शनिवार, २५ मे, २०१९

‘वृक्षमित्र’ आबासाहेब @ ६७ आणि पर्यावरण जनजागृतीची ४० वर्षे

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष, वृक्षमित्र आबासाहेब मोरे हे सतत पर्यावरणाचा विचार करणारे एक अफलातून व्यक्तिमत्त्व आहे. निसर्ग आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समूहाला वैचारिक स्तरावर अधिकाधिक सक्षम राहाण्यासाठी आबासाहेब सातत्याने प्रयत्नशील असतात. आबासाहेबांनी सुरु केलेली पर्यावरण संमेलने आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे पर्यावरणीय जनजागृतीच्या क्षेत्रात कार्यरत समूहाला वैचारिक पातळीवर ज्ञानार्जन देणारे उपक्रम म्हणून नोंदवले जावेत इतके महत्त्वाचे आहेत. आबासाहेब आजच्या (५ जून २०२) जागतिक पर्यावरण दिनी वयाची ६ वर्षे पूर्ण करून ६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. भारतमातेची अधिकाधिक पर्यावरण सेवा करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो ही आजच्या अभिष्टचिंतनप्रसंगी प्रार्थना. या निमित्ताने आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या पर्यावरणीय जनजागृती कार्याचा आढावा घेऊ या.

सन १९८२ : वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी वृक्षारोपण करून सामाजिक कार्यात गुंतलेल्या आबासाहेब मोरे यांनी सन १९८२ पासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन पर्यावरण संवर्धनकामास प्रारंभ केला. तेव्हापासून त्यांनी शिक्षक आणि शेतकरी मेळावा’, ‘ना नफा-ना तोटातत्वावर १३ लाख रोपांची स्वत:ची रोपवाटिका, ‘एक मूल एक झाडमोहीम, ‘यशाची वनशेतीप्रयोग, ‘जिजाऊ वनज्योत चूलप्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार, ‘वनश्री बंधारा योजनाप्रकल्प, वृत्तपत्रात हजारांवर लेख आणि सुमारे ३५०० व्याख्याने दिलेल्या मोरे यांनी राज्यभरात आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सन १९९८, २००२, २००४ साली राज्यस्तरीय रंगभरण आणि निबंध स्पर्धांचे आयोजन, ‘वनश्रीनावाने विशेषांक काढून पर्यावरण संवर्धनाचे विचार जनमानसात पोहोचवायला सुरुवात केली.

सन २००४ : मंडळाला नोंदणीकृतवलय प्राप्त करून घेण्याची गरज लक्षात आल्यावर पर्यावरण संवर्धन विषयक प्रसार कार्यासाठी वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी सन २००४ साली, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्रया मंडळाची स्थापना केली.

सन २००८ : यानंतर संत तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सन २००८ साली देहू येथे पर्यावरण संमेलन यशस्वी झाले. तेव्हापासून राज्यात सर्वत्र पर्यावरण विषयक उपक्रम सतत सुरु झाले.

त्यानंतर मंडळाने लोणी-व्यंकनाथ येथील स्व. लीलावती बन्सीलाल नाहाटा मानवसेवा ट्रस्ट यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय रंगभरण आणि निबंध स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले.   

याचवर्षी कोकणात मंडळाचे उपाध्यक्ष विलास महाडिक यांच्या नेतृत्वाखाली, आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय रंगभरण आणि निबंध स्पर्धांचे आयोजन यशस्वी केले गेले. यात १५० शाळांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, एकूण ६७ शिक्षकांना पर्यावरण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सन २०१३ : मंडळाच्या दशकपूर्तीनिमित्त एक विशेषांक तयार करण्याची सूचना उपाध्यक्ष विलास महाडिक यांनी १८ सप्टेंबर २०१३ च्या श्रीगोंदा बैठकीत मांडली. श्री. विलास महाडिक संपादित या अंकाची अतिथी संपादक म्हणून जबाबदारी पत्रकार-लेखक धीरज वाटेकर यांच्याकडे देण्यात आली. या अंकाचे प्रकाशन सन २०१४ मध्ये जागतिक वनदिनी पुण्यात सामाजिक वनीकरण विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंडळाने आजपर्यंत पाच वनश्रीविशेषांक प्रकाशित केले आहेत.

सन २०१५ : कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूणात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आद्य पक्षीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉ. सालीम अली यांच्या १२० व्या जयंतीचे निमित्त साधून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र तर्फे परिसरातील पक्षीप्रेमींनी आपल्या पक्षी विषयक आठवणी शब्दबद्द करीत आगळा वेगळा पक्षीदिन पेढे येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्रात दिनांक १६ नोव्हेंबर २०१५ ला साजरा केला. समीर कोवळे, धीरज वाटेकर, विलास महाडीक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमास साप्ताहिक कोकण एक्सप्रेसचे संपादक सतीश कदम, सरपंच दीपक मोरे, गारवा आग्रो टुरिझमचे सचिन कारेकर, अॅक्टिव ग्रुपचे कैसार देसाई, नेचर अँड एनवायरनमेंट सोसायटी ऑफ ठाणे (नेस्ट ) चे किशोर मानकर, छोटा पक्षी मित्र अथर्व रहाटे, वनविभागाचे बारसिंग, नाविद मोमीन उपस्थित होते.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ महाराष्ट्र आणि कोकण एक्सप्रेस फाऊडेशन यांच्या सयुन्क्त विद्यमाने महेन्द्रगिरी पर्वत, पेढे (तालुका चिपळूण) गावातील डोंगर पायथ्याशी मोरेवाडी परिसरात कोकणातील पहिले पश्चिमघाट बिगर मोसमी जंगलपेर अभियान ("गांधीजी अगेन्स्ट ग्लोबल वार्मिंग") रविवार २९ नोव्हेंबर २०१५ ला राबविण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र हजारे, माजी आमदार रमेश कदम, निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब मोरे, उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव धीरज वाटेकर, पीपल्स हेल्पलाईनचे अड कारभारी गवळी, सभापती सौ. स्नेहा मेस्त्रि कोकण एक्सप्रेस फाऊडेशनचे सतीश कदम, पेढे गावाचे सरपंच दीपक मोरे, भगवान परशुराम पन्चक्रोशि संस्था अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे, वृक्षम नासिकच्या आश्विनी भट, बी पुरवठादार महेंद्र घागरे, शाळा समन्वयक विनायक माळी, कोकण विकास आघाडीचे संजय यादवराव, सौ. उल्का कुर्ने, रामदास ठाकार, प्रमोद काकडे उपस्थित होते.

सन २०१६ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा रत्नागिरी आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जुलै २०१६ मध्ये रत्नागिरी जिल्हयात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या मुला-मुलींच्या माध्यमातून ७५ लाख बीज पेरणी - वृक्ष लागवड यशस्वी करण्यात आले. अभियानंतर्गत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आपटा, आवळा, बहावा, शमी, अश्वगंधा, गिरीपूष्प, बिब्बा, हरडा, खाया या जातीच्या बियाणांची पेरणी करण्यात आली. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणार् या विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम वयात बीजपेरणी, वृक्ष लागवड, वन, वन्यप्राणी, जैवविविधता, दुर्मीळ अशा वनसंपदेचे रक्षण व त्याचे संवर्धन याबाबत जाणीव व आवड निर्माण व्हावी, हा मुख्य उद्देश या अभियनामागे होता. या अभियानाला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलामाडे, उपाध्यक्ष सतीश शेवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजायकुमार पंडित, मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, संघटक धीरज वाटेकर, बीज पुरवठादार महेन्द्र घागरे, यांचे सहकार्य लाभले.

पहिले पर्यावरण संमेलन, राळेगणसिद्धी २०१६ : आपली प्राचीन भारतीय आणि महाराष्ट्रीयन समाज व्यवस्था खूपच जागतिक अनुकरणीय होती. त्यावेळी आजच्या सारख्या पर्यावरणाच्या भीषण समस्या नव्हत्या. अधिक बारकाईने अभ्यास करता, त्याकाळी समाजातील विविध सतत कार्यरत समाजघटकाला खूप मानाचे स्थान होते. आणि त्या मानाप्रमाणे हे सतत कार्यरत समाज घटक आपापल्या ठिकाणी कार्य करीत असत. अनेक गावात सकारात्मक बदल वा विकास होण्यात गावप्रमुख, शिक्षक, ग्रामसेवक, जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. याचा विचार करून समाजातील या साऱ्या कार्यरत समाजघटकांना एकत्रित आणून वैचारिक प्रबोधन घडविण्याच्या विचाराने, या विषयात काम करणार्या राज्यातील ५०० निमंत्रित शिक्षक प्रतिनिधींचे, पर्यावरणस्नेही कृतीशील समाज घटकांना प्रेरणा देणारे दोन दिवसीय पहिले पर्यावरण संमेलन राळेगणसिद्धी येथे ११ व १२ नोव्हेंबर २०१६ मध्ये संपन्न झाले.

 

राळेगणसिद्धी येथील या पर्यावरण संमेलन २०१६ चा सविस्तर वृत्तांत आपण खालील ब्लॉगलिंक क्लिक करून वाचू शकता.

https://dheerajwatekar.blogspot.com/2016/11/blog-post_28.html

 

संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे(पद्मभूषण), आंतरराष्ट्रीय पर्यावरण शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ प्रा. बी. एन. शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक वाय. बी. सोनटक्के, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक विनोद मोहन, संस्थाध्यक्ष आबासाहेब मोरे, जंगली बीयाणे पुरवठादार आणि चंदनतज्ज्ञ महेन्द्र घागरे, डॉ. भगवानलाल बंशिवाल (राजस्थान) यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने संमेलनाचा हेतू साध्य झाला. राज्यात विविध कृतीशील उपक्रमांच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करणारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन यांचे विशेष सहकार्य पर्यावरण संमेलने यशस्वी करण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्रसंस्थेस लाभले आहे.

 

राळेगणसिद्धी येथील या पर्यावरण संमेलन २०१६ निमित्ताने आदरणीय अण्णा हजारे यांची घेतलेली पर्यावरणीय मुलाखत आपण खालील ब्लॉगलिंक क्लिक करून वाचू शकता.

https://dheerajwatekar.blogspot.com/2016/11/blog-post_38.html

 

सन २०१७ : जिल्हा परिषद अहमदनगर आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने यावर्षी (२०१७) जागतिक पर्यावरण दिनी, जिल्ह्यातील ग्रामसेवक व शिक्षकांसाठी पर्यावरण कार्यशाळा घेण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यशाळेत वृक्षारोपण काळाची गरज, पाऊस कसा वाढवता येईल ?, वृक्षारोपण व संवर्धन कसे करावे, प्रशासन आणि वृक्षारोपण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र टाइम्समीडिया पार्टनर असलेल्या या कार्यशाळेस ना. सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखेपाटील, उपाध्यक्षा राजश्री घुले, सीईओ रवींद्र बिनवडे, सामाजिक वनीकरणचे निमसे साहेब, फंड साहेब, जि.प. अहमदनगरचे उपकार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी, विभागीय वनाधिकारी पी. पी. भामरे, अशोक कोल्हे, तुकाराम अडसूळ आणि आयोजक आबासाहेब मोरे उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ५ जून २०१७ रोजी चिपळूणातील प्रसिद्ध पावसाळी पर्यटन स्थळ सवतसड़ा धबधबापरिसरात निसर्ग व सामाजिक पर्यावरण  प्रदूषण  निवारण  मंडळ  महाराष्ट्रसंस्थेचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव-पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या बहावा, आपटा, बिट्टी, बिब्बा या जातीच्या बियाणांतून तयार तयार झालेल्या एक वर्ष वयाच्या झाडांचे रोपण महेन्द्रगिरी निसर्गमित्र संस्थेच्या युवकांनी वृक्षारोपण केले. यावेळी पंचायत समिती सदस्या ऋतुजा पवार, पेढ़े गावचे सरपंच दीपक मोरे, पोलिसपाटील सौ. वैष्णवी पाणकर, माजी सरपंच संतोष चोपड़े, मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चोपड़े, सामाजिक कार्यकर्ते रूपेश पवार, ‘ड़ॅशिंग स्क्वाडचे चिन्मय गोखले आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकणात निसर्ग व सामाजिक पर्यावरण  प्रदूषण  निवारण  मंडळ  महाराष्ट्रसंस्थेचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक आणि  सचिव-पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर हे सातत्यपूर्ण पर्यावरण संवर्धनउपक्रम राबवीत असतात. जंगली बीयाणे पुरवठादार आणि चंदनतज्ज्ञ महेन्द्र घागरे यांच्या सहकार्याने, अध्यक्ष आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात गेली तीन वर्षे चंदन लागवड अभियानराबवीत आहेत. त्याचप्रमाणे ७५ लाख बीज पेरणी अभियान’, किल्ले गोविन्दगड वृक्ष लागवड मोहीम, रोपवाटिका उभारणी, वृक्षारोपण मोहिमा, रत्नागिरी जि. प. शाळांत पर्यावरण संवर्धन विषयक जाणीवा जागृत करणारे उपक्रम कोकणात संस्था सातत्याने राबवित आहे.

दिनांक १६ आणि १७ सप्टेंबर २०१७ रोजी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंड़ळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक आणि सचिव पर्यटन अभ्यास धीरज वाटेकर यांनी, कोकणात-दापोलीत नुकतेच संपन्न झालेल्या पर्यावरण विषयी कार्यशाळादरम्यान महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांची भेट घेऊन  त्यांना मंडळाच्या सध्या सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी, त्यांनी गतवर्षी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली, राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या पर्यावरण संमेलनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेला माहितीपूर्ण वनश्री’  विशेषांक भेट दिला. या भेटीत बर्डेकर यांनी संस्थेचे कार्य जाणून घेतले. या कार्यशाळेत उपस्थित पर्यावरणप्रेमीना मंडळामार्फत चंदनतज्ञ महेंद्र घागरे यांनी भेट दिलेल्या चंदन रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.  

मंडळाने स्थापनेपासून सन २००५ ते २०१७ पर्यंत मंडळाने स्पर्धेच्या माध्यमातून कोट्यावधी विद्यार्थी आणि लाखो शिक्षक पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कार्यात सहभागी करून घेतले आहे.   

दुसरे पर्यावरण संमेलन, राळेगणसिद्धी २०१७ : मंडळाचे दुसरे राळेगणसिद्धी पर्यावरण संमेलन दिनांक २७, २८ ऑक्टोबर २०१७ रोजी आदरणीय अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली, मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या सक्रीय मार्गदर्शनाखाली विलास महाडीक, धीरज वाटेकर, आबासाहेब जगताप, प्रमोद काकडे, प्रा. लालासाहेब गावडे, प्रमोद मोरे, रामदास ठाकर, बापूराव खामकर, बाळासाहेब जठार, मारुती कदम, तुकाराम अडसूळ, वैभव मोरे, प्रमोद मोरे, लालासाहेब गावडे, रतन पाटील, गोरख शिंदे, प्रा. भाऊसाहेब सोनवणे, प्रा. प्रवीण गुणवणे, लतीफ राजे, तुकाराम अडसूळ, मारुती कदम, विजयकुमार बेबडे, राजू आंबेकर, राजन सोमासे, पांडुरंग आहेर, डॉ. गजानन हिरोळे, प्रा. नागेश शेळके, लक्ष्मण साळुंखे, व्यंकट लाडके, मनीषा लहारे, वनश्री मोरे, प्रियवंदा तांबोटकर, कावेरी मोरे उल्का कुरणे, शारदा होसिंग, वीणा नवले, कांचन सावंत, दीपाली शिंदे आदि राज्यभर पर्यावरण संवर्धन विषयक उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या सदस्यांच्या सहकार्याने यशस्वी झाले. 

सन २०१८ : दिनांक २२ जानेवारी २०१८ रोजी चिपळूण नजीकच्या आय.एस.ओ. २०१५-१६ मानांकित जिल्हा परिषद शाळा धामणदिवी नं. १ येथे रोपवाटिका लागवडया उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. निसर्ग व सामाजिक पर्यावरण  प्रदूषण  निवारण  मंडळ  महाराष्ट्रयांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अर्जुनसादडा, चंदन, बहावा या जातीच्या बीजांची पेरणी करण्यात आली. उपक्रमाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्या संजीवनी नरळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण  प्रदूषण  निवारण  मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव-पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, धामणदिवी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संजय नरळकर, मुख्याध्यापिका सौरवी जाधव, उपशिक्षिका विद्या गुजर, उपशिक्षिक विकास राठोड, पदवीधर शिक्षक मधुकर शिंदे, उपस्थित होते.

दिनांक २८ मार्च २०१८ रोजी चिपळूण शहरातील बांदल इंग्लिश स्कूलच्या आवारात संपन्न झालेल्या  चिपळूण तालुकास्तरीय शिक्षणाची वारीकार्यक्रमात, राज्यभर पर्यावरणाच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळया संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे राज्य उपाध्यक्ष, जि. प. शाळा उक्ताडचे पदवीधर शिक्षक विलास महाडिक आणि राज्य सचिव सचिव धीरज वाटेकर यांनी प्राथमिक शाळा भिले (भोई)चे पदवीधर शिक्षक आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक उपचारतज्ज्ञ जगदीश थरवळ यांच्या विशेष प्रयत्न आणि सहकार्यातून उभारलेल्या, पर्यावरण वाचविण्याचा संदेश देणाऱ्या स्टॉलला दिवसभरात विविध मान्यवरांनी भेट देऊन दखल घेतली आणि प्रभावी कामाचे कौतुक केले. या स्टॉलला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.

दिनांक २४ एप्रिल २०१८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील श्रीकुलदेवता मंडळ परचुरी (चंदरकरवाडी) यांच्या वार्षिक श्रीसत्यनारायण महापूजा, हळदीकुंकू आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने, हरित मित्र परिवार पुणे, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण  प्रदूषण  निवारण  मंडळ  महाराष्ट्रआणि शिल्पकार वाचनालय, परचुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळावा-चंदन बीज वाटपकार्यक्रमाला पंचक्रोशीतील महिला-ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी उस्फूर्त उपस्थिती  देऊन पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला प्रतिसाद दिला. यावेळी सर्वांना मंडळाच्या वतीने चंदनाच्या बियाणाचे वाटप, मार्गदर्शन, पर्यावरण वाचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला चंदनतज्ज्ञ, ‘वनश्रीमहेंद्र घागरे, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण  प्रदूषण  निवारण  मंडळ  महाराष्ट्रसंस्थेचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव-पर्यटन अभ्यासक आणि लेखक धीरज वाटेकर, कृषी विस्तार अधिकारी काटकर, पोकळे, पं. स. सदस्य परशुराम वेल्ये, परचुरीच्या सरपंच स्वप्नाली माटल, परचुरी शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक संतोष कडवईकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गोविंद कळंबटे, वाडीप्रमुख भिवा बाळ चंदरकार, प्रदीप चंदरकार, विजय भोसले, वसंत मेस्त्री, राजाराम लिंगायत गुरुजी, पोलीसपाटील सुधीर लिंगायत उपस्थित होते.

दिनांक २६ एप्रिल २०१८ रोजी अहमदनगरचे कलेक्टर मा. राहुल द्विवेदी यांच्याशी पर्यावरण संवर्धन कार्यक्रम आणि भूतान पर्यावरण संमेलन याविषयी चर्चा करण्यात येऊन त्यांचा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने, अध्यक्ष, वृक्षमित्र मा. आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे खजिनदार पीटर रणसिंग, कार्यालयीन चिटणीस तुकाराम अडसूळ, संघटक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रामदास ठाकर उपस्थित होते. 

दिनांक १ मे २०१८ रोजी चिपळूण तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा सावर्डे भुवडवाडी येथे महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून ८०० रोपांच्या रोपवाटिकेचा शुभारंभ चंदनतज्ज्ञ, ‘वनश्रीडॉ. महेंद्र घागरे, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण  प्रदूषण  निवारण  मंडळ  महाराष्ट्रसंस्थेचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, राज्य सचिव-लेखक धीरज वाटेकर, पत्रकार प्रकाश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अमरदीप कदम, शिक्षिका पल्लवी पाटील आणि ग्रामस्थांच्या विशेष उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी चंदन, नरक्या, विलायती चिंच, रिंगी, खाया, सागरगोटा, पुत्रंजीवा, बांबू, आंबट चिंच, कांचन जातीच्या बियाणाचे वाटप, करण्यात येऊन  पर्यावरण रक्षणाबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.  

दिनांक ५ जून २०१८ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाथर्डी (अहमदनगर) येथे पर्यावरण स्नेही संघ या स्वयंसेवी सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निसर्ग संवर्धन पुरस्कार २०१८ कार्यक्रमात मंडळाने सक्रीय सहभाग घेतला. यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, पाथर्डी पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पं. स. सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत पवार, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी जयसिंग जवक, शारदा होशिंग, तुकाराम अडसूळ उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान वृक्षमित्र मोरे यांचा अभिष्टचिंतन गौरव साजरा करण्यात आला.

दिनांक २६ जून २०१८ रोजी अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी आणि सध्याचे महाराष्ट्र राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य-सचिव डॉ. पी. अन्बलगन यांचा संस्थेस केलेल्या सहकार्याबद्दल निसर्ग व सामाजिक पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने अध्यक्ष आबासाहेब मोरे यांच्या हस्ते मंत्रालयात सत्कार करण्यात आला.

दिनांक २७ जून २०१८ रोजी वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षमित्र आबासाहेब मोरे, मा. आ. रंजनाताई कुल, पोपटराव शेलार आणि सुभाष तापकीर या मान्यवरांनी  ग्रामस्थांच्या उपस्थितीत देलवडी, ता. दौड, जि. पुणे येथे मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबविला.

दिनांक २७ जून २०१८ रोजी वटपौर्णिमेच्या दिवसाचे औचित्य साधून चिपळूण येथील परशुराम घाटात, प्रसिद्ध पावसाळी पर्यटन स्थळ सवतसड़ा धबधबापरिसरात महेन्द्रगिरी निसर्गमित्र संस्थेच्या युवकांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्रसंस्थेच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण आणि बीजपेरणी अभियान राबविले. यावेळी महेन्द्रगिरी निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष अनिकेत चोपड़े, सदस्य अवधूत पाणकर, मनोज माने, मनोज पटेल, मंगेश राठोड, अनिकेत भोसले, सल्लागार विलास महाडिक आणि धीरज वाटेकर उपस्थित होते. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्रसंस्थेचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव-पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या बहावा, आपटा, रिंगी, बेहेडा, अर्जुनसादडा या बियाणांची सवतसडा धबधबा ते विसावा पॉईंट मार्गावर डाव्या बाजूच्या दरीत पेरणी आणि पिंपळ आणि बहावा जातीच्या रोपांची लागवड यावेळी करण्यात आली.

दिनांक १ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत जि. प. प्राथमिक शाळा श्रीगोंदा (शुगर), ता. श्रीगोंदा येथे वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी लिंपणगाव ग्रा. पं. सरपंच सौ. माधुरीताई साळवे, पं. स. श्रीगोंदाचे सदस्य नानासाहेब ससाणे, कारखान्याचे कार्यकारी संचालक नाईक, भा.ज.प.चे ज्येष्ठनेते नंदकुमार कोकाटे, श्रीगोंदा सा. कारखान्याचे संचालक विलास काकडे, ग्रा. पं. सदस्य निळकंठ जंगले, वृक्षमित्र आबासाहेब मोरे, सामाजिक वनीकरणचे वनपाल दरेकर, मुख्याध्यापिका श्रीम. साळवे, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दिनांक ७ जुलै २०१८ रोजी चिपळूण तालुक्यातील पेढे बौद्धवाडी येथील स्मशानभूमी परिसरात महेन्द्रगिरी निसर्गमित्र संस्थेच्या युवकांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्रसंस्थेच्या मार्गदर्शनाखाली बहावा, नीव, उंबर जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी पेढे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रविण पाकळे, ग्रामपंचायत सदस्या चित्रा गमरे, कालुस्ते गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार काजारे, पेढे गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तुषार गमरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष डी. एस. मोहिते, पेढे ग्रामस्थ अमित गमरे, सुरज गमरे, साहिल तांबे, चिपळूण वनविभागाचे वनरक्षक दत्ताराम सुर्वे, रामदास खोत, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण  प्रदूषण निवारण  मंडळ  महाराष्ट्रसंस्थेचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव-पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, अध्यक्ष अनिकेत चोपडे, सदस्य अवधूत पाणकर, मनोज माने, अविनाश बुरटे उपस्थित होते.

दिनांक ८ जुलै २०१८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, थिटे सांगवी, ता. श्रीगोंदा येथे वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर कलश, रोपे घेऊन, टाळ आणि वीणा गजरात गावातून वृक्षदिंडी काढली. यावेळी ग्रामस्थही कौतुकाने या चिमुकल्यांच्या वृक्षदिंडीत सामील झाले होते. गावातील महिलांनी ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत केले. यावेळी जेष्ठ नागरिक देविदास वाळके, मुखाध्यापक ईश्वर नागवडे, पिटर रणसिंग, संदिप काळे, श्रीम. सुनिता गोलवड   पोलिसपाटील शिवाजी वाळके, ग्रामसेवक दत्तात्रय वाघ उपस्थित होते.

दिनांक ८ जुलै २०१८ रोजी श्रीक्षेत्र सुरेगाव येथे प.पू. श्रीआनंदाश्रम स्वामी महाराज यांच्या मठामध्ये वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रमात पंचक्रोशीतील वारकरी, ग्रामस्थ आणि तरूण सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी झाडे जगवण्याचा संकल्प केला. त्यासाठी दूरवरून पाण्याची व्यवस्था आणि वृक्षांच्या सुरक्षेसाठी ट्रीगार्डची व्यवस्था करण्यात आली. यावेळी सुरज आबासाहेब टकले, प्रदीप टकले, इब्राहिम शेख, गावचे सरपंच सर्जेराव रोडे, स्वामी संस्थानचे अध्यक्ष मनमोहन सिंग कोचर, अंकुश रोडे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

जुलै २०१८ मध्ये निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्रसंस्थेचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव-पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या जंगली बियाणे आणि रोपांची लागवड करण्याचा उपक्रम चिपळूण शहरानजीकच्या पेठमापच्या जुन्या मराठी शाळेजवळ आणि नवीन स्मशानभूमी परिसरात, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आकले नंबर १ शाळा आणि सती-चिंचघरी प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण आणि सीडबॉल उपक्रम राबविण्यात आला.

तिसरे पर्यावरण संमेलन आणि भूतान - आंतरराष्ट्रीय निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौरा, २०१८ : ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी पर्यावरण संमेलनआयोजित करणाऱ्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंड़ळ महाराष्ट्रआणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते २० नोव्हेंबर २०१८ दरम्यान तिसरे पर्यावरण संमेलन आणि राज्यातील ८० पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा भूतान : आंतरराष्ट्रीय निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न झाला. उद्घाटन सोहोळा १० नोव्हेंबर रोजी दुपारी, पुणे जिल्ह्यातील दौण्ड येथील शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयात संपन्न झाला. यावेळी दैनिक सकाळचे उपसंपादक आणि सिनेदिग्दर्शक राज काझी, नाट्यकर्मी व सिनेअभिनेते शैलेश पितांबरे, दौण्डचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, दौण्डच्या नगराध्यक्षा शीतलताई कटारिया, मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबसाहेब मोरे, कुकडी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष डांगे, भीमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रमशेठ कटारिया, डॉ. विजय बगाडे, प्रमोद काकडे, प्रमोद मोरे, विलास महाडीक, बाळासाहेब जठार, तुकाराम अडसूळ, गोरखनाथ शिंदे, भाऊसाहेब सोनवणे, वैभव मोरे उपस्थित होते. उद्घाटन सोहोळ्याचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर सर्व पर्यावरणप्रेमी भूतानला रवाना झाले. भारत-भूतान बॉर्डरवरील जयगाव येथील हॉटेल क्लासिक इन् च्या कॉन्फरन्स हॉलमध्ये १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 'भूतान कसा पाहावा ?' या विषयी धीरज वाटेकर यांनी सर्वांना विस्तृत माहिती दिली.

 

भूतान : आंतरराष्ट्रीय पर्यावरण अभ्यास दौरा २०१८ चा सविस्तर वृत्तांत आपण खालील ब्लॉगलिंक क्लिक करून वाचू शकता.

https://dheerajwatekar.blogspot.com/2018/11/blog-post.html

 

भारत-भूतान बॉर्डरवरील २ दिवस मुक्काम, पारो येथील २ दिवस मुक्काम, राजधानी थिम्फू येथील ३ दिवस मुक्काम अशा एकूण मुक्कामी ७ दिवसांच्या भूतानमधील वास्तव्यात सर्व पर्यावरणप्रेमींनी, हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेल्या या ऑफबीट डेस्टिनेशन मधील वनराई, नैसर्गिक सौंदर्य, बौद्ध मॉनेस्ट्री, किल्ले यांची अभ्यासपूर्ण पाहाणी केली. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी, नामवंत सी.ए. राज देशमुख, सुशांत जवक यांनी मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नपूर्वक, भूतानमधील भारताचे राजदूत आदरणीय जयदीप सरकार यांची सर्व प्रतिनिधींना महत्वपूर्ण भेट घडवून आणली. दूतावास कार्यालयाकडून भूतानच्या इंडिया हाऊस प्रांगणात भव्य शामियाना उभारून माननीय राजदूत साहेबांसोबत संवाद आणि चहापानाच्या कार्यक्रमाद्वारे उपस्थित प्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी इंडिया हाऊस मधील वरिष्ठ अधिकारी इशा श्रीवास्तव तसेच एकेकाळचे आबासाहेब मोरे यांचे विद्यार्थी राहिलेले वरिष्ठ अधिकारी समीर अकोलकर उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांच्या हस्ते  भारताचे राजदूत आदरणीय जयदीप सरकार यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीप्रसंगी माननीय सरकार साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सर्वाना भूतान देशाविषयी अधिकची माहिती प्राप्त झाली. भूतान देशाच्या पर्यावरण अभ्यास दौऱ्यानंतर सर्व प्रतिनिधी आदरणीय पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली राळेगणसिद्धी येथे होणाऱ्या समारोपासाठी एकत्र जमले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे महाव्यवस्थापक विजयकुमार ठुबे, सी.ए. राज देशमुख उपस्थित होते. विजयकुमार ठुबे यांनी बोलताना, मराठी माणूस फारसा घराबाहेर पडत नसल्याबाबत खंत व्यक्त करून सहभागी प्रतिनिधींचे अभिनंदन केले. भूतानच्या चांगुलपणाचे कौतुक करताना आपल्या देशाचाही अभिमान बाळगायला हवा, असे ते म्हणाले. समारोपप्रसंगी आदरणीय अण्णा हजारे यांनी आपल्या भाषणात सामाजिक प्रदूषणाबाबत सर्वाना अवगत केले. टाकाऊ पासून टिकाऊ निर्माण करण्याचा संकल्प करण्याचे, विषयाची आसक्ती कमी करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. जगभरात प्रदूषणामुळे आजार, तापमान, समुद्रपातळी वाढतेय, हिमनद्या वितळताहेत. त्यामुळे या विषयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. मंडळाचे तिसरे पर्यावरण संमेलन आणि राज्यातील ८० पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा भूतान : आंतरराष्ट्रीय निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल, महाराष्ट्रभरातून सहभागी झालेले सर्व पर्यावरणवादी कार्यकर्ते, विविध मार्गदर्शक, संस्थेचे सतत सहकार्य करणाऱ्या हितचिंतकांप्रति अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.  

सन २०१९ :

मंडळाच्या वतीने याच उपक्रमांतर्गत जानेवारी २०१९ मध्ये पशुपक्षी वाचवाअभियानांतर्गत राळेगणसिद्धी येथे मोरांसाठी ५ पोती धान्याचे वाटप करण्यात आले. राळेगणसिद्धी येथे मोरांची मोठी असलेली संख्या पाहून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी सांगितले. पशु-पक्ष्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणी धान्य पुरविण्याचा संकल्प यावेळी मंडळाने जाहीर केला. 

फेब्रुवारी २०१९ मध्ये निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने अध्यक्ष आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा येथे पशुपक्षी वाचवाअभियान सुरु करण्यात आले. मंडळाच्या वतीने सदस्य  मधुकर काळाणे यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना पशु-पक्षांसाठी पाण्याच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. आबासाहेब मोरे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, पशु-पक्षांसाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

चिपळूण शहरानजीक उक्ताड येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळासह अॅक्टीव्ह ग्रुप, ग्लोबल चिपळूण टुरिझम, महेंद्रगिरी निसर्ग मित्र, निसर्गसेवक आऊटडोअर्स, श्री परशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्र, चिपळूण सायकल क्लब, सह्यसागर, विकास सहयोग आणि वन विभाग चिपळूण या पर्यावरणात काम करणाऱ्या संस्थांच्या वतीने निसर्गरम्य जुवाड बेट येथे आमराईतील आम्रवृक्षाच्या छायेत जागतिक वनदिन (२१ मार्च) संपन्न झाला. हा कार्यक्रम तीन तास चालला. यावेळी जि. प. मराठी शाळा उक्ताड ते जुवाड भेट अशी पर्यावरण घोषणा आणि गीतांसह प्रभात फेरी काढण्यात आली. उद्घाटनप्रसंगी ग्लोबल चिपळूण टुरिझमचे चेअरमन श्रीराम रेडिज, निसर्गप्रेमी बालक रविराज शिंदे यांच्या हस्ते आम्रवृक्ष पूजन करण्यात आले. यावेळी श्रीराम रेडिज, निलेश बापट, डीबीजे कॉलेजचे प्रा. सावरे, प्रा. भादुले, प्रा. पुनवतकर, शिवाजी शिंदे, वनविभागाचे पत्की यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले. रेडिज यांनी निसर्गाच्या सानिध्यात मिळणारा आनंद समजून घ्या असे विद्यार्थ्यांना सांगितले. समीर कोवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या नेचरट्रेल मध्ये यावेळी मान्यवरांनी सहभाग घेतला. मुलांशी बोलताना वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांनी निसर्ग वृत्तपत्रासारखा वाचता आला पाहिजे असे सांगितले. निसर्गात कायम आनंद मिळतो, जगण्याचा श्वास पूर्ण होतो त्यामुळे निसर्ग संवर्धनासाठी आपण सतत जागरूक राहिले पाहिजे असे ते म्हणाले. धीरज वाटेकर म्हणाले, सध्याच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात प्रत्येकाला व्यक्त होणे सोपे झाले आहे. त्यामुळे आपण आपले अनुभव स्वत: लिहायला हवेत. ते मांडायला हवेत. निसर्गातील नवलाईबद्दल आपण आपले विचार लिहायला-बोलायला सुरुवात केल्यास निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने ते महत्वाचे पाऊल ठरेल असे ते म्हणाले. विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या तीन गटात यावेळी चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. आदर्श वृक्षसंवर्धन कार्याबद्दल अनारी गावचे विजय कदम यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आलिमशेठ परकार, विलास महाडिक, सतीश मुणगेकर यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन, प्रास्ताविक अॅक्टीव्ह ग्रुपचे अध्यक्ष कैसर देसाई यांनी केले.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने दुष्काळाच्या झळा बसणाऱ्या अहमदनगर- सावेडी भागात मे २०१९ मध्ये जॉगिंग ट्रॅकवर पक्षांसाठी पाणी आणि मुठभर धान्य यांकरिता मातीच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष आबासाहेब मोरे, स्वच्छतादूत शारदा होशिंग, तुकाराम अडसूळ, गोरखनाथ शिंदे, साहेबराव दरेकर उपस्थित होते. 

जागतिक पर्यावरण दिनी दिनांक ५ जून रोजी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन विषयात काम करणाऱ्या संरक्षकांचा, शहरात कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या ३० महिलांचा साडी-चोळी, शाल देऊन राज्य वखार महामंडळाचे महाव्यवस्थापक विजयकुमार ठुबे, डॉ. बाळ बोठे पाटील, केंद्र शासनाच्या नदी जोड प्रकल्पाचे संचालक राज देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी पर्यावरण जनजागृती महत्वाची असल्याचे यावेळी सांगितले. मंडळाचे तुकाराम अडसूळ, सुभाष वाखारे,शारदा होशिंग, गोरखनाथ शिंदे, प्रमोद मोरे, वैभव मोरे,पीटर रणसिंग, अनिल लोखंडे, रामदास ठाकर, भाऊसाहेब सोनवणे उपस्थित होते. 

चिपळूण नजीकच्या लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीच्या ग्रीन झोनमध्ये ११ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा येथे १ जुलै, कृषिदिनाच्या निमित्ताने उंबर, चाफा, बहावा, पिंपळ जातीच्या १५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव धीरज वाटेकर यांनी ही रोपे उपलब्ध करून दिली. श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज यांच्या उपस्थितीत या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी महेंद्रगिरी निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष अनिकेत चोपडे, नंदन धीरज वाटेकर, इंचगिरी सांप्रदायचे बुवा चव्हाण उपस्थित होते.

दिनांक ६ जुलै रोजी शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत अहमदनगर येथील भुईकोट किल्ला परिसरात पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

दिनांक १६ जुलै रोजी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी अहमदनगर जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षदिंडी आणि वृक्षारोपणमोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात जिल्ह्यातील विविध १७ सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधिक्षक इशू सिंधू,आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग उपस्थित होते. वृक्षदिंडी ही न्यू आर्ट्स कॉलेज ते नावे न्यायालय या दरम्यान काढण्यात आली. एक झाड लावून ते वाढविल्यास आपल्याकडून किमान ३५ लक्ष रुपयांची सेवा होऊ शकत असल्याचे यावेळी आबासाहेब मोरे यांनी सांगितले.

चिपळूण नजीकच्या गोवळकोट येथील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा गोवळकोट (भोई)च्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी वाशिष्ठी नदीचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगड परिसरात जांभूळ, बहावा आदि जातीच्या १० वृक्षांचे रोपण केले. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्रसंस्थेचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव धीरज वाटेकर यांनी यावेळी वृक्षारोपणासाठी बहावा जातीचे रोपे उपलब्ध करून दिली. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण चळवळ या विषयात प्रत्यक्ष अनुभुतीतून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख गर्जे, सहशिक्षक दिवाकर पवार, शितल राजे, मनीष भुरण, अंकुश राऊत, प्रिया जांभळे, विद्या पाटणकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल हरवडे, सदस्या दिप्ती हरवडे उपस्थित होते.

चिपळूण तालुक्यातील माध्यमिक महिला विद्यालय पाग, न्यू इंग्लिश स्कुल पाग, इंग्लिश मिडियम स्कुल, पाग, महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोम, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कापरे (देऊळवाडा) या शाळांमध्ये दिनांक २४ सप्टेंबर रोजी पर्यावरण उपक्रमांतर्गत चंदन बीज वाटप आणि पर्यावरण संवर्धन मार्गदर्शनकार्यक्रम संपन्न झाला. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि हरित मित्र परिवार पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हरित मित्र परिवार पुणेचे संस्थापक-अध्यक्ष वनश्रीडॉ. महेंद्र घागरे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव धीरज वाटेकर, कार्यक्रमाच्या संयोजनात महत्वाची भूमिका बजावणारे केंद्रप्रमुख शेषराव गर्जे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सुमारे चंदन २ लाख चंदन बीज, ८० हजार खैर बीज आणि ४ हजार रक्तचंदन बीज वाटप करण्यात आले. या चंदन बीज वाटप आणि पर्यावरण संवर्धन मार्गदर्शनकार्यक्रमामागची भूमिका धीरज वाटेकर यांनी मांडली. मनुष्याच्या आजूबाजूचा निसर्ग हे शाश्वत, संतुलित आणि चिरंतन सत्य आहे. परिणामांचा अभ्यास न करता, पर्यायी व्यवस्था न देता गेल्या काही शतकांपासून होत असलेली निसर्गाची लयलूट आज मानवाच्या मूळावर उठली आहे. निसर्गात ढवळाढवळकेल्यामुळे आपण आज नैसर्गिक आपत्ती युगाचा सामना करीत आहोत, असे वाटेकर म्हणाले. यंदाच्या सर्वात मोठ्यादिनी २१ जून रोजी चांगले पर्जन्यमान असलेल्या भारताच्या अनेक भागात उष्णता भाजून काढत होती. ऋतू पावसाळा चालू आहे, असे वाटत नव्हते. पूर्वी जूनमध्ये वेळापत्रकानुसार पाऊस यायचा. या बदलाचा विचार करता मनुष्याने जागे होण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. शेवटी निसर्ग आहे तसा ठेवाहे अद्वैत समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. घागरे यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाकडे चलाअसा संदेश दिला. छोट्या छोट्या उदाहरणातून त्यांनी मुलांना निसर्गाचे महत्त्व समजावून सांगितले. झाडे ओळखायला शिका. झाडाच्या भावना ओळखायला शिका. झाडांनी आपल्याला मानसिक, आर्थिक अशी सर्वंकष श्रीमंती दिली आहे, असे ते म्हणाले. दिले जाणारे बीयाणे कुंडीत कसे लावावे ? याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात येऊन काही विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमात ते करून घेण्यात आले. कोकणातला निसर्ग हिरवागार आहे. डोंगरात काहीकाही जागा रिकाम्या आहेत. वृक्षारोपण करून त्या भरण्याचे आवाहन त्यांनी केले. आपलं शरीर, मन आपल्याशी जेवढं प्रामाणिक आहे, त्यापेक्षा निसर्ग अधिक प्रामाणिक आहे, असे डॉ. घागरे म्हणाले. विलास महाडिक यांनी शालेय स्तरावर राबविता येऊ शकणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी भूतानच्या शाळेत पाहिलेला निसर्ग, स्वच्छता याबाबत विद्यार्थ्यांना आठवणी सांगितल्या. केंद्रप्रमुख गर्जे यांनी सध्या दिल्या जाणाऱ्या बीयांचे रोपण करून पुढच्या वर्षी झाडे लावण्यासाठी रोपवाटिका तयार करण्याचे आवाहन केले. कापरे जि.प. शाळेच्या मुलांनी हाताने बनविलेल्या कागदी फुलांनी मान्यवरांचे स्वागत केले. विशेष म्हणजे या फुलांना मुलांनी अत्तर लावलेले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कांबळे, सहाय्यक शिक्षक जी. डी. सोनावणे, वाघमारे (भोम), मुख्याध्यापिका सौ. प्रिया नलावडे, शैलेश सुर्वे, महेंद्र साळुंखे (पाग), शिक्षिका सरिता कादवडकर, जयश्री सकटे, जयश्री लोंढे, शीतल सकपाळ, शिक्षक सचिन वाघे, शरद पवार (कापरे) यांनी विशेष मेहनत घेतली.

जागतिक कर्णबधीर दिनाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा मुकबधीर असोसिएशनतर्फे दिनांक ३० सप्टेंबर रोजी आयोजित दिव्यांग मेळाव्यात मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कामगार नेते आनंद वायकर, अनंत लोखंडे, सुनिल जगदाळे, मुकबधीर असोसिएशनचे अध्यक्ष आनंद कडूस आणि ३०० युवक सहभागी झाले होते.

गांधी जयंतीदिनी अहमदनगरच्या हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा स्मारक येथे वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, तहसीलदार उमेश पाटील उपस्थित होते.

दिनांक २५ ऑक्टोबर रोजी हिरवेबाजार (अहमदनगर) येथे कृषी विद्यार्थ्यांनी केलेल्या सीडबॉल उपक्रमात सहभागी राज्यातील शाळांचा गौरव करण्यात आला. शाळांना वृक्षसंवर्धन चळवळ राबविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, पोपटराव पवार, शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर उपस्थित होते.

चौथे पर्यावरण संमेलन चिपळूण नोव्हेंबर : समस्यांच्या भस्मासूरावर मात करायची असेल तर तर लोकजागृती प्रभावीपणे व्हायला हवी. याची पक्की जाणीव असलेले मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्रआबासाहेब मोरे यांनी आपल्या शिक्षकी कारकीर्दीत, ४० वर्षांपूर्वी  पर्यावरणीय कामास प्रारंभ केला. निवृत्तीनंतर अधिक सक्रीय होत त्यांनी पर्यावरण संमेलन घ्यायला सुरुवात केली. पुढची पिढी घडविण्यात शिक्षकया समाजघटकाचे असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना वर्तमान स्थितीची अधिकाधिक सजगतेने जाणीव करून देत संवर्धन विषयक जनजागृती व्हावी या हेतूने ही संमेलने घेतली जातात. अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली तीन संमेलने राळेगणसिद्धी येथे यशस्वी झाल्यानंतर पर्यटनभूमी अशी ओळख असलेल्या कोकणात संमेलन घेताना इथले पर्यावरण, त्यात काम करणाऱ्या हातांची ओळख, पर्यावरणाची पूर्व आणि सद्यस्थिती, कोकणात, चिपळूणात होणारी वृक्षतोड, जलप्रदूषण, वायुप्रदूषण हे गंभीर बनलेले प्रश्न, चिपळूणातील जैवविविधतेचे दर्शन, चिपळूणाल्या दळवटणे भागात तत्कालिन सैन्याला उद्देशून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पर्यावरण संदर्भातील विचार सांगणाऱ्या ऐतिहासिक पत्राची मांडणी संमेलनाच्या व्यासपीठावरून व्हावी असे उद्देश समोर ठेवून संमेलनाचे नियोजन करण्यात आले होते. या विषयात संमेलनस्थळी झालेले संवाद, मांडले गेलेले मुद्दे, पर्यावरणात काम करणाऱ्या वक्त्यांचे अनुभवकथन आदि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा येथून आलेल्यांना भावल्या. दिनांक १ नोव्हेंबर रोजी दुपारनंतर राज्यभरातून पर्यावरणप्रेमी चिपळूणात हॉटेल आम्रबन परशुराम येथे दाखल व्हायला प्रारंभ झाला. खुद्द संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत रात्री भोजन समयी परिचय सत्र संपन्न झाले. पर्यावरणासह पर्यटन विकासया सूत्राने काम करणारी ग्लोबल चिपळूण टुरिझमही संस्था संमेलनाची संयोजक राहिली. निमंत्रक धीरज वाटेकर यांनी संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन केले.

संमेलनाचा उद्घाटन समारंभ दिनांक २ रोजी सकाळी १०.४५ ते २.१५ दरम्यान संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. उमेश मुंडल्ये (प्रख्यात जल आणि देवराईतज्ज्ञ), उद्घाटक भाऊ काटदरे (खवले मांजर तज्ज्ञ कमिटी सदस्य, आय.यु.सी.एन. स्पेसीज सर्व्हायव्हल कमिशन आणि अध्यक्ष, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, चिपळूण) प्रमुख पाहुणे विजयकुमार ठुबे (माजी महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ), परशुराम करावडे (कार्यकारी अभियंता, एम.आय.डी.सी., रत्नागिरी), स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज (उद्योजक आणि अध्यक्ष, ग्लोबल चिपळूण टुरिझम), वृक्षमित्र आबासाहेब मोरे (अध्यक्ष, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ), विलास महाडिक (उपाध्यक्ष, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ), मंडळाचे सल्लागार अॅड. सुभाषराव डांगे होते. सुरुवातीला धीरज वाटेकर यांनी संमेलनस्थळ आणि यापूर्वीच्या तीन संमेलनांतील अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाचा आढावा घेतला. यंदाचे पर्यावरण संमेलन संपन्न होत असलेले चिपळूण शहर हे कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे शहर आहे. परशुराम भूमी अशी ओळख असलेल्या या शहरात यापूर्वी अखिल भारतीय, जलसाहित्य, बोलीभाषा, बालकुमार, कामगार, समरसता, शतकोत्तर ग्रंथालये, लेखक-प्रकाशक अशी जवळपास पंचवीसएक प्रकारची संमेलने, कोकण पर्यटन महोत्सव संपन्न झाले आहेत. इथला श्रोता हा सजग आणि बहुश्रुत आहे. या शहराचे सामाजिक भान अतिशय उत्तम आहे. इथल्या मातीत कार्यरत असलेल्या काही मान्यवरांना संमेलनकाळात आपल्या सर्वांच्या समोर आणण्याचा आमचा मानस आहे. पर्यावरणातील कार्यक्षम विचार समजून घेण्यासाठी संमेलनात सहभागी झालेल्या आपल्या सर्वांचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ५०० निमंत्रित शिक्षक प्रतिनिधींचे, पर्यावरणस्नेही कृतीशील समाज घटकांना प्रेरणा देणारे दोन दिवसीय पहिले पर्यावरण संमेलन राळेगणसिद्धी येथे आदरणीय अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली ११ व १२ नोव्हेंबर २०१६ मध्ये संपन्न झाले. मंडळाचे दुसरे राळेगणसिद्धी पर्यावरण संमेलन दिनांक २७, २८ ऑक्टोबर २०१७ ला, दिनांक १० ते २० नोव्हेंबर २०१८ दरम्यान तिसरे पर्यावरण संमेलन आणि राज्यातील ८० पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा भूतान : आंतरराष्ट्रीय निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाचे उद्घाटक भाऊ काटदरे आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्जवलन झाल्यानंतर अण्णांच्या संदेशाचा व्हिडीओ दाखविण्यात आला.

स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज यांनी आपली भूमिका मांडली.  ते म्हणाले, पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढीस लागलेली आहे. ही चांगली बाब आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या कोकणाला गेल्या ४/५ दशकांपासून पर्यावरणीय समस्यांनी ग्रासले आहे.सन १९८० ते २००० या काळात कोळसा तयार करण्यासाठी इथल्या जंगलांचा नाश झाला. अमर्याद तोडीमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या. सन १९८४ ते १९८७ दरम्यान जंगल वाचविण्यासाठीही देवरुख येथील पुरोगामी युवक संघटनेच्या पुढाकाराने कोकणात मोठे आंदोलन उभे राहिले. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्रमांक २२६७/१९८७) दाखल झाली. यामुळे कोकणातील भट्ट्यांवर बंदी घातली घेतली ती आजही कायम आहे. संजीव अणेराव, दादा जाधव, कै. विलास होडे, राजीव सरफरे यांनी हे आंदोलन केले होते. सन २००१ ते २०१० काळात राजकीय आशीर्वादाने कोकणात वृक्षतोड सुरु झाली. कारखान्याच्या बॉईलरला लागणाऱ्या लाकूड व जळावू कीटा याकरिता ही वृक्षतोड झाली. याहीवेळेस सह्याद्री बचाव आंदोलन काही स्वयंसेवी संघटनांनी आवाज उठविला. मोर्चे, उपोषणे, माहितीचा अधिकार यांद्वारे प्रयत्न सुरु झाले. यात श्रीराम रेडिज, संजीव अणेराव, राजन इंदुलकर, दादा जाधव, सुनिता गांधी आदिंचा सहभाग होता. दोन वर्षे हे आंदोलन चालले. कोकणातील चारही जिल्ह्यात वृक्षतोड बंदी झाली. दिनांक १९ मार्च २०१० रोजी ही मंडळी मुंबई-गोवा महामार्गावर बेमुदत साखळी उपोषणाला बसली. विधिमंडळात यावर चर्चा झाली. त्रिसदस्यीय समिती नेमली गेली. विधिमंडळात अहवाल सादर झाला. अहवाल मात्र धूळ खात पडलेला आहे. जंगल माफियांचे हित जपण्यासाठी हे घडले. कोकणात वारेमाप होणारी जंगलतोड थांबायला हवी. जंगल राखण्याकरिता शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट द्यायला हवे. शतकोटी वृक्ष लागवडीसारखा दिखाऊ कार्यक्रम घेण्यापेक्षा वृक्षतोड थांबवावी. इथल्या रासायनिक कारखानदारीमुळे जल, वायू आणि भूपृष्ठावरील प्रदूषण वाढलेले आहे. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ते महाड परिसरातील सावित्री, खेडची जगबुडी, चिपळूणची वाशिष्ठी अशी कितीतरी नावे सांगता येतील. हे सारे चिंताजनक आहे. प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी आपल्या पश्चिम घाट अहवालात या नद्यांना विषनद्याम्हटले आहे. मनमोहक वाशिष्ठी प्रदूषणाची बळी आहे. लोटे एम.आय.डी.सी. परिसरातील गावे वायू-जल-भूपृष्ठ प्रदूषणाने त्रस्त आहेत. कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी खाडीत सोडल्याने मासेमारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. इथले नागरिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळयांच्याकडे तक्रारी करतात. ते यावर कठोर कारवाई करणार का ? हा प्रश्न आहे. इथल्या सी.ई.टी.पी.च्या नियंत्रणाबाबत गंभीर तक्रारी आहेत. खाडीपट्यात फेरफटका मारून स्थानिकांशी बोलल्यास याची जाणीव होते. दाभोळ खाडीतील जैवविविधता मृतावस्थेत गेली आहे. कोकणात पर्यटनाच्या संधी वाढत आहेत. ४५ कि.मी.ची वाशिष्ठी खाडी, त्यातला निसर्ग आधारभूत मानून ग्लोबल चिपळूण टुरिझमकार्यरत आहे. वाशिष्ठी नदीत कोयनेचे स्वच्छ अवजल सोडले जाते. मात्र चिपळूणच्या चारही बाजूला असलेले डोंगर तोडले गेल्याने खाडी गाळाने भरलेली आहे. गाळ काढला जायलाच हवा आहे. मात्र पुढाऱ्यांचे फक्त गाळ काढण्याकडे लक्ष आहे. पर्यावरणाचे नुकसान होते आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणाची समिती असावी. सह्याद्रीत जंगल माफियांनी केलेल्या रस्त्यांवर डांबर टाकले तर स्टेट हायवे होतील. हे रस्ते अडीच हजार फुटांवर आहेत. पावसाळ्यानंतर जिल्ह्यातून प्रतिदिन १०० ते १५० ट्रक लाकूड घाटावर, मुंबईत जाते. यात गुंतलेल्या सर्वांना तुडुंब पैसे मिळतात. या तोडीकरिता परजिल्ह्यातून माणसे आणली जातात. अन्नाचा तुटवडा भासल्यास ती सरसकट शिकार करतात. हा ह्रास न परवडणारा आहे. वाशिष्ठीचा गाळ काढणे, पर्यटकांना कायम बोटिंग करता यावे याकरिता खासदार हुसेन दलवाई यांचे समक्ष आत्तापर्यंत पाच वेळा पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि अधिकाऱ्यांशी बैठका होऊनही काहीही उपयोग झालेला नाही. आपापल्या गावात पर प्रांतातून, जिल्ह्यातून आलेल्या लोकांची नोंद ठेवणे हे पोलीसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष याचे काम आहे ते होत नाही. जे.सी.बी., पोकलेनसारख्या अवजारांनी सह्याद्रीचे लचके तोडेलेले आहेत. जंगल तोडीची पाहणी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी आपण वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांच्यासह सह्याद्रीत गेलो असता स्थानिक लोकांनी रस्त्यात मोठे दगड टाकून रस्ता अडविला होता. लोकं आपल्याला मारायच्या तयारीने आलेली होती. पोलिसांची गाडी वेळेत आल्याने आपण बचावल्याचे रेडिज यांनी सांगितले. पर्यावरण वाचविण्यात, वाढविण्यात आपण काय करू शकतो याचे मंथन व्हावे. तुटत चाललेली जंगले, गाळाने भरलेल्या, प्रदूषणाने व्यापलेल्या नद्या या समस्यांची उकल होण्याकरिता या व्यासपीठाचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी प्रास्ताविक करताना संमेलन ठराव मांडले. कार्बन क्रेडिट, जलप्रदूषण, प्लास्टिक, वृक्षतोड बंदी, ग्लोबल वॉर्मिंग संबंधी ठराव चौथ्या पर्यावरण संमेलनात मंजूर करण्यात आले. कार्बन क्रेडिट : आपल्या महाराष्ट्रात पारंपरिक वनशेती व्यतिरिक्त स्थानीय पिकांसोबत सांगड घालून वनशेतीच्या विविध पद्धतींची म्हणजेच कृषी वनशेती पद्धतीची शिफारस अनेक विद्यापीठांनी केली आहे. वनेतर क्षेत्रावर (पडीक जमीन, शेतीक्षेत्र) वृक्ष लागवडीस प्रोत्साहन मिळावे म्हणून शेतकरी करीत असलेल्या प्रयत्नाचे क्रेडिट त्याला मिळायला हवे, हे क्रेडिट केवळ शाब्दिक स्वरूपाचे न राहता त्याला आर्थिक मोबदला मिळण्याची व्यवस्था निर्माण करून तज्ज्ञांच्या सूचनेनुसार कार्बन क्रेडिटसंकल्पना राबविण्यासाठी यशस्वी प्रयत्न व्हायला हवेत, अशी मागणी हे संमेलन करीत आहे. जलप्रदूषण : जलप्रदूषण ही सर्वात मोठी समस्या बनून राहिलेली आहे. ज्या निसर्गरम्य चिपळूण भागात हे पर्यावरण संमेलन होते आहे त्या भागातून बारमाही वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीसह राज्यभरातील सर्व प्रदूषित नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी, त्यांच्या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने, तज्ज्ञांच्या सल्यानुसार तातडीने आवश्यक ती पाऊले उचलावीत अशी मागणी हे संमेलन करते आहे. प्लास्टिक बंदी : मुंबईसह राज्यभरात दिवसाला अंदाजे १२०० मेट्रिक टन प्लास्टिकचा घनकचरा निर्माण होतो आहे. प्लास्टिकचं पूर्णपणे विघटन होण्यास अनेक दशकांचा कालावधी लागतो. प्लास्टिकचा राज्यासह देशभरातील सागरी जैवविविधतेवरही मोठा परिणाम होतो आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घ्यावा. भविष्याचा विचार करून या निर्णयाची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी आग्रही मागणी हे संमेलन करीत आहे. वृक्षतोड बंदी : वृक्षतोडीसाठी परवानग्या देत असताना पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या स्थानिक स्वंयसेवी संस्थांना विश्वासात घेतले जावे, अशी मागणी हे संमेलन करीत आहे. कोकणात, राज्यात आणि देशभरात आजही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आहे. वृक्षतोड करताना फक्त झाड तोड हाच मुद्दा लक्षात न घेता त्या वृक्षाच्या सभोवतालच्या जैवविविधतेचे अवलोकन करणे गरजेचे आहे. तोडलेल्या वृक्षावर वन्यजीव, पक्षी यांचा अधिवास असल्यास, वृक्षतोडीत त्यांचा मृत्यू होणे, त्यांचा अधिवास नष्ट होणे निसर्ग नियमाला धरून नाही. राज्यातील शहरात वृक्षसंवर्धन कृती समिती स्थापन करणे, या समितीत वृक्षप्रेमींचा सहभाग घेतला जावा अशी मागणी हे संमेलन करीत आहे. ग्लोबल वॉर्मिंग : गेल्या अनेक वर्षांपासून आपण वाढते तापमान, महापूर अनुभवतो आहोत. अतिपाऊस, वादळे, उष्णलहर, शीतलहर आता हा नित्याचाच भाग बनला आहे. या विषयात काम करणाऱ्या संस्थांच्या अभ्यासानुसार, मागील शतकातील पृथ्वीच्या सरासरी तापमानापेक्षा सध्याच्या तापमानाच्या सरासरीत खूप वाढ झाली आहे. यामुळे ओझोन थर विरळ होणे, बर्फ वितळणे, समुद्रपातळी वाढणे, उष्ण हवामान होणे, जैवप्रजाती नष्ट होणे, अन्नसुरक्षेचा धोका, आरोग्याचे धोके निर्माण होत आहेत. निसर्गाच्या दूर जाणारी आपली जीवनपद्धती बदलून ती अधिकाधिक 'इको फ्रेंडली' करण्याची गरज आहे. यासाठी तज्ज्ञांच्या सूचनेनुसार समतोल कार्यवाही व्हावी, अशी मागणी हे संमेलन करीत आहे. उपाययोजना स्थळानुरूप असाव्यात : पर्यावरण संवर्धन होण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकास प्रक्रिया आणि उपाययोजना स्थळानुरूप असाव्यात, अशी मागणी हे संमेलन करीत आहे.

ठरावासंदर्भात बोलताना परिवर्तन संस्थेचे अशोक कदम यांनी दोन अधिक ठराव मांडले. ते म्हणाले, शेती, भाजीपाला, गुरेढोरे यांची उत्पादन क्षमता जवळपास ६० टक्यांनी घसरलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यातले आपले श्रम कमी केल्याचे ते म्हणाले. लवेल, दाभीळ, सातवीण, असगणी भागात रासायनिक कारखानदारीद्वारे एम.आय.डी.सी. विस्तारू पाहतेय. तिथल्या स्थानिकांनी लोट्यातील कारखानदारी आमच्याकडे नको म्हणून गेली १५ वर्षे लढा दिला आहे. लोकं रासायनिक कारखाना उभारू देणार नाहीत, हे निश्चित आहे. लोकांना पाणी विकत घ्यावे लागते आहे. येथे संशोधन झाले. सी.ई.टी.पी. उभा राहण्यामागचा लढा त्यांनी सांगितला. सी.ई.टी.पी. जसा चालायला हवा तसा चालत नाही. हे योग्य नाही असे त्यांनी सांगितले. लोटे औद्योगिक विस्तार क्षेत्र विकसित होणार आहे, त्यात स्थानीय लोकसंघटनांच्या मागण्यांप्रमाणे एकही रासायनिक कारखाना सरकारने आणू नये. प्रदूषण विरहित कारखाने आणावेत. आणि इथले स्थानिक लोक सध्या पर्यटनाकडे नवा आर्थिक स्त्रोत म्हणून पाहात आहेत. त्या पार्शभूमीवर इथला सी.ई.टी.पी. मोठा करण्याचा विचार आहे. प्रदूषित पाणी कारखान्यांनी खाडीत न सोडता त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी कारखान्यांनी त्यांच्या बागबगीचा, झाडे-झुडूपांसाठी वापरावे. म्हणजे खाडी प्रदूषणाचा प्रश्न संपेल हे दोन ठराव त्यांनी मांडले. सर्व ठरावांना अॅड. सुभाष डांगे यांनी अनुमोदन दिले. मंडळाच्या पदाधिकारी, पर्यावरण क्षेत्रात गेली २५ वर्षे योगदान देणाऱ्या सौ. प्रियावंदा तांबोटकर (उरण-रायगड) आणि श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्राच्या संचालिका सौ. नूतन विलास महाडिक (चिपळूण) यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परशुराम करावडे, विजयकुमार ठुबे, भाऊ काटदरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

यानंतर निसर्गाचा वारसा सांगणाऱ्या देवरायांचे अभ्यासक, जलतज्ज्ञ, संमेलनाध्यक्ष डॉ. उमेश मुंडल्ये यांनी सुमारे तासाभर आपली भूमिका मांडली.  नैसर्गिक स्त्रोतांसाठी आपण शासनावर अवलंबून राहाता कामा नये. महाराष्ट्रात वृक्ष लागवड करण्याऐवजी जंगलाचे छोटे छोटे पट्टे तयार केले पाहिजेत. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या गावात ही चळवळ उभी केली पाहिजे. आपल्या पर्यावरणीय उपाययोजना या स्थळानुरूपअसाव्यात. त्यात स्थानीय लोकसहभाग, योग्य अनुभवी तंत्रज्ञान मार्गदर्शन असावे, असे मत त्यांनी मांडले.  मान्सूनचा कालावधी संपूनही वेगवेगळ्या कारणांमुळे पाऊस अजुनही अनेक ठिकाणी पडतोच आहे. त्यामुळे शेतीचं नुकसानही झालं आहे. नागरी भागातील लोकांना या विस्तारित पावसामुळे मानसिक त्रास होतो आहे. याचं खापर पडणाऱ्या पावसावर फोडून आपण राग, संताप, निराशा व्यक्त करत आहोत. मात्र सध्या वातावरणात जे बदल आपण अनुभवतोय ते एका वर्षात घडलेले नाहीत. हे बदल गेली कित्येक वर्षं हळूहळू घडतायत. त्याकडे दुर्लक्ष करणं आत्ता आपल्याला किंमत मोजायला लागल्यावर कळायला तर लागलंय. हे आपल्याच (माणसाच्या) कर्तृत्वामुळे आहे हे बहुसंख्य लोकांना माहिती नाही किंवा पटत नाही. आपल्याकडे येणारा मान्सून ही एक वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक घटना आहे. दूर समुद्रातून येणारे वारे ढग बरोबर आणतात आणि अनुकूल वातावरण मिळतं तिथे पाऊस पडतो. यात वाऱ्यांची दिशा, वेग, ताकद, कमी किंवा जास्त दाबाचे पट्टे तयार होणं, तापमानवाढीमुळे त्यावर परिणाम होणं, इत्यादि अनेक घटक कारणीभूत असतात, असे मुंडल्ये यांनी सांगितले. विकास करताना आपण यंत्रांवर आणि तंत्रज्ञानावर अतिविश्वास ठेवताना पर्यावरणातील समतोलया सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय. इतकं, की आपल्या अभ्यासक्रमातही याबाबत काही ठोस माहिती मिळत नाही. केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून हे कसं होतं ते सांगितलं जातं. त्यावर कशामुळे बरावाईट परिणाम होऊ शकतो आणि हे का होतं ? याबद्दल काही शिकवलं जात नाही. याचा परिणाम म्हणजे सर्वसामान्य लोकांमधे त्यांच्या जगण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या विषयाबद्दल नावड तयार होते. त्याचं महत्त्व समजावून सांगितलं न गेल्याने आपण नक्की काय करायचंय ? हेच सामान्य माणसाला त्याच्या शिक्षणाच्या काळात कळत नाही. त्या वयात हे न शिकल्याने, उर्वरित आयुष्यात या सर्व गोष्टींचा माझ्या वागण्याशी काय संबंध ? हा प्रश्न मनात घेऊन खूप मोठा वर्ग जगत असतो. या विषयातील जाणीव जागृतीसाठी खरंतर माध्यमांनी पुढाकार घेऊन काम करणं अपेक्षित आहे. पण आपल्याकडे हे माध्यमे केवळ मनोरंजनाचे साधन मानली जातात. त्यामुळे अशा गंभीर नैसर्गिक बदलांकडे लोकांचं लक्ष वेधून त्यात जागरूकता आणणं हे करण्यापेक्षा राजकारण, खेळ, सिनेमा, सिरीयल्स जास्त महत्त्वपूर्ण ठरतात. त्यातही वेगळेपणा दाखवण्यासाठी काहीही करायची तयारी असणारे भरपूर झाल्याने बहुतेक गंभीर प्रसंगांचा विनोद होऊन जातो. त्यामुळे सर्वसामान्य माणूस सत्यापासून आणखी लांब जायला सुरूवात होते, असे मुंडल्ये म्हणाले. आत्ताही पडणारा पाऊस खरंतर आपल्याला, भविष्यात काय घडणार आहे त्याची सूचना देतो आहे. आपण मात्र सरकार, प्रशासन आणि सर्वात मोठा शत्रू पाऊस असल्यासारख्या प्रतिक्रिया देतो आहोत. जगातल्या सोडाच  आपल्याला आपल्या देशातील, राज्यातीलही पर्यावरणात चालू असलेल्या घडामोडीही माहिती नसतात. आपल्याला हेही माहिती नसतं की ओरिसामध्ये अनेक गावं समुद्राच्या आक्रमणामुळे पाण्याखाली गेली, अनेकदा विस्थापित करावी लागली. आज ओरिसातील साधारण ३०% किनारपट्टी या आक्रमणाच्या धोक्याखाली आहे. आपल्याला हेही कोणी सांगत नाही की कोकणात देवबाग किंवा भोगवे यासारख्या गावांमध्येही समुद्र आक्रमण करतो आहे. अगदी दादरसारख्या शहरातील किनाऱ्यावरील महापौर बंगल्याच्या भिंतीला समुद्रामुळे धोका निर्माण होतो आहे. समुद्राचं भरतीचं पाणी रस्त्यावर कचरा घेऊन येते आहे. हिमनग वितळून पूर येणं, जंगलतोडीमुळे डोंगर खचणं आणि नद्या गाळाने भरून जाणं, मानवी प्रदूषणामुळे नैसर्गिक स्त्रोत कमकुवत होणं आणि नष्ट होणं, इत्यादि मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक गोष्टी बिघडताना बघितल्या आणि त्याबद्दल असलेलं समाजामधील अज्ञान बघितलं की धडकी भरते. नळ चालू केल्यासारखा येणं आणि बंद केल्यासारखा बंद होणं हे पावसाच्या बाबतीत शक्य नाही हे लक्षात घेऊन आपण याच्या मूळ कारणांकडे लक्ष देऊन त्यावर उपाय केले तरच काही सकारात्मक बदल शक्य आहे. ही जबाबदारी केवळ सरकार आणि प्रशासनाची आहे, असं म्हणून त्यांच्यावर टीका करणं पुरेसं नाही. समस्येची मूळ कारणं दूर करण्यासाठी मीआणि आम्हीकाय करतोय ? करणार आहोत ? हे ठरवणं आणि प्रत्यक्ष करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींसाठी प्रत्यक्ष कामात लोकसहभाग आवश्यक आहे. तरंच त्याचा दबाव सरकार, प्रशासन, उद्योग आणि समाजातील बेफिकीर लोक यांच्यावर राहील. त्याचा परिणाम पर्यावरणामधील बदलांवर दिसून येईल. विकासाचा पर्यावरणावर परिणाम होतंच असतो. कचरा करणारे, अशा कार्यक्रमांना येत नाहीत. आपल्याकडे जमीन, नैसर्गिक स्त्रोत मर्यादित आहेत. नैसर्गिक स्त्रोतांचा बेसुमार वापर होतो आहे. पाणी ही सरकारने द्यावयाची गोष्ट आहे, हे आपल्याला कळायला हवे आहे. प्रदूषणाशिवाय औद्योगिकरण शक्य नाही. शेतजमिनीची बिनशेती वाढते आहे. भारताच्या एकूण पैकी ४०% धरणे महाराष्ट्रात आहेत, तरीही इथे शेतकरी आत्महत्या करतो आहे. आपण १२८ एम.बी. वरून १२८ जी.बी.वर पोहोचलो आहोत. पण या चीप खाऊन आपण जगणार आहोत का ? हा प्रश्न त्यांनी विचारला.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, चिपळूणचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी धोक्यातील वन्यजीवन आणि आपणया विषयावर मार्गदर्शन केले. आज सर्वत्र निसर्गसाखळी तुटल्यामुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या कामात स्थानिकांचे योगदान महत्वाचे आहे. आपल्या २७ वर्षांच्या कामाकडे वळून पाहताना स्थानिकांना उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत मिळवून दिल्यास पर्यावरण संवर्धन शक्य असल्याचे काटदरे म्हणाले. निसर्गसाखळी तुटल्यामुळे अनेक गोष्टी आपल्याकडे घडतात. जागतिक पातळीवर पर्यावरण विषयात काही संस्था काम करतात. ह्या संस्था दुर्मीळ झालेल्या प्राण्यांची नोंद ठेवतात. कोकणातही प्राण्यांची नोंद होत असते. सह्याद्री निसर्ग मित्र सुरुवातीला शासनाला पत्र पाठविण्याचे काम करायची. पुढे कामाचे स्वरूप व्यापक होत गेलं. समुद्र काठावर आढळणारा सागरी गरुड यावर संस्थेने पहिल्यांदा वर्षभर काम सुरु केले. तेव्हा शासन ४ म्हणत असताना तेव्हा यांना गरुड पक्षांची ६२ घरटी मिळाली. नेमकेपणाने अभ्यास केल्यास हे समोर येऊ शकते हे सिद्ध झाले. त्यासाठी मोठ्या झाडांची आवश्यकता लक्षात आली. काही लोकांना हे पटले. त्यातून पुढे १०५ घरट्यांचे संरक्षण करण्यात संस्था यशस्वी झाली. वेंगुर्ले रॉक या ठिकाणी असलेल्या स्वीफ्ट पक्षांची (भारतीय पाकोळी) तस्करी होत होती. वार्षिक ५० लाखांचा व्यापार होता. हा प्रकार संस्थेने उघडकीस आणला. यावर न थांबता ह्या पक्षांना शासनाला वर्ग १ मध्ये आणायला भाग पाडलं. सन १९९० दरम्यान गिधाडांची संख्या कमी झाली होती. संस्थेने त्यावर काम केले. इंजेक्शने टोचूनही, दुर्दैवाने मेलेल्या जनावरांना गिधाडांनी खाल्ले तर अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आले. हे पक्षी काही ठिकाणी घरट्यात बसायचे, पण अंडी घालायचे नाहीत. संस्थेनी याचाही अभ्यास केल्याचे ते म्हणाले. कालांतराने संस्थेने या पक्षांच्या खाद्याच्या उपलब्धतेसाठी केलेल्या कामाविषयी त्यांनी सांगितले. समुद्रावर फिरताना कासवांची घरटी दिसली. त्यावर काम सुरु झाले. कॅमेरा उपयोगात आणला. अभ्यास केला. तेव्हा यांना खाद्य मिळत नाही. उपासमार होते. अंडी कोल्ह्यांनी खाल्याचे लक्षात आले. सुरुवातीला कोणाचीही मदत मिळत नव्हती. नंतर यातून ओलिव्ह रिडले कासवाचा प्रकल्प आणि नंतर कासव महोत्सव जन्माला कसा आला याची कहाणी त्यांनी सांगितली. सन २००६ साली कासव महोत्सव सुरु झाला. सुरुवातीला अंदाज घेऊन लोकांना बोलावलं. वेळास गावात तेव्हा नातेवाईक वगळता कोणी येत नव्हता. पण लोकं येऊ लागले. स्थानिकांना रोजगार मिळू लागला. कासवांची पिल्ले जगू लागली. ८०० लोकसंख्या असलेल्या त्या गावात आज ५५ घरात पर्यटकांची राहाण्याची सोय होते. सन २०१४ पासून शासन, स्थानिक ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने हे काम सुरु झाले. आज कोकणात अनेक ठिकाणी हे काम सुरु आहे. परिणामस्वरूप ६० ते ७०% कासवे वाचू लागलीत. स्थानिक माणसाला जेव्हा त्याचा फायदा, उत्पनाचे साधन दिसले, तेव्हा तो नक्की पुढे येतो. हे यातून स्पष्ट झाले. आज हे काम संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरु आहे. आतापर्यंत १ लाख कासवे सोडण्यात यश मिळालेले आहे. कासवांच्या संदर्भातला एक धडा ९ वीच्या पाठ्यक्रमात आहे. दरवर्षी १६ लाख मुले याचा अभ्यास करतात. जंगल तोडू नका, हे सांगणं आणि त्याची लोकचळवळ बनविणे सोपे काम नाही. त्याचाही प्रयत्न संस्था करते आहे. कासवानंतर संस्थेने खवले मांजर याकडे लक्ष दिले. जगात सर्वात जास्त शिकार खवले मांजरची होते. याच्या खवल्याना चीनमध्ये प्रचंड मागणी आहे. त्याचा औषधात वापर होतो. त्याकाळात ४/५ जीवंत खवले मांजर विकताना पकडली गेली. खवले मांजर ही दुर्मीळ आणि धोक्यात आलेली प्रजाती असल्याचे जाहीर झाले. त्यांची शिकार आणि चोरटा व्यापार होत असल्याने संस्थेने गेली ३ वर्षे हे काम सुरु केले आहे. आय.यु.सी.एन.च्या रेड डेटा लिस्ट मध्ये हा प्राणी आहे. खावल्यांमुळे बंदुकीची गोळीही त्याला लागू शकत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात संस्था या प्राण्याच्या संवर्धनाचे काम करते आहे. खवले मांजराचे पिल्लू ३ महिन्यानंतर आपल्या पिल्लाला पाठीवर घेऊन फिरते. मुंग्या, वाळवी खाऊन जगते.आज याबाबत संस्था सर्वेक्षण, जनजागृती, विद्यार्थी व युवकांसाठी विशेष जागृतीचे कार्यक्रम करते आहे. याबाबत सातवीच्या पुस्तकात याचा धडा आलेला आहे. १६ लाख मुलांपर्यंत पोहोचायला मदत झाली आहे. गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी १२ खवले मांजरांचे स्थानिकांच्या मदतीने संवर्धन झाले आहे. हे मोठे यश असल्याचे काटदरे म्हणाले. प्राण्यांचे, पक्ष्यांचे संवर्धन झाले पाहिजे, ते वाचले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. कुठेही खवले मांजर दिसले की कळवा असे आवाहन त्यांनी केले. भारतातले कासव या विषयातले सर्वोत्तम काम आपल्याकडून झाल्याचे त्यांनी नमूद केले.

दुसऱ्या सत्रात निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी सुगंध वसुंधरा रक्षणाचाया विषयावर भूमिका मांडली. कचऱ्याचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे उग्र रूप धारण करतो आहे. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली न जाणे हे त्यामागचे कारण आहे. मात्र बहुतांश प्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. निवेदिता प्रतिष्ठानने हे स्वतःच्या प्रयोगांतून सिद्ध केले आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून बाकडे, स्टूल, फुटपाथ, कंपाउंड वॉल, टिकाऊ विटा तयार केल्या आहेत. असे प्रतिपादन जलनायकप्रशांत परांजपे यांनी केले. आपल्याकडचे प्लास्टिक आमच्याकडे जमा करा, आम्ही ते उपयोगात आणू असे परांजपे यांनी सांगितले. डम्पिंग ग्राउंड मुक्त नगरपालिका होण्यासाठी सर्वांची एकत्र साखळी तयार व्हायला हवी. प्लास्टिक हे  ५००/१००० डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाळल्यानंतर त्यातून धूर, वास, प्रदूषण होत नाही. त्याचे लवकर विघटन होते. अशातून दापोलीत कचऱ्यावर वीजनिर्मिती होऊन बालोद्यानामध्ये असलेले दिवे पेटवलेले आहेत. हा एक आशेचा किरण दिसू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला थर्माकोल उपयोगात आणता येतो. त्यापासून उत्तम इंधन, गम तयार करता येते. हा गम २०० रुपये किलोने विकता येतो. बांधकामाला उपयोगी वीट तयार करता येते. अशा विटांचे उत्पादन पुण्यात सुरु आहे. आपले प्लास्टिक पाण्याची बाटली मुक्त व्हायला हवे. त्याला असणारे पर्याय आपण वापरायला हवेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. आजही खेडेगावातला माणूस दुकानात जाऊन कोलगेट मिसवाक द्याअसं म्हणतो. इतका जाहिरातीचा प्रभाव आहे. काम करताना आपण हे लक्षात घ्यायला हवं आहे. ते राबवित असलेल्या वृक्ष वाढदिवस संकल्पनेविषयी बोलले. गाव पातळीवर जैवविविधता समिती गठीत व्हायला हवी. प्रदूषणमुक्त, वणवामुक्त गाव व्हायला हवे. आपला विकासाला विरोध नाही. मात्र निसर्ग जपला गेला पाहिजे. यासाठी आपण वसुंधरादूत म्हणून काम करायला हवे अशी भूमिका त्यांनी मांडली. बहुतांश प्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. प्लास्टिक कचऱ्यापासून बाकडे, स्टूल, फुटपाथ, कंपाउंड वॉल, टिकाऊ विटा तयार करता येतात. प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांपासून गिफ्ट आर्टिकल्स, थर्माकोलपासून गोंद (ग्ल्यू), फ्लेक्स-बॅनरपासून ऑफिस फोल्डर तयार होतात. अशी माहिती त्यांनी दिली. संस्थेने टाकाऊ प्लास्टिकपासून तयार केलेल्या विटांची उपयुक्तता सिद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेने दापोलीत रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प्लास्टिक संकलन केंद्र सुरू केले आहे. प्लास्टिकच्या पाण्याच्या आणि थंड पेयांच्या बाटल्या आणि ज्याप्रमाणे आपण इस्त्रीला कपडे देतो त्याप्रमाणे प्लास्टिकचा स्वच्छ केलेला कचरा स्वीकारला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील हे पहिलेच संकलन केंद्र असून, या केंद्राकडे स्वच्छ प्लास्टिक कचरा देऊन निसर्गरक्षणाचे एक वर्तुळ आपण पूर्ण करू शकतो असे परांजपे म्हणाले.

राज्यात प्रसिद्ध असलेल्या चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष, नामवंत इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे यांनी शिवकालीन पर्यावरणीय विचारया विषयावर बोलताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भारतीय संस्कृतीने कायमच पर्यावरणाचा विचार दिलेला आहे. चिपळूण जवळच्या दळवटणे येथील सैन्यदलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले पत्र जगभरात भाषांतरित करून दर्शनी लावलं जायला हवं. आदर्श राज्य कसं असावं ? याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पत्र आहे. पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणाचा विचार करणारी शिवकालीन नीती अवलंबायला हवी, असे देशपांडे म्हणाले. ते पुढे म्हणाले, अत्यंत पवित्र भूमीत संमेलन होते आहे. भगवान परशुरामांच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज चिपळूणला आलेले होते. राज्याभिषेकापूर्वी एक महिना त्यांचा इथे मुक्काम होता. चिपळूणच्या रामेश्वराजवळ अंघोळ करून गांधारेश्वरचे दर्शन घेऊन ते परशुरामला आले होते. असे देशपांडे यांनी सांगितले. भारतीय परंपरेने आपल्याला पर्यावरणाचा विचार दिलेला आहे. हे आजचं नाही, आपल्या बहुसंख्य प्राथर्ना निसर्गाशी निगडित आहेत. काले वर्षतु पर्जन्य, पृथ्वी सस्यशालिनी । देशोयं क्षोभ रहितः सज्जना सन्तु निर्भया ।। अर्थात पृथ्वीवर वेळेवर पाऊस होऊ देत. पृथ्वी हिरवीगार राहू देत. आपला देश संकटांपासून दूर राहू देत. सगळे सुखाने नंदू देत. आपले सण निसर्गाशी संबंधित आहेत. सावित्री-यम संवाद हा पर्यावरणाशी संबंधित आहे. त्यात अकारण वृक्ष तोडू नका. नदीमध्ये घाण करू नकाअसं म्हटलं आहे. आपल्या भारतीय नौसेनेचे बोधचिन्ह शन्नो वरुणअसे आहे. ती पर्जन्य देवता आमचं रक्षण करो’, असं म्हटलेलं आहे. आपल्या जीवनाचे ४ भाग ब्रम्हचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, सन्यास. यातला वानप्रस्थ हा खरा वनप्रस्थच असायचा. याचा अर्थ जंगलात राहायचे. महाभारतात युद्ध संपल्यानंतर सगळे जंगलात राहिले होते. ईस्लामचा धर्म ध्वज हिरवा आहे. तिथे प्रचंड वाळवंट आहे. म्हणून हिरवळीचे प्रचंड आकर्षण. माणसाला जगण्यासाठी निसर्गाची गरज आहे. वन वाघाचं आणि वाघ वनाचं रक्षण करतो. असं वचन पूर्वी होतं. शिवकालीन समर्थ रामदासांनीही गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळे | धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळेअसे म्हटलेले आहे. मुक्तेश्वर यांनीही, विद्युल्लतांचे कडकडाट गगनगर्जना गडगडाट गंगा सरितांचे संघात महापूर मातले ! असे वर्षाकालाचे सुंदर वर्णन केले आहे. पृथ्वी ही शिवपिंडीका, पर्वत शंख त्या शाळुंखा इंद्रे मांडिले अभिषेखा पूर्णपात्रे बहुधारा ! १७ व्या शतकात होऊन गेलेल्या वामन पंडित यांनी सुद्धा, वनी खेळती बाळ ते बल्लवांचे। तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे असं म्हटलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षिणी सुस्वरे आळविती' असं संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याचे देशपांडे म्हणाले.

मानवाचं निसर्गाशी आतुट नातं आहे. आपण मान्सूनची वाट बघत असतो. दुष्काळाची भीषण वर्णनं आपल्याला इतिहासात भेटतात. शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा बारकाईने विचार केलेला होता. याचे शिवचरित्रात उल्लेख आहेत. छत्रपतींचा जन्म १६३० सालचा ! १६३० साली प्रचंड मोठा  दुष्काळ पडला होता. धान्य महाग महाग तैसे तीही मिळेना ! कैसे होईल होईल, होईल कळेना ! अशी स्थिती होती. एका होनाला (सोन्याचे नाणे) सहा पायली धान्य मिळत होतं. माणसं माणसाला खातील अशी अवस्था आलेली होती. लोकं गावं सोडून गेलेली होती. दुष्काळी स्थिती सावरल्यावर ती परत येत. महाराजांकडे पुन्हा त्या भूभागाची, सहकार्याची मागणी करत. नुसतं दाट जंगल असेल नी माणसं नसतील तर चालणार नाही हाही विचार जुन्या काळात होता. शेतकरीवर्गाचे मृगसालप्रमाणित धरून शिवरायांनी आपला शिवशकसुरू केला. त्या समयास ५ सप्टेंबर १६७६ रोजी प्रभावळीच्या सुभेदार रामाजी अनंत यास पाठविलेल्या पत्रामध्ये शिवराय सांगतात, ‘....त्या उपरी रयेतीस तवाना करावे आणि कीर्द करवावी हे गोस्टीस इलाज साहेबी (शिवरायानी) तुज येसा फर्माविला आहे की कष्ट करून गावाचा गाव फिरावे ज्या गावात जावे तेथील कुलबी (कुणबी) किती आहेती जे गोला करावे त्यात ज्याला ते सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफीक त्या पासी बैलदाणें संच आसीला तर बरेत जाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे. माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर पोटास दाणे नाही. त्यावीण तो आडोन निकामी जाला असेल तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दोचो बैलाचे पैके द्यावे. बैल घेवावे व पोटास खंडि दोन खंडि दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे.शेतकऱ्यांचा, कामकऱ्यांचा ऐसा राजा होणे नाही, अशा या प्रसिद्ध पत्राचा संदर्भ दिला. पर्यावरण संदर्भात काही जुन्या शिवकालिन संदर्भांचा आधार मिळतो. शिवछत्रपतींच्या काळात लिहिल्या गेलेल्या लेखनात ' झाडांचे महत्व थोर आहे', असे ते म्हणाले. दुर्गम राजधानी राजधानी रायगड करण्यामागे पर्यावरणीय विचार आहे. रयतेचे भाजी देठास हातही लावू न द्यावा हा विचार करणारे राजा शिवछत्रपती होते. चिपळूण जवळच्या दळवटणे येथे महाराजांची १० हजारावर फौज होती. आजही शहरात तत्कालिन हत्तीमाळ, पागा हे शब्द वापरात आहेत. यावेळी दिलेल्या पत्रात राजांनी, ‘...कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल.असे म्हटल्याचे त्यांनी नमूद केले. नंतरच्या काळातही कान्होजी आंग्रे यांनी बाणकोट ला सागवानाची लागवड केलेली होती. समुद्रातील जहाजे बनविण्याकरिता ते लाकूड लागायचे. दुर्दैवाने पुढे इंग्रजांनी ते साग ते तोडले. आजही बाणकोटला यातील काही दिसतात असे ते म्हणाले.

गेली २५ हून अधिक वर्षे सह्याद्रीत डोळस भटकंती करणारे नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांचे सह्याद्रीतील वैविध्यताहे चौथे सत्रही संस्मरणीय ठरले. लोकांनी निसर्गातला चमत्कार बघावा, अशी जंगलात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. या भागात सह्याद्री टायगर रिझर्व्ह होतोय. हा प्रकल्प चिपळूणच्या जवळ आहे. जंगल वाचविण्याकरिता प्रयत्न व्हायला हवेत. जंगल हे चालत चालत बघायचं नसतं तर जंगल बघत बघत चालायचं असतं आणि हे जंगलात सातत्याने चालायला लागल्यावर समजतं. झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत घडणाऱ्या हालचाली वर्तमानपत्रासारख्या वाचता यायला हव्यात. नुसता पेपर चाळलात तर जंगलं आणि त्यातल्या गमतीजमती समजणार नाहीत. जंगल वाचायचे, वाचवायचे असेल तर जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या सानिध्यात जायला हवे बापट म्हणाले. त्यांनी सुरुवातीला, कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत आमच्या सारख्या जंगलात काम करणाऱ्या अभ्यासकांना, पर्यटक आल्यानंतर त्यांना सहज माहिती देण्यासाठी आवश्यक असलेली थिएटर सुविधा, बसायला जागा उपलब्ध नसल्याचे सांगून खंत व्यक्त केली. असे असले तरीही तरीही इथली पोरं हुशार आहेत. पदरमोड करून हे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. अनुभव महत्वाचा आहे. माहितीच्या आधारे आज निसर्गावर लिहिलं जातंय, प्रत्यक्षात निसर्गात काहीतरी वेगळ घडत आहे. असे सांगून, ‘निसर्गासाठी जर काही करायचे असेल तर ते मलाच केले पाहिजेअशी शपथ त्यांनी उपस्थितांना दिली. अशा कार्यक्रमांना वय ४०/५०च्या पुढची लोकं असतात. तरुण मुलं कमी असतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धन यशस्वी होट नाही. आजही पर्यावरणात काम करणाऱ्या मुलांची संख्या हजारी दहा इतकीच आहे. आमच्यासोबत काम केलेली मुलं आज कोळ्यांवर, मुंग्यांवर संशोधन करतात. अंदमान सारख्या भागात जाऊन जारव्हा नावाच्या मुंगीवर काम करतात. टिटवीच्या डोळ्याला झालेल्या मोतीबिंदूवर उपाययोजना करताना पाहून समाधान वाटतं असं ते म्हणाले. आम्ही टूर ऑपरेटर नाही. आम्ही जंगल, जैवविविधता समजावून सांगतो. सह्याद्रीत वैविध्यता सर्वत्र आहे. चिपळूणची स्थिती बेसिनसारखी आहे. शहराला चारही बाजूने डोंगर आहे, घाट आहेत. चिपळूण हा गुजरात ते केरळ दरम्यानचा सह्याद्रीचा तुकडा आहे. महाबळेश्वर ते आंबा घाट असे कोयना जंगल आहे. पुढे चांदोली अभयारण्य आहे. ही दोन्ही जंगले सह्याद्री टायगर रिझर्व्ह अंतर्गत आहेत. यातल्या काही भागात जायला सध्या बंदी आहे. कोयना जलाशयात खूप माश्यांच्या जाती आहेत. सह्याद्रीत पूर्वी आम्ही डॉक्टरांची टीम नेऊन लोकांची तपासणी करायचो. कारण हेच की सह्याद्रीत माणसं राहायला हवीत. तेव्हा ती लोकं प्राणी मारून खायची. त्यांना जीवनसत्व कमी पडायची. आम्ही त्यांना बीयाणे दिली. त्यांनी त्याची लागवड झाली. आता लोकं यातून चांगुलपणाने बाहेर आलीत. आपण माणसाने जंगलासाठी, बाहेर राहून काम केलं पाहिजे. उन्हाळ्यात पाणी खाली जातं, डोंगर रिकामे होतात. आपण शासनाच्या मदतीने पाणवठ्याचे काम सुरु केले. प्राणी अधिक खाली जाऊ शकत नाहीत. त्यांचे शत्रू वाढतात. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या लिटमस पेपरच्या कार्याप्रमाणे पक्षांना निसर्गातील बदल लवकर कळतात. पक्षी बघणं आणि निरीक्षण करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षी लिटमस पेपरसारखे अॅक्ट होतात. त्यांचा अधिवास गेल्याने अडचणी वाढतात. आपल्याकडे साफसफाई करणारे काही पक्षी आहेत. शक्यतो सुगरण पक्ष्याचे घरटे घरात शोसाठी आणून लावू नका. एका पक्षाने सोडलेले घरट्याचे वेस्ट मटेरीअल हे दुसऱ्यासाठी बेस्ट मटेरीअल असते. जंगलातून फक्त आठवणी घेऊन बाहेर येत चला ! असे ते म्हणाले. यावेळी पक्षांच्या पाय, चोचींचे प्रकार त्यांनी मांडले. वळचणीच्या जागा कमी झाल्या म्हणून चिमण्या कमी झाल्या. आपण टाकलेल्या कचऱ्यामुळे पक्षांच्या पायांना रोग झालेले आहेत. पक्षांचा पंखावर विश्वास असतो. तो सकाळी पंख साफ करतो. ते दिवसातून तीन वेळा अंघोळ करतात. खेडेगावातील लोकं आपल्या ज्ञानाप्रमाणे पक्षांना नावे देतात. भारद्वाजला विदर्भात याला नपिताम्हणतात. आपण नावासाठी शास्त्रीय आग्रह धरायला हवा असे बापट म्हणाले. यावेळी बापट यांनी स्लाईड शो द्वारे अनेक पक्षांविषयी माहिती दिली.

संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात पर्यावरणप्रेमींनी शहरातील लोटिस्माच्या अश्मयुगकालीन आणि कोकणातील जुन्या संस्कृतीचा ठेवा असलेल्या कोकणातील एकमेव वस्तूसंग्रहालयास भेट देऊन कोकणची संस्कृती समजावून घेतली. यानंतर सर्वांनी ग्लोबल चिपळूण टुरिझमच्या ४ बोटींच्या सहाय्याने मनसोक्त संचार करणाऱ्या मगरी, केरळच्या बॅकवॉटरचा कोकणात आनंद, रम्यखाडी, संथ पाणी, किनाऱ्यावरची टिपिकल किनारवर्ती गावं, किनाऱ्याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता अनुभवली. क्रोकोडाईल सफारीचा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा वाशिष्ठी बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. खाडीतील नैसर्गिक वातावरणात सर्वांना मगर पाहाता आली. खाडीत पाण्याच्या ठिकाणी आढळणारे पक्षी आणि काही दुर्मीळ पक्ष्यांचं दर्शनही अनेकांना झाले. वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरील झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीत तिचा उगम, किल्ले गोविंदगड याचीही माहिती देण्यात आली. मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची 'तुंबाडचे खोत' ही द्विखंडी कादंबरी याच खाडीच्या वातावरणात रमलेली आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा प्रदीर्घ कालखंड या कादंबरीचा गाभा आहे. चित्रविचित्र इतिहासांच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष, व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्‍या अनेक घटना, पुन्हा एक व्यक्ती दुसरी सारखी नाही. एकूण काळ सव्वाशे वर्षाचा असला तरी स्थळ मात्र एकच - तुंबाड आणि तुंबाडचा परिसर आहे. हा परिसर वाशिष्ठी आणि खेडहून येणाऱ्या जगबुडी नदीच्या संगमावर आहे. श्री. ना. पेंडसे यांनी अजरामर केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता सर्वांना पाहाता आली.

संमेलनाचा समारोप सायंकाळी एसआर. जंगल रिसॉर्ट धामणवणे येथे झाला. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, पुण्याच्या प्रा. अल्का गव्हाणे, सिंधुदूर्गच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रणिता पाताडे, पर्यावरणप्रेमी रणजित पाताडे, अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, उपाध्यक्ष विलास महाडिक, निवृत्त वनपाल सावंत, संमेलनाचे निमंत्रक धीरज वाटेकर उपस्थित होते. यावेळी प्रा. तारा काबरा, प्रा. अनिल लोखंडे, अॅड. सुभाष डांगे, कचरू चांभारे, गोरखनाथ शिंदे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रणिता पाताडे आणि रणजित पाताडे या दाम्पत्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्यात मंडळाचे काम वाढविण्यासाठी जिल्ह्याध्यक्ष म्हणून आगामी काळात आपण निश्चित प्रयत्न करू, लोकजागृतीसाठी कार्यरत राहू अशा भावना यावेळी जबाबदारी देण्यात येऊन रणजित पाताडे यांचा सन्मान करण्यात आला. या संमेलनामुळे, राज्यातील पर्यावरण प्रेमींना, कोकणातील पर्यावरणाची समस्या समजून घेता आली. संमेलनातील वक्त्यांच्या उद्बोधक मार्गदर्शनामुळे पर्यावरण संवर्धन विषयात कोकणात सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती मिळाल्याच्या भावनाही व्यक्त झाल्या. स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज यांच्या उध्गातन सत्रातील परखड भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. प्रभाकर तावरे यांनी या प्रसंगी बोलताना, कचऱ्याच्या समस्येवर भाष्य केले. आगामी काळात जगबुडी ही कचऱ्याने होईल अशी स्थिती असल्याची व्यथा त्यांनी मांडली. आपल्या वापरातले प्लॅस्टिक बंद करा अशी आग्रही सूचनाही त्यांनी केली.

आबासाहेब मोरे यांनी बोलताना पर्यावरण संवर्धन विषयातील जाणीव जागृतीचा हा यज्ञ आपल्या सर्वांच्या पाठबळावर यशस्वी होत असल्याचे सांगून हे पाठबळ भविष्यात कायम राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींच्या व्यवस्थापनात मंडळाचे सचिव प्रमोद मोरे यांनी मोलाचे योगदान दिले. ग्लोबल चिपळूणचे व्यवस्थापक विश्वास पाटील, उद्योजक जयसिंगराव जवक, अॅड. सुभाषराव डांगे, प्रा. पोपळघट, प्रा. सुभाष वाखारे, गोरखनाथ शिंदे, विलास शेडाळे, संतोष दिवे, निवृत्त वनपाल सावंत, बाळासाहेब कणके, प्राचार्य शोभा भालसिंग, प्रा. श्रीम. काब्रा यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

सन २०२० :

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे, निसर्ग संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या, वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेच्यावतीने येत्या जागतिक वन आणि जलदिनी (दिनांक २१ आणि २२ मार्च २०२०) राज्यभरातील सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, गावातील क्रियाशील कार्यकर्ते, कृतीशील शिक्षक, प्राध्यापक, सरपंच, ग्रामसेवक यांसाठी आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय पाणी व्यवस्थापनकार्यशाळा कोरोनाविषाणूच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्यात आली. संस्थेचे सचिव धीरज वाटेकर आणि प्रमोद मोरे यांनी ही माहिती दिली. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेला अण्णा हजारे यांच्यासह प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये, श्री. दिलीप गोंडे, जलमित्र डॉ. सीमा निकम, श्री. प्रभाकर तावरे, मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्रआबासाहेब मोरे आदिंचे मार्गदर्शन होणार होते. कार्यशाळेस उपस्थित राहणाऱ्या सर्वांसाठी यावेळी बहुमोल राळेगणसिद्धी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कोरोना विषाणू आटोक्यात येईपर्यंत पर्यटकांनी राळेगणसिद्धीस न येण्याचं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकांना केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यशाळा रद्द करण्यात आली आहे.

अहमदनगर : वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाने जागतिक पर्यावरण दिनी, ५ जून रोजी आपल्या पुढील पाच वर्षांकरिता (२०२०-२०२५) महाराष्ट्र राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्षांची पदभार निवड आणि राज्य कार्यकारिणी जाहीर केली. राज्यात पुढील पाच वर्षात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे कामास गती मिळण्यासाठी या सर्वांनी आपापल्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची नवनियुक्त पाच वर्षांची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जागतिक पर्यावरण दिनी, ५ जून रोजी मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्रआबासाहेब मोरे यांनी जाहीर केली.

चिपळूण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या चिपळूण शाखेच्या वतीने आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या सहकार्याने, कै. भानुदास वालचंद शिंपी गुरुजी यांच्या प्रेरणेने पुण्यात स्थापन झालेल्या राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ५८ वर्धापनदिन, २२ जुलै रोजी सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या जैवविविधतेने संपन्न असलेल्या सह्याद्री पर्वतातील कुंभार्ली घाट परिसरात बीजपेरणी अभियान राबवून साजरा करण्यात आला. यावेळी अर्जुन सादडा, रिंगी, बेहडा, कुसुम, बिब्बा, शमी, बहावा, आपटा, रामफळ, सीताफळ आदिंच्या  ६५ हजार स्वदेशी जंगली बियाणांची पेरणी करण्यात आली.

प्रत्यक्ष बीजपेरणीपूर्वी समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापनदिन कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविकातून सरचिटणीस आर. डी. मोहिते यांनी समितीच्या कामाबाबत सर्वांना माहिती दिली. जिल्हा सेकटरी संतोष सुर्वे आणि जिल्हा सल्लागार दीपक शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोरोना पार्श्वभूमीवर आलेल्या मानवी मर्यादेत वर्धापन दिन साजरा करताना निसर्गाच्या सानिद्ध्यात, राज्य कार्यकारिणी सदस्य आणि पर्यावरण मंडळाचे उपाध्यक्ष विलास महाडिक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम निवडण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. पर्यावरण मंडळाचे राज्यसचिव धीरज वाटेकर यांनी यावेळी बीजपेरणी अभियानसंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. यापूर्वी सन २०१६ साली चिपळूणात महेंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी हे अभियान राबविण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली. पर्यावरण मंडळाचे राज्याध्यक्ष वृक्षमित्रआबासाहेब मोरे आणि बीज पुरवठादार वनश्रीडॉ. महेंद्र घागरे यांच्या माध्यमातून बियाणे उपलब्ध झाले. यावेळी शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन विनय घाणेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापनदिन बीजपेरणी अभियानकार्यक्रमाला समितीच्या चिपळूण शाखेचे ज्येष्ठ सल्लागार चंद्रकांत जंगम, माजी सरचिटणीस मिलिंद चव्हाण, तालुका कार्यालय सेक्रटरी विजय वाघमोडे, प्रवक्ते मौला नदाफ, ऑडिटर दत्तात्रय नार्वेकर, आयुर्वेद अभ्यासक जगदीश थरवळ, संघटना प्रतिनिधी, डी. जी. शिंदे, गणेश कोरनुळे, शिवाजी कोदारे, आरती घाणेकर, माया शिपटे, सुजाता जांबोटकर, आक्काताई वाद्रे, अनुराधा पवार, निलम मोहिते, विनया देवरुखकर, लिना शिंदे उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करून करून अभियान संपन्न झाले. आभार विजय वाघमोडे यांनी मानले.

अहमदनगर : गुगलने तयार केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपच्या माध्यमातून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची राज्यस्तरीय गुगलमीट १२ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊनअसलेल्या मंडळाच्या प्रतिनिधींनी आपापल्या ठिकाणी कोरोनाअनलॉक काळात सुरक्षेच्या नियमांचे पालन करून पर्यावरणीय उपक्रम यशस्वी केले. या कृतीशील आणि जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा, सर्व नवनियुक्त राज्य पदाधिकाऱ्यांना मंडळाची कार्यओळख सत्र आणि अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे मार्गदर्शन हे या गुगलमीटचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. या मीटमध्ये राज्यभरातील ४५ पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना मोरे यांनी, पुढील वर्षाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने स्थानिक देशी, ऑक्सिजन देणाऱ्या जंगली बियाणांची रोपवाटिका निर्मितीचे लक्ष्य त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर ठेवले. बियाणांसाठी आवश्यकतेनुसार मंडळाचे सल्लागार वनश्रीडॉ. महेंद्र घागरे यांचे सहकार्य घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मंडळातर्फे सातत्याने मांडल्या जाणाऱ्या कार्बन क्रेडिटच्या मुद्द्याचा त्यांनी पुन्हा उल्लेख केला. पुढील पिढीला स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, आरोग्यदायी जीवन मिळावे, ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम कमी व्हावेत, सेंद्रिय खाद्य पदार्थ उपल्स्ब्ध व्हावेत, मनुष्याला पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी आपण पर्यावरणीय काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मंडळाची कार्यओळख होण्यासाठीच्या सत्रात राज्यसचिव धीरज वाटेकर यांनी कार्याचा आढावा सर्वांसमोर मांडला. मंडळाच्या अध्यक्षांनी वयाच्या दहाव्या वर्षी वृक्षारोपण करून सन १९८२ पासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन पर्यावरण संवर्धनकामास प्रारंभ केल्याचे त्यांनी सांगितले. गुगलमीटचे संयोजक मंडळाचे राज्यसंघटक बाळासाहेब चोपडे यांनी सर्वांचे स्वागत केले. मंडळाचे कार्याध्यक्ष प्रमोद काकडे यांनी ऑनलाईन निसर्गकाव्य स्पर्धांची माहिती यावेळी दिली. उपक्रमशील मुख्याध्यापक कचरू चांभारे यांनी लहान मुलांचे वृक्ष लागवड काम चांगले असल्याचे मत नोंदविले. डॉ. गौतम सावंत यांनी जैवविविधतेतील दुर्मीळ घटकांचा अभ्यास करण्याची गरज बोलून दाखविली. प्रियंवदा तांबोटकर यांनी आपल्या मंडळासोबतच्या मागील २० वर्षांच्या आठवणीना उजाळा दिला. माधव केंद्रे यांनी शाळा चालू झाल्यानंतर पुन्हा राज्य चित्रकला स्पर्धा घ्याव्यात असे मत मांडले. प्रा. गजानन हिरोळे यांनी भूतान बाबतचे डॉक्युमेंट तयार करण्याची सूचना केली.

यावेळी पदाधिकारी जयसिंगराव जवक, प्रमोद मोरे, डॉ. ललिता जोगड, कांचन सावंत, तुकाराम अडसूळ, संजय ताडेकर, सुधीर कुंभार, अतुल निगवेकर, सिद्धार्थ पटणी, भाऊसाहेब पाटील, मधुकर गायकवाड, माधुरी अहिरे, मनाली देशमुख, काजल बनोडे, माधव केंद्रे, मारुती कदम, नाना पाटील, नवनाथ लाड, निर्मला म्हस्के, पंडितराव म्हस्के, प्रणिता  बोरकर, राहुल पाटील, बाळासाहेब कोकरे, रुपाली पाटील, संजय तेडेकर, साईनाथ लोणे, सुहास गावित, सुजित गावित, विजयाचंद्र पाटील, अतुल निगवेकर आदि उपस्थित होते. कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी मंडळाने जाहीर केलेला पर्यावरण प्रकल्प उपक्रमाची माहिती दिली. शेवटी महाडिक यांनी वनश्री प्रतिज्ञावाचन केल्यावर मिटची सांगता झाली.

चिपळूण : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक यांचे तालुक्यातील पहिले कृषी पर्यटन केंद्र असलेल्या पेढे येथील श्रीपरशुराम सान्निध्य निसर्ग पर्यटन केंद्रात २ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी कृषि विद्यापीठ दापोली येथे शिक्षण घेत असलेला गावातील विद्यार्थी सुयोग चोपडे याच्या कल्पनेतून ग्रामीण उद्योजगता जागृती विकास योजना अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे पत्रकार-लेखक उपस्थित होते. त्यांनी, ‘नारळाचे महत्त्व आणि त्याचे फायदे जगभर पोहोचविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जग वाचविण्यासाठी नारळात गुंतवणूक कराही यावर्षीची संकल्पना असल्याचे नमूद केले. यावेळी पर्यटन मित्र समीर कोवळे, सुयोग चोपडे, महेंद्रगिरी निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष अनिकेत चोपडे उपस्थित होते.

अहमदनगर : आपली उद्यमशीलता जपून समाज विकासाचा ध्याय घेतलेले, कुंथलगिरी येथे सुमारे ६९ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारणारे, नॅशनल ज्वेलरी अॅवार्डकडून जेम ऑफ द इयरपुरस्काराने सन्मानित चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेड बारामतीचे संचालक अतुलकुमार जीनदत्त शहा (सराफ) उर्फ अतुलकाका यांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पर्यावरण संवर्धनविषयक राज्यव्यापी कामाला गती प्राप्त व्हावी, तंत्रज्ञानाची जोड मिळावी या हेतूने लॅपटॉप, प्रिंटरसह एक वर्षांचे पेड झुम व्हिडीओ कन्फरन्स अॅप नुकतेच अध्यक्ष वृक्षमित्रआबासाहेब मोरे यांना भेट दिले. जागतिक पर्यटनदिनी या तंत्रस्नेही भेटीचा ऑनलाईन हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळाझूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपद्वारे २७ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लिमिटेडचे अहमदनगरचे प्रतिनिधी आनंदभाई कोठारी यांचे हस्ते मोरे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात ही भेट स्वीकारली. यावेळी मंडळाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसुळ, कार्याध्यक्ष पै. नाना डोंगरे, वैभव मोरे उपस्थित होते. मोरे यांच्या गेल्या ३/४ वर्षांतील सह्राद्री वाहिनी आणि इतर न्यूजवाहिन्यांवरील मुलाखती ऐकून अतुलकाका सराफ यांनी आबासाहेबांना फोन करून मंडळाचे काम जाणून घेतले होते. गेली काही वर्षे ते स्वतः आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण कुलकर्णी हे आबासाहेबांच्या संपर्कात आहेत. मंडळाच्या पर्यावरणीय कामावर समाधान व्यक्त करणाऱ्या सराफ यांनी या भेटीद्वारे मंडळाला तंत्रस्नेही होण्याची संधी उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी पर्यावरण मंडळाच्या कामाचा आढावा घेतला. अतुलकाका यांच्या कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘कोरोना वैश्विक महामारीच्या काळात मंडळाला मिळालेलं हे दूरसंचार यंत्रणेच योगदान आपणा सर्व पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांच्या हाताना बळकटी देणारं ठरणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात तन, मन आणि धनाने सहभाग घेणाऱ्या, समाजाला आपण काय देऊ शकतो ? याचा विचार करणाऱ्या, सेंद्रिय शेतीत विशेष रुची असलेल्या अतुलकाकांनी, ‘वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे वय, सध्याची कोरोना स्थिती, मंडळाच्या पर्यावरण कामाची राज्यभर असलेली व्याप्ती, पर्यावरणप्रेमी सदस्यांचा मंडळातील सक्रीय सहभाग विचारात घेऊन अडचण येऊ नये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंडळ सतत प्रगतीपथावर कार्यरत व्हावे यासाठी  दिलेल्या या योगदानाबद्दल वाटेकर यांनी अतुलकाकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी अतुलकाका यांना या सहकार्यासाठी धन्यवाद दिले. निसर्ग व पर्यावरण मंडळाचा प्रत्येक सदस्य हा पर्यावरण संवर्धन हे ध्येय समोर ठेवून कार्यरत आहे. मंडळाच्या माध्यमातून राज्यात बीजारोपण, वृक्ष लागवड मोहीमेसह रोपवाटिका नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना अतुलकाका शहा यांनी, झाडे वाढली तर आपल्याला अधिक ऑक्सिजन मिळणार असून हे काम व्हायला हवे असल्याचे म्हटले. मंडळाचे काम राज्यभर  सुरु आहे ही चांगली बाब आहे. यासाठी आपण आपले कर्तव्य केल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या ऑनलाईन हस्तांतरण आणि शुभारंभ सोहोळाझूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला राज्यभरातून कार्याध्यक्ष विलास महाडिक, डॉ. गौतम सावंत, राजेंद्र सावंत, प्रियवंदा तांबोटकर, विलास शेडाळे, नाना पाटील, शिवा नंदकुले, बाळासाहेब चोपडे, प्रमोद मोरे, बाळासाहेब कणसे, माधव केंद्रे, बाबासाहेब महापुरे, अ‍ॅड. सौ. आंधळे, प्रणिता पाताडेउमाजी बिसेन, सुहास गावितम रामदास खवसी, कचरु चांभारे, अनिल लोखंडे, संजय भापकर, डॉ. जगदीश पाटील, दत्तात्रय मंचरे, प्रमोद काकडे, सुनिल दिघे, नंदकुळे शिवप्पा, नयना पाटील, संजय ताडेकर, लीलाधर वानखेडे, राजेश पाटील, सुरेंद्र पाटील, प्रभाकर तावरे, विजय लुल्हे, रविंद्र खरादे, कुंभकर उपस्थित होते. यांनी सहभाग नोंदवला. कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन आणि आभार मारुती कदम यांनी मानले. वनश्री प्रतिज्ञा वाचनाने कॉन्फरन्सचा समारोप झाला.

 

मा. अतुलकुमार जीनदत्त शहा (सराफ) उर्फ अतुलकाका यांनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाला भेट दिलेल्या लॅपटॉप, प्रिंटरसह एक वर्षांचे पेड झुम व्हिडीओ कन्फरन्स अॅप संदर्भातील वृत्त वाचण्यासाठी खालील लिंक पाहा.

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/09/blog-post_26.html

 

राळेगणसिद्धी : २०२०च्या दीपावलीनंतर कोरोना अनलॉक वातावरणात २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी पर्यावरण मंडळाच्या वेबसाईटकरिता शुभसंदेश रेकॉर्ड करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पद्मश्रीबीजमाता राहीबाई पोपेरे यांची अध्यक्ष आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे पदाधिकारी डॉ. महेंद्र घागरे, विलास महाडिक, सुधाकर शेट्ये, धीरज वाटेकर यांनी शुभेच्छा भेट घेतली आणि पर्यावरणीय संवाद साधला.

 

वरील भेटीत आदरणीय अण्णा हजारे यांनी सांगितलेल्या ‘गावाचा वाढदिवस’ ह्या सामाजिक प्रदूषण दूर सारण्याची क्षमता असलेल्या संकल्पनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया खालील ब्लॉग लिंक क्लिक करा.

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/12/blog-post_13.html

 

पुणे : ठिबक सिंचनद्वारे किंवा नव्याने लागवड केलेल्या झाडांना वाढविण्यासाठी कृत्रिम पद्धतीने आपण कितीही पाणी दिले तरी त्यांना कालांतराने जमिनीतून मिळणाऱ्या भूजलाची आवश्यकता भासते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मूलत: जलसंधारणअतिशय आवश्यक असल्याचे स्पष्ट मत सहजजल बोधकार भूजलतज्ज्ञ लेखक उपेंद्र धोंडे यांनी व्यक्त केले. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाणलोट धारण क्षमताया विषयावरील २१ डिसेंबर रोजीच्या ऑनलाईन सेमिनारमध्ये ते बोलत होते.

सेमिनारचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी केले. मोरे यांनी परखड, रोखठोक स्वभावाचे आणि मेहनती अधिकारी असलेले भारत सरकारचे भूजलवैज्ञानिक धोंडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी धोंडे म्हणाले, जलसंधारणासाठी पाणलोट समजून घेण्याची गरज आहे. नदी पुनरुज्जीवन करण्यासाठी नदीच्या वेदना आणि लक्षण समजून घ्यायला हवं. नदीचे पात्र कोरडे का पडते याचा अभ्यास करायला हवा. जमिनीत मुरलेले पाणी शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आज पाणी टंचाईच्या काळात जलआराखडा तयार करायला हवा. ओढे, झरे जीवंत राहिल्यास नदी जीवंत राहिलं. नदीच्या पात्राचे खोलीकरण, रुंदीकरण करताना नदीचे भरण क्षेत्र, वहन क्षेत्र समजून घ्यायला हवे आहे. पर्यावरणीय मुद्द्यांवर सुरु असलेल्या त्रिस्तरीय जलसंधारण आणि निसर्गाचे बेट आदि उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पाणलोट क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.

सेमिनारनंतर धोंडे यांनी राज्यातील पर्यावरण प्रेमींच्या प्रश्नाला उत्तरे दिली. मंडळात कोकणचे प्रतिनिधित्त्व करणारे राज्य सचिव धीरज वाटेकर यांनी यावेळी चिपळूणातून वाशिष्ठी नदीद्वारे दैनंदिन ५.२३६ दश लक्ष घनमीटर इतक्या प्रमाणात समुद्रास जाऊन मिळणाऱ्या पाण्याबाबत विचारले असता, ‘हे पाणी इतरत्र वळवताना अभ्यास करायला हवा अशी भूमिका मांडली. पाणी अडविल्याने, उचलल्याने नद्या कोरड्या पडण्याचा धोका संभवतो’, अशी भूमिका धोंडे यांनी मांडली. सेमिनारचे सूत्रसंचालन सांगलीचे इतिहास अभ्यासक बाळासाहेब चोपडे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे यांनी आभार मानले. दुष्काळ निवारणासाठी शेतकऱ्यांनी जलसंधारण समजून घेत आपल्या शेतात निसर्गबेट निर्माण करायला हवे. यासाठी अशा प्रकारचे सेमिनार नियमितपणे होण्याची आवश्यकता असल्याचे मत यांनी मांडले. यावेळी मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक आणि राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

सन २०२१ :

चिपळूण : तालुक्यातील दळवटणे येथील श्री दत्त शिक्षण संस्था दळवटणे, मोरवणे, वालोटीच्या शाळेत आयोजित वृक्ष लागवड, मोफत बीजवाटप आणि विद्यार्थी पालक संवाद कार्यक्रम २८ जानेवारी रोजी संपन्न झाला. यावेळी बोलताना, डॉ. महेंद्र घागरे यांनी विद्यार्थ्यांनी आपले ग्रुप तयार करून घरी, शाळेत रोपे तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यशस्वी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल, असेही घागरे यांनी यावेळी जाहीर केले.

हरित मित्र परिवार आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या कोकण विभागातर्फे मोफत जंगली बीजवाटप अभियानांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला होता. विलास महाडिक यांनी रोपवाटिका निर्मिती बाबतीतील आपले अनुभव सांगितले. रोपवाटिका करण्यासाठी डॉ. घागरे देत असलेल्या बीजात स्थानिक प्रजातींचा विचार केला असल्याचे ते म्हणाले. धीरज वाटेकर यांनी यावेळी बोलताना, शिवकालीन प्रसिद्ध दळवटणे गावाचा हलवर्णअसा उल्लेख केला. दळवटणे येथील दहा हजारांच्या सैन्यदलाला उद्देशून ९ मे १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या, ‘आदर्श राज्य कसं असावं ? याचं सर्वोत्तम उदाहरण असलेल्या पत्राचा उल्लेख आपल्या भाषणात केला. भारतीय संस्कृतीने कायमच पर्यावरणाचा विचार केलेला असून त्यादृष्टीने विचार करणारी नीती अवलंबायला हवी असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाची साखळी तुटल्याने दुर्दैवी घटना सुरु झाल्या आहेत. यंत्र आणि तंत्रज्ञानावर अति विश्वास ठेवल्याने अडचण निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून आपल्याला वृक्ष संवर्धनाकडे पाहावे लागेल. रोपवाटिकाहा पर्यावरण शिक्षणाचा भाग असून यातून जाणीवजागृती आणि ज्ञानप्राप्ती होऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी जोडता येईल असे वाटेकर म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे चेअरमन संतोष नलावडे यांनी बोलताना, तीन वर्षांपूर्वी पर्यावरण संस्थेच्या वतीने गावात राबविण्यात आलेल्या चंदन लागवड अभियानसंदर्भातील आठवण सांगितली. पर्यावरणाच्या जाणीव जागृतीचा हा उपक्रम स्त्युत्य असल्याचे नलावडे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चिपरीकर केले यांनी तर आभार शशिकांत पवार यांनी मानले. 

चिपळूण : येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पर्यावरण संवर्धन महिला मंडळाची बैठक चिपळूण अध्यक्ष शैलजा लांडे यांच्या अध्यक्षतेखाली ३ एप्रिल रोजी संपन्न झाली. यावेळी मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक उपस्थित होते. मंडळाचे राज्य सचिव आणि लेखक धीरज वाटेकर यांनी यावेळी उपस्थित महिलांना मंडळाच्या जनजागृती कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

उपस्थित महिला सदस्य आणि मान्यवरांचे अध्यक्ष शैलजा लांडे यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदस्यांनी आपली ओळख आणि करत असलेल्या शालेय पर्यावरण विषयक उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. येणाऱ्या अडचणी सांगितल्या. यानंतर मंडळाचे सचिव आंनी लेखक धीरज वाटेकर यांनी पर्यावरण मंडळाच्या जनजागृतीपर कामाची व्याप्ती, आवश्यकता आणि उपयुक्तता स्पष्ट केली. आपण आपल्या कार्यकक्षेत करीत असलेल्या उपक्रमांवर लक्ष कसे केंद्रित करावे ? त्याच्या नियमित नोंदी ठेवून समस्या निराकरण कसे करावे ? याबाबत वाटेकर यांनी मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांवर निसर्ग जोपासण्याचे आणि पर्यावरण वाचवण्यासाठीचे संस्कार करताना कोणते छोटे-छोटे उपक्रम घेता येतील ? त्यात येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय याबाबत त्यांनी माहिती दिली.  मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्रआबासाहेब मोरे यांनी १९८२ पासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. यातल्या विशेष भावणाऱ्या, परिसरात राबविणे शक्य असलेल्या उपक्रमांवर महिला सदस्यांनी लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी सांगितले. यावेळी वाटेकर यांनी वृक्ष संवर्धनासाठी गावागावातील देवकंअसणाऱ्या झाडांची यादी करून त्यांचे संवर्धन करण्याविषयी तसेच देवराया संवर्धनासाठी मंडळाची भूमिका सातत्याने मांडत राहण्याचे आवाहन सर्वांना केले.

यावेळी उपाध्यक्ष मायावती शिपटे, सचिव विनया देवरुखकर, खजिनदार प्रिया खेडेकर, सदस्या ज्योती कदम, सीमा कदम, नीलम मोहिते, सुप्रिया उबळेकर आदी उपस्थित होत्या. मंडळाच्या पर्यावरण प्रतिज्ञा होऊन बैठकीची सांगता करण्यात आली.

आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली सध्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वेबसाईट निर्मितीचे काम सुरु आहे. वेबसाईटचे ७० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. आगामी काळात ही वेबसाईट आपल्याला पर्यावरणीय संदर्भासाठी उपलब्ध होईल.

 

धीरज वाटेकर

राज्य सचिव

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ

मो. ९८६०३६०९४८.

२०१८ : भूतान आंतरराष्ट्रीय पर्यावरण अभ्यास दौरा समारोप 

२०१९ : चिपळूण पर्यावरण संमेलन समारोप 

१९८५ : वनराई संस्था अहमदनगर  स्थापना प्रसंगी मनोगत

मंगळवार, १४ मे, २०१९

उमाळा : मातीशी असलेल्या नात्याचा !

कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला आणि त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडला की त्याच्यातल्या ‘कोकणी’ जाणीवा अलगद फुलत जातात. या फुललेल्या जाणीवांसहच्या विचार-कृतीतून अनेकजण एकत्र येतात. एकत्र आलेली माणसं लाल मातीच्या ओढीनं जोडली जातात. एक साखळी तयार होते. मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी, त्या नात्याचं ऋण फेडण्यासाठी अशी माणसं सतत आयुष्यभर कार्यरत राहतात. चाकरमान्यांनी पाहिलेलं गाव विकासाचं स्वप्नंही अशातूनच साकार होत जातं. डोळस नजरेनं पाहिलं तर मातीशी असलेलं हे असं नातं सांगणाऱ्या अनेक कहाण्या कोकणातल्या गावागावात सतत घडत असतात. या साऱ्यामागे इथल्या मातीशी असलेला हृदयस्थ आंतरिक उमाळा दडलेला सापडतो. त्या उमाळ्याचा घेतलेला हा धांडोळा !

बाळाची नाळ आईशी जोडलेली असते. पण मातीची नाळ पिढ्यांशी जुळलेली असते. म्हणूनच मातीला / जमिनीला आई म्हणत असावेत. तिच्या दर्शनाचा सोहोळा सर्वांगसोहळा ठरतो. ताठ कण्याचा आणि निधडय़ा छातीचा बापाच्या जागी असलेला सहय़ाद्रीसारखा पाठीराखा, तांबडय़ा मातीत खेळ मांडून एकमेकांच्या गळाभेटीसाठी आसुसलेली, फळांफुलांनी युक्त वृक्षसंपदा, तिच्या अंगाखांद्यावर खेळणारी रंगीबेरंगी पाखरं, वन्यजीव, निसर्ग नवलांची दुनिया, इथलं अध्यात्म आणि माणसांची जडणघडण या साऱ्यातूनच झालेली आहे. हा माणूस शतकभरापूर्वी पोटापाण्यासाठी मोठाल्या शहरात जाऊ लागला. मनिऑर्डरवर जगणारा प्रांत अशी कोकणची ओळख खरंतर तेव्हापासूनची ! या चाकरमान्यांनी कोकणातील आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. गावागावातल्या जत्रा, मे महिन्याची सुट्टी, शिमगा-गणपतीच्या निमित्ताने चाकरमानी पिढ्यानपिढ्या कोकणात येत असतात. नोकरीत वर्षभरातून एक-दोनदा मिळणारी हक्काची रजा कोकणात जाण्यासाठी राखून ठेवणारी पिढी आजही कार्यरत आहे. हा या मातीचाच गुण म्हणावयास हवा !

गणपती हा कोकणातला सर्वात मोठा सण. एकवेळ वर्षभर नाही जमलं तरी चालेलं पण गणपतीत कोकण कमिंग मस्टच ! कोकणात गणपतीची शाळाअसते. मुंबईत कारखाना तर पुण्यात चित्रशाळाअसते. गणपतीला घरी येणाऱ्या चाकरमान्याचे सामान म्हणजे ऐश्वर्य ! काय-काय असतं त्याच्यात ! जणू सगळा संसारच सोबतीला आणलेला असतो. कोकणातील माणसांची श्रद्धाही जाज्ज्वल्य आहे. इथल्या ग्रामदेवतांचे लोकजीवनाशी असलेलं नातं भक्तीशी मर्यादित नाही. इथली दैवतं लोकांच्या दैनंदिन जगण्याचा भाग बनलेली आहेत. ही देवस्थाने आजही सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकसंग्रहाची केंद्रे आहेत. देवाला गाऱ्हाण घालणं, वर्षातून एकदा किमान शिमग्याला देवतेची ओटी भरणं, गावरहाटीचे नियम पाळणं सारं विलक्षण आहे. इथली दैवते माणसांशी बोलतात, संवादही साधतात ! संवादाची प्रक्रिया सुशिक्षित माणसांना धर्मभोळेपणाची, अंधश्रद्धेची वाटत असेलही ! पण गावात उभे आयुष्य घालविलेल्या माणसांना त्याच्या खडतर दैनंदिन जीवनात प्रसंगी संवादाची हीच प्रक्रिया आधार देणारी वाटते. हे एकविसाव्या शतकातील वास्तव आहे. इथल्या मातीशी दूरदेशीच्या माणसाचं जे नातं आजही टिकून आहे, त्यामागे ही सुद्धा काही कारणे आहेत. गूढरम्य गोष्टींचे भांडार असलेला कोकण भुताखेतांचा म्हणूनही प्रसिद्ध आहे. भूतही संकल्पना खरी की खोटी ? हा वेगळा विषय आहे. पण तरीही त्यातील रंजकतेचा इथल्या मातीवर पगडा आहे, हे नक्की ! जगातील पुढारलेल्या अनेक देशांच्या प्राचीन दंतकथात डोकावल्यावरही आपल्याला हेच जाणवते.

पावसाळ्यातल्या कोकणाचं आमच्यासारख्या अनेकांच्या मनात वेगळ स्थान आहे. कोकणातला पाऊस आजतागायत आम्ही तरी शांतपणे आलेला पाहिला नाही. ढगांच्या प्रचंड आवाजात गर्जना करीत तो येतो. तेव्हाचा गंधवती पृथ्वीचा नाकात शिरणारा सुगंध ‘मातीशी आपलं नातं’ सांगतो. हा सुगंध कोकणी कर्तृत्वाला मातीचं ऋण फेडण्यासाठी तेव्हाही उद्युक्त करायचा, आजही करतोय. वचन दिल्याप्रमाणे येणाऱ्या या पावसाच्या तयारीसाठी अवघ्या कोकणची लगबग चालू असते. पावसात कुठं पाणी गळू नये म्हणून घरावरची कौलं परतणं, पत्रे सरळ करणं, अंगणातला माटव (छत) काढून ठेवणं, नित्य चुलीसाठी लागणारी सुकी लाकडं शाकारलेल्या पडवीत आणणं अशी बरीचं कामं याकाळात सुरु असतात. कोकणी माणसाच्या पायांना ह्या दिवसात थारा नसतो. अर्थात तसा तो पूर्वीही नसायचा. नशीबानं, जन्मानं आणि कर्मानं आम्ही कोकणातील आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील आहोत. शालेय सहलींचे क्वचित प्रसंग वगळले तर बारावी होईतोपर्यंत या जिल्ह्याच्या बाहेर आमचं पाऊल पडल्याचंही आम्हांला स्मरत नाही. दापोली तालुक्यातलं केळशी आमचं मूळ गाव ! जन्म आमचा तळवडे-लांज्याचा ! लहानपणापासूनचं वास्तव्य चिपळूणात ! अगदी काल-परवापर्यंतचं आमचं सुट्टीतलं बालपण मातीच्याचं घरात गेलंय. कोकण आमच्याही जगण्याचा भाग आहे. बालपणी शाळेच्या सुट्टीच्या दिवसात उन्हाळी सुट्टीत आजोळी तर दिवाळीत मूळगावी आमचा मुक्काम ठरलेला. त्या लहानपणी या सुट्टीत आमच्याही पायांना अजिबात थारा नसायचा. आमचा संबंध कामाशी कमी नि भटकण्याशी जास्त असायचा. अशातच कधीतरी आभाळ आवाजू लागायचं. खेळून सुटी झालेली पायाखालची लाल माती उडवत सोसाट्याचा वारा यायचा. झाडं हलायची. सारं आभाळ पाखरांचं व्हायचं. भर दिवसा काळोख दाटून आल्यावर जाम मज्जा यायची. तेव्हा लाईट नव्हती. काळोख दाटून आला की आजी / काकी रॉकेलच्या छोट्या छोट्या बाटल्यांचे दिवे घरभर लावायची. कळकट्ट लोखंडी नळीने चूल फुंकायची. होणारा आवाज आम्हाला प्रचंड आवडायचा. चुलीवरचा गरम कोरा (बिना दुधाचा) चहा, यथेच्छ बरसणारा पाऊस, रातकिड्यांचे आवाज, जवळच्या पाणवठयावर, नळाजवळ येणारे बेडकांचे आवाज, रात्रीच्या जेवणानंतर रॉकेलच्या दिव्याजवळ बसून रंगणाऱ्या गप्पा, मारताना कमालीचं सुरक्षित वाटायचं आयुष्य ! किती वर्णावा या मातीतल्या आठवणींचा तो महिमा ?

भगवान श्रीपरशुरामानं समुद्र हटवून ही भूमी निर्माण केली. यावर आमची श्रद्धा आहे. कोकणच्या किनाऱ्यांवर झालेल्या संशोधनाद्वारे या भागात बऱ्याच ठिकाणी पूर्वी समुद्र खूप आतपर्यंत होता आणि पुढे तो मागे हटला याचे अनेक भूपुरातत्त्वीय पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. भडोच (भृगुकच्छ), नालासोपारा (शूर्पारक) येथील समुद्रकिनाऱ्यांबाबतची संशोधने हेच सांगत आहेत. गेली सतत १५/१८ वर्षे आम्ही या मातीत पनवेल ते पणजी भटकतो आहोत. आज एका दमात अख्ख कोकण फिरताना प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या अनेक जुन्या खुणा हरवत जाताना पाहातो आहोत. मागच्या पाच-पंचवीस वर्षांत कोकणातल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार होत आलाय ! जुन्या कौलारू देवळांच्या जागी भव्य मंदिर उभी राहिलीत. बाकी सारं ठीक मानलं तरी आधुनिक जीर्णोद्धार आमच्यासारख्या इतिहास, पर्यटन, प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासकाला पटणारा नाही. कोकणातल्या लालमातीतील वास्तुसंस्कृती वैशिष्टय़पूर्ण आहे. आम्ही ती मोडीत काढू पाहतो आहोत. इथल्या आरोग्याला पूरक असणारे तांदूळ, उडीद, नाचणी, कुळीथ, शेवग्याच्या शेंगा, जांभूळ, भोपळा, काकडी, करांदे आज गायब होत आहेत. कोकणची भौतिक प्रगती, भौगोलिक विविधता आणि इथली संस्कृती ह्याची सांगड घालण्याचे मोठे आव्हान आम्हां कोकणवासियांसमोर आहे.

कोकण बदलतंय. माणसं बदललीत. मागच्या पिढीने अनुभवलेलं कोकणपुढच्या पिढीला बघायला मिळेल का ? प्रश्न आहे. कौलारू घर, घराबाहेरची पडवी, झोपाळा, पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपा मारलेल्या खिडक्या, छानसं माजघर, जातं, सारवलेली चूल, स्वच्छ अंगण, तुळस, तुळशीतला दिवा, गुरांचा गोठा, साठवून ठेवलेलं गवत, वासरू, कौलारू देऊळ, देवळातला गुरव, मानाचे दगड, देवळातले देव... महापुरुष, वाघजाई, सोळजाई, महाकाली, व्याघ्रेश्वर, व्याडेश्वर, नागेश्वर, सोमेश्वर, नाटेश्वर, देवाची राई (देवराई), वेशीवर दिला जाणारा नारळ, शिमग्यातली सोंगं, ढोल-ताशा, निशाण, ग्रामदेवतेच्या पालख्या, घराघरातला देवचार, वाडवडिलांच्या पुण्याईची जाणीव, मोहरत जाणारा आंबा, फणस, आंब्याची साठं, माडा-पोफळीची झाडं, बकुळी, करवंदाची जाळी, कण्हेरी, इथला मांसाहार... सरंगा, पापलेट, सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी, चुलीवर भाजलेला बांगडा, भाकरी, मिरचीचा ठेचा, उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या आठला, फणसा-केळफुलाची भाजी, मऊ गुरगुरीत भात, कैरी घातलेली डाळ, घावणे, उसळी, मुसळधार पाऊस, नदीला येणारे पूर, पुलाखालून वाहणारा व्हाळ, गणपती बाप्पा, त्याची मंडपी, गावरान सजावट, मोदक, रात्रीच्या डबलबाऱ्या, दिवाळी, फोडलेलं कारीट, करंज्या, कंदिल, इथली होळी, होळीतल्या बोंबा, ग्रामदेवतांच्या जत्रा, लोककला, समुद्रातून हाती लागलेली रापण, तिला ओढणारे तांडेल, बघ्यांचा गलका असं सारं बरचं काही उद्याच्या पिढीला पाहायला मिळावं यासाठी कोकणातील काही माणसं आजही जीव तोडून धडपडतायतं. सातासमुद्रापार कोठेही न आढळणारी संस्कृती, पारंपारिक वैशिष्ट्ये सांभाळणारे, मनुष्य जीवनाप्रती ओतप्रोत भरलेल्या कृतज्ञतेचे तत्त्वज्ञान जपणारे कोकण जसजसे जागतिक नकाशावर अग्रेसरहोऊ पाहते आहे तसतसे कोकणाकडे पाहाण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलतो आहे. उद्याच्या कोकणात मुंबई ते गोवा सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग, रो-रो ट्रेन सर्व्हिस, कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेसेवा, वेंगुर्ल्याच्याजवळचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, चिपी येथील विमानतळ, सागरी महामार्ग यांमुळे परकीय आणि भारतीय पर्यटकांच्या नजरा गोव्यावरून कोकणाकडे वळताहेत. हे सारं कोकणचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणार आहे.

बड्या शहरांच्या बजबजपुरीत जगणारा माणूस आपल्या हिरव्यागार कोकणात आला की परत जाईपर्यंत कोकण डोळ्यांत साठवून घेत असतो. परतताना त्याच्या गाडीत, खांद्यावरल्या पिशवीत सारं कोकण भरलेलं असतं. बसस्टँडवर, स्टेशनवर जेव्हा तो घरच्यांच्या हातात आपला निरोपाचा आणि प्रेमाचा हात ठेवतो तेव्हाचं दृश्य तर खास ठेवणीतलं असतं. खिडकीतून बाहेर काढलेल्या हातातून एकमेकांची बोट जेव्हा सुटतात तेव्हा ती इथल्या मातीशी असलेल्या नात्यांची खरी जाणीव करून देतात. बदलत्या कोकणात त्याचं प्रमाण आज कमी झालं असेलही ! पण जाणीवांचा ओलावा कायम आहे. स्वतःला कोकणी म्हणवणाऱ्या, या मातीशी आपलं नातं सांगणाऱ्या, या मातीवर प्रेम करणाऱ्या, या मातीचं ऋण मानणाऱ्या प्रत्येकाने इथल्या मातीशी असलेल्या आंतरिक उमाळ्यापोटी या जाणीवा जपायलाच हव्यात. 
 
धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५,
जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८         
ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  
ब्लॉग  : https://dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)










सोमवार, १३ मे, २०१९

मराठी कथा सृष्टीतला नवा प्रयोग : माकडहाड डॉट कॉम


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष, नाटककार, कवी प्रा. संतोष गोनबरे यांचा सुपरिचित प्राणीकथांच उपहासगर्भ पुनर्कथन, जुन्या कथांचा काळानुसार अन्वयार्थ असलेला माकडहाड डॉट कॉम हा कथासंग्रह नुकताच पुण्याच्या संस्कृती प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला आहे. आपल्या संस्कृत वाड्मयातील विष्णूशर्मांचे पंचतंत्र, पाश्चात्य इसापच्या नीतिकथा, महानुभाव पंथातील चक्रधर स्वामींच्या दृष्टांतकथा आदि माध्यमातून लेखनात प्राणीसृष्टीचा वावर झालेला आहेच ! गोनबरे यांनी कालातीत संदर्भांसह उपहासगर्भ कथेच्या फॉर्ममध्ये हा प्राणीसृष्टीचा वावर आणला आहे. मराठी कथा क्षेत्रातला आजवर न हाताळला गेलेला हा नवा प्रयोग आहे.

चिपळूणचे नामवंत कवी अरुण इंगवले यांची समर्पक प्रदीर्घ प्रस्तावना हे पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांनी केलेली ‘अवस्थ माकडहाडाची चिकित्सा’ वाचताना त्यांनीही हा कथासंग्रह जवळपास लेखकाइतकाच अभ्यासल्याचे जाणवते. निसर्ग नियमांची संविधानिक जबाबदारी निष्ठेने पाळणाऱ्या प्राण्यांच्या प्रवृत्तीशी मानवी दुर्गुणांना तोलणे ही फारमोठी विसंगती आहे, असे इंगवले यांनी म्हटले आहे. यातल्या साऱ्या कथा वरकरणी वेषांतर केलेल्या वाटतात. चिकित्सकपणे वाचल्या तर बोधकथा किंवा नीतिकथा वाटतात. आणि त्यात खोल डुबकी मारली तर अचंबित करणारे मतितार्थ गवसतात. हे प्रस्तावनाकारांचे विधान कथासंग्रह वाचताना वारंवार आठवत राहते.

संग्रहातील साऱ्या कथा मॉडर्न इसापनीती सांगतात. पूर्वी कधीतरी गावातील प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनात लेखकाने कोल्हा, लांडगा, माकड यांचा एक संवाद लिहिला होता. पण माकड व्हायला कोणीच तयार नसल्याने तो प्रयोग झाला नाही. लेखकाला इसाप पहिल्यांदा भेटला तो तेव्हाच ! पुढे मग अनेकदा भेटत राहिला. संग्रहातील ‘म्हातारी आणि वाघ’ या पहिल्याच कथेतील ‘भोपळा सुकला तर ? म्हातारीचे काय होईल ?’ हा आणि असे अनेक प्रश्न लेखकाला पडू लागले नि त्याची उत्तरे शोधताना या कथांची निर्मिती झाली. आर. के. नारायण यांनी आपल्या लेखनातून ‘मालगुडी’ नावाचं गावं निर्माण केलं. तसाच प्रयत्न गोनबरे यांनी ‘भोचकवन’ नावाने जंगलं उभारून केला आहे. समकालीन प्रश्नांना भिडून वाचकांना खडबडून जागं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कथा आहेत. प्रमाणभाषा आणि बोलीभाषेचा वापर, सामन्यांच्या तोंडच्या शब्दांचा खुबीने वापर असल्याने यातलं कथानक अधिक जवळचं वाटतं. मानवी जीवनात घडते, ते प्राणी सृष्टीत घडले तर काय होईल ? अशा विचारातून लिहिलेल्या या कथा आहेत. वरवर हलक्याफुलक्या वाटणाऱ्या या साऱ्या कथा आशयघन असून अत्यंत संवेदनशील विषयांना लेखकाने वाचा फोडलेली जाणवते. ‘जिंकणारा जिंकत राहतो, हरणारा हरत राहतो. जिंकण्याची वृत्ती शारिरिक न होता मानसिक झाली की हरणाराही उरफुटेस्तोवर जिंकण्यासाठी धावत सुटतो. हरणं ही सवय असेल तर जिंकणं हे व्यसन आहे. दोन्हीही बदलता येत नाहीत.’ असे अनेक जबरदस्त पंच कथानकात भेटत राहतात.

म्हातारी आणि वाघ’ कथेत म्हातारीच नाव सांगायचं राहून गेलं म्हणत लोकशाहीचा केलेला उल्लेख विदारक वास्तव पुढे आणते. पुढारलेल्या समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारा वाघ, मागासलेल्या समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारी म्हातारी ! इतर पांढरपेशे जीवन जगणारे प्राणी, कथेतील इंग्रजी आणि ग्रामीण शब्दांची उधळण छान जमलेली आहे. चोरून खीर खाणाऱ्या मांजराची ‘बुडबुड घागरी’ कथा न्यायदानाच्या परिभाषेत वाचताना आजचे वास्तव नजरेखालून जात असल्याचे जाणवते. इतिहासात आठशे वर्षांपूर्वी ‘काऊचे घर शेणाचे, चिऊचे घर मेणाचे’ ही कथा चक्रधरस्वामींनी सांगितली आहेच. इथे ‘चिऊ-काऊ’ कथेत लबाड कावळ्याची भूमिका ज्या व्याकुळतेने मांडली आहे ते पाहाता मूळ कथेचा भाव पूर्णपणे बदलला आहे. माकडाचा अप्रतिम शोधप्रवास असलेल्या पाचर कथेत परखड भाष्य करून शिक्षण व्यवस्थेचा उपरोधिक समाचार घेण्यात आला आहे. ‘वेबसाईटवर शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण सोडून सर्वकाही माहिती मिळाली.’ हे वाक्य विचार करायला प्रवृत्त करते. लेखकाचे लेखन सामर्थ्य दाखविणारी कमी शब्दातील ‘श्रेष्ठ’ ही रंगतदार कथा सर्वार्थाने विचार करायला लावणारी आहे. जातीभेदाचे वास्तव मांडणारी ‘बोकड आणि लांडगा’ कथा, दैनिक बाताबाती... बातमी खरी तोंडाला येईल ती ! ही मुळातून वाचण्यासारखी कथा आहे. लेखकाने कथासंग्रहात उभारलेल्या भोचकवनातील साऱ्या कथांमागे नितांत करुणा दडलेली आहे.

माकडहाड हा प्राणी आणि माणूस यांच्या उत्क्रांतीमधला फरक आहे. ‘कॉक्सिक्स’ नावाचे हे टोकदार हाड वाढले तर शेपूट होते. खुरटले तर टोचत राहते. म्हणूनच प्राणी स्वभावाने सच्छिल वावरतात. तर माणसं स्वभावाने एकमेकांना टोचत राहतात. काहीश्या वेगळ्या शैलीचा, व्यवस्थेला आव्हान देऊ पाहाणारा हा कथासंग्रह आहे. माणसं व्यवस्थेची गुलाम झालेली असताना लेखक पक्ष घेऊन लिहीत नाही. बोलीभाषेचा समर्पक उपयोग लेखकाने केला आहे. पुस्तक कुठल्याही पानावरून वाचायला सुरुवात केली तरीही छान वाटतं. अचूक शब्दांची केलेली निवड हे या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य ! माणसाचा उत्क्रांतीच्या विरुद्ध दिशेने चाललेल्या दिशाहीन प्रवासाचे वर्णन असलेला हा वाचनीय कथासंग्रह आहे.

पुस्तकाचे नाव : माकडहाड डॉट कॉम (कथासंग्रह)
पृष्ठ संख्या : १७६, मूल्य : २०० रुपये
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे 
फोन : ०२२ / २४४९७३४३


पुस्तक परीक्षण : धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८ 

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...