शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

नवागतांना घडविणारा व्रतस्थ पत्रकार !

साधारणत एकवीस वर्षांपूर्वीची, सन १९९८ सालची लिहिलेलं छापून यायला सुरुवात होण्यापूर्वीची घटना. ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ अशा मथळ्याचा तीन फुलस्केप पानी लिहिलेला लेख घेऊन आम्ही दैनिक सागरच्या कार्यालयात पोहोचलो. सकाळची साधारण अकराची वेळ. कार्यालयातली लगभग नुकतीच सुरु झाली असावी. कोणाशीच ओळख, नीटशी माहिती नसलेल्या आम्ही तो लेख एका टेबलाजवळ वर्तमानपत्र वाचत उभ्या असलेल्या गृहस्थांच्या हातात नेऊन दिला. त्यांनी त्यावरून नजर फिरवली मात्र, पुढच्या काही क्षणात, काही कळायच्या आतच तो लेख आमच्या दिशेने भिरकावला गेला. आमच्यासारख्या नवागतांना घडवू पाहणाऱ्या व्रतस्थ भालचंद्र दिवाडकर साहेबांची आणि आमची ती पहिली भेट !
अखिल भारतातील तालुका (चिपळूण) स्तरावरून सर्वप्रथम प्रसिद्ध होण्याचा मान मिळविणाऱ्या दैनिक सागरचे कार्यकारी संपादक, ‘संदर्भकोष’ अशी ओळख असलेले भालचंद्र दिवाडकर साहेब गेले (१६ फेब्रुवारी) ! आणि गेली अनेक वर्षे मनात कुठलाश्या कोपऱ्यात घर करून बसलेला वरील प्रसंग अचानक आठवला. तो व्यक्त होण्यासाठी मनातल्या मनात झुंजू लागला. व्यक्त व्हावं की होऊ नये ? या विचारात आठवडा निघून गेला. गेली अनेक वर्षे निव्वळ नाना (दैनिक सागरचे संपादक, कोकणचे बुद्धिवैभव निशिकांत जोशी) आणि दिवाडकर साहेबांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनासाठी आम्ही अधाशासारखा सागर वाचत आलो आहोत. लेखन संस्कार गिरवण्यासाठी, कोकणच्या प्रश्नांची समूळ जाण होण्यासाठी ते आवश्यकच होते. आता या दोघांच्या लेखनापासून आमच्यासारखे अनेक लिहिते तरुण पोरके झाले आहेत. आम्हाला पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी दिनांक ७ सप्टेंबर १९९८ ला दैनिक सागरनेच दिली. सागरमध्ये लिहूनही प्रत्यक्ष पत्रकारिता करण्याचा योग काही आला नाही. लेखन संस्कारासाठी मात्र सागर कायम महत्त्वाचा राहिला. ज्यांना ‘सागर’ने शब्दशः घडविले अशा पत्रकारांच्या सान्निध्यात आमच्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला आहे. गेल्या एकवीस वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. नानांपाठोपाठ दिवाडकरांच्या लेखनातील अनेक मुद्दे संदर्भ म्हणून जसजसे स्वीकारत गेलो तसतशी दिवाडकर साहेबांविषयी एक निश्चित भूमिका आमच्या मनात तयार होत गेली. गेल्या आठ-दहा वर्षांच्या कालखंडातील स्वर्गीय नानांसोबतच्या आमच्या गप्पांचं दिवाडकर साहेबांना विशेष कौतुक वाटत राहिलं आहे.
दिवाडकर साहेबांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेबाबत आम्हाला चिपळूण पर्यटन चळवळीतील आमचे ज्येष्ठ सहकारी संजीव अणेराव यांच्याकडून कळले होते. ब्रेनट्युमरच्या आजारामुळे ते त्रस्त होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र तेव्हा ‘ते बरे होत आहेत’ अशी माहिती होती, आणि नंतर अचानक ते गेल्याची बातमी आली. मनात कालवाकालव झाली. १७ फेब्रुवारीला सकाळी दैनिक सागरमध्ये जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. भालचंद्र दिवाडकर गेली ४५ वर्षे एकाच दैनिकात कार्यरत राहिले. ही आजघडीला अशक्यप्राय वाटणारी गोष्ट त्यांच्या आणि नानांच्या संबंधांची जाणीव करून देण्यास पुरेशी आहे. गुहागर तालुक्यातील पेवे या गावातून शिक्षणाच्या निमित्ताने ते चिपळूण शहरात आले. सन १९७४ साली नानांना भेटून, ‘मला लिहायची आवड आहे. मी सागरासाठी लिहू का ?’ असे विचारत पुढे ते सागरची ‘पडछाया’ बनले. पुरोगामी डाव्या विचारसरणीचा वारसा त्यांना त्यांचे मामा मधुकर शेट्ये यांच्याकडून मिळालेला होता. आपल्या लेखनात त्यांनी तो कसोशीने जपला. मराठीसह हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती भाषांवरचे त्यांचे प्रभुत्व, वृत्तपत्रीय जगतातील बदलांना स्वीकारून, स्वतःचे लेखन स्वतः टाईप करून देण्यातला त्यांचा साठीतला उत्साह जबरदस्त होता. त्यांच्या फिलॉसॉफीकल लेखांनी, अग्रलेखांनी काळ गाजवला. अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ‘एनरॉनची अंधारयात्रा’ या एनरॉन प्रकल्पाविषयी परखड विश्लेषण करणाऱ्या पुस्तकासह मुलांसाठीची वैज्ञानिक विषयावरची आणि इतर अशी त्यांची एकूण सात पुस्तकं प्रसिद्ध झाली. तर्कशुद्ध विचार आणि बुद्धिनिष्ठ प्रतिपादन करणारे दिवाडकर साहेब चौफेर वाचन, व्यासंगी वृत्ती, कोकणच्या मातीशी बांधिलकी सांगणाऱ्या शैलीदार लेखनासाठी प्रसिद्ध होते. पत्नी व मुलीच्या निधनाने वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळूनसुद्धा ते जिद्दीने उभे होते. ‘कोकण विकासाची दिशा’ हा विषय तर आम्ही त्यांच्या आणि नानांच्या लेखनातूनच अभ्यासला. दहशतवाद, विविध भागातील राजकारणाचा अभ्यास शोधपत्रकारितेसाठी त्यांनी देशभर प्रवास केला. हजारो लेख लिहिले. पत्रकारितेतील अनेक आव्हाने त्यांनी लिलया पेलली.
तर, एकवीस वर्षांपूर्वीची घटना घडली तेव्हा आम्ही रत्नागिरीला शासकीय तंत्रनिकेतनात शिक्षण घेत होतो. सन १९९८ च्या सप्टेंबर महिन्यात १८ ते २० तारखांना होऊ घातलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभा संगम’ या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या नियोजन बैठकीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून आम्ही पहिल्यांदाच रत्नागिरीहून पुणे शहराचा प्रवास केला. ही घटना जुलै-ऑगस्ट १९९८ मध्ये केव्हातरी घडली. या प्रवासाचा, तिथल्या बैठकीचा, वातावरणाचा आमच्या मनावर एवढा जबरदस्त परिणाम झाला की परततनाच आम्ही या संपूर्ण संमेलनाबाबत तीन लेख लिहायचे नियोजन करूनच घरी, चिपळूणला परतलो होतो. त्यातला ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ लिहिलेला हा पहिला लेख काही क्षणात, काही कळायच्या आतच व्रतस्थ भालचंद्र दिवाडकर साहेबांनी आमच्या दिशेने फेकला होता. तेव्हा त्यांच्या तोंडचे वाक्य होते, ‘दिवसातून तीन वेळा एस.टी. गाड्या पुण्याला जाऊन परत येतात. त्या प्रवासावर लेख काय लिहायचा ?’ अभाविकपणे कानावर आदळलेल्या त्यांच्या या वाक्याने आम्ही अक्षरशः थरथरलो होतो. आज आम्ही म्हणू त्या किंवा सुचविणारा सांगेल त्या विषयवर लेख होतो. पण तेव्हा ‘त्या’ लेखाची पाने गोळा करून आम्ही परतलो होतो. अठरा वर्षांचे होतो. अजून एकही लेख कोठेही प्रसिद्ध झालेला नव्हता. काही दिवस विचारात गेले. पुन्हा धाडस करून आम्ही त्या साहित्य संमेलनाचे महत्त्व प्रतिपादित करणारा ‘प्रतिभा संगम’ का ? व कशासाठी ?’ हा दुसरा लेख लिहिला. तो मात्र ७ सप्टेंबर १९९८ ला छापला गेला. त्यावेळी झालेला आनंद पहिल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर कसा होता ? ते शब्दात सांगता येणार नाही. दिवाडकर साहेबांसोबतची ‘ती’ पहिली भेट आम्हाला ‘बाळकडू’ देणारी ठरली. तो ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ हा अप्रकाशित लेख आजही आमच्या संग्रही आहे.
बाळकडू (शास्त्रीय नाव हेलेबोरस नायगर) हे एक बहुवर्षायू, सदाहरित सपुष्प विषारी झुडूप आहे. दक्षिण व मध्य यूरोप, पश्चिम आशिया आणि भारतातील डोंगराळ भागात ते वाढते. लहान मुलांना ठराविक काळाने उद्‌भवणाऱ्या रोगलक्षणांचा (उदा. ताप) प्रतिबंध करण्यासाठी याचा रस योग्य प्रमाणात देतात. त्याची फुले कुळातील नसली तरी रानटी गुलाबाप्रमाणे दिसतात. दिवाडकरांचा आमचा वरील अनुभव हा वरून अत्यंत काटेरी वाटला तरीही तो टवटवीत गुलाबासारखा, प्रसन्न मनाने आम्ही स्वीकारला होता. असे नक्की का घडले असेलं ? अशा स्वाभाविक प्रतिक्रियेमागची दिवाडकर साहेबांची नेमकी भुमिका काय असेल ? या वागण्यातून त्यांना नक्की काय सुचवायचे असेल ? असे प्रश्न स्वतःला विचारून घेत, अनेक अंगांनी आम्ही त्या घटनेचा विचार केला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात वरती म्हटल्याप्रमाणे आम्हाला पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी दैनिक सागरने दिली. अलिकडच्या काही वर्षांत एखाद्या छानश्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असल्याबाबतची माहिती मिळाल्यावर फोन करून वृत्तांत मागवून घेणारे, चिपळूणात संपन्न झालेल्या जलसाहित्य आणि बोलीभाषा संमेलनांचे महत्त्व एका वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत, विस्तृत वृत्तांत लिहायला लावून ‘रसिक’ पुरवणीत पानभर छापणारे, याच संमेलनात राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांचे झालेले अभ्यासपूर्ण भाषण शक्य तेवढे विस्तृत मागवून छापणारे दिवाडकर साहेब अलिकडच्या प्रत्येक भेटीत नानांप्रमाणे काहीतरी नवीन, सकस, दर्जेदार देऊन जायचे. आमचा तो काही मिनिटांचा वेळ सत्कारणी कसा लागेल ? याचीच जणू ते काळजी घ्यायचे. दैनिक सागरचा वेब माध्यमात तितका जम बसला नाही. याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवायची. म्हणूनच की काय दिवाडकर साहेबांनी ‘कोकण अॅलर्ट’ नावाचे संकेतस्थळ स्वत: सुरु केले होते. त्यावर आमचे काही लेखही, त्यांच्या मेलवर पोहोचल्यानंतर काही तासात प्रसिद्ध झाले होते. मागाहून ते लेख सागरमध्ये प्रसिद्ध झाले. हे सारे पाहिल्यावर आम्हाला, वयाच्या अठराव्या वर्षी पचवलेल्या त्या एकवीस वर्षांपूर्वीच्या ‘बाळकडू’ प्रसंगाची आठवण व्हायची. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या घटनेनंतर ज्या ‘स्थितप्रज्ञ’ वृत्तीने आम्ही लिहित राहिलो त्याबाबत आमचे आम्हालाच आश्चर्य वाटायचे. दिवाडकर साहेबांना नंतर तो प्रसंग लक्षातही राहिला नसावा !
दुर्दैवाने नानांप्रमाणेच दिवाडकर साहेबांचेही अनेक संकल्पित पुस्तकांचे लेखन राहिले. दैनिक सागर हे नुसते वृत्तपत्र नसून ते कोकणचे सांस्कृतिक प्रतिबिंब आहे. कोकणातील अगण्य लिहित्या हातांचे, ‘सागर’ विद्यापीठ राहिले आहे. अनेकांप्रमाणे स्वर्गीय नाना आणि दिवाडकर साहेबांच्या सावलीत आम्ही लिहिते झालो हे आमचे भाग्य ! पण हा सागर नावाचा संस्कार आमच्या पुढच्या पिढीवर त्याच ताकदीने व्हायला हवायं. नाना गेल्यानंतरच्या पहिल्या भेटीत सागरसाठी साप्ताहिक स्तंभलेखन सुरु करण्याबाबतची सूचना दिवाडकर साहेबांनी केली होती. पण ते जमले नाही. अगदी हल्ली-हल्ली आदरणीय शुभदा जोशी मॅडम यांनीही सागरकरिता रोज एखादी ‘फोटोस्टोरी’ सुरु करण्याबाबत सुचविले होते, दुर्दैवाने तेही जमलेले नाही. लेखनाच्या प्रारंभिक दिवसातील सोबती म्हणूनही असेल कदाचित, पण आजही सागरसाठी आमचा जीव हळवा होतो. म्हणूनच नानांच्या, दिवाडकर साहेबांच्या आठवणी मनात जपत, सागरसाठी शक्य तेवढं लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८, ई-मेल : dheerajwatekar@gmail.com    

http://www.mulshidinank.com/2019/03/blog-post_4.html



सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

नाथभूषण आर. आर. भंडारे : मनाला चटका लावणारी एक्झिट !


चालू महिन्याच्या पहिल्या रविवारी (३ फेब्रुवारी) अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाने ‘नाथभूषण’ या महासंघाच्या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराने समारंभपूर्वक गौरविलेल्या खेड-भरणे येथील रामचंद्र रक्कमनाथ तथा आबा भंडारे यांचे अवघ्या आठच दिवसात गेल्या रविवारी (१० फेब्रुवारी) दु:खद निधन झाले. गेली अनेक वर्षे प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहात समाजाच्या विकासासाठी योगदान देणारे नाथपंथी समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या रामचंद्र रक्कमनाथ तथा आर. आर. भंडारे यांची ही अचानकची एक्झिट संवेदनशील मन असलेल्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

मृत्यूने चोरपावलांनी येवून आकस्मिकपणे माणसांचे जीवन संपवणे ही विसाव्या शतकातील आधुनिक वैद्यकशास्त्रापूर्वीची नेहमीचीच घटना होती. मात्र वैद्यकीय प्रगतीमुळे मानवी आयुष्य वधारले आहे. तरीसुद्धा मानवाला कुठे ? कधी ? कसे ? मरण येणार ? हे सांगणे कठीण आहे. गेल्या शंभर वर्षात मृत्यूची गणिते पूर्णपणे बदललेली आहेत. या साऱ्या कागदी अभ्यासाच्या पलिकडचा विचार करायला भाग पाडणारे असे आबांचे जाणे घडले आहे. आबांसारखी, जीवनातील प्रत्येक पायरीवर आपली कर्तव्ये पार पाडत, जीवनाचा उद्देश समजून घेत थोडेसे अंतर्मुख होऊन जगणारी माणसे आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत असली तरी त्यांच्या स्मृती अनेकांच्या हृदयांतरी कायम राहतील असेच त्यांचे जगणे होते. जन्माला आलेला प्रत्येक जीव तसा हळूहळू आपल्या शेवटाकडे प्रयाण करीत असतो. हा प्रवास अखंड सुरु असतो. त्याचा शेवट शांत आणि समाधानाने व्हावा असे आपल्याला कितीही वाटत असले तरीही प्रत्येकाच्या बाबतीत तसे घडतेच असे नाही, या मागची कारणमीमांसा हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीने केलेली आहे. परवाच्या रविवारी (१० फेब्रुवारी) चिपळूण-नवीमुंबई-चिपळूण प्रवासात, दिवसभर ड्रायव्हिंग करत असताना सायंकाळी चारसव्वाचारच्या सुमारास एका निवांत क्षणी वॉट्सअप पाहताना अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या ‘प्रवक्ता’ ग्रुपवर प्रवक्ते विश्वनाथ डवरी यांनी दुपारी २.२५ वाजता टाकलेली पोस्ट वाचून मन कातरले. ती पोस्ट आबांची प्रकृती बिघडल्याची जाणीव करून देण्याबाबतची होती. गेल्याच रविवारी (३ फेब्रुवारी) बरोबर याचवेळी आबा, ‘नाथभूषण’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आ. संजय कदम आणि नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत सत्काराला उत्तर देत होते. ‘या पुरस्कारामुळे आपण कृतार्थ झालो आहोत. ज्या समाजासाठी झटलो. त्यांनी आपले प्रेम या पुरस्काराच्या रूपाने परत दिले त्यामुळे आता कोणतीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. या कार्यक्रमानंतर आबांचे ज्येष्ठ चिरंजीव संदीप यांच्या आग्रहाखातर घरी आम्ही जाऊन चहापान घेतले होते. आबांची तेव्हाही भेट झाली होती. तशी तब्बेत ठीक नव्हती. आबा झोपूनच होते. हे सारे आठवले. तातडीने चार वाजून एकोणीस मिनिटांनी संदीपना फोन लावला. फोनवर ‘आबा गेले !’ एवढंच काय ते ऐकू आलं. बाकी संदीप यांच्या रडण्याचा आवाज कानात येत राहिला. २७ सेकंदांनी फोन बंद झाला. क्षणभर काय करावे ? हेच समजेना. विज्ञानयुगातील हा ‘भ्रमणध्वनी’ आपल्याला कोणत्या क्षणांना सामोरे जायला लावेल याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. संदीपचे शब्द पुनःपुन्हा कानात आठवून चार वाजून अडतीस मिनिटांनी आम्ही वॉट्सअपवरून घडलेली घटना इतरांना कळविली, इतक्या लवकर कळवणे योग्य होते की अयोग्य ? याबाबतही नंतर आमच्या मनात द्वंद्व राहिले. नंतरच्या वृत्तात आबांच्या जाण्याची वेळ सायंकाळी ४.२० अशी नोंदवलेली होती.  

समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी, विधानभवनात साप आणि माकड सोडणारे नेते अशीही त्यांची ओळख होती. भंडारे, यांना अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ यांच्या सहीने दिलेले प्रवक्ता विश्वनाथ भंडारी यांनी लिहिलेले मानपत्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आजच्या पिढीस ओळख करून देण्यास पुरेसे आहे. त्यातील वर्णनानुसार, नाथ संप्रदायासारख्या महत्त्वपूर्ण पवित्र अशा समाजात आपला जन्म दिनांक ऑगस्ट १९४६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रामचंद्र रक्कमनाथ भंडारे असे नाव आपण धारण केले. परिस्थितीशी टक्कर देत आपले बालपण गेले. मंत्रालयासारख्या मोठ्या ठिकाणी आपण शासनाची सेवा केलीत. ही सेवा प्रामाणिकपणे करत असतानाच आपला नाथ समाज सुद्धा आपण विसरला नाहीत. मंत्रालयात डेस्क ऑफिसर, रेकॉर्ड इन्चार्ज आपण होता आणि इंडस्ट्री हे खाते आपणाकडे होते. मंत्रालयात संपूर्ण राज्यातून लोक येत असतात; त्या दृष्टीने आपण येणाऱ्या समाजाच्या लोकांना भेटून त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात. एक नव्हे- दोन नव्हे -तर तब्बल पंचवीस वर्षे महाराष्ट्र नाथजोगी सेवा समाज मुंबई, या संस्थेचे आपण सचिव म्हणून काम केले आहे. विमुक्त भटक्या जमातीचे आपण सन्माननीय सदस्य सुद्धा होता. लक्ष्मण माने, मच्छिंद्र भोसले, बाबुराव चव्हाण आदी मान्यवरांच्या बरोबर आपण समाज एक करण्याचा प्रयत्न केला. अनेक मेळावे घेतलेत. त्यापैकी १९८७ ला अखिल महाराष्ट्र नाथजोगी समाजाचा महामेळावा आपण खेड या ठिकाणी घेतला होतात. मंत्रालयामध्ये आपण समाज कल्याण सल्लागार बोर्डावर सुद्धा होता. ज्येष्ठ नेते डॉक्टर जयाजी नाथ व डॉक्टर गोरखनाथ चव्हाण यांना आपण स्वतः संस्थेमध्ये घेतले होते व त्यांना मार्गदर्शनही केले होते. यावेळी संस्थेच्या इतर काही लोकांनी 'हे आपल्या जातीचे नाहीत' अशा प्रकारे विरोध केला होता; परंतु अशा प्रकारच्या बारीक-सारीक अडथळ्यांना लिलया पार करण्याचे कसब तुमच्याकडे होते. आपण अनेक वधू-वर मेळावे सुद्धा घेतले. अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. आपण अनेक मोर्चे घेतले, त्यामध्ये पुंगीवाले, सापवाले, नंदीबैलवाले, माकडवाले यांना घेऊनही आपण मोर्चे काढलेले आहेत. आपण विधान भवनावर काढलेल्या मोर्चाला मंत्री भेटायला येत नाहीत या रागातून आपण विधानभवनामध्ये साप आणि माकडे सोडली होती !! त्यामुळे गहजब झाला होता !! भारताची राजधानी दिल्ली येथे सुद्धा आपण एन. डी. सोनवणे संरक्षक यांच्या बरोबर मोर्चा काढून धडक दिली होती. नागपूर येथे काढलेल्या मोर्चा मध्ये सुद्धा आपले नेतृत्व सिद्ध झाले होते. वयाची कोणतीही तमा न बाळगता व शरीर प्रकृतीकडे लक्ष न देता आपण आज सुद्धा कोकणामधील गोरगरीब नाथ जोगी समाजाचे काम करीत आहात. आपण वयाने सुद्धा आता ज्येष्ठ असून, अनुभवाने परिपक्व आहात. या वयातही आपण मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहात, ही कौतुकाची व अभिमानाची अशी बाब आहे. नाथ जोगी समाजाचे चरित्रकार म्हणून इतिहास तुमच्याकडे पाहिल आणि संघटनेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा इतिहास तुम्हाला टाळून पुढे जाऊ शकणार नाही !! पुढील आयुष्यात तुमची तब्येत चांगली राहावी व तुमची शंभरी पूर्ण व्हावी, अशी परमेश्वराकडे या सन्मानपत्राच्या निमित्ताने प्रार्थना करुन आपण केलेल्या कार्याचा गौरव म्हणून, आपला अधिकार मान्य करून अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या हातात असलेला सर्वोच्च  "नाथ भूषण" हा पुरस्कार आपणाला सन्मानपूर्वक व कृतज्ञतापूर्वक अर्पण करण्यात येत आहे !! या मानपत्रासहच्या सत्कारानंतर अवघ्या आठच दिवसात आबांची प्राणज्योत मालवली.

आत्तापर्यंत जगलेल्या एकोणचाळीस वर्षांपैकी तेवीस वर्षांच्या सक्रीय सामाजिक आयुष्यात, स्वतःच्या समाजात वावरण्याचा अत्यंत कमी संबंध आलेल्या माझ्यासारख्याला अखिल भारतीय नाथपंथी महासंघाने गेल्या रविवारी (३ फेब्रुवारी २०१९) नाथभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने 'कोकण आणि नाथपंथ' या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केले होते. याच कार्यक्रमात आबांशी झालेली माझी ती पहिली भेट दुर्दैवाने शेवटची ठरली. जन्म आणि मृत्यू या आपल्या नियंत्रणापलिकडील मानवी जीवनातील अटळ घटना आहेत. दरम्यानच्या आयुष्याची समीकरणेही इतकी साधी नसतात. आयुष्यातील शेवट गोड व्हावाही इच्छाही प्रत्येकाच्या अंतरी असते. पण तसे भाग्य सर्वांनाच लाभते असे नाही. असे विलक्षण भाग्य लाभलेले, आम्ही पाहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणून आमच्या मनात आर. आर. भंडारे यांची सदैव नोंद राहील.

धीरज वाटेकर

दैनिक उद्याचा मराठवाडा (नांदेड) दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ 

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

चिपळूणचे वैभवशाली वस्तूसंग्रहालय


अफाट ग्रंथसंपदा, हजारो दुर्मीळ ग्रंथ अशी पैशात मोजता न येणारी बौद्धिक संपत्ती लाभलेल्या चिपळूणच्या तब्बल १५५ वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले ‘संग्रहालय’ अलीकडेच (२४ नोव्हेंबर २०१८) मूर्तिशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयातील अधिकारी व्यक्तिमत्त्व डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या शुभहस्ते पर्यटक, अभ्यासक, जिज्ञासूंसाठी खुले केले. भगवान परशुराम यांचे वास्तव्यस्थान, क्रोकोडाईल टुरिझमसाठी प्रसिद्ध ‘ऑफबीट डेस्टीनेशन’ चिपळूणातील हे संग्रहालय कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव ठरते आहे. भारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षातल्या विविध वस्तूंचा दुर्मीळ ठेवा पाहायला उपलब्ध असलेले पनवेल ते पणजी दरम्यानचे हे एकमेव संग्रहालय आहे.

वस्तुसंग्रहालयाची पाहाणी, जुन्या रचनेच्या देखण्या प्रवेशद्वारापासूनच सुरु होते. प्रवेशद्वाराच्या उजव्या कोपऱ्यातील लक्ष वेधून घेणाऱ्या दगडी वस्तू आपल्याला वस्तुसंग्रहालयाच्या जगात घेऊन जातात. दरवाजातून आतमध्ये गेल्यावर दिसणारी आकर्षक रचना आपले लक्ष वेधून घेते. आजच्या पिढीला माहिती नसणाऱ्या अनेक वस्तू इथे पाहाता येतात. भाकरी थापणारी कोकणी महिला आपल्याला ग्रामीण कोकणातल्या स्वयंपाकघरात घेऊन जाते. सहसा पाहायला न मिळणारे, आवर्जून बनवून घेण्यात आलेले इथले हरिक दळायचे जाते आपल्याला ‘हरिक’ म्हणजे काय ? या प्रश्नात टाकते. तीस-पस्तीस वर्षापूर्वीपर्यंत कोकणी लोकांच्या जेवणात मुख्य अन्न म्हणून हरिकाचा भात असे. पुढे कोकणचा ‘विकास’ आडवा आला, तांदळाची (भात) विविध बियाणी उदयास आली आणि पचायला हलका असणारा हरिकाचा भात मागे पडला. पर्यायाने हरिकाचे उत्पादन थांबले. हरिक हे तीळासारखे लहान असते. त्याचा भात पौष्टिक, चविष्ट असतो. हा भात साबुदाण्यासारखा फुलतो. सन १९५०-५५ सालात रत्नागिरी जिल्हय़ात प्रत्येक शेतकरी ९० टक्के हरिक आणि उर्वरितात वरी, नाचणी, वरिक आणि कडधान्ये-भाजीपाल्याची काही पिके घेतली जात असतं. या हरिकाच्या अत्यंत चिवट रोपकाडीचा उपयोग घरबांधणीसाठी काढाव्या लागणाऱ्या मातीच्या मापांमध्ये होत असे, असो ! एखाद्या प्रश्नातून जिज्ञासूला अशी अत्यंत ज्ञानरंजक माहिती उपलब्ध करून देण्याची क्षमता संग्रहालयामध्ये असते, म्हणूनच कशाच्याही निमित्ताने प्रवासाला दूरदेशी कोठेही गेलो, तर तेथील संस्कृतीची प्रतिक असलेली संग्रहालये आवर्जून पाहावीत असे म्हटले जाते.


                    


संग्रहालयात शिरल्यावर डाव्या बाजूने पाहात आत गेलो की मनाला थक्क करणाऱ्या अनेक वस्तू दिसतात. सुरुवातीलाच दोन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन दगडी हत्यारे, हडप्पा इथल्या उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणाच्या संशोधन, उत्खननात सापडलेली भांडी असा दुर्मीळ पुरातन वस्तूंचा खजिना दिसतो. इथल्या काही दगडी वस्तू, मातीची भांडी, खापऱ्या आपल्याला तब्बल किमान १२ लाख वर्षे (आदम पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग, इतिहासपूर्व, नवपाषाण, सिंधुसंस्कृती, ताम्रपाषाण, महापाषाण) मागे घेऊन जातात. या वस्तू जागतिक कीर्तीच्या डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (डेक्कन अभिमत विद्यापीठ) पुणे यांनी कुलगुरू डॉ. वसंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. बालाजी गाजूल (अभिरक्षक, पुरातत्त्व संग्रहालय, डेक्कन कॉलेज पुणे) यांच्या सहकार्याने उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय पहिल्या शतकातील इराणी कुंभ, सातवाहनकालीन जाते, शहरातील वीरेश्वर मंदिर परिसरात मिळालेली देवीची महिषासुरमर्दिनी स्वरूप मूर्ती, भोम (ता. चिपळूण) येथील वाघजाई देवीची मूर्ती, बाराव्या शतकातले वीरगळ, कोरीव दगड, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, ढाल, तलवारी, तोफगोळा, भाला, जंबी, कट्यार आदि शिवकालीन शस्त्रे, दगडाच्या ठोकळ्यात कोरलेला चारशे वर्षपूर्व गणपती, कलात्मक कंदिल, दुसऱ्या महायुद्धात वापरलेली भूमापन दुर्बिण, वाळूचे घड्याळ, फोनचा प्रवास दर्शविणारे जुने लाकडी टेबलावरील, भिंतीवरील टेलिफोन, वैशिष्ट्यपूर्ण रचनायुक्त बहिर्वक्र भिंग, तिबेटीयन घंटा, कालबाह्य वजने, सायाळीच्या काट्यापासून बनविलेली पेटी, दक्षिण धृवावरील दगड, कोकणात मिळणारी अभ्रक (कणकवली), सिलिका (कासार्डे-तरळा), आयर्न ओव्हर (फोंडा-कणकवली), क्वार्ट्ज (वाटूळ-लांजा), बॉक्साईट (केळशी-दापोली), जांभा (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) आदि खनिजे, होकायंत्राची दिशा बदलविणारे दगड, जुना सारीपाटाचा खेळ वेगवेगळ्या आकर्षक रचनेत मांडण्यात आलेले आहेत.



                          


ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार शिवाजीराव सावंत यांच्या संग्रहातील धोंडो केशव कर्वे, वि. स. खांडेकर, ना.सि. फडके, दत्तो वामन पोतदार, पां. स. साने, सानेगुरुजी, दादासाहेब मावळणकर, सेनापती बापट, जयप्रकाश नारायण यांच्या सन १९४० दरम्यान घेतलेल्या स्वाक्षऱ्या येथे पाहाता येतात. सावंत हे सन १९४० साली रत्नागिरीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजन समितीचे सदस्य होते. दोनशे वर्षपूर्व ब्रिटीशकालीन, होळकर संस्थान (इंदूर), सांगली संस्थान, श्रीमंत सरकार गायकवाड (बडोदे), जोधपुर सरकार यांचे स्टॅम्पपेपर, ग्रामर ऑफ संस्कृत हे सन १८०५ चे कलकत्यातून प्रकाशित झालेले पुस्तक, दोन आणे किमतीची भगवद्गीता प्रत, दोनशे वर्षे जुनी हस्तलिखिते, सन १७६३ सालचे झांशी संस्थानचे जमा-खर्चाचे कागद, सन १८३४ साली पार्थिवेश्वराला (पाथर्डी-चिपळूण) दिलेल्या सनदेची मूळप्रत, लोकमान्य टिळकांनी दिनांक १३ फेब्रुवारी १९२० रोजी चिपळूणला पाठविलेल्या पत्राची प्रत, ‘मु.पो. चिपळूण बंदर’ असा उल्लेख असलेली ईस्ट इंडिया कंपनीची पोस्टकार्ड आपल्याला इतिहासात घेऊन जातात. दोन हजार वर्षांपूर्वीपासून अगदी स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश कालखंडापर्यंतची नाणी येथे पाहाता येतात. ज्यात मौर्य, सातवाहन, कुषाणकाळ, शीलाहार, रोमन, पोर्तुगीज डच, शिवकालीन, पेशवेकालीन, इंदूर संस्थान, नागपूर संस्थान, झांशी संस्थान, ग्वाल्हेर संस्थानची पुरातन नाणी, पहिल्या महायुद्धात मिळालेली सन्मानपदके, १२ व्या शतकातील सोन्याचे पद्मटंक आणि शिलाहारकालीन (शतक नऊ ते अकरा) डाळीच्या एका दाण्याच्या आकाराचे सोन्याचे फनम संग्रहालयाच्या खजिन्याचे मूल्य वाढवित आहेत. विचारपूर्वक तयार करण्यात आलेले कोकणातल्या खेडेगावातील स्वयंपाकघर, तिच्यातली भाकरी थापणारी महिला, आजूबाजूचे चूल, चिमटा, फुकणी, तांब्या, लाकडाचा पलेता, पाटा-वरवंटा, गरम पाणी तापवण्याचे तपेले, कंदील, लाकडाची विळी, रॉकेलचा दिवा आदि साहित्य आपल्याला ग्रामीण लोकजीवनाचा नजरा दाखवते. त्या सोबतच कोकणी वापरातल्या कणगी, पाणी तापवायचा बंब, हरिक दळायचे जाते, पातेली, काथवट, लाकडी मापटी, घिरट, उखळ, शंभर वर्षपूर्व लाकडीपेटी, पंचपाळ, चौफुला, नारळाच्या करवंटीपासून बनविलेले जेवण वाढायचे डाव, तांब्या-पितळेचे हंडे-कळश्या यांसह कोकणी देवघरातील दोनशे वर्ष जुनी प्रभावळ, समई, फुलदाणी, आरतीचे ताट, पंचपाळ, संपुष्ट, तेल घालायचे भांडे, करा दिवा, पंचदीप, पूजेची उपकरणे, रक्तचंदन विष्णुमूर्ती आदि दोन-तीनशे वर्षापूर्वीच्या वस्तू आपल्याला कोकणाची सैर घडवून आणतात.







संग्रहालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वाचन मंदिराचे ‘कलादालन’ उभे राहते आहे. या कलादालनात आपल्या कर्तृत्त्वाने कोकणच्या लाल मातीचा सुगंध देशासह जगभर पोहोचविलेल्या निवडक ७५ कोकणरत्नांची तैलचित्रे पाहाता येतील. या सर्व कोकणरत्नांच्या कार्य-कर्तृत्त्वाची माहिती असलेली रंगीत पुस्तिकाही अल्पदरात उपलब्ध केली जाणार आहे. त्या माध्यमातून कोकणच्या मातीचा सुगंध सर्वांना अनुभवता येईल. दिनांक १ ऑगस्ट १८६४ रोज स्थापन झालेले अनेक दोलामुद्रित पुस्तके, जुन्या पोथ्या असा दुर्मीळ ग्रंथसंग्रह ३०० वर्षांपूर्वीची हस्तलिखिते, ग्रंथसंख्या ६२३४४, दुर्मिळ ग्रंथ १४२७, संबंधित लेखकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या ३०० पुस्तकांची उपलब्धी असलेल्या वाचनालयाचे हे संग्रहालय आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी हे वस्तूसंग्रहालय उभारण्याचे स्वप्न पहिले होते. त्यांच्यासह वाचन मंदिराचे अध्यक्ष, नामवंत कवी अरुण इंगवले आणि सर्व संचालक मंडळाची मेहनत या संग्रहालय उभारणीमागे आहे. कमी जागेतही एखाद्या राष्ट्रीय संग्रहालयासारखी मांडणी हे वस्तुसंग्रहालयाचे वैशिष्ट्य असून त्या कौशल्यामागे ज्येष्ठ कला मार्गदर्शक प्रकाश राजेशिर्के यांची मेहनत आहे. या वस्तूसंग्रहालय दालनाएवढी चार दालने सामावतील एवढ्या जुन्या वस्तू, नाणी, हस्तलिखिते, ग्रामदेवता पालखी, दगडी वस्तू, इरलं, शेतीची औजारे आदि वाचनालयाला अद्यापी जागेअभावी मांडता आलेली नाहीत.

कोकणची सांस्कृतिक राजधानी, चिपळूण हे महाराष्ट्रात वेगाने विकसित झालेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील एक प्रमुख शहर आहे. कोकणात-चिपळूणात येणाऱ्या इतिहासप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक, पर्यटक, शालेय सहली, नव्या पिढीतील तरुणांनी हे संग्रहालय आवर्जून पाहायला हवे ! हे संग्रहालय-कलादालन बुधवार, सार्वजनिक सुट्टी वगळता इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले असते. तिकीट दर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ५ रुपये तर इतरांसाठी १० रुपये इतका आहे. संपर्कासाठी पत्ता : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संग्रहालय, जुन्या बहिरी मंदिराजवळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, दूरध्वनी : ०२३५५ – २५७५७३, मो. ९४२३८३१६६८.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.                
मो. ९८६०३६०९४८, dheerajwatekar@gmail.com







सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

माने सर ! विद्यार्थी प्रिय शिक्षक ते मुख्याध्यापक !


रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर आगवेकर सरांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलोरे हायस्कूल अलोरे शाळेतून सेवानिवृत्त होताना स्वतः आगवेकर सरांनी, आपल्या पश्चात शाळेच्या मुख्याध्यापक पदाकरिता खात्रीपूर्वक विश्वास दाखवलेले, ‘ज्ञानमंदिर पावित्र्यासाठी, केवढा जीवाचा आटापिटा !’ ही काव्यभावना जगणारे अरूण केशव माने सर हे आजपासून शाळेच्या (मोरेश्वर आत्माराम आगवेकर हायस्कूल अलोरे) मुख्याध्यापक पदाची सूत्रे स्वीकारत आहेत. माने सर हे आगवेकर सरांनंतरचे शाळा आणि सर या सूत्रात सामावणारे, दीर्घकालीन कारकीर्द लाभलेले अफलातून व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या सेवाकारकिर्दीतील हा अखेरचा टप्पा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. तो अधिकाधिक संस्मरणीय करण्याची जबाबदारी त्यांच्या हाताखाली घडलेल्या, जगभर सर्वदूर पसरलेल्या विद्यार्थ्याची आहे. त्याची सुरुवात आजपासूनच, चिपळूण येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक सागर या वृत्तपत्रात विशेष अर्धपान पुरवणी प्रकाशित करून सन २००० च्या इयत्ता दहावीच्या बॅचने केल्याने तेही सर्वजण अभिनंदनास पात्र ठरताहेत ! 

शालेय जीवन समृद्ध मानवी जीवनाचा पाया मानला जातो. आमच्यासारख्या अगणित विद्यार्थ्यांचा हा पाया सर्वार्थाने बळकट करण्यासाठी मुलांना शिस्त लावणारे, आयुष्यावर जीवनमूल्यांचे संस्कारासह वक्तशिरपणा, वेळापत्रकानुसार वर्तवणूक, वेळच्यावेळी अभ्यास या गोष्टींची सवय लावणारे प्रसंगी अगदी व्यक्तिगत पातळीवर परिश्रम घेणारे माने सर आमच्यासह अनेकांच्या पक्के स्मरणात आहेत. मजबूत झाडाच्या फांद्या कायम नम्र असतात. निसर्गाच्या या नियमाचे सदैव भान असलेल्या सरांचा ‘शिक्षित विद्यार्थी देश घडवू शकतो’ या तत्त्वावर गाढा विश्वास आहे. दिनांक १० मे १९६२ ला जन्मलेले, बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळचे रहिवासी असलेल्या सरांनी आपले शिक्षण अत्यंत खडतर वातावरणात पूर्ण केले आहे. दिनांक १ जून १९८६ पासून काही महिन्यांचा अपवाद वगळता माने सर अलोरे शाळेत कार्यरत आहेत. हाताखालून गेलेल्या विद्यार्थ्यांना सरांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे. शिस्तीच्या माध्यमातून स्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला जमलं नाही तर आयुष्यात अनेक  समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे व्यक्तीला शालेय जीवनात स्व-नियमन सवयीची आणि त्याकरिता शिस्तीची गरज असते. सर्वसाधारणपणे कडक शिस्त ही गोष्ट मुलांच्या जगात फार चांगली मानली जात नाही. थोडीशी बदनामच असते. परंतु खरी शिस्त ही वागण्याबाबत नसून मनाला, विचारांना असावी लागते. आश्वासक जीवनासाठीचा ती महत्त्वाचा पाया असते. तशी शिस्त आपल्या विद्यार्थ्यांच्यात पेरण्यात आपल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून माने सर यशस्वी झाले आहेत. स्वत: मानेसर हे स्व-नियमित जीवनपद्धतीचे आदर्श उदाहरण आहेत आणि आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत ही जीवनातील केवढी तरी मोठ्ठी आनंदाची बाब आहे.

अलोरे हायस्कूल अलोरे शाळेला महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर स्वतंत्र स्थान आहे. शाळा सन २०२२ साली आपला सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वातावरणात अलिकडच्या कालखंडात घडलेल्या, काळाच्या गतीचे अचूक भान असलेल्या विभावर वाचासिद्ध सरांचे अलोरे शाळेतील आगमन, शाळेचा झालेला ‘मोरेश्वर आत्माराम आगवेकर हायस्कूल’ हा नामकरण सोहोळा आणि आता अरुण केशव माने सरांची मुख्याध्यापक पदी झालेली नियुक्ती या सकारात्मक घटनांकरीता शाळेचे संस्थाचालक आदरणीय डॉ. विनय नातू साहेब आणि त्यांचे सर्व संचालक मंडळाचेही अभिनंदन करावयास हवे ! जाताजाता पुन्हा एकदा अत्यंत सुसंस्कृत, मनमिळाऊ, साधी राहणी अन् उच्च विचारसरणी लाभलेल्या, अनुकरणीय व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या माने सरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

धीरज वाटेकर

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

‘वंदनीय’ अटलजी...!

दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने वंदनीय अटलजींचं निधन झाल्याची बातमी आली आणि देशातल्या आमच्यासारख्या असंख्य संवेदनशील नागरिकांना जणू आपल्याच घरातलं वडीलधारं गेल्यासारखं वाटलं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात संपूर्ण भारतीय जनमानसावर ज्या मोजक्या नेत्यांनी आपली छाप सोडलेली दिसते त्यात अफाट विद्वत्तादेवळाच्या गाभाऱ्यात पसरलेल्या सोज्वळ प्रकाशासारखा सुसंस्कृतपणा आणि अजातशत्रुत्व लाभलेले पूर्व पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान फार वरचे आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी राहिलेले अटलजी हे पत्रकारकवीलेखकविचारवंतराजकीय नेते तर होतेच परंतु त्यांची खरी ओळख सह्रदयीदिलदारनिखळ मनाचा माणूस म्हणून अधिक होती. भारतीय राजकारणाचे स्वातंत्र्यानंतरचे एक युग गाजवलेल्याआपल्या पक्षाच्या विचारसरणीसह मर्यादेचे सजग समाजभान असणाऱ्याआपल्या विचारधारांशी समर्पित राहिलेल्या राष्ट्रतेज अटलजींचे मानवी मूल्य कालौघात समाजाच्या अधिक प्रखरतेने लक्षात येत राहील.


      सन १९२४ च्या डिसेंबर महिन्यातल्या २५ तारखेला, मध्यमवर्गीय कुटुंबात शिक्षक कृष्णबिहारी आणि कृष्णादेवींच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शब्दांचं सामर्थ्य अटलजींकडे त्यांच्या वडिलांकडूनच आलं होतं. आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी अशी इच्छा असणाऱ्या त्यांच्या कुटुंबाला स्वप्नातही वाटलं नसेल की ग्वाल्हेरच्या मातीत खेळणारा हा मुलगा एक दिवस आपल्या शब्द सामर्थ्याच्या बळावर देशातील कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल ! खरंतर कॉलेजच्या दिवसापासूनच अटलजींच्या शब्दांनी लोकांना वेड लावलं. त्यांच्या जीभेवरच्या सरस्वतीने अनेकांना मोहित केलं. एका छोट्या शहरातला हा मुलगा, विद्यार्थी नेता म्हणून नावारुपाला येत असतानाच कर्तृत्व गाजवत होता. त्यांचा संघाशी सर्वप्रथम संपर्क आला त्यावेळी ते आर्य समाजांतर्गत बालसंघटन आर्यकुमार सभा ग्वाल्हेर या संस्थांशी संबंधित होते. ग्वाल्हेरच्या आर्यकुमार सभेचे प्रमुख कार्यकर्ते भूदेव शास्त्री यांनी एक दिवस आर्य समाजाच्या साप्ताहिक सत्संगाशिवाय संध्याकाळी रोजच्या शाखेत जाण्यासाठी प्रोत्साहित केले व त्यातून अटलजी लहान असताना संघ शाखेत दाखल झाले. अटलजी ग्वाल्हेरला ज्या शाखेत जात असत, त्या शाखेतील बहुतांश बाल स्वयंसेवक मराठीत बोलत असत. अटलजींना शाखेतील रोजचे खेळ, साप्ताहिक बौद्धिकवर्ग विशेष आवडत. येथे संघदृष्ट्या बाल अटलजींवर प्रभाव पडला, तो संघ प्रचारक नारायणराव तरटे यांचा. आज मी जो काही आहे तो स्व. नारायणरावजींमुळेच’, असे अटलजी मोठ्या आदराने व विनम्रपणे नमूद करीत असतं. संघदृष्ट्या अटलजींवर ज्या अन्य दोन महनीय व्यक्तींचा प्रभाव पडला त्या म्हणजे पं. दीनदयाळ उपाध्याय व स्व. भाऊरावजी देवरस. शाळेत दहावीत असताना हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचयही चिरस्मरणीय रचना लिहिणाऱ्या अटलजींनी संघदृष्ट्या १९४१ मध्ये संघ शिक्षा वर्गाचे (अधिकारी शिक्षण वर्ग) प्रथम वर्ष, १९४२ मध्ये द्वितीय वर्ष व १९४४ मध्ये बी.एच्या अंतिम वर्षाला असतानाच तृतीय वर्ष पूर्ण केले. महाविद्यायलीन जीवनात संघशाखा स्तरावर काम करणाऱ्या अटलजी हे महात्मा गांधी यांच्या ब्रिटीशांविरोधातील चले जाव, भारत छोडोया आंदोलनात सक्रीय होते. १९४२ मध्ये त्यांना या आंदोलनाच्या काळात कारावासाची शिक्षा झाली होती. पुढे कानपूरच्या डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये राज्यशास्त्रात एम. ए. केल्यानंतर सन १९४६ दरम्यान अटलजींनी कायद्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलेलं असताना ते संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता (प्रचारक) बनले आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याच विचारधारेशी अटलराहिले. सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रधर्म, वीर-अर्जुन, पांचजन्य या सारख्या नियतकालिकांमधून पत्रकारिता केली.

      सन १९५१ साली तरुण अटलजींमधली गुणवत्ता पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी हेरली. त्यांनी अटलजींना कानपूरहून लखनऊमध्ये बोलावून त्यांच्यावर 'राष्ट्रधर्म' या साप्ताहिकाची जबाबदारी सोपवली. याच दरम्यान डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली होती. अटलजींच्या राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा इथेच झाला. १९५७ मध्ये बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला जाताना कोणतेही रिझव्‍‌र्हेशन नसलेल्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यात, जिथे सामान ठेवतात त्यावरच्या बाकावर झोपून ते बलरामपूरला पोहोचले होते. त्यांच्या लालित्यपूर्ण शैलीत अपनी अपनी बातमध्ये या प्रवासाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. बलरामपूरच्या लोकांनी पहिल्यांदा विश्वास दाखवला आणि ते देशाच्या संसदेत पोहोचले. त्याकाळी जनसंघाचे केवळ ४ खासदार होते. शब्दांचा हा अटलधनी राजकीय पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू पाहात होता. १९५० - ६० च्या दशकात अटलजी नेहरूंच्या पक्षात नसले तरीही त्यांना भारताचा दुसरा नेहरू असे म्हटले जात होते. पंडित नेहरू हेही वाजपेयी यांच्या अत्यंत मुद्देसूद, अभ्यासपूर्ण भाषणाने प्रभावित असत. वयाची तिशीही न गाठलेले अटलजी संसदेत परराष्ट्र खात्याच्या मागण्यांवर भाषण करायला उभे राहात तेव्हा नेहरू सभागृहात नसले तरी पळत पळत लगबगीने सदनात येत असत आणि या तरुण नेत्याचे भाषण केवळ लक्ष देऊन ऐकत, हातात वही घेऊन त्या भाषणातले मुद्देही टिपून घेत असत. इतकी विलक्षण वक्तृत्व प्रतिभा कशी निर्माण होते ?’ याचं उत्तर देताना एके ठिकाणी अटलजी म्हणाले होते, ‘हा आमचा परंपरागत गुण आहे. माझे वडील उतम भाषणे करीत असत. मात्र ते नेते नसल्याने त्यांच्या या गुणाचे कौतुक झाले नाही !तरुणपणातल्या अटलजींनी अमोघ वाणीने संसदेत विरोधी पक्षाच्या बाकाला आणि विषयांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या सदस्याला, सत्ताधारी पक्षाच्या बाकावरचे सदस्य किती सन्मानाने वागवतात आणि त्याचा कसा आदर करतात ? याचे उदाहरण अटलजीच आहेत. सन १९५७ मध्ये त्यांनी परराष्ट्र खात्याच्या कारभारावर टीका करणारे जे भाषण संसदेत केले ते ऐकून तेव्हाचे परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान पं. नेहरू यांनी प्रधानमंत्री पद के लिए अटलजी का एक दिन पक्का..असे भाकीत केले होते. अटलजींनी नेहरूंचा तो शब्द आपल्या कर्तृत्वाने पुढल्या चार दशकांत खरा करून दाखविला.

      आपल्या राजकीय जीवनात कविमनाच्या अटलजींनी स्वतःतली संवेदना कधी हरवू दिली नाही. कवितेनंच त्याचं राजकारण समृद्ध बनवलं. आयुष्याचं रोज नवं गाणं लिहिणाऱ्या या कवीला अनेक अग्नीपरीक्षांना सामोरं जावं लागलं. दिनदयाळ उपाध्याय यांच्यानंतर अटलजींच्या खांद्यावर जनसंघाची जबाबदारी आली. ही जबाबदारी लिलया पेलत त्यांनी जनसंघ तळागाळात पोहोचवण्यासाठी जीवाचं रान केलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या इंदिरा गांधींनी १९७५ साली देशावर आणीबाणी लादली. त्यात सरकारनं अटलजींना जेरबंद केलं. सन १९७७ साली झालेल्या निवडणुकीत देशातल्या जनतेनं आणीबाणीविरोधात कौल दिला. अटलजींनी आपल्या पक्षाचे विलीनीकरण जनता पार्टीत केले. मोराजजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री बनले. आपल्या मंत्रीपदाच्या काळात अटलजींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठारून हिंदीतून भाषण करत भारताचा गौरव वाढवला. दुर्दैवाने अंतर्गत गटबाजीनं मोरारजींचं सरकार कोसळलं नि इंदिरा गांधींना पर्याय देण्याचं स्वप्न भंगलं. अटलजी अस्वस्थ झाले. १९८० साली अटलजींनी त्यांच्या सहकाऱयांसोबत 'भारतीय जनता पक्ष' या नावाने नव्या सुरुवातीचा शंखनाद केला. सन १९८० च्या दशकात जनता पक्षाचे नेते पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेताना, राजकारणातील सात्विक चेहरा अशी ओळख लाभलेल्या अटलजींनी भविष्यवाणी केली, ‘सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा, कमल खिलेगा !पुढे सन १९९६ साली हे भविष्य खरं ठरलं. १९८४ च्या निवडणुकीत मोठय़ा पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली. एकेकाळी ३० पेक्षा अधिक जागांवर आपले अधिराज्य गाजवणाऱ्या पक्षाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेले असतानाही त्यांनी धीर न सोडता आपल्या पक्षाचा चेहरा अधिक तेजोमय करण्याचा अखंड यशस्वी प्रयत्न केला. सन १९८९ नंतर कोणत्याच पक्षाला केंद्रात स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नव्हते. आघाडीच्या राजकारणाची चर्चा होत असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने १९९८ ते २००४ अशी सलग सहा वर्षे चालविलेल्या आघाडी सरकारचे आजही अनेकांना स्मरण होते. या काळात त्यांनी आघाडी सरकार चालविण्याचा आदर्श निर्माण केला. यात देशभरातील जवळपास ३० छोटे-मोठे पक्ष सहभागी झाले होते. सध्या यातील अनेक पक्ष भारतीय जनता पक्षाचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. अटलजींनी या पक्षांना बरोबर घेत सरकार कसे चालविले असेल ? याची कल्पना यावी.

      सन १९९६ साली केंद्रात भाजपचं सरकार आलं. अटलजी पंतप्रधान बनले. परंतु संख्याबळाच्या अग्निपरीक्षेला त्यांना सामोरं जावं लागलं. त्या दिवशीचं संसदेतलं त्यांचं भाषण संसदीय इतिहासातलं एक सोनेरी पान होतं. त्यांना संख्याबळ जमवता आलं नाही. त्यामुळे १३ दिवसात सरकार कोसळलं. पण अटलजींनी देशातील जनतेची मनं जिंकली. पुन्हा निवडणुका झाल्या. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार आलं आणि वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. देशाच्या चार दिशा जोडणाऱ्या स्वर्णिम चतुर्भूज योजनेतून अटलजींचा द्रष्टेपणा, शत्रूराष्ट्र पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करत दिल्ली-लाहोर बससेवा सरु करणाऱ्या अटलजींचा शांततेवर चा अटल विश्वास, जगाच्या दबावाला झुगारत पोखरणमध्ये अणूचाचणी करत दाखवलेला कणखरपणा, देशातलं पहिलं टिकलेलं गैरकाँग्रेसी सरकारं देणारं नेतृत्व, मूल्यांसाठी सत्तेला लाथ मारण्याची धमक दाखवणारी तत्वनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा देशानं पाहिली. अटलजीचं व्यक्तित्व हे देशातील कोट्यवधी लोकांना कायम प्रेरक, आश्वासक आणि मार्गदर्शक ठरून ते जात, पात, धर्म, पक्ष, पंथ या सगळ्यांच्या पलिकडचे आदर्श लोकनेता बनले. अटलजींच्या जीवनातला मोठा काळ तीव्र संघर्षात गेला. राजकारणातही ते व्यासंगी, सृजन, लढवय्ये, तत्वचिंतक नि बहुआयामी राहिले. अनेक चढ उतार त्यांनी आयुष्यात अनुभवले, सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले. लोकमान्यतेच्या अन लोकप्रेमाच्या अमृतधारा अनुभवल्या. ममता बॅनर्जी अटलजींना पितृस्थानी मानत. बिजू जनता दलाचे नविन पटनाईक हेही वाजपेयींना वडिलांप्रमाणे मानत. पश्चिम बंगालचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री राहिलेले ज्योती बसू यांनीही अटलजींसोबत राजकारणापलीकडची आपली मैत्री जपली. कॉंग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सिंग हे त्यांना गुरूजीम्हणून हाक मारत. अटलजी संघ परिवारापेक्षा अधिक देशात लोकप्रिय होते. अटलजी संघाचे होते आणि त्याचवेळी साऱ्यांनाही ते आपले वाटत होते ही गोष्ट पाहिली की त्यांच्या असामान्यत्त्वाची जाणीव होते. 

      रामभाऊ म्हाळगी आणि अटलजी यांचं नातं कायम अतूट होतं. सन २००३ मध्ये अटलजी पंतप्रधान असताना भाईंदरमधील उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचं लोकार्पण करण्यात आलं. लोकार्पणानंतर पंतप्रधान अटलजी आणि त्यांचे परममित्र उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी प्रबोधिनीत मुक्काम केला. सामान्यत: पंतप्रधान आणि उपपंतप्रधान सुरक्षेच्या कारणासाठी एकत्र प्रवास करत नाहीत, एकत्र राहत नाहीत. तरीही हे दोघे म्हाळगी प्रबोधिनीत शेजारी शेजारी राहिले, हा एक दुर्मीळ योग होता. अटलजींसारख्या मोठय़ा माणसाची ही छोटीशी कृती त्यांचं मोठेपण अधोरेखित करणारी ठरली. लोकशाहीची जगभरातील सर्वात मोठी परंपरा असलेल्या भारतीय राजकारणातील भीष्म पितामहम्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचेच एकमेव नाव घेता येईल, असे गौरवोद्गार माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी एकदा राज्यसभेत काढले होते. वर्षानुवर्षे राजकारणाच्या खुर्चीला चिकटून बसण्याची परंपरा भारतात पक्की रुजलेली असताना अटलजींनी सन २००५ साली स्वतःहून राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. ४० पुस्तके प्रकाशित झालेल्या अटलजींचा मेरी एक्क्यावन्न कविताएँहा काव्यसंग्रह विशेष गाजला. गीतकार साहिर लुधियान्वी यांचे कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है या गाण्याची, पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीची, पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाची त्यांना विशेष आवड राहिली. अटलजी अशा काळात वाढले, जेव्हा राजकीय पक्षाचे नेते आणि सामान्यजन यांच्यात फार मोठी दरी नव्हती. साहजिकच अनेक गावातल्या अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. त्यांचा दौरा असला म्हणजे आपलेपणाने वाट पाहाणारी अनेक कुटुंबं गावागावात दिसत. जेवणात त्यांना विशेष आवडणारी पुरणपोळी हमखास असे.

      पक्षहिताहून देशहिताला आणि राजकारणाहून राष्ट्रकारणाला महत्त्व देणारी जी मोजकी माणसे देशाच्या नेतेपदावर आतापर्यंत आली त्यात अटलजी अग्रेसर होते. मनाचा उमदेपणा हे अटलजींचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. वक्तृत्व आणि विद्वत्ता, कवित्व आणि द्रष्टेपण व राजकारणपटुता आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व या साऱ्या गोष्टी एकाच नेत्यात अभावाने आढळतात. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वात या गुणांचा मनोज्ञ संगम होता. विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना विरोधी नेता कसा असावा ? याचा आदर्श घालून देण्याबरोबरच देशाचा पंतप्रधान कसा असावा ? त्याचाही परिपाठ त्यांनी आपल्या कारकिर्दीत साऱ्यांसमोर ठेवला. आपल्या भाषणात शुरु से शुरुवात करू  या  अंत से  आरंभ करूअसा नादमधुर अनुप्रास साधणारे अटलजी काश्मीर समस्येबाबत बोलताना, ‘आँखो से रोशनी कैसी अलग हो सकती है ? होटों से मुस्कान कैसी अलग हो सकती है ?’ असं काव्यमय रूपक मांडायचे. अटलजींची संघाबद्दलची आत्मीयता जाणवणारे, निष्ठावंत स्वयंसेवकासारखे अनेक प्रसंग सांगितले जातात. मी संघाच्या संपर्कात आलो, दीर्घकाळ संघ संघटनेत राहिलो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मला रा.स्व.संघ मनापासून भावला. मला संघ तत्त्वज्ञान तर आवडतेच ! पण त्याहून अधिक अशी मला आवडणारी बाब म्हणजे, संघाची परस्परांच्या संदर्भातील व एकमेकांबद्दल जोपासली जाणारी धारणा.  साप्ताहिक ऑर्गनायझरमध्ये प्रकाशित आरएसएस इज माय सोलया आपल्या लेखात खुद्द अटलजींनी संघाशी असणारे संबंध, संस्कार यावर विस्तृत व स्पष्ट विवेचन केले आहे.

      अटलजी सभेसाठी श्रोत्यांची उत्सुकता ताणणारा उशीर फारच क्वचित करत. गर्दीचा अंदाज घेऊन त्यांचं भाषण सुरु होत असे. शब्दांचा प्रपात, कधी तीव्र, कधी मध्यम, कधी वीज तळपावी तसा तर कधी ऋजुता आणि पारिजातकाचा दरवळ भासे. त्यांची भाषणातली तन्मय मुद्रा लोभस असायची. देशाच्या राजकारणात जवळपास ६० वर्षे अविरत उत्साहाने आणि अतिशय सभ्यतेने अटलजी वावरले. पंतप्रधान होण्यापूर्वी अटलजींची जनसंघाचे संस्थापक सदस्य, खासदार (१९५७, १९६२), जनसंघाचे अध्यक्ष (१९६८ ते १९७३), लोकसभेतल्या जनसंघ गटाचे नेते (१९५७ ते १९७७), जनता पक्षाच्या सरकारात परराष्ट्रमंत्री (१९७७ ते १९७९), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८० ते १९८६), भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८० ते १९९६), भारताचे पंतप्रधान,  (१९९६ आणि १९९८ ते २००४) अशी प्रदीर्घ संसदीय कारकीर्द आहे. एकेकाळी प्रधानमंत्री की अगली बारी, अटलबिहारी अटलबिहारीअशा अनेक वेळा घोषणा दिल्या जात होत्या. त्या घोषणा केवळ अटलजींच्या नेतृत्वामुळेच वास्तवात उतरू शकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अटलजींना गुरूस्थानी मानायचे. ते वाजपयीच होते ज्यांनी माझ्या हाताला धरून मला अनेक राजकीय गोष्टी शिकवल्या’, असे उद्गार मोदी त्यांच्या कार्यक्रमात अनेकदा बोलून दाखवतात. अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी लिहिलेल्या विशेष ब्लॉगमध्ये मोदी लिहितात, ‘अटलजी कधीही आडमार्गाने गेले नाहीत. त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात नवीन मार्ग बनवले आणि निश्चित केले. वादळातही दिवा पेटवण्याची क्षमतात्यांच्यात होती. ते जे काही बोलायचे ते थेट जनमानसाच्या हृदयाला भिडायचे. आयुष्य कसे जगायचे, राष्ट्राची सेवा कशी करायची हे त्यांनी आपल्या जगण्यातून इतरांना शिकवले.

      अटलजी म्हणायचे, ‘आपण केवळ आपल्यासाठी जगू नये, इतरांसाठीही जगावे ! आपण राष्ट्रासाठी जास्तीत जास्त त्याग करायला हवा. जर भारताची स्थिती दयनीय असेल तर जगात आपला गौरव होऊ शकणार नाही. परंतु जर आपण सर्व दृष्टीने सुसंपन्न असू तर जग आपला गौरव करेल’. देशप्रेम ही भावना अटलजींच्या दृष्टीने सर्वोपरी होती. ते म्हणतं असतं, ‘भारत ज़मीन का टुकङा नही है, जीता-जागता राष्ट्रपुरुष है । हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है । कश्मीर किरिट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं । विनध्याचल कटि है, नर्मदा करधनी है । पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जँघाए हैं । कन्याकुमारी उसके चरण हैं, सागर उसके चरण पखारता है । पावस के काले-काले मेघ इसके कुंतल केश हैं । चाँद और सूरज इसकी आरती उतारते हैं । यह वंदन की भूमि है, यह अर्पण की भूमि है, अभिनन्दन की भूमि है । यह तर्पण की भूमि है । इसका कंकर-कंकर शंकर है,  इसका बिंदु-बिंदु गंगाजल है । हम जियेगें तो इसके लिये और मरेंगे तो इसके लिये।राष्ट्राप्रति अटलजींच्या या जाज्ज्वल्य देशभक्तीने भारलेल्या भावना वर्तमानात आजच्या आम्हां पिढीने जगणं म्हणजे अटलजी आपल्याला सदैव वंदनीयअसल्याच्या म्हणण्याचे सार्थक होईल.  


धीरज वाटेकर

‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.     
मो. ९८६०३६०९४८
dheerajwatekar@gmail.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...