रविवार, २८ एप्रिल, २०२४

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती


        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी एक ‘गुरुजी’ घरातून आपल्या मोटारसायकलने नऊ वाजता निघाले. शाळा थोडीशी आडगावात असलेली. सकाळची एसटी येऊन गेली की रस्ता जणू निर्मनुष्य व्हायचा. जवळच्या बाजाराच्या गावातून जाणा-येणारा नशीबाने कोणी भेटला तरच आडगावात पोहोचणे शक्य होई. अन्यथा किमान पाच किमीची पैदल ठरलेली. त्यामुळे जातायेता कोणी पांथस्थ भेटला तर त्याला सोबत घेणे गुरुजींना नित्याचे झालेले. ‘त्या’ दिवशीही असंच घडलं. रस्त्यात लागणाऱ्या पुलाच्या पलिकडे उजव्या दिशेस एक महिला आपल्या १४-१५ वर्षांच्या लेकीला ‘चल लवकर चल लवकर’ म्हणत रस्त्याने फरफटत आणत होती. मुलीच्या तोंडातून फेस येत होता. गुरुजींच्या गाडीचा आवाज ऐकताच ती लगबगीने पुढे आली, ‘ लेकीला विषार झाला आहे. तिला वाचवा’. गुरुजींनी तातडीने त्या माय-लेकींना जवळच्या बाजाराच्या गावातील सरकारी दवाखान्यात आणले. मुलगी एव्हाना बेशुद्ध झालेली. सुदैवाने डॉक्टर भेटले. त्यांनीही तातडीने इंजेक्शन-सलाईन लावून उपचार केले. म्हणाले, ’अजून १०-१५ मिनिटे उशीर झाला असता तर काही खरं नव्हतं.’ गुरुजींनी त्या आईच्या हातात शंभराची नोट ठेवली आणि आपल्या शाळेच्या वाटेने निघून गेले. शाळेत पोहोचायला अर्थात अर्धा दिवस उशीर झाल्याने त्यांनी रस्त्यात घडलेला प्रकार सांगितला. घटना ऐकून एक सहकारी म्हणाले, ‘त्या बाईंना वाडीने वाळीत टाकले आहे. तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे कसे नेलेत. लोकांना समजले तर तुम्हाला काय म्हणतील?’ विषयाचं गांभीर्य ओळखून मुख्याध्यापकांनी गुरुजींना अर्धा दिवस रजा टाकू दिली नाही. दुसऱ्या दिवशी मुलीच्या आई शाळेत आल्या. त्यांच्या हातात एक नारळ आणि त्या शंभर रुपयातील शिल्लक राहिलेले पैसे होते. अर्थात गुरुजींनी पैसे परत घेतले नाहीत. अलिकडच्या काळात एखाद्या गुरुजीचं जगणं आपल्याला आपलं वाटावं, सर्वांपरिचं ते जगणं आपण आपल्या काळजात साठवून ठेवावं याची निरंतर जाणीव करून देणारे एक ‘दुर्मीळ गुरुजी’, कोकणातील चिपळूण तालुक्यातील खेण्ड आणि शिरळ या दोन केंद्रांचे केंद्रप्रमुख विलास दत्ताराम महाडिक आज (३० एप्रिल २०२४) सेवानिवृत्त होत आहेत.

आजकाल दुर्मीळ झालेल्या नैतिकतेचा, बर्‍यावाईटाचा विचार करणारा, काटेकोर, पापभीरू, अत्यंत आस्थेवाईक गुरुजी अशी विलास दत्ताराम महाडिक (गुरुजी) यांच्याविषयी मागील १८-२० वर्षांतील सहसंबंधातून आमची धारणा बनलेली आहे. संभ्रमाच्या वर्तमानात कोणीही कधीही स्वच्छ मनाने साद घालावी नि अवांतर काहीही न सांगता महाडिक गुरुजींनी साथ द्यावी. गुरुजींचं हे वागणं त्यांना जवळून ओळखणाऱ्या आणि अनुभवणाऱ्या अनेकांना अंगवळणी पडलेलं आहे. ‘विश्वास’ शब्दाचा अर्थ समजावून सांगणारी फारच कमी माणसं दुनियेत शिल्लक असताना जगण्याची आस्थेवाईक समज असेलेले महाडिक गुरुजी सामाजिक आशेचे बलस्थान आहेत. सेवानिवृत्ती निमित्त गुरुजींचा आज जाहीर सत्कार होतोय. त्यांची निवृत्ती शासकीय सेवेतील असून भविष्यात ती कृतिशील पर्यावरण जनजागरणासह सकस समाज निर्मितीच्या विविध विषयांत झोकून देऊन कार्यरत होणारी ठरावी अशा आमच्या शुभेच्छा आहेत.

निवृत्त ‘ग्रामसेवक’ वडिल दत्तात्रय (आबा) आणि आई सौ. सुषमा या उभयतांचे सामाजिक भान, संयमित जीवन जगण्याची पद्धती, कुणाला फारसं न दुखावता कुटुंबाला एकत्र ठेवण्याची हातोटी गुरुजींनी जशीच्यातशी उचलली आहे. सदा हसतमुख चेहरा, समोरच्याचे पूर्ण ऐकून घेण्याची क्षमता, एखादी गोष्ट पटली नाही तरीही घाईघाईने व्यक्त न होण्याची सवय, सर्वांशी सहज जुळवून घेण्याची हातोटी या गुणांचे धनी असलेले महाडिक गुरुजी हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष आहेत.

५ एप्रिल १९६६ रोजी निवळी (चिपळूण) गावी महाडिक गुरुजींचा जन्म झाला. संत गाडगेबाबांच्या विचारांचे पाईक, ग्रामसेवक वडील दत्ताराम आणि आई सौ. सुषमा यांच्या मायेच्या सावलीत चिपळूण तालुक्यातील निवळी गावात त्यांचे नि छोटी बहिण स्मिता आणि भाऊ विकास यांचे बालपण गेले. गुरुजींच्या बालपणी, एकत्र कुटुंब पद्धतीतील घरची आर्थिक स्थिती मध्यम होती. त्यांचे बालपण आनंदात गेले. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा घराजवळ होती. पुढील हायस्कूल शिक्षणासाठी त्यांना तुरंबव गावाची आठ किमीची दैनंदिन पायपीट करावी लागली. दहावीनंतर पुन्हा पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. कॉलेजची सोय सावर्डे आणि चिपळूणला होती. वडीलांच्या सुचनेनुसार गुरुजींनी कॉमर्सचा पर्याय निवडला. गावातून चिपळूणला डी.बी.जे.तील कॉमर्स कॉलेजच्या वर्गांच्या वेळेनुसार जाणाऱ्या एस्.टी. बसेस उपलब्ध होत्या. दैनंदिन प्रवासासाठी लागणाऱ्या एस्.टी.च्या पासचे पैसे मिळवण्यासाठी गुरुजींनी चिपळूणला काही हॉटेलात घरातील अतिरिक्त दूध दैनंदिन पोहोचवण्याचे काम सुरु केले. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान सावडर्याला सहयाद्री शिक्षण संस्थेने डी.एड्. कॉलेज सुरु केले होते. सावर्डे ते निवळी अंतर आठ किमी होते. आर्थिक अडचणींमुळे हॉस्टेलमध्ये राहाणे अशक्य होते. वडिलांनी गुरुजींना सायकल घेऊन दिली. रोजच्या १६ किमी. सायकल प्रवासासह गुरुजींचे डी.एड. शिक्षण सुरु झाले. या प्रवासाने त्यांना खूप थकून जायला व्हायचं. पहाटे लवकर उठून आई डबा करून द्यायची. आईनं कितीही देऊ केलं तरीही सायकलचा प्रवास आणि दिवसभराच्या कॉलेजसाठी तो अपुरा पडायचा, पण इलाज नव्हता. गुरुजींनी जिद्दीनं जुलै १९८६मध्ये डी.एड. पूर्ण केलं. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात खेड तालुक्यातील जि. प. शाळा शिंगरी येथून प्राथमिक शिक्षक म्हणून शिक्षकी पेशास प्रारंभ केला.

शिंगरीतील नोकरीच्या सुरुवातीच्या पहिल्या स्वतंत्र जगण्यात निवळीहून निघताना गुरुजींनी आईकडून भात बनवण्याची पद्धत विचारून लिहून घेतली होती. पण प्रत्यक्ष कृती करताना भात ढवळावा लागतो हे कृतीत न लिहिल्याने लक्षात आलं नाही आणि भातातील पाणी आटलं. भात कच्चा राहिला, थोडासा करपलाहि ! सुरुवातीच्या टप्प्यावर हा अनुभव आलेल्या गुरुजींनी जीवनात यथावकाश उत्तम शिक्षक म्हणून नावलौकिक तर मिळवलाच पण कृषी पर्यटन आणि त्या अनुषंगाने केटरिंग सर्व्हिसमध्येही स्वतःला सिद्ध केलं. तर, शिंगरीतील जेवणाचे हाल बघून वडिल आबांनी गुरुजींची बदली चिपळूणला व्हावी म्हणून धडपड सुरु केली. त्याला यश आलं. गुरुजींची पेढे पाणकरवाडीत (३१ डिसेंबर १९८६ - १३ सप्टेंबर १९९५) बदली झाली. ‘मुख्याध्यापक’ मोरेश्वर महादेव परांजपे गुरुजींसारखे मार्गदर्शक-गुरु लाभले. परांजपे गुरुजींनी महाडिक गुरुजींना स्वतःच्या मुलासारखे प्रेम देऊन सांभाळले. ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. समाजासाठी आपण काम केले पाहिजे.’ ही शिकवण त्यांना परांजपे गुरुजींनी स्वतःच्या कृतीतून दिली. इथल्या प्रदीर्घ सेवेनंतर गोवळकोट मराठी (१४ सप्टेंबर १९९५ – १३ सप्टेंबर १९९६), उक्ताड (१४ सप्टेंबर १९९६ – ३० नोव्हेंबर २०००), गुहागर तालुक्यातील मासू, (१ डिसेंबर २००० – २३ जुलै २००२) आणि पुन्हा जिल्हा परिषद शाळा उक्ताड येथे २४ जुलै २००२ ते ६ डिसेंबर २०२३ पर्यंत गुरुजींनी काम केले. डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ निवृत्तिअखेर ते चिपळूण तालुक्यातील खेण्ड आणि शिरळ या दोन केंद्रांचे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत राहिले. दरम्यान, महाडिक यांनी जुलै १९९२मध्ये  बी.ए. तर २००१साली बी.एड. हे व्यावसायिक पदवी शिक्षण पूर्ण केले होते.

महाडिक गुरुजींचे वडिल दत्ताराम‘आबा’ हे सरकारी कर्मचारी असल्याने घरात सतत सुरु असलेल्या गावातील सामाजिक कार्याच्या चर्चांचा आणि लोकांच्या सततच्या ‘ये-जा’चा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला होता. त्या पायावर गुरुजींनी केलेल्या शैक्षणिक, ग्रंथचळवळ, सामाजिक आणि पर्यावरणीय कामाच्या वर्तमान वाटचालीत पत्नी सौ. नूतन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे ते नमूद करतात. घरची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळल्याने ते काम करता आल्याची त्यांना जाणीव आहे. गुरुजींचे पूर्वज निवळीतील तीन गावाच्या देवस्थानचे मानकरी होते. ग्रामदेवतांचे कपडे धुण्याचा मान परंपरेने त्यांच्या कुटुंबीयांकडे असलेला. पूर्वजांनी गावात शेती सांभाळली. आजोबा मुके होते. त्यांना पाच मुलगे आणि तीन मुली. आर्थिक परिस्थिती हालाखीची. आजोबा हे पंचक्रोशीत ‘वैदू’ म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र मुके असल्याने त्यांना जवळचे ज्ञान कोणाला देता आले नाही.

आपले सामाजिक भान उत्तम राखताना महाडिक गुरुजींनी विविध सामाजिक चळवळीतही सक्रीय सहभाग नोंदवला आहे. शिक्षण विभागातर्फे ‘सर्वधर्मसमभाव’ संकल्पनेवर आधारित त्यांनी सादर केलेल्या मुकनाट्य या सांस्कृतिक कार्यक्रमाला जिल्हास्तरीय केंद्रप्रमुख संमेलन, विभागीय स्तर आणि राज्यस्तरावर क्रमांक मिळाला होता. २००२मध्ये त्यांनी शहरात जुनी नाणी, नोटा आणि ३६० देशातील विविध तिकीटांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात सक्रीय सहभाग घेतला. शहरातील हजारो लोकांनी हे प्रदर्शन पाहिले. आवड असत्यामुळे गुरुजींनी आपल्या घराजवळ नारळ, सुपारी, आंबा, काजू, फणस, शेवगा तसेच फुलझाडे गुलाब, जास्वंद, जाई, जुई, मोगरा, लिली, कृष्णकमळ, ब्रह्मकमळ, विविध तळ्यातील कमळे, बेल, शमी आणि विविध ‘शो’च्या झाडांची लागवड केली. किराणा दुकानासह रोपांची नर्सरी उभारली. यातूनच पुढे त्यांनी घराला कृषी पर्यटनाचा साज चढवला. त्यांचे घर आणि बगीचा तालुक्यातील पहिले अधिकृत कृषी पर्यटन केंद्र ठरले. बालपणीची छायाचित्रणाची आवड त्यांनी जाणीवपूर्वक व्यवसायात बदलली. हाही व्यवसाय त्यांनी इतक्या तत्परतेने केला की दैनिक तरुण भारतने आपल्या ‘ध्यास’ छायाचित्र प्रदर्शनात जिह्यातील मान्यवर छायाचित्रकारांत त्यांच्या निसर्ग चित्रांची निवड केली होती. कोणतेही काम अगदी मनापासून करण्याची त्यांची सवय जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांच्या पदरात काही सकस देऊन जात राहिली आहे.

महाडीक गुरुजी हे आपल्या पर्यावरणीय जनजागरणाच्या कामामुळे महाराष्ट्रातील एक उपक्रमशील पदवीधर प्राथमिक शिक्षक-मुख्याध्यापक-केंद्रप्रमुख म्हणून परिचित राहिले आहेत. गुरुजींनी सुरुवातीच्या काळापासून पर्यावरण विषयाची आवड जोपासली होती. शेतीविषयक ज्ञानजागरण, वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी मार्गदर्शन, परिसरातील स्थानिक वृक्ष प्रजातींच्या बीयांचे संकलन, शाळेच्या आणि १९९८ पासून घराच्या रोपवाटीकेत रोपांची निर्मिती करून शाळेतील विदयार्थी व समाजामार्फत, विविध संस्था-मंडळांमार्फत वृक्षदिंडी, वृक्षारोपण, जागतिक पर्यावरण दिन, कृषिदिन, पर्यटनदिनी महिलामंडळे, तरुणमंडळे, तंटामुक्ती कमिटी, शिक्षक संघटना आदींच्या सहकार्याने रस्त्यांच्या कडेला व ओसाड डोंगरावर रोपण, रोपांचे वितरण, २००५, २०२१ मध्ये चिपळूणला आलेल्या महापूरप्रसंगी मजरेकाशीसह विविध ठिकाणच्या पूरग्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर, विविध शाळकरी मुलांना वह्या, दप्तरे, पुस्तके, कपडे आणि धान्यवाटप केले होते. महिला मंडळांकडून हळद लागवड, भाजीपाला लागवड करून त्यापासून चांगले उत्पन्न मिळते, हे पटवून दिले. निसर्गातील विविध घटकांचे छायाचित्र प्रदर्शन भरवून स्थानिक लोक व विदयार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन चिपळूण पंचायत समितीने आपल्या मासिक सभेत अभिनंदनाचा ठराव केला होता. विदयार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती व्हावी यासाठी सातत्याने वनभोजन आणि पर्यावरण सहलींचे आपल्या कार्यकाळात गुरुजींनी आयोजन केले. शाळेतील विद्यार्थांना पर्यावरणीय अनुभूती प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक समयोचित पर्यावरण ज्ञान आपल्याजवळ सक्षमतेने असायला हवं यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील राज्यव्यापी पर्यावरणीय उपक्रमांची वाट धरली.

शिक्षकी पेशात कार्यरत राहताना, शाळेशी होणारा प्रत्येक पत्रव्यवहार जबाबदारीने हाताळणाऱ्या गुरुजींना एका पत्रव्यवहारातून वृक्षमित्रआबासाहेब मोरे भेटले. २००० साली ते ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या संपर्कात आले. आबासाहेब मोरे हे ‘पद्मभूषण’ अण्णासाहेब हजारे यांच्या विचारकार्याने प्रभावित राज्यात पर्यावरण संवर्धन जनजागरणाचे काम करत होते. त्यांच्यासोबत गुरुजींच्या पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीच्या कामाला अधिक गती मिळाली. इतकी की, महाडिक गुरुजींसारखा उमदा सक्रीय सहकारी भेटल्यावर आबासाहेबांनी त्यांच्यावर निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. महाडिक गुरुजी अधिक क्षमतेने कार्यरत झाले. पावसाळ्यात शालेय मुलांकडून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड ,डोंगरभागात बीज पेरणी उपक्रम, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय पर्यावरण विषयक निबंध आणि रंगभरण स्पर्धेचे आयोजन, बक्षिस वितरणाच्या मुख्य कार्यक्रमाचे चिपळूण येथे आयोजनात सक्रीय भूमिका बजावली होती. राज्यभरातील पर्यावरण या विषयात काम करणारे शिक्षक, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांना वेगळा दृष्टीकोन मिळावा म्हणून राळेगणसिद्धीसह विविध ठिकाणी मंडळाची आजवर आठ पर्यावरण संमेलने यशस्वी होण्यात महाडिक गुरुजींचे योगदान आहे. चिपळूणच्या या पदवीधर प्राथमिक शिक्षकाने राळेगणसिद्धीच्या मातीसह सर्वदूर संपन्न झालेल्या सात पर्यावरण संमेलनांत दिलेले योगदान त्यांच्या सहकारी शिक्षकांनी त्या-त्या ठिकाणी स्वतः येऊन अनुभवले आहे, त्याला दादही दिलेली आहे.

त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे 'वणवामुक्त ग्राम अभियान' राबवण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर केला. चिपळूण येथे २०१३ साली संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पर्यावरण विभाग व पर्यावरण दिंडीच्या कामात सहभाग घेतला. ‘वनश्री’ या पर्यावरण विशेषांकाचे संपादक म्हणून काम पाहिले. वृक्षमित्रआबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या मंडळाचे, राज्यातील दुसरे बिगरमोसमी जंगलपेर अभियानचिपळूणला संपन्न झाले. त्या कार्यक्रमात चंदनतज्ज्ञ वनश्रीमहेंद्र घागरे भेटले नि ‘रत्नागिरी जिल्ह्यात चंदनाचा सुगंध दरवळावा’ म्हणून आम्ही दोघांनी अभियान सुरु केले. ते ५/६ वर्षे चालवले. गुरुजी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून, जिल्हाध्यक्ष विजयराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शालेयस्तरावर ७५ लाख बीज पेरणी अभियान संपन्न झाले. आजही कोकणातील वेगवेगळ्या गावातील देवराया, नदीकिनारे, रस्त्याच्या दुतर्फा, पर्यटनस्थळी, स्मशानभूमी परिसरात आमचे वृक्षारोपण-संवर्धन उपक्रम सुरु असतात.

गुरुजींनी शिक्षकी पेशाच्या सुरुवातीच्या दीडेक दशकात, स्थानिक वर्तमानपत्रे, स्मरणिका आणि मासिकातून शिक्षण, पर्यावरण विषयावर विपुल लेखन केले. ग्रंथचळवळ वाढावी, समाजातील चांगल्या लेखकांना पुस्तकरूपी व्यासपीठ उपलब्द्ध व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कार्यक्षम अर्धांगिनी, सौ नूतन वहिनींच्या सहकार्याने त्यांनी २००७साली चिपळूण तालुक्यातील पहिले निसर्ग पर्यटन केंद्र सुरु केले. पर्यटन विषयात चिपळूणात कार्यरत असणाऱ्या रामशेठ रेडीज, प्रसाद काणे, कैसर देसाई, मिलिंद कापडी, समीर कोवळे, धीरज वाटेकर आदींचे सहकार्य त्यांना लाभले होते. आपल्या राहात्या घराला नुसते ‘कृषी पर्यटन केंद्र’ करून भागणार नाही हे लक्षात येताच पर्यटन केंद्र सर्वदूर पोहोचवण्यासाठी गुरुजींनी २००८ साली, आमच्या मनातील चिपळूण तालुका पर्यटन पुस्तकाची कल्पना उचलून धरली. आमच्यासह सहकारी मित्र समीर कोवळे याच्या लेखनाला पहिले पुस्तकीय कोंदण प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. पत्नी सौ. नूतन यांच्या सहकार्याने सुरु केलेल्या चिपळूण तालुक्यातील पहिल्या श्री परशुराम सान्निध्य निसर्ग पर्यटन केंद्रातर्फे धीरज वाटेकर आणि समीर कोवळे यांच्याकडून ‘चिपळूण तालुका पर्यटन’ हे पर्यटनाची इत्यंभूत माहिती असलेले पुस्तक लिहून घेतले आणि प्रकाशित केले. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या आजवर जवळपास तीन हजार प्रती वितरीत झाल्यात. नामवंत इतिहास संशोधक स्वर्गीय निनादराव बेडेकर, कोकणचे बुद्धिवैभव स्वर्गीय नानासाहेब जोशी, ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रकाश देशपांडे, नामवंत लेखक प्र. के. घाणेकर, इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णासाहेब शिरगावकर, प्रख्यात इतिहास संशोधक स्व. श. गो. धोपाटे यांसारख्या नामवंतांचे मिळालेले आशीर्वाद त्या पुस्तकाचा वेगळेपणा सांगण्यास पुरेसे आहेत.

२०१४-१५ साली पर्यावरण-पर्यटन विषयातील गुरुजींच्या अभ्यासू मनाने उचल खाल्ली. संधी मिळाली. नि आमचे त्यांच्या सहकार्याने ठोसेघर पर्यटनहे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आम्ही दोघे जवळपास दीड वर्षे चिपळूण-सातारा-सज्जनगड-ठोसेघर असा निसर्गरम्य प्रवास करत होतो. या प्रवासातील अनुभव हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे. गुरुजींमधील निखळ आयुष्य जगणारा अवलिया म्हणजे ‘आयुष्य जगलेला गुरुजी’ आम्हाला खऱ्या अर्थाने तेव्हा पहिल्यांदा भेटला. पुढे या पुस्तकाला कोल्हापूरच्या चंद्रकुमार नलगे ग्रंथ पुरस्काराने गौरविण्यात आले. लेखन चळवळ वाढावी म्हणून ते सतत कार्यरत असतात. आमच्या सोबत अनेक विशेषांकांचे संपादन करण्यात त्यांचे योगदान आहे. आपले गुरु प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगीमो. म. परांजपे गुरुजी यांची जीवनकथा प्रकाशित व्हावी म्हणून त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय नानांनी, विलासरावांच्या गुरुदक्षिणाया लेखनाबाबत म्हटले होते, ‘गुरुदक्षिणा या कृतज्ञ अक्षरपूजेत गुरुजी श्री. विलास महाडिक यांनी कर्मयोगी परांजपे गुरुजींबद्दल जे उत्कटतेने लिहिले आहे ते मनोगत सध्याच्या तरुणांनी व विशेषतः शिक्षकांनी मन:पूर्वक वाचले तर प्राथमिक शिक्षक आपल्या अत्यंत मर्यादित कार्यक्षेत्रात किती अमर्याद काम करू शकतो हे लक्षात येईल.अधिक काय लिहावे? कोकणचे नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर (व्रतस्थ, शेवचिवडा, सिंहावलोकन, गेट वे ऑफ दाभोळ) आणि कोकण पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांची ८-१० पुस्तके त्यांनी आजवर प्रकाशित व वितरीत केली. महाडिक गुरुजी यांनी आपले वडिल दत्ताराम(आबा) महाडीक यांची जीवनकथा ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’, शिक्षकी पेशातील ‘गुरु’ मोरेश्वर महादेव परांजपे यांची जीवनकथा ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ या नावाने लेखक धीरज वाटेकर यांच्याकडून लिहून घेतली. आम्ही लिहिलेले, कोकणातील पहिल्या ‘मेडिकल सोशल वर्कर’ कमल श्रीकांत भावे यांचे ‘कृतार्थिनी’ चरित्र प्रकाशित केले.

गुरुजींनी आपल्या अंगभूत कलात्मक गुणांच्या बळावर प्राथमिक शिक्षकी पेशाला आकार दिला. प्रतिकूल परिस्थितीतून जीवनाचा मार्ग शोधला. आज त्यांच्या मित्र परिवाराला त्यांच्याबद्दल वाटणारा जिव्हाळा याचेच द्योतक आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत प्राथमिक शिक्षण घेण्याची प्रक्रिया आज मंदावलेली जाणवते. पण तत्पूर्वीच्या दशकभराच्या कालावधीत गुरुजींनी आपल्या शालेयस्तरावरील जबाबदारीला सर्वस्व झोकून देत न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या बाहेर जाऊन शिक्षण देण्याची त्यांची पद्धत अनुकरणीय आहे. प्रसंगी पदरचं खर्चून, आपल्या विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना समजाव्यात म्हणून ते सतत आघाडीवर राहिले. त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे तिथे आजही त्यांच्याविषयी जे बोललं जातं ते याची साक्ष देण्यास पुरेसं आहे. ज्यांनी आजवर कधीही विशेष म्हणावा असा प्रवास केलेला नसेल अशा उपेक्षित-वंचित घटकातील मुलांना आपल्यासह मोजक्या सामजिक योगदानातून सातत्याने निसर्गात घेऊन जाणारा, चिपळूणातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे यांच्या सहकार्याने राज्याची राजधानी मुंबईचे शालेय विद्यार्थ्यांना बालवयात दर्शन घडविणारा अवलिया म्हणजे विलास महाडिक गुरुजी! मोलमजुरी निमित्ताने कोकणात आलेल्या बहुभाषिक पालकांच्या शाळाबाह्य लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत शाळेची गोडी लागावी या उद्देशाने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारे गुरुजी म्हणूनही महाडिक गुरुजी विद्यार्थीप्रिय आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी कार्यानुभव, कला, मनोरंजक खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला, कौशल्य आणि कलेला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात वारली कला, अक्षरलेखन, भेटकार्ड, मातीकाम, रंगकाम, खाद्ययात्रा भरविणे, उन्हाळी छंद शिबिर, प्लास्टीकचा पुनर्वापर करून रोपकुंड्या, टाकाऊ पुठ्ठ्यांपासून साहित्यनिर्मिती केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. अनेकदा सुट्टीच्या दिवशी रविवारी महाडिक गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याच चारचाकीमधून कुठेनाकुठे घेऊन जात असताना आम्ही पाहिलेत. यात विविध स्पर्धांपासून मनोरंजनाच्या सकस उपक्रमांचा समावेश आहे.

गुरुजींनी १९८९ ते १९९१ या तीन वर्षांत सलग तालुका व जिल्हा विज्ञान प्रदर्शनात आपल्या शाळेला प्रथम क्रमांक मिळवून दिला. शिक्षकांसाठीच्या शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात १९९०-९१, १९९६-९७-९८या तीन वर्षांत प्रथम क्रमांक पटकाविला. साक्षरता आंदोलनामध्ये ते मास्टर ट्रेनर, एस.एस.सी. परीक्षेसाठी सहाय्यक उपपरीक्षक म्हणून कार्यरत होते. महाडीक गुरुजी यांनी आपल्या कार्यरत शाळांच्या शैक्षणिक सोईसुविधासाठी खूप प्रयत्न केले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सलग तीन वर्षे त्यांना गोपनीय 'अतिउत्कृष्ट' शेरा देऊन गौरविण्यात आले होते. याखेरीज स्मार्ट पी.टी. प्रशिक्षणातील मूकअभिनय, पल्स पोलिओ, साक्षरता अभियान, कुटुंब कल्याण आदी कामासाठी शासनाने गौरविले. शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर जात आपल्यातील क्रयशक्तीला अधिकचे सकस काहीतरी हवे आहे, याची जाणीव झालेल्या गुरुजींनी शिक्षणासोबतच आवडत्या सामाजिक, पर्यावरण आणि पर्यटन या क्षेत्रात काम केले. जे जे सत्य नि चांगलं, ते ते सारं आपलंया न्यायाने, त्यांनी अनेकविध समाजाभिमुख उपक्रमांना आपलसं केल्याचं अनेकांनी पाहिलं आहे. शैक्षणिक कार्यकाळात त्यांची एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात अचानक बदली झाली होती. यामुळे त्यांना मनस्ताप, आर्थिक तोटा, रोजचा ११० कि.मी. दुचाकी प्रवास आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. पण शांत वृतीने त्यांनी यावर मात केली. अनेक ‘ज्येष्ठ’ शिक्षक रांगेत उभे असताना वयाच्या ३५व्या वर्षी त्यांची जि. प.च्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुक्यातून एकमेव निवड झाली होती. आपल्या सातत्यपूर्ण उपक्रमशील शिक्षकी वर्तनातून शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारही निवृत्तीपूर्वी सतरा वर्षे अगोदर मिळवून महाडिक गुरुजींनी जिल्हास्तरावरील पुरस्कार पटकावतानाचा शिरस्ता कायम ठेवला होता.

गुरुजींना महाराष्ट्र शासनाने जिल्हा व राज्यस्तरीय (२००६-०७) आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे त्यांना आजवर आदर्श शिक्षक (नगरपरिषद, लायन्स क्लब व रोटरॅक्त क्लब चिपळूण), पर्यावरण मित्र (श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषि सेवा ट्रस्ट अहमदनगर), कलागौरव (मयूर आर्ट अकादमी परळी वैजनाथ), कलाश्री (कलांजली कला महोत्सव), पर्यावरण रक्षक (पर्यावरण व सामाजिक प्रदूषण निवारण महामंडळ), राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप (अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ), भाषारत्न (राष्ट्रभाषा हिंदी प्रचार परिषद सिंधुदुर्ग), राष्ट्रचेतना गौरवमूर्ती (राष्ट्रचेतना पब्लिकेशन जळगाव), अखिल भारतीय प्रतिभा सन्मान, पर्यावरण भूषण (ग्रामीण मानव विकास प्रतिष्ठान व माय अर्थ फाउंडेशन), उपक्रमशील कलाध्यापक (सानेगुरुजी प्रबोधिनी चिपळूण), श्री गणेश गौरव (सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण) आदी पन्नासेक राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

निवृत्ती आली की आयुष्याची संध्याकाळ आली असं म्हटलं जातं. मात्र न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनया वैद्यकीय नियतकालिकाच्या मे २०२३च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथे सर्वाधिक उत्तम कार्यक्षमतेचा काळ हा साठी आणि सत्तरीत असतो असे नोंदवण्यात आले आहे. मनुष्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कार्यक्षमता वयाच्या ७० ते ८० या दशकादरम्यान असते. ५० ते ६०च्या दशकाचा क्रमांक त्यानंतर लागतो असे नमूद आहे. निवृत्तीची अट नसलेल्या वकिली, लेखन, लेखपाल अशा क्षेत्रांत कित्येक लोक ऐंशीव्या वर्षी सक्रिय व कामातली गुणवत्ता टिकवून आहेत. सतत कार्यमग्न राहणे हाच यशस्वी जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आमचे आणि महाडिक गुरुजींचे ‘मार्गदर्शक’ प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक स्व. अण्णा शिरगावकर हेही वयाच्या ९३व्या वर्षी आगामी ग्रंथलेखनासाठीच्या संदर्भांची जुळवाजुळव करत असलेले आम्ही पाहिलेत. प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणणे, समाजातील सर्व घटकांना जमेल तेवढी मदत करणे, गरजूंना सहकार्य करणे, आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांना आपल्यासोबत पुढे घेऊन जाण्याची कला, कोणाला विशेष विरोध न करणे, निसर्गाची आवड, झाडांची जोपासना, परसबाग, फोटोग्राफी, संग्राहकवृत्ती, संगीताची आवड, दुर्मीळ आणि औषधी वनस्पतींची लागवड, शांत व नम्र स्वभावामुळे महाडिक गुरुजी सर्वदूर पोहोचले. संकटात सापडलेल्यांना शक्यति मदत, सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभाग, टाकावूतून टिकावू वस्तू बनविण्याचे कौशल्य, शोधकवृत्ती, समानता, स्वच्छता, टापटीप यांमुळे गुरुजींचे व्यक्तिमत्त्व अनेकांत उठून दिसते.

स्वच्छंदी जीवन जगणारे महाडिक गुरुजी गेली दोन दशके आम्ही पाहातोय. ‘आयुष्य हे माणसाला मिळालेले एक वरदान आहे. त्याचा यथार्थ उपयोग करून घेता आला पाहिजे. आयुष्यात मी हे पाहिले नाही. मला हे माहिती नाही असे होता कामा नये. सर्व गोष्टींचा मर्यादित आनंद लुटता आला पाहिजे. सगळ्याच गोष्टीत यश नाही मिळाले तरी चालेल पण खचून न जाता प्रयत्नवाद जीवंत ठेवला पाहिजे. जीवनात सुख-दुःख, यश, अपयश या सर्वांना समर्थपणे सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत इप्सित साध्य करण्यासाठी अत्यंत कष्टाने व नेटाने आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती, ताकद आपल्यात असली पाहिजे.’ ही विलास महाडिक गुरुजींची जगण्याची भूमिका सर्वस्पर्शी आहे. प्रत्यक्ष मेहनतीतून, श्रमातून, ध्यासातून यशाचं फूल उमलतं. या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवल्याने आपण इथवर मजल मारू शकल्याचे गुरुजींना वाटते. ‘आपल्या यशाची बलस्थाने सांगताना ते तीर्थरूप आई-वडिल, आदरणीय गुरुवर्य महादेव मोरेश्वर परांजपे (गुरुजी), शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात वावरताना लाभलेले सहकारी मित्र, मार्गदर्शक अधिकारीवर्ग आणि कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात’ जे त्यांच्यातील माणूसपण दर्शवणारे आहे. गुरुजींची आजची ‘सेवानिवृत्ती’ आगामी विविधांगी आणि ठोस सामाजिक कामासाठी पूरक ठरो, या शुभेच्छा !

धीरज वाटेकर चिपळूण

बुधवार, २७ मार्च, २०२४

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (२७ मार्च) मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी कोकणातील चिपळूणच्या खेण्ड हद्दीतून मार्गक्रमण करणारी ग्रामदेवता (मिरजोळी) श्रीमहालक्ष्मी साळूबाईची शिमगा पालखी आमच्या ‘विधिलिखित’ निवासस्थानी ५०१ श्रीफळांच्या तोरणावर विराजमान झाली. वर्षभराचे कष्ट करण्यासाठी लागणारी नवीन उमेद, ऊर्जा देण्यासाठीच देव अंगणी आल्याचा आनंद झाला.

शिमगा म्हटला की कोकणी माणसाच्या अंगात जणू संचारतं. शिमग्याची पालखी त्याच्या डोक्यात नाचायला लागते. कोकणी लोककला, सोंगं दिसायला लागतात. कोकणात गावोगावी शिमगोत्सवात ग्रामदैवतं पालख्यात बसून माणसाच्या भेटीला येतात. दारोदारी पालख्यांचे जल्लोषात स्वागत होतं. वर्षानुवर्षे ठरलेल्या क्रमाने आणि दिवसाप्रमाणेच पालख्या फिरतात. पालखीचा मार्ग, वेळ, तपशीलवार नियोजन पूर्व प्रसिद्ध होत असते. त्यामार्गावर, आपापल्या घराजवळ रांगोळ्या घालून, सजावट, स्वच्छता, नीटनेटकेपणा बाळगून लोकं श्रद्धेने पालखीच्या दर्शनासाठी उभे असतात. महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला तरी कोकणातली होळी आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने सजत असते. अलीकडे तिला पर्यटनाचे कोंदण मिळू लागले आहे. शिमग्याच्या दिवसांत देवही देऊळ सोडून भक्तांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आलेले असतात. कोकणी माणसांना गावापासून मुंबई-पुण्यासह जगभर काबाडकष्ट करण्यासाठी लागणारी वर्षभराची ताकद, कुटुंबियांना आधार देण्यासाठीचा आत्मविश्वास शिमग्यातून मिळत असतो. देऊळ सोडून चव्हाट्यावर आलेल्या देवाला कोकणी मनुष्य आपल्या अडचणीची थेट विचारणा करतो. त्याला आपल्या ग्रामदेवतेवर भरवसा असतो, त्याला ग्रामदेवतेचा आधार वाटतो. आपल्या ग्रामदेवतेकडून मिळालेले संरक्षण त्याला महत्वाचे वाटते. जगाच्या पाठीवर कोकणातील गावगड्याचे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

अशा या ग्रामदेवतेच्या आगमनाची वाट पाहात रात्र जागावी लागते तेव्हा आपल्याला पालखी सोबतची मानकरी मंडळी शिमगोत्सवात दिवस-रात्र बजावत असलेल्या अखंड सेवेची जाणीव होते. कोकणातील शिमग्यात गावोगावी ज्या प्रथा-परंपरा, रितीभाती आणि लोककललांचं दर्शन होतं ते 'बकेटलिस्ट'मध्ये ठेवून प्रत्येकानं एकदातरी 'याचि देही...' जरूर अनुभवावं. कोकण पर्यटन आपली वाट पाहातंय.

धीरज वाटेकर चिपळूण

मंगळवार, १९ मार्च, २०२४

पर्यावरणीय ‘सावधानतेचे तत्त्व’ सांगणारे आत्मचरित्र

पाच तपांहून अधिक काळ भारतातील वनांचे सखोल संशोधन केलेल्या ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सरांचे निसर्गप्रेम सर्वश्रुत आहे. भारतातील निसर्गाची, जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणाऱ्या, सामान्य माणसाप्रति उत्तरदायित्व मानणाऱ्या गाडगीळ सरांचे साहित्यिक अंगाने, ललित शैलीने नटलेले ‘सह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. देशाचा पर्यावरणीय इतिहास, आधुनिक भारताला आकार देणाऱ्या पर्यावरणीय हालचाली आणि धोरणात्मक निर्णयांची नोंद असलेला, देशातील निसर्गप्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि भवतालबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा दस्तऐवज आहे.

१ सप्टेंबर २०२३ला पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत गाडगीळ सरांच्या ‘सह्याचला : एक प्रेम कहाणी’ या वैज्ञानिक आत्मचरित्राचे ‘ए वॉक अप द लिव्हिंग विथ पिपल अनड नेचर’ या इंग्रजीसह कोंकणी, कानडी, मल्याळम, तामिळ, तेलगू. हिंदी आणि बंगाली आदी भारतातील नऊ भाषांत प्रकाशन झाले. सरांनी महिनाभर अगोदर या कार्यक्रमाची कल्पना दिलेली असल्याने प्रकाशन समारंभाला उपस्थित राहाता आलं. यावेळी आधुनिक भारताच्या राजकीय तसेच सामाजिक इतिहासाचे अभ्यासक, संशोधक आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी गाडगीळ सरांची आत्मचरित्र अनुषंगाने घेतलेली मुलाखत आम्हा श्रोत्यांसाठी पर्वणी ठरली होती.

गाडगीळ सर हे सहा राज्ये, ४४ जिल्हे आणि १४२ तालुक्यांमध्ये पसरलेल्या, भारतातील सर्वात श्रीमंत वाळवंट, १३ राष्ट्रीय उद्याने आणि अनेक अभयारण्ये असलेल्या पश्चिम घाट संवर्धन समितीसह जैविक विविधता कायदा आणि पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टरच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. सध्याच्या नवीन युगात हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या घातक स्थितीला आपण तोंड देत आहोत. त्या पार्श्वभूमीवर माणूस म्हणून आपण कुठे होतो? इथे कसे आणि का आलो? हे समजून घेण्यासाठी हे चरित्र अनिवार्य आहे. गाडगीळ सरांनी आपले हे आत्मचरित्र गोव्यातील शाकाची जुवे गावाच्या बिस्मार्क डियास यांना समर्पित केले आहे. भारतातील सामान्य लोकांचा शहाणपणा आणि सामर्थ्य यावर विश्वास ठेवणाऱ्या बिस्मार्क डियास यांच्या संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडण्याच्या अस्वस्थ कहाणीने आत्मचरित्र उलगडू लागते. सरांना गेली पन्नास वर्षे ओळखणाऱ्या, भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांची प्रस्तावना आपल्याला २५ प्रकरणात विभागलेल्या पुस्तकाची उंची सांगते. पुस्तकात आपल्याला पिढ्यानपिढ्यांचे आघात, संकटे, जमिनीच्या सर्वात जवळ राहणाऱ्यांचे सामूहिक नुकसान, त्यांच्या परंपरांनी नैसर्गिक संसाधनांच्या वापराबद्दल आदर कसा निर्माण केला? गाडगीळ सरांच्या मनात निसर्गाबद्दलची उत्कट आस्था आणि देशातील आदिवासी आणि ग्रामीण लोकांबद्दलचा आदर बालपणापासून कसा निर्माण झाला? याची माहिती मिळते.

या आत्मचरित्रातून माणसांसह जगभरातून समोर येणारे मासे, पक्षी, भटके हत्ती, प्राणी, कीटक, किनारपट्टीवरील मच्छिमार लोक यांची सरांनी केलेली निरीक्षणे, निसर्गवेडाचे धडे, पायपीट, स्थानिकांसोबत मिळून-मिसळून राहाण्याची त्यांची पद्धत थक्क करते. पुस्तकात प्रादेशिक पर्यावरणीय इतिहासाची नोंद आणि सरांच्या कामाच्या सूक्ष्म नोंदी आहेत. पुण्याबाहेरील उपवने, पानशेत धरण पाणलोट क्षेत्र, देशात डोंगर उतारावर स्थलांतरित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दलची समाजशास्त्रीय निरीक्षणे आणि वरच्या स्तरात वर्चस्व गाजवणाऱ्या लोकांबाबतचे सरांचे निरीक्षण विचार करायला लावणारे आहे. हे पुस्तक निसर्गाशी आणि देशासह जगातील विविध भूप्रदेशातील समुदायांशी असलेले सरांचे गहन संबंध स्पष्ट करते.

सरांच्या कार्यवृत्तीचे मूळ घरातील बालपणीच्या संस्कारात असल्याचे पुस्तक वाचताना लक्षात येते. सरांचे वडिल देशाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष राहिलेले अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्यासह डॉ. सलीम अली, सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे यांचे सान्निध्य तसेच महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, धर्मानंद कोसंबी, जे.बी.एस. हाल्डेन यांचा प्रभाव, हार्वर्डसारख्या विद्यापीठात ई. ओ. विल्सन या प्रसिद्ध वैज्ञानिकांचे मार्गदर्शन, अमेरिकेत संधी असूनही भारतात परत येऊन संशोधन करण्याचा त्यांचा निश्चय, महाराष्ट्रातील देवरायांवरचे काम, IISC नियुक्ती, कर्नाटकातील काम, सायलेंट व्हॅली जनआंदोलन, biodiversity register, मेंढा-लेखा, पश्चिम घाट समिती, बंदीपूरमधील पांढऱ्या ठिपक्यांसह जमिनीवर राहणाऱ्या कोळ्याच्या नवीन प्रजातीला भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाचे बीके टिकाडर यांनी दिलेले ‘ओरनिथोक्टोनस गाडगीली’ नाव अशा अनेक गोष्टी पुस्तकात भेटतात. मुंबई विद्यापीठात प्राणिशास्त्रात सागरी जीवशास्त्र विषय हा परिसरशास्त्राच्या जवळचा म्हणून इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये एमएस्सी करत असताना ‘मांदेली’ माशाच्या संशोधनाच्या निमित्ताने अनेकदा सरांचा मुंबईच्या मच्छीमारांशी संवाद झालेला आहे. त्याकाळी हे मच्छीमार ट्रॉलरच्या उपयोगाबद्दल साशंक होते. म्हणायचे, ‘सुरुवातीला खूप मासे सापडतील, पण या ट्रॉलरने समुद्राचा तळ खरडून काढला जातो आणि याच्यातून माशांच्या विणीवर वाईट परिणाम होऊन दूरच्या पल्ल्याने मोठा तोटा होण्याची शक्यता आहे.’ आज मच्छिमारांचे भाकीत खरे ठरल्याची नोंद सरांनी केली आहे. मच्छीमार जी मांडणी करत होते त्याला ‘सावधानतेचे तत्त्व’ (Precautionary principle) म्हणतात असे पुस्तकात नमूद आहे.

१९९०मध्ये, गाडगीळ सरांना मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून पीपल ऑफ इंडिया (POI) प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली होती. पीओआय डेटाबेसमधून गाडगीळ सर आणि त्यांचे सहकारी, ‘आधुनिकता, वेगवान विकास आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर संसाधनांची अधिक चांगली वाटणी करण्यासाठी गरिबी निर्मूलन आणि लोकसंख्या नियंत्रण धोरण परस्परपूरक राबवून भारतीय कुटुंबाचा आकार लहान व्हायला हवा’ या निष्कर्षापर्यंत पोहोचले. हे आत्मचरित्र निसर्गप्रेमींसाठी एक खजिना आहे. पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत असलेल्या जगासाठी ही जीवनकथा प्रेरणादायी आहे. राजकीय अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार यासह वस्तुनिष्ठ तथ्ये सांगून आपल्याला ज्या विषयांची माहिती आहे त्यावर आजवर निर्भयपणे लिहिणारे गाडगीळ सर चरित्रात पानोपानी भेटतात. हे पुस्तक म्हणजे एका तल्लख विद्वान, शिक्षक, वैज्ञानिक, कार्यकर्ता, प्रभावशाली धोरणकर्ता आणि बरेच काही यांचे संस्मरण आहे. या आत्मचरित्राची भाषा सरांच्या बोलण्यातल्या शब्दांसारखी सहजसोपी आहे. सरांनी संपूर्ण पुस्तकात निसर्ग-पर्यावरणाच्या रक्षणासोबत शाश्वत विकास कसा होईल? यासह भारतीय समाज, अर्थव्यवस्था आणि शासन याविषयी आपले स्पष्टवक्तेपण कायम ठेवले आहे. मोजकी छायाचित्रे असलेले हे पुस्तक प्रकाशकांनी सुरेख सजवले आहे. मराठी पुस्तकाचे संपादन हे गाडगीळ सरांसोबत पश्चिम घाट अभ्यासवर्गात काम केलेल्या डॉ. मंदार दातार यांनी केले आहे. भारतासह जगात आमच्यासारखे अगणित पर्यावरणप्रेमी आहेत, ज्यांच्यावर गाडगीळ सरांच्या कामाचा खोलवर प्रभाव आहे. सरांचे हे आत्मचरित्र निसर्ग, जंगल आणि पर्यावरणाकडे कललेल्या पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

गाडगीळ सरांचे कोणतेही म्हणणे हे शास्त्रीय पुराव्याशिवाय नसते आणि समोरचा माणूस कितीही मोठा असला तरी कटूसत्य सांगायला सर कचरत नाहीत याची अनेक उदाहरणे पुस्तकात आहेत. आत्मचरित्रातील शेवटचे प्रकरण ‘पुढची दिशा’ सांगणारे आहे. त्यात सर म्हणतात, ‘आपल्या प्रचंड लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी आसमंतातील नैसर्गिक संसाधनांवरचे अधिकार स्थानिक लोकांच्या हाती दिले पाहिजेत.’ सध्याच्या हवामान बदलाच्या युगात सरांच्या या सल्ल्याकडे तातडीने लक्ष द्यायला हवे आहे. भारतातील पर्यावरणीय इतिहास आणि संवर्धन यांची वास्तविकता शिकवण्यासाठी हे पुस्तक अमूल्य आहे. भारतातील जैवविविधता, संवर्धन आणि पर्यावरणीय भविष्याविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे प्रकाशमय पुस्तक आहे. भारतात शेतीवरती रासायनिक खतांची आणि कीटकनाशकांची जी पकड आहे ती नवी पिढी ढिली करेल या आशावादासह सरांनी आपल्या आत्मचरित्राचा शेवट दलाई लामा यांच्या ‘वैश्विक जबाबदारी’ विषयक मानवतेच्या कल्याणासाठी आपल्याला झटावे लागेल अशा आशयाच्या वचनाने केला आहे. हे आत्मचरित्र म्हणजे भारताच्या समृद्ध जैविक वारशाच्या एका माणसाच्या खोल वेडाची दुर्मिळ प्रेमकथा आहे. यातील बारकावे अस्वस्थ करणारे आहेत. हे पुस्तक निसर्ग व पर्यावरणप्रेमी, विकासाच्या अर्थशास्त्राचे अभ्यासक यांसह सर्वांनी वाचायला हवे आहे. आज विकासाच्या नावाखाली देशभरात झपाट्याने हिरवाई मोडीत निघत असताना गाडगीळ सरांचे जीवन एक धडा म्हणून समोर आले आहे. दुर्दैवाने आम्ही भारतीय हा धडा शिकायला तयार नाही पण न शिकण्याची मोठी किंमत मोजायला तयार आहोत अशी आजची स्थिती आहे.

‘परिसरशास्त्राचे शिक्षण घेतल्याचा एक तोटा म्हणजे तुम्हाला एका रक्तबंबाळ जगात एकाकीपणे जगायला लागते. सामान्य माणसाला जगावर होत असलेले हे घाव बिलकुल दिसत नाहीत. परिसर शास्त्रज्ञाला एक तर निर्ढावायला लागते, नाही तर मृत्यूची चिन्हे दिसत असली, तरी ती पाहायची नाहीत, असा डॉक्टर बनायला लागते.' अमेरिकेतील निसर्गप्रेमी आल्डो लिओपोल्ड यांनी १९४९ साली त्यांच्या A Sand County Almanac या पुस्तकात लिहिलेल्या मजकुराचा संदर्भ देऊन गाडगीळ सर, ‘मीसुद्धा हे घाव बघतो आणि त्याचे मला दुःख होते’ असं लिहितात ते वाचताना अस्वस्थ व्हायला होतं. त्याही स्थितीत कविवर्य विंदा करंदीकर यांच्या शब्दात, 'विज्ञान ज्ञान देई, घडवी कितीक किमया, देई न प्रेम शांती, त्याला इलाज नाही' हे सांगूनही मी दुर्दम्य आशावादी आहे आणि आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी जी ज्ञानक्रांती घडवून आणली आहे, त्यातून खूप काही चांगली निष्पत्ती होईल, ह्याची मला खात्री आहे. असं गाडगीळ सर नमूद करतात. भारत देश महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर असताना वैज्ञानिक प्रगती, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवीन पिढीची मने शाश्वत जगाकडे वळतील असा सरांना विश्वास आहे. तो सार्थ ठरावा, ही वनदेवतेच्या चरणी प्रार्थना.


धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

 

आत्मचरित्र : सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी

लेखक : माधव गाडगीळ

पृष्ठे : ४६४ + १६ रंगीत पृष्ठे

किंमत : ८००

राजहंस प्रकाशन पुणे



महाराष्ट्र टाईम्स २४ मार्च २०२४

शुक्रवार, १ मार्च, २०२४

‘खाजगी पसंत’ शाळेचा सुवर्णमहोत्सव!

दैनिक सागर २ मार्च २०२४ 

                                                                

देशाच्या ग्रामीण भागातील कोणत्याही शाळेच्या उभारणीमागे ‘स्थानिक आवश्यकता, भौगोलिक समस्या, विद्यार्थ्यांची गैरसोय’ ही कारणं तर असतातच! पण या सर्वच कारणांच्या बरोबरीने, अधिक दूरचे पाहात एखाद्या गावातील चारेक वाड्या एकवटून गावातील, दुर्दैवी अपघाती निधन पावलेल्या व्यक्तीच्या मागे त्याच्या कुटुंबाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनू नये यासाठी चक्क खाजगी प्राथमिक शाळेचे प्रयोजन करतात. हा विचारच विचार करायला लावणारा आहे. ‘त्या’ चारेक वाड्यांनी केलेले हे प्रयोजन पुढे एक-दोन नव्हे तर आपल्या वयाची तब्बल पन्नास वर्षे पूर्ण करते. हे अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे. शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे. हे खरे असले तरी नवीन शाळा सुरू करणे म्हणजे एखाद्या मुलाला जन्म देण्यासारखे असते. इथून सुरुवात करून अनेक गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेत ‘A’ ग्रेड आणि आय.एस.ओ. मानांकनासह एक यशस्वी शाळा घडवण्यापर्यंतचा पन्नास वर्षांचा प्रवास करणारी कोकणातील चिपळूण तालुक्यातील शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे कासारवाडी संचलित खाजगी पंसत शाळा असुर्डे कासारवाडी ही आजपासून दोन दिवस (२-३ मार्च) आपला सुवर्ण महोत्सव साजरा करते आहे.



असुर्डे! मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अकरा वाड्यांनी युक्त सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव. पन्नास वर्षांपूर्वी गावात सात इयत्तांची एक आणि चार इयत्तांच्या दोन शाळा अस्तित्वात होत्या. मात्र गावातील कासारवाडी, खापरेवाडी, चोगलेवाडी आणि गुरववाडी येथील विद्यार्थ्यांना बसस्टॉप जवळील शाळेत पोहोचण्यासाठी रस्त्यातील नदी पार करावी लागत असे. इतर मोसमात ठीक असायचे पण पावसाळ्यात हा प्रवास अत्यंत खडतर व्हायचा. स्थानिक लोक, नदी पार करायची पारंपारिक व्यवस्था म्हणून नदीच्या पात्रावर लाकडाचा साकव उभारीत. मात्र त्यालाही मर्यादा येत. अनेकदा हा साकव पुराच्या पाण्यात वाहून जाई. मग पालकांना आपल्या लेकरांना स्वतःच्या खांद्यावर बसवून शाळेत पोहोचवावे लागत असे. अनेकदा तर चौथीपर्यंतच्या छोट्या विद्यार्थ्यांना पर्यायाअभावी शाळा बुडवावी लागत असे. शाळेला जाणाऱ्या रस्त्यावरील पक्क्या पुलाच्या अनुपलब्धीमुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला पालक पर्याय शोधण्याच्या मनस्थितीत होते. अशातच गावातील वसंत शंकर जाधव यांचे १९७१साली रेल्वे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती सुमन वसंत जाधव आणि उभयतांच्या छोट्या कन्येच्या भविष्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. जाधव यांच्या कुटुंबीयांनी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत देसाई आणि विठठल साळवी यांच्यामार्फत हा विषय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वर्गीय गोविंदराव निकम (माजी खासदार) यांच्यासमोर मांडला आणि काहीतरी मार्ग सुचविण्याची विनंती केली. निकम साहेबांनी ग्रामस्थांची समस्या समजून घेऊन कासारवाडीतील प्रमुख ग्रामस्थांना खाजगी पसंत शाळा सुरु करण्याची सूचना केली. त्यांची सूचना आणि वाडीतील पावसाळी शैक्षणिक स्थितीचा विचार करून गावातील कासारवाडी, खापरेवाडी, चोगलेवाडी आणि गुरववाडीतील ग्रामस्थ एकवटले. गावात शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे संस्थेची स्थापना झाली. संस्था स्थापन होताच शाळेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा आपल्या राहात्या घराच्या पडवीत जागा उपलब्ध करून देत स्वर्गीय गणपत बाळकृष्ण नरोटे यांनी जागेचा प्रश्न सोडवला. १ जून १९७४ रोजी कासारवाडीत पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘खाजगी पसंत’ शाळा सुरु झाली.

 


ज्या घटनेच्या गांभीर्यातून शाळेची उभारणी झाली होती त्या स्वर्गीय वसंत शंकर जाधव यांच्या पत्नी श्रीमती सुमन वसंत जाधव यांना शाळेत ‘शिक्षिका’ म्हणून नेमण्यात आले. असुर्डे ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गावातील एका कुटुंबावर ओढवलेल्या संकटावर मात केली होती. पुढे गणपत नरोटे यांच्या घरात वर्षभर शाळा चालली. वर्षभरात शाळा नियमित झाल्यावर इमारतीचा प्रश्न पुढे आला. तेव्हा स्वर्गीय शांताराम कृष्णा नरोटे आणि स्वर्गीय राजाराम कृष्णा नरोटे यांनी शाळेच्या इमारतीसाठी जागा दिली. या जागेवर ग्रामस्थांनी अर्ध्या मातीच्या भितींवर गवताचे पेंढारु छप्पर घालून शाळेसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली. शाळेची गरज लक्षात घेऊन पुढच्या वर्षी श्रीमती घाणेकर यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. अनेक वर्षे शाळा याच पेंढारु अवस्थेत होती. कालांतराने ग्रामस्थांनी शाळेला कौलारू स्वरूप दिले. २०११साली स्वतंत्र दोन रूमची चिरेबंदी कौलारू इमारत बांधण्यात आली. या खोल्यांच्या मध्यभागी स्लॅब टाकून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील असा मोठा पॅसेज तयार झाला. आज याठिकाणी शाळेचे सर्व कार्यक्रम संपन्न होत असतात.

 


गावातील लोकांनी शासकीय मदतीशिवाय हे सारे उभे केले आहे. सुरुवातीपासून शाळेचा दर्जा उत्तम आहे. शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे कासारवाडी या संस्थेचे पहिले अध्यक कै. गणपत बजाबा नरोटे (१ जून १९७४ ते डिसेंबर १९८०) होते. त्यानंतर कै. विठोबा केशव नरोटे (१९८१ ते १९८३), कै. नारायण गोपाळ खापरे (२ मे १९८३ ते २००९), कै. राजाराम गजानन नरोटे (२००९ ते २०२१), राकेश राजाराम नरोटे (ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२) यांनी काम पाहिले. एप्रिल २०२२ पासून वसंत शांताराम साळवी हे अध्यक्ष आहेत. आजपर्यंतच्या सर्वच संस्थाचालकांनी आपलं तन-मन-धन अर्पून शून्यातून ही शाळा नावारुपाला आणलेली आहे. यासाठी मागील पन्नास वर्षांत सर्व ग्रामस्थांचेही सातत्याने सहकार्य राहिलेले आहे. २०१४ मध्ये ही शाळा डिजीटल होऊन इयत्ता पहिली ते चौथीचे इंग्रजी वर्ग सुरु करणेत आले आहेत. २०१५मध्ये  शाळेने ISO नामांकन प्राप्त केले. शाळेने ‘A’ ग्रेडही प्राप्त केली आहे.



आमदार निकम यांच्याहस्ते उद्घाटन होणार

शनिवारी (दिनांक २ मार्च) सकाळी ९ वाजता गोपूजन व ग्रंथदिंडी सोहळा संपन्न झाल्यावर आमदार शेखर निकम यांच्याहस्ते सकाळी ११ वाजता सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी जि. प. उपाध्यक्ष संतोष थेराडे, माजी सभापती संतोष चव्हाण, पं. स. चिपळूणच्या गटविकास अधिकारी उमा घारगे (पाटील), गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक, साहाय्यक गटविकास अधिकारी भास्कर कांबळे, प्रभाग सावर्डेच्या शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते, मांडकी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय कवितके, असुर्डेचे सरपंच पंकज साळवी, उपसरपंच दिलीप जाधव, सदस्य सारिका नरोटे, माजी सदस्य (शाळा समिती) गणपत खापरे, लायन्स क्लब सावर्डेचे अध्यक्ष डॉ. निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अवधूत साळवी, गजानन साळवी, असुर्डेचे तंटामुक्ती अध्यक्ष अनंत निर्मळ, उत्तम जाधव, माजी मुख्याध्यापिका सुमन जाधव, माजी साहाय्यक शिक्षिका अपर्णा भाताडे आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, ०३.३० - महिला व बालविकास अधिकारी माधवी जाधव यांचे महिला कायदे विषयक मार्गदर्शन, सायंकाळी ५ - हळदीकुंकू समारंभ, रात्रौ ७.३० - आजी-माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल. यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांची विशेष उपस्थिती असेल. तर रविवारी (दिनांक ३ मार्च) सकाळी १० वाजता श्रीसत्यनारायण पूजा संपन्न होईल. सकाळी १०.३० – सामाजिक कार्यकर्ते अवधूत साळवी यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी सन्मान सोहोळा संपन्न होईल. सकाळी ११.३० – फनीगेम्स,  दुपारी १.३० – महाप्रसाद, दुपारी ३ – लायन्स क्लब सावर्डे यांच्या सौजन्याने डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर होईल.

 

या शाळेचा सुवर्णमहोत्सवी समारंभ संपर्कात आलेल्या सर्वासाठी पर्वणी असणार आहे. कोकणच्या मातीत उपक्रमात्मक वैशिष्टपूर्ण कार्य करणाऱ्या मान्यवरांचे विद्यमान विद्यार्थ्यांना सान्निध्य देताना शाळेचे गेल्या पन्नास वर्षातील माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक आवर्जून उपस्थित राहातील, असे नियोजन शाळेने केले आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्ष समारंभास अवश्य उपस्थित राहावे. शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे कासारवाडीचे अध्यक्ष वसंत शांताराम साळवी, सचिव महेंद्र नरोटे आणि त्यांचे सर्व सहकारी शाळेचा सुवर्ण महोत्सव यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. विद्यार्थी संख्येअभावी राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा बंद होत चालल्या असताना, अभिनव विचारातून उभ्या राहिलेल्या आणि वयाची पन्नाशी पूर्ण केलेल्या या खाजगी पसंत शाळेचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

 

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०४९८


मौजे शिपोशी :: विशेष नोंदी

कोकणातील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण साहित्य संमेलन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर सरांच्या अध्यक्षतेखाली आजपासून (१-३ मार्च २०२४) शिपोशीतील न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठल्ये विद्यामंदिरात होत आहे. संमेलनाच्या निमित्ताने ‘शिपोशी’ संदर्भातील काही दुर्लक्षित नोंदींचा घेतलेला हा आढावा...

धीरज वाटेकर चिपळूण (मो. ९८६३६०९४८)


निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी श्रीपोशीचा अपभ्रंश होऊन आजचे शिपोशी नाव रूढ झाले असावे असा कयास आहे. इ.स. १६८२ मध्ये गावात वस्ती असल्याचे उल्लेख सापडतात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी कोकणातील वसाहती ग्रंथात केलेल्या नोंदीनुसार हे गाव कोणी मराठा सरदाराने वसविलेले असावे. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडावर श्रीभवानी देवीचे मंदिर बांधले त्यावेळी देवीचे पुजारी इनामदार आठल्ये होते. मौजे बावधन (वाई) हा गाव त्यांच्याकडे इनाम होता. देवीचे विद्यमान पुजारी हडप मूळचे आठल्ये होत. छत्रपती संभाजी महाराजांच्या भयंकर आणि दुर्दैवी मृत्युनंतर (१६८९) कोकणात ज्या चकमकी, जाळपोळी झाल्या त्यात शिपोशी गाव सापडून श्रीदेव गांगेश्वर मंदिराचे नुकसान झाले होते. शिपोशी हे पेशवाईपूर्व काळापासून विद्वत्ता, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा ह्यात पुढारलेले गाव होते.


११व्या शतकाच्या सुमारास पाटण (सातारा) तालुक्यातील पाटणच्या दक्षिणेस असलेल्या ‘ओटोली’तून आठल्ये घराण्याचे मूळ पुरुष देवळे येथे आले होते. ‘ओटोली-ये’ आडनावाचा १६७६ च्या श्रीमत् छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रात उल्लेख आहे. शिपोशी हे गाव हा इ.स. १७२५ च्या आसपास देवळे येथील आठल्ये यांना इनाम म्हणून मिळाले. गावचे ग्रामदैवत श्रीगांगेश्वर आहे. सन १७५०च्या दरम्यान आठल्ये यांनी श्रीदेव हरिहरेश्वराची स्थापना करून प्रसिद्ध मंदिर बांधले. शिपोशी गावात मुंबई इलाख्यातील सहावी मराठी शाळा १८५५ साली सुरु झाली होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात मुंबईत उद्योगधंदे वाढत होते. मुंबई बोटीने कोकणाला जोडलेले होते. १८३० नंतर टप्प्याटप्प्याने झालेला मुंबई गोवा रस्ता तयार झाला. तर रत्नागिरी-कोल्हापूर मार्ग १८८० ते १८९० या कालावधीत टप्प्याटप्प्याने टायर झाला. १९व्या शतकात कोकणातून लोकं कामधंदा व शिक्षणासाठी मुंबईला जाऊ लागले. १९०५ साली गावी पोस्टऑफिस सुरु झाले. गावात १९१३ साली शिपोशी ग्रुप सहकारी पतपेढी स्थापन झाली होती.  १८ जून १९५९ रोजी कै. डॉ. वि. ग. तथा बापूसाहेब आठल्ये यांच्या पुढाकाराने माध्यमिक विद्यालय सुरु झाले. शिपोशीचे शशिशेखर काशीनाथ आठल्ये गुरुजी हे आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे विविध समाजाच्या पाठबळावर विधानसभेवर सतत निवडून येत राहिले. आपल्या साधेपणासाठी विशेष लोकप्रिय असलेल्या गुरुजींनी ‘सामाजिक कार्य कसे करावे?’ याचा आदर्श आपल्या जीवनात निर्माण केला. गावात १९५६ पासून ग्रामपंचायत अस्तित्वात असून पहिले सरपंच कै. रघुनाथराव बाईंग होते. गावातील मोहोळ पऱ्यावरील धरणामुळे लोकं उन्हाळ्यात भाजीपाला व इतर पिके घेत असतात. विशेष नोंदींची सुरुवात याच मोहळच्या पऱ्यापासून करूयात.

 

शिपोशी ओढ्याची दिशा बदलण्याची कल्पकता

जमीन सुधारण्यासाठी, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सरकारकडून साहाय्य मिळत असे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तर्फे देवळे मौजे शिपोशी या गावी मोहळचा पऱ्या (ओढा) व दाभोळच्या सीमेवरील ओढा असे दोन ओढे होते. विशाळगडचे पोतदार मल्हार रंगनाथ यांनी हे दोन ओडे मोडून नवे भातशेत करण्यासारखे आहे असे देवळे येथील ठाणेदारांना कळविले होते. मल्हार रंगनाथ मशागत करणारे असले तरी हे काम फार कष्टाचे होते. त्या जागी बराच खर्चही करावा लागणार होता. भातशेत तयार होऊन लागवडीस देण्यास बरीच वर्षे लागण्याची शक्यता होती. मल्हार रंगनाथ आणि देवळे येथील सरकारी कामगार यांनी ती जागा पाहून, तेथील मल्हार, गुरव यांना बोलावून सर्वासमक्ष नदीस मिळालेला मोहोळाचा ओढा मोडून उत्तरेच्या बाजूने डोंगरात चर काढून नदीस मिळविण्यासाठी तो १४०० हात लांबीचा खणावा अशी योजना होती. त्यासाठी त्यांना देवळे तर्फ्याचे ठाणेदार यांनी मल्हार रंगनाथ याला १६८२ साली कौलनामा सादर केला होता. ओढ्याची दिशा बदलण्याची आणि त्याखालील जमीन भातशेतीखाली आणण्याची योजना, त्याकाळचा विचार करता, अत्यंत कौतुकास्पद ठरावी अशी होती. या कल्पनेला संभाजीराजांच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. मल्हार रंगनाथ आणि काशी रंगनाथ यांनी डोंगरातून जो चर खणला त्याची लांबी १८०० हात, रुंदी १८ ते २० हात आणि खोली ५ ते ७ हात होती. त्यांना या कामासाठी ८ हजार रुपये खर्च आला होता. श्रम, साहस व कष्ट मशागत करून केलेले हे बांधकाम फुटले. पुन्हा खर्च आणि श्रम करण्यासाठी हुशारी यावी म्हणून शिपोशीपैकी नदीच्या पूर्वेकडील सर्व भाग कोंड म्हणून स्वतंत्र करून द्यावा यासाठी काशी रंगनाथ याने १६९२ साली विशाळगडचे अमात्य रामचंद्र निळकंठ यांना विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांना सनद देण्यात आल्ली होती. खोदून तयार केलेला चर कित्येक ठिकाणी १० ते २० हात रुंद असून ७-८ हात उंचीचा आणि दोनअडीचशे हात लांबीचा होता. या ठिकाणाला 'चराची पट्टी' म्हणत. दाभोळ नावाच्या सीमेच्या ओहोळासही बांध घालून बाजूने चर खणून तोही नदीपर्यंत नेलेला होता. त्या ठिकाणी शेत तयार केलेले होते. मोहोळाच्या ओढ्यातील बांध फुटल्यामुळे ते काम अपुरे राहिले होते. चर खणण्याचे आणि बांध घालण्याचे काम १६८२ साली सुरू होऊन पुढे ८-९ वर्षे चालू होते.

 

जवळच्या गावात चकमक

२ मार्च १७०२ रोजी रात्री शिपोशी जवळच्या (कोतरी-कातर) गावावर मोगल बादशाही अधिकाऱ्यांनी हल्ला चढवला होता. मराठे आणि मोगल बादशाही अधिकाऱ्यांच्यात यांच्यात चकमक झाली होती. मोगल बादशाही अधिकाऱ्यांनी गाव ताब्यात घेतले होते. मराठ्यांनी खेळणा (विशाळगड) किल्ल्याचा आसरा घेतला होता.

 

रियासतकारांच्या प्राथमिक शिक्षणाचे गाव

रियासतकार डॉ. गो. स. सरदेसाई यांचा जन्म गोविळ गावी १७ मे १८६५ला (मृत्यू - २९ नोव्हेंबर १९५९, कामशेत) झाला. गोविळच्या परिसरात सृष्टीनिरीक्षण आणि काबाडकष्ट करण्यात त्यांचे बालपण गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोविळ जवळ असलेल्या वेरवली एक वर्षे (वय वर्षे ७) आणि उर्वरित वर्षे शिपोशी या त्यांच्या मामांच्या गावी झाले होते. त्यांचे पुढील शिक्षण रत्नागिरी (१८७९), पुणे आणि मुंबई येथे झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून १८८८ साली बी.ए. झाल्यावर पुढे काय करावे? अशा विचारात असताना, बडोदा संस्थानात नायब दिवाण असलेल्या शिपोशीतील बापूसाहेब आठल्ये यांनी त्यांना तिकडे नेले. बडोद्याचे तरुण महाराज सयाजीराव यांचे वाचक म्हणून १ जानेवारी १८८९ रोजी त्यांची नेमणूक झाली. पुढे त्यांना राजपुत्र विद्यालयात शिक्षक म्हणून बढती मिळाली. विद्यालयाचे मुख्य कालानुरूप युरोपीय होते. पुढील जीवनात सयाजीराजांच्या सोबत अनेकदा ते विलायतेस गेले. सरदेसाई हे निर्लोभी असल्याने जे सहजरित्या मिळेल त्यावर संतुष्ट राहून जणू इतिहासाला आपला पुत्र मानून त्यांनी आपले काम चोख बजावले. त्यांच्या या जगण्याचा राष्ट्राला मोठा उपयोग झाला. वि. का. राजवाडे यांनी सरदेसाई यांना शतकातील शंभर नामांकितमध्ये ’इतिहासमार्तंड’ म्हणून संबोधले होते. इतिहास संशोधकांच्या तीन पिढ्यांसोबत त्यांनी काम केले.

 

हिंदू महासभेला शिपोशीत पाठींबा

विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करण्याचा सरकारी आदेश असताना कोकणात त्याचे पालन होत नव्हते. तेव्हा रत्नागिरीत स्थानबद्ध असलेल्या स्वातंत्र्यवीर सावकारांनी हिंदू महासभेच्या माध्यमातून १९२५ मध्ये हा प्रश्न हातात घेतला. जनजागृतीसाठी त्यांनी कोकणात सर्वत्र दौरे केले, व्याख्याने दिली. याचे पडसाद कोकणातील साठ-सत्तर गावात उमटले होते ज्यात शिपोशी एक होते.

 

१९२९ची शिपोशी सहकार परिषद

तत्कालीन सावंतवाडी प्रांतातील कुडाळ येथील बाकरे कुटुंबातील वैद्यकीय व्यावसायिक (आयुर्वेद आणि होमिओपॅथी) वासुदेव महाशेवर बाकरे यांनी १९०८मध्ये बेळगाव येथे वैद्यकीय व्यवसाय सुरु केला होता. ते बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १३ वर्षे संचालक, सहकार परिषदेचे सदस्य, १९३२-३३मध्ये मुंबई प्रांतीय सहकारी संस्थेचे सचिव होते. विशेष म्हणजे १९२९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शिपोशी येथे झालेल्या सहकार परिषदेचे ते अध्यक्ष होते.

 


आठल्ये दप्तर

शिपोशी गावातील श्रीकृष्ण विठ्ठल आठल्ये हे मराठा इतिहासाचे एक सुप्रसिद्ध समीक्षात्मक अभ्यासक होते. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित मूळ दस्तऐवज संकलित, कॉपी आणि प्रेससाठी तयार केले होते. त्यांच्या आठल्ये दफ्तरातील हा संग्रह १९४५मध्ये रघुवीर लायब्ररीसाठी विकत घेण्यात आला.  

 


हिंदुस्थानातील पहिल्या बॉम्बचे जनक शिपोशीचे!

क्रांतीकारक गणेश गोपाळ उर्फ अण्णा आठल्ये यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८७९ रोजी शिपोशी येथे झाला. पोस्टमास्तर वडिलांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे शिपोशी, अलिबाग आणि दापोली येथे त्यांचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले; पण हलाखीच्या परिस्थितीमुळे शिकणे कठीण झाले. मुंबईत बदामवाडीत रहात असतांना त्यांचा संपर्क आर्यसंघ या बंगाली क्रांतीकारकांच्या संघटनेशी झाला. संघटनेतील शामसुंदर चक्रवर्ती हे अण्णांचे खास मित्र होते. त्यावेळी गुप्तपणे काम करणार्‍या क्रांतीकारकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा असे. त्यामुळे गणेश गोपाळ हे कधी अण्णा कधी डॉ. आठल्ये, अमेरिकन मेस्मोरिस्ट, ओ. अँटले, ए. गणपतराव, तर कधी गणेशपंत आठल्ये अशा अनेक टोपणनावांनी वावरत होते. गोव्यात झालेल्या राणे बंडाच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलीस त्यांची चौकशी करत असल्याने आठल्ये यांना मुंबईत रहाणे कठीण झाले होते. त्या वेळी बेंजामिन वॉकर या पारशी गृहस्थाने त्यांना आर्थिक साहाय्य केले. त्यामुळे आठल्ये टोपण नावाने जहाजावरून वॉकर यांच्यासमवेत अमेरिकेला निघून गेले. त्या वेळी त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी झालेली भेट अखेरची ठरली. त्यांचा मुलगा म्हणजेच (कै.) डॉ. विनायक गणेश आठल्ये केवळ दीड वर्षांचे होते. गणेश आठल्ये यांनी अमेरिका, इंग्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स या देशांचा छुप्या पद्धतीने दौरा करून बॉम्ब सिद्ध करण्याची विद्या आत्मसात केली होती. त्यानंतर जर्मनीहून मालवाहू जहाजाने ते कोलकत्याला आले. या दरम्यान त्यांना क्षयरोग झाला. अज्ञातवासात असतांनाच ३२ व्या वर्षी २ सप्टेंबर १९११ ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार तेथील तत्कालीन महाराष्ट्र मंडळाचे सदस्य आणि नागपूरचे डॉ. केशव बळीराम हेडगेवार, पुण्याचे डॉ. पळसुले यांच्या अर्थात महाराष्ट्रीय व्यक्तीच्या हस्ते अज्ञातपणे त्यांचा अंत्यविधी झाला. शस्त्रास्त्रांच्या जहाल मार्गाने अन्यायी ब्रिटीश राजवटीला हादरवून सोडणार्‍या या थोर क्रांतीकारकाचे संपूर्ण जीवन आणि कार्यपद्धत गुप्त राहिली आहे. मुंबईतील भडकमकर मार्गावरील चौकाला क्रांतीवीर जी. अण्णा यांचे नाव दिलेले आहे. “वन्दे मातरम् या जहाल नियतकालिकाचे संपादक शामसुंदर चक्रवर्ती यांनी अण्णांना बंगाली लिपीतील वन्दे मातरम् ही अक्षरे कोरलेली चंदनाची पाटी भेट दिली होती. गणेश गोपाळ हे हिंदुस्थानातील पहिल्या बॉम्बचे जनक होते. सेनापती बापट यांच्यापूर्वी त्यांनी बॉम्ब सिद्ध करण्याची विद्या शिकून घेतली होती. ही विद्या त्यांनी बंगालमधील तत्कालीन जहाल क्रांतीकारकांना शिकवली. खुदीराम बोस यांनी उडवलेला हिंदुस्थानातील पहिला बॉम्ब त्यांनीच सिद्ध केला होता.

 

कवी-साहित्यिक कृष्णाजी नारायण आठल्ये

कोचीन (केरळ) मधील वास्तव्यात ‘केरळकोकिळ’ नावाचे मासिक सुरू (१८८६) करून ते सुमारे २५ वर्षे चालविणारे कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे मूळगाव शिपोशी. वडील दशग्रंथी वैदिक असल्याने त्यांनाही तेच शिक्षण मिळाले. कराड, पुणे ट्रेनिंग महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे तीन वर्षे शिक्षण घेतले होते. मलबारमधील कोचीन येथे आठल्यांचे एक बंधू नोकरी करीत होते. ते आजारी पडल्याने त्यांना भेटायला म्हणून कृष्णाजी कोचीनला आले आणि तेथेच राहिले. कोचीन मधील वास्तव्यात त्यांनी ‘केरळकोकिळ’ नावाचे मासिक चालविले. त्यांनी ‘गीतापद्यमुक्ताहार’ (१८८४), ‘आत्मरहस्य’ (१९१९), ‘The English Teacher’ भाग १ व २’ (१९२३), ‘कोकिळाचे बोल’ - निवडक लेख (१९२६), ‘रामकृष्ण परमहंस’ (१९२९), ‘माझे गुरुस्थान’, ‘सार्थ दासबोध’, ‘समर्थांचे सामर्थ्य’, ‘सार्थ ज्ञानेश्वरी’, ‘सुलभ वेदान्त’, ‘आर्याबद्ध गीता’, ‘वसंत पूजा’, ‘फाकडे तलवार बहाद्दर’, ‘नरदेहाची रचना’, ‘विवेकानंद जीवन’, ‘ज्ञानेश्वरांचे गौडबंगाल’, ‘पंचतंत्रामृत’ हे ग्रंथ ‘सुश्लोक लाघव’, ‘सासरची पाठवणी’, ‘माहेरचे मूळ’, ‘शृंगार तिलकादर्श’, ‘मुलीचा समाचार’ आदी काव्यसंग्रह तसेच ‘मुले थोर कशी करावीत?’, नजरबंद शिक्षक’, ‘ग्रहदशेचा फटका’, ‘मथुरा गणेश सौभाग्य’ आणि अनुवादित आदी चाळीसेक ग्रंथ लिहिले. शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘महाराष्ट्र भाषा चित्रमयूर’ ही पदवी दिली होती. त्यांची ‘प्रमाण’ नावाची कविता विशेष गाजलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही कविता सर्वाची तोंडपाठ होती. मराठी बालभारती १९९८च्या चौथीच्या पुस्तकात अभ्यासासाठी असलेली ही कविता खालीलप्रमाणे...

प्रमाण

अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।

अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।

सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।

सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।

न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।

बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।

फुका सांग देवावरी का रुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।

अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

अती आळशी वाचुनी प्रेतरूप, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।

सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।

धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।

खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।

विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।

हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।

लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।

ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।

रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।

न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।

अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।

कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।

असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।

सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।

कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।



शिपोशीतील आठल्ये यांनी काढले                          रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले मराठी वर्तमानपत्र

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले मराठी वर्तमानपत्र ‘जगन्मित्र’ सुरु करणारे संपादक जनार्दन हरि आठल्ये यांचेही मूळगाव शिपोशी होते. जनार्दन हरि आठल्ये यांचा जन्म १८२६ ला झाल्याची नोंद मिळते. जनार्दन हरी आठल्ये (1826-1900) हे रावसाहेब विश्‍वनाथ नारायण मंडलिक हे प्रसिद्ध वकील आणि प्राच्यविद्या अभ्यासक यांचे लहानपणापासूनचे स्नेही आणि रत्नागिरीतील शाळासोबती होते. तसेच ते संस्कृतचे अभ्यासक बापूसाहेब आठल्ये यांच्याशी संबंधित होते. प्राथमिक आणि इंग्रजी असे सुरुवातीचे शिक्षण खाजगीत, घरी मिळवणारे ते एक स्वयंनिर्मित व्यक्ती होते. त्या काळात छापून आलेली इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याची त्यांना आवड निर्माण झाली होती. यातून त्यांना भारताबाहेरील देशांच्या घडामोडींमध्ये रस निर्माण झाला. रत्नागिरीच्या सरकारी हायस्कुलात शिकून ते मॅट्रिक झाले त्यानंतर त्याच हायस्कुलात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे जाणकार असलेल्या जनुभांऊचा धर्मशास्त्र आणि ज्योतिषाचा विशेष अभ्यास होता.

हस्तलिखितापेक्षा मुद्रित ग्रंथाना महत्व येणार आहे हे जाणून या ज्ञात्याने १८४८ ला रत्नागिरीत ‘जगमित्र’ छापखाना सुरू केला. जून १८५४ ते १८९० पर्यंत सुमारे ३७ वर्षे त्यांनी “जगन्मित्र” साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या शिळाप्रेसवर चालविले. पुणे-मुंबर्इ सोडून अन्यत्र कुठे वृत्तपत्राला प्रारंभ झाला नव्हता तेव्हा या दोन शहरानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पहिले साप्ताहिक सुरू करण्याचा मान ‘जगन्मित्र’ लाच आहे. जनार्दन हरी यांचा स्वतःचा उत्तम असा ग्रंथसंग्रह होता. स्वतःचा मुद्रण व्यवसाय असल्यामुळेच त्यांनी साप्ताहिकाचा बुडिताचा धंदा सुरू केला. साप्ताहिक विकत घेऊन वाचायची मानसिकता समाजात आलेली नव्हती. ’जगन्मित्र ‘साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी ५ रुपये होती आणि वर्गणीदारांची संख्या होती अवघी १७. विशेष म्हणजे या १७ वर्गणीदारात मराठीच्या क्रमिक पुस्तकांचे लेखक आणि कोशकार मेजर थॉमस कॅडी, कराची येधील फ्रियर हे पुढे मुंबर्इ प्रांताचे गर्व्हनर झाले होते. मिस्टर एलिस अशा अभ्यासू व्यक्ती होत्या. भारतात आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी ख्रिश्‍चन धर्माचा प्रचार करताना हिंदू धर्मावर टीका करायला प्रारंभ केला असताना त्या टीकेला अभ्यासपूर्ण भाषेत लेख लिहून उत्तरे देण्याचे काम जनुभाऊ आठल्ये यांनी ‘जगन्मित्र’ मधून केले. २० ऑगस्ट १८६६ च्या अंकात, हिंदुस्तानात पडलेल्या दुष्काळाच्या एका बातमीत, ‘चितापूर येथे भिकाऱ्यास तांदुळ वाटिले तेव्हा त्या गरिबांचे गर्दीत ३२ माणसे ठार मेली व १५ स दुखापत झाली आहे.’ अशी नोंद आहे. ’जगन्मित्र‘चा त्या वेळी ’रत्नागिरीचे गॅझेट‘ असा उल्लेख व्हायचा. बिनचूक माहिती प्रसिद्ध होत असे. जगन्मित्र छापखान्यात आठल्ये यांनी ‘धर्मसिंधू’, भावार्थ दीपिका’, ‘बृहत्संहिता’ ग्रंथ प्रकाशित केले.  १८७५साली  आठल्ये आणि विनायक शास्त्री आगाशे यांनी शब्दसिद्धीनिबंध नावाचा कोश प्रसिद्ध केला होता. संस्कृत श्लोक आणि त्याचा मराठी अनुवाद असलेला एक मूलभूत दुर्मिळ ग्रंथ वराहमिहिरकृत श्री बृहतसंहिता चे  भाषांतर करून जनार्दन हरि आठल्ये यांनी ११ ऑक्टोबर १८७४ रोजी प्रसिद्ध केला होता.

'वराहमिहिर' हा चौथ्या-पाचव्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता. त्या काळात, भारतीय खगोलशास्त्र व गणित, युरोपपेक्षा खूपच प्रगत होते. वराहमिहिर, हा विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता, अशी आख्यायिका आहे. या पुस्तकात १०७ अध्याय असून त्यातील भविष्य हे, व्यक्तिगत भविष्य नसून सार्वजनिक भविष्य आहे. भूकंपासारखी नैसर्गिक संकटांची कारणे आणि भविष्ये यात आहेत. अशा प्रकारचा हा ग्रंथ दीड हजार वर्षापूर्वी लिहिला गेला होता, ही आश्वर्याचीच गोष्ट आहे. १८७४ मध्ये आठल्ये यांनी रत्नागिरी सारख्या ठिकाणी, या ग्रंथाचे मुळाबरहुकूम भाषांतर सिद्ध केले होते. विद्योद्भव लाभ (१८४९) हा शिक्षणाच्या फायद्यांवरील निबंध, शब्दसिद्धी निबंध (१८७१) हा एक दार्शनिक निबंध, संस्कृतमधून मराठी शब्दांच्या व्युत्पत्तीबद्दल मुर्खासतक (१८७७) हा मूर्खाविषयीच्या २५ सुप्रसिद्ध संस्कृत श्लोकांचा श्लोक स्वरूपात केलेला अनुवाद, काली उद्भव (1878) हे येणार्‍या अंधकारमय युगाबद्दल संस्कृत कृतीचे मराठी रूपांतर, सद्यस्थिती निबंध, विद्यामाला, ज्योतिष, बालवैद्य, पाकशास्त्र ही त्यांची कमी ज्ञात पुस्तके आहेत. या नोंदी History of modern Marathi literature 1800-1938 मराठी वान्द्मय कोश या govind chimanaji bhate निवृत्त प्राचार्य वेलिंग्टन कोलेज सांगली यांनी १७ फेब्रुवारी १९३९ रोजी लिहून प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आहेत. त्यांनी शिपोशी येथे मराठी शाळा सुरू केली. लोकांच्या उदार सहकार्याने शाळेसाठी इमारत बांधली होती. भारतीय ग्रंथमुद्रण – बापूराव नाईक (कॅ. गो. गं. लिमये ट्रस्ट प्रकाशन) १० मे १९८० नुसार जगन्मित्र छापखान्यात १८५४ पासून १८६९ पर्यंत २५ पुस्तके छापण्यात आली होती. गुण्ये घराण्याचा इतिहास खंड दुसरा नुसार, शके १७९०, सन १८६८ मध्ये जनार्दन हरि आठल्ये (इनामदार शिपोशी) यांनी परिश्रमपूर्वक कऱ्हाड्यांची शुद्ध गोत्रावळी तयार केली होती.

१८०० ते १८६९ दरम्यान महाराष्ट्रात बेळगाव-धारवाड-कराची सह १०१ छापखाने होते. त्यात रत्नागिरीतील हा एकमेव होता. १८७० ते १८८५ - १८ पुस्तके छापण्यात आली. त्यांचे पहिले पुस्तक प्रातस्मरणादि पद्य (प्रती २५) सखाराम मोरेश्वर जोशी यांनी छापून घेतले  होते. विद्यामाला हे अन्वर्थक नाव घेऊन त्यांनी १८७८ मध्ये महाराष्ट्रीय ज्ञानकोश मासिक स्वरुपात छापायला सुरुवात केली होती. पण २०० पानांच्यावर त्याची प्रगती झाली नाही. जनुभाऊ वृद्धापकाळापर्यंत जगले आणि 1900 मध्ये मुंबईत त्यांचे निधन झाले.

 

संदर्भ ::

१.       WHO’S WHO INDIA (EDITED AND COMPILED THOS. PETERS) १९३६

२.   HAND LIST OF IMPORTANT HISTORICAL MANUSCRIPTS IN THE RAGHUBIR LIBRARY १९४९ - RAGHUBIR LIBRARY SITAMAU (MALWA)

३.      डिसेंबर १९५१ - मासिक नवभारत - प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर यांचा लेख

४.      शिवपुत्र संभाजी - डॉ. सौ. कमल गोखले (ज्ञान-विज्ञान विकास मंडळ १९७१)

५.     कै. वै. वि. आठल्ये यांचे १९८१ सालचे माघी उत्सवातील भाषण

६.     जानेवारी १९८३ :: मोगल दरबाराची पत्रे (खंड दुसरा) संपादक - सेतुमाधव पगडी 

७.     www.harihareshwardevasthanshiposhi.in


(धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखन’ या विषयावरील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.)

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...