दु:खितांसाठीच्या सेवाकार्यातून 'कृतार्थ'
झाल्याची भावना : कमल भावे
मुरुड (ता. दापोली) : दु:खात होरपळणाऱ्या
जगभरातील शेकडो कुटुंबाना, 'मी ज्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यामुळे त्यांच्या जीवनात झालेला बदल, त्यांना मिळालेले समाधान, यातच मला मी
कृतार्थ झाल्यासारखे वाटते.' अशा भावना, भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे, रँग्लर अप्पासाहेब
परांजपे, पद्मभूषण शकुंतलाबाई परांजपे आदि दिग्गजांचे सततचे
मार्गदर्शन आणि सहवास लाभलेल्या, दापोली तालुक्यातील मुरूड़
गावच्या प्रसिद्ध समाजसेविका, मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधील
निवृत्त मेड़िकल सोशल वर्कर सौ. कमल श्रीकांत भावे यांनी त्यांची जीवनकथा असलेल्या 'कृतार्थीनी' ग्रंथ प्रकाशन सोहोळ्याप्रसंगी व्यक्त
केल्या.
मुरूड़, तालुका दापोली
मधील महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित न. का. वराड़कर हायस्कूलच्या सभागृहात,
गांधी जयंती आणि ''स्वर्गीय न. का. वराडकर" यांच्या ४० व्या पुण्यतिथी दिनाचे
औचित्य साधून संपन्न झालेल्या या सोहोळ्याला व्यासपीठावर महर्षी कर्वे शिक्षण
संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी मोरे, प्रमुख पाहुणे म्हणून नायर हॉस्पिटल
मुंबईचे निवृत्त समाजसेवा विभाग प्रमुख भागवत हरी पाटील, कोकणचे
नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर, पं. स. सभापती बैकर, लेखिका प्रा. शांता
सहस्रबुद्धे, 'उखाणेकर' मीनल गुजर, 'कृतार्थीनी'चे
लेखक धीरज वाटेकर, श्री आणि सौ. कमल श्रीकांत भावे, संस्थेचे विश्वस्त विश्वनाथ
वराडकर, रमेश तळवटकर, मुरुडचे सरपंच सुरेश तुपे, शाळेच्या मुख्याध्यापिका मधुमालती
गारडे उपस्थित होत्या.
आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या, टाटा सामाजिक
विज्ञान संस्थेचे संचालक एस. परसुरामन, प्रसिद्ध चित्रपट
दिग्दर्शिका, निर्मात्या आणि नाटककार 'पद्मभूषण'
सई परांजपे, देशातील विख्यात शल्यचिकित्सक डॉ.
व्ही. एन. श्रीखंडे आदि मान्यवरांच्या संदेशाचे वाचन शिक्षक गमरे यांनी केले. पुस्तकाला
प्रस्तावना देणाऱ्या, प्रख्यात मानसोपचार व मनोविकारतज्ज्ञ, मराठीतील जवळपास प्रकाशित २५ पुस्तकांचे लेखक-साहित्यिक डॉक्टर राजेंद्र
बर्वे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान गौरी खटावकर, माधवी
मुकादम, देवेंद्र जाधव, निवृत्त मुख्याध्यापिका वैशंपायन यांनी 'कमल भावे' यांच्या
योगदानाबाबत आपले उस्फूर्त अनुभव कथन केले. कमल भावे यांना, त्यांच्या
गुरू शकुंतलाबाई यांनी दिनांक १४ नोव्हेंबर १९७३ रोजी, वाढदिनी
भेट दिलेला, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांची दुर्मीळ छबी असलेला फोटो या कार्यक्रमात,
सौ. भावे यांनी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेस भेट दिला, तो अध्यक्षा
सौ. सुहासिनी मोरे यांनी स्वीकारला.
यावेळी बोलताना भागवत हरी पाटील
यांनी कमलताई या आपल्या 'गुरु' असल्याचे नमूद केले. प्रा. शांता सहस्रबुद्धे यांनी
आपल्या आणि कमल भावे यांच्या शालेय जीवनापासूनच्या आठवणी सांगून, हा ग्रंथ तयार
झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मीनल गुजर यांनी आपल्या भावना काव्यातून व्यक्त
केल्या. रमेश तळवटकर यांनी महर्षी कर्वे शिक्षण संस्था आणि कमल भावे यांचे योगदान
याविषयी माहिती सांगितली. 'कृतार्थीनी'चे लेखक धीरज वाटेकर यांनी 'सामाजिक कार्यकर्ता' आणि 'समाजसेवा'
या शब्दांचा निश्चित अर्थ आणि कामाची पद्धत समजून घेण्यासाठी तरुणाईने हा चरित्रग्रंथ
आवर्जून वाचावा, असे नमूद केले. अण्णा शिरगावकर यांनी कमल भावे आणि श्रीकांत भावे
या दोघांचा आपल्या भाषणात सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापिका गारडे यांनीही मनोगत
व्यक्त केले.
चिपळूणच्या १५० वर्षांची परंपरा
जोपासणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्राच्या
ग्रंथालय चळवळीतील अग्रणी, साहित्यिक प्रकाश देशपांडे, कवि अरुण इंगवले, नाट्यलेखक
प्रा. संतोष गोणबरे, साहित्यिक मच्छिंद्रनाथ वाटेकर, सुभाष साटले, विवेक भावे,
प्रवीण वाटेकर यावेळी उपस्थित होते. प्रकाश देशपांडे यांनी कमल भावे यांना, अण्णासाहेब
कर्वे यांच्या १०० वर्षपूर्ती सोहोळ्यात त्यांनी केलेले भाषण प्रकाशित झालेल्या 'चंद्रोदय'
या चिपळूणातून प्रकाशित झालेल्या दुर्मीळ अंकाची प्रत भेट दिली. सोहोळ्याचे सूत्रसंचालन
राजेश नरवणकर यांनी तर आभार संजय भावे यांनी मानले. हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल
पेढे, चिपळूण येथील सौ. नूतन विलास महाड़िक यांच्या 'निसर्ग प्रकाशन'चे आभार मानण्यात आले. यावेळी
कार्यक्रमास उपस्थित सुमारे १२५ मान्यवरांना कृतार्थीनी हा ग्रंथ भेट देण्यात आला.
http://www.mahavrutta.in/mah/index.php/2013-12-07-04-03-38/10209-2017-10-03-11-34-25
|
प्रमुख पाहुणे अण्णा शिरगावकर बोलताना |
|
कृतार्थीनी कमलताई यांचे मनोगत |
|
लेखक धीरज वाटेकर |
|
कमलताई यांचा सन्मान ! |
|
महर्षी कर्वे यांचा दुर्मीळ फोटो भेट |
|
श्रीकांत भावे |
|
उद्घाटन सोहोळा |
|
उपस्थित श्रोते |
|
दैनिक सकाळ ०४१०२०१७ |