आल्यावर हे शब्द पोहोचले असा एक मतप्रवाह आहे. तेव्हा गावचे जंगम किंवा पुजारी भिक्षा मागताना सोबत ‘पवतं’ आणत. घरोघरी पुरुष, मुलांना बांधत. हे ‘पवतं’ घरच्या देवासह सायकल, गाडी, मशीन, दुकानातील तराजूंसह व्यवसायातील अवजारांना बांधलं जायचं. काही भागात नागपंचमीच्या दिवशी भिंतीवर काढलेल्या नागोबांना हळदीने पिवळे केलेले दोरे चिकटवले जायचे. दुसऱ्या दिवशी तेच दोरे ‘पवतं’ म्हणून हातावर बांधले जात. काही भागात पावसाळ्यात खरिपाची पेरणी संपल्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये बैलपोळ्यावेळी बैलांच्या शिंगानाही पवतं बांधली जायची. नारळी पौर्णिमेला, आजही महाराष्ट्रातील लाखो लोकांचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबालाही पवतं अर्पण केलं जातं. त्यानंतर पवित्र रक्षक धागा (पवतं) मिळवण्यासाठी भक्तांची गर्दी होत असते. राज्यातल्या काही ठिकाणी पूर्वी दानवीर महाबली राजा बळी यांना जे बांधलं गेलं तेच ‘रक्षासूत्र’ आज तुम्हाला बांधत आहे अशा अर्थाचा, 'येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:। हा मंत्र म्हणून पवतं बांधलं जात होतं.

चार वर्षांपूर्वी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्यासह आम्ही जेव्हा वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी ढोक्रवलीला गेलो तेव्हा आम्हाला ही ‘पवतं’ परंपरा पाहायला मिळाली. याबाबत लिहायचं ठरवल्यावर आम्ही पालवण मराठवाडी येथील सहाणेजवळ राहणारे १०२ वर्षे वयाचे ज्येष्ठ ग्रामस्थ धोंडबाराव रामराव सुर्वे यांच्यासह नयन रघुनाथ सुर्वे, रामचंद्र धोंडबाराव सुर्वे, राजेश महादेव सुर्वे, शंकर विचारे आणि मंदिराचे पुजारी दीपक गोविंद गुरव, ८३ वर्षीय दत्ताराम गोविंद उर्फ आबा महाडिक आणि त्यांचे चिरंजीव विकास महाडिक यांच्याशी चर्चा केली. अलिकडे सोशल मिडीयावर, ‘गणेशपूजेप्रसंगी बाप्पाला घालण्यात येणारं कापसाचं वस्त्र (पवतं) निर्माल्यात न टाकता भिजणार नाही अशा ठिकाणी अंगणातील एखाद्या झाडाला अडकवून ठेवा. याचा उपयोग पक्षी घरटे बांधताना करतात.’ अशा आशयाची पोस्ट वाचनात आली होती. तेव्हा आम्हाला परत ‘पवतं’ भेटलेलं. या कल्पनेचं अनेकांनी अनुकरण केलं. कापसाच्या पवतांचा पर्यावरणीय उपयोग साध्य करत एक पाऊल पुढं सरकलेल्या या ‘पवतं’ परंपरेनं आम्हाला लिहितं केलं.

 

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com 

परिटाचा दिवा !

    पाचेक वर्षांपूर्वी एका प्रेरणादायी शब्दकथेचं लेखन करताना परीटघडी, परिटाचा दिवा, परिटांचा अंगारा या शब्दांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. तसे हे शब्द माहितीतले होते. पण शब्दकथा लिहिण्याकारणे त्यांच्या अर्थांच्या अधिक जवळ जाता आलं होतं. कोकणात एकेकाळी हा  परिटाचा दिवा प्रसिद्ध होता. तेव्हा गावोगावी परीट समाजाकडून दिवाळीत, दिव्यांनी होणारी ओवाळणी सन्मानाची, प्रतिष्ठेची मानली जायची. नंतर जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशा गावोगावच्या परंपरा लुप्त होत गेल्या. काही परंपरा कालौघात बदलल्या तर काही अस्तित्त्वापुरत्या टिकून राहिल्या. ‘परंपरा’ म्हणून आजही आपलं अस्तित्व टिकवून असलेल्या असलेल्या दिवाळीतील परिटाच्या दिव्याविषयी जाणून घेऊयात !

देशातल्या ग्रामीण भागात आजही अनेकविध प्रथा परंपरा जोपासल्या जातात. गावागणिक त्यात बदलही पाहायला मिळतात. कोकणभूमीही गावोगावी उत्तमोत्तम परंपरा जोपासून आहे. प्रस्तुत लेखाचा विषय असलेल्या परीट समाजानेही आपल्या परंपरा जपल्या असून त्यात गावागणिक बदल असू शकतात. पूर्वी बांबूच्या वैशिष्ट्यपूर्ण खोबणीत लामणदिवा लावून परीट स्त्री घरोघरी जाऊन घरातील कर्त्या पुरुषाला ओवाळायची. तेव्हा दिवाळीपूर्वी परीट आळीत किंवा त्यांच्या घरी जाऊन स्त्रीयांना आमंत्रण केलं जायचं. ओवाळणी झाल्यावर परीट स्त्रीला फराळ आणि ओवाळणी दिली जायची. आपला परंपरागत गावगाडा अभ्यासता शंभर वर्षापूर्वीपर्यंत ही परंपरा अस्तित्वात असावी. प्रस्तुत लेखात नमूद चिपळूण तालुक्यातील निवळी-पालवण-ढोक्रवली पंचक्रोशीतील ज्ञात परंपरा ही पुरुषांकडे वर्ग झालेल्या काळापासूनची पाहायला मिळते. सध्याच्या काळात तर ही ओवाळणीची परंपरा श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवेतेच्या मंदिरात दिवाळीच्या उत्सवी वातावरणात संपन्न होत असते. ओवाळणीच्या ताम्हणात साधा दिवा, अक्षता आणि हळदी-कुंकू असतं. चिपळूण तालुक्यातील निवळी गावचे रहिवासी आणि संत गाडगेबाबा परीट समाज सेवा संस्थेचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष दत्ताराम गोविंद उर्फ आबा महाडिक यांची जीवनकथा ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’ लिहिताना आम्हाला या परंपरांची माहिती झाली होती.

परीट हा बारा बलुतेदारांपैकी एक मेहनती समाज आहे. घरोघरीचे कपडे गोळा करून ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे त्यांचे मुख्य काम होते. त्यांना गावकऱ्यांचे धुणे धुण्याचे काम लग्नकार्य आणि सोयर-सुतकप्रसंगी विशेषत्वाने करावे लागे. गावातील लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चादर धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा या समाजाकडे होती. देशभरात दहाएक कोटी लोकसंख्येचा, हा विखुरलेला समाज ग्रामीण भागात आपल्या प्रथा परंपरा, काही ठिकाणी इस्त्रीचा परंपरागत व्यवसायही सांभाळून आहे. संत गाडगेबाबा याच समाजात जन्मले. त्यामुळे या समाजाचं त्यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं आहे. पूर्वी नदीच्या काठाला बांधलेल्या घाटांवर परीट लोकं धुणं धुवायची. त्या बदल्यात सुरुवातीला त्यांना पोटाला खाणं मिळायचं. नंतरनंतर धान्य मिळू लागलं आणि कालौघात पैसा मिळायला सुरुवात झाली. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात डोकावलं तर कोणा थोराड परटाच्या तोंडून, ‘आरं अलीकडंची पोरं तुम्ही कशी वळखशीला ! तुझी आज्जी आमच्याकडं द्यायची धडूती धुवायला !’ असे शब्द सहज कानी पडतील.

परटांकडून पूर्वांपार दिव्याची ही ओवाळणी गावच्या खोतांना आणि मानकऱ्यांना केली जायची. परीट समाजातले मानकरी पूर्वज प्रतिनिधी तेव्हा गावाच्या खोतांना घरोघरी ओवाळायला जायचे. तत्पूर्वी नरकचतुर्दशी-अभ्यंगस्नानाच्या पूर्वरात्री देवळात पहाटेच्या वेळी ग्रामदेवतेला रूपे लावली जायची. सकाळी ग्रामदेवतेच्या देवळात देवाला आणि उपस्थित मानकऱ्यांना हा दिवा दाखवला (ओवाळला) जायचा. दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याला गावाच्या खोतांना, मानकऱ्यांना घरोघरी हळदी-कुंकू लावून ओवाळलं जायचं. ओवाळणीवेळी ही मंडळी पाटावर किंवा घोंगडीवर बसायची. मानकरी परिटांकडून ओवाळल्यावर स्वेच्छेने ताटात ओवाळणी टाकली जायची. शिधा मिळायचा. ही परंपरा आबा महाडिक यांनी पुढे चालवायला सुरुवात केली तेव्हा परीट पुरुष घरपट जायचे. दिवसभरात असं ४०/५० घरात जाणं व्हायचं. ४०/५० वर्षापूर्वीपर्यंत ही घरपट जाऊन ओवाळण्याची परंपरा कायम होती. नंतर पिढी जसजशी शिकत गेली तसतशी ती कामधंद्यासाठी गावाबाहेर पडली. गावातलं शेतीकाम कमी झालं. परिणामस्वरूप वेळ देण्यावर बंधनं येऊन परंपरांमध्ये बदल होत गेला. अनेक गावांतून जुनी माणसं आणि नवीन माणसं यांच्यातील संवाद भेदांमुळेही परंपरांमध्ये बदल होत राहिला. सध्याच्या काळात परटाचा दिवा घेऊन घरपट जाणे होत नाही. ही ओवाळणी ग्रामदेवतेच्या मंदिरात होते. मंदिरातील दिवा ओवाळणीच्या परंपरेचा मूळ मान हा परीट समाजाचा आहे. कालांतराने त्यांच्या जोडीला मंदिराचे गुरव आणि ४/५ गावकर मंडळी जोडली गेली आहेत.

सध्याच्या काळात पहिल्या अंघोळीला, नरकचतुर्दशीला सकाळी श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवतेला रूपे (मुकुट) लावून झाल्यावर गुरवाकडून पूजा होते. पूजा आटपल्यावर गुरव हे गावाकडून आणि खोतांकडून, ‘परटांनी दिवा करायचा का ?’ असा हुकूम (परवानगी) घेतात. मंदिराच्या बाहेर असलेल्या तुळशीजवळ एक पिठाचा दिवा प्रज्ज्वलित केला जातो. मंदिराला ५ फेऱ्या मारून देवाला नैवेद्य दाखविला जातो. नंतर गावातील खोतांना परटांचा दिवा दाखवून ओवाळले जाते. आता ओवाळण्याचे हे काम परीट कुटुंबातील पुरुष मंडळी करतात. ह्याही दिव्याने पहिल्यांदा ग्रामदेवतेला ओवाळले जाते. नंतर मंदिरात जमलेल्या खोत आणि मानकऱ्यांना ओवाळतात. ओवाळल्यानंतर त्यांच्याकडून ताटात स्वेच्छेने ओवाळणी टाकली जाते. यावेळी गुरवही एक दिवा घेवून सोबत असतात. त्यांच्या सोबत गावकर मानकऱ्यांपैकी ४/५ जण असतात. दिवा ओवाळण्याची ही परंपरा पहिल्या दिवाळीला आणि देव दिवाळीला अशी दोनवेळा संपन्न होते. याला पारंपरिक भाषेत दिवा चढवणे आणि दिवा उतरवणे असे म्हणतात. देवदिवाळीचा दिवा उतरवण्याचा कार्यक्रम मोठा असतो.

शिमगोत्सवादरम्यान होळीला दोन दिवस शिल्लक असताना श्रीबाजी वाघंबर मंदिरातील ग्रामदेवतेची पालखी पालवण गावच्या सहाणेवर आणून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी पालखीत देव बसवविले जात असताना ग्रामस्थ शिमग्याचा ‘माड’ आणायला जातात. सकाळी परीट समाजाचे मानकरी आपल्या घरून सहाणेवर पालखीजवळ पांढरे निशाण आणून ठेवतात. हे निशाण म्हणजे त्रिकोणी ‘पताका’ आकाराचा पांढरा ध्वज असतो. हा मान निवळी-पालवण-ढोक्रवली या गावात आजही अस्तित्वात आहे. महत्वाच्या प्रसंगी पांढरे निशाण फडकवण्याचा हा परटांचा मान आजही अनेक गावात सुरु आहे. सायंकाळी होळीसाठीचा माड आणल्यावर त्याच्या शेंड्याला हे पांढरे निशाण बांधले जाते. माड उभा केला जातो. शिंपणे कार्यक्रमाच्यावेळी माडाचा शेंडा गावकराकडून तोडला जातो. माडाचा शेंडा आणि शेंड्यावरचा निशाणाचा पांढरा झेंडा गावकर हे खोतांच्या दारात आणून ठेवतात.

‘हाणून’ घेण्याची परंपरा

चिपळूण तालुक्यातील याच पालवण-ढोक्रवली गावात शिमगोत्सवात श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवेतेची पालखी सहाणेवर बसल्यावर नाभिक समाजातील मानाच्या २ व्यक्ती पालखीतील प्रत्येक देवाला दुरून आरसा दाखवतात. देवावर सूर्यकिरणोत्सव घडविला जातो. भद्रेच्या दिवशी (धुलीवंदन) सकाळी १०/११ वाजता गावाचा होम लागतो. होमाला प्रदक्षिणा केल्यावर होमाला प्रज्ज्वलित केले जाते. ग्रामदेवतेची सहाणेवर असलेली पालखी दुपारी ढोक्रवलीला रवाना होते. तत्पूर्वी पालखीसमोर खोतांकडून पुकार देऊन हाणून घेणाऱ्या मानकऱ्यांना बोलावलं जातं. बोलावणं झाल्यावर, देवाच्या पालखीसमोर खोतांनी आणून ठेवलेली तलवार (शस्त्र) आपल्या दोन्ही हातात घट्ट धरून अन्य दोघे मानकरी आपल्या उघड्या अंगावर, पोटच्या बाजूला हाणून (स्वतःच्या अंगावर मारून) घेतात. परंपरेनुसार त्यांनी ३ वेळा आपल्या पोटावर तलवार हाणून घेतल्यावर गुरवांकडून, ‘पुरे...पुरे...पुरे !’ म्हटले जाते. मग हाणून घेणं थांबवलं जातं. हाणून घेण्याचं हे काम पूर्वी कोणी अन्य ग्रामस्थ करायचे. त्यांचा वंश संपुष्टात आल्याने त्यांनी हाणून घेण्याचे काम दुसऱ्या मानकऱ्यांकडे सोपवले आहे. तेच सध्या या परंपरेचे मानकरी आहेत.

शिमगोत्सवानंतर श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवेतेची पालखी देवळात पोहोचल्यावर मंदिरातला देव भंडारला जातो. तेव्हा देवतांना परिधान केलेली वस्त्रे ही धुण्यासाठी पासोड्यात (ग्रामदेवतेच्या पालखीवरील शाल किंवा वस्त्र) गुंडाळून याच परीट समाजाच्या महाडिक कुटुंबीयांकडे दिली जातात. त्यांच्याकडून ही वस्त्र धुवून इस्त्री करून (परिटघडी) करून गुरवाच्या स्वाधीन होतात. याकामी परिटांना एक नारळ आणि पासोडा भेटवला जातो. कधीकधी धुण्यासाठी म्हणून आलेल्या देवाच्या कपड्यांना अडकून, भाविकांनी नवसात अर्पण केलेला एखादा सोन्याचा दागिना, चांदीची फुलं सोबत येण्याची संभावना असते. अशावेळी ते दागिने गुरव किंवा गावकरांकडे आणून दिले जात असल्याची आठवण परटांची ही परंपरा सांभाळणाऱ्या विलास महाडिक यांनी सांगितली. हा मान निवळी-पालवण-ढोक्रवली या तिन्ही गावात अस्तित्वात आहे. धुतलेली ही वस्त्रे देवांना पवतं अर्पण (नागपंचमी ते नारळीपोर्णिमा दरम्यान) करण्यावेळी पहिल्यांदा आणि त्यानंतर अनुक्रमे दसरा, दीपावली, देवदिवाळी आणि शिमग्याला परिधान केली जातात. प्रत्येकवेळी कार्यक्रम संपल्यानंतर वस्त्रे पूर्ववत पेटीत ठेवली जातात. ही वस्त्र धुण्याचे काम वर्षातून एकदाच केले जाते. ग्रामदेवतेचे कपडे धुणे, दिवाळीची ओवाळणी, शिमगा पालखीला निशाण लावणं आदी धार्मिक कामं करायची कोणी ? असा प्रश्न निर्माण झाल्यावर चिपळूण तालुक्यातील निवळी-पालवण-ढोक्रवली पंचक्रोशीतील खोतांनी आणि मानकऱ्यांनी दापोली तालुक्यातील दाभोळमधून परीट समाजातील हे ‘महाडिक’ कुटुंब गावाची धार्मिक गरज म्हणून इथे आणून वसविलं आहे. पालवणच्या मंदिरामागील बाजूस, कोष्टेवाडीत या परटांचं जुनं घर होतं. तिथल्या विहिरीजवळ आजही या कुटुंबाचं जोतं पाहायला मिळतं. त्याकाळी सुरु झालेल्या परंपरा अनुषंगिक बदलांसह आजही पंचक्रोशीत कार्यरत आहेत.

प्रस्तुत गावच्या परंपरेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही पालवण मराठवाडी येथे सहाणेजवळ राहणारे १०२ वर्षे वयाचे गावचे ग्रामस्थ धोंडबाराव रामराव सुर्वे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नयन रघुनाथ सुर्वे, रामचंद्र धोंडबाराव सुर्वे, राजेश महादेव सुर्वे, शंकर विचारे आणि मंदिराचे पुजारी दीपक गोविंद गुरव, ८३ वर्षीय दत्ताराम गोविंद उर्फ आबा महाडिक यांनी जोपासलेली परिटांची परंपरा सांभाळणारे त्यांचे पुत्र विलास आणि विकास महाडिक यांनी आम्हाला याबाबतची माहिती दिली. गावगाड्यात जगणाऱ्या पूर्वीच्या माणसांकडे फार काही नसेलही ! पण त्यांच्याकडे एकमेकांसाठी भरपूर वेळ उपलब्ध होता. आजची आमची पिढी घड्याळाच्या काट्याची गुलाम झाली आहे. याच गुलामीनं गावागावातील प्रथा-परंपरांना हद्दपार केलं आहे. तरीही काही ठिकाणी जुन्या-जाणत्या मोजक्या लोकांनी आपल्या या प्रथा-परंपरा शक्य तेवढ्या जपल्यात. त्यांचे हे काम अत्यंत प्रशंसनीय आहे.


धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com   

सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

“दशा टाळण्यासाठी, कोकण पर्यटनाला हवेय ‘हरित’ दिशा !”

      एकविसाव्या शतकातील, एकविसाव्या वर्षात प्रवेश करताना, कोकणच्या लाल मातीत कार्यरत हाताला रोजगाराच्या विविधांगी संधी उपलब्ध करून देण्याची अमर्याद क्षमता असलेल्या, मागील तीन दशकात विस्तारलेल्या ‘पर्यटन’ विषयाची वर्तमान ‘दशा’ तपासून आगामी ‘दिशा’ ठरवायला हवी आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेला आमचा पर्यटन विषयक एक लेख वाचून, पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या एका ज्येष्ठांचं, ‘पर्यटनातून येणारा पैसा औद्योगिकरणातून येतो !’ असं अस्वस्थ करणारं उत्तर आलेलं. वास्तविक ‘कोकणात भूमिपुत्रांना आत्मनिर्भर बनविणारं, पर्यावरण जपणारं पर्यटन हवंय’, ही भूमिका अनेक विद्वज्जन सातत्याने मांडत आलेत. नव्या दशकात झेपावताना, “दशा टाळण्यासाठी, कोकण पर्यटनाला हवेय ‘हरित’ दिशा !” या मूळ भूमिकेचीच केलेली ही पुनर्उजळणी !

गेले दोन दशकांहून अधिक काळ आम्ही सातत्याने पर्यटन आणि पर्यावरण विषयात प्रत्यक्ष कार्यरत राहून लिहित असल्याने, ‘पर्यटनातून येणारा पैसा औद्योगिकरणातून येतो !’ या वाक्यातील मर्मभेदक पर्यावरणीय सूचनेने आमच्या मेंदूचा ताबा घेतला. सोशल मिडिया हे वर्तमान शतकातील अत्यंत ताकदवान शस्त्र आहे. काही काळ आम्ही या विचारात गुंतलो असताना, ‘सायकल चालविणे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी (जीडीपी) हानिकारक असते...!’ अशा आशयाची पोस्ट आमच्या वाचनात आली. पोस्टकर्त्याने उपरोधिकपणे सत्य लिहिलं होतं, ‘एक सायकल चालक देशासाठी मोठी आपत्ती आहे. कारण तो कार खरेदी करत नाही. तो कर्ज घेत नाही. तो गाडीचा विमा घेत नाही. वगैरे...’ पोस्टच्या शेवटी, ‘चालणे हे आणखी धोकादायक आहे कारण पादचारी सायकल देखील विकत घेत नाहीत’ असं म्हटलेलं. यातला विरोधाभास सोडला तर ज्या जुन्या पण सोन्याच्या सवयी सोडून पाश्चात्य सवयींच्या अधीन झालेलो आम्ही ‘पर्यटन’ नामे पुन्हा जुन्या सवयींकडे वळतोय. निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढते आहे. शहरात दिमाखदार हॉटेल्स असलेल्या आस्थापनांनी ‘निसर्ग/कृषी पर्यटन’ स्वरूप व्यवस्थाही उभारण्याकडे लक्ष केंद्रित केलंय. अनेकांनी अशा व्यवस्था उभारल्यातही ! अर्थात हे सगळं साकारात असताना कोकणच्या मूळ निसर्गाला आम्ही कितपत बाधा आणतो आहोत ? पर्यावरणासाठी अस्वस्थ होणाऱ्या आम्हांला गावागावातून संपूर्ण कुऱ्हाड बंदीसाठी का प्रयत्न करता येत नाहीत ? वणवे विझवताना आमची दमछाक होतेय. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग साकारताना तोडल्या गेलेल्या हजारो वृक्षांसाठी हळहळण्या पलिकडे आम्ही काहीही केलेलं नाही. महामार्गाच्या दुतर्फा नव्याने वृक्ष लावण्यासाठी चळवळ सक्रीय होत नाही. म्हणून कोकणातील आगामी पर्यटनाकडे बघताना शिल्लक राहिलेल्या निसर्गाची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं ? हे आपल्याला ठरवावं लागेल. मानवी इतिहासात जगण्यासाठी, रोजगारासाठी आणि नवनवीन शिकण्यासाठी जसजशी स्थलांतरे झालीत तसतशी पर्यावरणाची हानी होत राहिली आहे. १९९० नंतर जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळे स्थलांतराला वेग आला. परराष्ट्र खात्याच्या एका आकडेवारीनुसार आज सुमारे पावणे तीन कोटी भारतीय विदेशात कार्यरत आहेत. यातलं स्थलांतर यापुढच्या काळातही होत राहाणार आहे. पर्यावरणाची हानी मात्र रोकावी लागणार आहे. शतप्रतिशत पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था कोलमडलेल्या हिंदी महासागर क्षेत्रातील मालदीव, मॉरिशस, मादागास्कर, कोमोरोस आणि सेशेल्स या देशांना कोरोनाकारणे भारताने जून २०२० मध्ये अन्नपदार्थ, औषधे, आयुर्वेदिक औषधे आदिंची मदत पोहोचवली होती, हेही आम्हाला विसरून चालणार नाही. कोरोनामुळे भारतातील बेरोजगारी आणि दारिद्र्य हे निकषाच्या खाली घसरण्याची चिन्हे आहेत. आर्थिक विषमता, सामाजिक विसंवाद आणि पर्यावरणीय विध्वंस ह्या कोकणासह साऱ्या जगासमोरील समस्या आहेत. स्वच्छ हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यासाठी व्यवस्थात्मक पुनर्रचना करावी लागणार आहे. कसणाऱ्यांना जमीन आणि मालमत्तेसंदर्भात शेती हक्क धोरणाचा विचार केल्यास दारिद्र्य, विषमता, वंचितपणामुळे होणारे स्थलांतर कमी होऊ शकेल. पर्यटनाच्या नावाने चैन, चंगळवाद, एका विशिष्ठ मर्यादेबाहेरील मौजमस्तीस कोकणाने कायम विरोध करायला हवा आहे. ‘प्रकृतीदर्शन आणि निसर्ग निरीक्षण’ हेच कोकण पर्यटनाचे मुख्य अंग असायला हवे आहे.

जगातील १० टक्क्याहून अधिक रोजगार पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनामुळे आपल्याकडे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटनाला बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढणार आहे. त्यामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांमुळे वाढणारा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन हा भविष्यातील चिंतेचा विषय ठरणार आहे. एका आकडेवारीनुसार देशात आज उत्सर्जित होणाऱ्या एकूण कार्बनपैकी पर्यटनातील उत्सर्जन १० टक्क्याहून अधिक आहे. दरवर्षी हे प्रमाण वाढते आहे. हिमालयापासून कन्याकुमारी – अंदमानपर्यंत आपले देशांतर्गत पर्यटन विस्तारले आहे. सतत नवी डेस्टीनेशन पुढे येत आहेत. पर्यटन आणि वाहतूक हे एकत्र चालणार आहे. रात्रंदिवस रस्त्यांवर धूर ओकणाऱ्या वाहनांना आम्हाला पर्याय शोधावे लागणार आहेत. गेल्यावर्षी पर्यटन हंगामात मनाली येथे पर्यटकांची संख्या इतकी वाढली की कुल्लू ते रोहतांग पास मार्गावर हजारो पर्यटक रात्रभर अडकले. गर्दीची स्थिती इतकी बिघडली की लोकांना तिथेच रस्त्यांवर शौचासाठी जावे लागले. अर्थात काही पर्यटनस्थळी क्षमतेपेक्षा अधिक येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येला कोकणाला नियंत्रित करावे लागेल. कोकणात इतकी गर्दी खेचणाऱ्या जागा मोजक्या आहेत. त्या गर्दीचे नियोजन करणे पर्यावरणीयदृष्ट्या आवश्यक आहे. आपल्या शेजारच्या भूतानने पर्यटन शुल्क वाढवून पर्यटकांची संख्या निर्धारित केली आहे. पर्यटनासाठी लोकांना आवडत्या ठिकाणी जायचा पर्याय उपलब्ध असायला हवा असला तरी देशाचा आर्थिक फायदा पाहाताना दूरगामी पर्यावरणीय तोट्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पर्यटन म्हणजे पर्यावरणाची हानी नव्हे ! १९९० साली जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात अचानक मेलेल्या हरणांच्या शवविच्छेदनानंतर बेजबाबदार पर्यटकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यातून टाकलेले खाद्यपदार्थ त्या निष्पाप प्राण्यांनी प्लॅस्टिकसहित खाल्याचे निष्पन्न झालेले. आपल्याकडे गाई-गुरांच्या बाबतीत हे घडताना दिसतेय. आज कित्येक पर्यटनस्थळी स्वातंत्र्याच्या नावाखाली धुडगूस चालू असतो. मद्यपींनी मद्यपानाचा आस्वाद घेऊन झाल्यावर टाकलेल्या बाटल्यांचा खच, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिकचा कचरा हे दृष्य आज सर्रास झाले आहे. ‘युज अॅन्ड थ्रो’ जीवनशैलीमुळे प्लेट, चमचा, स्ट्रॉ, पाण्याच्या बाटल्या आदि कचरा वाढतोय. पर्यटकांकडून होणाऱ्या या अस्वच्छतेचा फटका स्थलांतरित पक्ष्यांनाही बसतोय. म्हणू स्वच्छतेच्या बाबतीत आपण पूर्वेकडील राज्यांचा कित्त्ता गिरवायला हवा. लडाख सारख्या ठिकाणी सुमारे ७०० हॉटेल्स आहेत. त्यात वर्षभरात अडीच लाख पर्यटक राहून जातात. जेवढी त्या भागाची लोकसंख्या आहे. अर्थात पाण्यासारख्या तिथल्या स्थानिक संसाधनावर याचा ताण येत असणार आहे. कोकणात पर्यटन वाढ करताना आम्ही पाण्याचा विचार करणार आहोत का ? कोकणात फलोत्पादन, दुग्धव्यवसाय आणि पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. कोकणात विमानतळ उभारून उद्योगधंदे वाढावेत यासाठी प्रयत्न होताहेत. पण या सगळ्या विकासासाठी लागणाऱ्या पाण्याकडे आम्ही पाहात नाही. कोकणातील शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाण्याची मागणीही वाढलेय. ही मागणी पूर्ण करण्यासाठी लागणारा पुरेसा पाणी’साठा’ कोकणकडे आहे का ? देशातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये कोकणचा समावेश असूनही दरवर्षी उन्हाळा आला की आपल्याकडे टँकरने पाणीपुरवठा का करावा लागतो ? हे अपयश शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसह इथल्या जनतेचे असल्याने कोकणातील पाणीटंचाई जणू मानवनिर्मित ठरावी. रोज सकाळी उठून विकासाचा खुळखुळा वाजविणारे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असलेले लोकप्रतिनिधी अशा अनेक मुलभूत प्रश्नांवर बोलत नाहीत आणि सुस्त प्रशासन दिवस ढकलत राहाते.

कोकणात येणाऱ्या एकूण पर्यटकांत स्वतःच्या गाड्या घेऊन येणारे नोकरदार वर्गातील पर्यटक अधिक आहेत. त्यांचा सर्वाधिक खर्च हा मुख्यत्वे खाद्यवस्तू, शॉपिंगनंतर प्रवास आणि हॉटेलवर होत असतो. या साऱ्या हॉटेल्स, गेस्टहाऊस, कृषी पर्यटन केंद्रे, दुकानदार, गाईड्स, वाहतूक व्यवस्थेतून शासनास महसूल प्राप्ती होते. मुंबई विद्यापीठांतर्गत एकूण ८२६ महाविद्यालये कार्यरत असल्याने कोकणात नव्या विद्यापीठाची मागणी सातत्याने होत आहे. ते रास्तही आहे. मूळ मुंबई विद्यापीठाचे वलय सोडण्याची मानसिकता नसलेली अनेक महाविद्यालये कोकणात आहेत. अलिकडे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देण्यास परवानगी मिळूनही कोकणातील अनेक महाविद्यालयांनी मूळ मुंबई विद्यापीठाची साथ सोडलेली नाही. म्हणून इथल्या स्थानिक पर्यावरणाला, कोकणी उद्यमशीलतेला अनुसरून आहे त्याच मुंबई विद्यापीठांतर्गत विशेष आत्मनिर्भर शिक्षणप्रणाली सुरु करायला हवी. आमचे दापोलीचे कृषी विद्यापीठ अनेकविध कृषी प्रकल्पांचे आगर आहे. हे प्रकल्प पर्यटकांनी पाहायला हवेत. तशा व्यवस्था खुल्या व्हायला हव्यात. कोकणात राहून कृषी शिक्षणाशी, व्यवसायाशी, शेतीशी संबंध नसलेल्या एका मोठ्या वर्गाला पिढीला कोकण कृषी विद्यापीठाचे हे शैक्षणिक सौंदर्य माहिती नाही. सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांकडून मद्यपान, गोंधळ होण्याच्या घटना घडत असल्यामुळे सामाजिक शांतता भंग पावते. या घटना पावसाळ्यात सर्वाधिक घडतात. त्यामुळे ऋतु बदनाम होण्याच्या घटना घडतात. अलिकडे राज्यातील काही ठिकाणे तर कौटुंबिक पावसाळी पर्यटनाच्या यादीतून बाद होताना दिसताहेत. यात कोकणातील आंबोलीसह इतर ठिकाणांची यात भर पडू नये. काही घाटात तर, ‘पावसाळ्यात पाऊस आणि दारूडेच एकत्र येतात’, असं बोललं जातं. ते कोकणबद्दल बोललं जाऊ नये. एकेकाळी विमान प्रवास ही चैनीची किंवा श्रीमंतीची गोष्ट वाटायची. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. देशात विमान वाहतूक क्षेत्र प्रचंड वेगाने विस्तारले आहे. पण कोकणात ना डोमॅस्टिक ना इंटरनॅशनल विमानतळ आजही उभे राहू शकले ! मला काय त्याचे ? मी आणि मला निवडून देणारे मतदार संघातील माझे निम्मे मतदार एवढ्या पुरता विचार करण्याच्या विकृत राजकारणाचा आणि त्याला वर्षानुवर्षे पोसणाऱ्या आम्हा करंट्या मतदारांमुळे विकास अडलेला आहे. असो. दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या नव्या वर्षाच्या सुरुवातीस सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ कार्यान्वित होईल असा आशावाद सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे. प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्री हरदीप पुरी यांच्याशी या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराची तत्परतेने दखल घेतली आहे. तिकडे शिर्डीला विमानतळ उभे राहिल्याने ते शहर देशातील हैदराबाद, बेंगलोर, उदयपूर, जयपूर, चेन्नई, भोपाळ आदि शहरांशी वेगाने जोडले गेले. चिपी विमानतळामुळे कोकणही असे जोडले जाईल. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी कोलंबो ते बौद्धगया अशी विमानसेवा सुरु करण्याचा आग्रह महाराष्ट्र सरकारकडे धरला होता. अशा अनेक संधी कोकणात पुढच्या दहा वर्षांत दृष्टीपथास येण्यासाठी पायाभूत व्यवस्थांचे सक्षमीकरण गरजेचे आहे.

कॅलिफोर्नियाचं स्वप्न कोकणी माणूस मागील पन्नास वर्षे पाहतोय. कोकणातून जाणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी मार्गाच्या स्वप्नाचेही असेच आहे. कोरोना येण्यापूर्वी मुंबई ते गोवा असा कोकणातून जाणारा हा पाचशे किमीचा दुपदरी सागरी महामार्ग पूर्ण व्हायला पाच वर्षे लागणार होती. त्यासाठीच्या खर्चाचा आकडा साडेतीन हजार कोटी रुपये होता. कल्पनेप्रमाणे हा मार्ग कॅलिफोर्नियातील ‘यूएस पॅसिफिक स्टेट हायवे (कोस्ट हायो)’ सारख्या स्वरुपात असणार होता. दरम्यान कोरोनामुळे हे थांबलं. आता त्याला कधी मुहूर्त लागेल, काय माहित ! संपूर्ण मार्गात जयगड खाडी (जयगड-तवसाळ), दाभोळ खाडी (दाभोळ-धोपावे), केळशी खाडी (केळशी-वेळास), सावित्रीच्या खाडीवर वेश्वी-बागमांडले आणि रायगड जिल्ह्यात आगरदांडा दिघी दरम्यान पुलांची आवश्यकता आहे. सागरी महामार्गामुळे चिंचोळ्या किनारपट्टीतील गावं रस्त्यांनी जोडली जातील. कोकण रेल्वे आणि मुख्य राष्ट्रीय महामार्गाला पर्याय उपलब्ध होईल. या विषयाची सखोल माहिती देणारा रत्नागिरीच्या प्रा. राजेंद्रप्रसाद मसूरकर सरांनी लिहिलेला विस्तृत लेख कृषिवल दीपावली अंकात (२०२०) प्रसिद्ध झाला आहे. यात त्यांनी कोकणात खाडी किनाऱ्याने (उदाहरणार्थ दाभोळ खाडीतील उसगाव ते परशुराम) रस्ते असण्याची आवश्यकता प्रतिपादित केली आहे, जी योग्य आहे. रस्त्यांचे उत्तम जाळे पर्यटनाला पोषक ठरते. रेवस-रेड्डी सागरी महामार्ग राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. निधीच्या अडचणीमुळे ऑक्टोबर २०२० मध्ये सागरी महामार्ग पुन्हा राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने या प्रकल्पाचे काय होणार ? हा प्रश्न आहे. मध्यंतरी, ‘केंद्राच्या आयुष मंत्रालयातर्फे होणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लॅटला सिंधुदुर्गमध्ये जागा मिळणार नसेल तर अन्यत्र परवानगी मिळणार नाही’ असं केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचं म्हणणं वाचण्यात आलं. या प्रकल्पामुळे कोकणातील औषधी वनस्पतींवर संशोधन होऊन त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अशा वृत्तांमुळे कोकणातील राजकीय नेतृत्वाला विकासाची दूरदृष्टी नाही हे सातत्यानं वाचनात येणारं विधान पटू लागतं. नव्या दशकाची झेप ठरविताना या प्रदूषण विरहित प्रकल्पांकडे गांभीर्याने पाहावे लागेल. आजही कोणतेही सत्ताधारी वरिष्ठ चिपळूणात आले की आमची वृत्तपत्रे, सोशल मिडिया कोयनेच्या वाया जाणाऱ्या पाण्याच्या वापरासाठी प्रयत्नरत होतात. पण प्रश्नाच्या मूळाशी कोणी जात नाही.

पर्यावरण पर्यटन म्हणजे ‘नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती शिकण्याच्या उद्देशाने नैसर्गिक भागाकडे प्रवास करणारे लोक असा अर्थ शिकविला जाण्याची गरज आहे. पर्यावरणाचा नाश आणि प्रदूषण करणाऱ्यांवर आर्थिक भार टाकला गेला पाहिजे. लोटे-परशुरामच्या औद्योगिक वसाहतीतून दाभोळच्या खाडीत रासायिनक पदार्थांचा विसर्ग होतो. याचा परिणाम इथले मासे, भाजीपाला आणि इतर घटकांमधून मानवात आणि पशुपक्ष्यांमध्येही होतो. कोकणातल्या प्रदूषणकारी प्रकल्पांबाबत, एखाद्या प्रदेशात आधीच प्रदूषण असेल तर त्या परिसरात पुन्हा नवीन प्रदूषण तयार करणारे उद्योग नकोत असं सुचवणारे नकाशे (Zoning Atlas Society of Industries) लोकांसमोर यायला हवेत, असं मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ सर व्यक्त करतात. २०१० साली पश्चिम घाट जैवसंस्था तज्ज्ञ मंडळाचे प्रमुख असताना डॉ. गाडगीळ सरांनी रत्नागिरी जिल्ह्याचा हा नकाशा मागितला होता. पुढे काही वर्षांनी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांच्यामुळे रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याचा नकाशा त्यांना मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यात आधीच भरपूर प्रदूषण आहे. म्हणून प्रदूषणकारी प्रकल्प नको आहेत. बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण व्हायला कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी अवघ्या ६ महिन्यात कोकणातल्या सावित्री नदीवर अत्याधुनिक पूल उभारला. हे सत्य समोर असताना या देशात हलगर्जी करणारे कॉन्ट्रॅक्टर, काही दशकांच्या प्रतिक्षेनंतर होऊ घातलेल्या कोकणातून जाणाऱ्या एकुलत्या एक राष्ट्रीय महामार्गाच्या वाटेला कसे काय येऊ शकतात ? रत्नागिरीतील ज्येष्ठ वकील विलास पाटणे यांनी या संदर्भात सातत्याने अभ्यासपूर्ण लिहिले आहे. त्याप्रमाणे २०२४ पूर्वी मुंबई ते गोवा चौपदरी रस्त्याचे लोकार्पण होईल, अशी अपेक्षा करूया ! असे घडल्यास ही येत्या दशकातील सर्वात मोठी उपलब्धी ठरेल. मुलभूत पायाभूत व्यवस्था सुधारल्याने आणखी १० वर्षांनी ‘नव्या दशकाची झेप’ लिहिताना यातल्या अनेक मुद्यांवर जनतेतून कार्यवाही झालेली असेल.

ज्यांनी पाहिलंय त्यांनी नुसतं ‘कोकण’ शब्द ऐकला तरी स्वर्गीय सौंदर्य डोळ्यांसमोर येतं. आंबे, फणस, करवंद, काजू, कोकमासह नारळी-पोफळीच्या बागा, कौलारू घरं, मातीच्या भिंती, शेणाने सारवलेले घर-अंगण, अंगणातलं तुलसी वृंदावन, पक्ष्यांचे किलबिलाट, पहिल्या पावसाने गंधवती पृथ्वीला (माती) येणारा सुगंध, खळाळते धबधबे, हिरवीगार शेती, निरभ्र आकाशात पसरलेले इंद्रधनुष्य, श्रावण-चैत्रात झाडांना फुटणारी पालवी, ग्रामदेवतेचं देऊळ, सण-उत्सव, पालख्या, परंपरा आदि अनुभवलेलं सारं काही मनाच्या सुगंधी अत्तरकुपीत बंद करून ठेवलेलं ! कोकणात येणाऱ्या पर्यटकांना फक्त पावसाळ्यात हिरवागार निसर्ग तर बघायला मिळतोच पण धबधबे, सह्याद्रीतील थंडी, अंगाला झोंबणारा वारा-पाऊस, धुके, पावसाळी गिर्यारोहण, रानभाज्या, चढणीचे मासे, बत्तीवर पकडलेले खेकडे, भात लावणी, गावठी पद्धतीने भाजलेले काजू, सड्यावरची रानफुले आदि गोष्टी अनुभवायला मिळतात. कोकणाला लागून असलेल्या पश्चिम घाटात आठ नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना राज्य सरकारने मान्यता दिली असली तरी अंमलबजावणीचे आव्हान पेलायचे आहे. जंगल पर्यटन संकल्पना राबवित असताना अतिसंवेदनशील भागांत पर्यटकांकडून धांगडधिंगा न होता दक्षिणेतील राज्यांप्रमाणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवास, निवास, भोजन यांचे शिस्तबद्ध नियोजन व्हायला हवे. कोकणातील काही गावं आजही रस्ता, एस.टी. पासून वंचित आहेत. गावातल्या लोकांना हाताला इथेच कामधंदा मिळाला असता तर ? तसं न घडल्याने इथला माणूस शहरात गेला. ‘पर्यटन’ व्यवसाय चळवळ वाढल्यापासून मंडळी पुन्हा कोकणात परतू लागलीत. वर्षानुवर्षे कुलूपबंद असलेली घरं उघडली जात आहेत. सारी बंद घरं उघडली जाऊन कोकणातलं गाव पुन्हा समृद्धीच्या वळणावर येण्यासाठीही इथल्या पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मुख्य म्हणजे कोकणी पर्यटन म्हणून, नव्या दशकाची झेप घेताना व्यावसायिकांनी येणाऱ्या पर्यटकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याचे भान ठेवायला हवे.

तब्बल ४२ खाडयांनी युक्त असलेली 'बॅकवॉटर' ही कोकणच्या पर्यटनाला मोठा आधार देणारी नैसर्गिक समृद्धी आहे. केरळनेही अलेप्पी ते कोट्टायम बॅकवॉटरमध्ये मोठे यश मिळवले आहे. 'बॅकवॉटर'च्या जीवावर चिपळूणला पर्यटन डेस्टीनेशन बनविण्यासाठी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ ही संस्था श्रीराम रेडिज यांच्या नेतृत्वाखाली धडपडते आहे. त्यांना हे करताना आलेले अनुभव हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कोकणात 'बॅकवॉटर' संकल्पनेला मोठे यश का मिळत नाही ? याच्यातून स्पष्ट व्हावे. बीचशॅक्स ही आम्हाला अजूनतरी फारशी पटलेली संकल्पना नाही. अर्थात शेजारच्या गोव्यामुळे ही संकल्पना अधिक बदनाम आहे. तिची अंमलबजावणी करताना कोकणी संस्कृतीचा नीटसा विचार व्हायला हवा. भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक अॅड. गिरीश राऊत सरांच्या कोकणची पर्यावरणीय मीमांसा करणाऱ्या सोशल मिडीयावरील पोस्ट वाचल्या की अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांचे निरसन होण्यासाठी, नव्या दशकाची झेप घेताना कोकणाचा विचार करताना अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना शासन आणि प्रशासनाने एका व्यासपीठावर आणायला हवे आहे. भारतातल्या ८ समुद्रकिनाऱ्यांना 'ब्लू फ्लैग' सन्मान मिळाला. त्यात सिंधुदुर्गातील निवती-भोगवे समुद्रकिनाऱ्याची चर्चा सुरु झालेली. कोकणातले किनारे वादातीत सुंदर आहेत. संपूर्ण कोकण प्रदेश हा सह्राद्रीचा कडा, अरबीसमुद्र, दक्षिण-उत्तरेस असलेल्या डोंगरदऱ्यांच्या वाटा आणि नद्या-खाड्यांच्या दलदलीने व्यापलेला आहे. दळणवळणाचे जवळपास मार्ग हे खाड्यांच्या भरती ओहोटीच्या गणितांवर अवलंबून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किनारपट्टीच्या भौगोलिकतेचा सुयोग्य उपयोग करून स्वराज्याचे पहिले मराठा आरमार निर्मिले होते. अर्थात इथल्या प्रत्येक दगडा-धोंड्याला, किल्ल्यांना, वास्तूंना समृद्ध इतिहास आहे. वारसा आहे. फक्त आम्ही तो जगासमोर जगाच्या पद्धतीने मांडायला हवाय. आजपासून सुरु होणारं दशक यासाठी सत्कारणी लागावं.

स्थानिक पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाल्याशिवाय कोणतेही पर्यटनस्थळ विदेशात प्रसिद्ध होऊ शकत नाही. म्हणून आमचं कोकण पहिल्यांदा ‘याचि देहि याचि डोळा’ आम्ही पाहायला हवं. त्यातून घराघरात प्रत्येक पर्यटनस्थळाच्या शाश्वत विकासाचा ध्यास जन्माला येईल. कोकणातल्या पावसाळी पर्यटनस्थळांवर नुसती बंदी, गर्दी, आणि दंग्यांची वृत्ते प्रसिद्ध झाली तरी ती आमच्या पर्यटनाचे चित्र नकारात्मक बनवतात, हे लक्षात घ्यायला हवं. कोकणाच्या पर्यावरण, पर्यटन आणि अर्थव्यवस्थेकरिता डोंगराळ प्रदेश आणि समुद्र हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. डोंगरउतारामुळे शेतीस मर्यादा आहेत. समुद्रातील संधी शोधायला अजून हव्या आहेत. अशा अवस्थेतील कोकणी अर्थव्यवस्थेला म्हणून शाश्वत पर्यटनाची जोड हवी आहे. हे शाश्वत पर्यटन इथून पुढच्या काळात हरित असायला हवेय, जाणीव कोरोनानेही याची जाणीव करून दिलेली आहे. ‘हरित कोकण’ संकल्पना लक्षात ठेवून आखणी झाली, पायाभूत सुविधांसह कोकणातील सार्वजनिक स्वच्छतेकडे इथल्या प्रत्येकानं लक्ष पुरवलं तर पर्यटन व्यवसाय उभा करायला कोकणी माणूस केव्हाही सज्ज आहे.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.     ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...