गुरुवार, २ मे, २०१९

सफर वाशिष्ठी बॅकवॉटरची !


मनसोक्त संचार करणाऱ्या मगरी पाहायच्यात ? केरळच्या बॅकवॉटरचा आनंद कोकणात मिळवायचा आहे ? रम्य खाडी, संथ पाणी, किनाऱ्यावरची टिपिकल किनारवर्ती गावं, किनाऱ्याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता अनुभवायची असेल तर पर्यटकांसाठी चिपळूणमध्ये वाशिष्ठी बॅकवॉटरहा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. वाशिष्ठी खाडीला निसर्गानं मुक्तहस्तानं सौंदर्य दिलं आहे. इतकी वर्षं हे सौंदर्य लोकांपुढे आलं नव्हतं. ग्लोबल चिपळूण पर्यटनया चिपळूण पर्यटन विकासासाठी झटणाऱ्या संस्थेच्या सततच्या प्रयत्नाने आता येथे पर्यटकांची लगबग सुरू झाली आहे.

      आपल्या देशात फक्त चेन्नईत क्रोकोडाईल पार्क आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मगरी पाहता येतात. क्रोकोडाईल सफारीचा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा वाशिष्ठी बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. मगरचिपळूणच्या पर्यटन विकासाचे मुख्य आकर्षण ठरू शकते, याची जाणीव झालेल्या चिपळूणातील पर्यटनप्रेमींनी ग्लोबल चिपळूण टुरिझमसंस्थेच्या माध्यमातून क्रोकोडाईल सफारीउपक्रम सुरु केला आहे. आजतागायत इथल्या मगरींनी कोणावरही कधीही हल्ला केल्याचे वृत्त नाही. या मगरी ओहोटी दरम्यान वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर पहुडलेल्या सहज नजरेस पडतात. अगदी ८-१० फुटाच्या अंतरावरून त्या पाहण्याचा आनंदही घेता येतो. विशेष म्हणजे त्यांना खाडीतील नैसर्गिक वातावरणात पाहाता येते. मायबाप शासनाने, चेन्नईप्रमाणे येथेही क्रोकोडाईल पार्कची शक्यता तपासण्याची तसेच या मगरींचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. सध्या इथल्या मगरी या चिपळूण पर्यटन व्यवसायाला आकार देण्याचे काम करत आहेत हे नक्की ! वाशिष्ठीच्या बॅकवॉटरमध्ये दिवसभर क्रोकोडाईल टुरिझमचा आनंद मिळण्यासाठी ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने पर्यटक बोटींची सुविधा निर्माण केली आहे. सन २०१४ पासून वर्षातून दोन वेळा नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामात सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. या वेळेत हा पर्यटन उपक्रम आयोजित केला जात असून प्रतिवर्षी किमान सुमारे २५ हजार पर्यटकांची सतत उपस्थिती यास लाभते आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्टी खाडी, तिच्यातील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळतो आहे. खाडीत साधारणत: पाण्याच्या ठिकाणी आढळणारे पक्षी दिसतातच, पण वूली नेक्ड स्टॉर्क, ओरिएंटल हनी बझार्ड, पफ थ्रोटेड बॅब्लर, लिटिल रिंग प्लोव्हर, युरेशियन कॉलर्ड डव्ह, प्लेन प्रिनिया, अॅशी प्रिनिया, लिटिल स्टिंट, मार्शलज आयोरा, कॉमन आयोरा, पाइड अॅव्होसेट, सिट्रिन वॅगटेल, युरेशियन स्पूनडिल, ब्लॅक हेडेड आयबीस, कॉमन रेडशॅक, चेंजेबल हॉक इगल, ब्राम्हिणी काईट, मोर, टेंटेड स्टॉर्क, जांभळी पाणकोंबडी, आयबीस, डार्टर, आल्बिनो किंगफिशर, हेरॉन आदि दुर्मीळ पक्ष्यांचं दर्शनही येथे होते. क्रोकोडाईल सफारीसाठी सुशोभित आणि अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात येते. गेल्या मे २०१८ मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई-पुण्यातील साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारीचे उद्घाटनासाठी चिपळूणात आलेल्या नामवंत हास्यकवी अशोक नायगावकर यांनीही वाशिष्ठी नदीतील पर्यटनाला अत्याधुनिक पातळीवर आणा असा सल्ला दिला होता. साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी मालदोलीचे संदेश आणि शैलेश संसारे, तुंबाडचे शैलेश वरवाटकर, हॉटेलियर रविकिरण जाधव यांनी खाडीत ‘क्रोकोडाईल सफारी’ची सुरुवात केली. त्यानंतर सन २०१० साली संपूर्ण कोकणात क्रोकोडाईल टुरिझमसाठी मालदोली (वाशिष्ठी) बॅकवॉटरहा सर्वोत्तम पर्याय असल्याचा निर्वाळा आम्हीही रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासू तरुणांचे संघटन असलेल्या झेप क्षितिजापलीकडेसंस्थेच्या आनंदमेळ्यादरम्यान दिला होता.

      वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरील झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीत तिचा उगम आहे. या उगमाचा शोध आम्ही नव्याने, नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या संशोधित ग्रंथाच्या निर्मितीची गरज म्हणून सन २०१५ साली सहकारी मित्र वन्यजीव अभ्यासक सदफ कडवेकर आणि विलास महाडिक यांच्या साथीने घेतला होता. नैसर्गिकदृष्ट्या कोणत्याही नदीचे मुख हा एक अद्भुत जादुई प्रदेश ठरावा, वाशिष्ठीबाबतही तसेच आहे. आगामी काळात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या माध्यमातून ‘वाशिष्ठी सफर (परिक्रमा) : उगम ते संगम’ हा चिपळूण पर्यटनातील महत्वकांक्षी उपक्रम पर्यटकांसाठी सुरु केला जाणार आहे. या प्रकल्पाची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. वाशिष्ठी नदी चिपळूण, खेड, गुहागर, दापोली तालुक्यांच्या सीमांतून वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते. खेडकडून येणारी जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. या वाशिष्ठीला नारिंगी, तांबी, धावती नदी, वैतरणा आणि शिवनदी येऊन मिळतात. कोयना अवजलमुळे वाशिष्ठी सदा भरलेली, वाहणारी असते. या वाशिष्ठीचे खोरे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. अचाट वैविध्याची रेलचेल असलेल्या या खोऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बाव, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, छोटे ओहोळ, खारफुटीची जंगले, ससे, साळींदर, बिबटे, कोल्हे, रानगवे, अन्य प्राणीसंपदा असून ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपे आहेत. फार पूर्वी शिवनदी हीच चिपळूणची जीवनवाहिनी होती. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिवनदीचा उगम कामथे-कापसाळ परिसरात, डोंगरात होतो. शिवनदी शहराच्या मध्यभागातून वाहते. तिच्या प्रवाहामुळे शहराचे पूर्व आणि पश्‍चिम असे दोन भाग नैसर्गिकरीत्या निर्माण झाले आहेत. तिची शहरातली लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे. या नदीवर कामथे आणि फणसवाडी असे दोन बंधारे आहेत. शिवनदीपात्रातून चिपळूणमधील पागमळ्यापर्यंत पूर्वी लहान होड्यांचा प्रवास चाले. मालवाहू-प्रवासी गलबते गोवळकोट बंदरातून, वाशिष्ठी नदीमार्गे बाजारपूल, बंदरनाका परिसरात येत. तिथे गलबतातील माल हा लहान नावांत घालून शिवनदी पात्रातून पागमळा परिसरात चढ-उतारासाठी येत असे. वाशिष्ठीला कोयनेचे अवजल उपलब्ध झाल्यानंतर झपाट्याने शिवनदीचे महत्त्व कमी होऊन तिचे अस्तित्व कचरा, गाळ, दूषित सांडपाणी यांमुळे संपल्यात जमा आहे. शासनाने जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑक्टोबर २००५ रोजी या कोयनेच्या अवजलाचा वापर कशा प्रकारे करावा ? याबाबत उपाय सुचवण्यासाठी ५ सदस्यीय अभ्यास गटाची स्थापना केली होती. दिनांक २९ ऑगस्ट २००६ रोजी या समितीने राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला. या पाण्याच्या मदतीने कोकणातील सुमारे १,७०,५०५ एकर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते, असे पेंडसे समितीचा अहवाल सांगतो. सुमारे ४०० पानांचा हा अहवाल सन २०१३ सालापर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. राजकीय साठमारीत पेंडसे समितीचा अहवाल आजही इतर अनेक अहवालांप्रमाणे धूळ खात पडला आहे. संघर्षाची फार मानसिकता नसलेल्या इथल्या जनतेला, लोकप्रतिनिधींना या पाण्याच्या पुन:र्वापराद्वारे संपूर्ण कोकणची तहान भागवावी यासाठी आपण सर्वपक्षीय एकत्र यावे असे कधीही वाटलेले नाही. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीचे रासायनिक प्रदूषण, सडणाऱ्या पाईपलाईन, जळणारी पिके, कमी होत गेलेली मस्यसंपदा, पशुपक्षी, मातांच्या दुधात मिळणारे अवजड धातूंचे अंश, बेकायदा वाळू उपसा इतके होऊनही वाशिष्ठी अजूनही संपलेली नाही. आजही वाशिष्ठीच्या खोऱ्यात वैविध्याची रेलचेल आहे.

      अंजनवेलचा गोपाळगड किल्ला याच वाशिष्ठीच्या दाभोळ खाडीमुखावर वसलेला आहे. मराठी अमदानीत हे जिल्ह्याचे ठिकाण होतें. किल्ला तीन बाजूंनी समुद्रवेष्टित व चवथ्या बाजूस खंदक आहे. भोवतालचा तट जाड दगड व चुन्याचा २० फूट उंच, ८ फूट रुंद व चांगला भक्कम आहे. खंदक १८ फूट रुंद व बराच खोल आहे. किल्ल्याला दोन दरवाजे (एक पूर्वेस व एक पश्चिमेस) आहेत. अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड हे दोन वाशिष्ठीचे पहारेकरी आहेत. गोविंदगड किल्ला जंजिऱ्याच्या हब्शांनी बांधला. तो शिवाजी महाराजांनी १६७० साली जिंकून घेतला. एका छोट्या बेटावर वसलेल्या किल्ल्याचा परिसर २ एकर आहे. ह्या किल्ल्यात रेडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर पुरातन काळातील तोफा व पाण्याचा मोठा हौद असून ६ तोफांचे हल्लीच एकत्रित जतन केलेले पाहायला मिळते. मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची 'तुंबाडचे खोत' ही द्विखंडी कादंबरी याच खाडीच्या वातावरणात रमलेली आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा प्रदीर्घ कालखंड या कादंबरीचा गाभा आहे. चित्रविचित्र इतिहासांच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष, व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्‍या अनेक घटना, पुन्हा एक व्यक्ती दुसरी सारखी नाही. एकूण काळ सव्वाशे वर्षाचा असला तरी स्थळ मात्र एकच - तुंबाड आणि तुंबाडचा परिसर आहे. हा परिसर वाशिष्ठी आणि खेडहून येणाऱ्या जगबुडी नदीच्या संगमावर आहे. श्री. ना. पेंडसे यांनी अजरामर केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता पर्यटक अनभवू शकतो. वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर मालदोली गावात नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली अभियांत्रिकी नवल ठरलेली रामचंद्र वासुदेव मराठे न्यासही ‘हेरिटेज वास्तू’ आहे. उपलब्ध मौखिक माहितीनुसार या वास्तूचे प्लॅनिंग भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले होते. खाडीकिनारी वसलेल्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी मोहवून टाकणारी आहे. साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकारात  ही वास्तू आहे. उंचीवरील जीने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज पडणार नाही वा तो चढताना दमणार नाही यानुसार या जीन्याची तंत्रशुद्ध रचना साकारण्यात आली आहे. तब्बल नव्वद वर्षांनंतरही या वास्तूतील लाकडाला काही झालेले नाही. वास्तूतील जवळपास वीस-बावीस खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन खिडक्या, भिंतीतील दोन कपाटे आहेत. खिडक्यांना चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर सूर्यप्रकाश वास्तूतील प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. छताच्या लगीआज नव्वदीनन्तरही मजबूत असून त्यांना कोठेही बाक आलेला नाही. छप्पराच्या ९ इंच आय बीमची मजबुती नव्वद वर्षांनंतरही सहज नजरेत भरते. भिंतींचा मूळ गिलावा अजिबात हललेला नाही व त्याचे तुकडे गळून पडलेले नाहीत. वास्तू परिसरात ८० आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे.

      दापोली तालुक्यातील पन्हाळेकाझी हे गाव कोरलेल्या लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील कोटजाई ही नदी पुढे वाशिष्ठी खाडीला जाऊन मिळते. या नदीच्या काठावर महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा नितांत सुंदर लेणी समूह  आहे. इथल्या गुंफा ऐतिहासक असून त्या जवळपास हजार वर्षांहून अधिक जुन्या आहेत. एकूण २९ भल्या मोट्या दगडांमध्ये पहायला मिळतात. या ठिकाणी श्रीगणेश, सरस्वती यांसारख्या देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसंच भिंतींवर महाभारत आणि रामायणातले काही प्रसंग चित्रीत केले आहेत. पन्हाळेकाझी इथे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक लेण्यांचं अनोखं मिश्रण आहे. शिलाहार राज्याची एकेकाळी राजधानी असलेल्या या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौद्धस्तूप, नाथपंथीय शिल्पपट, शंकराचे कोरीव मंदिर, रामायण आणि महाभारतातील प्रसंग, गणेश, लक्ष्मी, हनुमान या देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. हा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी किमान दोन-तीन तास लागतात. कोटजाई नदीकाठचं दृश्य अतिशय रमणीय आहे. येथील परिसर हिरव्यागर्द वनराईने समृद्ध आहे. दापोलीपासून पन्हाळेकाझी २१ कि.मी. आहे. चिपळूण तालुक्यातील गोंधळे येथील तांबी नदीच्या किनारी असलेले पेशवेकालीन हरिहरेश्वर मंदिर, परिसरातील इंग्रजी ‘एल’ शेप आकाराची प्राचीन विहीर (घोडेबाव), शेकडो वर्षांपूर्वीचे वडाचे झाड पाहण्यासारखे आहे. भरती-ओहोटीचे गणित सांभाळून छोट्या बोटीने खाडीमार्गाने आपण पन्हाळेकाझीसह येथेही पोहोचू शकतो. वाशिष्ठीच्या जोडनद्यांमध्ये गोंधळेसह दापोली तालुक्यातल्या उन्हवरे गावातले गरम पाण्याचे कुंड, पन्हाळेकाझी लेणी, मालदोली बंदरासमोरील गुहा लहान बोटीनं भरती-ओहोटीची वेळ बघून, साधारण द्वादशी ते चतुथीर्पर्यंत जाऊन बघू शकतो. गाडीनं जाण्यासारखी दोन प्राचीन ठिकाणं म्हणजे बिवली गावचं प्राचीन लक्ष्मीकेशव मंदिर आणि दोणवलीचं सिद्धिविनायक मंदिर होय. दाभोळ ते चिपळूण-गोवळकोट बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे. नुकताच आम्ही ६ ऑक्टोबर २०१८ रोजी हा प्रवास केला. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली, त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअरप्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा.

      ओहोटीच्या वेळी खाडी किनाऱ्यावर शरीराचे तापमान नियंत्रित करण्याकरिता ‘बास्किंग’ करीत निवांत पहुडलेल्या, मॅनग्रोव्हमध्ये लपलेल्या, कातळावर बसलेल्या, चिखलात विसावलेल्या मगरी बोटीतून बघायला धमाल मज्जा येते. या बोट प्रवासात सुमारे ८ ते १० फुट लांबीच्या किमान १० मगरी तरी पाहायला मिळतात. नशीब जोरावर असेल तर ही संख्या २०-२२ वरही जाऊ शकते. अर्थात त्यासाठी ओहोटी असली पाहिजे. पावसाळ्यात हा सगळा परिसर हिरवागार असतो. हिवाळ्यात कुडकुडायला लावणारी थंडी येथे असते. या खाडी पट्ट्यात आजवर पक्ष्यांच्या ७० ते ८० जाती नोंदवल्या गेल्या आहेत. हे बॅकवॉटर आणि इथल्या मगरी हे मोठं आकर्षण आहेच, पण वाशिष्ठीच्या खाडीतीरावर आणि जोडनद्यांमध्ये भरपूर प्राचीनता, लोकसंस्कृती, जीवनपद्धती, चालीरीती पाहायला मिळतात. आपल्या मातीतील हे सारे वैभव अनुभवण्यासाठी एकदा तरी या वाशिष्ठीच्या खाडीची सफर करायलाच हवी !

धीरज वाटेकर
‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.
     
मो. ९८६०३६०९४८
dheerajwatekar@gmail.com


प्रसिद्धी 
दैनिक महाराष्ट्र टाईम्स, मगरींच्या सानिद्ध्यात... ४ मे २०१९ 

मासिक लोकराज्य, मे २०१९ 

बुधवार, १० एप्रिल, २०१९

त्वदीयाय कार्याय ! ‘जाणकार’ प्रकाश देशपांडे यांच्या सुवर्णमहोत्सवी कारकीर्दीचा आलेख !


गेल्या मार्च महिन्याच्या २४ तारखेला चिपळूणात, श्री. प्रकाश देशपांडे कृतज्ञता समितीने ‘पुण्यभूषण’ डॉ. देगलूरकर सरांच्या आशीर्वादस्वरूप उपस्थितीत आपला संस्मरणीय उत्सव साजरा केला. निमित्त होते, श्री. प्रकाशकाका एकनाथ देशपांडे यांच्या विविधांगी कर्तृत्त्वसंपन्न सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे ! यावेळी ‘त्वदीयाय कार्याय’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही झाले. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वि. रा. करंदीकर यांच्यासारख्या वैचारिक क्षेत्रातील मानदंड असलेल्या अधिकारी व्यक्तीने, ‘प्रकाशराव जाणकार आहेत’ असे म्हटले होते. चिपळूणला कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त होण्यात, दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय नानांसोबतच प्रकाशकाका देशपांडे यांच्या कार्यशैलीचे असलेले योगदान या गौरवग्रंथाच्या पानोपानी जाणवते. चिपळूणंच, कोकणची सांस्कृतिक राजधानी का ? असा प्रश्न आजही पडणाऱ्या चिकित्सकांनी, अभ्यासकांनी, कोकणच्या सांस्कृतिक राजधानीची जडणघडण समजून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी ‘त्वदीयाय कार्याय’ हा एका अर्थाने कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचा मागोवा असलेला संदर्भीय गौरवग्रंथ मुद्दामहून वाचावयास हवा.

‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने...’ या वृत्तीने समाजासाठी कार्य करणाऱ्या ज्ञात-अज्ञातांना त्वदीयाय कार्यायगौरवग्रंथ समर्पित आहे. हा २८८ पानी गौरवग्रंथ ४३ मान्यवरांचे लेख, स्वत: प्रकाश देशपांडे यांचे निवडक लेख, कथा, कविता आदि पुनर्मुद्रित साहित्य, नामवंतांची दुर्मीळ पत्रं आणि फोटोंनी परिपूर्ण आहे. गौरवग्रंथ आणि सोहोळा निर्मितीतील कार्यकर्त्यांच्या श्रेयनामावली पानाच्या शीर्ष भागात दिलेली, गौरवग्रंथाच्या भागांना दिलेली बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, डॉ. अरुणा ढेरे यांची काव्यअवतरणे, लेख लिहिलेल्या लेखकांच्या परिचयातील कल्पकता अभ्यासताना साहित्यकुशल संपादन झाले असल्याची पक्की जाणीव होते. गौरवग्रंथाच्या मलपृष्ठावर कोकण इतिहास परिषदेच्या महाड येथे संपन्न झालेल्या ८ व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केलेल्या भाषणाचा संपादित अंश नोंद आहे. या अधिवेशनाला आम्हीही उपस्थित होतो. इतिहासाच्या अभ्यासकांना आवश्यक असणारे मुलभूत मार्गदर्शन प्रकाशकाकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले होते. गौरवग्रंथाच्या मुखपृष्ठावर असलेले समीर गोरे यांनी रेखाटलेले रेखाचित्र, आतील सजावट, लेखांची मांडणी, विविध रंगांची फारशी उधळण न करता साकारलेले मुखपृष्ठ हे सारे प्रकाशकाकांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे साधेशे तरीही लक्षवेधक आहे. कुसुमाग्रज, प्राचार्य राम शेवाळकर, ज्येष्ठ साहित्यिक व प्रख्यात इतिहास संशोधक रामचंद्र चिंतामण तथा रा. चिं. ढेरे, यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे, स्वा. सावरकरांचे निजी सचिव बाळाराव सावरकर, संत साहित्याचे आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. वि. रा. करंदीकर, डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी कांचन घाणेकर, मंगेश पाडगावकर, लेफ्टनंट कर्नल शाम चव्हाण, जेष्ठ कवी शंकर वैद्य, प्रख्यात संगीतकार यशवंत देव, श्रीकांत मोघे यांच्या सोबतचा पत्रव्यवहार, सरसंघचालक मोहनजी भागवत, लोकसभाध्यक्षा सुमित्राताई महाजन, संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वलजी निकम, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज यांच्या सोबतची छायाचित्रे ग्रंथाचे संग्राह्यमूल्य वाढवित आहेत. दीडशे वर्षांहून अधिक, किमान पाच पिढ्यांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे गेली तीन तपे प्रकाशकाका नेतृत्व करीत आहेत. ‘चालते बोलते विद्यापीठ’ असलेल्या प्रकाश देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाची सर्वांगीण ओळख व्हावी, या हेतूने गौरवग्रंथाची निर्मिती करण्यात आल्याचे संपादकीयात म्हटले आहे. आणि  ते खरेच आहे. ग्रंथातील विविध नोंदीबाबत अनेकजण आजतागायत अनभिज्ञ होते, हे प्रतिक्रियांवरून लक्षात येते आहे.

माणदेशी मातीत दिनांक ५ एप्रिल १९४७ ला त्यांचा जन्म झाला. वलवण, विटा परिसरात जीवावर बेतणारे खेळ खेळत, कीर्तनं, व्याख्यानं ऐकतं त्यांचं बालपण गेलं. लहानपणापासून इतिहासाची आवड असलेले प्रकाशकाका शाळेतील इतिहास शिक्षक तावरे सरांचे आवडते विद्यार्थी. शिवाजी महाराजांची भक्ती, बालवयात नाटकात साकारलेला तानाजी मालुसरे साऱ्यातून हे व्यक्तिमत्त्व आकाराला आलं. जनसंघाच्या निवडणुकांची जबाबदारी, मुंबईतील काम, भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव, ‘साक्षात धन्वंतरी’ डॉ. तात्यासाहेब नातूंचे कार्यालयीन काम, अणीबाणी जेल, चिपळूणात श्रीरामनवमी उत्सव, श्रीलक्ष्मी नारायणाच्या मैदानात, अश्रूंची झाली फुले (पणशीकरांनी अजरामर केलेली विद्यानंदची भूमिका), रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या त्यांच्या भूमिका, चिपळूणच्या कॉलेजयीन नाट्य प्रशिक्षण शिबिरांचे मार्गदर्शक, दूरदर्शनवर गाजलेल्या रचनांचे कवी, गेली ९० वर्षे चिपळूणात सुरु असलेली श्रीकृष्ण व्याख्यानमालेत शांताबाई शेळके, वि. रा. करंदीकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासारख्या दिग्गजांना आणून वान्द्मयीन वातावरण तयार करणारे, रत्नागिरीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोकणातीलच असावा विचारांनी झपाटलेले, अनेक साहित्य-नाट्य संमेलनाचे कर्तेधर्ते, कुमार गंधर्व संगीत महोत्सव, राज्य नाट्य स्पर्धांचे परीक्षक, शासनाच्या ग्रंथालय ग्रंथ निवड समितीचे सदस्य, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन / कार्याध्यक्ष, संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे सदस्य राहिलेल्या प्रकाशकाकांनी दैनिक सागरच्या दिवाळी अंकांचे संपादनही केले होते.

मूर्तीशास्त्राचे अभ्यासक, लेखक आशुतोष बापट यांच्या ‘अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ या पहिल्या लेखातील ‘लोकमान्य टिळक वाचन मंदिराचे अर्ध्वयू’ उल्लेखाने ग्रंथाची सुरुवात होते. मसापचे कार्याध्यक्ष आणि ख्यातनाम व्याख्याते प्रा. मिलींद जोशी यांनी आपल्या लेखात, ‘२०१३ सालच्या अखिल भारतीय संमेलनाच्या पूर्वतयारीच्या बैठकांत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन चिपळूणात दाखविले गेले. महामंडळ सदस्यांसाठी हा नवा प्रकार होता’ असे म्हटले आहे. संमेलनाच्या इतिहासातच अशा प्रकारे प्रेझेंटेशन चिपळूणातच पहिल्यांदा दाखविले गेले होते. एखाद्यावर विश्वास बसला की प्रकाशकाका नवख्या व्यक्तीला मान्यवरांच्या यादीत कसे आणतात, याची सुंदर आठवण संस्कृतच्या गाढ्या अभ्यासक डॉ. आसावरी बापट यांनी नोंदविली आहे. त्रिपुरा विद्युत महामंडळाचे अध्यक्ष आणि सन १९९१ साली चिपळूणला विद्युत विभागात कनिष्ठ अभियंता राहिलेल्या मुरहरी केळे यांनी सांगितलेल्या साऱ्या आठवणी संस्मरणीय आहेत. प्र. के. घाणेकर यांनी आपल्या लेखात त्यांचा केलेला ‘प्रचंड ग्रंथभूकीचा उल्लेख’, केंद्र सरकारच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष भिकुजी उर्फ दादा इदाते यांनी, ‘आपण पाहिलेल्या १८ समरसता साहित्य संमेलानांपैकी भव्यदिव्य म्हणून चिपळूणचा केलेला उल्लेख’, डॉ. अरुणा ढेरे यांनी नोंदविलेलं, ‘वान्द्मयीन क्षेत्रातील सगळी मोठी माणसं चिपळूणच्या व्याख्यानमालेसाठी आपलं म्हणून येत राहिली’ हे विधानही खूप महत्वाचं आहे. प्रकाशकाका १०/१२ वर्षांचे, पाचवीत शिकत असताना ग. दि. मा. विट्यात आले होते. पाठपुस्तकात ‘माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार ! भुकेलेल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार’ ही त्यांची कविता होती. केवळ त्यांना पाहण्यासाठी १०/१२ वर्षांच्या वयात ते त्यांच्या येण्याच्या वाटेत तिष्ठत उभे राहिले होते. रस्त्यावरून चालताना ‘ग.दि.मा.’नी सहज आपली शाल अंगावर लपेटली नि तिची झिळमिळी किनार प्रकाशकाकांच्या खांद्यावरून फिरली. या प्रसंगासह त्यांच्या जीवनातील अनेक बारकावे टिपलेला नामवंत लेखक सुमेध वडावाला रिसबूड यांचा ‘सुफळ संपूर्ण’ लेख अत्यंत वाचनीय आहे. दैनिक सागरचे संस्थापक संपादक स्वर्गीय निशिकांत जोशी यांच्या लेखातलं, ‘आमच्या शोरूममध्ये जे आहे ते यांच्या गोडाऊन मधूनच उधारीवर आणलेलं असतं’ हे वाक्य दोघांचे निकटचे घनिष्ठ संबंध दर्शविते. मुंबई मराठी साहित्य संघाच्या माजी कार्याध्यक्षा, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी आपल्या लेखात सन २०१३ साली चिपळूणला संमेलन व्हावे म्हणून त्यांनी सन २०११ सालापासून सुरु केलेल्या पाठपुराव्याची, दूरदृष्टीची नोंद केली आहे. मूर्तीशास्त्रातील जगद्मान्य व्यक्तिमत्त्व डॉ. देगलूकरकर सरांनी, ‘आले प्रकाशरावच्या मना, तेथे कोणाचेही चालेना’ अशा शब्दात त्यांच्या संघटन कौशल्याचा गौरव केला आहे. चिकाटी, मोठाले कार्यक्रम आयोजित करण्याचा अग्रक्रम, संस्कृतीची जोपासना करण्याची धडपड या गुणांचेही देगलूकरकर सरांनी कौतुक केले आहे. त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या की तरुण मंडळी सहज श्रोते होऊन जातात. म्हणूनच ‘मॅन फॉर ऑल सिझन्स’ असं ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र दिवाडकरांनी लिहून ठेवलं आहे. ज्येष्ठ कीर्तनकार धनंजय चितळे यांनी देशपांडे यांना दुर्लभ संयोजकही उपाधी कशी सार्थ शोभते याचे विवेचन केले आहे. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी भारतीय मजदूर संघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांना, ‘एखाद्या स्वयंसेवकाने कोणत्याही संस्थेचे काम स्वीकारले की ती संस्था आपली मानली पाहिजे, तिचा उत्कर्ष कसा होईल याचा विचार केला पाहिजे’ असा उपदेश केला होता. त्याचे प्रकाशकाकांनी पालन केल्याचे चितळे यांनी म्हटले आहे.     

‘दोन तपांच्या काळात महाराष्ट्रभर पोहोचलेलं वाचनालय अनेकांच्या भुवया उंचावणार ठरलं आहे’ ही नामवंत कवी, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष अरुण इंगवले यांची नोंद, डॉ. मिलिंद गोखले, विवेक भावे, प्रा. अंजली बर्वे, डॉ. सुरेश जोशी, मनीषा दामले, डॉ. विनिता विनय नातू, पुष्पा वाणी यांच्यासह सर्वच लेख वाचनीय आहेत. कौटुंबिक पातळीवर विचार करता काकांच्या पत्नी डॉ. रेखा देशपांडे मॅडम यांच्यासह कन्या आसावरीताई आणि नातवंडांसह इतर नातेवाईकांचेही लेख अप्रतिम आहेत. आदित्य जोशी याने शब्दबद्ध केलेला ‘हणमंतराव’ आपल्याही वाट्याला यायला हवा होता, असे सहजच वाटून जाते. सर्व कौटुंबिक लेखातून समाजाला माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. अर्थात ‘काम चांगलं आहे म्हणून पुस्तकही छान झाले आहे’ ही डॉ. प्रशांत पटवर्धन यांची सोशल मिडीयावरील प्रतिक्रियाही तितकीच बोलकी आहे. अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने एखाद्या संस्थेला आकार देत आपलं नियोजित कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेल्या माणसांचे कार्य संपूर्ण समाजाला समाधान देऊन जाण्यासोबतच प्रवाही जीवनाची अनुभूतीही प्रदान करत असते. चिपळूण शहरात आम्ही वास्तव्याला असल्यापासून स्वकतृत्वाने उपरोक्त 'स्वयंसिद्ध' चौकटीत बसण्याचे सामर्थ्य प्राप्त केलेली एक व्यक्ती म्हणून आम्हीही प्रकाशकाका देशपांडे यांना पाहात आलो आहोत.

स्नेहल प्रकाशनच्या रवींद्र घाटपांडे यांच्या लेखातील, नामवंत इतिहास संशोधक स्वर्गीय निनादराव बेडेकर आणि प्रकाशकाका यांच्यातील कवी भूषणाच्या छंदाबाबतची जुगलबंदी आठवण आणि शेवटी ‘या माणसाने माझा अहंकार उतरविला. ये तो सवासेर निकला.’ हे मनमोकळेपणाने केलेले विधान खूप काही सांगून जाते. आपल्यातल्या कार्यकर्त्याच्या भूमिकेला अधिक न्याय देणाऱ्या प्रकाशकाकांनी यापूर्वी स्वतः लिहिलेले गौरवग्रंथातील पुनर्मुद्रित लेख, कथा, कविता आदि साहित्य... त्यांच्यातल्या दर्दी लेखकातील स्पष्टवक्तेपणाच्या खुणा पटवून देतात. तरीही... स्वत:ला ‘भणंग’ संबोधून त्यांनी लिहिलेला ‘आंधळ्याच्या गायी देव राखतो’ हा लेख भविष्य घडवू पाहणाऱ्या तरुणाईने वाचावयास हवा. याच लेखाच्या शेवटी ‘सुखी माणसाचा सदरा कोणाला हवा असल्यास माझा खुशाल घेऊन जा’ असे त्यांनीच म्हटले आहे. संपूर्ण ग्रंथ वाचताना त्यांच्या या वाक्याची वारंवार प्रचिती येते. स्वत: दिव्याची वात होऊन आसमंत उजळविणाऱ्या प्रकाशपर्वाचा हा अक्षरयज्ञ म्हणूनच वाचावयास हवा !

पुस्तकाचे नाव : त्वदीयाय कार्याय (प्रकाश देशपांडे गौरव ग्रंथ)
पृष्ठ संख्या : २८८, स्वागतमूल्य : २०० रुपये
प्रकाशक : प्रकाश देशपांडे कृतज्ञता समिती, चिपळूण  
ग्रंथाकरिता संपर्क :
मो. ९७६५८६८७२२ (प्रकाश घायाळकर, अध्यक्ष, प्रकाश देशपांडे कृतज्ञता समिती)
मो. ९८६०४३५५६० (प्रा. अंजली बर्वे, चिपळूण)
मो. ७०५७५५७५०८ (आसावरी देशपांडे-जोशी, पुणे)


धीरज वाटेकर, चिपळूण  
मो. ९८६०३६०९४८

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

आयुष्य जगणारा गुरुजी !

उद्याच्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला, आज आमचे ज्येष्ठ मित्र, चिपळूण शहरानजीक असलेल्या उक्ताड जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक विलास (भाई) महाडिक (गुरुजी) यांचे अभिष्टचिंतन आणि श्रीसत्यनारायण पूजा त्यांच्या पेढे परशुराम येथील श्री परशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्रात, मित्रपरिवाराकडून होत आहे. सदा हसतमुख चेहरा, समोरच्याचे पूर्ण ऐकून घेण्याची क्षमता, एखादी गोष्ट पटली नाही तरीही घाईघाईने व्यक्त न होण्याची सवय, सर्वांशी सहज जुळवून घेण्याची हातोटी या गुणांचे धनी असलेले विलासराव हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष आहेत. दिनांक ५ एप्रिल १९६६ रोजी जन्मलेले विलासराव आज वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून जीवनाचा मार्ग शोधत, आपल्यातील उपजत कलागुणांना न्याय देत त्यांनी आपले जीवन जगण्याचा चालविलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

संत गाडगेबाबांच्या विचारांचे पाईक, ग्रामसेवक वडील दत्ताराम आणि आई सौ. सुषमा यांच्या मायेच्या सावलीत चिपळूण तालुक्यातील निवळी गावात त्यांचे नि छोटी बहिण स्मिता आणि भाऊ विकास यांचे बालपण गेले. जवळच्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यापक विद्यालयात शिक्षण पूर्ण करून ही तीनही  भावंडे प्राथमिक शिक्षक झालीत. अंगभूत कलात्मक गुणांच्या बळावर त्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षकी पेशाला आकार देण्याचा प्रयत्न केला. समोर आलेल्या कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही या एकाच सक्षम गुणाच्या बळावर ते कार्यरत झाले. आज त्यांच्या मित्र परिवाराला त्यांच्याबद्दल वाटणारा जिव्हाळा याचेच द्योतक आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत प्राथमिक शिक्षण घेण्याची प्रक्रिया आज मंदावलेली जाणवते. पण तत्पूर्वीच्या दशकभराच्या कालावधीत विलासरावांनी आपल्या शालेय स्तरावरील जबाबदारीला सर्वस्व झोकून देत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या बाहेर जाऊन शिक्षण देण्याची त्यांची पद्धत अनुकरणीय आहे. प्रसंगी पदरचं खर्चून, आपल्या विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना समजाव्यात म्हणून ते सतत आघाडीवर असतात. त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे तिथे आजही त्यांच्याविषयी जे बोललं जातं ते याची साक्ष देण्यास पुरेसं आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना सन २००६/०७ साली सपत्निक ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविले. शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर जात आपल्यातील क्रयशक्तीला अधिकचे सकस काहीतरी हवे आहे, याची जाणीव झालेल्या विलासरावांनी शिक्षणासोबतच आवडत्या पर्यावरण आणि पर्यटन या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. ‘जे जे सत्य नि चांगलं, ते ते सारं आपलं’ या न्यायाने, आमच्या सोबतच्या गेल्या १०/१२ वर्षांच्या कालखंडात, त्यांनी अनेकविध समाजाभिमुख उपक्रमांना आपलसं केल्याचं अनेकांनी पाहिलं आहे.    

      आपल्या कार्यसक्षम अर्धांगिनी, सौ नूतन वहिनींच्या सहकार्याने त्यांनी सन २००७ साली चिपळूण तालुक्यातील पहिले निसर्ग पर्यटन केंद्र सुरु केले. या विषयात चिपळूणात कार्यरत असणाऱ्या रामशेठ रेडीज, प्रसाद काणे, कैसर देसाई, मिलिंद कापडी अशा अनेकांचे सहकार्य त्यांना याकामी लाभले. नुसते पर्यटन केंद्र काढून भागणार नाही म्हणून त्यांनी सन २००८ साली, आमची ‘चिपळूण तालुका पर्यटन’ ही पुस्तकाची कल्पना उचलून धरली. आमच्यासह सहकारी मित्र समीर कोवळे याला पहिली पुस्तक प्रसिद्धी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. इतिहास संशोधक स्वर्गीय निनादराव बेडेकर, कोकणचे बुद्धिवैभव स्वर्गीय नानासाहेब जोशी, ग्रंथालय चळवळीतील अग्रणी आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रकाश देशपांडे, नामवंत लेखक प्र. के. घाणेकर, इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर, इतिहास संशोधक श. गो. धोपाटे यांसारख्या नामवंतांचे मिळालेले आशीर्वाद त्या पुस्तकाचा वेगळेपणा सांगण्यास पुरेसे आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत राहताना, शाळेशी होणारा प्रत्येक पत्रव्यवहार जबाबदारीने हाताळणाऱ्या विलासरावांना एका पत्रव्यवहारातून ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे भेटले. त्यांच्यासोबत पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीच्या कामाला अधिक गती मिळाली. हा प्रवास पुढे अण्णासाहेब हजारेंच्या मार्गदर्शनाखाली अलिकडच्या भूतान पर्यावरण अभ्यास दौऱ्यापर्यंत येऊन पोहोचला. चिपळूणच्या या पदवीधर प्राथमिक शिक्षकाने राळेगणसिद्धीच्या मातीत संपन्न झालेल्या तीन पर्यावरण संमेलनांत दिलेले योगदान त्यांच्या सहकारी शिक्षकांनी तिथे स्वतः येऊन अनुभवले आहे, त्याला दादही दिलेली आहे. सन २०१४ साली पर्यावरण-पर्यटन विषयातील त्यांच्यातल्या अभ्यासू मनाने उचल खाल्ली. संधी मिळाली. नि आमचे त्यांच्या लेखन सहकार्याने ‘ठोसेघर पर्यटन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आम्ही दोघे जवळपास दीड वर्षे चिपळूण-सातारा-सज्जनगड-ठोसेघर असा निसर्गरम्य प्रवास करत होतो. या प्रवासातील गमती-जमती हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे. विलासरावांमधला निखळपणे आयुष्य जगणारा अवलिया आम्हाला खऱ्या अर्थाने तेव्हा भेटला. पुढे या पुस्तकाला कोल्हापूरच्या चंद्रकुमार नलगे पुरस्काराने गौरविण्यातही आले. ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या मंडळाचे, राज्यातील दुसरे ‘बिगरमोसमी जंगलपेर अभियान’ चिपळूणला संपन्न झाले. त्या कार्यक्रमात चंदनतज्ज्ञ ‘वनश्री’ महेंद्र घागरे भेटले नि रत्नागिरी जिल्ह्यात चंदनाचा सुगंध दरवळावा म्हणून अभियान सुरु झाले, त्याला आता ५/६ वर्ष झालीत. विलासराव कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातूनही, जिल्हाध्यक्ष विजयराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शालेय स्तरावर बीज पेरणी अभियान संपन्न झाले आहे. या संघटनेचे ते राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत.

लेखन चळवळ वाढावी म्हणून ते सतत कार्यरत असतात, आमच्या साथीने अनेक विशेषांकांचे संपादन करण्यातही त्यांचे योगदान राहिले आहे. आपले ८५ वर्षे वयाचे गुरु ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ मो. म. परांजपे गुरुजी यांची जीवनकथा प्रकाशित व्हावी म्हणून त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय नानांनी विलासरावांच्या ‘गुरुदक्षिणा’ या लेखनाबाबत म्हटले होते, ‘गुरुदक्षिणा या कृतज्ञ अक्षरपूजेत गुरुजी श्री. विलास महाडिक यांनी कर्मयोगी परांजपे गुरुजींबद्दल जे उत्कटतेने लिहिले आहे ते मनोगत सध्याच्या तरुणांनी व विशेषतः शिक्षकांनी मन:पूर्वक वाचले तर प्राथमिक शिक्षक आपल्या अत्यंत मर्यादित कार्यक्षेत्रात किती अमर्याद काम करू शकतो हे लक्षात येईल.’ अधिक काय लिहावे ? विलासरावांना आम्ही मन:पूर्वक अभीष्ट चिंतितो.  
   
धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८ 

शनिवार, २३ मार्च, २०१९

साहित्य-कलेच्या प्रांगणातील सर्वस्पर्शी मार्गदर्शक !


अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने एखाद्या संस्थेला आकार देत आपलं नियोजित कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेल्या माणसांचे कार्य संपूर्ण समाजाला समाधान देऊन जाण्यासोबतच प्रवाही जीवनाची अनुभूतीही प्रदान करत असते. चिपळूण शहरात आम्ही वास्तव्याला असल्यापासून स्वकतृत्वाने उपरोक्त 'स्वयंसिद्ध' चौकटीत बसण्याचे सामर्थ्य प्राप्त केलेली एक व्यक्ती कायम आमच्या वैचारिक जडणघडणीचे कारण ठरलेली आहे. ती व्यक्ती म्हणजे आदरणीय प्रकाशकाका देशपांडे होत.

सन १९९२ साली, प्रकाश काकांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा १२ वर्षांचे आम्ही अलोरेच्या शाळेत आठव्या इयत्तेत शिकत होतो. सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या अलोरेच्या वातावरणात काही साहित्यप्रेमी सृजनांच्या सहकार्याने, आमच्या वडिलांनी 'ओंजळ काव्य रसिक मंच' स्थापन केला. या मंचाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘प्रमुख वक्ते’ म्हणून  दिनांक ४ एप्रिल १९९२ रोजी गुढीपाडव्याला प्रकाशकाका अलोरेत आले असताना आम्ही त्यांना पहिल्यांदा पाहिले, त्यांचे विचारही ऐकले. अर्थात तोपर्यंत आमचा आणि साहित्याचा फारसा संबंध नव्हता. निव्वळ आमच्या बाबांच्या आग्रहाखातर आम्ही कार्यक्रमात असायचो. वाचन ही जेमतेमच होतं. काकांनी आपल्या भाषणात वाचनाबाबत केलेलं मार्गदर्शन आजही आठवतंय. ‘अस्वस्थ आणि बेचैन साहित्यप्रेमींची चळवळ’ अशा शब्दात त्यांनी ‘ओंजळ’ला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी ‘कविता नव्या-जुन्यांची’ हा आमच्या वडिलांच्याच संकल्पनेतला कार्यक्रम सादर झाला होता, अनेकांनी त्याचे कौतुक केले होते. बाबांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे ‘प्रमुख वक्ते’ म्हणून प्रकाशकाकांची प्रतिमा आमच्या मनात तेव्हाच घट्ट बसली.

प्रकाशकाकांची दुसरी व्यवस्थित भेट आठवतेयं ती सन २००८ सालच्या मार्च महिन्यातली ! त्याच्या काही महिने अगोदरपासून आम्ही आमचे सहकारी समीर कोवळे आणि विलास महाडिक यांच्या सहकार्याने पूर्ण करीत आणलेला 'चिपळूण तालुका पर्यटन' हा पुस्तक निर्मिती प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना 'एक्सर्ट ओपिनिअन' घेण्यासाठी आम्ही काकांना भेटलो होतो. काकांमधील 'साहित्य-कलेच्या प्रांगणातील सर्वस्पर्शी मार्गदर्शक' व्यक्तिमत्वाची ओळख पहिल्यांदा आम्हाला तेव्हा झाली. आमच्या नियोजित पुस्तक प्रकल्पाचे मनापासून कौतुक करताना काकांनी आवर्जून त्यात काही मुद्द्यांची आपणहून भर घातली होती, यास्तव आम्हीही सर्वानुमते काकांचा फोटोसह गौरवपूर्ण उल्लेख त्या पुस्तकात केला होता. पुढे जाऊन त्याच बैठकीत काकांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या हॉलमध्ये घेण्याची सूचना केली होती. पुढे गुढीपाडव्याला तो कार्यक्रम लोटिस्माच्याच सभागृहात पार पडला. एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हॉल भरून रसिकांची दुर्मीळ गर्दी तेव्हा चिपळूणात अनेकांनी अनुभवली होती. या सा-यात काकांचे मोलाचे सहकार्य राहिले हे नक्की ! 

या पहिल्या पुस्तकाच्या निर्मितीनंतर यावर्षीच्या सन २०१८ च्या गुढीपाडव्याला, पेढे गावातील श्रीपरशुराम निसर्ग सान्निध्य पर्यटन केंद्रात आम्ही त्याच चिपळूणच्या पुस्तकाची 'दशकपूर्ती' साजरी केली. काकांचे हमखासचे मार्गदर्शन तेव्हाही मिळाले. गेल्या दहा वर्षांत आमची आठ पुस्तके प्रकाशित झाली. प्रत्येक वेळी प्रकाशित पुस्तक चिपळूणच्या वाचनालयाकरिता काकांच्या हाती देतानाचा आमचा आनंद केवळ अवर्णनीयचं राहिला आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही आमच्या कार्यबाहुल्यातून वेळ मिळेल तेवढे वाचनालयाशी जोडले गेलो ते काकांमुळेच ! वाचनालयाच्या उपक्रमात काहीवेळा व्यासपीठावर येऊ शकलो तेही काकांमुळेचं ! आमच्या आठव्या लिखित 'कृतार्थीनी' या सुप्रसिद्ध मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकाच्या दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी मुरूड ता. दापोली येथील प्रकाशन सोहोळ्यास प्रत्यक्ष निमंत्रण नसतानाही काका आपले दोन सहकारी नामवंत कवी आणि लोटिस्माचे वर्तमान अध्यक्ष अरूण (दादा) इंगवले आणि साहित्यिक प्रा. संतोष गोणबरे (आमचा    कॉलेजयीन साहित्यिक मित्र) यांच्यासह उपस्थित राहिले, तो क्षण आमच्यासाठी सुखद तितकाच धक्कादायक होता. आमच्या पुस्तक प्रकाशनाच्या मुरूडच्या कार्यक्रमाला चिपळूणातून कशाला कोण येईल ? हा आमचा विचार काकांनी खोटा ठरविला होता. 'मुद्दामहून तुला शुभेच्छा देण्यासाठीच आलोय' असेही ते यावेळी म्हणाले होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत 'कदाचित' वाचनालयाच्या कक्षेत येऊ न शकणारे परंतु सर्जनशील समाजासाठी आवश्यक असलेले अनेक उपक्रम काकांनी विचारपूर्वक सर्वांच्या सहकार्याने वाचनालयाच्या पटलावर आणून यशस्वी केलेले आम्ही पाहिलेत. वाचनालयाचे 'कलादालन' हा अशातीलच एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तो काकांच्या कल्पक नेतृत्वाखाली पूर्णत्वास जातो आहे. आगामी काळात त्याचा परिघ विस्तारेल असा विश्वास वाटतो. 

सतत कार्यरत राहू पाहणा-या वर्तमान तरूण पिढीच्या सोबत असलेले 'प्रकाशकाका' आम्ही पाहिलेत-अनुभवलेत. आज प्रकाशकाका देशपांडे यांच्या विविधांगी कतृत्वसंपन्न कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रति सदैव आदरभाव असलेल्या सर्वांकडून 'कृतज्ञता सोहोळा' संपन्न होतो आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या सोहोळ्यासाठी आणि काकांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही भरभरून सदिच्छा व्यक्त करतो. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला सतत मिळत राहावा, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. 


धीरज वाटेकर  (८ ऑक्टोबर २०१८)



सोमवार, १८ मार्च, २०१९

पालावलेल्या जंगलातील दोन तास !

रात्री साडेनऊची वेळ ! ठिकाण चांदोली अभयारण्याचा बफर झोन ! रस्त्यावर न्यायला आलेल्या धनगराने घराचा दरवाजा उघडला. घरात पाऊल ठेवले तर दरवाजातच आडव्या मोकळ्या जागेत म्हैस, रेडकू, दोन बैल बांधलेले. अधिकची जनावरं शेजारच्या एका खोलीत ! जवळच्या खुराड्यातल्या काही कोंबड्या, नि घरातच इकडे तिकडे फिरणाऱ्या दोन कुत्र्यांनी आमचे स्वागत केले. घरच्यांनी शेणाने सारवलेल्या जमिनीवर घोंगडी अंथरलेली. हातपाय धुऊन तिथेच बसलो. मित्राने विचारले, ‘कसं वाटलं ?’ आमची प्रतिक्रिया ‘जबरदस्त !!!’

चिपळूण शहराला ऑफबीट टुरिझम डेस्टिनेशनबनविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कार्यरत असलेल्या ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीया संस्थेच्या वतीने गेल्या आठवड्यात आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. या दौऱ्यात, निसर्ग आणि पर्यटनात रुची असलेल्या स्थानिक समाजघटकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी तीन स्वतंत्र पत्रकार परिषदा आणि तीन जिल्ह्यातील बावीस पर्यटन कंपन्या आणि प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. चेअरमन श्रीराम रेडीज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या दौऱ्यात संचालक आणि वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, संस्थेचे मॅनेजर विश्वास पाटील सोबत होते. चिपळूणला परतताना रात्रीच्या जेवणाचा बेत निलेशने, आमच्या परतीच्या प्रवासाचा रस्ता थोडा वाकडा करून ढेबेवाडी नजीकच्या प्रसिद्ध वाल्मिकी पठाराजवळ असलेल्या पाणेरी गावात निश्चित केला होता. ज्यांच्या घरी गेलो त्या विठ्ठल येमकर यांच्या पत्नी माळकरी असल्याने माझ्या शाकाहारी जेवणाचा प्रश्न सुटला होता. आमच्या दोघा मित्रांना मसाल्याचे वाटण नसलेल्या इथल्या खास मांसाहारी जेवणाचा, रश्याच्या आनंद घ्यायचा होता. म्हणून आमचे इकडे येणे झाले. पण या रात्रीच्या दोन तासात आम्ही इथले जे जगणे अनुभवले ते सारेच विलक्षण होते.

ढेबेवाडीनजिक पाटण तालुक्यातला वाल्मिकी पठाराचा हा परिसर. कराडहून वाल्मिकी ५० किमी आहे. कराड, ढेबेवाडी, सणबुर, पाणेरी, वाल्मिकी असा गाडी रस्ता आहे. सणबुरच्या पुढे प्रसिद्ध नाईकबा देवस्थान आहे. चांदोली अभयारण्याच्या बफर झोनमध्ये हा भाग येतो. वाल्मिकी विस्तीर्ण पठारावर आहे. त्याच्यावर अजून १०० मीटर चढाई केली की विस्तीर्ण सडे नि पवनचक्क्यांच जाळं पाहायला मिळत. आता तर पवनचक्या, सह्याद्री टायगर रिझर्व्हच्या चेकपोस्ट जवळ आपल्या स्वागताला उभ्या आहेत. शनिवार दिनांक ९ मार्च २०१९ च्या रात्री आमची गाडी जेव्हा तिथे नावनोंदणी करायला थांबली तेव्हा अंगाला स्पर्शिलेला वारा, पवनचक्यांचा कानात गुंजलेला ‘उँ उँ उँ’ असा विशिष्ट आवाज मनात तिथेच थांबण्याची इच्छा निर्माण करून गेला. वनखात्याची चेकपोस्ट सोडल्यावर, गेली अनेक वर्षे ज्याच्या दर्शनासाठी आतूर होतो त्या जरबेल (रानटी उंदीर)ची वाटेत अनेकदा भेट झाली. खूप चपळ त्यात रात्र त्यामुळे फोटो घेता आला नाही. हा उंदीर हाती लागलेलं धान्याचं अख्खं गोडावून खाली करण्याची ताकद ठेवतो. अर्थात सारं धान्य तो हळूहळू बिळात नेतो. जंगलाचा इन्सायक्लोपिडिया असलेल्या निलेशने माहिती दिली. मध्येच आकाराने काहीसे मोठे, गवताळ भागात रात्रीचे अॅक्टीव असलेले रानटी ससे (हेअर) भेटले. या दोघांचं दर्शन जाता-येता झालं. काही वेळाने आम्ही येमकर यांच्या घरी पोहोचलो. अंधाराची तीव्रता एवढी जबरदस्त की घरात लाईट पोहोचलेला असतानाही बाहेरचा काळाकुट्ट अंधार शहरी मनात धडकी भरवायला पुरेसा असलेला. घराबाहेरच्या वातावरणात प्रवेश केल्यापासून प्रत्यक्ष घरात प्रवेश करेतोपर्यंत नाकाला येणारा वास तीनदा बदलला जो नेहमीच्या शहरी परिचयातला नक्कीच नव्हता. दारातली जनावरं वाळकं गवतं, भाताचा पेंढा खात बसली होती. काही रवंथ करीत होती. आता हळूहळू यांना हिरवा झाडपाला कमी होत जाईल, आमची नजर हेरून येमकारांनी माहिती दिली. थोड्याश्या गप्पा झाल्या, वेळ कमी होता. पुन्हा चिपळूणला निघायचे होते. वाघाच्या उपस्थितीने दिव्याने दिवा लागावा तसं जंगल कसं पेटत जातं ? म्हणजे जागं होतं जातं, याची सुंदर माहिती त्यांनी दिली. घरात शेतात लागणारी हत्यारे, लाकडी नांगर, कुळव, सापत्या ठेवलेली दिसली. त्या पठारावर धनगरांची चार घरे नि तीनच माणसे होती.

काही दिवसांपूर्वीच इथे गव्याने एक बाई मारली. ती नेमकी यांच्या संबंधातली. दुपारी पाण्याला गेलेल्या त्या बाईची परतायची नि गव्याची एकाच वाटेत गाठ पडली. सध्याच्या पालावलेल्या जंगलात कुठल्याश्या झाळीत लपलेला तो गवा दुर्दैवाने तिला दिसला नाही. दोघे समोरासमोर येताच जे व्हायचं तेच झालं. जंगलातील झाडं जुनी पालवी पडून नवी पालवी अडवायला लागलीत. त्यालाच पालावलेल्या जंगलाचा काळ म्हणतात. घरी येऊन आम्ही जेवायला बसलो. निलेश आणि विश्वासराव मांसाहारावर ताव मारते झाले. तसं विशेष काही असणारही नव्हतं ! पण तरीही जे होतं आणि ज्या वातावरणात मिळालं होतं त्याला कशाचीच सर येणार नाही. दोघा मित्रांना येमकरांनी मटन वाढले. सोबतीला ते आणि त्यांचा मुलगाही बसला. आणखी एक मुलगा आणि सून माहेरी गेलेले. आम्ही आलोय म्हणून शेजारच्या घरातली बाईही इथेच आलेली. माझ्यासाठी एका बाजूला छानशी शाकाहारी पातळ भाजी बाईनी चुलीवरून आणून ठेवली. समोर एका ताटलीत तुकडे केलेल्या भाकऱ्यांचा ढीग ठेवला होता. मी आणि विश्वासरावांनी मनातून म्हटलं एवढं कधी नि कुणाला संपायचं ? पण त्या साऱ्या भाकऱ्या संपवून पुन्हा मागवाव्या लागल्या. त्या भाकऱ्या बऱ्यापैकी कडक होत्या. आपल्याकडच्या भाकऱ्या नरम होतात. म्हणून मी सहजंच विचारलं तेव्हा, ‘पीठ जरा जास्त वेळ मळलं की येते अशी भाकरी !’ अगदी सहजतेने त्या बाई बोलून गेल्या. कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न ठेवता ! मला त्यांचं वागणं मनाचा मोठेपणा सांगून गेलं. 

तिकडे मांसाहारावर ताव मारणे सुरु असताना मध्येच येमकर मला म्हणाले, ‘पाव्हणं खा दणकून....!’ त्यांचा हा आदेश चाळीशीच्या उंबरठ्यावर जगण्यापुरतं खाण्याचा विचार करणाऱ्या मला पुरता संकटात टाकून गेला. जेवणाचे काही घास पोटात ढकलतो तोच समोरचा बैल निवांत मुतला, शाकाहारी जेवणाऱ्या मला ते पटकन जाणवलं. तेवढ्यात दुसराही...! बाकी इथल्या लोकांसाठी त्यात काहीच नवीन नव्हतं. कोणाचं तिकडे लक्षही गेलं नाही. मी मात्र विचार करू लागलो. ग्रामीण भागातील संस्कृती नि त्यांच्याशी आमची असलेली एकरूपता म्हणजे काय ? ते लक्षात आलं. जंगलात फिरताना असे अनुभव अनेकदा येतात. मात्र घरातला हा माझा तरी पहिलाच अनुभव होता. निलेशच्या आग्रहाने इथला भातही आवडीने खाल्ला. जोडीला त्यानेच मागवून घेतलेलं, वेगळ्या चवीचं दही, लसणीची चटणी याने जेवणाची लज्जत अधिक वाढविली. जेवण आटपले. निलेशने मटणाची हाडं ताटाबाहेर ठेवलेली होती. विश्वासरावांची ताटात होती. घरच्यांनी ताटं उचलली. हाडं तिथंच ठेवली. मला काहीच कळेना ? मनात म्हटलं, ‘हा निलेश असा कसा ?’ तेवढ्यात तिथं दारातला कुत्रा आला नि ती हाडं खाऊन गेला, मी बघतच बसलो ! माहितीचा पुढचा अध्याय निलेशने सांगून संपवला. जेवल्यानंतर येमकर पुन्हा गप्पा मारू लागले. म्हणाले, ‘जंगलातल्या आमच्या पिढीचं निभावलं. पुढच्या पिढीचं अवघड आहे, शिक्षण गरजेचं आहे.’ त्यांचं बोलणं खरचं होतं. पण इथल्या मुलांना आम्ही जाणीवपूर्वक आत्ताचे जंगलं विषयक शिक्षण द्यायला हवे आहे, असं उगाचंच मनात वाटून गेलं.

चिपळूणजवळचं कोयनेचं वाहतं पाणी घाटावरती असतं तर इथले शेतकरी लखपती झाले असते. असं सांगताना मध्येच काही निलेश बोललाच तर येमकर त्याला, ‘हाँ...! बोल तू...!’ असा प्रतिसाद देत होते. त्यातून त्या दोघातले वर्षानुवर्षांचे संबंध सतत जाणवत होते. निघताना घरातल्या बाई म्हणाल्या, ‘या पुन्हा कुटुंबाला घेऊन !’ तर आमचा निलेश म्हणाला, ‘लॉज दाखवायला बामण आणलायं ! त्याला आवडलं तर आलोच आठवडाभर...!’ नेहमीच्या सवयीप्रमाणे निलेशने त्या जेवणाचे पैसे देऊ केले. परतीच्या प्रवासात या भागातल्या जुन्या आठवणी तो सांगत राहिला. आम्ही जमेल तेवढे प्रश्न विचारत राहिलो. रात्री अडीच वाजता चिपळूण आले. येमकरांसारख्या लोकांच्या सान्निध्यात वर्षानुवर्षे घालविलेल्या निलेशचा मला मनापासून हेवा वाटला.  

धीरज वाटेकर
विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८
dheerajwatekar@gmail.com, https://dheerajwatekar.blogspot.com


दैनिक तरुण भारत (रत्नागिरी) संवाद पुरवणी २३ मार्च २०१९
दैनिक उद्याचा मराठवाडा (नांदेड) २३ मार्च २०१९ 

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...