गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

‘सह्याद्री’सखा

 


‘कोकणच्या सांस्कृतिक राजधानी चिपळूणात, जंगलात काम करणारे अभ्यासक, जिज्ञासू, पर्यटक आल्यानंतर त्यांना सहज माहिती देण्यासाठी आवश्यक असलेली थिएटर सुविधा, बसायला जागा उपलब्ध नाही.’ ही खंत आयुष्यभर बोलून दाखविणारे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक कै. निलेश विलास बापट यांना आपल्यातून जावून (१४ सप्टेंबर २०२४) एक वर्ष झालं. रत्नागिरी वन विभागाने जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत चिपळूणात केलेल्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन आज (३ ऑक्टोबर) सायंकाळी होत आहे. या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलची मूळ संकल्पना आणि मांडणी निलेश बापट यांची होती. बापट यांचे नाव या गॅलरीला देण्यात यावे अशी चिपळूणातील पर्यावरणप्रेमींची आग्रही मागणी आहे. बापट यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख.

 


कोकणातल्या चिपळूण सारख्या छोट्याश्या शहरात सामान्य कुटुंबात जन्मलेला डिझेल गाड्यांची दुरुस्ती करणारा एक सर्वसाधारण मेकॅनिक जेव्हा आपल्या असाधारण बुद्धिमत्तेच्या बळावर जणू एखादं वर्तमानपत्र वाचावं तसा अवघा निसर्ग वाचू लागतो. बघताबघता भारतभरातील जंगलांचा, संपूर्ण सह्याद्रीचा अभ्यासक बनतो तेव्हा त्याच्यातल्या वेगळेपणाची दखल घ्यावी लागते. अशा व्यक्तिमत्त्वांच्या प्रवासामागे खूप मोठा संघर्ष असतो. मानद वन्यजीव रक्षक-अभ्यासक, ज्ञानी मित्र, ‘सह्याद्रीसखा’ निलेश विलास बापट यांचे गतवर्षी वयाच्या ४७व्या वर्षी (१४ सप्टेंबर) ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. निलेश म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलेला, कोणतंही काम करायला कसलाही कमीपणा न बाळगणारा निसर्गसखा. कोकणी मातीत घडलेलं आणि माणसाळलेलं हे व्यक्तिमत्त्व. निसर्गवेडापायी त्यानं देशभरच्या जंगलातील किती माणसं जोडली असतील त्याची गणती नाही. ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह’च्या उभारणीतील योगदान हा त्याच्या जीवनाचा सर्वोच्च कार्यटप्पा ठरला. निलेश मागील तीन दशकांहून अधिक काळ जैवविविधता, वन्यजीवन, निसर्ग आणि पर्यावरण आदी संवर्धन क्षेत्रात कार्यरत राहिला. त्याने भारतातील ताडोबा, पेंच, बांधवगड, रणथंबोर, STR, नागझिरा, दांडेली, कान्हा आदी जंगलांमध्ये निसर्ग प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी केल्या होत्या. किमान हजारभर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नेचर एज्युकेशन, नेचर वॉक संस्थेमार्फत वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल आदींच्या माध्यमातून ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून निसर्ग विषयक ध्वनीचित्रफीती, चित्रप्रदर्शनांच्या माध्यमातून तरुणाईच्या निसर्गविषयक जाणीवा समृद्ध करण्यात त्याने योगदान दिले होते. पुण्याच्या नेचरवॉक संस्थेमार्फत राज्यातील विविध गावात ‘पक्षी महोत्सव’ सादरीकरण केले होते. चिपळूणातील आरोही, ग्लोबल चिपळूण टुरिझम, ‘वणवा मुक्त कोकण’सह वृक्ष लागवड मोहिमेतही त्याचा सहभाग राहिला. त्याने विविध ठिकाणी तीन हजाराहून अधिक वृक्षांची लागवड यशस्वी केली होती. वनविभागासोबत अनेक ‘वाईल्डलाईफ रेस्क्यू ऑपरेशन्स’ यशस्वी करणे, वाट चुकलेले असंख्य अजगर, बिबटे, मगरी यांना त्यांच्या अधिवासात नेऊन सोडणे, महापुराच्या संकटात अनेकांना मदत, नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठीचे कार्यक्रम, वन विभागाच्या वन्यजीव सप्ताहांतर्गत ऑनलाईन वेबिनार, क्षेत्रभ्रमंती, निसर्ग अभ्यास सहली, ग्रामस्थ समुपदेशन, औषधी वनस्पती लागवड, मानव-वन्यजीव संघर्ष, अन्न साखळीतील वन्यजीवांचे महत्त्व अशा कितीतरी विषयांवर निलेशने दिशादर्शक काम केले. कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा, त्याने आणि त्याच्यासारख्या निसर्गरक्षकांनी मागील तीन दशकाहून अधिक काळ सह्याद्रीत निसर्ग संवर्धन विषयात केलेल्या कामाचा गौरव ठरला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भागातील घनदाट जंगलात पाणवठे निर्मिती, पुरातन विहिरी आणि जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, गाईड ट्रेनिंग प्रोग्रॅम त्याने परिणामकारकरीत्या यशस्वी केले. रत्नागिरी जिल्ह्यात पहिले वनवासी संमेलन आयोजित करण्यात त्याचा विशेष सहभाग राहिला होता. चिपळूणच्या जवळ असलेल्या धामणवणे डोंगरावर वृक्ष, पक्षी आणि प्राण्यांनी समृध्द वनीकरण प्रकल्प उभारण्यात त्याचे सक्रीय योगदान होते. अलिकडे त्याने रत्नागिरी जिल्हातील पक्ष्यांची सूची बनवण्याचे काम मनावर घेतले होते. ८ एप्रिल २०२३ रोजी पुण्यातील ‘निसर्गसेवक’ संस्थेने वर्धापन दिनी पर्यावरण संरक्षण व त्याविषयी जनजागृती करणाऱ्या व्यक्तीला गेली १६ वर्षे दिला जाणारा ‘निसर्गसेवक’ पुरस्कार निलेशला प्रदान केला होता.

 


आपल्याकडे पर्यावरण कार्यक्रमांना ४०/५०वर्षे वयाच्या पुढची लोकं असतात. तरुण मुलं कमी असतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धन यशस्वी होत नाही. आजही पर्यावरणात काम करणाऱ्या मुलांची संख्या हजारी दहा आहे. अशी व्यथा निलेश बोलून दाखवायचा. मनुष्याला अरण्यवाचन आल्यास जंगले टिकतील. लोकांनी निसर्गातला चमत्कार बघावा, अशी जंगलात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जंगल हे चालत चालत बघायचं नसतं तर जंगल बघत बघत चालायचं असतं आणि हे जंगलात सातत्याने चालायला लागल्यावर समजतं. झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत घडणाऱ्या हालचाली वर्तमानपत्रासारख्या वाचता यायला हव्यात. नुसता पेपर चाळलात तर जंगलं आणि त्यातल्या गमतीजमती समजणार नाहीत. जंगल वाचायचे, वाचवायचे असेल तर जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या सानिध्यात जायला हवे. आपण माणसाने जंगलासाठी, बाहेर राहून काम केलं पाहिजे. उन्हाळ्यात पाणी खाली जातं, डोंगर रिकामे होतात. आपण शासनाच्या मदतीने पाणवठ्याचे काम सुरु केले. प्राणी अधिक खाली जाऊ शकत नाहीत. त्यांचे शत्रू वाढतात. निसर्गासाठी जर काही करायचे असेल तर ते मलाच केले पाहिजे’ अशी शपथ घ्यायला हवी आहे. अशी मांडणी प्रत्येक ठिकाणी निलेश करायचा. ‘सह्याद्रीत पूर्वी आम्ही डॉक्टरांची टीम नेऊन लोकांची तपासणी करायचो. कारण हेच की सह्याद्रीत माणसं राहायला हवीत. तेव्हा ती लोकं प्राणी मारून खायची. त्यांना जीवनसत्व कमी पडायची. आम्ही त्यांना बीयाणे दिली. त्यांनी त्याची लागवड झाली. आता लोकं यातून चांगुलपणाने बाहेर आलीत.’ निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे चिपळूणला २०१९ साली आम्ही आयोजित केलेल्या पर्यावरण संमेलनात ‘सह्याद्रीतील वैविध्यता’ या सत्रात हे त्याने आवर्जून सांगितलं होतं. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या लिटमस पेपरच्या कार्याप्रमाणे पक्षांना निसर्गातील बदल लवकर कळतात. पक्षी बघणं आणि निरीक्षण करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षी लिटमस पेपरसारखे अॅक्ट होतात. त्यांचा अधिवास गेल्याने अडचणी वाढतात. आपल्याकडे साफसफाई करणारे काही पक्षी आहेत. शक्यतो सुगरण पक्ष्याचे घरटे घरात ‘शो’साठी आणून लावू नका. एका पक्षाने सोडलेले घरट्याचे वेस्ट मटेरीअल हे दुसऱ्यासाठी बेस्ट मटेरीअल असते. जंगलातून फक्त आठवणी घेऊन बाहेर यायला हवे. वळचणीच्या जागा कमी झाल्या म्हणून चिमण्या कमी झाल्यात. आपण टाकलेल्या कचऱ्यामुळे पक्षांच्या पायांना रोग झालेत. पक्षांचा पंखावर विश्वास असतो. तो सकाळी पंख साफ करतो. ते दिवसातून तीन वेळा अंघोळ करतात. खेडेगावातील लोकं आपल्या ज्ञानाप्रमाणे पक्षांना नावे देतात. ‘भारद्वाज’ला विदर्भात ‘नपिता’ म्हणतात. आपण पक्ष्यांच्या नावासाठी शास्त्रीय आग्रह धरायला हवा आहे. पक्षी जीवनाबाबतचे हे त्याचे अनुभवाचे बोलं विचारप्रवण करायचे. इतके की कधीकधी गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासारख्या अस्सल निसर्गसख्याने लिहिलेली जंगलची वर्णने वाचताना मिळणारा आनंद निलेशसोबत खुल्या जंगलात वावरताना मिळून जायचा. इतकी निलेशची जंगलविषयक मांडणी अस्सल असायची. निलेशचा स्वभाव झुंजार, कृतीशील होता. आपल्याला जे पटत नाही त्याच्याशी त्याने कधीही तडजोड केली नाही. चुकून पाय खड्डयात पडला तरी नियतीच्या नाकावर टिच्चून, कष्ट करून पुन्हा उभं राहायची त्याची धमक प्रेरणादायी होती. जंगलात-निसर्गात चुकीला माफी नाही. तिथे खूप काळजीपूर्वक प्राण्यांचं, पक्ष्यांचं, जैववैविध्याचं निरीक्षण करावं लागतं. हे अत्यंत नाजूक काम असतं. आपण निसर्गाजवळ जाऊन थोड्याफार प्रमाणात का होईना, त्यांच्या दिनचर्येचा भंग करत असतो. त्यांच्या जीवनात ढवळाढवळ करत असतो. आपलं जंगलावर प्रेम असलं तरीही ते व्यक्त करताना निष्काळजीपणा उपयोगाचा नाही. याची जाणीव निलेश नेहमी करून द्यायचा.

 


पावसाळ्याच्या दिवसात एकदा आम्ही भैरवगडला गेलेलो. पावसाळ्यातील भैरवगडाचे दृश्य पाहून आम्ही लिहिलं... ‘भर पावसात भैरवगड’! पहिला पॅरेग्राफ लिहून नेहमीप्रमाणे निलेशला वाचायला पाठवला. वाचल्यावर लगेच त्याचा फोन आला. म्हणाला, ‘हे वाचून लोकं पावसाळ्यातच भैरवगडला जातील. अपघातांना निमंत्रण मिळेल. त्यामुळे तू या नावाने लेख प्रसिद्ध करू नको.’ अर्थात लेखाला द्यायला दुसरं नाव आम्हाला सुचलं नाही, म्हणून तो लेख आम्ही प्रसिद्ध केला नाही. निसर्गाबाबतचा जो विचार निलेशने अंगिकारला त्याचा विशेष गवगवा न करता तो त्या विचाराशी प्रामाणिक राहिला. त्याने आपला वेगळा दृष्टीकोन जाणीवपूर्वक जपला होता. निलेश आम्हाला भेटल्यापासून लेखनकारणे त्याची दखल घेण्याचा प्रयत्न आम्ही जाणीवपूर्वक केला. अर्थात तो अपुरा पडला, ही खंत सदैव राहिल.

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

 

 

 

 

 

 

 

सोमवार, ९ जून, २०२५

अक्षरांना वचनांप्रमाणे सांभाळलेलं दाम्पत्य

‘तुका म्हणे वचनासाठी। नाम धरियेले कंठी।।’ हे वचन ऐकवून देवाचे नाव आपल्या कंठात धारण केल्याने, सतत नामस्मरण केल्याने बोलण्याची (वचनाची) शक्ती वाढत असल्याचं सांगणाऱ्या ह.भ.प. शशिकला सीताराम सकपाळ या आमच्या आत्येला ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता देवाज्ञा झाली. विवाहानंतर पोलादपूर (रायगड)हून नजीकच्या महाबळेश्वर मार्गावरील कापडे बुद्रुकची ती रहिवासी झाली होती. तिने पन्नासहून अधिक वर्षांचा काळ, आपले पती पोलादपूर पंचायत समितीचे सभापती राहिलेले वारकरी सांप्रदायातील अध्वर्यू सीताराम दौलती सकपाळ यांच्या साथीने शिक्षण-समाजकारण-साहित्य-राजकारण-पारमार्थिक क्षेत्रात घालविला. सव्वा वर्षांपूर्वी, २६ जानेवारी २०२४ रोजी सीताराम दौलती सकपाळ मामांनाही देवाज्ञा झाली. या उभयतांनी आम्हाला वारकरी संप्रदायाच्या नजीक नेलेले. गावचे पालकत्व सांभाळलेल्या या दाम्पत्याभोवती पंचक्रोशीचा ‘गावगाडा’ फिरत राहिलेला. अक्षरांना जणू वचनांप्रमाणे सांभाळलेल्या, गाव-तालुक्यासाठी झटलेल्या या एकरूप दाम्पत्याच्या कर्तृत्वाचा सुगंध दीर्घकाळ आसमंतात दरवळत राहील.

आम्हाला आणि आमच्या वडिलांना सख्खी बहिण नाही. आपसूक ‘सख्खी आत्या’ नाही. सौ.च्या वडिलांना म्हणजे सासऱ्यांनाही सख्खी एक बहिण! लग्नानंतर ती आमचीही आत्या झालेली. १ जून २००९ रोजी विवाहबद्ध झाल्यावर आमचा, वारकऱ्यांचा तालुका असलेल्या पोलादपूरशी, मामांशी आणि त्यांच्या पत्नी शशिकला (आत्या) यांच्याशी विशेष स्नेह जुळलेला. मृत्यूप्रसंगी आत्ये ७५ वर्षे वयाची होती. शीघ्रकवी असलेल्या आत्येच्या संवादात विविध संतांचे अभंगच अधिक असायचे. कधी केला असेल तिने हा अभ्यास? असा प्रश्न पडावा इतक्या गतीने ती एकावर एक संतवचने निरुपणासह ऐकवायची. तिच्या अशा संवादात गर्भितार्थ दडलेला असायचा. ‘आपण आता अक्षरं म्हणतो पूर्वीच्या काळात वचनं म्हणायचे’ असं ती सांगायची. अक्षरांना वचनाप्रमाणे सांभाळल्याने इतरांचा विश्वास मिळतो. आपल्या बोलण्याला महत्त्व प्राप्त होते. हे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि सामाजिक संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाचे असते. आजच्या पिढीला हे कार्यशाळा घेऊन शिकवावे लागते. मात्र आपण जे बोलतो किंवा जे वचन देतो, त्याप्रमाणे वागणे आणि त्याचे पालन करणे हे तत्त्व आत्ये-मामांनी जीवनभर जपले होते. ही बाब उभयतांना अनुभवलेल्या अनेकांच्या तोंडून आम्हीही ऐकलेली. यामुळे या दोघांना आपल्या बोलण्यावर आणि कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासह इतरांचा विश्वासही संपादन करता आला होता. विठ्ठलाची पूजा करणाऱ्या वारकऱ्यांच्या वैयक्तिक वैवाहिक जीवनातही भक्ती आणि सामाजिक मूल्यांचा खोलवर प्रभाव दिसतो. अशा पती-पत्नी जीवनात त्याग, क्षमा आणि प्रेम यासारख्या गुणांना महत्त्व देतात. पती-पत्नी म्हणून एकमेकांना देवही मानतात. ते पती-पत्नी म्हणून एकमेकांना आणि भगवान विठ्ठलाला समर्पित असतात. वारकरी वैवाहिक जीवन हे भक्ती, त्याग, क्षमा, प्रेम, साधेपणा आदी सामाजिक मूल्यांनी भरलेले असते. आत्ये-मामांच्या सहवासात आम्हाला हे सारं अनुभवायला मिळालं. आमच्याशी अधिकारवाणीने संवाद साधणाऱ्या मोजक्या माणसांत आत्ये एक होती.

आत्येचा एकूणच दरारा मोठा राहिलेला. तिचं महाबळेश्वर मार्गावरील कापडे बुद्रुकच्या नाक्यावरील श्रावणातील ग्रंथपरंपरा जपलेलं घर अडीअडचणीतील गरजूंसाठी हक्काचे होते. त्याकाळी कोकणातला ‘रानमेवा’ मुंबईला पाठविण्याचा व्यवसाय करणाऱ्या आत्तेच्या घराच्या दारात भला मोठा तराजू टांगलेला असायचा. त्यावर उन्हाळी हंगामात आंबा, कैरी, फणस, करवंदे, जांभळे यांचा व्यापार चालायचा. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळायचा. हिशोब करायला आत्ये बसलेली असायची. कपाळी भले मोठे कुंकू लावलेली, डोक्यावर पदर घेतलेली, अत्यंत कडक आवाजात बोलणारी आत्ये इथे अनेकांना भेटायची. आतून ती तितकीच मायाळू आणि प्रेमळ होती. याचा प्रत्यय मामांना भेटायला येणाऱ्यांना आत्येच्या हातचं चहापान घेताना यायचा. उभयतांच्या काळात अनेक संत-सज्जनांची पाऊले या घराकडे वळत राहिली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पोलादपूर शाखेची आत्ये अध्यक्ष राहिलेली. तिने कापडे बुद्रुक गावच्या शाळेत २००५साली दीड दिवसांचे साहित्य संमेलन घेतले होते. आलेल्या पाहुण्यांना आपल्या हातचं खाऊ-पिऊ घातलं होतं. तिच्यासोबत कधी गप्पा मारायला बसलो तर ती आम्हाला ज्ञानाची महती सांगायची. ‘हाताच्या बोटावर मोजण्याइतकी ज्ञानी माणसं या धरित्रीवर टिकतील’ म्हणायची.

श्री गुरु आजरेकर संप्रदाय (कोकण विभाग) माध्यमातून पोलादपूर तालुक्यासह महाराष्ट्रातील विविध गावात वारकरी संप्रदायाचे एक मोठे नेटवर्क तयार केलेली आत्ये एक अद्भुत व्यक्ती होती. तिला आपल्या पोलादपूरच्या जाधव कुटुंबियांबद्दल जितके प्रेम तितकेच कापड्याच्या सकपाळ कुटुंबियांबद्दलही होते. सर्जनशील व्यक्तिमत्त्व लाभलेल्या आत्येने अद्भुत वाटाव्यात अश्या काही काव्यरचना केलेल्या. आत्येच्या या अचाट शीघ्रवाणीचे सामर्थ्य अनुभवण्याचा योग १५ डिसेंबर २०१६रोजी आम्हाला आला. तो दिवस आमचे सासरे अरुण दाजी जाधव यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतनाचा होता. शिरस्त्याप्रमाणे पोलादपूरला, भावाला भेटायला आलेल्या आत्येला नियोजित कार्यक्रमाचं कळलं. दिवसभर ती विचार करत राहिली असावी. तिने एका कागदावर लिहिलेल्या काव्यपंक्ती सायंकाळी कार्यक्रमात ऐकवल्या तेव्हा उपस्थितांनी तिला टाळ्यांनी उत्स्फूर्त दाद दिलेली. अर्थात काव्यपंक्तीही तशाच होत्या. पण त्यातील, ‘अभागी मी एकटी। अकरा जणांत धाकुटी।। माता पिता छत्र गेले। माझे सर्व आले संपुष्टी।।’ या पंक्तीने मात्र आम्हाला अस्वस्थ केलेले. आत्येनं कागदावर लिहिलं होतं...

            चांदीच्या गं निरांजनी वात तुपाची तेवते 

            माझ्या लाडक्या बंधूला पंचाहत्तरीला ओवाळिते।।

 जाधवांच्या घराण्यात जन्मा आला अधोक्षज 

 जन्मा आल्यापासुनि त्याला न्यायनिवाड्याची हौस।।

 प्रामाणिक काम त्याचे साच बोलणे रोकडे 

 त्याच्यापुढे मेरू आणि मज मंदार तोकडे।।

 असा माझा बंधूराया सदाशिवाचा अवतार 

 माऊलीच्या कृपेने गं त्याचा चालिला संसार ।।

 तीन मुली दोन मुलगे त्यांस अडचण काही नलगे 

 आणि लाडके जामात क्षीराब्धीच्या सागरात ।।

 रजकणांचे आकलन धीरज ते धीरज धरणारं 

 आणि मोठे प्रशांत तेही महा महासागर।।

 अभागी मी एकटी अकरा जणांत धाकुटी 

 माता पिता छत्र गेले माझे सर्व आले संपुष्टी।।

 असा बंधूचा परिवार लोभस राजस सरोवर 

 बंधू-वहिनी मजवरी ढाळति छत्र आणि चामर।।

 त्रैलोक्यात असा भाऊ कुणा नाही मिळणार 

 देवा मागणे माझे हे आयुष्य दे दादा वाहिनीला।।

आत्येचे वडील दाजी काळू जाधव यांना तीन पत्नी होत्या. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक कन्या, दुसऱ्या पत्नीपासून दोन मुलगे आणि एक कन्या आणि तिसऱ्या पत्नीपासून सहा मुलगे आणि एक कन्या होती. सहावे अपत्य म्हणजे आमचे सासरे आणि शेवटची कन्या म्हणजे आत्या याचा आम्हाला, ‘अकरा जणांत धाकुटी’ असं आत्येच्या तोंडून ऐकल्यावर शोध लागला होता. त्याच काव्यात आत्येनं पुढे ‘माझे सर्व आले संपुष्टी’ असंही म्हटलं होतं. आत्या उच्च पारमार्थिक विचारांची स्त्री होती. तिच्या मनीचे भाव सहज समजण्यासारखे नव्हते. त्या अभीष्टचिंतनाच्या कार्यक्रमात तिला याबाबत विचारायचं राहिलं ते राहिलंच! पुन्हा तो योग आला नाही. मामांच्या पश्चात सव्वा वर्ष त्यांच्याच नावाचा ध्यास घेऊन निराशेचं जीवन ती जगली. त्यातून तिची मामांशी असलेली वचनबद्धता आमच्यासारख्यांना जाणवत राहिली. वैवाहिक जीवनात पतीला भक्कम आधार दिलेल्या आत्तेने ध्यासमग्न स्थितीत आपला देह ठेवला. अंत्यसंस्कार प्रसंगी आत्येचं पार्थिव शरीर जवळच्या स्मशानभूमीत नेताना, अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता । निरोप द्यावा आता येतो आम्ही ।। हे भजन म्हणण्यात आलेलं. कापडे बुद्रुक गावातील फौजदारवाडीतून रस्त्यानजीक वाहणाऱ्या ओहोळाच्या शेजारील जागेत स्वर्गीय मामांचा अग्निकाष्ठ झालेला. आत्तेला तिथेच मामांच्या शेजारील जागेत अग्नी देण्यात आला. कोकणात झालेल्या अवकाळी पावसाने तो ओहोळही जिवंत होऊन जणू आत्येला लगबगीने भेटायला आल्यासारखा भासत होता. ‘मृत्यूचा सोहळा व्हावा ऐसा’ असं वातावरण या उभयतांनी मृत्यू पश्चात जगलं असावं.

ब्रिटिशकाळात रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडील दऱ्याखोऱ्यांचा अविकसित भाग अशीच ओळख राहिलेल्या पोलादपूर तालुक्याच्या गत शंभरेक वर्षातील घडामोडींचे सकपाळ मामा साक्षीदार होते. मृत्यूप्रसंगी मामा ९५ वर्षे वयाचे होते. मामांचा जन्म १९३३सालचा! मामांनी रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सभापती, श्रीगुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड दिंडी पंढरपूरचे विश्वस्त, १९६७-७२ या कालावधीत पोलादपूर तालुका पंचायत समितीचे सभापती आदी पदे भूषविली होती. मामा हे कापडे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य, पोलादपूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन, कॉंग्रेस कमिटी पोलादपूरचे प्रांतिक सदस्य राहिले होते. पूर्वीपासून पोलादपूर हा वारकऱ्यांचा तालुका म्हणून परिचित. या तालुक्याची राजकीय आणि शैक्षणिक पीछेहाट होत असताना बंधुजीराव पालांडे, बाळाराम मोरे, वि. सु. मालुसरे, कोंडीराम मास्तर उतेकर, कमलाकर चित्रे, श्रीपती मोरे, बाबाजी महाडिक आदींसह मामांनीही तालुक्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी काम सुरु केले होते. ह्या अल्पशिक्षित मंडळींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपले योगदान दिलेले. याच मंडळींच्या योगदानामुळे पंचक्रोशीत शाळा-हायस्कूल उभ्या राहिल्या. मामांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रीय सहभाग घेत पोलादपूरच्या कुंभारवाडयात (भैरवनाथनगर) चळवळीचे कार्यालय सुरू केले होते. पंचक्रोशीतील २८२ गावे पायी चालून संयुक्त महाराष्ट्राची भूमिका जनमानसांत रूजविली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढयाच्या काळात ‘गुप्तवार्ता’ पोहोचविण्याचे कामही मामांनी केले होते. रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या कापडे गावातील वरदायिनी माध्यमिक विद्यालयासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. मंडळाचे अध्यक्ष कै. दादासाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वरदायिनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना १५ जून १९७० साली झाली. तेव्हापासून ५४ वर्षे त्यांनी विद्यालयाचे ‘सभापती’ म्हणूनही काम पाहिले होते. त्यांनीच शाळेत उच्च माध्यमिक शाखा सुरु केली. खरंतर शाळेच्या अध्यक्षांना स्कूल कमिटी चेअरमन म्हणायची पद्धत आहे. परंतु मामा पोलादपूर पंचायत समितीचे सभापती असताना शाळा सुरु झाल्याने शाळेतही ‘सभापती’ शब्द रूढ झाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब सावंत कापडे-देवळे भागात प्रचारासाठी आले होते. त्यांच्यासमोर कागदावर स्वाक्षरीसाठी अंगठे देणारी जनता पाहून मामांनी त्यांच्यादेखत, ‘दादा! अकलेची दुकाने काढा कापड्याला अन देवळ्याला (अर्थात शाळा सुरु करा)’ म्हटल्याची आठवण शाळेचे माजी मुख्याद्यापक अ. वि. जंगम यांनी नोंदवली आहे. उभयतांच्या कार्यकाळात मधु मंगेश कर्णिक, मारुती चितमपल्ली, दा. कृ. सोमण आदी दिग्गज मंडळी कापड्याच्या शाळेत येऊन गेली. पोलादपूर, कापडेसह देवळे, साखर, उमरठ, मोरसडे या तालुक्यातील गावात शाळा उभारणीत, सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात मामांचे योगदान राहिले. रायगड जिल्हा परिषद शाळा कापडे बुद्रुक गावातील प्राथमिक शाळेचे ते रजिस्टर क्रमांक एकचे विद्यार्थी होते. १९६०मध्ये त्यांनी श्री गुरु आजरेकर फडाचे ज्ञानदेव विठ्ठल भुरे माऊली यांचे शिष्यत्व पत्करून वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली होती. या दिंडीला सुमारे दोनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. मामांनी पोलादपूर तालुक्यात हरीनाम सप्ताह व्हावेत म्हणूनही लक्ष दिले. एकविसाव्या शतकात तालुक्याचा विकास होत असताना गाव आणि वाड्यावस्त्या ओस पडू लागल्याची खंत त्यांना होती. मामांचे निधन झाल्याची दु:खद बातमी आम्हाला समजली तेव्हा आम्ही पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मंदिर परिसरात होतो. ज्या मामांमुळे आम्हाला जीवनात पहिल्यांदा रिंगण सोहोळा अनुभवता आला त्या मामांना श्रीनामदेव पायरीवरूनच आम्ही मनोमन श्रद्धांजली वाहिली होती.

‘जीवन तो वही, जो समाज को दिशा दे’ म्हणतात. आत्ये आणि मामा असं जीवन जगलेली माणसं. त्यांचे काही काळचे सान्निध्य आम्हाला लाभले. लग्नानंतर दोनेक आठवडे देवदर्शन करीत असताना, आत्येने आम्हाला फलटणचे नेत्रदीपक रिंगण (२५ जून २००९) पाहायला, माऊलींच्या दर्शनाला बोलावलेले. एका विस्तीर्ण माळरानावर चुलीवरील आपल्या हातच्या अळूवडीचे केळीच्या पानावर चविष्ट भोजन खाऊ घातलेले. तो भोजन आनंद आजही आमच्या मनात ताजा आहे. दरवर्षी आपल्या आजरेकर फडातल्या सहकाऱ्यांसाठी पाचेक किलोच्या डबाभर अळूवड्या बनवून नेणारी ही आते होती. आत्तेविषयी रोज नवनवीन माहिती कानी पडणारा तो काळ होता. पंढरपूरचे दर्शन झाल्यावर मामांच्या साक्षीने, ‘जावई! आता एकदा आम्हाला दोघांना घेऊन आळंदीला चला!’ अशी आत्येची ‘अधिकारवाणी’ आम्ही पहिल्यांदा ऐकलेली. आम्ही ‘हो!’ म्हणणं ओघाने आलेलं. पुढच्या दोनेक महिन्यात आम्ही उभयतांना घेऊन आळंदीला माऊलींच्या दर्शनाला गेलेलो. आमचा ‘पंढरपूर ते आळंदी’ हा जीवनातील पहिला प्रवास या उभयतांच्या सान्निद्ध्यात झालेला. १६-१७ वर्षांच्या सहवासात आत्येच्या ‘अधिकारवाण्या’ आम्ही ऐकल्या. अंत्यविधीप्रसंगी श्रद्धांजलीपर दोन शब्द बोलतानाही आम्हाला आठवली ती आत्येची अधिकारवाणीच! आत्येची ही अधिकार'वाणी’ पुन्हा कधीही ऐकायला मिळणार नाही. याची जाणीव आता डोळ्यांच्या पापण्या अश्रूंनी भरते आहे.

 

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

बुधवार, ४ जून, २०२५

मलबार राखी धनेशाच्या सान्निध्यात...


तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यात दोन दिवस मुक्कामी होतो तेव्हाची घटना. त्या दोन दिवसात मलबार राखी धनेशाची (मलबार ग्रे हॉर्नबिल - Ocyceros griseus) भेट झालेली. खरंतर कोकणातील जंगलमय भागात फिरताना अनेकदा त्याचे दर्शन झाले होते. पण निवांत भेट झालेली नव्हती. दोडामार्ग तालुक्यातील एका गावात नदी किनाऱ्यावरील आपली बागायत सांभाळणाऱ्या मित्राकडील नंदनवनात ती झाली. मलबार राखी धनेशाने या बागेतील एका रातांब्याच्या (कोकम) झाडावरील ढोलीत आपला संसार फुलविला होता. आपसूकच त्याचे तिथे वारंवार येणे-जाणे सुरु झालेले. त्यामुळे आम्हालाही त्या दोन दिवसात त्याला निवांत भेटण्याची आणि निरीक्षण करण्याची संधी मिळाली. ते दोन दिवस मलबार राखी धनेशाच्या सान्निद्ध्यात घालवताना यापूर्वी त्याच्याविषयी वाचलेलं, पक्षी अभ्यासकांकडून ऐकलेलं आम्हाला अनुभवता आलं.



यावर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तळकोकणात अवकाळी पावसाचे आगमन झाले. त्यावेळी आम्ही कुटुंबासह दोडामार्ग तालुक्यात होतो. ज्या गावी मुक्कामी होतो तिथे गाव हद्दीतून वाहणाऱ्या धबधब्याचा प्रवाह बागायतीजवळून वाहात होता. दोडामार्ग तालुक्यात कोकणातील थोडेफार शब्दशः ‘जंगल’ म्हणावे असे क्षेत्र शिल्लक आहे. याच क्षेत्रात जागतिक अमूल्य जैवविविधता नांदते आहे. तिचे नीटसे मार्केटिंग केले तर हीच जैवविविधता इथल्या स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून भक्कम रोजगाराच्या संधी मिळवून देऊ शकते. त्यामुळे या भागात मुक्कामी असल्यावर काहीतरी छानसे पाहायला मिळणार आणि इथला मुक्काम संस्मरणीय होणार याची जाणीव होतीच. ती खरी ठरली. म्हणून कोकणातील दोडामार्ग तालुका हा जलद शहरणीकरणापासून दूर ठेवण्याची नितांत आवश्यकता वाटते आहे. हॉर्नबिल हा उष्ण कटिबंधीय प्रदेशातील मोठ्या जंगली पक्ष्यांचा समूह आहे. हॉर्नबिलच्या जगातील ५४ प्रजातींपैकी नऊ भारतात आढळतात. त्याच्या बहुतेक प्रजातींमध्ये मोठ्या वक्र चोची असतात. मलबार ग्रे हॉर्नबिल हा एक सुंदर आणि आकर्षक पक्षी आहे. ही हॉर्नबिल मधील सर्वात लहान प्रजाती आहे. तो पश्चिम घाट आणि दक्षिण भारतातील स्थानिक आहे. भारतातील सह्याद्रीच्या पश्चिम घाट पर्वतरांगांच्या वर्षावनांमध्ये महाराष्ट्रातील नाशिकपासून दक्षिणेकडील टेकड्यांपर्यंत आणि ओलसर पानझडीच्या जंगलांमध्ये त्याचे वास्तव्य आढळते. बहुतेकदा घरगुती बागांमध्येही आढळतो. मलबार राखी धनेशाची मोठी चमकदार नारिंगी चोच, सोनेरी तपकिरी बुबुळ असते. मादीची चोच तुलनेने लहान, फिकट रंगाची आणि तिचे बुबुळ गडद तपकिरी असते.

हा सर्वभक्षी पक्षी आहे. तो स्वतःचे घरटे (ढोली) खोदत नाही. मोठ्या झाडांमध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या पोकळींचा वापर करतो. यांचा प्रजनन हंगाम सामान्यतः फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. पाहाणी पूर्ण झाल्यावर मादी पक्षी पोकळीत शिरते. ती तिच्या चोचीने घरट्याचे प्रवेशद्वार दुरुस्त करते. नराने पुरविलेल्या फळांचा गर, स्वतःची विष्ठा आणि लाळ मिसळून ती पोकळीचे प्रवेशद्वार जवळपास बंद करते. मादी या पोकळीला नैसर्गिक सामग्रीद्वारे अधिक सुरक्षित आणि आरामदायक बनवते. आता प्रवेशद्वार केवळ अरुंद, उभ्या स्लिटसारखे उघडे असते. याच उघड्या प्रवेशद्वारातून नर तिला खायला घालतो. मादीचा पोकळीच्या घरट्यातील प्रजनन कालखंड सुमारे तीन महिने चालतो. हा पक्षी नदी/ओढ्याकाठच्या अधिवासात घरटे करण्यावर अधिक भर देतो. म्हणून नदीकाठच्या अधिवासाचे संरक्षण करण्यावर भर दिला पाहिजे. यांच्या घरट्यांच्या पोकळ्या सामान्यतः मोठ्या खोडांच्या झाडांवर जमिनीपासून ९ ते १८ मीटर उंचीवर आढळतात. भक्षक आत चढू नयेत म्हणून घरटे जास्त उंचीवर असतात. त्यांचा घरट्यातील एकूण प्रजनन कालावधी सरासरी ८६ दिवसांचा असतो. अंड्यांचा उष्मायन कालावधी सुमारे ४० दिवसांचा तर नवजात अर्भकांचा घरट्यातून बाहेर येण्याचा कालावधी ४६ दिवसांचा असतो. पिल्ले मोठी झाल्यावर घरटे सोडून बाहेर पडतात. स्वतःचे जीवन जगण्यास सुरुवात करतात. सर्वसाधारणपणे मादी चार अंडी घालते. सीलबंद ्रवेशद्वार तोडून कधी मादी सुरुवातीला तर कधी मादी आणि पिल्ले (स्क्वॅब) घरट्यांमधून एकाचवेळी बाहेर पडल्याच्या नोंदी आहेत.

हा एकपत्नी पक्षी वर्षानुवर्षे घरट्यांवरील एकनिष्ठता दाखवतो. हॉर्नबिलच्या प्रजनन वर्तनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी पारंपारिकपणे वापरल्या जाणाऱ्या घरट्यांच्या पोकळीत परतणे होय. आम्ही भेट दिलेल्या घरट्याबाबतचा पूर्व तपशील मात्र आम्हाला मिळू शकला नाही. घरट्याच्याच झाडावर बसून हॉर्नबिल जोडप्याची वीण झाल्याच्याही नोंदी आहेत. हॉर्नबिल घरट्यांच्या पोकळ्यांसाठी आपापसात स्पर्धा करतात. घरटे शोधताना एका जोडीला दुसऱ्या जोडीचा पाठलाग करतानाही आपण पाहू शकतो. अन्नाच्या गरजेसाठी मादी या काळात आपल्या जोडीदारावर पूर्णपणे विश्वास ठेवते. नर दररोज अन्न गोळा करण्यासाठी आवश्यक प्रवास करतो आणि मादीला झालेले अन्न पुरवतो. एकाचवेळी त्याला स्वत:सह मादी आणि पिल्ले यांना खाद्य आणावे लागत असल्याने निसर्गाने त्याच्या मानेच्या खाली विशिष्ठ पिशवी दिलेली आहे. यात तो फळं भरतो. घरट्याजवळ आल्यानंतर तो मानेला विशिष्ट झटका देतो. त्यामुळे पिशवीतील फळे वर चोचीत येतात. आम्ही पाहिलेल्या नराच्या मानेखालच्या पिशवीत फळे तर होतीच पण तोंडात छोटासा कीटकही होता. दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत दिवसभरात नर धनेश पक्षाला जंगल ते आपले घरटे अशा फेऱ्या माराव्या लागतात. आवश्यकतेनुसार वेळोवेळी घरट्याची स्वच्छताही पाहावी लागते. घरट्यातील विष्ठा व कचरा त्याच झाडाखाली पडू न देण्याची खबरदारी घ्यावी लागते. घरटं असलेल्या झाडाखाली, बुंध्याशी विष्ठा, कचरा पडला तर साप, मांजर व इतर शत्रूंना सुगावा लागू शकतो. क्वचित प्रसंगी बाहेर पडलेल्या नर धनेशाचे काही बरे वाईट झाले, तर एक-दोन दिवस वाट पाहून मादी घरट्यातून बाहेर पडते. खाद्यपदार्थ गोळा करून आपल्या पिलांना जगवते. हॉर्नबिलच्या या साऱ्या प्रजनन सवयी अद्वितीय, इतर पक्ष्यांपासून वेगळ्या आहेत. त्याची एकनिष्ठ जीवनशैली आणि त्यासाठीच्या खडतर परिश्रमातील सातत्य मानवाला प्रेरणादायी आहे.

फायकस कुळातील वड, पिंपळ, उंबर या झाडांची फळे या पक्षांना फार आवडतात. फिकस झाडे (नांदरूख) आणि फिशटेल पामची (भेरलीमाड) फळेही सामान्यतः प्रजनन आणि प्रजनन नसलेल्या हंगामातही हॉर्नबिल आवडीने खातात. याही बागेत भेरली माड (सुरमाड) फळाची (Ficus glomerata) झाडे होतीच. धनेश आणि या झाडाच्या फळांचा जवळचा संबंध आहे. मूलतः फळांवरच आधारित आहारामुळे मलबार ग्रे हॉर्नबिलचा वृक्ष प्रजातींशी घनिष्ठ संबंध आहे. मलबार ग्रे हॉर्नबिल जंगलातील परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतो. काही महत्त्वाच्या वृक्षांची बियाणे ही पक्ष्यांच्या किंवा सस्तन प्राण्यांच्या आतड्यातून गेल्यावरच अंकुरत असतात. मलबार ग्रे हॉर्नबिल बियाणे पसरवणारा पक्षी मानला जातो. मलबार ग्रे हॉर्नबिल आकाराने इतर पक्ष्यांच्या तुलनेने मोठे असल्याने ते मोठ्या बिया सर्वदूर पसरवण्यास मदत करतात. त्यामुळे जंगलाची वाढ आणि भरभराट होण्यास मदत होते. त्यामुळे स्थानिक वन्यजीवांच्या संख्येला अप्रत्यक्षपणे आधार मिळतो आणि मानव-प्राणी संघर्ष मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे हॉर्नबिल असलेल्या जंगलांचे आरोग्य आणि हिरवे वातावरण उत्तम राहाते.

घरट्यांच्या पोकळीसाठी हॉर्नबिल पक्षी मोठा घेरा असलेल्या उंच झाडांना प्राधान्य देतो. तो जिवंत झाडांचा उपयोग करतो. क्वचित प्रसंगी मृत झाडेही अभ्यासकांनी नोंदवली आहेत. आम्ही पाहिलेल्या मलबार ग्रे हॉर्नबिलने कोकमाच्या झाडावर घरटे केलेली पोकळी जमिनीपासून सुमारे १०-१२ फुट अंतरावर होती. हे घरटे काहीशा कमी उंचीवरील वाटले. या घरट्याच्या प्रवेशद्वाराची दिशा वायव्य होती. जी घरट्यात थेट येऊ शकणारा सूर्यप्रकाश कमी करण्यास मदत करणारी जाणवत होती. हे घरटे फळबागेत आणि काहीसे मानवी वस्तीजवळ होते. आम्हाला पिल्लांचे (स्क्वॅब) आवाज आणि घरट्यातील त्यांची हालचालही टिपता आली. नर अन्न घेऊन आल्यावर प्रथम जवळच्या झाडावर उतरत होता. घरट्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही वेळ आजूबाजूची पाहाणी करताना दिसला. आजूबाजूला कोणतेही भक्षक नाहीत याची खात्री केल्यानंतरच तो घरट्याच्या झाडावर परतत होता. विशेष म्हणजे, माणसांव्यतिरिक्त इतर प्राण्यांकडून प्रौढ मलबार राखी हॉर्नबिलची शिकार करणे दुर्मिळ असतानाही त्याने इथल्या मानवांना धोकादायक मानले नसावे. कारण आम्ही या घरट्यापासून जेमतेम २० फुट अंतरावरून निरीक्षण करत असतानाही त्याने निर्भयपणे मादीला खायला दिले होते. महाराष्ट्र आणि गोव्यात आढळणारे हॉर्नबिल पक्षी धार्मिक श्रद्धेमुळे काहीसे संरक्षित असावेत. हिंदू पौराणिक कथेनुसार त्याला ‘रक्षक’ (भगवान विष्णूचा वाहक) पक्षी म्हणतात.

दोन दिवसांच्या मुक्कामात आम्हाला या पक्ष्याची झाडावरील बंद असलेली घरटे-पोकळी, मादीने घरट्याच्या आत राहून स्लिटसारख्या ्रवेशद्वारातून पिल्लांचे मलमूत्र बाहेर काढून केलेली साफसफाई, अन्न वितरण आदी क्रियाकलापांचे जवळून निरीक्षण करता आले. नर या प्रजनन काळात मादीला आणि नंतर पिलांना फळे, पृष्ठवंशीय प्राणी आणि कीटक आणून देत असतो. आम्हीही नराने मादीला फळांसह बेडूक, कीटक आणून दिल्याचे पाहिले. अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यापूर्वी मादीला दिल्या जाणाऱ्या आहारात फळांची संख्या सर्वाधिक असते. अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यावर त्यात घट होत जाते. अंडी उबवल्यानंतरच्या टप्प्यात फळांपेक्षा प्राण्यांच्या अन्नाची वारंवारता जास्त राहाते. नराच्या घरट्याकडे अन्न घेऊन येणाऱ्या फेऱ्याही वाढतात. या टप्प्यात वाढत्या पिल्लांसाठी उच्च दर्जाचे पौष्टिक अन्न निवडले जाते. यात टोळ, साप, सरडे, बेडूक, लहान पक्षी आणि काही अज्ञात कीटकांचा समावेश असतो. कोकणात पावसाचे आगमन आणि मलबार ग्रे हॉर्नबिलकडून घरट्यात होणारा विविध प्राण्यांचा पुरवठा हा पिल्लांच्या अंड्यातून बाहेर पडण्याच्या वेळेशी जुळतो.

पश्चिम घाट जगातील जैवविविधतेच्या महत्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. परंतु धरणांची उभारणी, शेती आणि इतर विकासात्मक कामांसाठी झालेली आणि आजही होत असलेली बेसुमार आणि अनिर्बंध जंगलतोड यांमुळे वनक्षेत्र नष्ट झाले आहे. वनस्पतींच्या अनेक प्रजातींची संख्या मर्यादित झाली आहे. हॉर्नबिल पक्ष्याला आवडती असलेल्या फायकस कुळातील वड, पिंपळ, उंबर या झाडांवर माणसांनी मोठ्या प्रमाणात कुन्हाड चालवल्यामुळे ती आता दुर्मिळ झाली आहेत. मलबार ग्रे हॉर्नबिल सारख्या पश्चिम घाटातील स्थानिक पक्ष्याचे अस्तित्व जंगलतोडीमुळे धोक्यात आले आहे. हा पक्षी झाडाच्या खोडात स्वतः पोकळी खोदण्यास असमर्थ आहे. तो नैसर्गिक पोकळींवर अवलंबून आहे. व्यावसायिकदृष्ट्या पोकळी असलेली झाडे किफायतशीर नसल्याची धारणा आहे. परंतु हॉर्नबिलच्या प्रजनन चक्रासाठी अशी झाडे महत्त्वाची आहेत. हॉर्नबिलचे संवर्धन केवळ मोठ्या झाडांचे संरक्षण करण्यावर अवलंबून आहे.

कोणत्याही अहवालांनुसार वनक्षेत्र कितीही वाढलेले दिसले तरी जंगलांची गुणवत्ता कमी होत आहे. दाट जंगले कमी दाट होत आहेत, हे वास्तव आहे. मलबार ग्रे हॉर्नबिल त्याच्या प्रजननासाठी अधिवास आणि झाडांच्या वैशिष्ट्यांपेक्षा पोकळीच्या (ढोली) वैशिष्ट्यांना अधिक प्राधान्य देत असावा. असं आम्ही कुठेतरी वाचलं होतं. ते निरीक्षण आम्हाला इथं रातांब्याच्या (कोकम) झाडाच्या पोकळीचा उपयोग दिसल्यावर पटलं. त्या दोन दिवसात या मनमोहक पक्ष्याला भेटून आम्हाला खूप आनंद झाला. प्रजनन काळातील त्याच्या आकर्षक प्रेमसंबंधाचे वर्तन अनुभवता आले. त्यांच्यातील विश्वास आणि बंधन समजून घेता आले. आजवर या पक्ष्याविषयी अभ्यासलेल्या संदर्भांचा नेत्रसुखद ‘सृजन सोहळा’ अनुभवण्याचा हा आनंद केवळ शब्दातीत राहिला.

 

धीरज वाटेकर

(सर्व छायाचित्रे - धीरज वाटेकर)

दोडामार्ग तालुक्यातील मलबार राखी धनेशाचे
वास्तव्य असलेला बागायती परिसर...


बागायती जवळून वाहणारा आणि उगमापासून
हाकेच्या अंतरावर असलेला नदी परिसर

मलबार राखी धनेशाचे वास्तव्य
असलेल्या रातांब्याच्या  झाडाचा परिसर

मादी व पिल्लांसाठी आणलेल्या खाद्य बेडूकसह मलबार राखी धनेश


रातांब्याच्या ढोलीतील मलबार राखी धनेशच्या पिल्लाचे दर्शन

मादी व पिल्लांसाठी आणलेल्या खाद्य किटकासह मलबार राखी धनेश

मादी व पिल्लांसाठी आणलेल्या खाद्य फळांसह मलबार राखी धनेश

बुधवार, १४ मे, २०२५

विवाहाच्या पन्नाशीचा ‘अपूर्व’ योग

पूर्वपुण्याई लाभलेला आणि तिचा पुरेपूर उपयोग केलेला भाग्यवान पुरुष आणि कर्तृत्ववान स्त्री यांच्या विवाहाची पन्नाशी अनुभवणं हा अपूर्व योग आहे. अशा सुवर्णमहोत्सवी विवाह सोहळ्याचे उत्सवमूर्ती दाम्पत्य आदरणीय सासरे ज्येष्ठ पत्रकार अरुण दाजी जाधव (सर) आणि वंदनीय मातोश्री सौ. संगीता अरुण जाधव (पूर्वाश्रमीच्या राजकन्या बाजीराव गोलाईत भंडारज अमरावती) यांच्याविषयी मी बोलत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आज (१३ मे २०२५) इथे तीन पिढ्या एकत्र आल्यात. एखाद्या विवाहाची पन्नाशी अनुभवणं भविष्यात सोपं नसेल. म्हणून ही पीढी आणि हा क्षण अनुभवणारे आम्ही सर्वचजण भाग्यवान आहोत.

खरंतर जन्माला येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही. पण मिळालेल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी झटणे खूप मोठी गोष्ट आहे. या उभयतांनी आपल्या संसारासाठी खस्ता खाल्यात. ‘कर्तृत्त्वाचे सौंदर्य मोठे असते’, असे म्हणतात. आज या दिवशी आपल्याला मातोश्रींच्या कर्तृत्त्वाचे सौंदर्य एक-दोन नव्हे तब्बल पाच सुगंधी फुलांनी बहरलेलं दिसतं आहे. आपल्या कामावरील निष्ठा, समाधानी वृत्ती, भरपूर संयम, ममता आणि अंगभूत कामसूपणा या पंचसुत्रीच्या बळावर मातोश्रींनी आपल्या संसाराची गोल्डन ॲनिव्हर्सरी गाठली आहे. पन्नास वर्षांचा हा प्रवास निश्चित सोपा नव्हतामातोश्रींचे जीवन इतक्या खाचखळग्यांनी भरलेलं आहे की त्याबाबत त्यांची सविस्तर मुलाखत घेऊन ‘एका विवाहाची पन्नाशी’ असा लेख लिहिण्याची माझी इच्छा आहे, ‘मातोश्री मुलाखत कधी देताहेत?’ त्याची मी वाट पाहतोय.


‘घाईघाईने लग्न करा आणि फुरसतीने (निस्तरा) पश्चात्ताप करा’ अशी एक म्हण आहे. आजची पिढी (निस्तरणे) पश्चाताप करण्यावर विश्वास ठेवत नाही, ती पर्याय निवडते. पण पश्चातापाचे दुर्दैवी क्षण कितीही जीवनात आले तरी नियतीने आपल्या ताटात जे वाढलंय ते मनस्वी स्वीकारून त्यातून नवी पाऊलवाट निर्माण करण्याचे सामर्थ्य लाभलेल्या पिढीच्या ‘मातोश्री’ प्रतिनिधी आहेत. मेहनत आणि आपल्या कष्टाने-कर्तृत्वाने आयुष्याचा मळा हिरवागार करण्याचे अंगभूत सामर्थ्य दुर्दैवाने आता कमी होते आहे. दुर्दम्य इच्छा, सहनशक्ती, अपमान पचवण्याची क्षमता औषधालाही शिल्लक न राहिलेल्या आणि छोट्या-मोठ्या घटनांनी अरे-तुरेवर किंवा हमरातुमरीवर येणाऱ्या आजच्या आमच्या पिढीला मातोश्रींच्या हाल-अपेष्टांनी भरलेल्या ‘प्रेरणादायी’ जीवनाचं गणित कळेल? मला प्रश्न आहे. मातोश्रींचे कर्तृत्व सभोवतालच्या प्रत्येकासाठी आशेचा आणि शक्तीचा किरण आहे. त्यांच्या जीवनसरितेने सर्वांगसुंदर मार्गांने प्रवास करत जीवनाच्या विविध काठांना स्पर्श केला आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधणे यासारखे दुसरे सुख नाही. आमच्या मातोश्री लेकरा-नातवंडात, एकत्रित कुटुंबात अशी सुखे शोधत जगत आल्यात. उभयतांचा संसार काळाच्या कसोटीवर खरा उतरला आहे. 


आता थोडा, आदरणीय सासरे ज्येष्ठ पत्रकार अरुण जाधव यांच्याकडे वळतो. प्रपंचात राहून सुद्धा माणूस किती विरक्त असू शकतो? याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे सासरे अरुण दाजी जाधव. अन्यथा ६० वर्षांपूर्वी मंत्रालयात नोकरी मिळालेली असताना, उतरत्या वयात असलेल्या आईच्या सेवेचे कारण स्वीकारून पोलादपूरला परतण्याचा निर्णय कसा आणि कोण घेईल? पण यांनी तो घेतला. नुसता घेतला नाही तर ते जीवनभर तो पाळला. ४/५ वीत शिकत असताना खाऊसाठी वडिलांनी दिलेल्या एक आण्याचा दैनिक लोकसत्ता विकत घेऊन वाचणारा आणि पुढे पोलादपूर तालुक्यातील पहिला पत्रकार असं बिरूद जगलेले हे गृहस्थ! चुळबुळ्या स्वभाव, काही ना काही चांगले करण्याची वृत्ती असलेले, चाळीस वर्षे एकटाकी लिहिणारे आणि ‘आपला काळ गाजवलेले’ हे पत्रकार! वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नव्हती त्या काळात मैलोन मैल पायपीट किंवा सायकल चालवून त्यांनी सुरुवातीला शिक्षकी आणि नंतर पत्रकारिता पेशा सांभाळला. ‘मी कुणाच्या पाच पैशाच्या चहाचाही मिंधा नाही’ असं आजही स्मृतिभ्रंश होऊ लागलेल्या काळात ठामपणे सांगणारे सासरे हे ‘जगण्याचं जणू एखादं जगावेगळं व्रत घेऊन वावरावं’ असं जीवन जगलेत. ‘पैसे मिळवणं हे आयुष्याचं ध्येय न ठेवलेल्या माणसाची परमेश्वर काळजी करतो’, यावर माझा अजिबात विश्वास नाही. मात्र माझे सासरे आणि माझे वडिल यांच्या जीवनाकडे पाहिलं की मला या दैवीभूत वाक्यातील सत्यता पटू लागते. आपल्या जीवनातील आनंद शोधण्याची परिमाणं प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. सासऱ्यांचीही वेगळी होती. 

मागच्या दोन वर्षांपर्यंत त्यांची मनमती विलक्षण शाबूत होती. आता वयोमानपरत्त्वे किंचित शारीरिक कुरबुरी सुरु झाल्यात. कुरबुर सहन करण्याची सवय नसलेल्या सासऱ्यांना त्या मोठ्या वाटत असल्याने त्या गोंजारण्यात आणि त्यांना कोऱ्या चहाचा नैवेद्य दाखवण्यात यांचा दिवस कधी निघून जातो ते यांचे यानांच कळत नसेल! खरंतर शारीरिक कुरबुरी तुलनेने मातोश्रीना अधिक असणार असं आमचं ठाम मत आहे. पण जीवनभर अशा एकनाअनेक कुरबुरी भल्या पहाटे उठून चुलीवरच्या अंघोळीच्या पाण्यात टाकून उकळून प्यायलेल्या मातोश्रीपुढे शारीरिक तक्रारींचे आजही विशेष काही चालत नाही, हे कौतुकास्पद आहे.


ज्या सासऱ्यांनी आयुष्यभर घरातल्या ‘फोटोफ्रेम’मधील श्रीगणेशाची-आई श्रीकाळकाईची उपासना केली. जणू त्या काळकाईनेच त्यांच्या अर्धांगिनीच्या, म्हणजे मातोश्रींच्या पाठीमागे अज्ञात शक्ती बनून उभी राहून उभयतांच्या संसाराचा सांभाळ केला असावा! अन्यथा ‘आंधळ्याच्या गायी देव राखतो’ हे वचन सत्यात उतरलेलं आपल्याला तरी कधी पाहायला मिळालं असतं?

धीरज वाटेकर













नीलिमा पक्ष्याची दुसऱ्यावर्षी एकाच जागी वीण!

             नीलिमा ( Tickell’s Blue Flycatcher) पक्ष्याने आपल्या विणीच्या यंदाच्या नव्या हंगामासाठी सलग दुसऱ्यावर्षी आमच्या परसदारातील हॉलच...