मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

निसर्गाचे वर‘दान’ सांभाळू या !

अधिकमास निमित्ताने...

अधिक (
पुरुषोत्तममास सुरु झालाय. भारतीय जीवनपद्धतीनुसार, या महिन्यात केलेल्या सत्पात्री दानाचे फळ शतपटीने अधिक मिळण्याची मान्यता आहे. अर्थात हे दान म्हणजे डोनेशन नव्हे ! या संकल्पनेत कोणी दिले ? काय दिले ? कोणाला दिले ? या बाबी गुप्त राहातात. गरीब, गरजूंना मदत मिळावी हा या संस्कृतीचा उद्देश ! याचा आधार घेऊन मानवाने कालौघात ग्रंथदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, विद्यादान, गोदान, कन्यादान, अर्थदान आदि संकल्पनांना महत्त्व प्राप्त करून दिलं. सध्या कोरोनामुक्त झालेल्यांकडून होणाऱ्या प्लाझ्मादानालाही विशेष महत्त्व आहे. तरीही सर्वोत्तम दान म्हणून सध्या निसर्गाकडे पाहायला हवंय. निसर्गकृपेनं, निरपेक्ष भावनेनं मिळालेल्या निसर्गदानाने मनुष्यजीवन भरून पावलं आहे. निसर्ग समतोल राखणं आपली जबाबदारी होती. इतर दानांप्रमाणे निसर्गाचं वरदानरुपी सानिद्ध्यही मनुष्याला समाधान प्राप्त करून देतं. म्हणूनच निसर्ग सान्निद्ध्याचा वसा आणि वारसा संवर्धित करत पुढील पिढीला जसाच्यातसा सपूर्द करण्यासाठी मनुष्याने अधिक मासानिमित्ताने पाऊले उचलायला हवीत.

निसर्ग म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचतत्त्वांनी बनलेली सृष्टी. निसर्गाच्या ह्याच पंचतत्त्वातून मनुष्याला जन्मदानमिळत. मेल्यावरही मानवी देह पंचतत्त्वात विलीन होतो. निसर्ग एकाचवेळी आपला गुरु, मित्र आणि डॉक्टर असतो. निसर्गाशी असलेले मानवी नाते अतूट असूनही त्याच्या जतन, पोषणासह वृद्धी करण्याचे कर्तव्यदानमनुष्य विसरला. खोल दऱ्या, निर्मळ झरे, कमळांनी भरलेले तलाव, अथांग सरोवरे, रम्य सागरकिनारे, घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे, उत्तुंग पर्वत, वाऱ्याच्या झोक्याने डोलणारी हिरवीगार सृष्टी, नारळी सुपारीच्या बागा, डोंगराआडून उगविणारा सूर्यदेव, निळ्याशार आकाशात सप्तरंगांची उधळण करणारी त्याची किरणं, ऋतुचक्र, फुलांचा सुगंध, पक्ष्यांची किलबिल आदि त्याच्याच दानाच्या छटा आपल्याला जगण्याची नित्य प्रेरणा देत असतात. ह्या निसर्गरुपी कृष्णानं आपल्यासारख्यांना न मागता भरभरून दिलं. त्या बदल्यात मनुष्याने निसर्गाला काय दिलं ? त्याने उपद्रवी प्रदूषण वाढवून निसर्ग सौंदर्याचा ह्रास केला. इमारर्तींचे टॉवर उभारून चांदोबाला लपवलं. जंगलतोड करून पर्जन्यमान अनियमित केलं. अतिवृष्टी उशाशी आणून ठेवल्या. स्वार्थलोलुपतेची पट्टी डोळ्यावर बांधल्याने निसर्ग जगला तर आपण जगूहे तत्त्व तो विसरला. जगण्यातली गंमत हरवून बसला. ‘सुखासीन जीवनयुक्त प्रगती हा त्याचा पारंपारिक स्वभाव हव्यासात बदलला. मात्र डोळ्यानेही न दिसणार्‍याकोरोनाने त्याचा प्रगतीचा अहंकार धुळीस मिळवला. कोरोना वयाने वर्षभराचाही नाही. जगाकडे  त्याच्याविरुद्ध लढण्याची निश्चित व्यवस्था नाही. अंदाजांच्या आधारे उपचार सुरु आहेत. ‘रोग प्रतिकारशक्तीशब्दाला मागणी वाढली आहे. निसर्गाचा ह्रास धोकादायक स्थितीत आलेला असला तरी त्याची प्रतिकारशक्ती मानवापेक्षा कित्येकपट असल्याचे लॉकडाऊनमध्ये दिसून आले. मानव बंदिस्त होताच निसर्गाने वातावरणाला स्वच्छ बनविले. याकाळातली भारतातील वातावरणाची २०१६ आणि २०२० मधील दोन छायाचित्रे नासाने प्रसिद्ध केली. वैज्ञानिकांनी छायाचित्रांद्वारे भारतात धूळ-मातीसह इतर प्रदूषणाचा स्तर कमी झाल्याचे निदर्शनास आणले. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील एका गावातून लोकांना हिमालयाचे पूर्वी न होणारे दर्शन याकाळात झाले. अधिक मासापासून अंगच्या वाईट सवयी त्याग करून विशेष संकल्प सोडण्याची परंपरा असल्याने, ‘निसर्ग आहे तसाच ठेवाया उक्तीनुसार आपण विचार करायला हवा.

मेडिकल सायन्स प्रगत असताना कोरोना विषाणू झपाट्याने लोकांचा जीव घेऊन गेला. हा निसर्गाचा Balancing Act (समतोल) ठरावा. ज्या महाराष्ट्राला आपण देशातलं विकसित राज्य म्हणतो तिथं सर्वाधिक धरणं असूनही सिंचनाखालची जमीन कमी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भूजलातली घट, पाण्याच्या समस्या, वाळवंटीकरणासह कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यूची आकडेवारीही इथेच सर्वाधिक दिसतेय. तरीही आमचा विकास सुरु आहे. घराघरातील मनुष्याला, आयुष्य स्वत:साठी नसून इतरांच्या सेवेसाठी असल्याचा धडा कोरोनाने शिकवला. मानव `जीवो जीवस्य जीवनम म्हणत दोन वेळचं अन्न आपल्यापर्यंत कसं येईल ? ह्याच्या काळजीत दिसला. निसर्ग आपल्याला जगवतो आहे हे यंत्रयुगात झाकोळलेले सत्यकोरोनाने उघड केले. कोटय़वधी वर्षांपासून मानवी जीवनाच्या आधार असलेल्या नद्यांची जंगल (अॅमेझॉन) आम्ही पैशांसाठी जाळली. मिठी, गंगा, यमुनांपासून सगळ्या नद्यांत रसायने आणि घाण ओतली. आम्ही माणसं पृथ्वीवर राहायला नालायक आहोत. कोरोना हा आम्हां उन्मादलेल्यांना निसर्गाने दिलेला शेवटचा इशारा असेल का ? शाळेत शिकत असताना दरवर्षी इंद्रधनुष्याची कमान दिसायची. नकळततानापिहिनिपाजा उजळणी व्हायची. आज तेही प्रमाण कमी झालं. निसर्गाने सौंदर्याचा साक्षात्कार घडवित निर्माण केलेल्या रंगछटा पाहाताना मानवी डोळे थकून जायचे, पण छटा संपायच्या नाहीत. मानवी शरीरालगत ऊर्जेचं वलय (ऑरा) असतं. प्राचीन योगशास्त्राच्या अभ्यासातून आपण याचं महत्व समजू शकतो. आपल्या विचारांचा वलयावर परिणाम होतो. हे वलय स्वच्छ आणि सक्षम असेल तर त्याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो. हे तेजोवलय आपली पर्सनल सिग्नेचरअसून त्याच्या उन्नतीतही निसर्गाची भूमिका महत्त्वाची असते. निसर्गाने जे जे जन्माला घातलं त्या प्रत्येकाला नियम घातले. आम्ही हव्यासापोटी नियमांचं उल्लंघन केलं नि कोरोना भेटीला आला. कुठंतरी वाचलेलं, पूर्वी म्हणे समुद्रकिनारी वाळूऐवजी मीठ पसरलेलं होतं. समुद्राचं पाणी अमृतासारखं गोड होतं. सजीवांची तहान भागवण्यासाठी या पाण्याचा उपयोग व्हायचा. मानवी उत्कांतीत अन्नाला चव यावी म्हणून मिठाचा सुरु झालेला मोजका वापर  नंतर हव्यासात बदलला. या क्रियेला निसर्गाने प्रतिक्रिया दिली. मीठ समुद्रात वाहून गेले, फक्त वाळू उरली. समुद्राचे पाणी खारे झाले. आज खारं पाणी प्रक्रिया करून मानव पिण्यायोग्य बनवतोय. कदाचित वृक्षतोडीचंही असंच होईल म्हणून निसर्गदानसंकल्पनेचं महत्त्व समजवून सांगायला कोरोनाआलाय.

निसर्गाल गृहीत धरून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याची कल्पना आपण कशी करू शकतो ? निसर्गाने दिलेलं दान जपत जगण्या-वागण्यातून ते संवर्धित करण्याकामी आपण स्वतःला समर्पित करायला हवंय. विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या शाखा कितीही छाटण्याचा प्रयत्न केला तरीही त्या नव्याने उगवतात, आपलं दान मानवाच्या पदरात टाकतात. निसर्गाच्या सानिद्धयात मानवाला मिळणारं समाधान हेही निसर्गाच्या निर्हेतुक ओंजळीतून निसटलेलं दानच ! विनोबांची भूदानचळवळ सर्वश्रुत आहे. अधिक मासातील दानामागे वैज्ञानिक सूत्र, सामाजिक आशय आणि नैतिकता गुंफलेली आहे. दानामुळे संबंधित वस्तूवरील आपला हक्क समाप्त होऊन दुसऱ्याचा स्थापित होतो. घेणाऱ्यावर कोणत्याही प्रकाराचे उपकार न राहाता केलेलं दान सात्त्विक समजतात. याकारणे श्रद्धा, तुष्टि, भक्ती, ज्ञान, अलोभ, क्षमा आणि सत्य या सात गुणांची रुजवात आपल्या व्यक्तिमत्त्वात होत राहाते. भारतीय जीवनपध्दतीत यांचे महत्त्व विशेष असल्याने आपण निसर्गाला आहे तसा ठेवण्याची अभयशपथ घ्यायलाच हवी !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

ऑनलाईन पोर्टलवर लेख प्रसिद्ध झालेल्या लिंक्स :

https://www.khabarbat.in/2020/10/environment.html

https://kokanmedia.in/2020/10/04/nisarga-2/

केळशी (दापोली) येथील निश्चित कालमापन असलेली
जगातील पहिली त्सुनामी निर्मित वाळूची टेकडी (१५२४)


धामणदेवी (खेड) येथील खाडीकिनारा  सूर्यास्त

     
पालशेत (गुहागर) येथील अश्मयुगकालीन गुहा

                                                      चिपळूण तालुक्यातील कळमुंडी देवराई

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

अण्णा, ‘शतायुषी’ व्हा !

कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन-संवादासाठी प्रसिद्ध असलेले अण्णा शिरगावकर ९१व्या वर्षात (५ सप्टेंबर २०२०) पदार्पण करीत आहेत. कोरोना संक्रमण काळात बोलताना अनेकदा अण्णा व्यथित झालेले जाणवले. सतत माणसांत वावरलेल्या अण्णांना ‘लॉकडाऊन’ मधला एकटेपणा असह्य करून गेला. दोन दिवसांपूर्वी बोलताना म्हणाले, ‘काल ... हे गेले. ...तेही गेले. आमच्या वयाची बरीच माणसं जात आहेत. वाईट वाटतं. आता शुभेच्छानी काय करायचं आहे ?’ आपल्या या बोलण्याला मध्येच ब्रेक देऊन अचानक त्यांनी ‘कोरोनामुळे वेळ वाया जातो आहे’, या पूर्वीच्या अनेक संवादातील विधानाला पूरक असलेलं, ‘कामे पडली अनंत | वेळ मात्र मर्यादित || म्हणुनी व्यर्थ गप्पात | कालक्षेप न की जे ||’ हे वचन ऐकवलं. तेव्हा त्यांच्या याही वयातील वैचारिक सक्रीयतेचा हेवा वाटला. त्याच जाणीवेतून लिहिलेलं अण्णांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारं हे ‘शब्दपूजन’ !

दोन वर्षांपूर्वी, अण्णांनी प्रकृती अस्वास्थ्याने जगप्रसिद्ध दाभोळमधील आपल्या 60 वर्षांच्या वास्तव्याला पूर्णविराम दिला. त्यांनी आपला मुक्काम नोव्हेंबर २०१८ पासून चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे आपल्या कन्येकडे हलविला. १९६० मध्ये ते दाभोळला वास्तव्यास आलेले. दाभोळमधील सहा दशकात त्यांनी कोकणच्या इतिहासाला अनेक नवे संदर्भ उपलब्ध करून दिले. एखाद्या छोट्याशा ओव्हळामधील माशाला नदीचा पत्ता गवसावा तसे काहीसे विसापूरहून दाभोळला आलेल्या अण्णांचे त्याकाळी झाले. कारण दाभोळ ही प्राचीन नगरी ‘दालभ्यपूरीहोती. दाभोळच्या डोंगरावरून दिसणारा बंदराचा नजराणा, धक्क्यावरील आदिलशहाच्या बीबीची अर्थात मॉंसाहेबांची मशीद, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला, तांबड्या रंगाच्या मंगलोरी कौलांची घरं, खाडीपासून समुद्रापर्यंत पसरलेले माडांचे बन हा सारा नजराणा आणि त्यातच दाभोळ बंदरातून पैलतीरी वेलदूरला जाणारे मचवे, लॉंचेस होड्या आणि डुगडुग्या या सार्‍यांचे नजरेत सामावणारे चित्र पाहाण्याचा योग दाभोळच्या डोंगरावर जुळायचा. याच वातावरणात अण्णांच्या संशोधन आणि संग्राहकवृत्तीला खतपाणी मिळाले. दाभोळच्या खाडीला येऊन मिळालेल्या वाशिष्ठीच्या दोनही तीरावरील सांस्कृतिक, सार्वजनिक आयुष्यात अण्णा आयुष्यभर वावरले. गेली ७५ हून अधिक वर्षे डायरी लेखन करीत राहिले. बेताची आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी आयुष्यात असंख्य छंद जोपासले. अपरान्ताच्या साधनांसाठी ५० हून अधिक वर्षे डहाणूपासून कारवारपर्यंत धावपळ केली. दुर्मीळ वस्तूंचा संग्रह केला. वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन, वागण्यातील वक्तशीरपणा हे त्यांच्या कार्यपद्धतीतील आवर्जून दखल घेण्याजोगे गुण ! छंदी व्हा !हा विषय घेऊन लायन आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालयातून अण्णा महाराष्ट्रभर फिरले. ज्यातून असंख्य संग्राहक, अभ्यासकांनी प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याला छंदांची सुगंधी किनार प्राप्त करून दिली.

एकविसाव्या शतकात, कोकणला आठ हजार वर्षापूर्वीचा प्राचीन इतिहास असल्याचे पुरावे उपलब्ध होत असताना काही दशकांपूर्वी, ‘कोकणला प्राचीन इतिहास नाहीहे शासकीय तज्ज्ञांचे म्हणणे ९ ताम्रपटांचा शोध घेणाऱ्या अण्णांनी आपल्या मेहनतीने खोडून काढले. कोकणचा स्वाभिमान जागवत, इतिहासाला कलाटणी देण्याचे काम केले. सतत धडपडणार्या माणसाचे आयुष्य जगत शिक्षणाचा अगर वडिलोपार्जित कर्तृत्वाचा वारसा नसताना आपल्या अभ्यासूवृत्तीने ते कोकण इतिहास संशोधनाच्या माध्यमातून जगभर पोहोचले. आजही कै. सौ. नंदिनी काकींच्या पश्चात वयोमानानुसार थकलेले अण्णा उपलब्ध वेळेत समाजालाअधिकचे काही देता येईल का?’ याच्याच विचारात असलेले अनेकांनी पाहिलेत. खरंतर सच्च्या इतिहासकाराबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे इतिहासकार फक्त अस्सल पुराव्यांच्या आधाराने बोलतात. मूळ नकाशे, आकडेवारी यांची सोबत आपल्या बोलण्यात घेतात. विषयाच्या अभ्यासातील अपुर्या जागा वास्तववादी तर्क लावून भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. कधी-कधी बखरीचाही आधार घेतात. भूतकाळाचे आकर्षक किंवा भावनोत्कट चित्र रंगवत नाहीत. अशा संवादातून माणसाची भूतकाळाबाबतची जाण वाढते. भूतकाळ साक्षात जीवंत करून त्याची वर्तमानाशी सांगड घालीत भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न असे इतिहासकार करतात. आदरणीय अण्णा आम्हाला अशा पठडीतील वरच्या श्रेणीचे वाटतात. अण्णांनी आपल्या आयुष्यात शिक्षण, सहकार, कामगार, ग्रामीण विकास, वाचन संस्कृती, अपंग संस्था, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र आणि कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध या विषयात मैलाचा दगड ठरणारे कार्य उभे करून ठेवले. राजकारणासारख्या विषयात माणूस एकदा अडकला की प्रसिद्धीचे वलय, कार्यकर्त्यांचा गोतावळा या सार्यातून दूर जाणे अवघड असते. अण्णांनी वयाच्या पन्नाशीनंतर जाणीवपूर्वक राजकारणातून समाजकारणात स्वतःला वाहून घेतले. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून सन १९८३ मध्ये त्यांनी सागरपुत्र विद्या विकास संस्थास्थापन केली. सारा अपरान्त पायी तुडवून इतिहासाची अनेक साधने गोळा केली. ताम्रपट, लहान-मोठ्या तोफा, जुनी कागदपत्रे, पोथ्या, शिलालेख, तलवारी, बंदुका, खंजीर, जुनी नाणी, अनेक लहान-मोठ्या मूर्ती, सनदा, जुनी नक्षीदार भांडी आदि वस्तूंचा या साधनांमध्ये समावेश होता.  त्याकाळी दाभोळसारख्या फारशा सोयीसुविधा नसलेल्या गावातून एखाद्या छंदामागे बेभान धावत आपले कार्य सिद्धीस नेणे ही मोठी गोष्ट आहे. इतिहास हा कधीच कल्पित नसतो. तो कागदपत्रांवर आणि पुराव्यांवर आधारित असतो, हे अण्णांनी खूप अगोदरच निश्चित केल्याचे त्यांचा संग्रह अभ्यासल्यावर लक्षात येते. म्हणूनच अनेक अभ्यासकांना हृदयाला जागे करणारा स्वच्छ प्रकाश त्यांच्या मार्गदर्शनातून प्राप्त झाला आहे.

अण्णांच्या संशोधन कार्याने प्रेरित होऊन इतिहासाचे अनेक अभ्यासक दुरदूरहून आज शिरगावलाही येतात. अण्णा कोणालाही इतिहासात रमून जायला सांगत नाहीत. ‘इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे’, हे त्यांचे सांगणे असते. गेल्यावर्षी त्यांनी, ‘एखाद्या गावाकडे पाहाण्याची संशोधकदृष्टी किती चिकित्सक असू शकते याचा आदर्श वस्तूपाठ घालून देणारा दाभोळमधील ६० वर्षांच्या वास्तव्याचा आलेख प्रकाशित केला. एखाद्या गावाची तटस्थपणे चिकित्सा करताना किती संदर्भ विचारात घेता येतात याचीही जाणीव व्हावी. आयुष्याच्या अगदी सुरूवातीला आपल्याला नक्की काय हवंय ? याचं मर्म उमजल्याने आयुष्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून टाकीत जगाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध मार्गावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वतःला आनंद देणार्‍या निरूपद्रवी छंदांसोबत आयुष्य जगलेल्या अण्णांनी १४ पुस्तकांचे लेखनही केले आहे. पायाच इतिहासाचा असल्याने त्यांच्या लेखनात व्यापक संदर्भ, तत्वज्ञान, सखोल चिंतन, सूक्ष्म विश्लेषण भेटते. ९१ व्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने अण्णांमधील अद्वितीय छंदवेड्या संशोधकाला मनःपूर्वक दंडवत !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

अण्णा शिरगावकर यांच्या छंदांविषयी आणि शेवचिवडा/व्रतस्थ या दोन पुस्तकांची ओळख करून देणारा लिहिलेला लेख वाचण्यासाठी खालील लिंक पाहा !

https://dheerajwatekar.blogspot.com/2017/04/blog-post.html

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/04/blog-post_86.html

(अण्णा शिरगावकर यांचा पत्ता  आणि  संपर्क क्रमांक: c/o सौ. रिना रविंद्र लब्धे, नूतन बंगला, शिगवण महाराज मठाजवळ, मु.पो. शिरगाव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी . ९५५२३३४४६५, ९९७५१६६८६५)

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

शिंदेसर गेले आणि भीमाशंकर राहिलं !

‘भीमाशंकरला माझ्याकडे फार मोठी टीम नाही. परंतु सर्वांच्या सहकार्याने तिथे पर्यावरण संमेलन शक्य आहे. तुम्ही सगळे सहपरिवार भीमाशंकरला या. तुमचे स्वागत आहे.’ या शब्दांना आता आम्ही पर्यावरण मंडळाचे सारे सदस्य कायमचे पोरके झालोय. भीमाशंकरजवळ, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वास्तव्याला असलेले, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ’ संस्थेचे कार्याध्यक्ष गोरखनाथ दगडू शिंदे (सर) यांचे १७ ऑगस्टला ‘कोरोना’ने निधन झाले. पुणे जिल्ह्याच्या इतिहासात, शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आयुष्यभर सक्रीय सेवा बजावलेल्या शिक्षकाला जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याची दुर्मीळ नोंद कर्तृत्वाने आपल्या नावावर करणारे शिक्षक ही खरे तर शिंदेसरांची योग्य ओळख होती. मूळचे रांजणगाव मशीद (पारनेर-अहमदनगर)चे रहिवाशी असलेले, शिंदेसर (वय ६१) शिक्षकीपेशाकारणे आंबेगाव (पुणे) भागात शेवटपर्यंत कार्यरत राहिले.

निवृत्त होऊन त्यांना तीनेक वर्ष झालेली. वेगवेगळ्या सामाजिक कामात स्वतःला गुंतवून घेतलेले असल्याने कोरोना काळातही ते जन्मभूमी ते कर्मभूमी असा सतत प्रवास करत राहिले. निधनापूर्वी १५ ऑगस्टला मूळगावी ध्वजवंदन करून ते महाळुंगेला-पडवळ (आंबेगाव) येथे हुतात्मा बाबू स्मारकामध्ये बैठकीला आलेले होते. मागच्या मार्च महिन्यापासून, ‘जनता कर्फ्यू काळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्वांचे आभार ! कोरोना हटाव ! कोरोना नसता तर आपण राळेगणसिद्धी येथे भेटलो असतो ! कोरोना मुक्तीनंतर कोकणात येणार आहे !’ असा सततचा संवाद साधणाऱ्या सरांच्या पाठीमागून बहुदा ‘कोरोना’काळ धावत असावा. १६ ऑगस्टच्या दुपारी त्याने सरांना गाठलं. सरांना अस्वस्थ वाटू लागलं. मुलगा अवधूत आणि छोटे बंधू नंदकुमार (मो. ०९२२६३५८८७६) यांनी त्यांना सुरुवातीला पारनेर आणि नंतर अहमदनगर मधील हॉस्पिटलला दाखल केलं. दुर्दैवाने त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि पुढं सारं बिनसत गेलं. १७ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता सरांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यव्यापी उपक्रमांच्या निमित्ताने मोजक्याच परंतु प्रभावी गाठीभेटी घडत असल्याने ते महाराष्ट्रभर परिचित होते. भूतान आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यातील त्यांचे आपलेपणाचे वागणे आठवून आज अनेकजण व्याकूळ होतात. अर्थात सरांच्या कुटुंबाशी सर्वांचा फारसा संबंध असण्याचं कारण नव्हतं. म्हणूनच हा माणूस आम्हाला सातत्यानं ‘भीमाशंकर’ भेटीचं निमंत्रण देत राहिला असावा. ‘पर्यावरण’ धाग्याने जोडलेल्या आमच्यासारख्या राज्यभरातील अनेक सहकाऱ्यांना ते गेल्याची घटना कळली तेव्हा रात्रीचे १० वाजून गेलेले. जो तो झोपायच्या तयारीत असलेला. सध्या ‘कोरोना’मुळे अशावेळी कोणाला फोन करताना वा आलेला उचलता मनात शंका येते. म्हणून एका सहकाऱ्याने वैयक्तिक व्हॉट्सअप मेसेज केला. लिहिलं होतं, ‘भीमाशंकरच्या शिंदेसरांचे निधन !’ मेंदूला काही कळायच्या आतच मेसेज करणाऱ्याला फोन लावला. बोलणं झालं. मेसेज खरा होता. एव्हाना मंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरही चर्चा सुरु झाली. कोरोना दिवसागणिक अस्वस्थता वाढवत असल्याची जाणीव झाली.

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा आणि पारनेर सीमेवरच्या गावात प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेल्याने त्यांना शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात भेटलेले मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेबांच्या सहवासाने, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्यातल्या पर्यावरण विषयक कल्पनांना राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले. मंडळाचे उपाध्यक्ष जयसिंगराव जवक हेही त्यांचे बालपणीचे मित्र होत. आबासाहेबांचा आणि त्यांचा परिचय सन १९७२ पासूनचा. बी.एड. झाल्यावर १९७७ साली एम.ए.च्या नोट्स घेण्याकारणे ते आबासाहेबांच्या अधिक जवळ आले. चिपळूणला, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे ‘चौथे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन’ (नोव्हेंबर २०१९) घेतल्यानंतर कोरोना लॉकडाऊन संकल्पनेची भारतात रुजवात होण्यापूर्वी जागतिक वन आणि जल दिनाचे (२१ आणि २२ मार्च) औचित्य साधून मंडळाने राळेगणसिद्धी येथे ‘पाणी व्यवस्थापन कार्यशाळा’ घेण्याचे निश्चित केले होते. कोरोनाविषाणूच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कार्यशाळा नियोजन रद्द करताना आपल्याला यात आपला सहकारीही गमवावा लागू शकतो याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. पण दुर्दैवानं तेच घडलं. चिपळूण पर्यावरण संमेलनातील संमेलनाध्यक्ष डॉ. उमेश मुंडलेंपासून उद्घाटक भाऊ काटदरे (खवले मांजर तज्ज्ञ कमिटी सदस्य, आय.यु.सी.एन. स्पेसीज सर्व्हायव्हल कमिशन), स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज, निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, नामवंत इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे, गेली २५ हून अधिक वर्षे सह्याद्रीत डोळस भटकंती करणारे नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट आदिंची अभ्यासपूर्ण सत्रे ऐकून ‘चिपळूणनगरी बहुआयामी आहे’ असे त्यांनी म्हटले होते. पर्यावरणासह सांस्कृतिक, सामाजिक, सामुदायिक हिताची जपणूक झाली पाहिजे या मतासाठी आग्रही असलेले शिंदे सर जीवनभर हे तत्त्व जपताना, जगताना दिसले.

मागच्या १२ मार्चला कर्नाटक प्रवासात, मला पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. पण मला खरोखर हा पुरस्कार काय असतो याची कल्पना नाही’, अशी पहिली प्रतिक्रिया देणाऱ्या १०६ वर्षीय पद्मश्री सालू मरदा थिमक्का यांचे दर्शन त्यांनी घेतले होते. त्यांच्या पी.ए. सोबत चर्चाही केली. तसं आम्हाला कळवलंही ! मागच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जंगल संपत्तीचं संवर्धन करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत प्रतिनिधींचा सन्मान केला होता. सतत कार्यरत असलेल्या शिंदेसरांचा धडधाकट फिटनेस पाहाता ते गेल्याच्या वृत्तावर कोणाचा विश्वास बसेना. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अहुपे, राजपूर आदि तीन ठिकाणी त्यांनी आपला सेवाकाळ पूर्ण केला. ‘आम्ही शिंदेसरांना वर्गात कधीही बसून शिकविताना पाहिलेलं नसल्याची भावना त्यांच्यासोबत काम केलेले शिक्षक भांगे यांनी बोलून दाखविली. आपल्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय, शैक्षणिक आणि आर्थिक मदत करण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याचीही उदाहरणे आहेत. सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराला त्यांचा कायम विरोध राहिला. कदाचित यामुळे सेवाज्येष्ठता असूनही मुख्याध्यापक पदाने त्यांना हुलकावणी दिली. सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींशी त्यांचा चांगला संपर्क होता. आपल्या मोबाईलमध्ये विविध क्षेत्रातील सुमारे अडीच हजाराचा जनसंपर्क घेऊन जगणारा हा सेवेशी एकरूप झालेला अवलिया होता. युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, आंबेगाव भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि श्रीशारदा प्रबोधिनी पिंपळगाव (घोडे) संस्थेशी त्यांचे स्नेहबंध होते. अनेक ठिकाणी त्यांनी सढळहस्ते देणग्याही दिलेल्या. डिंबे (आंबेगाव) धरणाजवळ असलेल्या महाळुंगे बुद्रुक गावच्या जि. प. शाळेत त्यांच्या पत्नी श्रीमती चंद्रकला शिंदे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मोठा मुलगा प्रतिक आय.टी. इंजिनियर असून बेंगलोरला असतो. दुसरा अवधूत हा मुंबई एअरपोर्टला इमिग्रेशन ऑफिसर असून त्याचं मागच्या २६ जुलैला लग्न झालेलं होतं. मूळगावी, रांजणगाव मशीद येथे वृद्ध आईवडील आणि भाऊ नंदकुमार शिंदे आणि त्यांचे कुटुंब वास्तव्याला असते. तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यावर शिंदेसर दोन्ही भागाशी सततचा सामाजिक संपर्क ठेऊन होते. निधनानंतर दोन दिवसांनी मोबाईलवर जेव्हा आमचं त्यांच्या धाकट्या बंधूंशी, नंदकुमार शिंदे यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते ‘अस्थी’ ताब्यात घ्यायला अहमदनगरला निघालेले. आम्हांला त्यांच्याशी काय बोलावं हेच कळेना. नंदकुमार बोलले, ‘सर खूप मोठा धक्का बसला हो ! खूप मोठा धक्का बसला. आता त्यांच्या अस्थी आणायला चाललोय !’ वृद्ध आईवडील आणि कुटुंबातील जबाबदार मोठा घटक म्हणून सांभाळलेल्या साऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या शिंदेसर आपल्या धाकट्या भावाकडे देऊन निघून गेले. पुढचं बोलणं आम्हाला नीटसं ऐकू आलं नाही. फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत राहिला. काहीही बोलायला सुचलं नाही. काही सेकंदानी फोन कट झाला.

               वयात जवळपास वीस वर्षांचे अंतर असताना शिंदेसर आम्हाला ‘सर’ म्हणायचे तेव्हा अवघडायला व्हायचं. एकदोनदा त्यांना तसं सांगूनही पाहिलं, पण त्यांनी ऐकलं नाही. आमच्या लेखनाला दाद देणाऱ्या मोजक्या प्रतिक्रियांमधली एक प्रतिक्रिया त्यांची असायची. ‘असेच लेखन आपल्या हातून होवो’, म्हणत अनेकदा ते जबाबदारीची जाणीव करून द्यायचे. आबासाहेबांनी २००४ साली नोंदणीकृत केलेल्या पर्यावरण मंडळाचे ते विश्वस्त होते. त्याच नात्याने आबासाहेबांकडून एखादा मुद्दा मान्य करून घेण्यासाठीच्या चर्चेतला हक्काचा मध्यस्थ आधार म्हणजे शिंदेसर होते. कोरोना काळात जून-जुलै महिन्यात मंडळाने राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यावेळेस विलास महाडिक, प्रमोद मोरे आदि आम्हा सहकाऱ्यांजवळ त्यांनी, ‘मंडळाचा विस्तार होतो आहे. आपण सक्रियपणे आबासाहेबांना साथ देता आहात. याचा आनंद वाटतो आहे.’ अशा भावना व्यक्त केलेल्या. नव्या दमाच्या कार्यकारिणीसोबत काम करण्याच्या त्यांच्या आनंदाला ‘कोरोना’ने सुरुंग लावला. त्यांचे जाणे आम्हा निसर्ग व सामजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या टीमसाठी अत्यंत वेदनादायी आहे. गोरखनाथ शिंदेसरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

 

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.         

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com


भूतान निसर्ग अभ्यास दौऱ्यात विदेशी पर्यावरणप्रेमींशी संवाद साधताना 
वृक्षमित्र आबासाहेब मोरे आणि गोरखनाथ शिंदे



राळेगणसिद्धी येथील पर्यावरण संमेलनप्रसंगी डावीकडून गोरखनाथ शिंदे, 
वृक्षमित्र आबासाहेब मोरे आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे आदि.


साप्ताहिक चपराक पुणे लिंक 
https://chaprak.com/2020/08/shinde-sir-gele-aani-bhimashankar-rahile/

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

लाभो सर्वां निरोगिता


गणेशोत्सवाशी कोकणवासियांचे जीवाभावाचे नाते आहे. इथल्या माणसांना बाप्पा आपल्या घरातला वाटतो. ही माणसं बाप्पाची नुसती पूजाअर्चा नि आरत्या करत नाहीत. तर तो असेल तितके दिवस त्याच्याशी संवाद करत राहतात. त्याला आपली सुखदु:खे सांगतात. नवस-सायास करतात. वर्षभराची उर्जा उरी साठवून आपलं जीवन जगायला सिद्ध होतात. येणाऱ्या संकटांवर मात करत राहातात. कदाचित म्हणून कोकणी माणसं आत्महत्या करत नाहीत. गेल्यावर्षी ३ जून (२०२०) ला कोकण किनारपट्टीवर धडकलेलं निसर्ग चक्रीवादळ, यावर्षी (२०२१) आलेलं तोक्ते चक्रीवादळ आणि जुलै २०२१ मधल्या अतिप्रचंड महापूराने या माणसांच्या मागच्या ५/२५ वर्षांच्या मेहनतीवर कुऱ्हाड फिरवलेय. त्यातच गेली दोन वर्षे आलेलं ‘कोरोना’चं संकट वैश्विक आहे. शंभर वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या प्लेगच्या महामारीचं वर्णन, ‘एकाची तिरडी पोचवून परतलो की दुसऱ्याची बांधायला लागायची’ अशा शब्दात केलेलं आहे. ‘कोरोना’ची भयावहताही कमी नव्हे ! तरीही अनंत यातायात अडचणींना तोंड देऊन कोकणी माणूस घराघरात पोहोचेल. मर्यादित उपस्थितीत का होईना, ‘लाभो सर्वां निरोगिता’ असं साकडं आपल्या लाडक्या बाप्पाला घालताना दिसेल !

जगभरातला माणूस हा कायद्यापेक्षा संकल्पनाच्या अधीन राहून जगत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बुद्धीप्रामाण्यवादाच्या नावाने श्रद्ध माणसाला कितीही अंधश्रद्ध ठरविण्याचा प्रयत्न झाला तरीही तो ऐकत नाही. कितीही त्रास झाला तरी कालानुरूप व्यवहार्य बदल स्वीकारून तो पुढे सरकत राहातो. यंदा कोरोना काळात कोकणात आपल्याला याचा अनुभव येतो आहे. कोकणातल्या माणसाची गणेशोत्सवाशी नाळ पारंपारिक जुळलेली असल्याने त्याचे या काळातले वर्तन निवळ कायद्याने नियंत्रित होऊ शकत नाही. असंख्य अडचणी असतानाही मनुष्य आपल्या ठरवलेल्या तत्वाने जगतो, वागतो कारण त्यात त्याचा आनंद सामावलेला असतो. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा (५ ऑगस्ट २०२०) जल्लोष देशभर साजरा होत असताना कोकणसह राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होऊन पूर आलेला होता. अशातच त्या दिवशी दुपारी रत्नागिरी तालुक्यातल्या तोणदे गावातील श्रीसांब मंदिरातल्या श्रावण नाम सप्ताहाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. कौलारू मंदिरात छातीपर्यंत पाणी भरलेले असताना छताच्या आढ्यावर बसून भाविक श्रीनामाच्या गजरात दंग झालेले अनेकांनी पाहिले. कोकणातल्या उत्सवी उत्साहाची ही प्रातिनिधिक अनुभूती होती. हिंदू जीवन पद्धतीत मानवाला विष्णू चरित्र आवडल्यास त्याला वैष्णव होता येते. शिवाची उपासना केल्यास शैव होता येते. तसेच रामाची उपासना केल्यास रामभक्त, गणरायावर प्रेम केल्यास गाणपत्य होता येते. मूळ हिंदूजीवन पद्धतीचा त्याग करावा लागत नाही. ही फार मोठी वैश्विक उपलब्धी यात सामावलेली आहे.

                    सन १८९३ ला झालेल्या हिंदू मुसलमानांच्या मोठ्या दंग्यावर विचारविनिमय करण्यासाठी पुण्यात वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी भरलेल्या सभेत घरगुती गणेशोत्सव सार्वजनिक करण्याची कल्पना पुढे आल्याची नोंद ‘गणेशोत्सवाची साठ वर्षे’ या ज. स. करंदीकर यांनी १९५३ साली संपादित केलेल्या ग्रंथात भेटते. लोकमान्यांनी २६ सप्टेंबरला दैनिक केसरीतून या कल्पनेचे कौतुक केले. १८९४ ला स्वत: राहात असलेल्या श्री. सं. विंचुरकर यांच्या वाड्यात त्यांनी १० दिवसांच्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. उत्सवातून धार्मिक समतोल राखण्याबरोबर लोकसंघटन आणि संघटनेतून सबळीकरण होईल या सामाजिक मानसशास्त्राचा विचार करून लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पनेला व्यापक स्वरूप दिले. गणेशोत्सवाला ज्ञानसत्राची जोड दिल्याने ते चळवळीचे साधन ठरले. कोकणात मुरुड (रायगड) गावी श्रीमंत ताईसाहेब बाळ यांचे चिरंजीव बापूराव यांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. मेळे, मंत्रजागर, भजन, दुर्वांची सहस्रनामे असे कार्यक्रम होऊन समुद्रकिनारी बाप्पाचे विसर्जन होई. उत्सवातील मेळ्यांतून ज्ञान मिळे. मेळ्याच्या पदांनी सामाजिक आणि धार्मिक गोष्टी अंतकरणाला भिडत. ‘पैसाफंड’सारखी उपयुक्त संकल्पना कै. अंताजी दामोदर काळे यांनी १८९९ च्या दुष्काळाच्या वेदना अनुभवल्यावर याच उत्सवात सुरु केली. त्यावर्षी देवगडला १८९९ ला विठ्ठल मंदिरात खांबेटे, सदाशिवराव तांबे, रामभाऊ लेले वकील यांची व्याख्याने झाली होती. कर्जत, राजापूर, रत्नागिरीत सन १९०० मध्ये, चिपळूण, पेणला सन १९०५ पासून उत्सव सुरु झाला. आमचं मूळगाव असलेल्या केळशीत (दापोली) प्लेगची साथ आली होती. तेव्हा ग्रामस्थांनी गावातील भैरीबुवाला गाऱ्हाणे घातले होते. देवळात सात दिवस अखंड नामसप्ताहकेला होता. प्लेगची साथ क्षमली आणि नामसप्ताहाची प्रथा सुरु झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे सन १९०८ साली मिठगावणे (राजापूर) येथील उत्सवात आपापसातले कब्जे सरकारात न्यायचे नाहीत. गुरे कोंडवाड्यात पोचवायची नाहीत. अशा शपथ लोकांनी घेतल्या होत्या. मद्यपानाविरुद्ध चळवळ करण्याचे लोकांनी ठरविलेले होते. आपल्यातील राष्ट्रीय गुण लोप पावत चालले असताना निरुपद्रवी असणं हा राष्ट्रीय दुर्गुण असल्याची जाणीव करून देत राष्ट्राचे काम आपणच केले पाहिजे या विचाराचे राष्ट्रीय गुण लोकांच्यात यावेत असं शिक्षण उत्सवातून लोकांना दिलं जाऊ लागलेलं. सध्याच्या कोरोना महामारीची मूळ समजून घेऊन यंदाच्या उत्सवातही लोकांनी अशाच मातृभूमी संरक्षण आणि संवर्धनाच्या शपथा घ्यायला हव्या आहेत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानवी कार्यक्षमता डिस्चार्ज होऊन काहीवेळ स्वतःला शटडाऊन करण्याची वेळ येते तेव्हा या बाप्पाचं येणं इथल्या माणसाला मानसिक बळ देत असत. याची निश्चित जाणीव असल्यानं स्वतःच्या जीवाचे अतोनात हाल सहन करून चाकरमानी कोकणात पोहोचतात. गेली दोन वर्षे या त्रासाला ‘कोरोना’ची दुर्दैवी किनार आहे. चाकरमान्यांनी गणपतीसाठी येण्यापूर्वी विचार करावा असं कितीही म्हटलं गेलं तरीही कोकणात लोकं आली आहेत. अर्थात त्यांच्या येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटलं आहे. दरवर्षी कोकणात जाण्यासाठी गाड्यांची बुकिंग ४/६ महिने अगोदर सुरु होतात. कितीही व्यवस्था केली तरी अपुरी पडते हे वास्तव माहित असताना प्रवास करण्यासाठी आवश्यक ई-पास, वैद्यकीय तपासणी आदिंबाबत वेळेत पुरेशी स्पष्टता मिळवून देण्यास सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अयशस्वी ठरल्याच्या तीव्र भावना चाकरमान्यांच्या मनात गेल्यावर्षी होत्या. यंदाही टेस्ट होणार आहेत. गेल्यावर्षी कोकणात जाणारे बरेचसे चाकरमानी स्वतःच्या खर्चाने, गाड्या भाड्याने करून गेलेले. यंदा ट्रेन आणि एस.टी. बसच्या जागा भरल्यात. गेल्यावर्षी त्या निम्याही भरलेल्या नव्हत्या. शासकीय निर्णयाला झालेली दिरंगाई यामागे होती. राज्यातल्या ज्या परप्रांतीयांना सरकारने पैसे खर्च करून त्यांच्या राज्यात सोडले ते तिकडचा पाहुणचार झोडून परतले. आम्ही कोकणवासीय मात्र अनेक आठवडे ई-पास कसा मिळवावा ?, एस.टी. सुरू होईल का ?, गावी किती दिवस क्वारंटाईन व्हायला लागेल ? या गेल्यावर्षी चाकरमानी अडकले होते. होळी आणि गणपतीला रजा नाही मिळाली तर नोकरीवर लाथ मारून जाणारा असा आमचा इतिहास ! पण कोरोना काळात गाववाले विरुद्ध चाकरमानी अशी आमच्यातच दुर्दैवी दरी निर्माण झाली होती. यावर्षी स्थिती बरी आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या लॉकडाऊनने देशाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मध्यंतरी एका आयुर्वेदीय उपचार केंद्रात गेलो होतो. तिथे आलेली एक महिला वैद्यांच्या तपासणी कक्षात जाताना हातातली पिशवी सोबत घेऊन जाऊ लागलेली. म्हणून सहजच तिला, ‘पिशवी राहू देत तिथं कोण नेत नाय ती !’ असं सांगण्याचा प्रयत्न वैद्यांनी केला. ‘पैसेबैसे नाहीत ना तीत ?’ असंही विचारलं. अर्थात पिशवीत पैशाचं पाकीट होतं. साहजिक ती बाई पिशवी स्वतःपासून सोडायला तयार नसावी. समोर बसून पाहणाऱ्या आम्हाला त्यात काही विशेष वाटलं नाही. हे सगळ स्वाभाविक ! पण पिशवी उचलून वैद्यांच्या तपासणी कक्षात जाताना ती चटकन म्हणाली, ‘नको बाबा, पैसा भेटत नाय आता !’ तिच्या या वाक्यानं आम्हाला भलतंच प्रभावित केलं. कोकणच्या भूमीत जगाला समृद्ध करू शकणाऱ्या अर्थव्यवस्थेची मूळं लपलेली असतानाचं हे जीणं अस्वस्थ करणारं आहे. गणेशोत्सवकाळात ‘चाकरमान्यांना कोकणात येऊ नका !’ हे सांगणं जितकं सोपं आहे तितकं त्या महिलेच्या वाक्यातल्या व्यथा समजून घेणं निश्चित सोपं नाही. दरवर्षी या काळात गल्लोगल्ली आपली पावडरलेली तोंड घेऊन फ्लेक्स बॅनरवर दर्शन देणाऱ्यांनी आपापल्या भागातील चाकरमान्यांची घरपट जबाबदारी घ्यायला हवी. जवळपास सत्ताधारी असलेल्या कोकणाला हे अवघड नाही. म्हणजे नियोजनाचा दुष्काळ राहाणार नाही. आपल्यावरील कोरोनाचे संकट आजही पूर्णतः टळलेले नाही. ११ दिवसाचा गणेशोत्सव साजरा करताना याचे भान बाळगावे लागणार आहे. अर्थात आजची स्थिती कायम राहणार नाही. हेही दिवस जातील. भविष्यात गणेशोत्सव येतील. तेव्हा या वर्षीची उणीव भरून काढता येईल. पण सध्याचा काळ संयमाची कसोटी पाहणारा आहे. आपलं प्रशासन म्हणजे माणसे आहेत. कोरोना रुग्ण वाढले तर आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, आणि काही कलेक्टर, सीईओ यांची पुरती दमछाक होते. म्हणून आपण नागरिकांनी हक्क मागताना कर्तव्य पालनाकडे पाहायला हवे आहे.

गणपती बाप्पाचं रुपडं तसं विचित्र. सतत ज्ञान ग्रहण करायला सांगणारं ते हत्तीचं मोठालं मस्तक, सूक्ष्म निरीक्षण करायला सांगणारे लहान डोळे, लांबलचक सोंड, सारं सावधपणे ऐकायला सुचविणारे मोठाले कान, बाहेर आलेला दात, लोकांचे अपराध पोटात घालून क्षमाशील वृत्ती ठेवण्यास सांगणारे भलेमोठे पोट, सापाचे बंधन, अन्यायाचा प्रतिकार करायला सांगणारी आयुधं आणि वाहन काय तर उंदीर तरीही बाप्पा आम्हाला परमप्रिय कारण आमच्या मनातले त्याचे रूप वेगळे आहे. आमच्यासाठी तो सुखकर्ता दुखहर्ता आहे. ‘यावर्षी बाप्पाला आरास कोणती करायची ?’ याचे काही महिने अगोदर सुरु होणारे नियोजन असो किंवा बाप्पाला मुक्यांनी पोहोचविण्यात काय अर्थ ? म्हणून त्यांच्यासमोर एकतरी भजन झालंच पाहिजे अशा घराघरात होणाऱ्या प्रयत्नाला यंदा ब्रेक लागला आहे. तसा ब्रेक खंडणीचं दुर्दैवी स्वरूप येऊ पाहणाऱ्या वर्गणीला, कर्णकर्षक आवाज, अश्लील गाणी आणि गुलालाच्या अतिरेकी वापरालाही आला आहे. दरवर्षी कोकणवासिय बाप्पाच्या डोक्यावर पाने, फळे, फुले, वेली, कवंडाळं, आंब्याच्या डहाळ्याची जी ‘माटवी’ बांधतात. त्यामागे पर्यावरण संवर्धन संकल्पना आहे. पूर्वी रानावनात गुरांच्या मागनं फिरणारे गुराखी या कवंडाळाच्या वेली हेरून ठेवत असत. कोरोना असला तरी हे चित्र घराघरात दिसेल. आपल्या या उत्सवातील पर्यावरण रक्षणाचा संदेश समजून न घेता आम्ही बाप्पाच्याच तोंडावर ‘मास्क’ लावला तर अवघड होईल. गणपतीचा उत्सव हा सगळया पर्यावरणाला आणि परिसराला आनंद देणारा असला पाहिजे. गणेश पूजेसाठी लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक ही फुले तर मोगरा, माका, बेल, पांढऱ्या दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुन सादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मारवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्ति या २१ पत्री (पाने) शास्त्राने सांगितल्या आहेत. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन म्हणून आपल्या परसदारी किती वनस्पती आहेत ? किती लावायच्या आहेत ? त्यासाठी आपण काही करणार आहोत का ? ज्या वनस्पती आहेत त्यांच्याविषयी आपण सोशल मीडियात पोस्ट करू शकतो का ? असा साधासा कृतियुक्त पर्यावरणीय विचार करायला हरकत नाही. बाप्पाला निर्विवाद शाकाहारी भोजन प्रिय आहे. मात्र गौरीला मांसाहारी आहार कसा काय चालतो ? हे  आमच्या सारख्याला न समजलेले कोडे आहे. पडत्या पावसात रात्रीच्यावेळी जेवणावळी आटपल्यावर चिडीचूप झोपी जाणाऱ्या कोकणात या दिवसात वाड्या-वस्त्यांवर घराघरात आळीपाळीने कोणा बुवाची थाप अचानक ऐकू येते. भजनाचा साज ठीकठाक असल्याची खात्री झाली बुवांच्या आवाजाने भरून गेलेल्या वातावरणात सारे सखेसोबती बाप्पासमोर किंवा पडवीत जमा होतात. ‘पुंडलिका वर दे हरि विठ्ठल’चा आवाज रात्रीचा अंधार कापत वाड्या वस्त्या घुमवून काढतो. गणपतीच्या दिवसातल्या या पायरवालाही यंदा ब्रेक  लागलाय. विसर्जनवेळी बाप्पासोबत दहीभाताचा नैवद्य दिला जातो. आपल्याकडे प्रवासाला निघणाऱ्या माणसाच्या हातावर चमचाभर दही देण्याची परंपरा आहे. पाहुण्याला विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये ह्या त्यामागे असलेल्या कारणाची आम्ही ‘कोरोना’काळात उजळणी करायला हवी आहे. महाकवी कालीदासानं ‘उत्सवप्रिय: खलु मनुष्य:’ असं उत्सवप्रिय माणसाचं वर्णन केलं आहे. देशातील लोकजीवनाला जीवनस्पर्शी सांस्कृतिक परंपरेची जोड लाभलेली आहे. हे सगळं आम्हा कोकणवासियांच्या खरं असलं तरी कोरोनाने जाखडी नृत्य परंपरेत म्हटलं जाणारं ‘गणा धाव रे...’ हे गीत म्हणण्याची भक्तांवर आणलेली आहे.

जगाच्या इतिहासात प्लेग महामारीच्या पाऊलखुणा आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. सन १३५० च्या सुमारास युरोपात झालेला प्लेगचा उद्रेक भीषण होता. तेव्हा एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकं मृत्युमुखी पडली होती. १५ व्या शतकात उत्तर आणि दक्षिण अमेरिकन वसाहतींमध्ये इतक्या लोकांचा बळी गेला की त्याचा परिणाम जगाच्या वातावरणावर झाला. सध्या Epidemic Diseases Act, 1897 चा उल्लेख वारंवार होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेला हा कायदा ब्रिटिश सरकारने १८९७ साली प्लेगच्या नियंत्रणार्थ आणला होता. प्लेगच्या साथीच्या वेळी घरात उंदीर मरून पडलेला दिसला की लोकं घर सोडून गावाबाहेर पळत. गावाबाहेर वाडीत वा शेतात तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करून राहात. अनेक गावे ओस पडली होती. मृताचा शोक करायला, रडायला सोडा त्याच्या अंत्यसंस्कार करायला जाण्याची हिंमतही होत नसायची. काखेत किंवा जांघेत गाठ आली की तो माणूस गेलाच म्हणून समजावे लागायचे. रोगावर औषध उपलब्ध नसल्याने बाधा झालेली व्यक्ती अगदी अल्पावधीची आपली साथीदार आहे असे समजण्यात यायचे. १८९६१९१७ या काळात एकट्या भारतात ९८ लाख ४१ हजार ३९६ (मराठी विश्वकोश) लोक प्लेग साथीच्या रोगाला बळी पडले. प्लेगच्या साथीच्या काळात अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करून त्याचे मांगल्य आणि पावित्र्य जपण्यात आले होते. आपल्या देशाने मागील काहीशे वर्षात रोगांच्या साथी पहिल्यात. पण आजसारखी रात्रंदिवस झोपा उडवणारी समाजमाध्यमे तेव्हा लोकांच्या हातात नव्हती. जसजसे विज्ञान प्रगत होत आहे तसतसा नवनवीन रोगांचा जीवघेणा फैलाव होत आहे. भारत नावाच्या आपल्या एकाच देशात अनेक देश राहातात. त्यांचं जगणं परस्परविरोधी असतं. एका बाजूला कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यू वाढतात. दुसरीकडे अधिक रूग्ण बरे झाल्याची बातमी येते. रुग्णांना दवाखाने अपुरे पडत असतानाही शहरी वस्त्यांमध्ये जमाव काबूत येत नाही. लाखो बेघर उपाशीपोटी आपल्या गावाला जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत निघतात. काही टॅंकरचा वापर करतात. जनजीवन सुरळीत होईल म्हणून काहीजण समाजमाध्यमांवर खाण्यापिण्याचे पदार्थ झळकवतात. वाढदिवसाच्या जाहिराती सुरु राहतात. डॉक्टर आणि नर्सेससाठी सुरक्षासाधनांचा तुटवडा असताना काहींना दारू दुकानं उघडी हवी असतात. संकटकाळातही राजकारण दिसतं तेव्हा आपला छुपा अजेंडा पुढे रेटणाऱ्यांची कीव येते. तरीही आपण सध्याच्या काळात मन विषन्न आणि उद्विग्न होऊ न देता निर्धाराने निरामय सूर जपायला हवा. गलबला कितीही वाढला तरी आशावादी राहात खचून न जाता हेही दिवस जातील ही भावना जपायलाच हवी.

इतिहासाचार्य वि. के. राजवाड्यांच्या मते आपल्याकडला वैयक्तिक आणि घरगुती गणेशोत्सव प्राचीन आहे. सातवाहन, राष्ट्रकुट आणि चालुक्य आदि राजघराण्यांच्या काळात तो चालू होता. पेशवेकाळात त्याला महाराष्ट्रात अधिक महत्त्व प्राप्त झालं. टिळकांनी त्याला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप दिलं. राष्ट्रभक्ती साधली. गणेशोत्सव हे लोकसंवादाचं व्यासपीठ बनवलं. या गणेशोत्सवानं कार्यकर्ता निर्माण करणारा लोकविद्यापीठ म्हणून ही काम केलं. मात्र स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा विस्तार वाढला आणि वैचारिक खोली कमी होत गेली आहे. त्यामुळे ‘गणपती रत्यावर आणू नये’ हे महादेव गोविंद रानडे यांनी व्यक्त केलेलं मत नंतर अशंत: पटू लागलं. गेली काही वर्षे यावर लिहिलं बोललं जातंय. म्हणून ‘कोरोना’ काळात लोकप्रिय लोकोत्सवात सक्तीनं आपला समाज स्वयंशासित झालेला बघायला मिळायला हवा आहे. सध्या देशाला, राज्याला याची मोठी गरज आहे. कोरोनामुळे झालेले मृत्यू, वैद्यकीय व्यवहार, आरोग्याचा व्यापार, प्रशासनाचा विस्कळीतपणा आणि सक्रीय कोरोना योद्धे असं चित्र असताना लोकांच्या कौटुंबिक भक्तीला कुठेही विरोध झालेला नाही. त्यामुळे आपण हे समजून घेऊन आपण ‘लाभो सर्वां निरोगिता’ अशीच कृती करायला हवी आहे.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.         

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,

ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)














गणेशोत्सव : वैभवशाली इतिहास, अस्वस्थ वर्तमान आणि आपण


जगभरातला माणूस हा कायद्यापेक्षा संकल्पनांच्या अधीन राहून जगत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बुद्धिप्रामाण्यवादाच्या नावाने श्रद्ध माणसाला कितीही अंधश्रद्ध ठरविण्याचा प्रयत्न झाला तरीही तो ऐकत नाही. कितीही त्रास झाला तरी कालानुरूप व्यवहार्य बदल स्वीकारून तो पुढे सरकत राहतो. यंदा कोरोना काळात कोकणात आपल्याला याचा अनुभव येतो आहे. यंदा ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर का होईना या लोकप्रिय लोकोत्सवात सक्तीनं आपला समाज स्वयंशासित झालेला बघायला मिळायला हवा आहे. सध्या देशाला, राज्याला याची मोठी गरज आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू, वैद्यकीय व्यवहार, आरोग्याचा व्यापार, प्रशासनाचा विस्कळीतपणा आणि सक्रिय कोरोना योद्धे असं चित्र असताना लोकांच्या कौटुंबिक भक्तीला कोणीही कुठेही विरोध केलेला नाही. त्यामुळे आता कुठे थांबायचे, हे समजून घेऊन आपण ‘लाभो सर्वां निरोगिता’ अशीच कृती करायला हवी आहे.

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

सांज 'सोबत' निमाली !

अपर्णा बेलोसे कदम ! आपल्याला आता भेटणार नाहीत. त्यांचं नवीन लेखन वाचायला मिळणार नाही. हे इतकं अचानक घडेल असं वाटलं नव्हतं. ‘कोरोना’च्या विषाणूच्या महामारीत, व्यापक समाजभान जपणारे वृक्ष काळाच्या उदरात जाणाऱ्या चेहऱ्यांमध्ये एक ऑगस्टच्या सकाळी त्यांची भर पडली. अगदी सकाळी समजलेल्या ह्या घटनेनं कळवळायला झालं ! विश्वास बसेना. ‘कार्या व्हावे समर्पित हेचि बरे...’ तत्वाने जीवन जगणाऱ्या अपर्णा बेलोसे कदम यांनी अनेक क्षेत्रातील उत्साही वावरातून जीवन जगत असंख्य आठवणी मागे ठेवून घेतलेली अचानकची एक्झिट म्हणूनच वेदनादायी आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक हा त्यांचा प्रवास त्यांच्यातील अभ्यासूवृत्ती सांगणारा राहिला. जीवनात ज्याज्या ठिकाणी त्या वावरल्या, वास्तव्याला राहिल्या तिथे प्रसंगानुरूप धावून जाण्याच्या त्यांच्या ममत्व आठवणी अनेकांपाशी हृदयस्थ आहेत. एका बाजूला कर्तव्यदक्ष अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला संवेदनशील मनाचा उमदेपणा अशा दोन टोकाच्या भूमिकांमध्ये गुंफलेलं जीवन विलक्षण ताकदीनं जगणारी कवयित्री, लेखिका असलेल्या अपर्णा बेलोसे कदम यांचे व्यक्तिमत्त्व अलिकडच्या काळात ‘सांजसोबत’ संस्थेतील शीर्षकामामुळे समाजाभिमुख झाले होते. जबाबदारीची नोकरी आणि कुटुंब सांभाळून त्यांनी साद कवितासंग्रह, संसार वारीचा कथासंग्रह आदि तीन पुस्तकेही लिहिली. आपल्यासोबत काम करणाऱ्या तरुण सहकाऱ्यांना, ‘कसे आहात रे ! निवांत झालात की भेटायला या’ असं सहज बोलून आपलसं करणारा त्यांचा आवाज आता ऐकायला येणार नाही. शाळा-महाविद्यालयीन जीवनातील आपल्यातील लेखन, वकृत्व, संवाद कौशल्य, काव्य, नाट्य आदि अंगभूत कलागुणांना पुढील आयुष्यात प्रापंचिक कसरतीत सांभाळणं, यथायोग्य खतपाणी घालून त्यांची जोपासना करत सतत कार्यरत राहणं हे तसं कठीण. पण मॅडमनी तर या साऱ्या क्षेत्रात ‘परीक्षक’ होण्यापर्यंतची उंची गाठली. अलिकडे कोल्हापूरला झालेल्या महिला नाट्य महोत्सव स्पर्धेकरिता त्या निमंत्रित परिक्षक होत्या. आयुष्य रसरसून जगायचं कौशल्य त्यांनी प्रयत्नपूर्वक साधलं होतं.

सोशल मिडीयावर पोस्टद्वारे सहज व्यक्त होत मतांशी ठाम राहात, संपर्कातील इतरांचे विचारस्वातंत्र्य जपत त्यांनी साधलेली मैत्री त्यांच्यातल्या प्रभावी संवादकौशल्याची जाणीव करून द्यायची. श्यामच्या आईच्या जन्मशताब्दीनिमित्ताने चतुरंग प्रतिष्ठानच्या परिसंवादात त्यांनी ‘आई’च्या बाजूने मांडलेली मते आजच्या काळात विचार करायला लावणारी. सांजसोबतच्या माध्यमातून दुर्गम ग्रामीण भागातील वृद्ध दाम्पत्यांना असलेली आधाराची गरज ओळखून सुरु झालेलं काम आज अनेकांच्या कौतुकास पात्र ठरलं आहे. चिपळूणचे ग्रामदैवत श्रीदेव जुना कालभैरव देवस्थानने हल्लीच कोरोनाकाळात ‘सांजसोबत’ संस्थेला मदत दिली. यात देवस्थानच्या साड्या आणि धोतरांच्या जोड्या होत्या. यातली काही वस्त्र देवीला नेसवलेली असल्याचे कळल्यावर, ‘किती भाग्यवंत आमचे आई बाबा !’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. तिवरे धरणफुटीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध दाम्पत्याचे उत्तरकार्य केल्यावर, ‘या दोघांना आम्ही अजून पाच वर्षे तरी जगवले असते’ हे त्यांचं बोलणं कामावरील श्रद्धा सांगणारं होतं. इतरांना काळजी घेण्याचा मायेचा सल्ला देणाऱ्या मॅडम अशा अचानक कश्या काय जाऊ शकतात ? ह्या विचाराने म्हणूनच व्यथित व्हायला होतं.

मुद्रित माध्यमांत संपादकांना हव्या असलेल्या दृष्टीनं दिलेला विषय लिहिण्याचं कौशल्य कमी होतंय ! किंबहुना असंही असतं याची जाणीव नसलेल्या पिढीची रुजवात पक्की होत असताना मॅडमचं नैमित्तिक लेखन संपादकीय दृष्टीकोन सांभाळून होतं. स्थानिक कलाकारांसोबत ‘हमिदाबाईची कोठी’ साकारताना एकत्रित लय जमवणं निश्चित सोपं नव्हतं. पण त्याहीपेक्षा मॅडमनी ती कलाकृती राज्य नाट्य स्पर्धेसाठी करायला स्वीकारणं आणि त्यातही ‘हमिदाबाई’चं आव्हानात्मक व्यक्तिमत्त्व स्वत: पेलणं हेच मोठं धाडस होतं. आम्ही ग्रामीण पत्रकारितेत वावरताना, अठरा वर्षांपूर्वी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ‘प्रसार माध्यमे आणि साहित्य’ या विषयावरील भूमिका मांडल्यावर त्यांनी केलेलं कौतुक, अगदी दोन वर्षांपूर्वी, नामवंत कवी अरुण म्हात्रे एका साहित्यिक सहलीच्या निमित्ताने कवीवर्य अशोक नायगावकरांसोबत चिपळूणला आले असताना आपल्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावना आणि प्रकाशनासाठी त्यांना भेटायला आलेल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या संवेदनशील तितक्याच बेधडक लेखनाद्वारे सोशल मिडीयावर नियमित सक्रीय असलेल्या मॅडम आता कायमच्या स्मरणबद्ध झाल्यात.

‘कार्यरत’ माणसं काही कळायच्या आतच अशी एक्झिट घेतात तेव्हा माणूस संपत चालल्याची जाणीव होते. तिन्हीसांजेचं विदारक जीणं जगणाऱ्यांची सोबत निमाल्याचं सत्य स्वीकारणं अनेकांसाठी वाटतं तितकं सोपं नाही. स्पर्धेच्या जंजाळात स्वतःला हरवून कणाकणांनी मातीचं देणं विसरू पाहणाऱ्या दुनियेत फारशी कुणाची वाट न बघता आपल्या स्वयंप्रेरित सहकाऱ्यांच्या बळावर ‘अपर्णा बेलोसे कदम’ नावाचा झरा पूर्ण क्षमतेने वाहात होता. अशातच ‘अचानक निमाल्या अपर्णा, झाल्या निशब्द संवेदना !’ ही स्थिती उभी राहिली असली तरी त्यांनी ‘सांजसोबत’ मळलेली पाऊलवाट विस्तारायला हवी आहे. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८


दैनिक सागरने १० ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित केलेली श्रद्धांजली पुरवणी 

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...