दोडामार्ग ! महाराष्ट्रातील
दक्षिणेकडचा अखेरचा ६२ गावांचा तालुका. कोकणातील जवळपास जैवविविधता एकहाती
सांभाळणारा. गवारेडे, टस्कर हत्तींच्या प्रभावाखाली असलेला. मराठीसह कोकणी आणि मालवणी
बोलणारा. एका सीमेला कर्नाटक, पश्चिमेला गोवा राज्याशी जोडलेला. बिचोली (गोवा)
तालुक्याशी सतत तुलना होणारा. सन १९९९ ला निर्मिती होऊनही आजतागायत महाराष्ट्र
सरकारकडून आरोग्य, रोजगार, उद्योग व्यवसाय, पर्यटन सुविधांत
सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याच्या भावनेने अलीकडच्या काळात ‘संपूर्ण तालुका
गोव्यात विलीन करावा’ अशी चळवळ उभी झालेला. होऊ घातलेल्या ‘मोपे’ आंतरराष्ट्रीय
विमानतळापासून जवळचा. कदाचित ‘मायनिंग’साठी गोव्यातल्या
उद्योजकांचे बारीक लक्ष असलेला तालुका. यातल्या वनवैभवाशी जवळीकता असल्यानं दोडामार्गात
रममाण होण्याची संधी शोधत होतो, मागच्या फेब्रुवारी महिन्यात (२०२०) ती मिळाली. मग काय ? दोडामार्गच्या
वनवैभवात मनसोक्त भटकलो. निसर्ग अनुभवाच्या अनेक गोष्टी पोतडीत भरूनच बाहेर आलो..!
आजच्या जागतिक वनदिनी त्यातल्या काहींचा उलगडा..!
२८ फेब्रुवारीला दोडामार्गात
पोहोचलो तेव्हा सायंकाळचे ६ वाजलेले. सूर्य मावळतीला आलेला. अजून अंधार व्हायचा
होता. साध्याश्या लॉजमध्ये टी.व्ही. की गरम पाणी असा विचित्र पर्याय विचारल्यावर गरम
पाणी स्वीकारलं. मुक्कामाची इथली पहिलीच वेळ. मित्र यायला अजून अवधी होता. लॉज बुक
करून फेरफटका मारायला बाहेर पडलो. रस्त्यावरची हॉटेल्स ८ नंतर बंद होणारी. नाही
म्हणायला चायनीजयुक्त हॉटेल किमान ११ पर्यंत सुरु असणारे. मग जवळच्या खाणावळीचा
शोध घेतला. दीडेक तासांनी मित्र पोहोचला. डोक्यातील नेहमीची कामे बाजूला केली. आता हाताशी
असलेला क्षण अन क्षण महत्त्वाचा. पुढच्या ४० तासांचं नियोजन केलं, लॉजवर गेलो. खोली उघडली नि आत झोप कमी
नि झुरळंच जास्त भेटणार याची जाणीव झाली. याबाबत लॉजच्या मॅनेजरला बोललो तर, ‘काय म्हणता ? मी तर रोज झोपतो या
खोलीत ? आम्हाला एकही नाही दिसतं ?’ असं म्हणाला तो ! शेवटी काही
झुरळंं त्याला दाखवून, आवरून जेवायला बाहेर पडलो. तसंही जंगल फिरायचं असल्यानं फारसा
झोपण्याचा प्रश्न नव्हता. एका साध्या खाणावळीत हलका आहार घेतला. शहरातून आता अशा
घरगुती खाणावळी कमी होत चालल्यात.
रात्रीचे साडेनऊ वाजलेले.
सर्वत्र मस्त अंधार पसरलेला. दिवसा दिसणारे जंगल रात्री अक्षरशः भयाण वाटते. त्यात
रात्र आमावस्येच्या जवळची असेल तर अधिकच. जवळच्या तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या
वनपरिक्षेत्र संशोधन केंद्राचा परिसर धुंडाळण्याचं ठरवलेलं. रात्री १० वाजता नाईट
ट्रेलला सुरुवात केली. दोडामार्ग बेळगाव मार्गावरील हे जवळचं उत्तम संरक्षित जंगल.
सांबर, गवे, खवलेमांजर, बिबट्या,
साळींदर, रानडुक्कर, काळमांजर दिसण्याची शक्यता. बॅटरीच्या उजेडात चालायला सुरुवात
केली नि रातकिड्यांचा आवाज कानात शिरला. काहीतरी दिसावं म्हणून बॅटरी झाडाचे शेंडे
धुंडाळू लागली. निशाचर कुत्र्यांचे भुंकणे सुरु झालेले.
वाटेवरती एका सुकलेल्या
पानावर बसलेल्या ‘कॉमन ट्री फ्रॉग’ने दर्शन दिले. तिलारी नदीपात्राच्या
खळाळत्या आवाजाच्या दिशेने सरसावलो तेव्हा वॉचटॉवर आणि बसण्याची व्यवस्था दिसली. बॅटरीच्या उजेडात नदीचे
दोनही तीर चाचपण्याचा प्रयत्न केला. या परिसराला भेट द्यायला येणाऱ्यांसाठी शासनाने २ ठिकाणी
वॉच टॉवर आणि बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यातल्या जंगलात जाताना लागणाऱ्या पहिल्याच
ठिकाणाजवळ एका आंब्याच्या झाडाच्या खोडावर रात्रींचर असलेला बिनविषारी ‘कॉमन वोल्फ स्नेक’
(कवड्या) दिसला. दिसला तेव्हा तो जमिनीपासून ७/८ फुट उंचीवर पोहोचलेला. कदाचित
कुठलाश्या भक्ष्याच्या शोधात वर चढला असावा. त्याला चांगली ग्रीप भेटलेली. मूळ तपकिरी मात्र
क्वचित काळ्या रंगाचा दिसणारा कवड्या आम्ही पाहिला. बराचवेळ त्याच्याजवळ घालवला
पण हा काही जागचा हालला नाही. मग शेवटी आम्हीच हाललो. बऱ्याच दिवसांनी,
बॅटरीच्या प्रकाशात समोर काय चमकेल याचा नेम नसताना काळोख्या अंधारात केलेली रात्रीची पायपीट
अविस्मरणीय होती. किर्रर्र अंधारात जंगलवाटा तुडवण्यात वेगळी मजा असते. घुबड आणि
नाईटजार सारखे निशाचर शोधण्यासाठी भरपूर अट्टाहास केला. रात्रीच्या अंधारात दोनेक
तास इथे घालवले. रात्रीचं हे जंगल वेगळचं भासलं. महाराष्ट्र शासनाने सन १९७९-८०
साली येथे हे संशोधन केंद्र स्थापन केलेले. इथला उन्नेयी
बंधारा हा तिलारी प्रकल्पांतर्गत येणारा. दोनही प्रकल्पांत गोवा सरकारचा सहभाग.
पर्यटनस्थळ म्हणून पहिले जात असले तरी उत्तम ‘पक्षी अभयारण्य’ होण्याची क्षमता या
ठिकाणात असल्याची जाणीव झालेली. सकाळी पहिलं इथचं यायचं ठरलं. झुरळवाल्या लॉजवर परतलो
तेव्हा रात्रीचे १२ वाजून गेलेले. जाताना विनंतीवजा बोललो असलो तरीही कोणी दरवाजा
उघडेना. या लॉजवर आल्यापासून कोकणात पर्यटन वाढीसाठी काय काय करायला हवंय ? याचे
जणू धडेच मी मनातल्यामनात गिरवित होतो. इतक्यात दार उघडलं गेलं. सुटकेचा निश्वास
टाकला. सव्वाएक वाजता
उद्याचा विचार करत अंथरुणावर पडलो.
झोपेतून जागा झालो तो पहाटे
(२९ फेब्रुवारी) पाचच्या गजराने. पटापट
आवरलं. साडेसहाला लॉज सोडला. कालच्याच ठिकाणी जायला निघालो. दोडामार्ग चौकात
पिंपळपाराजवळ चहा घ्यायला थांबलो. पिंपळावर दोनेकशे बगळ्यांची वसाहत बसलेली.
त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची जाणीव रस्त्यावरील नक्षीकाम पाहून आलेली. त्यांच्या
खाली म्हणूनचं कोणी दुकानं घालत नसावं. मी सावरलो. वैभव उपहारगृहाच्या
दिशेने निघालेलो. तर त्या बगळ्यांनी नको-नको म्हणताना मलाही खांद्यावर थोडासा
प्रसाद दिलाचं ! चहा घेताना गळ्यातले कॅमेरे पाहून मालकाने जवळच्या कसईनाथ
डोंगरावर जायला सुचवलं. सकाळी ७ वाजता दोडामार्ग सोडलं. बेळगाव रस्त्याला आता कसईनाथाचा
डोंगर उजवीकडे दिसत होता. रस्त्यात तिलारी धरणाचा कालवा आडवा आला. आकाशातून मलबार
पाईड हॉर्नबिल उडत गेला. भेडशीच्या बाजारपेठेत असलेलं घोटींगचं मोठं झाड पाहिलं. अशा
मोठाल्या झाडांच्या ढोलीत धनेशसारख्या पक्ष्यांचे वास्तव्य असते. पूर्वी २०१५ साली
झाडावरच्या मधमाश्यांनी बांधलेल्या पोळ्यावर त्याच झाडाची फांदी पडल्याने
चवताळलेल्या मधमाश्यांनी नागरिकांवर अचानक हल्ला चढवून लोकांना जखमी केलं होतं. तेरवण-मेढे
बंधाऱ्याच्या दिशेने उजवीकडे वळलो तेव्हा डावीकडे छोटंसं श्रीपाताडेश्वरांच देवस्थान दिसलं. ही
देवराई असल्याचं लक्षात आलं. कालच्या रात्रीच्या अंधारात हे छोटंसं मंदिर दिसलं
नव्हतं. सकाळी ते पत्र्याची शेड असलेलं मंदिर, तिथला भगवा झेंडा, तुळशीवृंदावन
नीटसं पाहिलं. सोबतचे दोघे मित्र वन्यजीव अभ्यासक असल्याने त्यांच्यात मी तसा
अनाडीचं ! शक्यतो आपल्यापेक्षा विद्वानांच्यात वावरलं की थोडाफार आपल्यालाही कळतं
तशातलं आमचं अरण्यवाचनं ! वेड्यासारखा मी पहिला कुठं गेलो असेन तर तो कालचा ७/८
फुट उंचीवरील कवड्या बघायला. अर्थात सकाळी तो तिथे थोडाच असणार होता. तो नव्हताच. आता
उजाडलेलं. कोवळं उनही
अजून पडायला नव्हतं. निसर्ग नुकताच खुलू लागलेला. जंगल जागं झालेलं. पक्षांची किलबिल
आनंद देत होती. तिलारी नदीच्या वाहत्या पात्राचा आताचा आवाज मनात निर्झराचा नाद
गुणगुणवत लागला. एका ठिकाणी गाडी उभी केली नि वाट तुडवायला सुरुवात केली.
बऱ्यापैकी दाट जंगल. झाडांच्या फांद्या एकात एक गुंतलेल्या. सूर्यप्रकाश किंचित
जमिनीवर पडू लागलेला. इतक्यात एका झाडाच्या शेंड्यावर हालचालीची चाहूल लागली.
जागेवरच थांबलो. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एका झाडाच्या टॉपला महाराष्ट्राचा राज्यप्राणी
शेकरू (उडती खार; Indian giant squirrel, इंडियन जायंट
स्क्विरल) दिसलं. पण...! नजरेची पापणी लवायच्या आत या फांदीवरुन त्या फांदीवर
टुणकन उड्या मारत गेलं सुद्धा. माणसाची साधी चाहूलही लक्षात यावी इतकं शेकरू
संवेदनशील. जागेवर शांत उभा राहून कानोसा घेतला. तेव्हा अर्धा डझन शेकरू इथेच
भेटले. वेळ सकाळची असल्याने आम्हाला फोटोजनिक पोझ देण्यापेक्षा त्यांना आपल्या
पोटापाण्याची चिंता अधिक सतावत असावी. त्यात त्यांच्या मागून पुढून फिरणारे आम्ही
! बऱ्याच वेळानंतर त्यातलं एक शेकरू कुठल्याश्या रानबिब्याच्या पानाचा मागचा कोवळा
देठ खाताना दृष्टीस पडलं. एव्हाना आमच्या पाठलागाला तेही सरावलं असावं. जागचं
अजिबात हलेनाचं. जमेल तेवढे फोटो टिपले. मित्रानी स्टँड लावून छानसा व्हिडीओ
बनवला. शेकरुंच्या सान्निध्यात तासभर कसा गेला ते कळलंच नाही. इथल्या झाडांवर उंच ठिकाणी,
बारीक फांदीवर झाडाच्या काटक्या, मऊ पानं यांचा उपयोग करून सहसा अवजड परभक्षी पोचू
शकत नाही अशा ठिकाणी शेकरुने बांधलेली घुमटाकार आकाराची घरटी पाहिली. सकाळी आणि
सायंकाळी सूर्यास्तापूर्वी शेकरू सक्रीय असतं हे अनुभवायला मिळालं. मधल्याकाळात ते
आराम करतं म्हणे. पूर्वी आपल्या राज्यात भीमाशंकर आणि फणसाड अभयारण्यात शेकरूंचा
आढळ असायचा. नंतर डोंगररांगा, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबासह पश्चिमघाटात, विदर्भातील जंगलात दर्शन घडू
लागलं. त्यांचं आजचं दर्शन आमच्यासाठी सर्वोत्तम. शेकरूंनी नाष्ट्याला काय
खाल्लं असावं ? म्हणून विचार करताना झाडाचं वरून लालसर आवरण असलेलं फळ रस्त्यावर
पडलेलं दिसलं. ताजं होतं. फळाला नीटसं फोडून आतला गर फस्त करून झालेला. तो नक्की
शेकरुनेच केला असेल का ? शेकरुही नंतर खूपसा माणसाळल्याने हा प्रश्न मनात तसाच
राहिला.
पुढच्या तिथल्याच किमान दोन
तासाच्या भटकंतीत एरव्ही चुकून दिसला तर नशीब असं म्हणायला लावणारे असंख्य पक्षी
पाहायला मिळाले. त्यात यलो ब्रोड बुलबुल, व्हाईट रम्प्ड शामा, टिकेल्स ब्ल्यू
फ्लायकॅचर, डार्क फ्रंटेड वारब्लर, ग्रेट होर्नबिल, लेसर फ्लेम ब्लॅक,
स्मॉल ब्ल्यू किंगफिशर होते. सुतारपक्षाची
ठोकाठोकी विलक्षण आणि गूढ वाटली. रॅकेट टेल्ड ड्रॉन्गो आणि कॉमन ड्रॉन्गो एकमेकांना भेटले.
आम्हांला क्लिक करायला मिळाले. स्वर्गीय नर्तक (एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर) हा
विहंग जमातीतला एक सुंदर जीव. १५ वर्षांपूर्वी शिरवलीच्या जंगलात पहिल्यांदा
पाहिलेला, तेव्हा कॅमेरा नव्हता. रूपेरी पांढरा रंग, चकाकणारे काळे
डोळे, काळ्या रंगाचा
तुरा, लांबलचक फितीसारखी पिसं असलेली शेपटी. सुंदर तर आहेच, पण तो हवेतल्या हवेत
उडणारे कीटक फस्त करतो म्हणून ‘फ्लायकॅचर’ ! उडताना वेगाने
गिरक्या घेतो. त्याचे हे उडणे एखाद्या नृत्यासारखे वाटते म्हणून तो ‘स्वर्गीय नर्तक’! त्याला भरभरून पाहिलं,
कसंतरी क्लिक केलं. कोणत्याही जंगलातून पायी फिरण्याचा अनुभव अनुपम असतो. तो अनुभव
जगण्याचा कार्यक्रम सुरु असताना तिलारी नदीपलिकडच्या भागात ‘चेनसॉ’ने झाडं
तोडल्याचा कर्णकर्कश आवाज आला. मित्र म्हणाला, ‘पलिकडे खाजगी जंगल आहे ते तोडताहेत
!’ ‘चेनसॉ’च्या आवाजाने तोंड पडलेल्या अवस्थेत पुढे चालत असताना एका
झाडावरून किंचित मोठासा पक्षी उडालेला दिसला. उडताना पाहिल्यावर कळलं की तो ‘मलबार
ग्रे हॉर्नबिल’ होता. धनेश पक्ष्याच्या (hornbill) प्रजाती खूप
आहेत. सह्याद्रीत मोठा अबलक धनेश (Great Hornbill), मलबारी कवड्या
धनेश (Malabar Pied Hornbill), मलबारी राखी धनेश (Malabar grey
hornbill), राखी धनेश (Indian grey Hornbill) हे चार प्रकार आढळतात. हा त्यापैकीच एक, मी
पहिल्यांदा पाहिला. पण फोटो न मिळाल्याने, त्यातूनही नीटसा पाहाता न आल्याने मनाला
चटका लागून राहिलेला. मोठाली शेवर पाहिली. बांबूचं जाळलेलं बेट भेटलं. एका
पांथस्थाला विचारलं तर म्हणाला, ‘रस्त्यात आडवं येत होतं म्हणून जाळलंनी.’ उन्नेयी बंधाऱ्याच्या दिशेने
जाताना रेड स्पर हेन, सर्पंट ईगल, बार्बेट दिसला. बंधाऱ्यावर पोहोचलो, पलिकडे
जायला निघालो. एकावेळी अनेक विषय डोक्यात घेऊन चालण्याचा जसा फायदा होतो तसा कधीकधी
तोटाही होतो. इथे तोटा झाला. धरणाचे पाणलोट क्षेत्र टिपण्यासाठी कॅमेऱ्याची लेन्स
बदलली तेवढ्यात प्रौढ आकारमान असलेला मलबार पाईड हॉर्नबिल मोकळ्या आकाशातून इकडून
तिकडे जाताना दिसला. लेन्स चेंज करेपर्यंत तो झाडीत विसावला होता. त्याला आकाशातून
उडताना इतक्या जवळून पाहाणे संस्मरणीय होते. मगाचचा ‘मलबार ग्रे हॉर्नबिल’ बाबतचा मनाला
लागलेला चटका पाऊण तासांनी दूर झाला जेव्हा एका अनामिक वळणावर अचानक ‘मलबार ग्रे
हॉर्नबिल’ सामोरा आला नि क्लिक करायला मिळाला. या निमित्ताने एकाच
ठिकाणी रात्री आणि दिवसा जंगल निरीक्षणाचा सलग अनुभव मिळाला. चहा-बिस्कीट पोटात ढकलून
बाहेर पडलेल्याला आता ४ तास होत आलेले. पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी पोटपूजा
मस्ट होती. जवळच्या कोनाळकट्टा मुख्य वसाहतीतील एका ‘आँटी’च्या हॉटेलात आलो,
चांगला डोसा मिळतो म्हणून. पण पीठ संपलेलं. इडली सांबारावर ताव मारला. मन प्रसन्न असलं की चव समजत
नाही, सगळंच छान लागतं. तसं झालं.
पुढचा जंगल थांबा
देवराईत होता. तेरवण-मेढे गावाच्या हद्दीत सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन
श्रीनागनाथ मंदिराच्या देवराईच्या दिशेने निघालो. मंदिराच्या आवारात ‘नागकेशर’चं
(नागचाफा/सुरंगी/ Mesua ferrea) झाड पाहिलं. भारतात
पश्चिम किनारपट्टीत आढळणारं सुरंगी दुर्मीळ तितकंच औषधी आहे. देवराईत शिरतानाच
असंख्य विशाल वृक्ष दिसले. मंदिराचा जीर्णोद्धार नियोजित असल्याने अजून किती दिवस ते
या स्वार्थी विश्वाची सोबत करतील देव जाणे. त्यांच्याकडे मनसोक्त पाहिलं. कुशीत
जाऊन स्वतःचेच फोटोही काढून घेतले. फोटोंकडे पाहिल्यावर कालपरवा जन्मलेल्या मला तो
विशाल वृक्ष आपल्या जुन्या-जाणतेपणाची जणू जाणीवच करून देत असल्याचा भास झाला. देवराईत बहरलेल्या
‘सीता-अशोक’नं स्वागत केलं. त्याच्या दर्शन भेटीने प्रसन्न व्हायला झालं. भारत-श्रीलंकेतील
हा ‘सीता अशोक’ वृक्ष सुंदर व सदाहरित
वृक्षांमध्ये गणला जातो. हिंदू आणि बौद्ध धर्मात पवित्र मानला जातो. अशोकाचे खरं
वैभव म्हणजे त्याची फुले. या फुलांचा बहर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातला. मंद
सुगंधी फूल चार गोलाकार पाकळ्यांचे असून लांब-लांब पुंकेसर फुलाच्या बाहेर आलेले.
फुले उमलताना पिवळ्या रंगाची, मग केशरी आणि
शेवटी गडद नारिंगी-लाल होत निघालेली. एकाच गुच्छात छटा क्लिक केल्या. शेकरुसह मलबार
पाईड हॉर्नबिलचं पेअर
इथेही भेटलं. पण गर्द वनराईत आमच्या सोबतच्या लपाछपीत ते विजयी ठरलं. आम्ही त्याला
भेटण्याच्या नादात छोट्याश्या देवराईतल्या पाऊलवाटा नुसत्याच तुडवत राहिलो.
त्यातही एक वेगळी मजा असतेच म्हणा ! वेताच्या काठीचं बेट पाहिलं. आणखी कशाकशाची
ओळखता न येणारीही फुलंही दिसली.
तिलारी जलविद्युत
प्रकल्प क्षेत्रामध्ये वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगल आणि इको टुरिझम निर्मिती
प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिलेल्या. मग विशेष काही नसताना तिलारी घाटाचा
प्रवास केला. जाताना रस्त्यात केरळीयनांनी मोठ्या प्रमाणात केलेली रबर लागवड, अननस
लागवड पहिली. ह्या लागवडीचे प्रमाण इतके की कोकणाच्या निसर्ग सौंदर्यात आणि कृषीअंतर्गत
शेती उपक्रमात झपाट्याने बदल दिसणार असं वाटलं. लागवडीसाठी पाण्याचे स्रोत
असणाऱ्या डोंगर कपारीतल्या जमिनीवर झालेली बेसुमार वृक्षतोड वेदनादायी वाटली.
धरणांमुळे इथले पाणी वाढले, शेती वाढली. जंगल कमी होऊ लागले. त्याचा फटका वन्यजीवांना
बसू लागलाय. या विचाराने रबर लागवडीतून कोकणात आर्थिक क्रांती घडवण्याची मांडली
जाणारी गणितं आमच्यातल्या निसर्गाप्रेमाला अस्वस्थ करून गेली. वाटेत आशियाई
हत्तीची माहिती देणारे फलक पाहायला मिळाले. हे फलक पाहून क्षणभर आपण कर्नाटकात तर
नाही ना ? असं वाटून गेलं. फलकावर हत्ती-मानव संघर्ष टाळण्यासाठी वापरण्यात
येणाऱ्या तंत्रांची माहिती होती. आता अत्यंत नागमोडी वळणे आणि अती तीव्र उतारामुळे
वाहतुकीसाठी अवघड अशी ओळख असलेला तिलारीचा रामघाट सुरु झाला. सोबतीला नदी होतीच. तिलारी
जलविद्युत प्रकल्पाचे काम करताना यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी पाटबंधारे
विभागाने हा घाट तयार केलेला. सन २०१८ साली पाटबंधारे विभागाने बांधकाम विभागाकडे
वर्ग केल्यानंतर जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची डागडुजी, संरक्षक
कठड्यांचे मजबुतीकरण, रुंदीकरण झाल्याने सध्या वाहतूक वाढलेला, आंबोली घाटाला
पर्याय असलेला घाट. तिलारीतली रम्य सायंकाळ ही स्वच्छ आणि सुंदर हवेसाठी प्रसिद्ध.
तिलारी हे कोकणपट्टीतलं सर्वात मोठं मातीचं धरण तिलारी नदीवर बांधलेलं. महाराष्ट्रासह
गोवा, कर्नाटक भागातील सीमावर्ती भाग धरणामुळे ‘सुजलाम् सुफलाम्’ बनलायं. याने उन्हाळय़ात कोरडय़ा पडणाऱ्या
विहिरींची पाणीपातळी वाढवली आहे. इथे ६६ मेगावॅटच्या एका जनित्रामधून जलविद्युत
निर्मिती केली जाते. खूप ऐकलेलं या घाटाविषयी...! इन्शुरन्स नसलेला महाराष्ट्रातील
एकमेव असलेल्या या घाटातील प्रवासाचा अनुभव शब्दातीत. घाटातून खाली उतरलो तेव्हा
दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेलेली. पोटात काहीतरी ढकलायला हवं म्हणून साटेली
भेडशी येथील घरगुती खाणावळीत जेवलो.
पुढच्या जंगल प्रवासाला
लागलो. आजचा मुक्काम आंबोलीला ठरलेला. जायचा रस्ता दोडामार्ग-सावंतवाडी-आंबोली
ऐवजी दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोली असा ठरवलेला. हा बराचसा कच्चा, तीव्र
चढ-उतारांचा रस्ता जवळपास जंगलातून जातो. वाटेत २/३ गावं लागतात, इतकंच. हाही अनुभव संस्मरणीय. एखादं-दुसऱ्या मोटारसायकलीचा
अपवाद वगळता रस्त्याला वाहतूक नव्हती. मित्र म्हणाला, अगदीच नाही म्हणायला दुधवाले, पोल्ट्रीवाले, जवळपासचे
दुचाकीस्वार इथून जात-येतात. आम्ही दोडामार्गवरून सासोलीफाटा सोडून
कुडासे-कुंब्रलच्या दिशेने निघालो तेव्हा सायंकाळचे ४ वाजलेले. सुपारी पिकासाठी
कुंब्रल, तळकट, कोलझर प्रसिद्ध
आहे. कुंब्रलच्या पुढे आकाश ढगाळ झालेले. इतक्यात गाडीच्या काचेवर पावसाचे थेंबही
जमा झालेले. आणखी थोडं पुढं आल्यावर रस्ता ओला झालेला दिसला. दिवसभर बराचसा प्रवास
झालेला. वाटेत अवकाळी पावसाची भेट झालेली. मग काय ? त्याला
अंगाखांद्यावर खेळू दिलं. मातीचा सुगंध रंध्रात भरून घेतला. पाऊस थांबला, पुढे निघालो. आंबोली घाटाला पर्याय म्हणून गेली
दशकभर, आम्ही प्रवास करीत असलेल्या या मार्गाची चाचपणी सुरु आहे. ब्रिटीशांनी सन
१८५६ साली बांधलेला सावंतवाडी आणि बेळगाव या व्यापारी पेठांना जोडणारा आंबोली घाट
वाहतुकीला धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात या घाटमार्गावर दरडी कोसळतात. त्याला
दाणोली-केसरी-फणसवडे-नेनेवाडी या मार्गाचा पर्याय आहे. पण कुठूनही गेलो तरी वनजमीन
असणार आहे. तिला नख लावणं म्हणजे...? पण याही स्थितीत आंबोली घाटाला पर्याय किंवा
त्यांची उत्तम डागडुजी व्हायला हवी. आम्ही प्रवास केलेल्या तळकट-चौकुळ-आंबोली या
रस्त्याची मागणी पुढे आली आहे. इथेही वाटेत वनखात्याची बरीच जमीन आहे. तळकट-कुंभवडे
रस्त्यात गवे, हरिण, भेकरे, बिबट्या, ससे, रान मांजरे काळवीट दिसतात. नेचर ट्रेलसाठी हा
मार्ग सर्वोत्तम आहे. मात्र दोन गावांच्या जंगलांमधले असे ‘कॉरीडोर’ वन्यश्वापदांच्या
मृत्यूस, त्यांच्याकडून होणाऱ्या मानवी हल्यांना कारण
ठरतात. याचा विचार इथे व्हायला हवा, असं प्रवासात वाटतं
राहिलं.
सायंकाळचे
साडेपाच वाजून गेलेले. पार करायचं अंतर कमी राहिलं असणारं ! जंगलातली रानपाखरं, जनावरं सारी आपापल्या मुक्कामाला निघालेली. आता
कोणीतरी दर्शन देईल असं वाटत असतानाचं त्या दहाफुटाच्या कच्च्या रस्त्याशेजारील
झाडावर पुन्हा मलबार पाईड हॉर्नबिलनं दर्शन दिलचं. याला इतक्या जवळून पहिल्यांदा
पाहायला मिळालं. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर असल्यानं फोटोत कमाल साधता आली नाही.
पण खूप जवळून पाहण्याचा आनंद मात्र घेता आला. दुपारी ‘त्या’ नागनाथाच्या
देवराईत लपाछपीचा खेळ अर्ध्यात टाकून परतलेल्या आम्हाला ‘मी जिंकलो, मी जिंकलो !’ असं खिजवायला तर हा आला नसेल ना ? क्षणभर असं वाटावं इतक्या जवळून भेटला. (तसं तांत्रिकदृष्ट्या
आम्ही अजूनही दोडामार्गच्या हद्दीतच होतो ना !) थोड्या अंतरावर गेल्यावर खडपडे-कुंभवडे
गावची पक्की सडक लागली. कुंभासारख्या आकाराचं म्हणून कुंभवडे. गावात सुमारे
पाचशेच्या जवळपास लोकवस्ती असावी. बहुतेकजण शहरात राहतात. कुंभासारखा आकार
असणाऱ्या या गावात विलोभनीय निसर्ग, अचंबित करून
टाकणारे दोन नद्यांच्या संगमावर वाहणारे धबधबे आहेत. कुंभवडेच्या ‘बोरी’ येथून ‘कळणे’ नदी उगम पावते.
कुंभवडेपासून कुंब्रलपर्यंत ती ‘न्हयखोल’ म्हणून ओळखली जाते. दोडामार्ग जंगल प्रदेशातून
मार्गक्रमण करीत ही गोव्यात प्रवेश करते. गोवा हद्दीत ओझरी / मेणकुरे भागात शापोरा
ब्रीजजवळ तिलारीत विलीन होते. न्हयखोलच्या पात्रावर भेकुर्ली येथे जलविद्युत धरण
प्रकल्पाचे सर्वेक्षण झाले आहे. या भागात आजही नाचणीची शेती होते.
छोट्याश्या
घाटीतील वळणावर गाडी थांबवली जेव्हा समोरच्या झाडाच्या उंच फांदीवर यलो फुटेड
ग्रीन पिजन बसलेला दिसला. त्याला कॅमेराबंद करून पुढे निघालोच होतो तर वळणावरच्या
पुढच्याच झाडाच्या शेंड्यावर चेस्टनट हेडेड बी इटर (मुरलीचरा) बसलेला दिसला.
बराचवेळ तो तसाच बसलेला होता. कुणाचीतरी वाट पाहात असावा. थोड्यावेळाने जिची वाट
पाहात होता ती येऊन गेलीच. पण हा काही तिच्या मागून गेला नाही. आम्हाला फोटोपोझ
देत बसला. शेवटी आम्ही जसे त्याच्याजवळ जाऊ लागलो तसा सतर्कतेने उडाला. काळी घार (Black Kite), सातभाई (Jungle babbler), शिपाई बुलबुल (Red-whiskered bulbul), लहान पाणकावळा (Little
Cormorant), पाँड हेरॉन, रानधोबी (Forest
wagtail), Yellow-browed bulbul, वेडा राघू (Green bee-eater), व्हाईट-चीक्ड बारबेट, Indian scimitar babbler आदि पक्षीही
पहिले. खडपडे-कुंभवडे गाव हद्दीतही नुकताच पाऊस पडून गेलेला. चहा कोठेच उपलब्ध
नसताना अंगातला शीणवठा घालवण्यासाठी इतकं उत्तम वातावरण शोधूनही सापडणार नाही.
निवांत व्हायला रस्त्याच्या एका बाजूला आलो. ज्या छोट्याश्या घाटीने आम्ही प्रवास
करणार होतो तिचं रम्य चित्र समोर दिसत होतं. पायथ्याशी छोटासा ब्रीजही दिसला. ‘चला ! आता निघू यात !’ असं आमच्यातला
कोणीतरी म्हटला इतक्यात समोरच्या पर्णहीन झाडावर पुन्हा एक मलबार पाईड हॉर्नबिल
येऊन बसला. आज बहुदा यांच्याच दर्शनाचा दिवस असावा. तसंही घरून निघताना प्रवासात
ओणी (राजापूर), माडखोल (सावंतवाडी) जवळ आणि आज सकाळी
दोडामार्ग सोडल्यावर लागणाऱ्या अगदी पहिल्या ब्रीजच्या परिसरातही याने दर्शन
दिलेले. आत्ताच्या दर्शनाने त्यांची गेल्या २/३ दिवसातील सारी दर्शने आठवली.
विचारचक्रात असताना त्याचं झाडाच्या दुसऱ्या टोकाच्या फांदीवर आणखी एक मलबार पाईड
हॉर्नबिल येऊन विसावला. बहुदा ही पेअर असावी. ‘तो तिच्याकडे
पाहात होता. ती मात्र दुर्लक्ष करीत होती.’ असे काहीशे दृश्य
होते ते ! १० मिनिटं गेली असतील. शेवटी दोघेही उठून उडून गेले त्या ब्रीजनजीकच्या
झाडांत. या पक्ष्यांनी आम्हांला आम्ही खऱ्या अर्थाने जंगलातून प्रवास केल्याची
साक्ष दिली.
घाटी उतरून खाली
आलो तर इंग्रजी ‘T’ जंक्शनवर एक
मार्गफलक दिसला. त्यावर आम्ही आलो त्या रस्त्यावर गोवा, बांदा, दोडामार्ग, तळकट, समोर कुंभवडे तर
उजवीकडे आंबोली २० किमी. दाखविले होते. काजूच्या बिया अन् लाल-पिवळ्या बोंडांवर पावसाच्या
अस्तित्वाच्या खुणा खुणा आम्हाला चटकन दिसल्या. सध्याचा कुंभवडे-चौकुळ रस्ता उत्तम
असल्यानं चौकुळ लवकर आलं. ग्रामीण कोकण कृषी पर्यटनात चौकुळचा समावेश आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून कडव्या सैनिकांचा गाव म्हणून चौकुळ प्रसिद्ध आहे. गावात
३५/४० लहान-मोठ्या गुहा, विविध रंगी
फुलांचे सडे पाहाता येतात. आजही गावातील किमान ६० टक्के घरातील मंडळी लष्करी सेवेत
आहेत. चौकुळ ते आंबोली हे दहा कि.मी. अंतर पूर्वी घनदाट जंगल होते. भणभणता वारा, अहोरात्र धुकं, जंगली श्वापदांचा
वावर यामुळे कधी कोणत्या स्थितीला सामोरे जावे लागेल याचा पत्ता नाही. जगण्यातला
हा बेडरपणा इथल्या माणसात दिसतो. पावसाळी पर्यटनाचा आकर्षणबिंदू असलेले धबधबे, रंगीबेरंगी रानफुलांनी बहरणारी विस्तीर्ण पठारे
आदि असल्याने व्हिलेज टुरिझम, अॅडव्हेन्चर
टुरिझम, मान्सून टुरिझम, कौटुंबीक सहल
सारे उद्देश येथे सफल होतात. चौकुळला हरतऱ्हेच्या दुर्मीळ वनस्पती आहेत. इथल्या
ग्रामदेवतेच्या प्रांगणात धुपाचे झाड आहे. महाराष्ट्राच्या अन्य भागात धुपाचे झाड
नाही.
आंबोलीला जाताना
रस्त्याच्या डाव्या हाताला घटप्रभा नदी भेटली. वर्षानुवर्षे घटप्रभा नदीपात्रात
लोकं शेती करतात. त्यामुळे एका सरळ रेषेत शेती आणि मध्येच पाणी, चिखलं त्यातली
जैवविविधता आपल्याला दिसते. घटप्रभा सहयाद्रीच्या कुशीने चंदगडमार्गे कर्नाटककडे
रवाना होते. विजापूर जिल्ह्यात कृष्णेला मिळते. घटप्रभेवर गोकाकचा धबधबा आहे. चौकुळच्या
शाळेजवळ थांबलो. मस्त चहा मागवली. कशीही मागवली तरी मिळणार तिथल्या पद्धतीचीच हा
अस्सल ग्रामीण कोकणी रिवाज इथेही होताचं. त्यामुळे ‘तलफ’ तशीच राहिली. याच चौकुळला
आम्ही सन २०१३ साली निसर्गातल्या दिवाळीचे फटाके उडवायला आलो होतो. पहाटे टेंटमध्ये
साखर झोपेत असताना सांबराची बेफाम किंचाळी ऐकून त्या दिशेने धावताना वाऱ्याच्या
वेगाने धावणाऱ्या सांबराचे झालेले दर्शन, नंतर सांबराच्या पिल्लाच्या केलेल्या
शिकारीवर ताव मारणारे वाईल्ड डॉगचे अख्खे कुटुंब भेटलेले. जंगलातल्या त्या
दिवाळीवर लिहायचं मात्र अजूनही राहिलंय ! आजच्या दिवसभरात सूर्यास्तापर्यंत न
थांबणारा पक्षांचा आवाज अनुभवला. जिथेजिथे क्षणभर विश्रांती घेतली तिथे वाळलेल्या
पानावर पाय पडून भंग झालेली शांतता अनुभवली. असंख्य पक्षी, सरपटणारे प्राणी
आणि कीटकांनी श्रीमंत बनवलेले जंगल, बऱ्याच दिवसांनी सहज न दिसणारे असंख्य पक्षी
पहिले, काही क्लिक केले. आंबोलीत आलो तेव्हा वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर भेटले.
त्यांच्याकडून, आंबोलीत डॉ. वरद गिरी सर आल्याची माहिती मिळाली. त्यांनाही भेटलो. डॉ.
गिरी सरांसोबतच्या भेटीबाबत पुन्हा कधीतरी लिहिनं ! पोलीस चौकीजवळच्या हॉटेलात
जेवून रात्री पुन्हा चौकुळ रोडवर नाईट ट्रेलला निघालो. रात्रीचं जंगलं अनुभवलं. बॅटरीच्या
प्रकाशात दूर झुडुपात इंडियन पाम सिवेट आणि सांबराच्या चमकणाऱ्या डोळ्यांनी आपल्या
अस्तित्वाची जाणीव करून दिली. दिनांक १ मार्चची सकाळ. हाताशी वेळ कमी होता. सकाळी
आवरून जवळच्या रेशीम संचालनालयाच्या बेसीक सिडफार्म इमारतीनजीक असलेल्या फाकणीच्या
देवराईत निघालो. देवराई फक्त फिरणं झालं. फारसं साईटींग झालं नाही. जरवेलची बिळे,
बिबट्याची विष्ठा (लेपर्डस्कॅट), कोणीतरी शिकार केलेल्या (बहुधा शिक्रा पक्ष्याने)
रानकोंबडीची पिसं दिसली. काही पक्षी पाहिले. या देवराईतून परतताना एक स्थानिक
भेटले. तसा कुठल्याही देवराईत सतत वावर असणारा माणूस हा श्रद्धा असलेलाचं असणार !
त्यांनी फाकणीच्या देवराईची माहिती देताना जे काही सांगितलं तो स्वतंत्र लेखाचा
विषय ठरावा. आंबोलीत परतलो. रुचिरात तिथली स्पेशल मिसळ खाल्ली. परतीला लागलो. शेवटचा
हॉर्नबिल सायं. ६.३० वा मानसकोंडच्या (संगमेश्वर) अलिकडे दिसला. या साऱ्या
प्रवासात सोबत असलेल्या सर्पमित्र अनिकेत चोपडेने तो दाखवला. गंमत वाटली.
सृजन हो ! वर्तमान
मानवी जीवनात ‘बी कलरफुल’ संकल्पनेचा शिरकाव झालेला आहे. पूर्वीच्या पिढ्या
चाकोरीबद्ध जगल्या. सध्याच्या पिढीला विविधांगी विश्व सतत खुणावत असतं.
प्रत्येकाला आपलं असं काहीतरी वेगळं म्हणून करायला मिळतं. ‘बी कलरफुल’ संकल्पनेनुसार
जगायला भरपूर बळ देण्याचं काम अरण्याभ्रमंती करते. जंगल थोडंस समजून घ्यायला
सुरुवात केली की त्यातली गंमत कळायला लागते. मग त्याच्या संवर्धनासाठी आपली पाऊलं
आपसूक वळतात. वळणारी ही पाऊलं जितकी अधिक तितकी जैवविविधता अधिक खुलत जाते. आपलं
आयुष्य कलरफुल बनविते. आपल्याला आनंदी बनवते. आनंदी जीवनशैली रोगराईंपासून बचाव
करते. ‘दोडामार्गच्या वनवैभवात’ील ही अक्षर भ्रमंती आपल्याला निसर्गाकडे सतत
वळवणारी ठरो !
धीरज वाटेकर
@‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग : dheerajwatekar.blogspot.com
(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)
|
आपण वाचत असलेल्या दोडामार्गच्या ज्या वनवैभवात आम्ही सव्वा महिन्यापूर्वी भटकलो तिथली 'कोरोना लॉकडाऊन' मधली दिनांक ६ एप्रिल २०२० ची दैनिक सकाळ मधील बातमी |
|
बॅटरीच्या उजेडात दिसलेले तिलारी नदीचे पात्र |
|
कॉमन ट्री फ्रॉग
|
|
कवड्या (कॉमन वोल्फ स्नेक)
|
|
दोडामार्ग सूर्योदय |
|
दोडामार्ग चौक : पिंपळपार येथील बगळ्यांची वसाहत |
|
तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या वनपरिक्षेत्र संशोधन केंद्राचा परिसर |
|
बांबूच्या बेटाला लावण्यात आलेली आग
|
|
शेकरू (Indian giant squirrel)
|
|
यलो ब्रोड बुलबुल
|
|
तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या वनपरिक्षेत्र संशोधन केंद्राचा परिसर |
|
स्वर्गीय नर्तक (एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर)
|
|
व्हाईट रम्प्ड शामा |
|
मलबारी राखी धनेश (Malabar grey hornbill) |
|
तेरवण-मेढे येथील प्राचीन
श्रीनागनाथ मंदिराच्या देवराईतील वृक्ष |
|
तेरवण-मेढे येथील प्राचीन
श्रीनागनाथ मंदिराच्या देवराईतील वृक्षाच्या छायेत ब्लॉगलेखक |
|
बहरलेला सीता-अशोक |
|
तिलारी नदी पात्र |
|
तिलारी घाटातून दिसणारे
दृश्य |
|
तिलारी घाट
|
|
तिलारी घाट
|
|
कुंब्रल, तळकट मार्गावर अवकाळी पावसाचे दर्शन
|
|
|
खडपडे हद्दीत दृष्टीस
पडलेला गाव नामफलक |
|
दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोली
कच्चा जंगलमार्ग |
|
फाकणीच्या देवराईतील बिबट्याची
विष्ठा (लेपर्डस्कॅट)
|
|
फाकणीची देवराई |
|
दोडामार्गच्या वनवैभवातून
परतताना ब्लॉगलेखक (छायाचित्र : अनिकेत चोपडे) |
|
फाकणीची देवराईतील पाण्याचा
झरा |
|
चौकुळ नाईट ट्रेलमध्ये बॅटरीच्या
प्रकाशात डोळे चमकलेले इंडिअन पाम सिवेट |
|
चौकुळच्या घटप्रभा नदी पात्रातील
शेती |
|
अवकाळी पावसात न्हाऊन
निघालेली काजूची बोंडं |
|
चौकुळ गाव |
|
पर्णहीन झाडावर मलबार
पाईड हॉर्नबिल पेअर |
|
कुंभवडे घाटीतून दिसणारे
दृश्य
|
|
कुंभवडे ‘T’ जंक्शनवरील
नामफलक
|
|
चेस्टनट हेडेड बी ईटर (मुरलीचरा) |
|
यलो फुटेड ग्रीन पिजन |
|
जंगलात रस्त्याशेजारच्या
झाडावर येऊन दर्शन दिलेला मलबार पाईड हॉर्नबिल |
(सर्व छायाचित्रे : धीरज वाटेकर)
THIS BLOG PUBLISH LINKS / PAPER CUTTINGS