रविवार, १३ डिसेंबर, २०२०

गावाचा वाढदिवस

        महाराष्ट्रात नुकत्याच १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यातल्या काही पंचायती पूर्णत:, काही अंशतः बिनविरोध झाल्या होत्या. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत यशस्वी झालेल्या सदस्यांकडून जनतेला सामाजिक प्रदूषण दूर होऊन गावच्या भल्याची अपेक्षा असणार आहे. ग्रामपंचायती ह्याच देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या कणा असल्याने त्या चालविणाऱ्या विश्वस्थांची जबाबदारी मोठी आहे. या पार्श्वभूमीवर विचार करताना मागच्या २०२०च्या दीपावलीनंतर कोरोना अनलॉक वातावरणात (२३ नोव्हेंबर) आम्ही कार्यरत असलेल्या, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वेबसाईटकरिता शुभसंदेश रेकॉर्ड करताना बोलण्याच्या ओघात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलेली ‘गावाचा वाढदिवस’ संकल्पना आठवली. यापूर्वी कधीतरी अण्णांच्याच तोंडून ऐकलेली ही सामाजिक प्रदूषण दूर सारण्याची क्षमता असलेली संकल्पना या भेटीत वन-टू-वन ऐकल्यावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवर्जून नोंदवावीशी वाटली.

'खेड्यांकडे चला' हा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अनेक वर्षांपूर्वी दिला होता. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेमागेही तेच सूत्र आहे. राळेगणसिद्धीप्रमाणे शासनाचे विविध पुरस्कार पटकावणारं वाशिम जिल्ह्यातील जांभरूण महाली गावही ‘गावाचा वाढदिवस’ साजरा करतं. महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाने बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या इंग्रजी पुस्तकात ‘टुवर्डस् आयडियल व्हिलेजेस्’ पाठात या गावाची दखल घेतली आहे. राज्यात वैशिष्ट्यपूर्ण काम करणारी पोपटराव पवारांचे हिवरेबाजार, कोकणातल्या डॉ. प्रसाद देवधरांचे झाराप आदी काही गावं आहेत. समाजाने आणि माध्यमांनी अशा गावांची आणि तिथल्या प्रयोगांची सातत्याने विशेष दखल घ्यायला हवी आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांची ‘गावाचा वाढदिवस’ संकल्पना अधिक महत्त्वाची वाटते. ४० वर्षांच्या जन आंदोलनातून देशाला १० कायदे देणारे अण्णा आता ८४ वर्षांचे झालेत. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या वातावरणातही अण्णांनी केलेलं काम, त्यांचं असणं, तरुणांना मार्गदर्शन करणं, व्यक्त होत राहाणं आम्हाला महत्वाचं वाटतं. समाजकार्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्तींना कामाप्रति समाजाचा विरोधाभास दिसून आला तर नैराश्य येतं. अशा वातावरणात, ‘अध्यात्म माणसाला पूर्ण बदलू शकते, यावर माझा विश्वास आहे’, असं म्हणणारे अण्णा आम्हाला जवळचे वाटतात. यशस्वी ग्रामविकासासाठी नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदान या पाच सूत्रांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून अण्णा कमालीचे आग्रही आहेत. मंडळाच्या राज्य पर्यावरण संमेलनकारणे आम्ही २०१६ पासून अनेकदा, ४० वर्षांपूर्वी ओसाड, दुष्काळग्रस्त असलेल्या राळेगणसिद्धीतील जलसंधारण आणि ग्रामविकासाची कामे पाहिलीत. अण्णांच्या या कामातून प्रेरणा घेत देशातल्या अनेक गावांनी जलसंधारण व ग्रामविकासाची कामे सुरु केलीत. राळेगणसिद्धीतील जातीभेद नष्ट करण्यासाठी अण्णांनी गावकुसाबाहेरील कुटुंबांना आपले निवासस्थान असलेल्या यादवबाबा मंदिराजवळ वसविले. गावातल्या सर्वांचे विवाह एकाच मांडवात, एका मुहूर्तावर करण्याचा पायंडा पाडला. गावजेवण सुरु झालं. तुलनेने कमी शिकलेल्या अण्णांसारख्या विभूतीने सर्वस्वाचा त्याग करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले अशी उदाहरणे दुर्मीळ होताहेत. म्हणून त्यांचे महत्त्व अधिक आहे.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या संस्थेशी कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्यामुळे जोडला गेल्यानंतर आमचं राळेगणसिद्धीला जाणं होऊ लागलं. जलसंधारण, ग्रामविकास आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचा ध्यास घेतलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ऐकणं हा सामाजिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी असलेला समृद्ध जीवनानुभव आमच्याही पदरात पडू लागला. पुढे २०१६ साली ‘निसर्ग आणि सामाजिक प्रदूषण’ विषयावर अण्णांची विस्तृत मुलाखतही घ्यायला मिळाली होती. मंडळाच्या नव्याने बनविण्यात येत असलेल्या वेबसाईटसाठी शुभसंदेश रेकॉर्ड करताना अण्णांनी, राळेगणसिद्धी आणि जनआंदोलनांसंदर्भात विस्तृत माहिती असलेले ८ व्हिडिओ नुकतेच प्रदर्शित झाल्याचे म्हटले. या संदर्भात त्यांना अधिक विचारता अवघ्या मिनिटभरात पाणलोट क्षेत्रातून ग्रामीण विकास आणि ग्रामसभेची माहिती देत अण्णा सामाजिक पर्यावरणांतर्गत ‘गावाचा वाढदिवस’ संकल्पनेवर बोलू लागले. तसं याबाबत त्यांच्या तोंडून पूर्वीही ऐकलेलं होतं. पण का कोण जाणे ? आज (कदाचित कोरोना पार्श्वभूमीवर) त्या विषयातलं गांभीर्य अधिक जाणवू लागल्याने आम्ही शक्य तितक्या शांततेने अण्णांचे बोलणे ऐकू लागलो. अण्णा सांगत होते, ‘लोकं आपले वाढदिवस करतात. राळेगणसिद्धी परिवार गावाचा वाढदिवस करते. गावाचा वाढदिवस म्हणजे काय ? जन्माला येऊन एक वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना गावाने झबलं-टोपरं (अंगडं) घ्यायची. लग्न होऊन येऊन १ वर्ष झालेल्या गावातल्या सुनांचा खण, नारळ, साडी-चोळी देऊन सन्मान करायचा. गावातील वयोवृद्ध स्त्री-पुरुषाचं गावानं पूजन करायचं. सायंकाळी सर्वांनी एकत्रित भोजन करायचं. गावाच्या विकासाचं काम करणारे तरुण, शाळेतील यशस्वी विद्यार्थी आदिंना सन्मानित करायचं. हे सामाजिक पर्यावरण आहे. म्हणून गावाचा वाढदिवस देशभरातील गावागावात व्हायला हवा. यातून सामाजिक प्रदूषण दूर होईल. गावात पारिवारिक, एकोप्याची भावना वाढीस लागेल. गाव एक होईल.’ अण्णांचे विविध कामाचे ८ व्हिडिओ त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. त्यातल्या ‘राळेगणसिद्धी - जल संरक्षण क्षेत्र विकास’ या व्हिडिओत त्यांनी ‘गावाचा वाढदिवस’ या संदर्भातील आपली भूमिका मांडली आहे. गावातल्या वयोवृद्ध स्त्री-पुरुषाला आपले माता पिता मानून समस्त ग्रामस्थ त्यांचे पूजन करतात. एका वर्षात जन्माला आलेल्या बालकांना नवीन कपडे शिवले जातात. त्यांचा स्वागत केले जाते. लग्न करून गावात आलेल्या सुनांचा साडी चोळी देऊन सन्मान केला जातो. समाजसेवेचं काम करणाऱ्या गावातील युवकांचा सन्मान केला जातो. त्यांची प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न होतो. दरवर्षी २ ऑक्टोबरला, गांधी जयंतीदिनी हा गावाचा वाढदिवस (ग्रामपरिवर्तन दिन) होतो.

राळेगणसिद्धीत गावाचा वाढदिवस वर्षानुवर्षे सुरु आहे. हे काम पाहून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील भारावून गेले होते. आजचं आमचं बोलणं संपवून निघताना अण्णांनी, ‘सरकार पडण्याला घाबरतं. सरकार पाडण्याची शक्ती जोपर्यंत जनतेत येणार नाही तोपर्यंत खरे लोकतंत्र येणार नाही’ असं म्हटलं. या देशात ‘प्रजासत्ताक’ आलंय. त्याला ७१ वर्षे पूर्ण झालीत. ‘आज जनता देशाची मालक झाली आहे. ग्रामसभेला अधिकार देणारा कायदा देशाला हवा आहे. यासाठी जनतेचे संघटन करावं लागेल’, अण्णांचे हे विचार ऐकून आम्ही राळेगणसिद्धीच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या परिसरातून बाहेर पडलो. तेव्हा, ‘कथनी और करनी मैं अंतर नही होना चाहिये !’ हे अण्णांचं वाक्य कानात गुंजत राहिलं.  

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5443837279092300750&title=Birthday%20of%20Villages&SectionId=1002&SectionName=Be%20Positive








बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

वयस्क ‘नरसांबर’ दर्शन !

(छायाचित्र : गुगलच्या सौजन्याने)
     कालभैरव जयंतीच्या सोमवारची (७ डिसेंबर २०२०) सकाळ. वेळ साधारण सकाळी अकरा वाजताची. निसर्ग न्याहाळत जंगलातून चालायला सुरुवात होऊन तीनेक तास झालेले होते. चालताना सह्याद्रीत डाव्या हाताला दूरवर एका स्वतंत्र डोंगरावर विस्तीर्ण पसरलेल्या महिमतगडाचे रांगडे सौंदर्य, दुतर्फा दिसणारे त्याचे बुरुज पाहात आणि उजव्या बाजूच्या खोल दरीतील गुहेत विसावलेल्या श्रीक्षेत्र मार्लेश्वरचरणी मनोमन नतमस्तक होत लिंग डोंगराच्या दिशेने निघालेलो. दोनही बाजूला खोल दऱ्या असलेल्या दंडाच्या वाटेवरून चालताना, लिंगाचा डोंगर नजरेच्या टप्प्यात आला. नेमकं तेव्हा एका गवताळ टप्प्यावर डाव्या बाजूच्या झाडीतील आडोश्याला चरत असलेलं नर जातीचं वयस्क आणि रुबाबदार सांबर हरिण वाऱ्याच्या वेगानं आल्या वाटेला परत फिरलं अन् क्षणार्धात आमच्या नजरेआड झालं. दोन फुटाहून अधिक वाढलेली आकर्षक शिंगे आणि खांद्यापर्यंत किमान दीडेक मीटर उंचीचं, पूर्ण वाढ झालेलं, धिप्पाड देहयष्टी असलेल्या वयस्क एकलकोंड्या नरसांबराचं नजरेला पडलेलं शरीरसौष्ठव सौंदर्य केवळ अवर्णनीय !

सांबर हरीण (Cervix Unicolour) भारतात आढळणारी हरीणाची सर्वात मोठी आणि मुख्य जात आहे. सांबर हरिणाचा स्वभाव गरीब आणि भित्रा असला तरी त्याचा गडद तपकिरी रंग त्याच्या रुबाबात भर घालतो. आम्हाला ज्यानं दर्शन दिलं तोही असाच रुबाबदार, आकर्षक शिंगे आणि धिप्पाड देहयष्टी असलेला होता. हे नर सांबर झाडाच्या खोडाला शिंगे घासत असतात. जंगलात फिरत असताना त्यांनी घासलेली झाडे दिसतात. लिंगाच्या डोंगरावर जाण्याच्या चारेक दिवसांपूर्वी (४ डिसेंबर) कोयना निसर्ग संवर्धन व पर्यावरण पर्यटन संस्थेचे मित्र सचिन धायगुडे यांची फेसबुकवर ‘सांबराची घासण’ ही पोस्ट वाचलेली. अंगावरच्या गोचिडांचा त्रास, खाज कमी करण्यासाठी सांबरं चिखलात लोळतात. खाज असेल तर झाडाच्या खोडाला जोरजोरात अंग घासतात. जंगल फिरताना झाडांच्या खोडांवर ही ‘सांबराची घासण’ दिसून येते. त्यासाठी सांबरं झाडाची सालं शिंगांनी सोलतात. सोललेली सालं खातात. तिचा काही भाग झाडाच्या बुंध्याजवळ पडलेला दिसतो. पोस्ट वाचताना सांबराची ही वर्तवणूक लिंगाच्या डोंगरावर बघायला मिळाली तर ? असं सहज वाटून गेलेलं, अन् चक्क सांबरानेच दर्शन दिलं ! मार्लेश्वरकडे तोंड करून उभे राहिल्यावर आपल्या डाव्या हाताला असलेल्या लिंगाच्या डोंगरावर जाण्याचा बेत जवळच्या आंगवली (देवरुख-संगमेश्वर) गावचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र अभ्यासक मित्र संजीव अणेराव यांच्या सहकार्याने ठरवलेला. त्यासंदर्भात यथावकाश लिहीन. चिपळूणच्या ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’चे चेअरमन श्रीराम रेडिज आणि आम्ही सर्व संचालक मंडळी (रविवारी) अणेराव यांच्या सेंद्रिय मसाला बाग आणि ‘वनालिका’ हॉलिडे होमच्या भेटीला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) सकाळी श्रीराम रेडिज, वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, करजाई क्रिएशनचे महेंद्र कासेकर, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक, हॉटेलियर प्रल्हाद लाड, ‘ग्लोबल चिपळूण’चे मॅनेजर विश्वास पाटील आणि आम्ही ‘सृष्टीज्ञान’चे संस्थेचे तरुण कार्यकर्ते कुणाल अणेराव, स्थानिक वाटाड्या शांताराम रेवाळे आदि लिंगाच्या डोंगराच्या दिशेने जात असताना सांबराचं अलभ्य दर्शन झालं. तेव्हाही दक्षिणोत्तर पसरलेला, सह्याद्रीतील सलग रांगांपासून सुटावलेल्या एका स्वतंत्र डोंगरावर उठून दिसणारा अवाढव्य डोंगरी किल्ला महिमतगड डाव्या हाताला होता. त्याच्या दोनही टोकावर स्थानापन्न असलेले दोन बुरुज आणि बालेकिल्ल्यावरील ध्वजस्तंभही नजरेस पडत होते.

नरसांबर दर्शन क्षणाचे फोटो घ्यायला न मिळाल्याने आम्ही दोघे-तिघे चुटपुटलो. तेव्हा ‘जंगल हे वर्तमानपत्रासारखं वाचत वाचत चालताना, “सांबर अचानक डोळ्यासमोरून गेलं” ही “न्यूजफ्लश” होती. न्यूजफ्लश प्रमाणेच ती हालचाल आपल्या नजरेत राहायला हवी. अशा क्षणातल्या हालचाली कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी टिपणे फार महत्त्वाचे असते.’ असे वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट आम्हाला सांगत होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सांबराचे डोळ्यांनी दिसणारे सौष्ठव, काही सेकंदांच्या अवधीत कॅमेऱ्यात टिपणे अवघड होते. मानवी आवाजांना घाबरल्याने झुडुपात सांबराचा आवाज झालेला. तेव्हा पहिल्यांदा माकड किंवा डुक्कर असेलं असं वाटलेलं. आमच्या इनमिन नऊ जणांतील सुरुवातीचे दोघे-तिघे विशेष बोलण्याचा आवाज न करता दांडीच्या वाटेनं किंचित पुढे गेलेले. मधल्या फळीतील आम्ही तिघे-चौघे निसर्गाच्या गप्पा करत चाललेलो. पाठीमागे काहीश्या अंतरावर शेवटचे दोघे होते. तेव्हा मधल्यांच्या आवाजाने त्या शाकाहारी सांबराची वाळलेलं गवत खाण्यातली तंद्री भंगली आणि झुडुपातून ते अचानक समोर आलं. अपरिचित चाहूल जाणवल्यास वन्यजीवांमध्ये सजगता निर्माण होत असल्याची ती नैसर्गिक प्रतिक्रिया होती. श्रेष्ठ साहित्यिक अनंत काणेकर यांनी १९५५ साली लिहिलेली ‘सांबर’ नावाची एकांकिका आहे. ‘साम्बरी’ या काल्पनिक वन्यजमातीच्या, ‘सांबरी पुरुषाने एकतरी सांबर मारलाच पाहिजे. नाहीतर त्याला समाजात मान नाही’ या मूळ जीवनसूत्राला छेद देणारी ही शोकान्त एकांकिका आपल्याला वन्यजीवांच्या हत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. कॉलेजयीन जीवनात स्नेहसंमेलनाच्या वातावरणात कधीतरी ती ऐकलेली. आज पहिल्यांदा असं सांबर दर्शन घडल्यावर विविध ठिकाणी वाचलेलं सांबरांचं वर्णन आठवलं. तेव्हा ‘गरीब स्वभावाचा हा प्राणी हिंस्र प्राण्यांपासून स्वतःला कसा वाचवित असेल ?’ असाही विचार मनाला स्पर्शून गेला.

जगभरातील अभयारण्यांच्या चौकटीतलं वन्यजीव दर्शन आणि आजचं मोकळ्या आकाशाखाली मुक्त संचार करणारं, मानवी पाऊलखुणांची चाहूल लागताच, अवघ्या काही सेकंदात, मानवी डोळ्यांच्या पापण्या लवण्याच्या आत सुरक्षित जागेत पसार झालेलं ते सांबर हरिणाचं दर्शन मनसोक्त डोळे भरून निसर्ग पाहायला शिकविणारं होतं. आमच्यासारखे हाता-गळ्यात कॅमेरे घेऊन फिरणाऱ्यांनाही सांबराने काही सेकंदांच्या इंट्रीने चकवलं. मोकळ्या वातावरणात जंगलातील खरीखुरी गंमत समजावून सांगितली. फोटोंच्या फारशा मोहात न अडकणारे सन्मित्र, निलेश बापट अनेकदा सांगतात, ‘जंगलात अशा अचानकच्या क्षणी उघड्या डोळ्यांनी बघण्यातलं, ते दृश्य अनुभवण्याचं सुख वेगळंच ! ते जंगलातील खरं सौंदर्य !’ त्याची अनुभूती घेऊन आम्ही लिंगाचा डोंगर उतरलो.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

वयस्क ‘नरसांबर’ दर्शन घडण्यापूर्वीचा फोटो... 

लिंगाच्या डोंगराकडे जाणारी दंडाची वाट...

लिंगाचा डोंगर ट्रेकमधील सहभागी सहकारी

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

…यांना भेटायचं राहिलं !

‘सर्वोदय’ विचारांचे गांधीवादी कार्यकर्ते आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक ‘भारतरत्न’ आचार्य विनोबा भावे, सानेगुरुजी, समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्यासह ‘कोकणचे गांधी’ गोपुरी आश्रमाचे अप्पासाहेब पटवर्धन आदिंचे काही दशकांचे निकटचे सान्निध्य प्राप्त झाल्यावर उर्वरित जीवनात त्याच विचारांची आणि तत्वांची आदर्शवत जपणूक करणाऱ्या उरण (रायगड) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त कलाशिक्षक भिकाजी गोविंद तांबोटकर (वय ८५) यांना बालदिनी (१४ नोव्हेंबर २०२०) देवाज्ञा झाली. विनोबाजींच्याच पुण्यतिथी पूर्वदिनी त्यांचं जाणं हा अपूर्व योगायोग म्हणावा लागेल. भेट घेण्याची अतीव इच्छा असलेल्या एका तत्त्वनिष्ठ ज्येष्ठाला भेटायचं, छानसं बोलायचं, त्यांचं काम समजून घ्यायचं राहून गेल्याचं मनाला झालेलं आंतरिक दु:ख हलकं करण्यासाठीचा  हा लेखन प्रयत्न !

ऐन दीपावलीच्या दिवशी तांबोटकर सरांना देवाज्ञा झाल्याची दु:खद वार्ता आम्हाला दुसऱ्या दिवशी कळली. त्याच रात्री उशीरा आम्ही कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सरांच्या कन्येनं, चैत्रालीने याबाबतची पोस्ट केलेली. दुसऱ्या दिवशी ती पाहिली. पोस्ट पाहून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ लिहिताना नकळत हातून ‘गेल्यावर्षी चिपळूणच्या पर्यावरण संमेलनात भेट झाली होती’ असं वाक्य लिहिलं गेलं. लिहिल्यावर मन चटकन वर्षभर मागं सरलं. गेल्यावर्षी (२०१९) २ नोव्हेंबरला चिपळूणातील चौथ्या पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन समारंभानंतरच्या सहज गप्पांत आम्हाला, चिपळूणच्याच प्रा. मीनल ओक मॅडमनी तांबोटकर परिवाराच्या या वेगळ्या उंचीची जाणीव करून दिली. तेव्हा थक्क होऊन काही क्षण आम्ही तांबोटकर सरांकडे पाहात बसलेलो. तांबोटकर सर आणि मॅडमसोबत तेव्हा कन्या चैत्राली, जावई चेतन ठक्कर आणि सरांची नातही उपस्थित होती. संमेलनात, मागील २५ वर्षे मंडळाच्या पर्यावरण कामात सक्रीय योगदान दिल्याबद्दल सरांच्या पत्नी प्रियंवदा तांबोटकर मॅडमना ‘पर्यावरण मित्र’ म्हणून सन्मानित केल्यानंतर कुटुंबासोबत छानसे ग्रुप फोटोही घेतले. संमेलनानंतर हे कुटुंब सरांच्या इच्छेखातर अक्कलकोट, गाणगापूरला रवाना झालं. तेव्हाच ठरवलेलं, उरणला जाऊन एकदा निवांत सरांना भेटायचं ! चालूवर्षी, २०२० साली असं काही निश्चित होण्यापूर्वीच कोरोना भेटीला आला नि आमच्यासारख्या अनेकांच्या अनेकविध नियोजनांवर पाणी पडलं. पण ते इतकं भयानक असेल, तांबोटकर सरांच्या भेटीची इच्छा बाळगणाऱ्याला त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जायची वेळ आणेल असं वाटलं नव्हतं. पण तसं घडलं.

कोरोनाकारणे थांबलेला आमचा अहमदनगर प्रवास पूर्ण करून परतताना, मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष, सन्मित्र विलास महाडीक यांच्यासमवेत आम्ही उरणला तांबोटकर कुटुंबियांच्या भेटीस पोहोचलो. तेव्हा कळलं, अलिकडे सरांच्या पायाला सूज यायची. हाताला थोडंसं इन्फेक्शन झालेलं. थकवा जाणवायचा. पण हॉस्पिटलला अॅडमिट होण्याची मानसिकता होत नव्हती. मग किमान ईसीजी काढण्यासाठी म्हणून गावातल्या जे.एन.पी.टी. टाऊन हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय झाला. तसं हॉस्पिटलला कळवूनही झालं. तो दीपावलीचा दिवस होता. शहरातले रस्ते गर्दीने वाहात असलेले. मॅडमनी चैत्रालीला बोलावून घेतलं. दुपारी पावणे दोनच्या सुमारास कुटुंबियांसोबत तांबोटकर सर द्रोणागिरी नोड टाऊनशीप समोरील वसुंधरा हाऊसिंग सोसायटीच्या निवासी सदनिकेतून आपणहून चालत डॉक्टरांकडे निघाले. तिथे पोहोचेपर्यंत त्यांना हातपाय गळाल्यासारखं झालं. गाडीतून उतरून हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत ‘अॅटक’ आला. अशाही स्थितीत जावई चेतन ठक्कर आणि मॅडमनी त्वरेने व्हीलचेअर आणून हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण... तोवर मुलीच्या खांद्यावर मान टेकवून सरांनी आपला अखेरचा श्वास घेतला होता. असं काही इतकं अचानक घडेल याची कोणालाच कल्पना नसावी. त्याचदिवशी कोरोनाकारणे गर्दी टाळत कुटुंबियांनी तातडीने सरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. सुट्टीची जराशी उसंत मिळाली की फिरायला बाहेर पडायची सवय असलेले तांबोटकर सर कोरोना लॉकडाऊन मधल्या घरकोंडीला कमालीचे कंटाळलेले. कुठे जाता येत नाही. कोणाला भेटता येत नाही. हे त्यांच्यासाठी त्रासदायक बनलेलं. सध्याच्या काळात तर हॉस्पिटल म्हटलं की ‘कोरोना’ हे डोक्यात फिट्ट बसलेलं असावं. त्यात याच काळात सख्खे बंधू सोडून गेल्याचा, कोरोनाकारणे त्यांचं अखेरचं दर्शन घ्यायला न मिळाल्याचा मानसिक धक्काही बसलेला होता. बहुदा हे सगळं अनपेक्षित जुळून आलं ! दहाव्या दिवशी आम्ही सांत्वन भेटीस पोहोचलो तेव्हा मॅडमची नात त्यांना, ‘रडू नको !’ असं सांगत होती. आणि मॅडम तिला, ‘हां ! मैं नही रो रही हूँ बेटा !’ म्हणत समजावत होत्या. नातीमुळेच त्या काहीशा सावरलेल्या होत्या.

मुंबईत असताना सानेगुरुजींच्या संपर्कात आलेले तांबोटकर सर आयुष्यातील उमेदीच्या काळात ‘सर्वोदय कार्यकर्ते’ म्हणून चौदा वर्ष भारतभ्रमण करत होते. भूदान चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. नक्षलवाद्यांमध्ये जाऊन काम करताना १५ दिवस ओलीतास राहिलेले. पुढे परिवर्तन घडलं आणि नक्षलवादी विनोबांना शरण आले. आप्पासाहेब पटवर्धन यांच्यासोबतही सर असायचे. आप्पासाहेब तर सरांना, सर्वोदय चळवळीतील कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मापाच्या चामड्याच्या चपला बनवून वापरायला पाठवायचे. चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाच्या वेळेस तांबोटकर सर तेजपूर (आसाम) मधील हॉस्पिटलमध्ये ४ महिने जखमी सैनिकांची सेवा करत होते. तेव्हा इकडे, ते राहात असलेल्या दादर (मुंबई) मध्ये वृत्तपत्रात ‘दादरचा तांबोटकर गेला’ अशा आशयाची बातमी छापून आलेली. जयप्रकाश नारायण यांचे मदतनीस म्हणूनही सरांनी तीन वर्ष काम केलं. विनोबाजींना पवनार आश्रमासाठी स्वतःची जमीन दान करणाऱ्या राजाभाऊ देशमुख आणि कुटुंबियांना तांबोटकर सर मोठ्या भावाच्या ठिकाणी होते. आसाममध्ये सर्वात लहान सर्वोदय कार्यकर्ता म्हणून कुसुमताई देशपांडे ह्यांनी स्त्रीयांच्या आश्रमात सरांना दोन वर्षे राहाण्यासाठी परवानगी दिली होती. याकाळात आश्रमात उपस्थितांना गीताप्रवचने वाचून दाखविणे, त्याचा अर्थ समजावून सांगणे, शिल्लक वेळात विनोबांच्या पुस्तकांची परिसरात विक्री करणे, विनोबाजींचे विचार सर्वदूर पोहोचविणे आदि कामात सरांचा सहभाग राहिला. सेनापती बापट यांच्या सहवासातील स्वच्छता अभियान असो वा बाबा आमटे यांचे शांतीवन येथील कुष्ठरोग्यांच्या चळवळीतील काम असो तांबोटकर सर सतत कार्यरत राहिले.

मुंबईनंतर वसईत मुक्कामाला असेतोवर सरांचा बराचसा पत्रव्यवहार जपलेला होता. पुढे उरणला आल्यावर २००५च्या महापुरादरम्यान तो लुप्त झाला. केलेल्या कामाच्या फारशा नोंदी ठेवायला, त्याची जंत्री प्रसिद्ध करायला, फोकसमध्ये वावरायला सरांना स्वतःला कधीही आवडलं नाही. एकदा प्रवास करताना गंमत म्हणून कुलींची अर्धी चड्डी पाहून, ‘मी हेलिकॉप्टर मधून अर्धी चड्डी आणि खादीची बनियन घालून आलेलो !’ असंही ते बोलून गेले. स्वतः महाराष्ट्र कलाशिक्षक संघटनेचे कार्यवाह राहिलेले सर निवृत्तीनंतर कायम पर्यावरणासह कलाध्यापक संघटनेची राज्यव्यापी अधिवेशने, कृतिसत्रे, संमेलनांमधील मॅडमच्या वावरात सातत्याने पाठीमागे उभे राहिले. ‘चांगलं काम आहे. मी आहे तुझ्या बरोबर, तू कर !’ म्हणत त्यांनी मॅडमना कायम पाठबळ दिलं. सरांनी उरणमध्येही तीसेक वर्षे शैक्षणिक, सामजिक, वृक्षारोपण, गणेशोत्सव, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचारमुक्ती या विषयात, ‘झाडाचं रोप लावताना फळाची अपेक्षा कधी करायची नाही’ या विचारानं काम केलं. सामाजिक कामातील व्यवहार्य पारदर्शकतेसाठी सर सतत आग्रही राहिले. याचकारणे काही सेवाभावी कामं त्यांनी कमी केली. पुढे नि:स्वार्थीपणे काम करता येईल असा शिक्षकी पेशा त्यांनी स्वीकारला. पण इतका उशीरा की १९९३ ला सेवानिवृत्त झालेल्या सरांची सेवाही अवघी १९ वर्षे भरली. तेव्हा सेवेची २० वर्ष पूर्ण व्हायला एक महिना कमी पडत होता. परिणामस्वरूप पेन्शन कमी बसणार होती. खरतरं तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून विनंती अर्जाद्वारे एक महिन्याची सेवावाढ मिळवणं सहज शक्य होतं. पण, ‘पूर्वीची सेवा मी देशासाठी केली आणि ही पोटासाठी ! एक महिना वाढवून जास्त पैसे मिळविण्याचा अट्टहास मला करायचा नाही’, म्हणत सरांनी हे प्रलोभन नाकारलं. आयुष्याच्या सुरुवातीला ज्यांच्यासोबत सर वावरले त्यांनी त्यांना हे संस्कार दिलेले नव्हते. अर्थात सरांना पेन्शन कमी बसली. गिरगावच्या आर्यन हायस्कूलमध्ये कलाध्यापन करताना अनेक मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना हेरून सरांनी मार्गदर्शन केलं. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नरेंद्र भगत, चित्रकार जगदीश नैकर, लक्ष्मण खंबदकोण, शशिकांत झगडे, रंगभूषाकार उजवणे, मुंबई येथील फायरब्रिगेड  ऑफिसर उत्तम भगत ही यातली काही नावं. विद्यार्थी आपल्या आवडत्या शिक्षकाला कधीही विसरत नाहीत हे सूत्र तांबोटकर सरांच्याबाबतीतही लागू होतं. ‘सरांनी आम्हाला घराच्यांहून अधिक क्षमतेनं घडवलं !’ असं म्हणणारे अनेक विद्यार्थी आजही त्यांच्या आठवणींमध्ये गुंतून आहेत.

जीवनातील उमेदीचा बराचसा काळ प्रवासात घालविल्याने त्यांना २४-२४ तास गाडीत बसून प्रवास करायची सवय लागलेली. परिणामस्वरूप शिक्षक म्हणून वावरताना निसर्गाच्या सान्निद्ध्यात मनमुराद आनंद मिळवून देणाऱ्या सहलींचे आयोजन करण्यासाठी सर नावाजले गेले. कलाध्यापक म्हणून काम करताना त्यांनी बांद्रा स्कूल ऑफ आर्टचे दत्तात्रय परूळेकर यांच्यासोबत बालचित्रकलेचे विविध प्रयोग राबवले. अगदी वर्तमानातही सर जायंटस् ग्रुप ऑफ इंटरनॅशनलचे सदस्य म्हणून कार्यरत होते. सानेगुरुजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विनायक क्षीरसागर, आर्यन हायस्कूलचे माजी सुपरवायजर प्रभाकर राणे, माजी आमदार तात्या सुळे, बालनाट्य लेखक आणि मुंबई शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राहिलेले माधव साखरदांडे, बाप्पा रेडकर, प्रेमा साखरदांडे, सुलभा देशपांडे आदिंसोबत शिक्षक संघटनेच्या चळवळीतही सर सक्रीय राहिले. तत्कालीन ५४ दिवसाच्या शिक्षकांच्या संपात सहभागी होऊन दिलासादायक निर्णय पदरात पाडून घेण्यातही त्यांचा सहभाग राहिला. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सरकारी सेवासुविधांचा सरांनी कधीही लाभ घेतला नाही. त्यांनी एस.टी. बसमध्ये कायम पूर्ण तिकीट काढून प्रवास केला. ‘सरकारी सेवा मिळवायच्या असत्या तर त्या कधीच मिळवता आल्या असत्या. माझ्या दोन पैशाने सरकारला मदत होणार असेल तर अशी सेवा आपण का घ्यायची ?’ ही भूमिका सर जगले. वागण्यातील, जगण्यातील, बोलण्यातील उमदेपणा, दर दोन दिवसाआड दाढी करण्याची सवय, स्वच्छ इस्त्रीचे साधे कपडे आदि पेहेरावातील टापटीप सरांनी कधीही सोडली नाही. अखेरच्या दिवशीही हॉस्पिटलला जाताना ते असेच टापटीप गेले. कोरोना लॉकडाऊन नसता तर तांबोटकर कुटुंबीय आसाममधील शरणी आश्रमात जाण्याच्या तयारीत होतं. त्याठिकाणी पूर्वी दोन वर्ष सरांनी काम केलेलं. शांतीवन असो की आचार्य विनोबा भावे यांचे पवनार (वर्धा) येथील परमधाम आश्रम असो आजही तिथं सरांचं नाव निघतं, ही तांबोटकर कुटुंबियांसाठी समाधानाची बाब होय !

सानेगुरुजींवरील अविचल निष्ठेने गेली ४५ हून अधिक वर्षे प्रकाशित होणाऱ्या 'बालविकास मंदिर' मासिकाचे संस्थापक-संपादक आणि सानेगुरुजी बालविकास मंदिर संस्थेचे अध्यक्ष यशवंत क्षीरसागर हे सरांसोबतचे या साऱ्या कामातील स्नेही होत. ह्या लोकांनी त्या काळात प्रचंड काम केलं. आपण त्यांच्या कामाची, त्यागाची कल्पनाही करू शकत नाही. ‘पत्नी बनून ३४ वर्ष अशा माणसाची सेवा करायला मिळाली, हे मी माझं भाग्य समजते’ असं तांबोटकर मॅडम बोलल्या तेव्हा सर हे किती विलक्षण व्यक्तिमत्त्व होतं हे ध्यानात आलं. अशी माणसं आता शोधूनही मिळणे नाही. होणे त्याहून दुर्मीळ !

(प्रियंवदा तांबोटकर मॅॅडम यांचा संपर्क क्रमांक : +91 88794 56908)

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. 

ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

 


४थे पर्यावरण संमेलन चिपळूण (२०१९)
डावीकडून सरांच्या कन्या चैत्राली आणि नात,
पर्यावरण मंडळाचे 
अहमदनगर जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ,
स्वतः तांबोटकर सर आणि मॅडम, संमेलनाध्यक्ष डॉ. उमेश मुंडल्ये,
मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, धीरज वाटेकर,
प्रा. मीनल ओक, सरांचे जावई चेतन ठक्कर.
 


शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

आत्मनिर्भर भारत : ‘शहरी आणि ग्रामीण’ अंतर मिटायला हवं !

विकतचे प्रोजेक्ट कॉलेजयीन जीवनात सबमिट करणाऱ्या पिढीला ‘आत्मनिर्भर’ व्हायला समजवायचे कसे ? कामचलाऊ ऑनलाईन शिक्षण या देशाचे भविष्य घडवू शकत नाहीत. प्राचीन भारत आत्मनिर्भर होता तेव्हा इतर देश विकासाचे स्वप्न बघायचे. पुढे भारतावर आक्रमणे वाढत गेली. समस्या वाढत गेल्या. स्वातंत्र्यकाळात चरखा घेऊन वावरणाऱ्या महात्मा गांधींनीही या देशाच्या आत्मनिर्भरतेचे स्वप्न पाहिलेले. आपण त्यांचे ऐकले नाही. कोरोनाने, कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी आणण्यासाठी भारताचे ग्रामीण चारित्र्य उंचावायला लागेल. प्रत्येक सज्ञान नागरिकाला आपल्यातला आळसपणाचा व्हायरस दूर सारून सृजनशीलता, स्वावलंबन वाढवावे लागेल. मोजक्या शहरांऐवजी गावांमध्ये सापडणारा, भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी पायाभूत, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांकडे जबाबदारीने पाहाण्याचे, शहरी आणि ग्रामीण भागातील दरी मिटविण्याचे आव्हान मोठे आहे. आत्मनिर्भर भारताचे यश मुख्यत्वे तिथेच दडलेले आहे.

यंदाच्या गणपतीत कोकणात, गावी असताना निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर छोटाभाऊ आणि शाळकरी मित्र केदार गप्पांच्या ओघात एकदम गाव सोडण्याची भाषा बोलू लागले. मला क्षणभर काही कळेना. मग थोडं विस्तारानं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मित्र म्हणाला, ‘शहरातली एखादी चांगली शिक्षणसंस्था गावात येईल का ? ते सांग. विद्यार्थी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू.’ मित्राच्या बोलण्यात प्रामाणिकपणा असला तरी व्यवहारी शिक्षणसंस्थांना हे कोण समजावणार ? ह्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत राहिलो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत गावांच्या उद्धाराच्या घोषणा आपण ऐकतो आहोत. मागच्या शंभरेक वर्षांत पायाभूत, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांकडील अक्षम्य दुर्लक्षामुळे आज गावं रिकामी झालीत. काही गावं तर ‘वृद्धाश्रम’ बनलीत. आमचे वास्तव्य असलेल्या कोकणात याचे प्रमाण भयंकर आहे. देशातल्याही बऱ्याचश्या गावात आज म्हातारा, म्हातारी आणि त्यांच्यानी न होणाऱ्या ओसाड जमिनी, पडके वाडे, घरं नि बागा गावोगावी शिल्लक राहिल्यात. जीवनाचा कायापालट करण्यासाठी शहरात आलेल्या व्यक्तीला चक्रव्यूहात सापडल्यासारखे झालेय. शहरी जीवनाच्याही स्वतःच्या समस्या आहेत. त्यात रोज ‘कोरोना’सारखी नवीन भर पडते आहे. गर्दी, गोंगाट, हवा, पाण्यासह अन्नातील प्रदूषणाचे दुष्परिणामही वाढताहेत. अस्वच्छता वाढतेय. कोसळणाऱ्या इमारती आणि निवाऱ्यांची समस्या कायम आहे. ग्रामीण भागात संधी आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने अनेच्छेने का होईना, लोकं शहरात जगताहेत. आपले लोकप्रतिनिधी आणि मायबाप सरकार खेड्यात उद्योगधंदे सुरू करण्याचे धोरण लवचिक केल्याचे सांगतात. मात्र प्रत्यक्षात प्रयत्न करू पाहणाऱ्यांच्या नशीबी येणारे ‘प्रशासकीय’ अनुभव डोंगळ्यांनी रक्त पिऊन हैराण केल्यासारखे भासतात. गावातील प्रतिनिधी सक्षम असतील तर राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, वारणानगर सारखी गावं आकाराला येतात. पण असे प्रतिनिधी कितीसे आहेत ? शहराच्या तुलनेत गावात बकालपण, महागाई कमी असते. नैसर्गिक आहार, विहार मिळतो. आरोग्य उत्तम राहिल्याने कार्यक्षमता पुरेपूर वापरता येते. याचा विचार होताना दिसत नाही. देश स्वतंत्र झाल्यावर पारंपारिक व्यवस्थेला धक्का बसत गेला. माणुसकीचा र्‍हास होऊ लागला. ग्रामीण जीवनपद्धती कालबाह्य झाल्या. गावातील लोकांचे एकमेकांवर अवलंबून राहाण्याचे दिवस संपले. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी लोप पावली. शहर आणि गाव यात दरी निर्माण होत गेली. या स्थितीने एवढे भयानक रूप धारण केले की शहरातील रेल्वे प्लॅटफॉर्मवर चणे विकणार्‍याचे उत्पन्न गावातील किराणा विकणाऱ्यापेक्षा अधिक बनले. आपल्याला आत्मनिर्भर बनण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील ही दरी मिटवायला प्रयत्न करावे लागतील.

आत्मनिर्भरतेचा आणि आपल्या भाषा, साहित्य, संस्कृतीचा जवळचा संबंध आहे. पुण्याच्या विश्व मराठी परिषदेने कोरोना लॉकडाऊनमध्ये (जुलै) डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची याच विषयावर ७ दिवसांची ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली होती. तिच्या सुरुवातीला डॉ. जोशी यांनी, ‘आपल्या देशात ९५ टक्के लोक हे नोकरी देण्याच्या गुणवत्तेचे नाहीत’, या नारायण मूर्ती यांच्या विधानाची आठवण करून दिली. आत्मनिर्भरतेची अभिरुची वृद्धिंगत होण्यासाठी माणसांमध्ये गावाच्या मातीत हात घालण्यासाठी रुची असायला हवेय. भाषा, साहित्य आणि संस्कृती टिकली तरच स्थानिक रोजगार टिकणार हे वास्तव समजून घ्यायला हवे. एकेकाळचे या संस्कृतीचे मालक आता नोकर झालेत. कोकणासारख्या प्रांतात तर ८० टक्के जमिनी या २० टक्क्यांच्या मालकीच्या तर शिल्लक २० टक्के जमिनी ह्या ८० टक्क्यांच्या मालकीच्या आहेत. यातूनच पुढे गावात शेतीत, बागेत काम करायला माणसं मिळेनाशी झाली. लोकांनी शहरात जाऊन ‘चाकरमानी’ व्हायला पसंती दर्शविली. कोकणच्या मातीत, बागांत राबणाऱ्या हातात आज नेपाळ्यांसह इकडून तिकडून आणलेले आदिवासी, कातकरी काम करताहेत. यावर उपाय म्हणून ‘कम्युनिटी फार्मिंग’, कसणाऱ्याला अधिकचा मोबदला मिळावा असा विचार मांडला गेला. पण सध्याचा काळ ‘विनोबां’चा नसल्याने हे मान्य होत नसावे. गेल्या शंभरेक वर्षांत आपण आपली मातृभाषा विकासाची आणि रोजगाराची न ठेवली नाही. इंग्रजीचा अकारण फुगा फुगवला. इंग्रजी ही भाषा नसून ती एक संस्कृती असल्याचं आम्हाला कळलं नाही. म्हणून आमच्या गावातल्या मित्राला चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाची परवड सहन होत नाही आहे. त्याची ही मानसिकता आपण शहरावलेल्यांनी बनवली. त्यासाठी देशाची आणि जगाची वर्तमान अर्थव्यवस्था मुठभरांच्या हाती दिली. शब्द पाळणे नव्हे तर शब्द न पाळणे हा सभ्यपणा बनवला. वर्तनाशी निगडीत असलेली मूल्यव्यवस्था संपवली. पूर्वी मानवी जीवन नद्यांच्या साथीनं विकसित झालेलं. पोसलेलं. आम्ही गेल्या १०० वर्षांत त्या नद्या प्रदूषित केल्या. असांस्कृतिक, बाजारावादाच्या युगाला आपलंस केलं. भांडवलखोरी, नफेखोरीच्या संस्कृतीत आम्ही गुदमरलो. ७०च्या दशकात या स्थितीने वेग पकडला. गावखेड्यातले स्थानिक उद्योग बंद पडू लागले. संस्कृतीतून निर्माण होणारा रोजगार सुरुवातीला मोठ्या आणि नंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे गेला. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बाजारपेठेवर आपले वर्चस्व निर्माण केले. आमच्या संस्कृतीतील मूल्यव्यवस्था नामशेष होत गेली. जगात बाजारापुरती विद्या शिकवली जाऊ लागली. तयार वस्तू विकत घेता येईल एवढीच क्रयशक्ती लोकांच्या खिशात राहिली. जीवनातलं सौंदर्य नाहीसं होतं चाललं. मानवी अजेंडा घेऊन लढणारी माध्यमे कालबाह्य होत गेली. शासनात तर सामन्यांच्या पत्राला उत्तर न देणारी संस्कृती निर्माण झाली. ‘कोरोना’त भरडलेला सामान्य कष्टकरी ८०० किलोमीटर पैदल गेला. त्याला पाहून व्यथित व्हायला झालं. आमची संस्कृती अशी कधीच नव्हती, ओ ! पण हे घडलं. कोणत्याही विषयात ‘मला काय त्याचे ?’ आणि ‘निवळ दुर्लक्ष’ करण्याची आमची मानसिकता आम्हाला नडली. पूर्वी मर्यादित असलेला आमच्या जीवनाचा भूगोलतर विस्तारला पण बुद्धी आकसली. वाचन मंदावलं. दर्जेदार जीवनपद्धती नामशेष झाली. आजही देशातला एक मोठा वर्ग वर्तमानपत्रही वाचत नाही. पूर्वी माणसं उत्तम वाचायची. फक्त छापलेलं नव्हे तर आपल्या भागातला सारा परिसर ती अभ्यासायची. जैवविविधता वाचायची. निरीक्षण करायची. वास्तव्याच्या ठिकाणची त्यांना इत्यंभूत माहिती असायची. आम्ही या सर्वांपासून तुटत चाललो. आज सोशल मिडीयावर भरपूर रेडीमेड मजकूर उपलब्ध आहे. लाभ घेणाऱ्यांचा अभाव आहे. वाचक ग्रंथांपर्यंत पोहोचत नाहीत. नवा आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ग्रंथ ही गरज आहे हे आमच्या लक्षात येत नाही. सामान्य माणूस ग्रंथांपासून तुटल्याने ग्रंथालये ही आपली वैयक्तिक संपत्ती असल्यासारखे काही ग्रंथशत्रूवर्षानुवर्षे कार्यरत राहातात. लिहिणारे लोकं आयुष्यभर चिंतन करून लिहितात. आमचा समाज वाचायाचे कष्ट घ्यायलाही तयार नाही. आत्मनिर्भर होत बाजारवादाला शह देण्याची क्षमता ग्रंथसंस्कृतीत आहे. म्हणून ती हेतूपुरस्सर वाढविली जात नसावी. देशात कायदा आणि सुव्यस्थेवर प्रचंड खर्च होतो. तो कमी करण्यासाठी संस्कृती आणि ग्रंथवाचन आवश्यक आहे. पिढी सुजाण, सम्यक, तर्काचा, बुद्धीने विचार करणारी असली तर कायदा आणि सुव्यस्थेवरचा खर्च कमी होईल. आत्मनिर्भरतेला मदत होईल. पण असं न होता गेली अनेक वर्षे भाषिक आणि सांस्कृतिक चळवळ शिस्तबध्दपणे कमकुवत केली जात आहे, हे श्रीपाद जोशी सरांचे म्हणणे पटते.

पूर्वी देशात बारा बलुतेदार-अलुतेदार पद्धती होती. बी.ए. एल.एल.बी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या, मुंबई राज्याच्या महसूल खात्यात अव्वल कारकून, मामलेदार, सबजज्ज म्हणून काम केलेल्या त्रिंबक नारायण अत्रे यांनी १९१५ साली म्हणजे टिळकांनंतर आणि गांधीयुगाचा उदय होत असल्याच्या काळात ‘गावगाडा’ नावाचं पुस्तकं लिहिलं. आजही मराठीतील सर्वश्रेष्ठ १०० पुस्तकांत गणना व्हावी असं हे पुस्तकं. आत्मनिर्भर भारताबद्दल लिहिताना या पुस्तकाविषयी सांगायलाच हवं. धर्म, जाती, गुरंढोरं, पशुपक्षी, वेशीबाहेरील आणि आतील समाज, रितीरिवाज, गावपंचायत, देवदेवस्की, श्रद्धा-अंधश्रद्धा, आचार-विचार, सरकारी नियमात पिचणारा समाज आदिंचे विवेचन असलेल्या या पुस्तकातून व्यापक समाजचिंतन व्यक्त होते. आत्मनिर्भर भारताचा विचार करणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवी कार्यकर्त्याने हे पुस्तक वाचायला हवं. देशातली काही मोजकी मंडळी सोडली तर बऱ्याच लोकांचा जन्म हा गावातला असेल. त्यामुळे गावाशी नाळ जुळलेला, तिथली संस्कृती, लोकव्यवहार, भाषा आदिंचा एकत्रित संस्कार आपल्यावर झालेला असतो. कोणा महनीयांचे  चरित्र, आत्मचरित्र वाचलं की हे जाणवतं. ही ग्रामसंस्कृती १०० वर्षांपूर्वी आत्यंतिक भरभराटीला पोहोचलेली नसेल पण तिथले लोकं सुखी-समाधानी होते. प्रपंच म्हटला की अडीअडचणी ह्या असायच्याच ! तरीही आपली मन:शांती न हरवता, आरडाओरडा दोषारोप न करता ग्रामस्थांच्या सूचनेने, सहकार्याने अडचणी सोडवल्या जात. लग्न, यात्रोत्सवात गावातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा सहभाग असायचा. काही कर्मठांचा उपद्रव असायचा, पण त्याचा गावच्या व्यवहारात विशेष हस्तक्षेप नसायचा. वाद गावात मिटायचे. गावातील विद्वान आणि प्रतिष्ठितांचा शब्द ‘प्रमाण’ असायचा. लोकांच्या पारंपारिक व्यवसायात आधुनिकतेचा वावर नसल्याने कौशल्याचा पुरेपूर वापर व्हायचा. कालांतराने आपल्याकडे व्यवसाय स्वातंत्र्य आले. त्याचे काही फायदे झाले तसे तोटेही झाले. व्यवसाय स्वातंत्र्याचा पहिला फटका गावागावातल्या बारा बलुतेदार आणि अलुतेदारांना बसला. लोकांना पैसा अति झाला. पूर्वी गावात दोन-चार जण दारू प्यायचे. आता उलटं झालंय. लोकांना कोणाचा धाक राहिला नाही. परमार्थ कमी झाला, स्वार्थ बोकाळला. राहणीमान सुधारलं आणि जीवनमान घसरलं. या पार्श्वभूमीवर ‘गावगाडा’ पुस्तकाचे संदर्भमूल्य अधिक आहे. या पुस्तकातले उतारे खरंतर शालेय अभ्यासक्रमात असायला हवे होते. ‘गावगाडा’ म्हटला की चांगल्याचा हात धरून वाईटही चालतं. पूर्वीही चाललं. मुघलांनी इथल्या भूमीवर अत्याचार केले. इंग्रजांनी व्यापार केला.  या काळात देशाला समाजसुधारकांची परंपरा लाभली. स्वातंत्र्यानंतर समाजसुधारकी वातावरण लोप पावलं. आजचा गावगाडा टेलिफोन, मोबाईल, टीव्ही, मोटारसायकल, कार, संगणक आदि सोयींमुळे उतरणीला लागल्याचं बोललं जातं असलं तरी शहरांवर येणारा ताण कमी करण्यासाठी गावांना शहरातील किमान पायाभूत सुविधांशी जोडायला हवं आहे. अर्थात दोनेक हजार लोकसंख्येच्या गावात किती हॉटेल्स, किती वडापाव सेंटर, चहाच्या टपऱ्या असाव्यात यालाही मर्यादा असायला हव्यात. कारण टपरीवर सिगारेट ओढणाऱ्यांचा घोळका, ग्रामदेवतेच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेलं बीअरबार हे चित्र काही चांगलं नव्हे. गावच्या सुधारणांसाठी, बदलासाठी शहरातील संस्था, माणसं आणि गावं यांच्यात पूल तयार व्हायला हवा. शहरे चांगली होत राहातील पण गावं स्मार्ट व्हायला हवीत. गावात पायाभूत सुविधा, उत्तम शाळा, हिरव्यागार देवरायांचं जतन, नद्या नाल्यांची स्वच्छता आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. गावातले लोंढे शहरात येण्याचे थांबवण्याचा याच मार्ग आहे.

ज्या समाजाला ‘आत्मनिर्भर’ करण्याचे मिशन देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बाळगले आहे तो समाज आता बहुभाषिक झालाय. एकुणातल्या मुठभर लोकांना समृद्धीची चव चाखायला मिळते आहे. भाषिक संबंध तुटल्यामुळे माणसं गुलाम होत गेलीत. हिंदी कितीही बोलली तरी देशाची लिंकभाषा इंग्रजी झाली आहे. जोडाक्षरांसारखं अफलातून संचित असलेल्या मराठीचं स्वतंत्र भाषिक विद्यापीठ असावं असं आम्हाला वाटत नाही. सध्याचा बाजार समाजमाध्यमांनी व्यापला आहे. आपण सर्वजण त्याचे वाहक बनलोय. आपण या माध्यमांचं नेमकं काय करतोय ? आपल्याजवळ सांगण्यासारखं काही आहे का ? ही समाजमाध्यमं कशासाठी निर्माण झालीत ? या माध्यमांचं चारित्र्य काय ? याची माहिती नसल्याने आम्ही त्यांचा वापर करताना आमचा विवेक हरवून बसतो. आमच्यातच भांडतो. ही सोशलमाध्यमं मार्केटिंग टूल्स आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’च्या यशस्वीतेसाठी आम्ही हे समजून घ्यायला हवं. समूह माध्यमांमुळे ग्राहकांवर नजर ठेवणं सोपं झालंय. या बाजाराला प्रत्येक गोष्ट विकायची आहे. नको असलेल्या वस्तूही ग्राहकांच्या गळ्यात मारायच्यात. त्यातच जीवनात नसलेल्या गोष्टी असल्यासारख्या समजून आम्ही जगू लागल्याने बुद्धीहीन आणि मट्ठ लोकांची संख्या वाढतेय. यात भांडवलदारांची मोठी गुंतवणूक आहे. आपण कोणता विचार करायचा ? हेही समाजमाध्यमं ठरवतात. आपल्याला तपासायचीही संधी मिळत नाही. जगात या समूहमाध्यमांनी क्रांती घडवल्या. आमची आनंद आणि सुखाची व्याख्या बदलवली. आमचं स्वतःवरच नियंत्रण हरवल. द्वेष, चीड, संताप आणि राग वाढीस लागला. आजच्या जगात, ‘जे जे फुकट असतं ते सर्वाधिक महाग असतं’ हे कदाचित आम्हाला या जन्मात तर सोडा, मरेस्तोवर कळणार नाही. या आभासी जगात जो पैसे भरतो, तो त्याला हवा असलेला समाज घडवितो. आपलं जीवन माध्यमांच्या शक्तींनी नियंत्रित केलंय. संवाद भावनिक बनलाय. त्यातला वैचारीकपणा कमी झालाय. ‘कोरोना’मय बाजारात वस्तू विकण्यासाठी लोकांच्या मनात भीती आणि विश्वास निर्माण केला जात आहे. तंत्रज्ञान कोणतही असेना, उत्तमच असतं. पण त्याचा वापर कशासाठी होतो ? हे महत्वाचं आहे. तंत्रज्ञानामुळे माध्यमांचा पसारा वाढलाय. वाहिन्या, न्यूजपोर्टल, ही ऑनलाईन पत्रकारितेतील क्रांती ठरताहेत. या आधुनिक पत्रकारितेचे मूळ ‘व्यापारी माहिती’त आहे. पूर्वी पत्रकारितेने जनमत तयार केले, आजही होते आहे. पण त्यातून कोणाला समाजभान येत नाही. टीव्हीच्या रिमोट मधून हजारभर वाहिन्यांचे वहन होतेय. त्यासाठी लागणारा सारा पैसा आपल्यासाठी कोणीतरी दुसरा भरतो. अर्थात आपल्याला हवा असलेला मजकूर त्यात न मिळता पैसे देणाऱ्याला हवा असलेला मजकूर आपल्याला पाहावा लागतो हे नागवं सत्य आत्मनिर्भर होण्यासाठी आम्हांला समजून घ्यावं लागेल. ‘कोरोना’ने असंख्य पत्रकारांना घरी बसवले असताना तुरळक अपवाद वगळता त्यावर बोलायला आजची वर्तमानपत्र आणि पत्रकारिता तयार नाहीत, हे कशाचे द्योतक आहे ? हे चित्र बदलून स्वतःचं बॉल बेअरिंग नीट करण्याचा समांतर विचार देणारं सामूहिक शहाणपण सोशल मीडियातून आपल्यापर्यंत झिरपायला हवंय. आत्मनिर्भर भारत अभियानाचं यश त्याच्याशीही निगडीत आहे.

आपल्या देशातील माणसांच्या मनावर धर्म, आचार-विचार, जीवन व्यवहार, सण-समारंभ, आरोग्य, तंत्रज्ञान, पारंपरिकता, रूढी, प्रथा, श्रद्धा-अंधश्रद्धा, विचार, अविचार यांचा मोठा पगडा आहे. त्यामुळे इथे कोणतीही समस्या सोडवताना, तशी निरीक्षणं नोंदवताना समाजशास्त्र, अर्थशास्त्र, आरोग्यशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार करावा लागतो. शहराजवळची गावं सोडली तर देशातल्या, महाराष्ट्रातल्या दुर्गम खेड्यातलं आजचं चित्रही वेगळं आहे. इथलं जीवन अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यात अडकलेलं आहे. घरात शौचालय नसल्याने पहाटेच्या अंधारात गाव जागं व्हायच्या आत कुठे तरी आडोसा गाठणारी गावं कमी नाहीत. कोकणात काही प्रतिष्ठित कुटुंब वगळली तर सर्वसामान्य घरांची जबाबदारी गेली अनेक दशके स्त्रीया सांभाळताहेत. या स्त्रीयांमध्ये रक्तक्षय, जीवनसत्त्वांची कमतरता, कॅल्शियमच्या अभावामुळे पायात गोळे येणं, सांधेदुखी, अंगदुखी, कणकण, डोकेदुखी असली दुखणी चालूच असतात हे अभ्यासांती धान्यात येईल. गावातल्या स्त्रीयांत तंबाखू खाण्याचे प्रमाण अधिक आहे. तरुणींसाठी ब्युटीपार्लरची संख्या लक्षणीय वाढलेय. पूर्वी घराच्या दारात असणारी गवतीचहा, तुळसही आज शोधावी लागते. तरीही गावातली माणसं अज्ञानात, रोज कमावून रोज खाण्यात सुखी दिसतात. मूलभूत गरजांची, तंत्रज्ञानाची माहिती ह्या गावात पोचलेली नाही. तिथे आजही पाण्यासाठी वणवण करण्यात दिवस संपतो. हातपंप असला तर पाणी नसतं. पाणी असलं तर वीज नसते. दोन्ही असलं तर पाण्याच्या शुद्धतेचा अभाव !  घरातल्या कर्त्या पुरुषाला आणि मुलाला शिक्षण, उपचार, अन्न सगळं सुरुवातीला मिळतं. नंतर मुलीला आणि स्त्रीला ! असली पुरुषप्रधानता आजही काही ठिकाणी घट्ट जाणवेल. म्हणून गावं स्मार्ट हवीत म्हणताना तिथली माणसंही स्मार्ट, जागृत, बुद्धिमान, शिस्तबद्ध आणि सामाजिक भान असणारी हवीत. तरुण राजकीय कार्यकर्त्यांना एखादं सामाजिक काम करून ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणवून घेण्यात आनंद वाटतो. मात्र असं म्हणवून घेण्यासाठी आपल्याला गावातले वीजेचे प्रश्न, स्ट्रीटलाईटची चालू-बंद अवस्था, रस्ते, त्यांची डागडुजी, सांडपाणी गटार व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, आठवडा बाजार, मुबलक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शुद्धता, शाळा, कॉलेज, मैदान, गार्डन, व्यायामशाळा, विविध लसीकरण, आरोग्यकेंद्रे, दवाखाना, आरोग्य शिबिरे, गरीब मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, ज्येष्ठांचा सन्मान, अकस्मात घडणाऱ्या घटनातील मदत, गावात सरपंचांचे असलेले लक्ष, शासनाच्या योजना ग्रामसेवक सांगतात का ? आदि प्रश्न पडायला हवेत. १९५२ साली वि. स. पागे यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे प्रायोगिक तत्वावर रोजगार हमी योजना सुरू केली. लोकांचा प्रतिसाद पाहून सरकारने २६ जानेवारी १९७८ मध्ये यासंदर्भात कायदा केला. ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठीची रोजगार हमी योजना प्रचंड यशस्वी झाली. २००५ साली केंद्र सरकारने ती देशभरात योजना लागू केली. आज ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम म्हणून ओळखली जाते. तरीही समृद्ध गावं आकाराला आली नाहीत. ग्रामीण भागातील योजनांवर अब्जावधी रुपये खर्च होताहेत. तरीही गावे ओस का पडतात ? गावातील तरुण शहराकडे का धावतात ? भारताचे पोट ज्या गावांवर अवलंबून आहे, तिथली जनता सुखी होणे ही आमची प्राथमिकता असायला हवी. त्यांना अंधारात ठेवून शहरे उजळविणारी विचारधारा आम्ही गेली अनेक दशके पोसली. भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आम्हाला तिच्यातून बाहेर पडावे लागेल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चौथा लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी (१२ मे) देशवासीयांना केलेल्या संबोधनात ‘आत्मनिर्भर’ शब्द वापरला. तो समजून न घेता काहींनी त्याची टिंगलटवाळी केली. चालायचंच ! पूर्वी लोकांनी गांधीजींचं ‘खेड्याकडे चला’ म्हणणं तरी कुठं मनावर घेतलेलं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘एक जीवनस्वप्न माझ्या डोळ्यांसमोर मी स्पष्ट पाहात आहे की, आपली प्राचीन भारतमाता पुन्हा जागृत झाली आहे व कोणत्याही काळापेक्षा अधिक भव्य स्वरूपात ती आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे.’ या संकल्पपूर्तीसाठी ‘आत्मनिर्भर भारत’ योगदान देऊ शकते. इतिहासात डोकावता, भारतात ‘स्वदेशी’ संदर्भात पहिल्यांदा १९०५च्या सुमारास दादाभाई नौरोजी यांनी मांडणी केली. कदाचित तत्पूर्वी त्याची गरज नसावी. त्यानंतर लोकमान्य टिळक आणि १९२० नंतर महात्मा गांधींनी हा विषय पुढे आणला. ‘स्वयंपूर्ण गावं संपन्न भारत घडवू शकतात’, असं दीनदयाळ उपाध्याय म्हणालेले. दत्तोपंत ठेंगडी म्हणत, ‘जगातील आधुनिक आर्थिक धोरणांमध्ये संस्कृती आणि मानवी नाती यांचा विचार करण्यात आला नाही. प्रत्येक देशाला आपल्या संस्कृतीचा आणि समाजाचा विचार करुन आपल्या देशाला सोईची असेल अशी आर्थिक व्यवस्था करणे आवश्यक आहे.’ भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही आपल्या ‘इंडिया २०२०’ मध्ये, ‘भारत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये समृद्ध होईल. जगात त्याचे नाव होईल’ अशी भूमिका मांडलेली होती. याचा सारांश असलेल्या आत्मनिर्भर भारताचा अध्यात्मिकता हा आत्मा आहे. एकदा हा जीवनाधार निश्चित झाला की मग पुढे जाण्यासाठीचे मार्गही स्पष्ट होऊ लागतील. निवळ भौतिक वस्तूंबाबत स्वावलंबी होणे हे ध्येय नाही. भारताने जगाला दिशा देणे अपेक्षित आहे. अतिप्राचीन भारतीय सभ्यतेमुळे आपल्याकडे संकल्पनांची निर्यात क्षमता भरपूर आहे. मानवी सभ्यतेच्या भारतीय प्रवाहात असलेल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टी आपण जगाला देऊ शकतो. तरीही भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणूनच जग पाहाते. देश स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर असताना हे थांबवण्याचे पाऊल उचलण्याची संधी कोरोनाने दिली. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) म्हटले. कोरोनाकाळात भारताने जगाची भूक भागवल्याचे स्पष्ट झाले. दरवर्षी विविध कृषी मालाची होणारी निर्यात कोरोना काळात मार्च ते जून २०२० मध्ये २३.२४ टक्क्यांनी वाढली. कोरोनानंतरच्या काळात शहरांना मजुरांची, कामगारांची पूर्वीइतकी गरज कदाचित असणार नाही. बेकारी वाढेल. गावात रोजगार निर्माण करावा लागेल. खाजगीकरण, बाजारीकरण आणि जागतिकीकरणाने आणलेली जीवनशैली बदलावी लागेल. मॅगीच्याऐवजी शेवया जवळ कराव्या लागतील. कमी अंतरांसाठी बैलगाडी, सायकली वापराव्या लागतील. अवाढव्य धरणांऐवजी पाझरतलाव, प्रचंड उत्पादने करणार्‍या उद्योगांऐवजी कुटीर, गृहोद्योग गावात सुरू करावे लागतील. कपड्यांपासून पादत्राणांपर्यंत गावचे ब्रॅण्ड विकसित करून त्यांना प्रतिष्ठा द्यावी लागेल.

भारताचा प्राचीन इतिहास हेच सांगतो की भारत जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या उच्चांकावर होता, आत्मनिर्भर होता. इथला समाज उद्यमशील, कल्पक, परिश्रमी, पुरुषार्थी, सुखी, समाधानी आणि वैभवसंपन्न होता. सुमारे चारशेहून अधिक वर्षे मुघल आणि जवळपास दोनशे वर्षे ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्यामुळे भारतीय समाज संस्कृती दुबळी बनली. असांस्कृतिक बदलांनी समाजाला घेरले. देश पारतंत्र्यातून मुक्त झाल्यावर समस्या दूर होतील ही सामान्य अपेक्षा फोल ठरली. समाज आत्मविश्वासहीन बनला. ‘आत्मनिर्भर भारत’ ही देशाची मान ताठ करणारी, अभिमानाने छाती फुलून येणारी,आपणही कोणीतरी महत्त्वाचे आहोत’ असं सांगू पाहाणारी घोषणा आहे. पाश्चिमात्यांनी केलेली प्रगती भौतिक आहे. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पातळीवर आजही भारत सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेमागे देश उभा राहायला हवा आहे. या विषयावर सरकार काम करते आहे. स्वयंसेवी संस्थाही काम करताहेत. मागच्या काही दशकात भारत आणि इंडिया वेगळा झालेला. ६५ टक्के माणसं शहरात तर ३५ टक्के गावात राहिली. एका आकडेवारीनुसार देशातील ११५ जिल्ह्यांची आर्थिक स्थिती आजही वाईट आहे. म्हणून आपल्या देशाला फरक पडतो. तरीही प्रत्येक कामात स्पेशलायझेशन हवंय हे आपण समजून घेतलं तर अनेक गोष्टी सोप्या होतील. कोरोना व्हायरसला प्रगत जगाच्या तुलनेत भारताने नियंत्रणात ठेवले. यामागे रोगप्रतिकारक्षमता हे प्रमुख कारण आहे. कोरोना काळात गावी पोहोचलेल्यांपैकी काहींनी हतबल न होता गावातच काहीतरी करण्याचा विचार निश्चित केला, हे आत्मनिर्भरता शक्य असल्याचे द्योतक आहे. लोकांनी मास्क बनवून विकले. काहींनी कम्युनिटी किचन चालवले, आजही चालवताहेत. सॅनिटायझर तयार झाले. कोरोनापूर्वी आपल्या देशात ‘पीपीई किट’ दीडेक हजार बनत. तो उद्योग दिवसाला तीन ते चार लाख किट्स बनवू लागला. ५० सुद्धा तयार न होणारी व्हेंटिलेटर मशीन ५००च्या होताहेत. यातून आपली लपलेली क्षमता दिसून आली. ही क्षमता आत्मनिर्भर भारतची प्रेरणा ठरावी. हा तो काळ आहे जेव्हा जगातल्या जवळपास साऱ्या विषयातल्या वस्तू चीनने भारतीय बाजारात आणलेल्या. यातून मोठा अडसर निर्माण झालेला. कधीतरी प्रतिक्रिया देणे होतेच. आपल्या प्रधानमंत्र्यांनी योग्य वेळेत ही संधी साधली. ती वाया जाऊ न देणे देशवासियांच्या हातात आहे. अर्थात देशातलं सगळं चित्र एकदम बदलणार नाही. पण तसं वातावरण तयार होईल. कोकणात तर डहाणूपासून बांद्यापर्यंतच्या कोकणी पदार्थांची रेलचेल असलेलं डी-मार्टसारखं साखळी दालन सुरुवातीला कोकणच्या राष्ट्रीय आणि सागरी महामार्गावर आणि नंतर राज्यात, देशात निर्माण व्हायला हवंय, असं सुचवावंसं वाटतं. आपल्याकडील अनेक छोट्या मोठ्या ‘गावठी’ प्रयोगांना जुगाड टेक्नॉलॉजी’ म्हणणं, आपलं ते हीन संबोधणं, इम्पोर्टेड म्हणजे चांगलं आणि ‘स्वदेशी म्हणजे कामचलाऊ म्हणणं आपण थांबवायला हवंय.

१९९१-१९९२ दरम्यान पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील सरकारने अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही केली. भारतीयांना व्यापाराचे विश्व मोकळे झाले. विदेशी उद्योजकांसाठी भारतीय व्यापारपेठ काही अपवाद वगळता पूर्ण खुली झाली. मल्टिनॅशनल कंपन्या भारतात आल्या. यामुळे भारताच्या गंगाजळीत वाढ झाली. पण आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागलो. याचा फायदा चीनने घेतला. अनेक क्षेत्रांत त्यांची एकाधिकारशाही सुरु झाली. भारताएवढी एकत्रित अखंड बाजारपेठ चीनकडेही नाही. जागतिक बाजारपेठेत चीन आपला प्रतिस्पर्धी आहे. त्यांची प्रगती निश्चित कौतुकास्पद आहे. त्यांच्याशी जागतिक बाजारात लढा देणे सोपे नाही. तरीही प्रत्येक देशवासीयाने निर्धार केला तर आपण चीनची आर्थिक कोंडी करू शकतो. या चीनने १९८८ मध्ये औद्योगिक प्रगतीची योजना बनवली होती. त्यांनी जागतिक बाजारपेठेचा अभ्यास केला. कुठल्या पद्धतीचे उत्पादन चीन कमीत कमी खर्चात उत्पादन करून, जास्तीत जास्त देशांमध्ये विकू शकतो, यासंबंधी मास्टर प्लॅन बनवला. अशी हजारो उत्पादने हेरली. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले. ही उत्पादने दुसऱ्या देशांमध्ये अधिकाधिक विकण्याची व्यवस्था उभारली. यासाठीच्या निर्यातक्षम कारखान्यांना सरकारकडून भरघोस सवलती मिळाल्या. परिणामस्वरूप चीनची उत्पादने खूप स्वस्त मिळू लागली. आपण तीच चिनी उत्पादने खरेदी करायला सुरुवात केली. परिणाम भारतीय उद्योगांवर झाला. कृषी क्षेत्रात सातत्याने काम करून प्रश्न आणि आत्महत्या कायम आहेत. दुसरीकडे केंद्रीय खते विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना काळात मे २०२० मध्ये खतांच्या किरकोळ विक्रीत मे २०१९ च्या तुलनेत ९८ टक्के वाढ नोंदवण्यात आली. फेब्रुवारी २०२० मध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाली. भारत ट्रॅक्टर निर्यात करणारा देश आहे. या पार्श्वभूमीवर, ‘शेती ते ग्राहक अशी पायाभूत सुविधांची साखळी उभारण्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर फंडची घोषणा ‘आत्मनिर्भर भारत योजनेत करण्यात आली. आत्मनिर्भर भारत म्हणजे संपूर्णपणे स्वयंपूर्ण होणे नाही. वर्तमान व्यावहारिक जगात तसे शक्यही नाही. मात्र इतर देशांवर कमी विसंबून राहात आपल्या गरजा मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण भारतासारख्या विशाल लोकसंख्येची जबाबदारी स्वीकारणे सोपे काम नाही. सध्या आपला देश जगातील सर्वात तरुण देश आहे. येथील लोकसंख्येचे ६५ टक्क्यांहून अधिक नागरिक ३५ वर्षांहून कमी वयाचे आहेत, ही आपली मोठी उपलब्धी आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारत २०३०च्या पूर्वी चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल. याबाबत पावले उचलत पुढच्या २० वर्षात ठरवून आपण १३० कोटी लोकसंख्या १२५ कोटी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

सरतेशेवटी, भारत आत्मनिर्भर होण्यासाठी मी आजपासून काय करू शकतो ? याचा विचार करू यात ! घरातल्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले ? केवळ यावर त्याची बौद्धिक पातळी ठरवणे आपण सोडून द्यायला शिकूयात. स्वदेशी वस्तूंचा अधिक उपयोग करूयात. जागतिक राजकारणाबद्दल जागरूक राहूयात. युवकांनी स्वतःच्या कुटुंब नियोजनास प्राधान्य द्यायला शिकायला हवंय. ‘देशभक्ती हा विनोदाचा विषय नाही’ हे आपण स्वतःला समजवूया. कोरोनाची आलेली साथ, झालेले मृत्यू आणि आर्थिक नुकसान विध्वंसक आहे. यामुळे जगातील पुरवठा साखळी खंडित झाली आहे. तरीही चौकटीबाहेरचा विचार करण्याची संधी या संकटाने दिली. 'आत्मनिर्भर भारत' असाच चौकटीबाहेरची दूरदृष्टी असलेला कार्यक्रम आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी आपलं शासन हे अधिक कार्यक्षम, पारदर्शक, लोकांना उत्तरदायी व्हायला हवं. शासन, प्रशासन आणि जनतेचं नातं विश्वासाचं, मैत्रीचं बनल्यास आळसविरहित आत्मनिर्भर भारताची वाटचाल देशाला महासत्तेकडे नेईल.


धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.         

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,

ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...