सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

चला ! प्रत्येक हृदयात ‘प्रेम’ज्योत पेटवू या !

प्रेम ही खरं तर दोन सजीवांमधील ‘अव्यक्त’ भावना आहे, ती तिसऱ्याजवळ व्यक्त झाली की बिनसायला सुरुवात होते, असं आमचं ठाम मत आहे. ‘प्रेमाची व्याख्या, ते कसं होतं ?’ या प्रश्नाचे उत्तर कोणाजवळही नसावे, कारण ते काही पायथागोरसचा सिद्धांत किंवा न्यूटनचा नियम नव्हे ! परंतु 'प्रेम' ही या पृथ्वीवरील सर्वात सुंदर अनुभूती आहे, हे मात्र नक्की ! अभ्यासकांच्या दृष्टीकोनातून त्याच्या विविध संकल्पना आहेत. 'प्रेमाची  सायकॉलॉजी' हा तर स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे. आमच्या लग्नापूर्वी आमचे अनेक मित्र-मैत्रिणी धडाधड प्रेमात पडलेले आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेत, पुढे त्यांची लग्नेही झाली, कालांतराने आम्हीही विवाहबद्ध झालो. कमी-अधिक सुखात सर्वच जण संसारही करताहेत ! पण तरीही नंतर जीवनात अचानक कधी कधी एकदम चमकल्यासारखं व्हायचं, जुन्या मित्रांना भेटताना, संवाद साधताना, त्यांना समजून घेताना आणि हे सारं आपल्याशी ताडून पाहाताना 'कुठे तरी काही तरी चुकतंय?’ असं जाणवायचं ! यातूनच पुढे एकाच वेळी अनेक हृदयात ‘प्रेमज्योत’ जागविण्याचा विचार मनात आला जो आमच्या वर्तमान जीवनपद्धतीचा मूलाधार बनून राहिला आहे. 

तेव्हापासून एकाच वेळी जीवनातील सजीव-निर्जीव अशा अनेकांवर मनस्वी प्रेम करण्याची आमची सवय अधिक सक्रीय झाली. कोणतीही गोष्ट एकदा मुरली की ती अधिकाधिक गोड होत जाते, ‘प्रेम’ ही यापैकीच एक परंतु सर्वांत उच्च ! विश्वास, जिव्हाळा आणि प्रामाणिकपणावर प्रेमाचा डोलारा उभा असतो. एंडॉर्फिन नावाचे शरीरातील संप्रेरक प्रेम भावनेची जाणीव करून देते. अशा व्यक्तीला सारंच जग छान वाटू लागतं. कसलाही राग येत नाही, पूर्वीच्या न आवडणाऱ्या गोष्टी अचानक आवडू लागतात. स्वप्न पडायला लागतात. अशक्य गोष्टी शक्य वाटू लागतात, त्यामुळे प्रेमात पडलेली व्यक्ती चारचौघात सहज ओळखता येते. प्रेमाला स्वतःची परिभाषा नसली तरी त्याच्या नशेमुळे अख्खे जगचं कधी गुलाबी, कधी मोरपंखी दिसतं. या पार्श्वभूमीवर विचार करता, आम्हीही कॉलेजयीन जीवनातील काही वर्षे घराबाहेर काढल्याने मुला-मुलींचा एकत्र ग्रुप बनणे स्वाभाविकच होते. अनेकदा एकत्र वावरल्याने एकमेकांचे स्वभावही कळत गेले, पण वावगं काहीही घडलं नाही. उलट पुढील जीवनात कार्यरत होताना, कुठेही, केव्हाही, कोणीही आपल्यासोबत असताना सतत आनंदाचे वाटप करीत जगण्याचे व्रत अंगीकारण्याचीच उर्जा या दरम्यान मिळाली.

शालेय पातळीवर निरीक्षण करताना किशोरवयीन मुला-मुलींमध्ये प्रेम व आकर्षणाची समस्या जाणवते. इंटरनेट युगामुळे चौथी-पाचवीतील मुले प्रेमाला खूप महत्त्व देताना दिसतात, व्हॅलेंटाईन डे दिवशी एकमेकांना विश करतात, कारण त्यांना हेच खरं प्रेम आहे असं वाटत राहत. यातून कधी-कधी वर्तनाच्या समस्या निर्माण होतात, या समस्या कौटुंबिक स्तरावर सोडवल्या जायला हव्यात. आजकालच्या तारुण्याच्या प्रेम समस्या तर भयानकच आहेत. एखाद्या व्यक्तीबरोबर, एकमेकांनी लग्नापूर्वीच सगळं शेअर केलेलं असतं. आणि हे सगळं म्हणजे अगदी सग्गळं असतं ! आपले विचार, मतं, भावना, आवडीनिवडी, शरीर, बेड, चित्रविचित्र फँटसीज् इत्यादी इत्यादी ! एके दिवशी, विदेशी स्टाईल 'आय नीड ब्रेक' म्हणत या साऱ्यापासून अचानक दूर जायची दुर्दैवी वेळ आली की काही कळेनासंच होत. मुठीत घट्ट पकडून ठेवलेली एखादी गोष्ट केवळ गुदगुल्या केल्याने हातातून झटकन सुटून जावी तसं घडतं. असल्या या तरुणाईला, एकमेकांत अगदी रुतून बसलेल्या 'त्या' दोघांची विमानतळावरील ताटातूट पाहताना, तिसऱ्याला जाणवणाऱ्या त्यांच्या प्रेमाविषयी काय सांगणार ?

आमचं प्रारंभीच्या जगण्याच सारं वय खऱ्या अर्थाने चाळटाईप कॉलनीत गेलं. महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणी निमित्ताने निर्माण झालेल्या शाळेत, वडिलांना नोकरी मिळाली आणि सहा महिने वयाच्या आमचा प्रवास मूळ गाव केळशी (ता. दापोली) तून चिपळूण तालुक्यातील अलोरेत झाला, ही दोन्ही गावे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यायाने कोकणात आहेत. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चाळटाईप कॉलनीत आम्ही वयाची चौवीस वर्षे काढली, वडील निवृत्त झाले म्हणून ठीक ! नाहीतर अजून काही वर्षे हा मुक्काम नक्कीच वाढला असता. सांगायचा मुद्दा असा, तेथील भाड्याचे चाळीतील ते घर सोडायच्या आदल्या दिवशी रात्री, भिंतीला चिकटून झोपलेले आम्ही अंगावर पांघरून घेवून खूप रडलो होतो, त्या छोट्याश्या ५०० चौ. फूट घरात आमचं अख्ख बालपण सरल होत. आज तो आनंद आम्ही स्वत: विकत घेतलेल्या शहरातील १५०० चौ. फूट घरात आम्ही शोधत राहातो, पण तो सापडत नाही. ते दिवसच वेगेळे होते, असं कायम वाटत. त्या वास्तूवर, भिंतींवर, दरवाजा, खिडक्यांवर, इतकच काय तर जमिनीवरच्या लाद्यांवरही आमचं प्रेम राहिलं, कोणी कोणत्या लादीवर जेवायला बसायचं हेही ठरलेलं असायचं. आज वाटत आम्ही तेव्हा जीवन जगत होतो, आज नुसतेच धावतोय ! कदाचित आमच्या सध्याच्या चिपळूण शहरातील घराबाबत आणि वातावरणाबाबत, चिरंजीवाच्या भावना अशाच असू शकतील, कारण तो त्याचं बालपण इथे जगतोय. कदाचित आणखी काही वर्षांनंतर आम्हीही आमच्या वर्तमान वातावरणाच्या प्रेमात पडू ! प्रेम ही भावनाच अशा प्रकारची आहे. आपण जितकं देतो त्याच्या तितक्या पटीत आपल्याला कायम मिळतच राहाते, मग ती व्यक्ती असो वा वस्तू, सजीव असो वा निर्जीव, आपण जीव लावला की बस्स, झालं !     

प्रेमात चांदण्यांचा पाऊसही पडतो, जो मानवी आयुष्यावर प्रेम करतो त्याला कायम प्रेम करणारी माणसंच  भेटतात. आपल्या भावनांना समजून घेणाऱ्या व्यक्‍तीवर आपण प्रेम करतो, आणि हे अगदी बरोबर आहे. मनातील भावना आपल्या माणसांना सांगायच्या नाहीत तर सांगायच्या कुणाला ? यातून काहीही मिळत नाही, मिळते ते फक्त समाधान ! प्रेम इथे जन्मते, ती दैवी देणगी आहे. ही भावना अमूर्त असते, आपण त्याला दृश्य स्वरूप देण्याची घाई केली की मग गडबड होण्याचा धोका संभवतो. प्रेम ही एक प्रत्येकाची वैयक्तिक भावना आहे. ते दोघा मनांनी एकमेकांशी केलेले अव्यक्त चिंतन आहे. प्रणयाने ओथंबलेला एखादा नयन कटाक्ष अनेक शब्दात पकडता न येणारे भाव व्यक्त करतो. सौंदर्यापेक्षा सुंदर, स्वप्नाहुनी रम्य, फुलाहुनी कोमल या शब्दांचा अर्थ समजण्यासाठी प्रेमातील 'उत्कटता' समजायला हवी. प्रेम हे नित्य नवे, ताजे आणि जीवंत असते, त्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ नसतो. ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हे मानसिक एकरूपता दर्शविणारे ‘वचनप्रेम’ आम्हाला सर्वाधिक आवडणारे सर्वात उत्कट प्रेम आहे. प्रभू श्रीराम, दानशूर कर्ण, महापिता भीष्म आदि अनेक उदाहरणे आहेत. प्रेम ही एक दिव्य शक्ती आहे. परंतु भौतिक प्रेम दिव्य असूच शकत नाही, ते पुष्कळदा आंधळे असते, मोहापोटी निर्माण होऊन सारासार विचारशक्ती लोप पावून ते केलेले असते. मनुष्य जन्मापासून मृत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बालपण, तारुण्य, वृध्दत्व या जीवनाच्या तीनही अनिवार्य अवस्था जगताना ‘प्रेम’ या भावनेला खूपच खास आणि मोलाचं स्थान आहे. महान तपस्व्यांनाही हा मनोजय साधता येत नाही तेथे सामान्यांची काय कथा ! वरवर पाहाता, अनेक माणसं नैतिकतेचा बुरखा पांघरून ‘प्रेम-बिम झूठ असतं’ असं काहीतरी म्हणत असतीलही ! पण एकतर्फी का असेना, हे गुलाबी वादळ प्रत्येकाच्या जीवनात घोंगावतचं ! फरक एवढाच की प्रत्येकाच्या जीवनातील त्याचा वेग, संख्या, फलनिष्पत्ती वेगवेगळी असते. प्रेमाच्या प्रवासात कोणत्याही कारणाने सफल न होऊ शकलेल्या हृदयांचा, आयुष्य संपवून घेण्याचा ‘रोमिओ-ज्यूलिएट’ प्रकार मात्र, ‘अरेरे ! यांना प्रेमाचा खरा अर्थ कळलाच नाही !’ असं ओरडून सांगत राहतो.

आमच्या कोकणचे गणेशोत्सवावर भलतंच प्रेम ! सर्वत्र सार्वजनिक आणि घरपट स्वरूप येण्यापूर्वीपासून कोकणी माणसाच्या घरात ‘गणपती’ येतो आहे. ‘बाप्पा’ घरी येऊन गेला की पुन्हा नव्या दमाने आम्ही आमचं प्रापंचिक रहाटगाडग हाकायला मोकळे होतो. त्याकरिता लागणारी आवश्यक ऊर्जा या उत्सवातून मिळते, अशी पारंपारिक धारणा, आम्हाला पटते. संवेदनशील, भावनिक मानवी मनाला जगण्यासाठी असं काहीतरी लागतंच ! आम्हा कोकणवासियांना ते बाप्पात मिळत. म्हणूनच की काय आमच्या अनेक संकल्पनात ‘बाप्पा’ असतोच ! सन २००९ साली स्वतःच घर आणि लग्न या दोन जीवनातील महत्वाच्या गोष्टी एका दमात पूर्ण केल्यानंतर आम्हाला चारचाकी गाडी खुणावत होती. इतक्या लगेच शक्यही नाही, पण हवीही आहे, म्हणून आम्ही मध्यम मार्ग स्वीकारत सन २०११ साली, बाप्पाच्या आगमनाच्या प्रारंभी आम्ही एक जुनी टाटा इंडिका कार विकत घेतली. तेव्हा आमचा चिरंजीव एक वर्षांचा होता, गावातील दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आटोपून आम्ही आमच्या सासरी, सपत्नीक पाच दिवसांच्या गणपतीच्या दर्शनाला, केळशी ते पोलादपूर (जि. रायगड) प्रवास करीत होतो. गाडी जुनी असली तरी आमच्यासाठी ‘सारच नवीन’ होत. नेमकं याचवेळी नियती तिकडे आम्हाला एक नवा जीवनानुभव देण्याची तयारी करत होती. सप्टेंबरचा महिना होता, पाऊस मुसळधार कोसळत होता. कोकणातल्या माणसाला पाऊसाची काय चिंता ! ‘तो नियमाने येतो आपले काम करतो, आपण आपले काम करीत रहावे’ अशी आमची धारणा असल्याने आम्ही बिनधास्त होतो, त्यात पाऊस आमचा लाडका, पाऊस म्हणूनही आणि ऋतू म्हणूनही ! नव्या जोशात वेगाने गाडी मार्गक्रमण करीत होती. लाडक्या लेकाला सौ.ने कुशीत घेतले होते. काहीच न कळणाऱ्या त्या जीवाला ती खिडकीतून मामाच्या गावाचा रस्ता दाखवीत होती. त्या लहानश्या जीवाकडून तिला प्रतिसाद मिळाला की आम्हालाच काय पण त्या गाडीलाही आनंद होत असावा. पाऊसाने जसा आपला वेग वाढविला तसा आमचा गाडीचा वेग मंदावला. रस्त्यात कशेडीच्या घाटात दरड कोसळल्याने सारी वाहने तुळशी-विन्हेरे मार्गे वळविण्यात आल्याचे कळले, आणि काळजाचा ठोकाच चुकला. हा रस्ता आम्हाला ड्रायव्हिंगसाठी नवीन होता, त्यात या मुसळधार पाऊसामुळे तोही खचलेला, खड्डे पडलेलाच असणार होता. अशातून एका वर्षाच्या लेकराला घेऊन सासरी पोहोचण्याचे दिव्य नियतीने आमच्या समोर आणून ठेवले होते. काही वेळातच, सौ.ने आमची अवस्था ओळखली. तिने सहज मोकळे सोडलेल्या चिरंजीवाला आता आपल्या कुशीत घट्ट पकडून धरले, तिची ती स्थिती पाहून आमची अवस्था आणखीनच बिकट बनली. नव्याने गाडी शिकलेल्या आमची आज एका अवघड वळणावर, नियती परीक्षा घेत होती. रस्त्यात काळजाचा ठोका चुकविणारे प्रसंग दोन-तीनदा आले, पण सुदैवाने निभावले. आम्हा उभयतांचीच काय, त्या बारक्या जीवासोबतचीही मैत्री गाडीने निभावली होती, आम्ही सुखरूप सासरी पोहोचलो. पुढे या जुन्या गाडीवर आमचे सर्वांचेच खूप प्रेम जडले. सन २०१३ साली फेब्रुवारी महिन्यात एकटेच गाडीने, कामानिमित्त चिपळूणहून कराडला जाताना आम्हाला  अपघात झाला. गाडीच्या डाव्या बाजूला भरपूर मार बसला, गाडीची अलाईन्मेंट बिघडली, आम्ही मात्र थोडक्यात बचावलो. ‘आता ती गाडी आपण विकून टाकू या !’ म्हणत सारे कुटुंबीय आमच्या मागे लागले, तळमळणारा गाडीचा जीव मात्र काहीतरी वेगळेच म्हणत होता. सर्वांचा विरोध पत्करून, नुकसान सोसून आम्ही ती गाडी पुढे सन २०१५ च्या विजयादशमीपर्यंत सोबत ठेवली, इतकेच काय तर गाडीत मन गुंतलेल्या एव्हाना, पाच वर्षांच्या चिरंजीवाला, ‘ही गाडी आता थकलेय, आपण ही गाडी तिच्या घरी नेऊन देऊ या, आणि तेथून दुसरी नवी आणू या !’ असे समजावत त्याच्या समोरच जुनी गाडी एक्स्चेंज करून नवी टाटा इंडिका घेतली होती. सांगायचं तात्पर्य हेच की, या साऱ्यामागे असलेली प्रेम भावना आम्ही जपत राहिलो, सामोऱ्या आलेल्या प्रत्येक हृदयात अत्यंत जागरूकतेने आपल्याविषयी प्रेम भावना जागविण्याचा आपला प्रयत्न आपल्याला एक वेगळेच समाधान प्राप्त करून देत असतो, याचा आणखी एक अनुभव आम्ही घेतला होता.

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊलींचे ‘पसायदान’ हे विश्वकल्याणकारी प्रेमामुळे निर्माण झाले आहे. साने गुरुजींची ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही काव्यपंक्ती प्रसिद्ध आहे. संत एकनाथांच्या ‘हितोपदेश’मध्ये, ‘परमेश्वर सर्व शक्तिमान म्हणून जर आपण प्रेम करणार असू तर सर्वत्र दिसणाऱ्या मानव सृष्टीवर प्रेम करावे तरच तो परमात्मा परमात्मातत्त्व  हे तुमचे तारक साधन बनेल’ असे वाक्य आहे. अर्थात प्रेम हा विषय व्यापक असून विविधांगी आहे. धृतराष्ट्राने युद्धाअंती भीमाचा सूड घेण्यासाठी प्रेमाचा आव आणला होता, अफझलखानाने शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी मैत्रीचा आव आणला होता, पुतना राक्षसीने भगवान श्रीकृष्णाला ठार मारण्याचा कट मायावी रूपानेच रचला होता. एवढं कशाला, ‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत चीननेही कपटी भ्रातृभाव दाखवलाच होताच की ! प्रेमात त्याग करावा लागतो, पुष्कळदा हिंसाचारही होतो. त्यागी प्रेम मात्र बावनकशी सोन्यासारखे असते. अपत्य प्रेम, सद्गुरू आणि शिष्य यांचे एकमेकांवरचे प्रेम, राष्ट्रासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या राष्ट्रभक्तांचे प्रेम, तत्त्वासाठी, धर्मासाठी, व्रतासाठी प्राण देणाऱ्या निष्ठावंतांचे प्रेम, मातृभाषेवरचे प्रेम आदि अत्युच्च पायरी गाठायला, षड्रिपूंच्या आहारी न जाणारी कडवी निष्ठाच असावी लागते. असे बावनकशी प्रेम कीर्तिरूपाने इतिहासात अमर होते.

आमच्या घराजवळील गल्लीत एका कुत्रीने एकदा चार-पाच पिल्लांना जन्म दिला, जन्मलेली पिल्ले थोडेसे हवा-पाणी मिळाल्यावर इतरत्र विखुरली, दुर्दैवाने एक पिल्लू अगदीच अशक्त होते, त्याला स्वतःला सावरयालाही येत नव्हते. एके सकाळी घराच्या गेटजवळ त्याच्या ओरडण्याचा केविलवाणा आवाज ऐकू आला. शोध घेण्याचा वरवर प्रयत्न केला, पण काही दिसले नाही, सिनियर के.जी.त शिकणाऱ्या चिरंजीवाच्या, ते पिल्लू खाली गटारात सहज न दिसणाऱ्या ठिकाणी पडलेले लक्षात आले. तो धावत धावत ते सांगायला आला. मातीच्या गोळ्याला कुंभार एकटाच आकार देत असतो, पण आपल्या या लहान मुलांवर संपूर्ण समूहाचा प्रभाव पडत असतो, त्यामुळे त्याची भूमिका नाकारून त्याच्यातील तयार होत असलेली संवेदनशीलता आम्हाला मारायची नव्हती. हट्ट करून त्याने ते गटारातील पिल्लू आम्हाला बाहेर काढायला लावले, पांढरे शुभ्र, गुबगुबीत, पिल्लू थरथर कापत होते. त्याच्या हट्टापायी आम्ही पिल्लाला पाणी पाजण्याचा, दूध वगैरे देण्याचा प्रयत्न केला, रस्त्यावरून गटारात पडल्याने त्याला लागलं असावं ! एका खोक्यात उबदार कपड्यात गुंडाळून आम्ही त्याला ठेवलं, एका मित्राने त्याची जगण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगितले. पण चिरंजीवाला समजावणे कठीण होते, तो दिवसभर त्या खोक्याजवळच घुटमळत राहिला होता, त्या पिल्लात त्याचा अडकलेला जीव पाहाता, उद्या त्याला ते पिल्लू मेलेले बघावे लागले तर काय ? अचानक कोठेतरी वाचलेले आठवले, एका लहान मुलाने आपल्या मेलेल्या मांजराला घट्ट छातीशी धरून ठेवलं होतं. शुष्क डोळ्यांनी, मिटलेल्या ओठांनी तो आई-वडिलांशी झगडत होता ते न देण्यासाठी ! आम्ही रात्रभर विचार करत राहिलो, पहाटे पिल्लाची खोक्यातली हालचाल पूर्णत: थांबलेली दिसली. चिरंजीवाने या पिल्लासाठी काल केलेली धडपड आठवली आणि क्षणार्धात डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या. पण आता काहीच उपयोग नव्हता. तातडीने आम्ही घराजवळच्याच बागेत खड्डा खणून पिल्लाला दफन केले. नंतर स्वतःहून चिरंजीवाला सांगितले, 'ते पिल्लू पहाटे चांगले झाले, म्हणून दत्त महाराज आले आणि त्याला घेवून गेले.' चिरंजीवाच्या बालमनात पूर्वीपासूनच दत्त महाराजांविषयीही प्रेम होतेच, आणि आता त्या पिल्लाबद्दल निर्माण झाले होते ! त्यामुळेच त्याला ते सहज पटले. इथे निव्वळ प्रेमभावना उपयोगी पडली होती, 'प्रेमाने जग जिंकता येते' हे वाक्य आम्हाला आठवले.

तसं पाहिलं तर आमचं सर्वाधिक प्रेम निसर्गावर आहे. सकाळच्या ताज्या सूर्यकिरणांनी आपल्या परिसरातील निसर्गाचं वातावरण शुद्ध होतं. घराच्या उघड्या दारा-खिडकीतून दिसणारं एखादं रोपटं नव्या पालवीसकट वाऱ्याच्या झुळूकीसोबत नाचत असतं. एखादा सनबर्ड, एखादा खंड्या हा पहाटे उमलेल्या फुलाशी आपुलकीने हितगुज करीत असतो, रसपान करीत असतो, कोणाच्यातरी चाहुलीने तो अचानक भुर्रकन उडून जातो, ती फांदी काहीकाळ थरथरते, परत स्तब्ध होते तोच पक्षी परत येतो, काही झालेच नाही अशा पद्धतीने फांदीवर बसतो, पुन्हा हितगुज सुरु होते. निसर्गातील ही गंमत तर आपण सारेच अनुभवतो, मात्र निसर्गाच्या प्रेमात पडलो की मग तो आपल्याला त्याची अनेक रूपे दाखवतो, ते पाहून आपले मानवी मन चैतन्याने, प्रेमाने  भरून जाते.

पणती तेवण्यासाठी वात तेलात बुडलेली पण वातीचे टोक तेलाच्या बाहेर असावे लागते, तरच ती प्रकाशमान होऊ शकते. मानवी जीवनही असेच पणतीतल्या वातीसारखे आहे. आपल्याला जगात, पण तरीही काही प्रमाणात अलिप्त राहावे लागते. विवेकाचा आणि प्रेमाचा दिवा प्रत्येक हृदयात लावत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रफुल्ल हास्य फुलविण्याचा संदेश आपल्याला ‘दीपावली’सारख्या सणातून प्राप्त होत असतो. आयुष्यात जो पर्यंत आपल्यावर प्रेमाचा अभिषेक होतो आहे, तोपर्यंत शांतपणे, त्यात बेधुंद होऊन, कर्तव्याचं भान ठेवून, आनंदाच्या लहरींत जगायला शिकायलाच हवंय ! प्रत्येकात चांगले गुण असतातच ! काहींत संयम, काहींत उत्कट प्रेम, सामर्थ्य, उदारता, काहींत लोकांना एकत्र आणण्याची क्षमता असते. दीपावलीतील प्रत्येक पणती ही त्याचेच प्रतिक असते. अशा अनेक पणत्या आपल्या स्वभावाने, लावत (पेटवित), कटुता टाळून, मानवी क्षमता विकसित करत संपूर्ण जीवन समृद्ध करीत प्रत्येक हृदयात प्रेमज्योत पेटविण्याचा संकल्प करू या ! 


धीरज वाटेकर

 

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

'कृतार्थीनी' चरित्रग्रंथ प्रकाशन सोहोळा

दु:खितांसाठीच्या सेवाकार्यातून 'कृतार्थ' झाल्याची भावना : कमल भावे

मुरुड (ता. दापोली) : दु:खात होरपळणाऱ्या जगभरातील शेकडो कुटुंबाना, 'मी ज्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात झालेला बदल, त्यांना मिळालेले समाधान, यातच मला मी कृतार्थ झाल्यासारखे वाटते.' अशा भावना, भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे, रँग्लर अप्पासाहेब परांजपे, पद्मभूषण शकुंतलाबाई परांजपे आदि दिग्गजांचे सततचे मार्गदर्शन आणि सहवास लाभलेल्या, दापोली तालुक्यातील मुरूड़ गावच्या प्रसिद्ध समाजसेविका, मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधील निवृत्त मेड़िकल सोशल वर्कर सौ. कमल श्रीकांत भावे यांनी त्यांची जीवनकथा असलेल्या 'कृतार्थीनी' ग्रंथ प्रकाशन सोहोळ्याप्रसंगी व्यक्त केल्या.    

मुरूड़, तालुका दापोली मधील महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित न. का. वराड़कर हायस्कूलच्या सभागृहात, गांधी जयंती आणि ''स्वर्गीय न. का. वराडकर" यांच्या ४० व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून संपन्न झालेल्या या सोहोळ्याला व्यासपीठावर महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी मोरे, प्रमुख पाहुणे म्हणून नायर हॉस्पिटल मुंबईचे निवृत्त समाजसेवा विभाग प्रमुख भागवत हरी पाटील, कोकणचे नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर, पं. स. सभापती बैकर, लेखिका प्रा. शांता सहस्रबुद्धे, 'उखाणेकर' मीनल गुजर, 'कृतार्थीनी'चे लेखक धीरज वाटेकर, श्री आणि सौ. कमल श्रीकांत भावे, संस्थेचे विश्वस्त विश्वनाथ वराडकर, रमेश तळवटकर, मुरुडचे सरपंच सुरेश तुपे, शाळेच्या मुख्याध्यापिका मधुमालती गारडे उपस्थित होत्या.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक एस. परसुरामन, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि नाटककार 'पद्मभूषण' सई परांजपे, देशातील विख्यात शल्यचिकित्सक डॉ. व्ही. एन. श्रीखंडे आदि मान्यवरांच्या संदेशाचे वाचन शिक्षक गमरे यांनी केले. पुस्तकाला प्रस्तावना देणाऱ्या, प्रख्यात मानसोपचार व मनोविकारतज्‍ज्ञ, मराठीतील जवळपास प्रकाशित २५ पुस्तकांचे लेखक-साहित्यिक डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान गौरी खटावकर, माधवी मुकादम, देवेंद्र जाधव, निवृत्त मुख्याध्यापिका वैशंपायन यांनी 'कमल भावे' यांच्या योगदानाबाबत आपले उस्फूर्त अनुभव कथन केले. कमल भावे यांना, त्यांच्या गुरू शकुंतलाबाई यांनी दिनांक १४ नोव्हेंबर १९७३ रोजी, वाढदिनी भेट दिलेला, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांची दुर्मीळ छबी असलेला फोटो या कार्यक्रमात, सौ. भावे यांनी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेस भेट दिला, तो अध्यक्षा सौ. सुहासिनी मोरे यांनी स्वीकारला.

यावेळी बोलताना भागवत हरी पाटील यांनी कमलताई या आपल्या 'गुरु' असल्याचे नमूद केले. प्रा. शांता सहस्रबुद्धे यांनी आपल्या आणि कमल भावे यांच्या शालेय जीवनापासूनच्या आठवणी सांगून, हा ग्रंथ तयार झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मीनल गुजर यांनी आपल्या भावना काव्यातून व्यक्त केल्या. रमेश तळवटकर यांनी महर्षी कर्वे शिक्षण संस्था आणि कमल भावे यांचे योगदान याविषयी माहिती सांगितली. 'कृतार्थीनी'चे लेखक धीरज वाटेकर यांनी 'सामाजिक कार्यकर्ता' आणि 'समाजसेवा' या शब्दांचा निश्चित अर्थ आणि कामाची पद्धत समजून घेण्यासाठी तरुणाईने हा चरित्रग्रंथ आवर्जून वाचावा, असे नमूद केले. अण्णा शिरगावकर यांनी कमल भावे आणि श्रीकांत भावे या दोघांचा आपल्या भाषणात सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापिका गारडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

चिपळूणच्या १५० वर्षांची परंपरा जोपासणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्राच्या ग्रंथालय चळवळीतील अग्रणी, साहित्यिक प्रकाश देशपांडे, कवि अरुण इंगवले, नाट्यलेखक प्रा. संतोष गोणबरे, साहित्यिक मच्छिंद्रनाथ वाटेकर, सुभाष साटले, विवेक भावे, प्रवीण वाटेकर यावेळी उपस्थित होते. प्रकाश देशपांडे यांनी कमल भावे यांना, अण्णासाहेब कर्वे यांच्या १०० वर्षपूर्ती सोहोळ्यात त्यांनी केलेले भाषण प्रकाशित झालेल्या 'चंद्रोदय' या चिपळूणातून प्रकाशित झालेल्या दुर्मीळ अंकाची प्रत भेट दिली. सोहोळ्याचे सूत्रसंचालन राजेश नरवणकर यांनी तर आभार संजय भावे यांनी मानले. हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल पेढे, चिपळूण येथील सौ. नूतन विलास महाड़िक यांच्या 'निसर्ग प्रकाशन'चे आभार मानण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित सुमारे १२५ मान्यवरांना कृतार्थीनी हा ग्रंथ भेट देण्यात आला.

http://www.mahavrutta.in/mah/index.php/2013-12-07-04-03-38/10209-2017-10-03-11-34-25

प्रमुख पाहुणे अण्णा शिरगावकर बोलताना 

कृतार्थीनी कमलताई यांचे मनोगत 

लेखक धीरज वाटेकर 

कमलताई यांचा सन्मान ! 



महर्षी कर्वे यांचा दुर्मीळ फोटो भेट 

श्रीकांत भावे 

उद्घाटन सोहोळा 

उपस्थित श्रोते 



दैनिक सकाळ ०४१०२०१७  


शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

एक पाऊल पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने...!

  राज्यस्तरीय पर्यावरण विषयी कार्यशाळेस उपस्थित मान्यवर  
पर्यावरणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेत त्यावर काही ठोस रचनात्मक निर्णय घेऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण विषयात काम करणा-या व्यक्ती, संस्थांनी, शासनाच्या मागे सामुहिक रेटा लावावा, आपली सांघिक शक्ती वाढवावी, ‘जैवविविधता जपणूक आणि प्लास्टिकचा भस्मासूर रोखणे व पर्यावरण संवर्धनातील सर्व घटकांवर अभ्यास’ या अनुषंगाने सांघिकपणे शासनासमोर वसुंधरेच्या रक्षणार्थ कृती अहवाल सादर करणे, असे उद्दिष्ट असलेली, राज्यस्तरीय ‘पर्यावरण विषयी कार्यशाळा’ नुकतीच दिनांक १६ आणि १७ सप्टेंबरला जालगाव-दापोलीत संपन्न झाली. २८ संस्थांनी सहभाग नोंदविलेली, निवेदिता प्रतिष्ठान, टेलस ऑर्गनायझेशन आणि  ए.ई.आर.एफ. पुणे आयोजित, जबाबदारीचे ‘एक पाऊल पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने’ टाकणाऱ्या या महत्वपूर्ण कार्यशाळेचा हा घोषवारा !

जैवविविधता : पुढील दहा वर्षांची स्थिती, प्लॅस्टिक समस्या, ओल्या कच-यापासून खत निर्मिती, प्रसारमाध्यमांची भूमिका, वातावरणातील बदल या विषयांवर डॉ. अर्चना गोड़बोले, लोकेश बापट, ओल्या कच-यापासून गॅस, खत आणि वीज तयार करणा-या, 'रिड़र्स ड़ायस'ने गौरविलेल्या भारतातील पहिल्या महिला निर्मला कांदळगावकर, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य या तज्ज्ञांसह कार्यशाळा संयोजक प्रशांत परांजपे, युयुत्सु आर्ते, राधिका कुलकर्णी, भक्ती परब जान्हवी पाटील या अभ्यासकांनी आपली भूमिका मांडली. उपस्थित संस्था प्रतिनिधींनीही यावेळी आपले पर्यावरण संर्वधन कामातील अनुभव आणि शासनाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या.

कोकणात होत असलेल्या मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणातील वृक्षतोडीबाबत, पर्यावरणप्रेमींत कमालीची नाराजी आहे. सामुहिक रेट्यामुळे चौपदरीकरणाचा मध्यभाग दहा फुटापर्यंत वाढवून अनेक जुनी झाडे वाचविण्यासाठी शासन यंत्रणा अनुकूल बनली आहे. शेजारच्या गुजरात राज्यात अनेक मोठ्या झाडांचे प्रत्यारोपण झाले आहे, आपण त्याचा विचार करायला हवा. दुसरीकडे शासनाविरोधात लढणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना शासनाच्या एकूण दृष्टीकोनात लवचिकतेचा अभाव आजही जाणवतो. शासनाचे वृक्ष लागवड अभियान राबविताना, कोकणात अनेक गावात आजही भरगच्च वनराईमुळे नवीन झाडे लावायला जागा मिळत नाही, अशी स्थिती येते. हे समजून न घेताच शासकीय यंत्रणा ‘वृक्ष लागवड न केल्याचा’ शेरा मारते. यातून जिथे भरपूर झाडे आहेत तिथे झाडे लावायची जबरदस्ती का ? हा प्रश्न निर्माण होतो. एखाद्या गावात कचराकुंडी नाही तर ती का नाही ? हे समजून घेण्याचा प्रयत्न होत नाही. बायोगॅस व सार्वजनिक स्वच्छताविषयक काम करणारे देहूगावातील दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, स्वच्छतादूत ‘पद्मश्री’ डॉ. सुहास विठ्ठल म्हापूसकर यांचे ‘प्रसाधनगृह’चे मॉडेल आपण स्वीकारायला हवे होते, हा मुद्दा यावेळी पुढे आला. कोकणातील वणव्याच्या समस्या आपण सर्वजण जाणतो, परंतु ‘कोकण मै वणवा लगता है क्या ?’ असे जेव्हा वन खात्याचा प्रमुख जबाबदार अधिकारी विचारतो, तेव्हा मात्र प्रश्न पडतो, अस्वस्थता वाढते.   

फलोत्पादनासाठी प्रसिद्ध कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात एकही ‘अभयारण्य’ नाही. इथली जमीन, जंगले खाजगी आहेत. जिल्हा बऱ्यापैकी हिरवागार आहे. भारतातील दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस इथल्याच संगमेश्वर तालुक्यात पडतो. या जिल्ह्याच्या जंगलात असलेल्या ‘हिरडा’ वनस्पतीचा १९८० च्या कालखंडात जंगल माफियांनी कोळसा बनविला, नंतर आंदोलन उभे राहिले, मग हे प्रकार थांबले. कोकणात श्रीमंताचा बंगला हा अनेक गवत बहुदा लाकुडतोडयाचा असतो. ‘शेकरू’साठी प्रसिद्ध महाराष्ट्रातील भीमाशंकर जंगलाच्या रक्षणासाठी चार गार्डस आहेत. जंगल तोडल्यावर पैसे मिळतात, असा सर्वमान्य समज आहे. पूर्वी लोकांनी आंबा-काजू लावण्यासाठी जंगले तोडली, शासनाचे लागवड अनुदान लाटले, बागा केल्याच नाहीत. आपल्याकडे जंगले वाचविण्याची आव्हाने वाढताहेत ! झाडातून, जंगलातून पैसे मिळतात हे लोकांना पटवून द्यावे लागेल. गेल्या १५-२० वर्षांतील कोट्यानुकोटी जंगल लागवड अभियाने पाहिली, की वाटत आता नवीन झाडे लावायला भारतात जागाच शिल्लक नसेल ! हे करताना प्रजातीचा विचार, रोपे कोण बनवितो ? हा कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबविता येईल का ? विचार करायला हवाय. अकारण हा पैसा वाया जातोय. हे घडण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी आपापली संस्थाने खालसा करून एकत्रित संवाद साधायला हवाय !

‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी आजची आपली आणि प्लास्टिकची स्थिती आहे. आज पर्यावरण आजारी पडलंय, मानवी हस्तक्षेप त्याला नडलाय. मानवनिर्मित प्लास्टिकचा शोध सन १८६२च्या दरम्यान  सर अलेक्झांडर पार्कस यांनी लावला, पुढे जगभर मान्यता मिळाल्यावर सन १९८०-८५च्या दरम्यान प्लास्टिकने भारतात धुमाकूळ घालायला सुरुवात केली, आणि आज त्याने आपले अख्खे आयुष्य व्यापले, पर्यावरणाच्या एकूण समस्यांत त्याचा आजचा वाटा निम्याहून अधिक आहे. ‘प्लास्टिक’ हे खरेतर वरदान आहे, परंतु त्याच्या अयोग्य व्यवस्थापनाने अडचणी वाढल्यात. त्याकरिता ‘Reduce-Reuse-Recycle’ हे तत्व अंमलात आणायला हवे, प्लास्टिक न वापरण्याची मानसिकता तयार व्हायला हवी. एका आकडेवारीनुसार प्रतिवर्षी एक माणूस सुमारे ५-६ किलो प्लास्टिक हाताळतो. यातील निम्यावर पुनर्प्रक्रिया होते, उरलेले आम्ही कसेही, कुठेही टाकतो. वन्य प्राणी ते अन्न म्हणून खातात, मरतात, आम्हाला काय त्याचे ? पण हे प्लास्टिक उष्णतेच्या संपर्कात आले की त्यातून जे विषारी वायू बाहेर पडतात, ते आपल्याही मानवी शरीराला हानिकारक आहेत. तरीही आम्ही सुधारण्याचे नाव घेत नाही. यावेळी ‘DON'T WASTE, WASTE !’ हे तत्व जगणाऱ्या निर्मला कांदळगावकर यांनी केलेले ओल्या कचऱ्याचे सोने करणारे विवेचन सर्वांनाच थक्क करून गेले. याच कचऱ्यातील मिथेन वायुमुळे मागे देवनार कचरा डेपोला आग लागली होती.

 प्रदूषणामुळे गेल्या चाळीस वर्षांत आपण निम्म्याहून अधिक जीव आपण गमावलेत. सोशल मिडीयाचा विचार करता फेसबुक, व्हात्सप्प हे मोहमयी आणि आभासी जग असल्याने तिथे अशी माहिती नुसती प्रसूत करून आपलं काम संपणार नाही, हा मुद्दा येथे मांडला गेला. कुंपणाबाहेरील झाडाला आम्ही पाणी घालणार आहोत का ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न अनेकांचा मनाला भिडला. अशा विचारातून या कार्यशाळेत चर्चा झाली, तिला प्रतिसादही उत्तम मिळाला, कार्यशाळा यशस्वी झाली. 

धीरज वाटेकर














सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

'गावकुसाबाहेर' जगणाऱ्यांचे आशास्थानच 'उदासिन'

गावकुसाबाहेर जगणाऱ्यांनी ज्या शासकीय संस्थेकडे आशा-अपेक्षा ठेवून आपले जीवन कंठायचे, त्या महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाला आवश्यक सुविधा देण्याबाबत गेली १६ वर्षे विविध राज्य सरकारे दिरंगाई करीत असल्याने, अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला, आवश्यक पायाभूत सुविधा द्यायच्या नसतील तर, 'महाराष्ट्र मानवाधिकार आयोग मोडीत काढा', असे सांगितले. यामुळे एकूणच व्यवस्थेची हतबलता सामोरी आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने ही भूमिका मांडल्याने महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या उदासीनतेचे रहस्यही सर्वांना समजले.

या आयोगामधील कर्मचारी आजही कायमस्वरूपी कामावर नाहीत. आयोगाचे कर्मचारी रोजंदारीवर काम करत असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांना नियमित करण्याचे आदेशही कोर्टाने दिले होते, त्याची पूर्तता झालेली नाही. आयोगाला मोठी जागा देण्यासंदर्भातही  अजून सरकारकडून निर्णयाप्रत येणारी ठोस काही भूमिका घेण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात या आयोगाची स्थापना सन २००१ मध्ये झाली, गेल्या १६ वर्षात राज्य शासनाला, आयोगाला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता आलेल्या नाहीत. राज्य मानवाधिकार आयोगाला आपले कर्मचारी नियमित करता येत नसतील, त्यांचे मानवाधिकार जपता येत नसतील तर हा आयोग सर्वसामान्यांच्या अधिकारांचं रक्षण कसं करणार ? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्यात अधूनमधून, बनावट मानवाधिकार संघटना आपल्या लोगोचा गैरवापर करीत असल्याविषयी वृत्त प्रसारित होत असतात. या क्षेत्रात काम करणार्‍या खर्‍या व्यक्‍तींना याचा अधिक त्रास होत असतो, त्यावरही अंकुश ठेवणे कठीण बनले आहे.

देशातील प्रत्येक व्यक्‍तीला भारतीय राज्यघटनेने विविध अधिकार दिलेले आहेत. भारतीय या नात्याने कोणा   व्यक्‍तीवर अन्याय झाल्यास, त्याला संविधानाने दिलेला अधिकार वापरात बाधा आल्यास मानवाधिकार संघटनेकडे दाद मागता येते. त्यासाठी संविधानाने मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ अंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश असतात तर सर्वोच्च न्यायालयाचे तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्ते तसेच मागासवर्गीय आयोग, महिला आयोग व अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हे या आयोगाचे सदस्य असतात. अधिकार कक्षेतील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांचा तपास करणे, अशा घटना घडू नयेत यासाठी नियंत्रण ठेवण्याचे काम या आयोगामार्फत होत असते. मानवी हक्कांचे हननांविरुध्द पीडित व्यक्तीने राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोगाकडे लेखी वा तोंडी तक्रार केल्यानंतर राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोग कारवाई करु शकतात. या तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्यांतर्गत न्यायालयाद्वारे शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे काम आयोग करीत असतो. या आयोगाकडे साध्या पोस्टकार्डावर देखील तक्रार करता येते. माणसांना संरक्षण देणाऱ्या, त्यांचे हित जपणाऱ्या, त्यांना हक्क मिळवून देणाऱ्या संस्थांवर लाचार होण्याची वेळ आली तर राज्य प्रगतिपथावर आहे  असे म्हणता येत नाही. राज्य मानवाधिकार आयोगामध्ये गेल्या आठ वर्षांपासून अपुरे कर्मचारी तेही रोजंदारी तत्त्वावर आहेत. आयोगाला पुरेशी जागा नाही. मूलभूत सुविधा नाहीत. राज्यात परवड होणारे अनेक विभाग असले तरी हे दुर्दैव मानवाधिकार आयोगाच्या वाट्याला यावे हा सर्वाधिक चिंतेचा विषय मनाला जायला हवा. रोजंदारी तत्त्वावरील अपुरा कर्मचारी, १० वर्षांची सेवा झाल्यानंतरच आयोगात कायम केले जाईल हे न पाळलेले आश्वासन, अपुरी जागा, अनेक मूलभूत सुविधांचा अभाव, पीडित नागरिकांना हानी-भरपाई किंवा अन्य दिलासा देण्याचा आदेश झाला तर त्याचेही वेळेत पालन न होणे अशा अनेक त्रुटी आहेत.
आयोगाला समन्याय कक्ष दर्जा असून तेथे पोलीस कस्टडीतील मृत्यू झालेले कैदी, भिकारी, लहान मुले, महिला आणि मतिमंद तसेच अपंग यांच्यांशी संबंधित मानवाधिकार उल्लंघनाचे खटले चालतात. जेव्हा एखादे प्रकरण दाखल केले जाते त्यावेळी आयोग त्याची फेरतपासणी करते. त्यासाठी आयोगाकडे चौकशी यंत्रणा आहे. त्यात आय.पी.एस. अधिकाऱ्यांसह पोलीसांना आदेश देऊन माहिती घेण्याचीही व्यवस्था आहे. दुर्दैवाने आयोगाकडून केल्या जाणाऱ्या चौकशीत पोलीस ठाण्यांकडून असहकार्य केले जाते, महिनोनमहिने या चौकश्यांना दाद दिली जात नाही, त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात. साऱ्या उदासीनतेमुळे आयोगाकडे येणाऱ्या एकूण प्रकरणांपैकी १५ टक्के प्रकरणांवरच सुनावणी होते आहे. त्यामुळे राज्यातील वंचितांना न्याय देऊ शकणाऱ्या या यंत्रणेला शासनाने प्राधान्यक्रमाने सहकार्याचा हात देणे गरजेचे आहे.


धीरज वाटेकर                                                                        dheerajwatekar@gmail.com

व्यसनयुक्त 'ह्रास' थांबवायलाच हवा !

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला सन २०२० साली ६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण राज्य व्यसनमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. व्यसनमुक्ती आणि बंदीसाठी प्रचार व प्रसाराचे काम करणा-या ९९ संस्था, संघटनांनी मागच्या एक ऑगस्टला आझाद मैदानात राज्यव्यापी धरणे आंदोलन करून आपली ही मागणी प्रभावीपणे मांडलीही आहे. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रीय महामार्गावरील दारूच्या दुकानांचा मुद्दा गाजतो आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून अनेकांनी आपापले दारू व्यवसाय महामार्गावरून हटवलेही आहेत, ते सुरळीत ठिकाणी सुरूही आहेत. या निकालात रोज नवीन बदल होत आहेत. यातून शासनाला मिळणारा महसूल पाहाता, दारूच्या दुकानांना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार प्रोत्साहन देत असल्याची धारणा, व्यसनमुक्ती आणि बंदीसाठी प्रचार व प्रसाराचे काम करणा-या लोकांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे. या संपूर्ण प्रश्नाचा मुळापासून विचार व्हायला हवा.

व्यसन हे मानवी शरीरासह मनावर विपरीत प‍रीणाम झाल्याशिवाय राहत नाही. दारू हे 'स्लो पॉयझन' आहे असे म्हणतात ते खरे आहे. नव्याने दारू पिणार्‍यापैकी १५ ते २५ टक्के समाज कायमचा व्यसनी बनतो. आधुनिक जीवनात दारूने सहजरित्या प्रवेश केला आहे. स्त्री, पुरुष, युवावर्ग, वृध्द सर्वांनाच ती प्रिय झाली आहे, दारु मात्र कोणावरच प्रेम करत नाही, हे सत्य आहे. सतत सफरचंदाचा रस पिऊन, उकडलेले सफरचंद दिवसातून तीन- चारदा सेवन करून, एका हळदीचे बारीक-बारीक तुकडे हे जेव्हा सिगारेट, तंबाखू खाण्‍याची इच्छा होते तेव्हा तोंडात टाकून,  दालचिनीला बारीक वाटून मधात टाकून सिगारेट ओढण्याची इच्छा झाल्यावर ते मिश्रण बोटाने चाखून, कांद्याचा रस २५ ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन करून आपण नशामुक्त होऊ शकतो. व्यसन ही संपूर्ण प्रक्रिया आजही संशोधनाच्या अवस्थेत आहे. त्याबद्दल ठोस असे काही सांगता येत नाही. मुक्तांगणसारख्या नामवंत संस्थेत, जिथे एका आकडेवारीनुसार सत्तावीस हजार रुग्णमित्रांनी उपचार घेतले आहेत त्यांच्या यशाचे प्रमाण सत्तर टक्के आहे.

प्रसंगानुरूप दारू पिणारे सगळेच व्यसनी होत नाहीत. व्यसन असणे हा एक मानसिक आणि शारीरिक आजार आहे. मादक पदार्थाची नशा, त्यातून मेंदूत घडणारे रासायनिक बदल आणि आपल्या मेंदूतून मिळणारा  आनंद यामुळे नशा वारंवार करून बघावीशी वाटते, हळूहळू सवय बनते. कालांतराने अशी स्थिती निर्माण होते की व्यसन केले नाही तर अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे निर्माण होतात आणि ही लक्षणे  जाणवणारे, ते टाळण्यासाठी नशेकडे वळतात. अनेकदा तर दिवसभर मनात नशेसाठीच पैसे मिळवणे हाच ध्यास राहतो. कधीकधी आनुवंशिकता, वातावरणातील घटक, नाविन्याचे आकर्षण व्यसनास कारणीभूत ठरते. लहानपणापासून वर्तणुकीच्या समस्या असलेल्या मुलांना व्यसन पटकन लागते. दुर्दैवाने आज समाजात सिगरेट पिणे, दारू पिणे याला प्रतिष्ठा आहे, त्यामुळे तरुण मुले आणि मुलीसुद्धा सहजपणे दारूचा ग्लास हातात घेताना आणि सिगरेट ओढताना दिसतात. सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमुळे, हाती खेळणारा पैसा, नसलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, हाताशी असलेला रिकामा वेळ यातून तरुणाई व्यसनांच्या आहारी जाते. दैनंदिन संघर्ष, ताण-तणाव, मनातली निराशा यांचा सामना करण्याचा उपाय म्हणजे नशा, अशी पळवाट अनेकदा शोधली जाते. मानवी स्वभाव आणि व्यसनमुक्ती हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. काहीवेळा स्वभाव व्यसनाला कारणीभूत होतो, तर काहीवेळा परिस्थिती कारण बनते. दारु पिणारी समाजातील सर्वच माणसं व्यसनी होत नाहीत, हे यातील आणखी एक जबरदस्त सत्य आहे. व्यसन हा जगातील एकमेव असा आजार असेल जेथे रुग्ण उपचारच करुन घ्यायला नकार देतो. अनेकदा फार पुढच्या परिणामांचा विचार न करण्याचा स्वभाव, आत्मकेंद्रित वृत्ती ही व्यसनामागे दिसून येते. त्यातूनच 'ड्राय डे'च्या पार्श्वभूमीवर आधीच आपली "व्यवस्था" करुन ठेवण्याचे विचार सुचतात. सतत दारू पिणा-र्यांत 'प्रचंड राग येणे' हा एक स्वभाव विशेष आढळतो. मग भांडणे, बायको, मुलाबाळांवर हात उगारणे हे प्रकार घडतात. दारुच्या व्यसनात संशयी वृत्ती बळावते त्यातून आणखी गुंता वाढतो. मोठमोठ्या बढाया मारणे, हे एक महत्त्वाचे लक्षण बर्‍याच व्यसनीमध्ये आढळून येते. सर्व गोष्टी वाढवून सांगायच्या, समोरच्यावर छाप पाडण्याचा सतत प्रयत्न करीत राहायचा असे अनेक स्वभावदोष असतात, व्यसनाच्या दरम्यान निर्माण होतात. व्यसनमुक्तीच्या फॉलोअपग्रुपमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना अनेकजण सांगतात, 'मलाच सारे कळते, मीच सर्वात शहाणा' अशी भावना तयार झालेली असते. यांना व्यसनमुक्त करणे एक दिव्य आहे.

त्यामुळे दारू ही गोष्ट फक्त मजा म्हणून किंवा दिवसभरातील कामाचा आलेला ताण कमी व्हावा म्हणून घेणाऱ्यांना थांबवणे कोणालाही शक्य नाही, कायद्याचा बडगा कितीही दाखवला तरीही हे शक्य नाही. खरा  प्रश्न आहे तो दारूच्या आहारी जाऊन स्वतःचे, संसाराचे, कुटुंबाचे वाटोळे लावणाऱ्या समूहाचा ! त्यासाठी मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. राज्यातील सार्वजनिक ठिकाणी गुटखा, तंबाखू, धूम्रपान आणि मद्य यावर बंदी घालण्याचा मुद्दाही योग्य आहे. मद्य, सिगारेट आणि तंबाखू विक्रीतून मिळणाऱ्या महसुलातील किमान एक टक्का रक्कम राज्यातील व्यसनमुक्ती मोहिमेवर खर्च करावी, नशाबंदी मंडळाला मिळावी असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. महाराष्ट्रात मुक्तांगण, सलाम बॉम्बे सारख्या स्वयंसेवी संस्था व्यसनमुक्ती मोहिमेत भरीव काम करत आहेत. व्यसनमुक्ती धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, हे येथील सामाजिक चळवळीच्या कामाचेच यश आहे. एखाद्या माणसातील व्यसनाचा प्रभाव कमी झाल्यावर त्या व्यक्तीच्या शारिरिक आणि मानसिकतेत पडलेला फरक कधीही लपून राहात नाही, अशांचे समाजातील प्रमाण वाढवून निरोगी, सशक्त पिढीच्या उभारणीसाठी 'व्यसनमुक्ती' कामाची निश्चित गरज आहे.

धीरज वाटेकर                                      

बालकांच्या समस्या वाढविणारी ‘ब्लु व्हेल गेम’ संस्कृती

कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच ! मोबाईल, संगणकाचा शब्दशः अतिरेकी वापर घडावा, म्हणून जगभरात ज्या काही बाबी तथाकथित बुद्धिमंतानी पुढे आणल्यात त्यातील ‘गेम’ संस्कृतीने गेल्या महिन्याभरापासून भारतात प्रचंड दहशत निर्माण केली आहे, कधी नव्हे तो पालकवर्ग, ‘आपला मुलगा मोबाईल अथवा संगणकावर बसून नेमका कोणता गेम खेळतोय ? आणि त्याचे काही भयानक परिणाम तर नाही आहेत ना ?’ याची चाचपणी करीत आहे. विज्ञानामुळे जग जसजसे जवळ येते आहे, तसतश्या समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करू लागल्यात. गेल्या महिन्याभरात त्यांनी ब्लू व्हेल गेमच्या माध्यमातून ज्या प्रकारे बालकांच्या मेंदूचा ताबा घेतला ते पाहाता, नीट विचार करता धोके अधिक गंभीर होताना दिसत आहेत.    

जगातील लहानग्यांमध्ये ब्लू व्हेल, द सायलेंट हाऊस, द सी ऑफ व्हेल, वेक मी अप अ‍ॅट टू फोर्टी हे विचित्र इंटरनेटवरील खेळ विशेष प्रसिद्ध आहेत.  १२ ते १९ या वयोगटात या गेमची क्रेझ आहे. यातील ‘ब्लू व्हेल’ने भारतात हल्लीच एका १४ वर्षाच्या मुलाचा बळी घेतला, आणि यातील गांभीर्य देशासमोर आले, तसे जगात इंग्लंड, इटली आणि अमेरिका या देशांमध्येही या गेमने जवळपास १३० जणांचे प्राण घेतले होते, पण तेव्हा त्याचे गांभीर्य आपल्याला कळले नव्हते. या घटनेनंतर मात्र आपल्या सरकारने या खेळावर बंदी आणली, पण तरीही समस्या संपलेली नाही. तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे रोज एक नवा गेम इंटरनेटवर येत असतो. आपली मुलंही तो गेम डाउनलोड करून सहज खेळायला लागतात. हे खेळ कुणी कुणाला शिकवतही नाही. तरीही हे खेळ थेट खेळायला सुरु करुन, गेमचे नियम आत्मसात केले जातात. आपली मुलेही हे करतात. कोणताही शास्त्रीय शोध हा माणसाच्या सोयीसाठी लागलेला असतो. परंतु त्याचा वापर करण्याचे तारतम्य सुटले म्हणजे असे जीवघेणे खेळ सुरू होतात. मोबाईल गेम बनविणारे मानसिकदृष्टया अपरिपक्व, कमकुवत मनस्थितीचा गैरफायदा घेऊन 'ब्लु व्हेल' सारखे जीवघेणे खेळ तयार करतात. त्यातील अवघड टास्क पूर्ण करण्यासाठी मुले जीवावर उदार होतात, तेव्हा अंगावर शहाराच येतो. हे गेम खेळता खेळता मुले आत्महत्या करतात, हे वास्तव धक्कादायक आहे. हे असे का घडते ? आत्महत्या करणार्‍या जगातील या मुला-मुलींचं सोशल मीडियावरील प्रोफाईल तपासल्यानंतर लक्षात येत की, या मुलांपैकी बहुतांश मुलं एकटी, एकलकोंडी आणि तणावग्रस्त असतात. त्यांनी आपल्या प्रोफाईलवर निराश, उदास, डिप्रेस्ट मजकूर पोस्ट केलेला आढळतो. अशांना हे खेळ एक आव्हान देतात. काहीतरी करुन दाखवण्याचं ! आणि मग त्या मागे धावताना पुढे हे घडतं !
पूर्वी सन २०१५ साली चार्ली चॅलेंज नावानेही एक गेम प्रसिद्ध झाला होता. यामध्येही आत्म्यांशी किंवा दुष्ट अद्भूत शक्तींची भेट घालून देण्याचे आश्वासन दिलेले होते. मध्यपूर्वेतील अनेक तरुणांना या खेळानं वेडं केलं होत. तेथील पोलिसांना शेवटी कॉलेजमध्ये समुपदेशनाचे वर्ग आयोजित करुन जागृती करावी लागली. ब्लू व्हेल गेममध्ये एकदा प्रवेश केला की खेळणारा मरेर्पयत काही त्यातून बाहेर पडू शकत नाही. सूचना  देणारा व्यक्ती अज्ञात असतो. एकदा या खेळात लॉग इन केलं की तो वेगवेगळ्य़ा आज्ञा देतो. खेळायचं तर आज्ञा पालन करणं आलंच. ५० प्रकारच्या आज्ञांचे टप्पे ओलांडणाऱ्या खेळणार्‍याला शेवटी आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं, काही शूरवीर आपलं जीवन या खेळण्याच्या नादात संपवतात ! त्यामुळे मृत्यूचा हा कुप्रसिद्ध ब्लू व्हेलगेम तपासाचा भाग म्हणून आता पोलीसही खेळणार आहेत. भारतात काही ठिकाणी या गेममुळे मुलांनी घर सोडल्याच्या, काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्यात. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात सोलापूर येथील १४ वर्षीय किशोरवयीन मुलगा पुण्याच्या दिशेने जात होता. हे लक्षात येताच सोलापूर पोलिसांनी भिगवण पोलिसांच्या साहाय्याने बसस्थानकातून त्या मुलाला ताब्यात घेतले, पुढील अनर्थ टळला. आजही देशात, ग्रामीण भागात ब्लु व्हेल, लुडो हे गेम मुले रात्र-रात्रभर खेळत आहेत. अलीकडे जामनेरमध्येही या गेमच्या आहारी जाऊन एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. 
सामान्य मुलांना मोबाईलवरचे कॅँडीक्रश, स्रेक, रेस, बर्न इट आऊट, ड्रॉप लीटज डिलाईट, बर्न द रोप, बॉम्ब टॉस, ब्लॉक ब्रेकर्स, क्रिकेट वर्ल्ड, स्पीड रेसींग, अ‍ॅँग्री बर्ड, टेम्पल रन, सबवे, फुटबॉल, सॉकर, तीनपत्ती
हे गेम आवडताहेत. पूर्वी शाळेतून घरी आलो, दप्तर टाकलं की हातपाय धुऊन, खाऊ खाऊन कधी अंगणात खेळायला जातो असे व्हायचे. पण त्या अंगणाची किंवा मैदानाची जागा आता मोबाइलच स्क्रीनने घेतली आहे. पूर्वी साधा फोन नवलाईची गोष्ट होती तिथे, आज दोन वर्षाच्या मुलांना मोबाइलवरचे अ‍ॅप्स चालवता येताहेत. जितके फायदे तितकेच तोटेही या मोबाइलमुळे मुलांच्या आयुष्यात आले आहेत. आम्ही लहान असताना, लहान मुलांच्या दवाखान्यात इंजेक्शनच्या भीतीने मुलांच्या रडण्याचा आवाज यायचा. आज ही लहान मुले बिझिनेसमॅनप्रमाणे मोबाइलमध्ये गर्क दिसतात. मुलांची भिती, चिंतेची जागा मोबाइलने घेतली. हा बदल चांगला की वाईट ? यावर भाष्य करणे जरा अवघडच आहे.
सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा अति वापर करणारे, इंटरनेट गेमिंग अॅडिक्ट मुले याच्या प्रभावाखाली लवकर येतात. अर्थात हे झाले लहान मुलांचे, पण आम्ही मोठी माणसेही मोबाईलच्या इतके आहारी गेलोय की सेल्फी काढण्याच्या नादात जीवास मुकतोय ! आजकालच्या वेगवान युगात अनेक गोष्टी अपरिहार्य बनल्या आहेत, पण त्याचा अतिवापर घातक ठरतो  आहे. लहानमुलांच्या हातात मोबाईल देणे, त्यांना सतत माहिती, व्हिडीओज, गेम्स पाहण्याची सवय लागली तर या छंदिष्ट मुलांना वेड लागण्याची पाळी येते. नंतर अचानक आपण त्यांच्या हातून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला तर ते चवताळून उठतात. अशा छंदिष्ट मुलांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे या वापरावर पालकांनी सततचे कालबद्ध नियंत्रण ठेवणे आवश्यक बनले आहे.


धीरज वाटेकर                                                                        dheerajwatekar@gmail.com


आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...