आंबोली
हे कोकणातील सावंतवाडी तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. आंबोली घाटाचा परिसर
घनदाट अरण्याने वेढलेला आहे. सह्याद्रीचे कडे ढगांना जणू आग्रहाने थांबवत असावेत
असा विक्रमी पाऊस इथे कोसळतो. निसर्गप्रेमींसह साहसी व अभ्यासू पर्यटकांना आंबोली
कधीही निराश करत नाही. २०१३च्या दिवाळीच्या दिवशी आम्हालाही तिने निराश केले नाही.
‘आंबोली जंगलातील दिवाळी’ आम्ही, कोकणात ‘शिरवली’ येथे खाजगी पक्षी अभयारण्य साकारणारे
‘वन्यजीव अभ्यासक’ निशिकांत उर्फ नंदू तांबे आणि पुण्यातील ‘वन्यजीव अभ्यासक’ अभय
काळे यांच्यासोबत अनुभवली केली होती. ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०१३ या दिवसातील
जंगल भ्रमंतीत आम्ही, ज्याच्या मार्गावरून प्रवास करणे इतर प्राणी टाळतात अशा
दुर्मिळ असलेल्या 'कोळशिंदा'
(रानकुत्रा) टोळीने चौकुळ गावातील
(आंबोली) जंगल भागात केलेल्या सांबर मादीच्या पिल्लाच्या 'किलिंग
अॅक्टीव्हीटी'चा (शिकार) थरार अनुभवला होता. या पाच दिवसांच्या कालावधीत
आम्हाला ग्रीन वाईन स्नेक (हरणटोळ) या मध्यम विषारी जातीच्या आणि झाडावर आढळ
असलेल्या सापासह आंबोली जंगलात भरपूर आढळ असलेला मलबार पिट वायपर, दख्खनची
छोटी पट्टेरी पाल (डेक्कन बॅण्डेड गेको), शेकरू, विविध
रंगाची फुलपाखरे, पतंग, कोळी, पांढऱ्या मानेचा करकोचा (वूली नेक्ड स्टॉर्क), बाळढोक, ग्रीन
बी इटर, स्टॉर्क बिल्ड किंगफिशर, ब्राह्मणी
काईट, इंडियन रॉबिन, ओरिएंटल मॅगपाय रॉबिन, टिकेल्स
ब्ल्यू फ्लायकॅचर, ब्लॅक नेप मोनार्च, एशियन
फेरी ब्ल्यू बर्ड, सनबर्ड, विविधरंगी चतुर, ग्रे हेरॉन, बदक, गायवगळे, क्रीमसन
बॅक सनबर्ड, मलवार ट्रॉगन, ब्ल्यू मॉर्मन फुलपाखरू आदीचे
दर्शन झाले होते. याशिवाय नांगरतास धबधब्यावरील पठार परिसरात जिथे हत्ती आढळून
आलेले तिथे धामण जातीचा साप पाहिलेला. फुलपाखरांच्या फोटोग्राफीसाठी हे ठिकाण
उत्तम वाटलेले. भारतीय सापसुळी (skink),
काळा विंचू, विविध प्रकारची झाडावरील शेवाळे, गवा
आणि बिबट्या यांचे आंबोली जंगलातील वास्तव्याचे पुरावे, जमिनीवरील, झाडावरील
आणि गुहेतील बेडूक, गार्डन लिझार्ड, केसाळ कोळी (टॅरांट्यूला) यांचे
जवळून दर्शन झालेले. याच भ्रमंतीत आम्हाला आंबोली परिसरातील जंगलात, महाराष्ट्रात
फारसा आढळ नसलेला चेस्टनट हेडेड बी-इटर हा पक्षीही दिसला होता.
तर, २
नोव्हेंबरच्या सकाळी चौकुळ गावातून वाहणाऱ्या नदीच्या तीरावरील टेंटमध्ये आम्ही
विश्रांती घेत होतो. पहाटे साडेपाचच्या सुमारास जंगलाच्या दिशेने आम्हाला तिघांना
भारतातील सर्वात मोठे हरिण असलेल्या सांबराची किंकाळी (कॉल) ऐकू आली. पहाटेच्या
शांततेत आजूबाजूला कोणतेच आवाज नसल्याने ही किंकाळी नदीच्या दरीत चांगलीच घुमली.
टेंटमधून बाहेर येईपर्यंत ‘कुई कुई’ आवाजाने आमचे लक्ष आणखी विचलित केलं.
कोळशिंद्याने काहीतरी सावज पकडल्याची जाणीव झाली. जंगलातील वास्तव्यात नेहमीच
तयारीत असावे लागते. दोघा अभ्यासकांच्या मागून आम्हीही आवाजाच्या दिशेने धावलो.
ज्या वाटेने आम्ही धावू लागलेलो ती वाट उभी चढणीची किंचित दमछाक करणारी आणि दोन्ही
बाजूने दाट झाडी झुडुपानी वेढलेली होती. सह्याद्रीत पावसानंतर रानमोडी, गवत
आणि इतर झुडुपे इतकी दाट वाढतात की अगदी पुढ्यात कोणी येऊन उभा राहिला तरी चटकन
दिसणार नाही. आज नेमकं असंच झालं. ज्या दिशेने कानात आवाज येत होते त्या दिशेने
पाऊलं टाकताना एका अनपेक्षित क्षणी आमच्या समोरून स्वतःचा जीव मुठीत धरून वेगाने
पळताना सांबराची मादी आम्ही पाहिली. जंगलात काहीतरी घडल्याची जाणीव झाली. खरंतर
तिच्याच मागे काही कोळशिंदे लागले होते. पण कोळशिंद्यांच्या हाताला सांबराचे
पिल्लू सापडले होते. आम्ही उभे होतो तेथून थोड्या अंतरावर आम्हाला गव्यांची झुंज
सुरु असलेली दिसत होती. आदल्या रात्री पूर्णतः निपचित पडलेलं हे जंगल एव्हाना
पूर्णतः अॅक्टीव्ह जाणवत होतं.
ज्या
झुडुपातून सांबराच्या पिल्लाचे आवाज येत होते तिथपासून आम्ही तिघेही ५० फुट
अंतरावरील फायकस वड वर्गीय झाडाच्या आडोश्याला उभे होतो. त्या पिल्लाला जीवंत मारत
असल्याचे जवळच्या झुडुपातून येणारे आवाज जंगलातील सकाळच्या शांततेत केवळ भयानक
वाटत होते. झुडुपातून येणारे ते आवाज ऐकताना अतिउत्कंठेने आमचं हृदय धडधडायला
लागलं होतं. काळ जणू थांबलेला आहे असाच भास होत होता. गलितगात्र होत आलेल्या त्या
पिल्लाला पाणी तरी द्यावे किंवा मोठंमोठे आवाज करून कोळशिंद्यांना हाकलावे असे
विचार मनात माझ्या मनात येत होते. पण सोबतचे दोन्ही वन्यजीव अभ्यासक आम्हाला ‘जीवो
जीवस्य जीवनम्’ची आठवण करून देणारे होते. जिवंतपणी शरीराचे लचके तोडले जात
असल्यामुळे वेदनेने सांबर पिल्लू अगदी विचित्र आवाजात ओरडत होते. कोळशिंद्यांना
त्याच्याशी काही देणं-घेणं नव्हतं. ते आपल्या जबड्याच्या जोराच्या हिसक्याने
सांबरीच्या पिल्लाचं पोट फाडत असणार हे नक्की होतं. ‘कोळशिंदा भक्ष्याला न ठार
मारताच खायला सुरुवात करतात’ हे मी आज पहिल्यांदा कानाने पाहात होतो. पाहाताना फार
भयंकर वाटत होतं. एव्हाना आमचे सर्वांचे झुडुपातून येणारे आवाज ऐकून आणि बाहेर
येणारे कोळशिंदे पाहून एकूण कितीजण असावेत? याचा
अंदाज बांधणे सुरु झाले. कदाचित कोळशिंद्यांना आमचे अस्तित्व जाणवलेही असेल. मग
सुरू झाला जंगलातील आमचा वाट बघण्याचा काळ. कारण त्या एकाच ठिकाणी पुढे आम्ही
दोनेक तास थांबलो. खाणं खाऊन पोट भरलेले कळपातील काही कोळशिंदे तोंडावरून जीभ
फिरवत झुडूपाबाहेर येऊन आम्हाला दर्शन देत होते. कोळसुंद्यांच्या टोळीचा प्रमुख
अल्फा मेल आणि फिमेल दर्शनांति बऱ्यापैकी प्रौढ जाणवत होते. जीवनात अशा वेळा नक्की
अनुभवाव्यात. कारण या वेळा ह्या मानसिक आंदोलनाच्या असतात. त्याच आपल्याला जीवनात
‘समर्थ’ बनवतात. या दोनेक तासात आम्ही कोळशिंद्याच्या विविध हालचाली टिपलेल्या.
त्याच्या १२ ते १५ जणांच्या टोळीतील किमान नऊ जणांनी आम्हाला जणू आळी-पाळीने
झुडूपाबाहेर येऊन आम्हाला दर्शन दिले. या दोनेक तासात कोळशिंद्यांविषयी वाचलेल्या, ऐकलेल्या
कथा डोळ्यासमोर आल्या. यांच्या शिकार करण्याच्या पद्धती, प्रसंगी
वाघाला सुद्धा न घाबरण्याची निडरवृत्ती आणि त्यांचे कळपातील सामर्थ्य सारे काही
आम्ही डोळ्यासमोर पाहात होतो. आज डोळ्यादेखत सांबर पळाले पण तिचे पिल्लू मात्र
सुदैवी ठरले नाही.
झुडूपातील
अॅक्टिविटी पूर्णपणे थांबल्याचा निश्चित अंदाज घेऊन हतबल चेहऱ्याने आम्ही दुपारी
त्याच झुडूपात आणि शेजारच्या कारवीच्या जंगलात शिरलो. सांबराच्या पिल्लाला
खाल्लेल्या खुणा दिसत होत्या. पिल्लाची आतडी बाहेर ओढून काढलेली असावीत. पोटाकडून
फाडून आतलं मांस खाल्लेलं असावं. मांसल भागाचे अगदी छोटे तुकडे तिथे पडलेले होते.
आम्ही कोळशिंद्यांनी किल केलेल्या सावजाचे (सांबराचे पिल्लू) मांस व हाडांचे फोटो
टिपले. दिवाळीच्या दिवशी असे फोटो टिपणे थोडे विचित्र वाटत होते, पण
‘जंगलातील दिवाळी अशीच असायची’ असे स्वतःला समजावले. ज्या पध्दतीने झुडुपात मांस व
हाडे आढळली त्या मार्गावरून शेवटपर्यंत जाणे मात्र आम्ही तिघांनी टाळले. बहुतेक
वेळा जंगल हे दिसण्यापेक्षा ऐकूच जास्त येतं असतं. भेकरांचं भुंकणं, बिबट्याची
साद, वानरांचं खेकसणं, प्राण्यांची चाहूल लागताच
केकाट्यांची ओरड, चान्यांची टिवटिव, शेकरूची साद असे प्रसंग
अनुभवयाला मिळतात. असे अनुभव रोमांचित करणारे, आपली
जंगल भ्रमंतीची आस वाढवणारे सुखांत आणि मन प्रफुल्लित करणारे असतात. परंतु काही
प्रसंग अगदी थरारक, भितीदायक आणि खऱ्या अर्थाने जंगलाचे दुसरे रूप आपल्यासमोर
आणणारे असतात. ‘आंबोली जंगलातील दिवाळी’ असाच अनुभव होता.
पत्रकारितेच्या
क्षेत्रात वावरत असताना आपल्या लेखनात अधिकाधिक बारकावे उतरावेत म्हणून सह्याद्रीत, किल्ल्यांवर
फिरत असताना जंगलाकडे आम्ही केव्हा ओढले गेलो कळलंच नाही. धुळीत उमटलेली
प्राण्यांची पावले, बिबट्याच्या विष्ठा, रानडुक्करांनी
खाण्यासाठी उपटलेली मुळे, रानडुक्करांच्या जंगलातील लोळणी, सांबरांनी
शिंगाने खरवडलेल्या साली अशा कितीतरी गोष्टी जंगलाने आम्हाला दाखवल्या. त्यातल्या
काही संस्मरणीय ठरल्यात. आपल्या सह्याद्रीतील जंगलं ही इथल्या पावसासारखी लहरी
जाणवतात. सह्याद्रीच्या शिखरावरील घनदाट सदाहरित पासून पायथ्याच्या पानझडी
पर्यंतची या जंगलात सामावलेली दिसते. अर्थात पूर्वी कधीतरी ही सारीच भूमी घनदाट
असावी. या सह्याद्रीतील जंगलात कोणत्याही मोसमात मिळणाऱ्या अनुभवांची मेजवानी काही
वेगळीच असते. पायी चालत वन्यजीवांचा माग शोधणं हा फार उपयुक्त आणि आनंददायी प्रकार
आहे. यामुळे आपल्याला अगदी जवळून ठसे, गंध, इतर
खाणाखुणांचा माग घेता येतो. मात्र यासाठी खूप सावध राहावं लागतं. पावलं जपून
टाकावी लागतात. अन्यथा आवाजाने जनावरं सावध होऊन पळ काढण्याची शक्यता असते. आतातर
सह्याद्रीत जंगलाचा राजा असलेल्या वाघांपासून छोट्या किटकांपर्यंत सगळ्याच जीवांची
रेलचेल नांदते आहे. त्यामुळे सह्याद्रीत गेल्यावर काय बघावं? असा
प्रश्न अजिबात पडू नये. सस्तन प्राणी, पाखरं, सरपटणारे
आणि उभयचर जीव, फुलपाखरं- पतंग या सारखे अनेक किटक आणि या सगळ्यांसाठी
अतिशय महत्त्वाचे असणारे वृक्ष-वनस्पतींचे अरण्य यांचे निरीक्षण हा नितांत सुंदर
अनुभव असतो. आता सह्याद्रीत वाघापाठोपाठ शिकार करणाऱ्यांत सर्वात पुढे बिबट्या आणि
कोळशिंदे आहेत. अर्थात बिबट्या एकट्याने भक्ष्य धरतो आणि कोळशिंदा (रानकुत्रा)
टोळीने. शिकार करणाऱ्या कोळशिंद्यांचे निरीक्षण करायला मिळणे हे जंगल भटक्यांसाठी
भारी अनुभूती देणारे असते. वाघ आणि कोळशिंदे हे तसे हाडवैरीच असावेत. समान
भक्ष्यामुळे वाघांनाही कोळशिंदा आपल्या हद्दीत नको असतात. आतातर सह्याद्रीत दोघेही
स्थिरावलेत. त्यामुळे वन्यजीव अभ्यासकांना यातून मिळणाऱ्या अनुभूती अधिक
वेगळेपणाच्या असू असतील.
आंबोलीतील
निसर्गाने, कोळशिंदा
(ढोल / Wield Dog) प्राण्याच्या
टोळीसमवेत ‘किल्लिंग अॅक्टिविटी’चा थरार ऐन दिवाळीच्या पहाटे आम्हाला दाखविला
होता. २ नोव्हेंबरच्या सकाळी कोळशिंद्याच्या टोळीने सांबराच्या पिल्लावर केलेला
हल्ला, पिल्लाला वाचवण्यासाठी धावलेली सांबराची मादी, नंतर
स्व:तचा जीव वाचवण्यासाठी तिने ठोकलेली धूम, खुल्या
जंगलात कोळशिंद्याची टोळी सावज जीवंत फाडत असताना जेमेतेम पन्नासेक फुट अंतरावरून
आमच्या कानावर आदळलेले आलेले आवाज आठवले की निसर्गासमोर आपण हतबल आहोत हे जाणवतं.
निसर्गाच्या कुशीत नित्य नूतन घडामोडी या घडतच असतात. त्यातल्या काही अनुभवांच्या
रूपाने आपल्या पदरात पडतात. अशीच एक घडामोड ऐन दिवाळीच्या दिवशी पदरात टाकण्याची
निसर्गाची किमया आम्हाला अचंबित करून गेली. आंबोली जंगलात पाच दिवस-रात्र
जैवविवधतेच्या निरीक्षणाचा आलेला अनुभव अफलातून होता. आंबोलीतील निसर्ग हा स्वत:ची
दु:ख, मानवी जगण्याच्या विवंचना विसरायला लावणारा. दिवाळीच्या
दिवसातील डोंगराच्या कुशीत शुभ्र धुक्यात भिजलेली चिंब ती आंबोली आम्हाला पाच दिवस
पावित्र्याची साद घालत दिवाळीची अनोखी भेट देऊन गेली.
धीरज वाटेकर
पत्ता : ‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी
रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.
ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,
ब्लॉग : https://dheerajwatekar.blogspot.com
(लेखक धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखन’ या विषयावरील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते गेली २८ वर्षे ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)
1 टिप्पणी:
छान सफर घडवली!
टिप्पणी पोस्ट करा