“आनंदी राहण्यासाठी सतत काहीतरी नवीन करायला हवं आणि नवीन करण्यासाठी ‘कल्पकता’ हवी !” ह्या विचाराची नुसतीच पेरणी न करता, प्रत्येक वेळेच्या तासंतास भेटीत ‘त्या’ विचारांची नांगरणी करून विचारांना सतत ‘कल्पक’ गती देणाऱ्या ‘मार्गदर्शक नाना’ यांना कायमचा मुकलोय !!! कोकणचे ‘बुद्धिवैभव’, दैनिक 'सागर'चे संपादक, माजी आमदार निशिकांत तथा नानासाहेब जोशी यांचे वृद्धापकाळाने, वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी (दिनांक ३ जून २०१७, दुपारी ३.२० वा.) कळली आणि धक्काच बसला, काही सुचेनासंच झालं होतं...!!!
कोकणातील असंख्य लेखक-पत्रकारांना पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी देणाऱ्या, सुवर्णमहोत्सवी दैनिकाचे नाना संस्थापक-संपादक होते. दिनांक ७ सप्टेंबर १९९८ ला मला दैनिक सागरनेच पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी दिली, त्या दैनिकाचे संपादक असलेल्या नानांची प्रत्यक्ष भेट घडायला मात्र पुढे १० वर्ष जावी लागली. सन २००८ साली गुढीपाडव्याला ‘चिपळूण तालुका पर्यटन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले, तेव्हापासून शक्य होईल तेव्हा विशेषतः हातून काहीतरी नवनिर्मिती घडल्यानंतर ती भेट घेऊन माझे नानांकडे आवर्जून जाणे होई. प्रत्येक भेटीत नानांचे व्यक्तीमत्व माझ्यासमोर नव्याने उलगड़े. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विषयावर मला माहित नसलेले परंतु आवश्यक असे मार्गदर्शन मिळत असे. गेल्या १० वर्षातील प्रत्येक भेटीत नानांकडून जे काही विचारांना गती देणारे मार्गदर्शन मिळालेय, त्याला आजच्या दुनियेत खरंच तोड नाही. पाच-पंचवीस-पन्नास वर्षांपूर्वी आयुष्यात घडलेली, अनुभवलेली, पाहिलेली, जगलेली घटना सांगताना ‘नाना’ जे बिनचूक बारकावे सांगायचे ते ऐकताना अक्षरशः मती गुंग व्हायची ! मी अनेकदा त्या पद्धतीने ‘डायरी’ लिहिण्याचाही प्रयत्न केला. चर्चेला कोणताही विषय समोर आला तरी नानांचे काहीसे खास वेगळे मार्गदर्शन हमखास ठरलेले ! याच मार्गदर्शनाने आम्हाला ‘सतत वेगळा विचार करण्याचे बळ पुरविले’ हे मात्र नक्की. नाना, चांगल्या कामाचे मनापासून भरभरून कौतुक करायचे, सूचना करायचे. आमच्या अनेक प्रकारच्या विशेषांक, दीपावली अंक, स्वत: लिहिलेली पुस्तके, कोकण पर्यटन प्रचारपत्रके, कोकण नकाशा आदि विविध प्रकाशित उपक्रमांची आवर्जून पाहणी करताना बारीकसारीक माहिती मोठ्या उत्सुकतेने जाणून घेत आणि आमचा विचार कुठेतरी गडबडतोय म्हटल्यावर लगेच तो सुधारित, पटवून देत. फोनवर बोलताना आवर्जून अलिकडे आम्ही लिहिलेला, कुठेतरी दूरच्या नियतकालिकातला लेख वाचल्याचे सांगीत, हा सारा मार्गदर्शनाचा अनुभव आमच्यासाठी आयुष्यभराचा अनमोल ठेवा राहणार आहे.
नानांसोबतच्या ओळखीच्या अगदी सुरुवातीला, २००८ साली 'चिपळूण तालुका पर्यटन' नंतर आम्ही 'श्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन' पुस्तिकेसाठी नानांकड़े शुभसंदेश मागायला गेलो होतो तेव्हा 'किती लिहू?' या आम्हाला न समजलेल्या त्यांच्या प्रश्नावर आम्ही, 'पुस्तिका खूप छोटी आहे, चार ओळी तरी लिहून द्या' असे सहजच म्हटले...परतच्या भेटीत मोजक्या चार ओळीतील नानांचा संदेश हाती आला होता...! पुस्तिका भेट द्यायला जेव्हा गेलो तेव्हा मात्र नानांकड़ून तब्बल दोन तास आम्ही 'भगवान परशुराम' या विषयावरील श्रवणानंद घेतला होता. अगदी मागील वर्षी आमचे 'प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी' हे चरित्र लेखन प्रसिद्ध होत असताना नानांकडेच आम्ही हक्काने प्रस्तावना मागितली आणि नानांनी मनापासून भरभरून लिहून दिलीही...! त्यावेळी खरेतर नानांनीच त्या पुस्तक प्रकाशनाला यावे, अशी इच्छा होती. पण नेमके तेव्हाच नानांचे आजारपण-ऑपरेशन आदि विषय पुढे आल्याने ते राहिले.
सततचे नवनवीन उपक्रम नानांसमोर ठेवायचे, त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, प्रेरणा घ्यायची आणि नवीन काहीतरी करायला बाहेर पड़ायचे... असाच गेल्या दहा वर्षांचा आमचा नियमित क्रम राहिला... नानांच्या जाण्यामुळे हे सारं आता थांबलय ही जाणीव जगण्यासाठी बळच देईनाशी झाली... इतकी की, 'काय लिहू?' तेच सुचेना...! नानांचे मार्गदर्शन आठवून सतत कार्यरत राहणे एवढेच आता हाती शिल्लक राहिलेय...!!!
विनम्र श्रद्धांजली !!!
धीरज वाटेकर चिपळूण.
स्वर्गीय नानासाहेब जोशी यांना चिपळूणातील पत्रकारांनी श्रद्धांजली अर्पण केली |
चिपळूणातील पत्रकारांच्या श्रद्धांजली सभेत स्वर्गीय नानांविषयी आठवणी सांगताना धीरज वाटेकर |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा