बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

चाळीशीच्या उंबरठ्यावर !

      नेमिले तू करि कर्म कर्तव्यचि म्हणोनिया : गीताई  
कालच्या १७ ऑक्टोबरला आम्ही वयाची ३८ वर्षे पूर्ण करून ३९ व्या वर्षात पदार्पण केले. अत्यंत शिस्तबद्ध जीवन जगण्याची कला मनुष्याला सततचे समाधान प्राप्त करून देत असते, याचा अनुभव वयाच्या १७ व्या वर्षांपासून गेली २१-२२ वर्षे आम्ही घेत आलो आहोत. मानवी जीवनात अनंत अडचणी सदैव येतच असतात, पण त्यावर सतत मात करून एकेक पाऊल पुढे जाण्यातली गंमत काही औरच असते. संपूर्ण कुटुंबियांसह असंख्य वंदनीय ‘गुरुजी’, सच्चे मार्गदर्शक, शिक्षक, जीवलग मित्र-मैत्रिणी आणि आबालवृद्धांच्या सानिद्ध्यात आम्हीही हा अनुभव घेतला आहे.

वास्तविक चाळीशी म्हटले की अनेकदा आपल्या भुवया उंचावतात, कधीकधी अस्वस्थही वाटू लागते. मलाही ‘सुटलेल्या पोटाची कहाणी’ लिहावी लागते की काय अशी शंका होती ! असो... आपण किती वर्षे जगलो यापेक्षा कसे जगलो यालाच जीवनात अधिक महत्त्व असल्याचे संदेश आपण फेसबुक / वॉट्सपवर सतत वाचत असतो. तशा जगण्यातली मजा काही वेगळीच असते. गुणवत्तापूर्ण जगण्यासाठीही चाळीशीनंतरचा काळ अधिक महत्त्वाचा असतो. वय वाढण्याची प्रक्रिया ही आपल्या जन्मापासूनच सुरूच असते. शरीरात काही अपरिहार्य, अटळ बदल वयोमानानुसार होत असतातचं ! ते मान्य करून जगण्याची सवय आपल्याला आनंद प्रदान करते. बालपणापासून आम्ही वाट बघण्याचा अतिरेक आणि अतिघाई या मधला फरक समजून घेत जगण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. तरीही अनेकदा घाई होतेच ! कालच्या वाढदिनी आम्हांला फोन, फेसबुक, वॉट्सपवरून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आम्ही याद्वारे आभार व्यक्त करीत आहोत.
      वीस वर्षांची काय नवलाई ती, साखर तेव्हा कायतरीच स्वस्त होती !
      बापानं आमच्या वाटी वाटी वाटली ती, पहिल्या पुत्र लाभाकारणे !
      घराणे तसे देवादिकातले, भटजी आले, पाटावर बसले !
      पंचांग उघडले, आणि घातले, अवघे बोटचि की हो तोंडात !
      सतरा ऑक्टोबरला जन्म ज्याचा ज्याचा...          
      वयाच्या विसाव्या वर्षी कॉलेजच्या स्नेहसंमेलनात ही ७२ ओळींची कविता आम्ही सादर केली होती. दुर्दैवाने ती आमच्या कडून गहाळ झाली. पण या सुरुवातीच्या ओळी मात्र आजही आठवत राहतात. त्यावेळी आमच्यासोबत असलेल्यांना नक्की आठवतील. वीस वर्षांनंतर चाळीशीच्या उंबरठ्यावर आज त्या पुन्हा शेअर कराव्याश्या वाटल्या.      

आमच्या ‘नियोजित’ जीवनाला अर्थप्राप्त करून देणाऱ्या सर्वांना पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद !!!

धीरज वाटेकर
विजयादशमी, दिनांक १८ ऑक्टोबर २०१८

सन २००० @ अलोरे ता. चिपळूण 


सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

‘तिवरे ते मालदेव’ व्हाया ‘बैलमारव घाट’

             

 
इतिहासात, ‘देश आणि कोकण’ या दरम्यान चालणारी चिपळूणसह त्याला जोडलेल्या अनेक गावांची व्यापारी देवघेव ज्या मार्गाने चालत होती तो घाट ‘बैलमारव घाट’ या नावाने प्रसिद्ध आहे. पूर्वांपार या मार्गाने लमाणांचे तांडे कोकणात येत असत. सन १८४६ च्या दरम्यान रत्नागिरी-सातारा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातून बैलगाडी प्रवास सुरु झाला आणि ‘बैलमारव घाट’ परिसराचे व्यापारी महत्त्व हळूहळू कमी होत गेले. मात्र प्रदूषणाने घेरलेल्या सध्याच्या काळात या प्राचीन घाटमार्गांवर असणाऱ्या पदभ्रमण मार्गांना महत्त्व प्राप्त होऊ घातले आहे. वन्यजीव परीक्षणपर्यटनासह ट्रेकींग करणाऱ्यांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान ८ हॉट स्पॉटनजीकच्या बफर झोनचे दरवाजे वन्यजीव विभागाने नुकतेच उघडले. तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट हा त्यापैकी एक आहे. या ‘ट्रेकरूट’वरील प्रत्यक्ष अनुभवलेल्या, सामान्य पर्यटकाला आपलंस करण्याची क्षमता असलेल्या परिसराचा आढावा !

     
प्राचीन बैलमारव घाट  
चिपळूण पर्यटन विकासासाठी झटणारी मातृसंस्था ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ने या जंगल ट्रेकना पर्यटकाभिमुख बनविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच आबालवृद्धांच्या उत्साही सानिद्ध्यात 
सह्याद्री टायगर रिझर्व्हनजीक असलेला तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट हा ट्रेक ३० निसर्गप्रेमींनी १६ कि.मी. भटकंती करीत अडीच हजार फुट उंचीपर्यंत जात यशस्वी केला. या ट्रेक दरम्यान तिवरेदुर्गमालदेवपालीदेवसरीबैलमारवघाटरेडेघाट हा परिसर नजरेच्या टप्यात येतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या ८२४८.८ चौ.कि.मी. भौगोलिक क्षेत्रापैकी अवघे ६२.५९ चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्रीच्या उंच शिखरांची उंची ४०० ते २००० मीटरपर्यंत आहे. जिल्ह्याला लागूनच कोयना व चांदोली अभयारण्ये असल्याने वन्यप्राण्यांचा वावर सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘जंगलट्रेक’चे प्रयोजन असून हे घडल्यास जंगलतोडजंगलातील वणवे यांचे प्रमाण कमी होऊ शकेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

      चिपळूणहून ३१ कि.मी. अंतरावर असलेले तिवरे हे गाव सह्याद्रीतील चिपळूण तालुक्यात इतिहासप्रसिद्ध ‘दसपटी’ (दस म्हणजे दहा आणि पट्टी म्हणजे कर दहा टक्क्यांची करवसुली) या २८ गाव इनाम भागात येते. चिपळूण तालुक्याच्या या पूर्व भागात,
मालदेवच्या दिशेने कूच करताना ट्रेकर्स 
सह्याद्रीत बारराव कोळ्याचे साम्राज्य होते. मौजे पेढांबे गावाच्या माथ्यावर खडपोली, कळकवणे यांच्या सीमामध्यावर पंधराशे फूट उंचीचा बारराव कोळ्यांचा ‘किल्ले बारवई’ आहे. तेथे १२ कोरीव लेणी (ओवरी/खोली) आहेत. त्यांचा पाडाव केल्यानंतर शिंदे-कदम सरदारांनी या भागात आपला अंमल प्रस्थापित केला. या दरम्यान त्यांनी कुंभार्ली, चोरवणे खिंड आणि तिवरेच्या घाटात ध्वज लावून चौक्या बसविल्या होत्या. या घाटांतून वाहतूक चालू असताना चिपळूणसह गोवळकोट बंदरात पडाव लागत. गोवळकोट बंदरात ४०० लोकांना एकाचवेळी आणणाऱ्या बोटी प्रवासात होत्या. शहरातील जुन्या पद्मा चित्रमंदिरासमोरील ‘कोकणी आणि घाटी’ अशा दोन स्वतंत्र भव्य गाडीतळात शेकडो बैलगाड्या उभ्या असत. सांगली, कराड, कोल्हापुरातून गूळ, ज्वारी, मिरची, कांदा, लसूण, गुळ, हरभरा, चवळी, मूग, आणि इतर शेतमालाची वाहतूक होत असे. बैलमारव घाटातून 
पुरातन काळापासून देशावरून लमाणांचे तांडे या वाटेने कोकणात येतं. हा घाट कोकण व पश्चिमघाट यांना जोडणारा महत्वाचा दुवा होता. याच मार्गे बैलांच्या पाठीवर माल लादून त्याची ने-आण चाले. म्हणून त्यास बैलमारव घाट असे नाव पडले.

      तिवरेचे ग्रामदैवत श्रीदेवी व्याघ्रांबरी देवस्थानचा ञैवार्षिक जञोत्सव (समा) आपली सुमारे पाचशे वर्षांची परंपरा जोपासून आहे. गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गंगेचीवाडी भागातखडकाळ नदीप्रवाहाच्या तीरावर गंगाकुंड’ आहे. या कुंडात दर तीन वर्षांनी कार्तिक महिन्यात सातशे वर्षापूर्वीपासून गंगा उगम पावते आहे. या पर्वणी काळात गंगास्नानास भाविकजिज्ञासूपर्यटक यांची येथे रीघ लागलेली असते. तिवरे येथील सहयाद्रीच्या रांगेत उंच टेबलासारखा पठारवजा डोंगर दिसतो तो तिवरेगड. तिवरे गावातून बैलमारव घाटातून या गडाकडे, मालदेवकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. घाट संपल्यानंतर खिंडीतून उजव्या बाजूने पाल घाटातून पाली गावाकडे, तिवरेगडावर पोहोचता येते.तिवरेगडावर देवीची छोटी मूर्ती, चौथ-याचे भग्नावशेष दिसतात. हा परिसर सह्याद्री प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये असल्याने तेथे जाता येत नाही. घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याची योजना असावी. तिवरे धरणाच्या उजवीकडीलभेंडवाडीतील उंच टापूवर आपल्या गाड्या उभ्या करून ठेवून धरणाच्या डाव्या किंवा
मालदेवहून दिसणारे तिवरे धरण  
उजव्या 
तीरावरून (स्थानिक वाटाड्यांच्या सूचनांनुसार) ट्रेकची सुरुवात करता येते. तिवरे ते मालदेव हा बैलमारव घाटातील प्रवास प्राचीन इतिहासाची आठवण करून देतो. घाटाच्या मध्यभागीही श्रीदेवी व्याघ्रांबरीचे स्थान आहे. याच घाटमार्गे तिवरे गावात प्रवेश करताना देवीने येथे काहीकाळ विसावा घेतला होता. तेथून थोडे पुढे मार्गक्रमण केल्यानंतर, ‘बैलमारव आलं हं !’ ही अक्षरे लिहिलेला मोठासा काळाकभिन्न पत्थर दिसतो. तिवरे धरणाच्या बॅकवॉटरच्या शेजारून सुरुवातीचा  प्रवास पूर्ण झाल्यानंतर हा घाट सुरु होतो. घाटातील वातावरण आल्हाददायक आहे. घाट संपतो तेथे खिंड आहे. तिवरे गावातून मालदेवकडे पहिले असता खिंडीचा आकार इंग्रजी ‘U’ अक्षरासारखा दिसतो. मालदेवच्या पश्चिमेला कोकणात याच खिंडीतून दोन वाटा उतरल्या आहेत. त्यातली एक बैलमारव घाटमार्गे आणि दुसरी सोंडेवरून उतरणारी देवसरीची वाट आहे. तिवरे गावातून तेराशे फूट उंचीवर सहयाद्रीत ऊर्ध्व बाजूकडून पायाकडे निमुळता होत गेलेला सुमारे २२ फूट उंचीच्या विशाल प्रस्तरखंडाच्या शेजारून ही वाट गेलेली आहे. प्रस्तरखंडाचा आकार साधारणपणे उभ्या केलेल्या चिलमीसारखा दिसायचा म्हणून त्यास चिलीम खडकही म्हणत. किमान अडीच-तीन तासांच्या पदभ्रमणानंतर बफर आणि कोअर झोनच्या सीमांवर असलेल्या अडीच हजार फुट उंचीवरील मालदेव गाव सीमेत आपण तिवरेघाट खिंडीतून प्रवेश करतो. सुखावणारा थंडगार वारा येथे आपले स्वागत करतो. जवळचा एखादा जीवंत झरा आपली तृष्णा भागवतो.मालदेव हद्दीत डाव्या बाजूस असलेल्या उंच टापूवरून दिसणारे तिवरे धरणाचे विहंगम दृश्य, सह्याद्रीच्या विशालतेचे दर्शन घडते.

ट्रेकमधील एका निवांत क्षणी ब्लॉगलेखक  
      सह्याद्रीच्या माथ्यावर उंच पठारावरील सपाट माळरान म्हणजे माळदेव किंवा मालदेव’ होय. कोयना खोऱ्यातील वासोटा किल्ल्याजवळ असलेल्या ‘मालदेव’चे सन १९५९ नंतर कोयना जलविद्युत प्रकल्पाची गरज म्हणून मनुष्य वस्ती उठवून पुनर्वसन झाले आहे. परंतु शहरीकरणाचा स्पर्श न झालेले, गेली अनेक दशके मालदेव ट्रेक करणाऱ्या असंख्य डोंगरभटक्यांचे स्थानिक मार्गदर्शक ‘पितृतुल्य’ ८५ वर्षीय शामराव कोकरे यांनी गावावरचे प्रचंड प्रेम, मातीशी असणारे मायेचे नाते यांमुळे अगदी काल-परवापर्यंत गाव सोडलेले नव्हते. ‘मालदेव रिकामं झाल्यानंतरही शामराव भूतासारखे एकटे तिथं राहात. श्वापदांनी हल्यात त्यांचा अडीचशे जनावरांचा गोठा रिता केला. पण ‘मरेन तर इथंच’ या हट्टाने शामराव अनेक दशके येथे राहिले. डोक्याला गुंडाळलेलं मुंडासं, अंगात शर्ट, भगवी लुंगी, हातात काठी, खांद्यावर बॅग असा पेहेराव असलेल्या  शामरावांचा अनेक ट्रेकर्सनाकोयनेतल्या निसर्गाइतकाच लळा आहे. वन्यजीवांच्या सान्निध्यात राहण्याची सवय जडल्याने त्यांना आजही कुठेही गेलं तरीही मालदेव आठवत राहतं. याच आठवणीतूनच त्यांनी (१ ऑक्टोबर २०१८) मालदेवकडे कूच केली नि ट्रेकदरम्यान आमची-त्यांची भेट घडली. ट्रेकच्या दिवशी पहाटे आमच्या सौभाग्यवतीने बनवून सोबत दिलेले ‘कांदेपोहे’ शामरावांना खाऊ घालताना आम्हाला जो आत्मिक आनंद मिळाला तो शब्दातीत ! ‘वाघ आता म्हातारा झालायं, आता त्याला किंमत उरली नाही’, हे त्यांचे वाक्य ऐकून मनाला वेदनाही झाल्या. जंगली श्वापदांची शास्त्रीय माहिती बाजूला ठेवून शामारावांना विविध प्रश्न विचारून खरं जंगल जाणून घेण्याचा अनेकांचा शिरस्ता आम्हीही पाळला. मालदेव हे जिल्ह्याचे ठिकाण साताऱ्यापासून ९७ कि.मी., तर जावळी ९२  कि.मी. अंतरावर आहे७३४ हेक्टर क्षेत्र असलेल्या कोअरझोन मध्ये असलेल्या मालदेवात आता मनुष्य वस्ती नाही. ‘शामराव’ मात्र आजही या भागात अधून-मधून भटकताना दिसतात. या भागात उंबर, अंजन, कढीपत्ता, शिकेकाई, वावडिंगची झाडे, रानगवे, अस्वल, जंगली कुत्रे, रानडुक्कर, बिबट्या, कोल्हा आदि वन्यजीवांचे अस्तित्त्व आहे. अरण्यसहवासासाठी मालदेव उत्तम आहे. शामराव कोकरेंचे वास्तव्य राहिलेल्या वाड्यानजीक एक पुरातन जांभ्या दगडाची बांधीव चौकोनी विहीर (घोडेबाव) असून तीत उतरण्यास रूंद पायऱ्या आहेत. मुख्य मंदिरात चार कोनाडयाचे छप्पर असून भैरव व देवीच्या मूर्ती आहेत. कोयना धरणाचे बॅकवॉटर पसरलेल्या बामणोली गावातूनही बोटीने मालदेवला जाता येतेहा परिसर कोअरझोन (अतिसंवेदनशील) असल्याने येथे जाण्यास मज्जाव आहे.

      मनुष्याला अरण्यवाचन आल्यासच जंगले’ टिकतील ही नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांची भूमिका ट्रेकमध्ये त्यांच्याच तोंडून ऐकण्यातला आनंद काही औरच ! ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’चे अध्यक्ष श्रीराम रेडीज यांनी आपली संपूर्ण शारीरिक क्षमता पणाला लावून हा ट्रेक पूर्ण केला. हे पाहून त्यांना ‘सलाम’ करावासा वाटला. आजपर्यटनाचा ट्रेण्ड बदलतोय. लोक त्याच-त्या पर्यटनाला कंटाळलेत. शहरातील जगण्यातली हिरवाईची उणीव भरून काढण्यासाठी पर्यटकांची पावलं निसर्ग सफारींकडं वळू लागलीत.पर्यटकांना जंगलांतला भन्नाट रानवारा शीळ घालतोय. जंगलातल्याआडरानातल्या वाटा खुणावू लागल्या आहेत. म्हणूनच नेचरट्रेल्सजंगल सफारींना प्रतिसाद मिळतोय. महत्त्वाचेम्हणजे सर्व वयोगटातील निसर्गप्रेमी तिथं जाताना दिसत आहेतट्रेकिंग करताना मानवाच्या शारीरिक क्षमतांचा कस लागतो. अनेकदा शरीर अजून सुदृढ बनवायला हवं,खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचं’ असल्याची जाणीवही होते. वयाच्या चाळीशीत थोडंस चालल्यानंतर पाय दुखायला लागले तर आपल्या शरीराच्या सूचना आपल्यालाच मिळत जातात. ट्रेक करताना नुसतेच काय डोंगर चढता नि उतरता ? हा पूर्वीचा खोचक प्रश्न आता कमी झालायं. ट्रेकिंगमध्ये निसर्गातल्या अनेक घटकांशी मुक्तपणे संवाद करता येतो. अनेक सहकाऱ्यांशी जुळवून
२५०० फूट उंचीवर पोटपूजा !
घेत जीवनाची शिस्तबद्ध हालचाल करता येते. डोंगरात वर चढताना श्वासांची क्रिया जलद होते
त्यामुळे पूर्ण श्वासोच्छ्वासाची जलद प्रक्रिया घडते. रक्तप्रवाह वाढतोरक्ताभिसरणाची क्रिया जलद होते. प्रसंगी शीरांतीलनसांतील ब्लॉकेज निघतात. ब्लड-प्रेशरचा त्रास कमी होतो. गुडघे, पायांवर ताण येऊन स्नायु उत्तेजित होतात. चढ चढताना दम भरल्याने फुफ्फुसे पुर्ण क्षमतेने ऑक्सीझन आत घेतात आणि बाहेर सोडतात. गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द चालल्याने कधीकधी डिहाइड्रेशनमुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते मात्र इप्सित ठिकाणी पोहोचल्यावर झरातळीपावसाचे अतिशुद्ध पाणी पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. शरीरातील चरबी कमी होते. मन प्रसन्न करणाऱ्यानिसर्गाची मुक्तहस्त उधळण असलेल्या वातावरणाने ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. ट्रेकिंगमुळे श्वसनरक्तप्रवाहगुडघेछातीपोट आणि मानसिक मानसिक आजारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः खात्री केव्हाही श्रेयस्कर !
    
  निसर्गावर मात करु पाहाणाऱ्या जीवनशैलीने आम्हाला गेल्या शतकात हृदयरोग आणि चालू शतकात कर्करोग दान’ केला आहे. यामुळे मनुष्य नावाचा भारतीय प्राणी निसर्गाकडेनिसर्ग सहवासाकडेआयुर्वेदीय संकल्पनांकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहू लागला आहे. दैनंदिन टिपिकल घर ते ऑफिस जीवन जगणाऱ्या अनेकांना ट्रेकिंगचे महत्त्व पटल्याने डोंगरातील पदभ्रमण हा साहसी पर्यटन प्रकार आता सामान्य पर्यटकांत रुजतो आहे. ट्रेकिंगमॅरेथान सारख्या उपक्रमांना सामान्यजनांचा प्रतिसाद वाढतो आहे. शहरात खाण्यावर वाट्टेल तसा आडवा-उभा ताव मारतअरबट-चरबट खाणं शरीराला लवकर थकवतं आणि डोंगर-दऱ्यांमधल्या पाऊलवाटांवरून चालताना हे जाणवतं. या बाबतच्या वाढत्या जाणीवांमुळे पर्यटक’ म्हणवणारा एक वर्ग ट्रेकिंगकडे वळतो आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान वन्यजीव विभागाने ८ हॉट स्पॉटनजीकच्या बफर झोनचे दरवाजे नुकतेच उघडल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ट्रेकला मिळालेला प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे. तेव्हा ग्लोबल चिपळूण पर्यटन’ (संपर्क : ९८२३१३८५२४) संस्थेने सुरु केलेल्या या ट्रेकचा आनंद घ्यायला तुम्हीही या ! इथला सह्याद्री तुमचे स्वागताला सज्ज आहे !



धीरज वाटेकर


पत्ता : विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.

ई-मेल - dheerajwatekar@gmail.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहासपर्यटनपर्यावरणविषयकसामाजिक जागृतीपर विषयात गेली १५ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

दैनिक सागर चिपळूण १४ ऑक्टोबर २०१८ 

मुंबई तरुण भारत १४ ऑक्टोबर २०१८
सहभागी ट्रेकर्स



रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

परदेशी पाहुणे ‘सीगल’ कोकणात दाखल !

 थंडीच्या हंगामाची चाहूल लागताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णै, पाडले, आडे येथील समुद्रकिनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने सीगल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यामुळे किनारपट्टीवर विलोभनीय दृश्य पहावयास मिळत असून किनाऱ्याचे वैभव अधिक खुलले आहे. हे सीगल पक्षी अमेरिका, युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी कोकणात येत असतात. पांढरा शुभ्र रंगपंखांवर करडा रंगलालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असे मोहक रूप असलेल्या पक्ष्यांना या पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठी गर्दी करत असतात.

फोटोस्टोरी : धीरज वाटेकर




गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

आबालवृद्धांच्या उत्साही पदभ्रमणाने ‘तिवरे ते मालदेव जंगल ट्रेक’ सुरु

मालदेव हद्दीत आल्यानंतर सह्राद्रीच्या
विशालतेसोबत निसर्गप्रेमी पर्यटक.
चिपळूण : भारत सरकारने सन २००८ साली निर्माण केलेल्या ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह’च्या चिपळूण तालुक्यातील ‘बफर आणि कोअर झोन’च्या सीमांपर्यंत घेऊन जाणाऱ्या अडीच हजार फुट उंचीवरील तिवरे ते मालदेव जंगल ट्रेकची १६ कि.मी. भटकंती नुकतीच ३० निसर्गप्रेमी आबालवृद्धांच्या सान्निध्यात उत्साही पदभ्रमणाने सुरुवात झाली. चिपळूण पर्यटन विकासासाठी झटणारी ‘मातृसंस्था’ ग्लोबल चिपळूण पर्यटन या संस्थेने संयोजकत्त्व स्वीकारलेल्या या जंगल ट्रेकचे अलिकडेच उद्घाटन झाल्याच्या पार्श्वभूमीवर, वन्यजीव सप्ताहच्या निमित्ताने हा पर्यटनाभिमुख साहसी उपक्रम पहिल्या बॅचसह सुरु करण्यात आला.
  
भारतीय संस्कृतीप्रमाणे ट्रेकच्या सुरुवातीला तिवरेची ग्रामदेवता असलेल्या श्रीदेवी व्याघ्रांबरीला श्रीफळ अर्पण करण्यात आला. या परिसरात उपस्थितांना उपक्रमामागील भूमिका सांगण्यात आली. कोकणात समुद्र पर्यटनासोबत आगामी काळात ‘सह्याद्री पर्यटन’ बहरायला हवे आहे. असंख्य निसर्ग अभ्यासक, डोंगरभटके यांच्या सततच्या वावराने मनुष्य संपर्कात असलेल्या सह्याद्रीत पर्यटकांची पाऊले वळावीत, त्यातून सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांना, तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी हा या उपक्रमामागचा मूळ हेतू आहे. या पहिल्या एकदिवसीय ट्रेकमध्ये डॉ. अरूण पाटील, सावर्डे पोलिस कर्मचारी रमा करमरकर, सेवानिवृत्त शिक्षिका शालन रानडे, संदीप चिंगळे, 'नेस्ट' संस्थेचे कार्यकर्ते किशोर मानकर, विद्या कोकण कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका गार्गी सरखोत, प्राथमिक शिक्षिका आखाडे, श्रीपरशुराम सान्निध्य निसर्ग पर्यटन केंद्राचे विलास महाडिक, शालेय विद्यार्थी नेहा महाडिक, कौशिक करमरकर, सुरभी म्हापाते, प्रथमेश पाटील, ट्रेकचे संयोजन करणा-या 'ग्लोबल चिपळूण टुरिझम' संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रेडिज, मॅनेजर विश्वास पाटील, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, ट्रेकचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, तिवरे ग्रामपरिस्थितीय विकास समितीचे अध्यक्ष हणमंत शिंदे, सदस्य सुरेख शिंदे, तिवरे विविध सहकारी सोसायटीचे सचिव पांडुरंग शिंदे, 'पर्यटक गाईड' ट्रेनी म्हणून सहभागी झालेले उदय मुकुंद शिंदे, प्रतिक यशवंत शिंदे, प्रिती गंगाराम शिंदे, निखिल कृष्णाजी शिंदे, विक्रांत संतोष शिंदे, मंगेश पवार, सुरेश गणपती बालुगडे, सिद्धेश सुभाष दळवी, वाटाड्या शांताराम कोकरे, राजू शिंदे, वनपाल अमित वाझे, खंडेराव कटकडे, फॉरेस्ट गार्ड सुभाष आणि गेली अनेक दशके मालदेव ट्रेक करणाऱ्या असंख्य डोंगरभटक्यांचे स्थानिक मार्गदर्शक राहिलेले शामराव कोकरे आदि सहभागी झाले होते.

तिवरे धरणाच्या उजवीकडील, भेंडवाडीतील उंच टापूवर गाड्या उभ्या करून ठेवून धरणाच्या डाव्या तीरावरून ट्रेकची सुरुवात झाली. तिवरे ते मालदेव हा बैलमारव आणि व्याघ्रांबरी घाटातील प्रवास अनेकांना प्राचीन  इतिहासाची आठवण करून देत होता. याच घाटमार्गे तिवरे गावात प्रवेश केलेल्या देवीने ज्या ठिकाणी काहीकाळ विसावा घेतला होता तिथेच घाटाच्या मध्यभागी श्रीदेवी व्याघ्रांबरीचे स्थान आहे. सर्व निसर्गप्रेमी पर्यटकांनी या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली. तीन तासांच्या पदभ्रमणानंतर ‘बफर आणि कोअर झोन’च्या सीमांवर असलेल्या अडीच हजार फुट उंचीवरील मालदेव गाव सीमेत प्रवेश केल्यानंतर सुखावणाऱ्या थंड वाऱ्याने सर्वांचे स्वागत केले. मालदेव हद्दीत डाव्या बाजूस असलेल्या उंच टापुवरून, सह्याद्रीच्या विशालतेचे दृश्य सर्वांनी आपापल्या नजरेत सामावून घेतले. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी दोन खोल्या बांधण्याचे काम या ठिकाणी सुरु असल्याचे दिसले. याच ठिकाणी सर्वांनी ‘वनभोजन’ केले. जवळच असलेल्या एका जीवंत झऱ्याच्या पाण्याने सर्वाची तहान भागविली. या ठिकाणी ट्रेकचे मार्गदर्शक निलेश बापट यांनी, ट्रेक  कशासाठी ? याबाबत बोलताना ‘मनुष्याला अरण्यवाचन आल्यासच ‘जंगले’ टिकतील’ ही आपली भूमिका सर्वांना समजावून सांगितली. इथल्या निसर्गात आढळणाऱ्या जैवविविधतेची माहिती त्यांनी यावेळी दिली. मालदेव ट्रेक करणाऱ्या असंख्य डोंगरभटक्यांचे स्थानिक मार्गदर्शक राहिलेल्या शामराव कोकरे यांना विविध प्रश्न विचारून पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला. जंगली श्वापदांची शास्त्रीय माहिती बाजूला ठेवून शामरावांसोबतच्या गप्पांमधून खरं जंगल जाणण्याचा अनेकांचा शिरस्ता यावेळीही पाळण्यात आला. सह्याद्रीच्या सानिद्ध्यातील तिवरे हे ऐतिहासिक गाव आहे. ग्रामदैवत श्रीदेवी व्याघ्रांबरी देवस्थानचा ञैवार्षिक जञोत्सव (समा) आपली सुमारे पाचशे वर्षांची परंपरा जोपासून आहे. गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गंगेचीवाडी भागात, खडकाळ नदीप्रवाहाच्या तीरावर  ‘गंगाकुंड’ आहे. या कुंडात दर तीन वर्षांनी कार्तिक महिन्यात गंगा उगम पावते. या पर्वणी काळात गंगास्नानास भाविक, जिज्ञासू, पर्यटक यांची येथे रीघ लागलेली असते.  

वन्यजीव परीक्षण आणि पर्यटनासह ट्रेकींग करणाऱ्यांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनचे दरवाजे वन्यजीव विभागाने उघडल्यानंतर हा ट्रेक यशस्वी करण्यात आला. सह्याद्री व्याघ्र राखीव व स्थानिक ग्रामविकास परिस्थितीय विकास समितीच्या माध्यमातून महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान पर्यटन व  टेकींगसाठी ८ हॉट स्पॉटनिवडण्यात आले आहेत. त्यापैकी तिवरे ते मालदेव हा एक आहे. भविष्यात या ट्रेकचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांनी विश्वास पाटील मो. ९८२३१३८५२४ येथे संपर्क साधावा.


दैनिक तरुण भारत रत्नागिरी 

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...