गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

‘तांबट’ पक्ष्याचा फराळ !

     
      दीपावलीच्या चौथ्या दिवशीची, रविवार (१५ नोव्हेंबर २०२०) सकाळची घटना. पूर्वेकडल्या दारात बांधलेल्या किल्ल्यावर
सूर्याची कोवळी किरणपडण्याच्या तयारीत होती. किल्ल्यावर उशीरा पेरलेले धान्यही किंचितसे उगवून आलेले. किल्यावर पाणी शिंपडण्याच्या हेतूने मावळ्यांना, ‘थोडी विश्रांती घ्या म्हणत जमिनीवर उतरवलं. पत्नीला भोवताली साधीशी रांगोळी काढायला सांगितली. बहिणीने पुण्याहून मावळे पाठविल्याने गेल्यावर्षीच्या सैन्यदलात चांगलीच भर पडलेली. लेकासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना किल्यावर पुन्हा स्थानापन्न करत असताना पश्चिमेकडच्या उंबरावरची फळं जमिनीवर पडत असल्याचा आवाज आला. झाडावरून पडणाऱ्या उंबराच्या फळांच्या आवाजाचा वेग नेहमीपेक्षा जास्त असल्यानं उत्सुकता ताणली गेली. थोडं बारकाईनं पाहिलं तेव्हा डोके, छाती आणि कंठ तपकिरी रंगाचा असलेल्या तांबट पक्ष्याची (Brown Headed Barbet) जोडी पिकलेल्या उंबराच्या फळांच्या फराळाचा आस्वाद घेताना दिसली. तांबटपक्ष्याचा हा दिवाळी फराळ कार्यक्रम तीसेक मिनिटे चालला. एरव्ही कॅमेऱ्याची चाहूल लागताच उडून जाणाऱ्या ‘तांबट’ची आजची कृती मात्र पर्यावरणीय कारणे आमची दीपावली सुखद करून गेली.

दीपावलीचा पहिला दिवस अशी मान्यता असलेल्या वसुबारसेच्या सकाळी परिसरातील बालमावळ्यांनी साकारलेल्या किल्यावर शेवटचा हात फिरवून तातडीच्या प्रवासाला निघालेलो, तो परतायला धनत्रयोदशीची रात्र झाली. घरून निघताना किल्यावर धान्य पेरणी केलेली. तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान आटपल्यावर लगबगीनं किल्यावर महाराजांना आणि मावळ्यांना स्थानापन्न केलं. छानसे फोटोही घेतले. कोरोनाच्या संकटात दीपावलीचा आनंद विशेष नसला तरी काळासोबत चालायला हवं. यंदा अभ्यंगस्नानानंतर ग्रामदेवतेच्या दर्शनाला जाणं, घरचा फराळ अर्पण करणंही शक्य झालं नाही. अशात दिवस सरला. दीपावलीच्या आजच्या चौथ्या दिवशी सकाळी किल्यावर पेरलेलं धान्य उगवू लागल्याचे लक्षात आले. तिकडे लक्ष देत असताना परसदारातल्या उंबरावरच्या पिकल्या फळांच्या जमिनीवर पडताना होणाऱ्या आवाजाने लक्ष वेधून घेतले. जवळपास अर्धा डझनहून अधिक खारुताईंची टीम परसदारी आंबा, नारळ आणि उंबरावर फळं खायला कायम कार्यरत असते. निसर्ग नियमानुसार सकाळी त्यांचा खाण्याचा वेगही अधिक असतो. फळं खाताना बरीचशी जमिनीवरही पडतात. तेव्हा आवाज येतो. आता हे सवयीचं झालेलं. पण आजच्या आवाजाचा वेग कानाला अधिक जाणवला. म्हणून पाहिलं तेव्हा तांबटपक्ष्याचा जोडीनं दीपावली फराळ आनंद कार्यक्रम सुरु असल्याचं दिसलं. या जोडीला पाहाताच दुसरं काही सुचेचना. किल्यावरील मावळे चटकन स्थानापन्न करून आम्ही तांबटांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचा आनंद घेण्यास सज्ज झालो. त्या आनंदात काही फोटोही घेतले. मात्र दोघे तांबट स्वतंत्रपणे फलाहार करण्यात मग्न होते. दारातल्या उंबराला फळं धरू लागल्यावर तांबटाचं एकट्याने येणं आम्हाला नवीन नाही. तसे विविध पक्षी येत असतात. पण आजचं दीपावलीच्या, फटाक्यांच्या आवाजी वातावरणात सकाळी सकाळी यांचं जोडीनं येणं नाही म्हटलं तरी सुखद पर्यावरणीय अनुभूती प्रदान करणारं होतं.

गेली काही दशके वर्षे फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा, त्यांच्या अतितीव्र प्रकाशाचा पशुपक्ष्यांवर परिणाम होत असल्याचे आपण वाचतो आहोत. पक्ष्यांच्या स्थलांतरणाचाही हा काळ असल्याने अनेक स्वयंसेवी संस्था, पक्षीप्रेमी, अभ्यासक, संशोधक याबाबत समाजात सतत जागरुकता निर्माण करण्याचे काम करत असतात. दीपावलीतील रॉकेट्ससारख्या फटाक्यांमुळे पक्ष्यांची झाडावरील घरटी जळण्याचा धोका असतो. फटाक्याच्या आवाजाचा सर्वाधिक परिणाम चिमण्यांवर होत असल्याचंही वाचल्याचं आठवतं. तशी मलाही यंदा दीपावलीत परसदारी चिमणी दिसली नाही. गेल्यावर्षी देशातल्या काही शहरात फटाके फोडण्याचे, पर्यायाने पशुपक्षी जखमी होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे नोंदवले गेले आहे. तामिळनाडूतल्या वेल्लोडसारख्या पक्षी अभयारण्यात शेकडो कुटुंबे पशू आणि पक्ष्यांसाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करत असल्याच्याचेही मागे वाचले होते. आमचे मात्र आजही दाट लोकवस्तीच्या शहरात फटाके वाजविणे सुरू आहे. लहानग्यांना समजावताना अडचणीचं होतं, पण मोठ्यांनी तरी हा मोह टाळायला हवा. फटाके उडविण्याची पद्धत हजारो वर्ष जुनी असली तरी वर्तमानात ती किती उपयोगात आणावयाची ? याचे तारतम्य प्रदूषित जगात आपण बाळगायला हवे. आमच्या बालपणी भुईचक्र, लवंगी फटाके, फुलबाजे, पाऊस, एखाद-दुसरा दादा बॉम्ब, एवढेच फटाके असायचे. आता त्यात खूप वाढ झाली आहे. नवनवीन प्रकार आलेत. पूर्वीची लवंगी फटाक्यांची छोटी माळ आता मोठया आकारात कित्येक मीटर लांब झाली आहे. दीपावलीसारख्या उत्सवी काळात या विषयावर सातत्याने चर्चा झडतात. रोजगाराचा सारासार विचार करून सरसकट फटाके बंदीला विरोधही केला जातो. फटाके बंदीमुळे चोरट्या विक्रीला बळ मिळू शकते असाही एक मतप्रवाह आहे. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आणावी असा काहींचा विचार असतो. काहीजण प्रदूषणविरहित फटाक्यांना प्राधान्य देण्याचा विचार मांडतात. तरीही काही गोष्टी आम्ही आपणहून समजून कमी करायला हव्यात.

तर आजच्या फटाक्यांच्या आवाजात, जमिनीवर कमी उतरणाऱ्या वृक्षवासी तांबटला सकाळच्या सूर्यप्रकाशात उंबराच्या झाडावर बसून फराळ करताना पाहाण्यात खूप मजा आली. त्या दोघांमधला एकजण तर आपल्या चोचीत उंबराच्या फळांचा नुसता बकाणा घेत होता. त्यांच्या आजच्या वावरात भिती दिसत नव्हती. त्यांना न्याहाळताना मला ज्येष्ठ साहित्यिक स्नेही प्रल्हाददादा जाधव यांनी लिहिलेल्या ‘तांबट’ पुस्तकाची आठवण झाली. दीपावलीच्या दिवसात निमशहरी भागात सकाळ संध्याकाळी फटाके वाजविण्याच्या मुहूर्तावर परसदारी शुकशुकाट असतो. यंदा कोरोनाकारणे, फटाक्यांचे आवाज काहीसे कमी झाल्याने पक्ष्यांची हालचाल जाणवत होती. प्रस्तुतचे तांबट पक्षी उभयता म्हणूनच चटकन उडून न जाता फराळ करीत बसले असावेत ! नंतर दुपारी, भोजनसमयी एक कोकीही उंबरावर येऊन विसावलेला. पण तो मला पाहून चटकन उडाला, बहुदा त्याला आज फराळात रस नसावा. सोमवारी, दीपावलीच्या पाचव्या दिवशीही सकाळी तांबट आलेला, पण एकट्याने ! आणि मला बघताच तोही उडून गेला. जाण्यापूर्वी मात्र त्यानं २/३ वेळा ‘कुटरुक् कुटरुक् कुटरुक्’ एकसुरी आवाज ऐकवून मला मोहवून टाकलं, प्रस्तुतचा मजकूर लिहायला प्रोत्साहन दिलं.

खरंतर उंबराच्या झाडाची दारात होणारी पानगळ, फळांची पडणारी रास यांना कितीही नाही म्हटलं तरी मी कंटाळलोय. शहरी वातावरणात, मर्यादित जागेत यांचं करायचं काय ? असं गेल्या दहा-बारा वर्षात अनेकदा वाटून गेलंय. एक-दोनदा उंबराच्या काही फांद्या तोडूनही झाल्यात. आत्ताही तोडायच्यात. पण सकाळ-दुपार-संध्याकाळी झाडावर बसलेलं पक्षीवैभव न्याहाळताना फांद्या छाटण्याचा विचार आपोआप गळून पडतो आहे. गेली २/३ वर्षे हे असंच चाललंय. यंदा तर पानगळीचा आणि फळांचा त्रासही वाढला. आगामी दिवसात काही फांद्या छाटण्याचे जवळपास निश्चित केले असताना तांबटाच्या जोड्याने ऐन दीपावलीत फलाहाराच्या (फराळ) निमित्ताने दिलेले हे दर्शन मला पुन्हा माझ्या विचारापासून परावृत्त करू पाहाते आहे.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

सोयरिक ‘वाचन’ संस्कृतीशी !

     

गोत्रांच्या रूपाने पूर्वजांची आठवण जपणारा भारतीय माणूस सकळ स्नेह्यांची सोयरिकही सांभाळतो. 'वसुधैव कुटुंबकम्' तत्त्व जगणाऱ्या भारतीय मनाच्या कप्प्यात सकळ सोयरिकतेचे ‘सगे’ पदर एकमेकांत खोलवर गुंफलेले पाहायला मिळतात. या गुंफलेल्या सोयरिकीच्या साक्षीने मनुष्याचं जगणं प्रगल्भ होत जातं. कुणाच्यातरी जाण्याने काहीतरी गमावल्याची जाणीव जेवढ्या तीव्रतेने होते, तेवढीच एखादी स्मृती उजेडात आल्यावर काहीतरी गवसल्याचीही होते. या सग्यांमध्ये नुसती माणसं नसतात. त्यात आपलं घर, परिसर, जैवविविधता, पशूपक्षी, बाग-बगीचा, फुलं-फळावळे, वाहने, गावच्या आठवणी, वाचलेली, संग्राह्य असलेली पुस्तके, संस्कृती, शाळा, बालपण आदि बरंच काही सामावलेलं असतं. सग्यांची ही सोयरिक जीवनात नवचैतन्य आणते. उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जाण्याने, समाजाच्या उंचीकडची वैचारिक बाजू ढासळत असताना सकळ सोयरिकतेत मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या वाचन संस्कृतीचे ठाम असणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच सज्जन सोयरिक जपणाऱ्या या ‘वाचन’ संस्कृतीचे सगे पैलू उलगडू यात !

कोरोना लॉकडाऊन काळात, पुस्तकांची सोयरिक माणसांना प्रकर्षाने जाणवली. कधीही पुस्तकं न वाचणाऱ्यांनीही पन्नासेक पुस्तकं वाचल्याचं सोशल मिडीयावर जाहीर केलं. कोणी १९३० ते २०२० पर्यंतच्या कादंबऱ्या वाचल्या. कोणी सांप्रदायिक पुस्तक वाचली तर कोणी आणखी काहीतरी ! काहींना पैसा कमावण्याच्या नादात आपण जीवनातील आनंद हरवून बसल्याची जाणीव पुस्तक वाचनाने झाली. कोणाला संत तुकाराम महाराजांचं, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ या भावनेमागचं मर्म समजलं. सामान्य माणूस एका आयुष्यात एकच जीवन जगतो पण वाचन करणारा एका आयुष्यात अनेक जीवन जगत असल्याची जाणीवही काहींना झाली. हा सारा सोयरिकतेचा प्रभाव होय. पालकांनी मुलांसाठी अवांतर पुस्तके खरेदी करण्याचा सपाटा लावला. सोशल मिडीयाने वाचकांना अधिकाधिक सगेसोयरे मिळवून दिले. तेथे पुस्तकांवर चर्चा होऊ लागल्या. ज्यातून अनेकांना पुस्तकं अधिक समजायला मदत झाली. वाचनातून मनन, चिंतनाची प्रक्रिया समृद्ध होण्यासाठी सुरु झालेला वाचन प्रेरणा दिन समजून घेताना सरकारी अनास्थेमुळे वाचन संस्कृती चळवळ थांबल्याचे अनेकांना जाणवले. वाचनसंस्कृती खेड्यापर्यंत रुजविण्याचे प्रयत्न करताना राज्यातील अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्यिक मूल्य असलेल्या पुस्तकांच्या विक्रीची दुकाने नाहीत, हे सत्य कोरोनाने सर्वांसमोर आणले. लोकांनी वाचलेल्या पुस्तकांच्या ढीगांचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेले आपण पाहिले. त्या फोटोजना प्रतिसादही मिळाला. अशा वाचकांना कोणी, ‘आमच्या वाचनालयाला भेट द्या असं सुचवलं’, कोणी, ‘वेळेचा सदुपयोग केल्याचं कौतुक केलं’. कोणी त्यातली आवडलेल्या ४/५ पुस्तकांची नावंही विचारली. काहींनी अतिशय जगावेगळा छंद म्हणून कौतुक केलं. लॉकडाऊनमध्ये बहुसंख्य लोकांचा वेळ जात नसताना, वाचनाशी सोयरिक जोडलेल्यांना वेळ पुरत नव्हता. कोणीतरी हे पुरूषांना शक्य आहे म्हणालं. त्यावर आणखी कोणीतरी आवड असली तर सवड मिळते असंही सांगून मोकळं झालं. कोणीतरी वाचन प्रेरणा दिनाचं निमित्त साधून आपल्या आवडत्या पुस्तकांसाठी साठवलेल्या पैशातून कपाट खरेदी करून आला. what’s on your mind ? असं विचारणाऱ्या सोशल मिडीयावर मनातलं सगळं पोस्ट करता येत असल्याने हेही पोस्टीत आलेलं. मूळ पोस्टपेक्षा त्याला मिळालेला प्रतिसाद सोयरिकतेतील गहिरेपणा सांगणारा होता. पुस्तके आणि कपाट विकत घेण्यासाठी बचतीचा मार्ग अनेकांना भावला. कोणीतरी अशी ५० कपाट व्हावीत म्हणून शुभेच्छा दिल्या. माणूस वयाने बुजुर्ग होत जातो, पण ग्रंथ जागच्या जागी असतात. आपल्याला मनाने ताजातवाना ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून विशेष आवडलेली पुस्तकं विकत घेऊन संग्रहित करावी, हवी तेव्हा वाचता येतात. खरंतर एकच पुस्तक आपण वर्षांच्या अंतराने वाचले तरी आपली गृहीतके, आकलन आणि अनुभवानुसार त्यातले पैलू भावत जातात. विचारसरणी बदलणाऱ्या, समृद्ध जीवनानुभव देणाऱ्या वाचनाच्या सोयरिकतेचं मी अनुभवलेलं गम्यही अफलातून आहे.

लहानपणी माझ्यानं शालेय पुस्तकं वाचून होत नव्हती. अवांतर वाचन लांब राहिलं. पण घरात ग्रंथसोबत होती. एखाद्या भाषाशास्त्राच्या अभ्यासकाच्या घरी शोभावं असं ग्रंथस्नेही वातावरण नांदत होतं. आजही नांदतंय ! तेव्हा मला वह्यांची उरलेली कोरी पाने फाडून दाभणाने शिवून वापरायला मजा वाटायची. त्या ‘कच्च्या’ वहीत मनातलं ‘पक्क’ व्यक्त होता यायचं. माझं अक्षर तुलनेनं मोठ्ठं ! पण कच्ची वही संपू नये म्हणून, बारीक अक्षर काढून लिहायची सवय लागलेली. ज्याची बघून लागलेली तो मात्र वही लवकर संपते म्हणून बारीक अक्षर काढायचा. हे मला कळेस्तोवर शाळा सुटली होती. अर्थात माझ्याही घरी काही वह्यांचं दुकान वगैरे नव्हतं. पण आपल्यासारखं मुलांच्या शिक्षणाचं आबाळ होऊ नये म्हणून वडिलांनी, शक्य तेवढी काळजी घेतलेली. वडिलांनी घरात आणलेल्या नव्या पुस्तकांना उघडून त्याचा वास नाकातोंडात भरून घ्यायला मला आवडायचं. पुस्तक विकत घेऊन वाचण्यातला वडिलांचा आनंद समजत नव्हता तेव्हा. आपणही अशीच पुस्तकं विकत घेऊन वाचायची असंही मनात आलं नव्हतं. घरातल्या धार्मिक वातावरणात, श्रावणातील ग्रंथवाचन परंपरेची लागलेली ओढ वगळता बारावी होईपर्यंत, सांगण्यासारखं विशेष नसलेला मी यथा-तथा विद्यार्थी होतो. दहावीपर्यंतचं शिक्षण, वडील शिक्षक असलेल्या शाळेत कमालीच्या धाकात पार पडलेले. पुढे बारावीला तो धाक संपला आणि आम्हांला शिंग फुटली. त्याचा परिणाम बारावीच्या निकालावर झाला. लहानपणापासून स्थापत्य शाखेची आवड म्हणून रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनात प्रवेश घेतला आणि त्याचवर्षी, १९९७ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या झालेल्या दुसऱ्या प्रतिभासंगम युवा साहित्य संमेलनात मी ओढला गेलो. मला आपल्याकडे ओढण्याचे काम भिंतीवरल्या एका पोस्टरने केलेलं. तेव्हा मला चरित्र-आत्मचरित्र वाचनाची गोडी लागलेली. लोकांचे भन्नाट अनुभव वाचताना आपण जणू तेच आयुष्य जगतोय असा भास व्हायचा. अ.भा.वि.प. कार्यकर्ता म्हणून जरी मी त्या संमेलनात सहभागी झालो असलो तरी संमेलन कार्यक्रमात कानावर पडलेल्या साहित्य चर्चांनी माझ्यात चरित्रवाचनाने जागृत केलेल्या भासाला वर्तमानात आणायला सुरुवात केली. लिहिणं सुरु झालं. शब्दांशी सोयरिक जडली. स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होऊ लागलेल्या स्फुटलेखांची गरज म्हणून फिरणं आणि संदर्भ शोधणं सुरु झालं. शिक्षण संपल्यावर लिहिलेलं छापून येणं अवघड बनताच पत्रकारितेकडे मोर्चा वळवला. वाचन आणि लेखन होत राहिलं. यातलं ठरवून असं काहीही घडलं नाही. जेजे जसंजसं समोर येत गेलं तेते मी स्वीकारत गेलो. नंतर केव्हातरी, ‘वाचण हे पेरणं असतं आणि लिहिणं हे उगवणं म्हणून पेरत चलूयात ! कधीतरी ते उगवेलच !’ हे ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांचं वाक्य ऐकलं आणि ‘मी इथवर कसा आलो ?’ याचं कोडं उलगडलं. अर्थात या साऱ्याच्या मुळाशी घरचं, वडिलांचं प्राथमिक मार्गदर्शन होतंच ! ‘आपल्याला लिहिण्यासाठी आवश्यक संदर्भ आपल्या संग्रही असायला हवेत’, ही वडिलांची सूचना मनावर घेतल्याने स्वतःचा ग्रंथसंग्रह जमा होऊ लागला. कालांतराने याच सूचना चिपळूणला कोकणची सांस्कृतिक राजधानी बनविण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या स्वर्गीय नानासाहेब जोशी आणि प्रकाशकाका देशपांडे या ज्येष्ठ मार्गदर्शकांकडून ग्रहण करायला मिळाल्या. संदर्भ तपासून लेखन करण्याच्या पद्धतीमुळे कोकण इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांचे आमच्याकडे लक्ष गेले. त्यांच्याच सूचनेनुसार वाचन संस्कृतीच्या जवळ जाणाऱ्या वस्तूसंग्रहालय संकल्पाने मेंदूत शिरकाव केला. त्याला आता काही वर्षे झालीत. संग्रहालयांसह पुस्तकांच्या आणि रद्दीच्या दुकानात सर्वाधिक रमणाऱ्या मला, चाळीशी पार केल्यावर माझ्या ‘परमचिंतन’ अभ्यासिकेत तिथल्या संदर्भीय सोयऱ्यांसोबत वावरताना जो आनंद मिळतो तो शब्दात पकडणे कठीण आहे.

मला वाटतं, माणूस बिन चेहऱ्याचा जन्माला येतो. त्याचा दिसणारा चेहरा हा अवयव असतो. अशा माणसाला आत्मविश्वासाने व्यक्त होणाऱ्या चेहऱ्याची गरज असते. पुस्तकं माणसाची ती गरज पूर्ण करतात, व्यक्त व्हायला शिकवतात. लेखकही व्यक्त होण्यासाठीच लिहितात. जो व्यक्तच होत नाही, तो माणूस कसला ? ‘पुरुष ते महापुरुष’ घडण्याच्या प्रक्रियेत आपल्याला पुस्तकं भेटतात. म्हणून ‘वाचन हेचि सकळ सोयरे आमुचे’ असं म्हणावसं वाटतं. जिकडेतिकडे पुतळे उभारण्यात आपली सोयरिक कामी येत असल्याचे आपण पाहातो. पण पुतळ्यांच्या विचारांचा विचार काही मनात रुजत नाही. कारण वाचन संस्कृती नाही. म्हणून आजचे पुतळे पत्ता सांगण्यापुरते राहिलेत. देशाच्या गल्लोगल्लीत विचारवंतांचे पुतळे असताना तिथे वैचारिक दारिद्र्य का पाहायला मिळतं ? वाचन संस्कृतीशी असलेला सोयरिकतेचा अभाव हेच त्यामागचं कारण आहे. पुस्तकं आजच्या भपकेबाज दृश्य माध्यमांइतकी परिणामकारक नसली तरी विश्वासार्ह नक्की असतात. अर्थात सोयरिक कोणाबरोबर करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वाचनाशी सोयरिक करण्याचे फक्त फायदेच आहेत, तोटे नाहीत. माणूस जीवनात व्यवहार्य वावरतो. फायदे-तोटे पाहून निर्णय घेतो. मग वाचनाशी सोयरिक करायला काय हरकत आहे ? आयुष्याचं जगणं समृद्ध होण्यासाठी माणसं, वाचनाचं वातावरण, जीवनपद्धती अवतीभवती असावं लागतं. यातून माणूस, ‘कसं जगावं ?’ हे नकळत शिकत जातो. शब्दांशी केलेली सोयरिक आजूबाजूच्या परिस्थितीचं वाचन करायला शिकविते. आपली सततची भूक ही चांगलं काम करण्याची असावी घाईघाईने व्यक्त होण्याची नसावी हे जाणवत राहातं. ‘मला काहीतरी सांगायचं आहे आणि ते न सांगितल्यामुळे मला झोप लागत नाही आहे’, असं आपल्याबाबत जेव्हा होतं तेव्हा दर्जेदार कलाकृती जन्माला येते. याचं भान पुस्तकं आपल्याला देतात. या वाचनानंदाच्या वाटेवर पहिल्यांदा वाचकाला पुस्तकाचा शोध लागतो. नंतर माणूस त्या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. आपल्या बोलण्यात त्यातले संदर्भ द्यायला लागतो.  नंतर नंतर तर जीवनात माणसांना पर्याय म्हणून पुस्तकं उभं राहातं आणि सोयरिक जन्माला येते. ही सोयरिक नसानसांत भिनत जाते. त्यातून वाचकाला पुस्तकाचा पुनर्शोध लागतो. शेवटी वाचक आपल्याजवळ उत्तमोत्तम पुस्तकांची समृद्ध संपत्ती तयार करतो. आयुष्याच्या शेवटी, हा वाचक आपल्याकडील ज्ञानाचा हा वारसा पुढच्या पिढीकडे सुपुर्द करता होतो. या साऱ्या प्रक्रियेतून जाणारा वाचक हा उत्तम सोयरिकतेचा प्रवास अनुभवत असतो, या बाबतीत मीही नशीबवान आहे.

सध्याच्या सोशल मिडीयाच्या काळात दूरचित्रवाणीसह करमणूकीची अनेक साधने उपलब्ध आहेत. तरीही त्यातून वरवरची करमणूक होत असल्याचा फील अनेकांना आला असेल, मला येतो. पण वाचन करताना आपण एका वेगळ्या वातावरणात, विश्वात रममाण होत असतो. पुस्तकातील मजकूर मनातून मेंदूकडे सरकताना समाधान देऊन जातो. ‘वीकएन्ड’ला निसर्गाच्या सानिध्यात मौजमजा करणाऱ्यांना आनंद तर मिळतो पण त्याच निसर्गरम्य ठिकाणाच्या बारकाव्यांचे अफलातून वर्णन असलेलं एखादं पुस्तकं हाती पडलं तर प्रत्यक्ष स्थळी न जाताही तिथल्या निसर्गाचा गारवा अनुभवता येतो. केवळ मनोरंजन म्हणून पुस्तकांचे वाचन करणाऱ्यांना नंतर त्यातले तत्वज्ञान खुणावते. लिहिणाऱ्यांची विद्वत्ता पाहून ही माणसं तपस्वी असल्याबाबत श्रद्धाही निर्माण होते. आपल्या मनाचा उत्तम व्यायाम सुरु होतो. हे सारं लक्षात आलेल्या माणसांकडून आज बड्या शहरात ‘ग्रंथ तुमच्या दारी / पुस्तकपेटी’ उपक्रमांना प्रतिसाद मिळताना दिसतो. वृद्धापकाळाकडे झुकलेली माणसं पुस्तकांच्या सोबतीनं छान आयुष्य जगताना दिसतात. त्यांनी उमेदीच्या काळातही सकस वाचनाची आवड जोपासलेली असते. म्हणून उतारवयात देवदर्शन करू म्हणत आयुष्य घालविल्यावर शेवटी देवदर्शन करताना दुखणारे गुडघे अशांकडे नसतात, असतो तो केवळ जीवनानंद ! आणि खऱ्या सोयऱ्याचे हेच प्रामाणिक लक्षण आहे ना ! 

गुगलने माहितीच्या क्षेत्रात जी क्रांती केली आहे त्याने माणसांना अपंग बनवले आहे. त्यामुळे तात्पुरते, कामचलाऊ जगणे वाढीस लागून संदर्भ, अवांतर वाचन, सखोल ज्ञान मिळवण्याची जिद्द संपुष्टात येऊ लागली आहे. सुपरफास्ट स्पीडच्या जगात सारे धावताहेत. धावण्याच्या या शर्यतीत आयुष्याची, जगण्याची उमेद संपतेय. माणसाला यशाचा आनंद उपभोगायलाही वेळ नाही. पुढे जेव्हा तो मिळेल तेव्हा शरीर साथ देत नसेल. अशात ज्ञान, माहिती, उपदेश, आनंद, अध्यात्म, काव्य, रसास्वाद आणि मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांच्या वाचनाची आवड वरदान असून त्यासाठी वाचनालयाचे सभासदत्त्व घेणे ही पहिली पायरी ठरावी. मानवी इतिहासात अक्षरवाङ्मय निर्मिती सुरु झाल्यापासून आजवर लाखो लोकांनी शेकडो वर्षे त्याचे अनुकरण केले आहे. तरीही माणसाची आजची स्थिती आपल्याला काय दर्शविते ? याचा विचार केल्यास बालपणी आनंद देणारे वाचन तरुणपणी  चारित्र्याचे  रक्षण तर वृद्धपणी दुःख दूर करते. चांगल्या ग्रंथांची सोयरिक नेहमीच हितकारक ठरते.

वाचन संस्कृतीशी आपली सोयरिक इतकी महत्त्वाची असताना त्याकडे दुर्लक्ष का होतंय ? ज्या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचा राजव्यवहार कोष तयार केला, त्या महाराष्ट्रात भाषिक समृद्धीसाठी काम करणाऱ्या संस्था भाषातज्ज्ञांना भरकटलेल्या का वाटतात ? सरकार त्यांचे का ऐकत नाही ? समर्थ आणि सक्षम तरुण माणसांना कामाची संधी का मिळत नाही ? भाषेच्या शिक्षणाचा अभाव का होतो आहे ? मराठी विद्यापीठाची मागणी पूर्ण का होत नाही ? इंग्रजी ही भाषा नसून ती एक संस्कृती आहे, हे आजही आमच्यातल्या बहुसंख्य माणसांना का कळलेले नाही ? वाचनाशी सोयरिक वाढविण्याच्या टप्प्यावर असे अनेक प्रश्न उभे राहतात. आपली विचार करण्याची भाषा ही मातृभाषा आहे. पण आपण तिला विकासाची आणि रोजगाराची भाषा बनवू शकलेलो नाही. आजही वर्तमानपत्र न वाचणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे माणसांना दर्जेदार जीवन जगणं जमेनासं झालंय. पूर्वी गावोगावचा माणूस छापलेलं तर वाचायचाच पण तो निसर्ग, जंगलं, पशुपक्षी, प्राणी, नदी हेही वाचायचा. तो माणूस ग्रंथांशी निगडीत होता. आता तोही वेग मंदावलाय. सोशल मिडीयावर तयार सामग्री खूप आहे अन् उपयोग करणारे अत्यल्प ! आज आधुनिकता माणसांना सभ्यता वाटते आहे.  मूळ संस्कृतीपासून तुटल्याने माणसाने रेडीमेड संस्कृती अंगिकारायला सुरुवात केली आहे. ग्रंथांपर्यंत वाचक पोहोचायला हवा म्हणून आम्ही काय करतो ? हा प्रश्न आहे. ग्रंथालयातला माणूस ग्रंथशत्रू होण्याऐवजी ग्रंथस्नेही जाणवायला हवा. तर माणसांची ग्रंथांशी सोयरिक वाढेल.

माणसाला प्रस्थापित व्यवस्थेत आपली जागा बनविताना जेव्हा ही व्यवस्था आपल्याला नकळत संपवत असल्याची भिती वाटते तेव्हा वाचनानंदासारखा सोयराच मदतीला धावतो. मळलेल्या त्याच त्या वाटांवरून चालण्याऐवजी स्वतःची वेगळी वाट चोखाळू पाहणाऱ्यांचा सुरुवातीला सार्‍या जगावर अफाट विश्वास असतो. हळूहळू जसजसे अनुभव येत जातात तसतसा या विश्वासाला सुरुंग लागतो. इथेही वाचनाने आलेली प्रगल्भताच माणसाला सांभाळते. कार्य कोणत्याही क्षेत्रातील असुदेत, ते वाढायला लागले की त्याला समाजमान्यता मिळू लागते. तसे अनेकजण सहकार्यासाठी पुढे सरसावतात. ते शक्य झालं नाही तर दूर होतात, प्रसंगी स्पर्धक बनतात. वापर करू पाहातात. विश्वासघात करतात. तेव्हा खचायला, एकटं पडायला होतं. जगण्यातली गंमत संपू लागते. तेव्हा नव्याने हरिओम करण्यासाठीची मानसिक तयारी करण्याचं काम ग्रंथ करतात. सगेसोयरे तरी अशाप्रसंगी वेगळं काय करतात ? मग या ‘वाचन’ नावाच्या संस्कारक्षम सोयऱ्याचं हे आपल्यावरील ऋण आपण कसं फेडणार ? कृतज्ञता व्यक्त करणं सोपं असतं. पण तेवढ्यानं समाधान होत नाही. म्हणून, जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी शिकवावे। शहाणे करून सोडावे । सकळ जन ।।‘ ही समर्थ रामदासांची शिकवण जगत संपर्कात येणाऱ्या नव्या पिढीशी, ‘वाचनसंस्कृतीशी सोयरिक घडवून आणण्याचा संकल्प या दीपावलीपासून करू यात !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

dheerajwatekar@gmail.com

(प्रसिद्धी : दैनिक सागर दिवाळी पाडवा विशेष 'सोयरे सकळ' टॅॅब्युलर पुरवणी २०२०)

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

निसर्गरम्य सिंधुदूर्गातील सुरक्षित वास्तूविकास

निसर्गरम्य देवभूमी कोकणातील पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्गला ‘कायमस्वरूपी निवासी वास्तव्य ठिकाण’ म्हणून निवांतपणासाठी पसंती मिळू लागल्याला आत अनेक वर्षे लोटलीत. गावाकडील घर (सेकंडहोम) ही आयुर्वृद्धी साधणारी अत्यावश्यक गरज असल्याचे कोरोनाने साऱ्या जगाला सांगितल्याचे या विषयातील अहवाल आणि सर्व्हे सांगताहेत. मोठ्या शहरात नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना निसर्गाच्या सुरक्षित सानिद्ध्यात गावातल्या घरांचे महत्त्व कोरोनाने पटवून दिले आहे. याकाळात भाड्याच्या घरात राहताना, पगार घटल्याने घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वितुष्ट येण्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांना कुटुंबासोबत एकत्र राहाण्याचे महत्त्व पटलेले आहे. त्यामुळे निवासी सदनिका, मोकळे प्लॉट, स्वतंत्र ड्युप्लेक्स घरे यांसह वर्षानुवर्षे ज्यांची कोकणातील पारंपारिक घरे दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत, ज्यांकडे ममत्त्वाने पाहिले गेलेले नाही अशा घरांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे वाढण्याचे संकेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘निसर्ग सान्निद्ध्य’ हा या साऱ्यातला केंद्रिभूत घटक असल्याने त्याची पुरेशी काळजी घेत बांधकाम प्रकल्पांच्या विकासवाटा विकसित होत राहिल्यास त्या विकासकांना व्यावसायिक यशातील सातत्य देण्याबरोबरच ग्राहकांसाठीही आनंददायी ठरतील.

सर्वत्र दसऱ्या-पाडव्याला नवीन खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. निसर्ग सान्निद्ध्याच्या अपेक्षेने कोकणात नवीन वास्तू / घर खरेदी करताना त्या घरात राहाणाऱ्या सर्वांची पसंती, वाढत्या मासिक खर्चाचे नियोजन, शहरापासून दूर जाताना दैनंदिन प्रवासाचे नियोजन करायला हवे. मासिक मेन्टेनन्स खर्च, नवीन घरात लागणाऱ्या नवीन वस्तू, साफसफाईचे नियोजन, लोडशेडिंग आणि इनव्हर्टरची आवश्यकता तपासायला हवी. खरेदी करत असलेल्या जागेचा / फ्लॅटचा लेआऊट, बिनशेती आदेश, पुरेसा गाडीरस्ता, किती क्षेत्रफळ बांधकाम परवानगी, भूखंड / बंगला / फ्लॅट आपल्याला हवा तेव्हा विकता येईल का ? हे पाहायला हवे. कारण इथं आपली स्वप्न जोडली गेलेली असतात. आयुष्याची पुंजी आपण गुंतविणार असतो. म्हणून ही जागरूकता आवश्यक ठरते. कोरोनाचा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसलेला आहे. त्यातून हे क्षेत्र उभारी घेत असले तरी अनेकांचे बजेट कोलमडले आहे. पैसा सर्वत्र खेळता राहायला हवा आहे. मोठ्या शहरात बकालपणामुळे, व्यावसायिक स्पर्धेमुळे, घड्याळाला बांधलेल्या आयुष्यामुळे अनेकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. त्यावर उपाय म्हणून, ‘शहरापासून दूर जा’ असे वैद्यकशास्त्रही सांगते. खेडेगावात, निसर्गाच्या सान्निद्ध्यात तणावापासून दूर गेल्यामुळे शरीराला मानसिक लाभ होतो. वर्षातून दहा दिवस कोकणात जाणाऱ्यांना इथला निसर्ग छानच वाटतो. पण इथं कायमचं राहायची वेळ आली तर महिन्याभरात कंटाळा येईल अशी इथल्या विकासाची गती नक्की नसावी. शहरातल्या घरांत कामावरून घरी आल्यानंतर अनेकदा आपल्याला ताजेतवाने आणि आरामदायी वाटतेच असे नाही. कौटुंबिक सदस्यांसोबतचा संवाद, शांत झोप याही बाबी अडचणीच्या ठरतात. गावात आपली वास्तू ही  अशी जागा असते जिथे आपण विश्रांती घेतो. आपल्या कुटुंबासोबत सर्वाधिक वेळ घालवतो, भावनिक क्षणांचा आनंद जगतो. अर्थात इथले वातावरण आरामदायक असायला हवं. त्यासाठी निसर्गाची सोबत हवी. ती सोबत कोकणात, सिंधुदुर्गात सहज मिळू शकते.

सेकंडहोम हे वाढत चाललेली संचयीवृत्ती, चंगळवाद, महत्त्वाकांक्षा आणि आनंदाच्या बदललेल्या व्याखेचं प्रतिक असल्याचं पूर्वी बोललं गेलं असलं तरी कोरोनाने तिला अत्यावश्यक गरजेच्या स्वरुपात पुढे आणलं आहे. विकास आणि निसर्गसंवर्धन याचा ताळमेळ घालण्याची संधी असलेला सिंधुदुर्ग जिल्हा इतरांना दिशादर्शक ठरेल असे काम उभे करू शकतो. अलिकडे कोकणातील नागरी क्षेत्रातील पहिल्या, देवगड-जामसंडे नगरपंचायत अखत्यारित बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २५.३० कोटी रुपयांच्या २४० घरांच्या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. हे महत्त्वाचे आहे. कोणाही लोकांनी गाव सोडून शहरात जाण्याच्या मानसिकतेमागे आवडीपेक्षा गरजेचं कारण अधिक आहे. ही माणसं कोरोना काळात जीव वाचवायला गावाकडे धावलेली आपण पाहिलीत. मागच्या काही महिन्यात कोकणात आंब्यासारख्या नगदी पीकाचे नुकसान झालेय. मासेमारीसह इथल्या पर्यटन उद्योगाला फटका बसलाय. निसर्ग चक्रीवादळ, ढगफुटी, अतिवृष्टीने बागांचे पिकांचे न भूतो... नुकसान केलेय. या पार्श्वभूमीवर कोरोना पश्चात नव्या घरांच्या मागणीत वाढ होऊ शकते आहे. सध्याच्या वैश्विक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची मानसिक अवस्था काहीशी संभ्रमित आणि निर्णय क्षमता मंदावलेली असू शकते. ग्राहकांच्या हाती येणारे कमी अर्थार्जन वाजवी दरातील पर्यायांना अधिक पसंती मिळवून देईल. यास्तव व्यावसायिकांनीही आपल्या मोबदल्याच्या गणितात थोडा बदल करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विकासाच्या नावाने निसर्गाची हानी न होता सेकंडहोमचा पर्याय आनंददायी ठरायला हवाय. डॉ. माधव गाडगीळ सरांसारखी व्यासंगी माणसं लोकांच्या मनामध्ये जे पर्यावरण प्रेमाचं आणि संवर्धनाचं बीज पेरत असतात, आपला वर्तमान विकास त्याला साजेसा असायला हवा. स्वतःचं गाव सोडून शहरात गेलेल्यांनी सुट्टीपुरतं गावात येऊन, गाव बदललं म्हणणं दुर्दैवी आहे. यातली कळकळ हृदयस्थ असायला हवी. कारण गावाचं गावपण टिकवणं हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. आजही तळकोकणातील, सिंधुदूर्गातील गावे नव्या प्रकल्पांच्या विकासवाटा वाटा चालत असताना आपलं गावपण टिकवून आहेत. गावपण टिकवण्यासाठी, विकासगरजा ह्या किमान पक्का रस्ता, दळणवळणाची साधने, वीज, पिण्याचे स्वच्छ पाणी, शिक्षणाची सोय, गरजेच्या वस्तूंची उपलब्धी, वैद्यकीय सुविधा आणि काळाची गरज म्हणून इंटरनेट अशा मर्यादेत असायला हव्यात. अन्यथा जास्तीच्या हावरटपणाने सत्यानाश होण्याची शक्यता बळावते. डोंगर-नद्यांच्या काठाने पण त्यांच्या जीवावर न उठणारे वाट्टेल तसे बांधकाम न करता सामाजिक संतुलन साधणारे, निसर्ग आणि मानव सहसंबंध जोपासणारे प्रकल्प लोकांच्या मनाची सहज पकड घेतात हे वास्तव आहे.

कामाच्या व्यस्त धावपळीपासून काही क्षण निवांत घालविण्यासाठी सेकंड होमची कल्पना आकारास आली. तेव्हा ते ठिकाण निसर्गरम्य असावं अशी प्रमुख गरज असल्याने नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या सिंधुदुर्गासह भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील रमणीय कोकणप्रदेश आकर्षक आणि उत्तम पर्याय म्हणून पुढे आला. सध्या मुंबई गोवा महामार्गाचे सूरू असलेले चौपदरीकरण पूर्ण होताच येथे विविध व्यावसायिक घटना वेगाने घडायला सुरुवात होईल. भौगोलिकदृष्टय़ा संपन्न असलेलं कोकण हे संस्कृती, वास्तूरचना, समुद्रकिनारे, फळफळावळे, हिरवाई, मंदिरे, किल्ले, घरे-वाडे आदिंनी प्रसन्न आहे. व्यस्त जीवनशैलीत जगणाऱ्या समूहाला वीकेण्डच्या मर्यादित काळात निसर्गाच्या कुशीत निवांत सामावणे, गड-किल्यांवर भटकणे, निसर्गवाटा तुडविणे, अध्यात्मिक अनुभूती घेणे, शेतीत रमणे असे अनेक पर्याय कोकणात उपलब्ध आहेत. वाढत्या पर्यटनामुळे या पर्यायांना व्यापकता प्राप्त झालेली आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी आपणही आपली हक्काची वास्तू उभारु यात !

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

अतुलकाका सराफ यांची निसर्ग व पर्यावरण मंडळास तंत्रस्नेही भेट

तंत्रस्नेही भेटीचा ऑनलाईन ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’

चिपळूण / अहमदनगर : आपली उद्यमशीलता जपून समाज विकासाचा ध्याय घेतलेले, कुंथलगिरी येथे सुमारे ६९ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारणारे, नॅशनल ज्वेलरी अॅवार्डकडून ‘जेम ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेड बारामतीचे संचालक अतुलकुमार जीनदत्त शहा (सराफ) उर्फ अतुलकाका यांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पर्यावरण संवर्धनविषयक राज्यव्यापी कामाला गती प्राप्त व्हावी, तंत्रज्ञानाची जोड मिळावी या हेतूने लॅपटॉप, प्रिंटरसह एक वर्षांचे पेड झुम व्हिडीओ कन्फरन्स अॅप नुकतेच अध्यक्ष ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांना भेट दिले. जागतिक पर्यटनदिनी या तंत्रस्नेही भेटीचा ऑनलाईन ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’ झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपद्वारे संपन्न झाला.

चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेडचे अहमदनगरचे प्रतिनिधी आनंदभाई कोठारी यांचे हस्ते मोरे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात ही भेट स्वीकारली. यावेळी मंडळाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसुळ, कार्याध्यक्ष पै. नाना डोंगरे, वैभव मोरे उपस्थित होते. मोरे यांच्या गेल्या ३/४ वर्षांतील सह्राद्री वाहिनी आणि इतर न्यूजवाहिन्यांवरील मुलाखती ऐकून अतुलकाका सराफ यांनी आबासाहेबांना फोन करून मंडळाचे काम जाणून घेतले होते. गेली काही वर्षे ते स्वतः आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण कुलकर्णी हे आबासाहेबांच्या संपर्कात आहेत. मंडळाच्या पर्यावरणीय कामावर समाधान व्यक्त करणाऱ्या सराफ यांनी या भेटीद्वारे मंडळाला तंत्रस्नेही होण्याची संधी उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी पर्यावरण मंडळाच्या कामाचा आढावा घेतला. अतुलकाका यांच्या कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘कोरोना वैश्विक महामारीच्या काळात मंडळाला मिळालेलं हे दूरसंचार यंत्रणेच योगदान आपणा सर्व पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांच्या हाताना बळकटी देणारं ठरणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात तन, मन आणि धनाने सहभाग घेणाऱ्या, समाजाला आपण काय देऊ शकतो ? याचा विचार करणाऱ्या, सेंद्रिय शेतीत विशेष रुची असलेल्या अतुलकाकांनी, ‘वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे वय, सध्याची कोरोना स्थिती, मंडळाच्या पर्यावरण कामाची राज्यभर असलेली व्याप्ती, पर्यावरणप्रेमी सदस्यांचा मंडळातील सक्रीय सहभाग विचारात घेऊन अडचण येऊ नये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंडळ सतत प्रगतीपथावर कार्यरत व्हावे यासाठी  दिलेल्या या योगदानाबद्दल वाटेकर यांनी अतुलकाकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी अतुलकाका यांना या सहकार्यासाठी धन्यवाद दिले. निसर्ग व पर्यावरण मंडळाचा प्रत्येक सदस्य हा पर्यावरण संवर्धन हे ध्येय समोर ठेवून कार्यरत आहे. मंडळाच्या माध्यमातून राज्यात बीजारोपण, वृक्ष लागवड मोहीमेसह रोपवाटिका नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना अतुलकाका शहा यांनी, झाडे वाढली तर आपल्याला अधिक ऑक्सिजन मिळणार असून हे काम व्हायला हवे असल्याचे म्हटले. मंडळाचे काम राज्यभर  सुरु आहे ही चांगली बाब आहे. यासाठी आपण आपले कर्तव्य केल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या ऑनलाईन ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’ झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला राज्यभरातून कार्याध्यक्ष विलास महाडिक, डॉ. गौतम सावंत, राजेंद्र सावंत, प्रियवंदा तांबोटकर, विलास शेडाळे, नाना पाटील, शिवा नंदकुले, बाळासाहेब चोपडे, प्रमोद मोरे, बाळासाहेब कणसे, माधव केंद्रे, बाबासाहेब महापुरे, अ‍ॅड. सौ. आंधळे, प्रणिता पाताडे,  उमाजी बिसेन, सुहास गावितम रामदास खवसी, कचरु चांभारे, अनिल लोखंडे, संजय भापकर, डॉ. जगदीश पाटील, दत्तात्रय मंचरे, प्रमोद काकडे, सुनिल दिघे, नंदकुळे शिवप्पा, नयना पाटील, संजय ताडेकर, लीलाधर वानखेडे, राजेश पाटील, सुरेंद्र पाटील, प्रभाकर तावरे, विजय लुल्हे, रविंद्र खरादे, कुंभकर उपस्थित होते. यांनी सहभाग नोंदवला. कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन आणि आभार मारुती कदम यांनी मानले. वनश्री प्रतिज्ञा वाचनाने कॉन्फरन्सचा समारोप झाला.

 तंत्रस्नेही भेटीच्या ऑनलाईन ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’ निमित्ताने...

आदरणीय अतुलकाका सराफ यांचेविषयी लिहिलेला विशेष ब्लॉग

 पर्यावरणप्रेमी सेवाव्रती उद्योजक

आपली उद्यमशीलता जपून समाज विकासाचा ध्याय घेतलेले, कुंथलगिरी येथे ६८ लाख ७५ हजार २८० लिटर क्षमतेचे शेततळे उभारणारे, नॅशनल ज्वेलरी अॅवार्डकडून ‘जेम ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेड बारामतीचे संचालक आदरणीय अतुलकुमार जीनदत्त शहा (सराफ) उर्फ अतुलकाकांनी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्त्वाखालील पर्यावरण संवर्धनविषयक राज्यव्यापी कामाला गती प्राप्त व्हावी, तंत्रज्ञानाची जोड मिळावी या हेतूने लॅपटॉप, प्रिंटरसह एक वर्षांचे पेड झुम व्हिडीओ कन्फरन्स अप भेट दिले. त्याचा ‘हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळा’ आज (२७ सप्टेंबर) ऑनलाईन स्वरुपात आपण चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेडचे अहमदनगरचे प्रतिनिधी आनंदभाई कोठारी यांचे शुभहस्ते संपन्न झाला. आपले अध्यक्ष आबासाहेबांच्या गेल्या ३/४ वर्षांतील सह्राद्री वाहिनी आणि इतर न्यूजवाहिन्यांवरील मुलाखती ऐकून आदरणीय अतुलकाकांनी, आबासाहेबांना फोन करून मंडळाचे काम जाणून घेतले. गेली काही वर्षे ते स्वतः आणि त्यांचे सहकारी बाळकृष्णकाका कुलकर्णी हे सातत्याने आबासाहेबांच्या संपर्कात होते. मंडळाच्या पर्यावरणीय कामावर समाधान व्यक्त करणाऱ्या आदरणीय अतुलाकाकांनी आपल्या मंडळाला तंत्रस्नेही होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचे अभिनंदनही केले. कोरोना वैश्विक महामारीच्या काळात मंडळाला मिळालेलं हे दूरसंचार यंत्रणेच योगदान आपणा सर्व पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांच्या हाताना बळकटी देणारं ठरलं आहे. त्या निमित्ताने अतुलकाकांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ यात.

विविध ठिकाणी असलेल्या १४ शाखांच्या माध्यमातून शुद्धता, विश्वास आणि परंपरा यांवर आधारित आपली १९३ वर्षांची परंपरा जपणारा, चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेड हा सोने खरेदी-विक्री व्यवहारातला पश्चिम महाराष्ट्रातला प्रसिद्ध ‘ब्रँड’ आहे. कोरोना संकटात मागच्या १५ मे रोजी बारामतीत लॉकडाऊन शिथिलतेनंतर एका दिवसात ३ कोटी रुपयांचे सोने खरेदीचे व्यवहार झाले. या वृत्ताची दखल संपूर्ण देशातील माध्यमांनी घेतली होती. या व्यवहारामागे चंदुकाका सराफ आणि परिवाराने जपलेली विश्वासार्ह्यता आहे. अतुलकाकांना नुकतेच १५ फेब्रुवारी २०२० रोजी नॅशनल ज्वेलरी अॅवार्ड सोहोळ्यात ‘जेम ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परिवाराच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी सिद्धार्थ शाह यांनाही ‘महाराष्ट्र टाईम्स’तर्फे ‘यंग अचिव्हर्स २०२०’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सिद्धक्षेत्र श्रीदिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी संचालित भक्तनिवास, विद्यार्थी वसतिगृह, विविध पशुपक्षी, फळबागा, विविध प्रकारची झाडे आणि शेतीकरिता वर्षभर सातत्याने व मुबलक पाणी पुरवठा व्हावा या हेतूने जलसंधारण कामांतर्गत २० ऑगस्ट २०२० रोजी, अतुलकाकांनी स्वखर्चाने ६८ लाख ७५ हजार २८० लिटर क्षमतेचे शेततळे उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे परामपूज्य शांतीसागर महाराजांच्या ६५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पूर्णत्त्वास गेलेल्या शेततळ्याचे काम अमीर खान संचलित पाणी फाउंडेशन विकास सेवा मंडळाने केले आहे. या शेततळ्याची लांबी ५४ मीटर, रुंदी ४४ मीटर आणि खोली सात मीटर आहे. या शेततळ्यामुळे श्रीदिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी संस्थेची पाण्याची संपूर्ण गरज पूर्ण होईल. या ठिकाणी तयार झालेला शेततळ्याचा हा पहिला प्रकल्प आहे. या शेततळ्याचे ‘वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे तलाव’ असे नामकरण करण्यात आलेले आहे.

शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात तन, मन आणि धनाने सहभाग घेणाऱ्या, समाजाला आपण काय देऊ शकतो ? याचा विचार करणाऱ्या, सेंद्रिय शेतीत विशेष रुची असलेल्या अतुलकाकांनी, ‘वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे वय, सध्याची कोरोना स्थिती, मंडळाच्या पर्यावरण कामाची राज्यभर असलेली व्याप्ती, पर्यावरणप्रेमी सदस्यांचा मंडळातील सक्रीय सहभाग विचारात घेऊन अडचण येऊ नये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंडळ सतत प्रगतीपथावर कार्यरत व्हावे यासाठी  हे योगदान दिले आहे. याद्वारे आपण आपली फक्त सामाजिक बांधिलकी जपल्याचे नमूद करणाऱ्या अतुलाकाकांचे आपण सर्वांनी मनापासून अभिनंदन करूयात !

धीरज वाटेकर

सचिव, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ

मो. ९८६०३६०९४८

 

जेम ऑफ द इयर 'अतुलकाका '

सिद्धार्थभाई शाह गौरव 

कुंथलगिरी शेततळे हस्तांतरण 


शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

पर्यटन, ‘वेट अॅॅन्ड वॉच’वर !

कोरोना संकटामुळे जगभरातील पर्यटन व्यवसायासाठी सध्याचा काळ खडतर आहे. ‘वाईटाला सुधारून घ्यावं’ या तत्त्वावर विश्वास असणाऱ्या पर्यटन व्यवसायकर्मी आणि पर्यटकांनी घेतलेली ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कोरोनोत्तर काळात ‘ग्रामीण डेस्टीनेशन्स’ना मोठ्या संधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनची आजच्या (२७ सप्टेंबर २०२०) जागतिक पर्यटन दिनाची थीम ‘पर्यटन आणि ग्रामीण विकास’ अशीच आहे. ग्रामीण पर्यटनातील संभाव्य संधींचा विचार करता कोकणसह महाराष्ट्रासाठी कोरोनोत्तर काळ ‘सुवर्णकाळ’ ठरू शकतो. वर्तमान कितीही कठीण असलं तरी ‘जगायचं’ म्हटल्यावर व्यवसायकर्मींनी भूतकाळात न अडकता आपली वर्तमानशक्ती भविष्यावर केंद्रित करायला हवी. दारात आलेल्या पर्यटकांना आपण सुग्रास भोजन, स्वच्छता, नीटनेटकेपणा, निवांतपणा, शांत निसर्गाचा सहवास देत आलो आहोत. पण पर्यटक प्रवास करून येतो त्या रस्त्यांचे काय ? ग्रामीण डेस्टीनेशन्समधील मोबाईल कनेक्टिव्हिटी, कॅशलेस पेमेंट आदि सुविधांचे काय ? या समस्यांवर मात करण्यासाठी कृतीगट कार्यरत हवा. पर्यटन आज वेट अॅन्ड वॉचवर असलं तरी उद्या ते नव्याने भरारी घेणार आहे. त्यातला कोकणी निसर्गाचा, महाराष्ट्राचा सहभाग आणि रोजगार वाढवायचा असेल तर पायाभूत सुविधा सुधाराव्या लागतील.

यावर्षी आलेला पर्यटन दिन ‘न भूतो..’ असा आहे. वर्षाच्या अगदी सुरुवातीला आम्ही ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक ९० वर्षीय अण्णा शिरगावकर यांचे समवेत राजवाडी गरम पाण्याची कुंडे, श्रीक्षेत्र सप्तेश्वर (कसबा-संगमेश्वर), स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस या ठिकाणी दोन दिवस भटकलो होतो. श्रीदेव महाबळेश्वरसारख्या पुरातन देवळांचे गाव अशी ओळख असलेल्या देवळेला (पोलादपूर) गेलेलो. नदीच्या पात्रात असलेली जुने शिवमंदिर पाहिले होते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अक्कलकोट, तुळजापूर दर्शनकारणे ऐन महाशिवरात्रीला राष्ट्रीय संरक्षित स्मारक श्रीक्षेत्र माचणूरला (सोलापूर) लाखांचा जनसमुदाय लोटलेल्या श्रीसिद्धेश्वराच्या यात्रेत सहभागी झालेलो. कोल्हापूर-गगनबावडा प्रवासात प.पू. गगनगिरी महाराजांची तपोभूमी आणि साधनेचे माहेरघर असलेल्या श्रीक्षेत्र रामलिंग आश्रम पळसंबेला भेट दिली होती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंबोली-दोडामार्गच्या वनवैभवात दोन दिवस रमलो होतो. प्रख्यात उभयसृपशास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी सरांची संस्मरणीय भेट या प्रवासात झालेली. वर्षारंभी दोन महिन्यातील या अनुभूतींमुळे यंदाचं वर्ष विशेष फिरण्याचं असेल असं वाटलेलं. पण मार्च महिन्याच्या उत्तरार्धात सारं चित्र बदललं. इप्सित नियोजनांवर पाणी पडलं. असं अनेकांचं झालं. अगदीच नाही म्हणायला लॉकडाऊन काळात धामणदेवी (खेड) खाडी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने मिळू लागलेल्या शिवल्या पाहायला पोहोचलेलो खरं ! कोरोना संकटाने एवढी भयावह परिस्थिती ओढवली की गेली काही वर्षे पर्यटन दिनानिमित्ताने लिहिणाऱ्या आम्हाला, ‘यंदा लिहावे तरी काय ?’ असा प्रश्न पडला. घरकोंडीत, जुने संदर्भ चाळताना करमणूकच्या ९ जुलै १९०४ च्या अंकात महाबळेश्वरचे वर्णन असलेल्या ४० कडव्यांच्या पद्यात सुरुवातीला आलेला ‘पर्यटण’ शब्द नजरेस पडला आणि सुखावलो. याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुरेशा खबरदारीने ३ दिवसांचा पुणे प्रवास केल्यावर, ‘पर्यटन निश्चित शक्य आहे’ असा विश्वास वाटला. मार्चपासूनच्या लॉकडाऊन मानसिकतेवर मात करायला ज्यानं बळ दिलं तो ‘प्रवास’ हा माणसाचा प्राचीन छंद आहे. ‘पर्यटन’ हे त्याचे आधुनिक रूप. यंदाची, पर्यटनातून ग्रामीण विकास साधण्याची संकल्पना मोठ्या शहरांबाहेरील वातावरणाला आर्थिक विकास साधण्याची संधी उपलब्ध करुन देते. कोरोनाने शहरातील लोंढे ग्रामीण भागाकडे केव्हाच वळवलेत. त्या भागाला रोजगार उपलब्ध करून देत निसर्ग रक्षणाचे काम ‘ग्रामीण आणि कृषी पर्यटन’ विषयातून साध्य होत असल्याचे महाराष्ट्रातील आठशेहून अधिक ग्रामीण कृषी पर्यटन केंद्रे आपल्याला सांगताहेत. शहरातील बिघडलेल्या वातावरणाला ‘स्मार्टसिटी’त आणण्यापेक्षा धोरणकर्त्यांनी ग्रामीण वातावरणाला ‘स्मार्ट व्हिलेज’मध्ये परावर्तित करण्यासाठी कार्यरत व्हायला हवं. शाश्वत विकास यातून शक्य आहे.

ग्रामीण भागात यातायात व्यवस्थेसोबत शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल्स सुविधांवर काम व्हायला हवे. आज गावातील लोकसंख्या शहरांकडे वळण्याचे हे प्रमुख कारण आहे. गावातला माणूस गावात राहून कार्यरत झाला, शहरातल्या सोई त्याला गावात मिळू लागल्या तर गावांचा कायापालट होईल. लोकं गावात रमतील. एका अनुमानानुसार कोरोनानंतर जगभरात वीकेंड होम्सना पसंती वाढणार आहे. आठवड्यातल्या दोन दिवसांसाठी का होईना, लोकांची पाऊले गावाकडे वळतील. शहराजवळ निसर्गाच्या सान्निध्यात, इंटरनेटची सुविधा असलेलं वीकेंड घर लोकांची महत्त्वाकांक्षा होती, आज ‘गरज’ बनली आहे. या साऱ्यामुळे ग्रामीण पर्यटन व्यवसायही जीवनावाहक बनेल. लोकं ग्रामीण भागातील पर्यटनानुभूती घेतल्यावर मुक्क्माला शहराकडे वळतात. ती पाऊले गावात थांबली तर गावाच्या विकासाला हातभार लाभेल. शहरीकरण हा जगभराचा प्रचलित कल आहे. सन २०५० पर्यंत जगातील ६८ टक्के लोकसंख्या शहरीभागात वास्तव्यास असेल असा अंदाज असताना कोरोनाने ही गणितं बदलवायची संधी दिलेली आहे. कोरोनात जागतिक पर्यटनापेक्षा देशांतर्गत ग्रामीण पर्यटन लवकर सुरळीत होणार असल्याने त्याचा फायदा ग्रामीण समुदायांना होऊ शकेल. हवामान बदल आणि शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील घट, चक्रीवादळे पाहाता पारंपारिक जीवनशैली, स्थानिक संस्कृती, उत्पादने, ग्रामीण निसर्ग पर्यटनात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संधी अफाट आहेत. त्यासाठी पायाभूत सोईसुविधांसोबत नवीन संधींचा शोध, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन, डिजिटल परिवर्तनास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. औषधांच्या भरवशावर पथ्याबाबतची बेफिकिरी कमी झाल्याने, रोगनिवारण उपायांपेक्षा रोगप्रतिबंधक उपाय जीवनात अधिक उपयुक्त असल्याचे लोकांना कळल्याने भरपूर ऑक्सिजन पुरवणाऱ्या निसर्गरम्य कोकणकडे पर्यटकांचा ओढा वाढेल. कृषी पर्यटनाला अनुकूल वातावरण येईल. त्याचे सामाजिक आणि आर्थिक अंगही उत्तम असेल. कमी गुंतवणूकीत त्वरित अधिक नफा देणारा हा व्यवसाय आहे. या पर्यटनाचा आनंद पर्यटकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारा आहे. लोकांची फिरायची आवड कमी झालेली नसून घरकोंडीने ती अधिक वाढेल. शहरातील माणूस निसर्ग सहवासाकडे धाव घेईल. म्हणून कृषी पर्यटन हे संपूर्ण भारतात ग्रामीण रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे साधन ठरेल. आजही हे क्षेत्र बाल्यावस्थेत असल्याचे बोलले जाते, त्याकडे लक्ष पुरवावे लागेल.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात, कृषिप्रधान भारतात पाऊस न पडल्यामुळे १९५८, १९६६ आणि १९८०मध्ये मंदी आली होती. आज भारत मोठ्या प्रमाणावर कृषीक्षेत्राकडून सेवा आणि उत्पादन क्षेत्राकडे वळलेला असताना कोरोनाचे संकट आले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी अनावश्यक खर्च कटाक्षाने टाळायला हवेत. सर्वांनीच देशासाठी त्याग करायची मानसिकता करायला हवी. एका वृत्तानुसार कोरोना काळात लडाखच्या पर्यटनाचे झालेले ४०० कोटी रुपयांचे नुकसान हे कारगिल युद्धकाळातील नुकसानीहून अधिक आहे. माथेरानमध्ये गेल्या महिन्यात फुलपाखरांच्या १४० प्रजातींची नोंद करण्यात आली. १२५ वर्षांनी ही यादी अद्ययावत झाली. कोकणच्या किनारपट्टीवर असलेल्या दीपगृहांचे पर्यटनही आगळेवेगळे आहे. अशा अनेक आयामातून कोकण पर्यटनाकडे पाहाता येईल. मात्र कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर झावळीच्या झोपड्यांमधील ‘बीचशॅक’ म्हणजे मुली-बाळी निवांत फिरू न शकणारे, कोकणच्या मूळ संस्कृतीला बाधा आणणारे पर्यटन उभारताना सर्वंकष विचार व्हायला हवा. कोकणात १९९५ नंतर पर्यटनवाढ झाली. रोजगार निर्मिती झाली. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला. २००० नंतर त्याला चांगले दिवस येऊ लागले. मुंबईवरची अवलंबिता कमी होऊ लागली. पर्यटन केंद्रांना ८० ते १०० दिवसांचा हंगाम मिळू लागला असताना कोरोना आला. फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटीनुसार कोरोनामुळे देशात ५.५ कोटी लोकांना रोजगार देणाऱ्या पर्यटन व्यवसायातील १ कोटी लोकं बेरोजगार झालेत. ३ कोटी होण्याच्या मार्गावर आहेत. कंपन्यांची वित्तीय स्थिती वाईट आहे. एवढे मोठे संकट या व्यवसायावर पहिल्यांदा आलेले आहे. जगातील अनेक देशांनी पर्यटन, प्रवास आणि सेवा क्षेत्रातील सर्व कर एक वर्षासाठी समाप्त करत १२ महिन्यांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध केले आहे. मदत आणि सुरक्षा पॅकेज दिले आहे. एकूण बँककर्जात ९ टक्के हिस्सा असलेल्या भारतातील पर्यटनालाही कमी व्याजदर, दीर्घ मुदतीचे कर्ज, कर्ज आणि व्याज वसुलीस वर्षभरासाठी स्थगिती, चालू भांडवल मर्यादा दुप्पट करणे, विविध कर, वीजबीलात सवलत मिळायला हवी. पर्यटन व्यवसायावर असलेला विविध करांचा बोजा उतरवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात हॉटेल सुरु करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करून प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसाच बीचशॅक किंवा साहसक्षेत्र पर्यटनाला जोडण्याचा निर्णय घेताना या विषयात काम करणाऱ्यांची मानसिकता आणि भूमिका समजून घ्यायला हवी. यावर लोकांना व्यक्त व्हायला पुरेसा वेळ द्यायला हवा. सध्या पर्यटनस्थळांच्या सुशोभिकरणाचा वार्षिक निधी पॅकेज म्हणून व्यावसायिकांना देऊन पर्यटन क्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी योगदान द्यावे अशी मागणी पुढे आली आहे. त्यावर विविध मते असू शकतात. मात्र पर्यटन क्षेत्रात काम करणारे गाईड, सफाई कामगार, वेटर, कुक, स्वागतकक्ष कर्मचारी, बोट आणि वाहनचालक कर्मचारी आणि पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यवसायावर गुजराण करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना ठोस आर्थिक मदत मिळायला हवी. पर्यटन क्षेत्रात नव्याने जम बसवू इच्छिणाऱ्यांनी आपापले उद्योग बंद केले असून सर्व क्षेत्रांची अशीच अवस्था आहे. त्यामुळे पर्यटन कंपन्या, टूर ऑपरेटर, कृषी पर्यटन केंद्रे, गेस्टहाऊस, हॉटेल्स उद्योगाला कशा प्रकारे सहकार्य करता येऊ शकते ? याबाबत तज्ज्ञांची मते पाहायला हवीत. कोरोनोत्तर पर्यटन अंमलबजावणी संदर्भात ‘वैशिष्ट्यपूर्ण कार्यप्रणाली’ (गाईडलाईन्स) विकसित व्हायला हवी आहे. जागतिक पर्यटनातील भारताचा ३ टक्के हिस्सा पाहाता पर्यटनाला ‘उद्योग’ दर्जा देऊन कात टाकायला हवी. पर्यटन व्यवसायकर्मींनी नव्या संधी निर्माण करणं आणि आणि त्यांचं सोनं करणं यामागे लागायला हवं. पर्यटकांचा सहलींचे नियोजन करण्याचा कालावधी वाया गेला आहे. पुढील शिक्षणाचे निश्चित नियोजन अद्याप झालेले नाही. नव्याने सहलींच्या तारखांचे नियोजन जुळविणे सोपे राहिलेले नाही. म्हणून व्यवसायातील वेळ, पैसा, अनाठायी संसाधनांची वापर, कार्यालयीन व्यवस्थात्मक ताणतणाव, आर्थिक असमतोल या घडणाऱ्या गोष्टींचा प्रभाव कमी करायला हवा.

परदेशी पर्यटनात सर्वांत जास्त सहभाग हा ६०पेक्षा अधिक वय असलेल्यांचा असतो. कोरोनाने त्यांचा आत्मविश्वास कमी केला आहे. देशांतर्गतही अधिक दिवस फिरणारे लोकं ३/४ दिवसांच्या पर्यायांचा विचार करतील. पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी सोईसुविधांत मोठे बदल व्हायला हवेत. पर्यटनस्थळी आलेला पर्यटक कोणत्याही वस्तूला थेट स्पर्श करताना आता विचार करतील. कोरोनासारख्या विषाणूंचे संक्रमण रोखण्यासाठी भविष्यात हॉटेलात रूमसर्व्हिस किंवा बुफेदरम्यान कागदी प्लेट्सचा वापर वाढेल. कोरोनाशी निगडीत सुरक्षा आणि स्वच्छतांची काळजी पर्यटन आस्थापनांना घ्यावी लागेल. नवीन नीती आणि योजना, पर्यटकांना आकर्षित करू शकणारी पॅकेज तयार करावी लागतील. सध्याच्या काळात मोठ्या गटांचे, वयोवृद्ध, गरोदर महिला, लहान मुलांचे बुकिंग न घेणे किंवा काळजीपूर्वक घेणे, येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याची चौकशी करणे, आर्थिक व्यवहार डिजिटल करणे, पर्यटकांचे स्वागत करताना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर वापरणे, जेवताना, वावरताना सुरक्षित अंतर ठेवणे, पर्यटन कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या साधनांचा वापर करणे, पर्यटकांची खोली, हॉल, जेवणाची जागा सॅनिटायझरने स्वच्छ करणे, ऑक्सिमीटर, तापमापन यंत्राने पर्यटकांची तपासणी करणे, उत्पादने विकताना विशेष काळजी घेणे आदि नियम स्वतःवर घालून घ्यावे लागतील. सेवांमध्ये बदल करावे लागतील. युज अॅन्ड थ्रौ टॉवेल द्यावे लागतील. वॉशिंगच्या कल्पना बदलतील. ‘असेच चालायचे’ ही नेहमीची भूमिका चालणार नाही. पर्यटकांना सज्ञान करण्याची भूमिका पार पाडावी लागेल. पुरेशी काळजी घेऊन जगाला कोरोना सोबत जगावे लागेल. याची पक्की जाणीव झाली की पर्यटन व्यवसाय पुन्हा गती पकडेल !

२०२० हे वर्ष मानवाने ‘जीवंत’ राहण्याच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे ठरले आहे. कोरोनाचा पहिला फटका पर्यटनाला बसला. या धक्क्यातून सर्वात शेवटी सावरणारा व्यवसायही पर्यटनच असेल. हा व्यवसाय आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिरतेवर अवलंबून असतो. कोरोनाने या स्थिरतेला सुरुंग लावला. १५ वर्षांपूर्वीपर्यंत फॅमिली डॉक्टरप्रमाणे लोकांचे ट्रॅव्हल एजंट ठरलेले होते. सुट्ट्यांची आखणी, नियोजन ते करायचे. तंत्रज्ञानाने हे चित्र बदललं. तरुण पिढी हाती मोबाईल घेऊन नियोजन करू लागली. तिला यंत्रापेक्षा माणसांवर विश्वास ठेवायला शिकवावं लागेल. पृथ्वीवरील सर्वच ठिकाणे सुंदर होती. आपण त्या सौंदर्यांचे अभयारण्य, पार्क, कृषी पर्यटन आदि तुकडे पाडले. हे तुकडे नीट सांभाळण्याची जाणीव कोरोनाने करून दिली आहे. चला तर मग, आपण ‘स्मार्टखेडी’ घडवू या ! पर्यटन वाढवू या !! रोजगार निर्मिती साधूया !!!

धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.            

मो. ९८६०३६०९४८, ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)






दैनिक पुढारी (रत्नागिरी) २७ सप्टेंबर २०२०

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...