शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

विंचूदंश बळींची शोकांतिका !

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील काळवली गावात अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडया ‘श्रावणी राजेश पार्टे’चा विंचूदंशानंतर उपचाराविनाच दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे घरात आनंदाने वावरणाऱ्या श्रावणीला अचानक काहीतरी चावले आणि वेदनांमुळे ती जोरजोरात रडू-ओरडू लागली. घरातील लोकांना तिच्या शरीरावर विंचूदंशाच्या खुणा दिसल्या, तातडीने तिला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले गेले. तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये डॉक्टरांच्या कमतरतेमुळे उपचारार्थ प्रवासात असताना उपचाराविनाच तिचा मृत्यू झाला आणि अवकळा आलेल्या आरोग्यव्यवस्थेवर समाजमनाने आसूड ओढायला सुरुवात केली. विंचूदंशावर प्रतिलस उपलब्ध असताना निव्वळ निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या या शोकांतिकांना जबाबदार कोण ? त्यावर कारवाई कधी आणि काय होणार ? असे प्रश्न त्यामुळे निर्माण झालेत.        

या घटनेत पोलादपूर येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये तिच्यावर उपचार करण्यासाठी विंचूदंशावरील प्रतिलस इंजेक्शन उपलब्ध नव्हते. महाड येथील डॉक्तरांनी ‘वयाने व प्रकृतीने खुपच लहान असल्याचे कारण देऊन एवढया लहान बालिकेवर विंचूदंशाचे उपचार करण्यासंदर्भात असमर्थता दर्शवित माणगाव उपजिल्हा रूग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.  माणगावला जात असतानाच उपचाराविनाच तिचा मृत्यू झाला. शासकीयस्तरावर सर्वदूर डॉक्टरांची वानवा आहे आणि त्यामुळे बोगस डॉक्टरांचे फावते, म्हणूनच कदाचित स्थानिकांना अनेकदा बोगस डॉक्टरांची बाजू घ्यायला आवडत असावे. दुर्गम भागातील आरोग्यकेंद्रात जर विंचूदंशावर उपचार होऊ शकत नसतील तर या केंद्रांची आवश्यकता ती काय ? अर्थात या साऱ्याला नागरिकांचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षही तितकेच कारणीभूत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेसंदर्भात सर्वसामान्यांत कमालीची चीड आहे. गोरगरीबांकडून अधिक पैशाची इथे नेहमीच लुट होत असल्याची ओरड होत असते. वर्षानुवर्षे हे असेच सुरु आहे. भारतात ब्रिटीश राजवटीपासून आरोग्य सेवा पद्धती सुरु झाली, तत्पूर्वी आयुर्वेदीय ‘वैद्य’ परंपरा होती, आजही आहे. ब्रिटीशकालीन आरोग्य यंत्रणेचे उद्दिष्ट सैनिक आणि युरोपियन नागरिकांना सेवा देणे हे होते. दरम्यान त्यांनी भारतातील प्लेग, कॉलरा, देवी या साठींवर उपचार सुरु केले. हे औषधोपचार पाश्चात्य पद्धतीचे होते.कालांतराने देशात सन १९४० साली आरोग्यसेवा सुरु झाली आणि सन १९४२ साली पश्चिम बंगाल राज्यात कलकत्याजवळ ‘शिंगुर’ गावी देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले. तेव्हापासून देशभर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून काम सुरु आहे, तरीही ही केंद्रे मानवी चुकांनी ग्रासलेत, आणि त्यामुळे आजही सक्षम नाहीत. वास्तविकत: प्राथमिक आरोग्य केंद्रांना रोज ४ तास सकाळी व २ तास संध्याकाळी वैद्यकीय बाहयरुग्ण सेवा, आंतररुग्ण सेवा (६ बेड) पुरविणे बंधनकारक आहे. जखमा व अपघात यांचे योग्य व्यवस्थापन व प्रथमोपचार, संदर्भसेवेपूर्वी रुग्णाला जीविताचे धोक्याबाहेर आणणे, श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंश व इतर स्थितीत २४ तास तातडीची सेवा देण्याचे बंधन आहे. तरीही हे घडत नाही, कोणी काही बोलत नाही, या साऱ्यांत नाहक बळी जात आहेत.

याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात घराच्या शेजारी मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेलेल्या १४ वर्षे वयाच्या श्रध्दा विठ्ठल गुरव या मुलीचा घरी परतत असताना अंधारात पायवाटेवर विंचूदंश झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर पालकांनी सर्वप्रथम प्रथमोपचार आणि नंतर तिला अधिक उपचारासाठी संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संगमेश्‍वर तालुक्यातील २५८ लोकांना एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत विंचूदंश झाल्याची नोंद देवरुखच्या ग्रामीण रुग्णालयात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात, पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील गत दहा वर्षांत झालेल्या तब्बल ७४३ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूत ‘विंचूदंश’ हे एक प्रमुख कारण होते. यातील ६० टक्के विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नव्हते. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात लावणीसह शेतीची कामे सुरू झाल्याच्या काळात सर्प व विंचूदंशाचे प्रमाण अधिक वाढते. जिल्हा परिषद आरोग्य विभागातील माहितीनुसार जिल्ह्यात २०१३-१४ यावर्षी विंचूदंशाचे ३४०५ रुग्ण, तर सर्पदंशाचे १२१३ रुग्ण दाखल झाले होते. सन २०१४ साली जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात १७६ विंचू, १३६ श्वानदंश, तर १० जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने एकही रुग्ण दगावला नाही. सन २०१५ मध्ये मे ते जून या कालावधीत बिरवाडी-महाड भागात ५१ जणांना विंचूदंशाची बाधा झाली होती. विंचूदंश, सर्पदंश झाल्यानंतर आवश्यक असणारे उपचार ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याची ओरड होत होती, रुग्ण दगावण्याचे प्रमाण तेव्हाही वाढले होते.

महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी सापडणाऱ्या काळ्या विंचूपेक्षा कोकणात सापडणारा लाल विंचू जास्त घातक असून रुग्ण त्यामुळे दगावू शकतो. एप्रिल, मे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये या विंचूदंशाचे प्रमाण कोकणात सर्वाधिक आहे. सातत्याने बदलत जाणारे हवामान, वाढता उष्मा यामुळे विंचू बाहेर पडण्याच्या प्रमाणात वाढ होऊन दंशाचे प्रमाणही वाढते. कडक उष्मा वातावरणात विशेष काळजी घेण्याची गरज असते. ग्रामीण भागातील परिसरात होणा-या विंचूदंश, श्वानदंश व सर्पदंश अशा रुग्णांवर वेळेत उपचार करून रुग्णांचा जीव वाचवावा लागतो. अलिकडच्या संशोधनामुळे विंचवाचा दंश म्हणजे यमाचीच भेट अशी खात्री असणाऱ्या कोकणात विंचूदंशाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चाळीस टक्क्यांवरून एक टक्क्यापर्यंत आले आहे. मात्र तरीही निव्वळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे विंचूदंश व सर्पदंशाने आजही रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत, ही बाब खूपच चिंताजनक आहे, यावर स्थानिक पातळीवर जबाबदार समाजघटकांनी ठोस मार्क काढायलाच हवा.

धीरज वाटेकर

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०१७

‘कॅम्पस’बाहेरील उच्चशिक्षण

साधारणतः वर्ष-दीड वर्षापूर्वी, जर्मन कंपन्यांनी महाराष्ट्रात आयोजित केलेल्या एका ‘व्यवसाय परिषद’ कार्यक्रमात बोलताना राज्यातील एका जबाबदार लोकप्रतिनिधीनी, ‘महाराष्ट्रात हजारभर इंजिनिअरिंग कॉलेज असून त्यातून प्रतिवर्षी एक लाख इंजिनिअर बाहेर पडतात’ असे आत्मविश्वासपूर्ण विधान केले होते. तेव्हा महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग शिक्षणाचे वास्तव जवळून अनुभवणाऱ्या प्रत्येकाला पडतील, असे सारे प्रश्न पडले होते. एकतर राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेश क्षमतेपैकी किमान ४० हजार सीट दरवर्षी रिकाम्या राहतात. बाकी बहूतेक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर मिळणारा कंपनी जॉब असा की, अकुशल कारागिराइतका पगार! अर्थात जे विद्यार्थी पहिल्यापासून ध्येय ठरवून हे शिक्षण घेतात, ते आपले करियर घडवतातच ! पण बाकी बहुसंख्यकांचे काय? आणि या मागील कारणे काय? ‘कॅम्पस’बाहेरील उच्चशिक्षणाबाबतची ही सारी कारणे नेहमीच दबक्या आवाजात चर्चिली जातात. परंतु औरंगाबादच्या चौका येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयात १६ मे २०१७ रोजी ४७ विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा ‘बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉइंग’ या विषयाचा पेपर नगरसेवकाच्या घरात बसून लिहायला घेतला, गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकरवी हा प्रकार उघडकीस आला, आणि या साऱ्या चर्चेला जणू व्यासपीठच मिळाले. ‘कॅम्पस’बाहेरील या ‘भ्रष्ट’ उच्चशिक्षणामुळे गेल्या काही वर्षांपासून शिक्षित महाराष्ट्रात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.   

शिक्षणातील असे हे अनेक प्रकार ‘समाजकार्य’ नक्कीच नव्हे ! यामागे लाखो रुपयांचे ‘अर्थ’कारण लपलेले आहे. आपली ‘संस्कारक्षम मूल्यव्यवस्था’ आजच्या बाजारु दुनियेत कशी पायदळी तुडवली जात आहे, हेच यातून जाणवते. औरंगाबादच्या घटनेत यातील ४७ पैकी विद्यार्थ्यांसह ३० जणांना कोर्टाने २३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर ३ विद्यार्थिनींना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. यात संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, नगरसेवक, नगरसेवकाचा मुलगा यांचा समावेश होता. घटनासमयी प्राध्यापक विद्यार्थ्यांना तोंडी उत्तरे सांगत होते, मुले उत्तरपत्रिका लिहीत होती. दिनांक २ मेपासून या भागात अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली. दोनदा रद्द करण्यात आलेले हे परीक्षा केंद्र दबावामुळे पुन्हा देण्यात आले होते. परीक्षेदरम्यान रोज १५ हजार उत्तरपत्रिकांचे संकलन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्यावतीने केले जाते. त्यासाठी विद्यापीठाकडे दोनच वाहने आहेत. त्यामुळे अतिदुर्गम भागातील तुळजापूर, आंबाजोगाई, परळी, जालना, बीड आणि उस्मानाबादच्या सोडवलेल्या उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यासाठी आठ-आठ दिवस वाहने जात नसल्याची, एका मुलाकडून या रॅकेटने एका पेपरसाठी दहा हजार रुपये घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

आजच्या समाजातील युवक असंतुष्ट आहेत आणि त्यांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करून घेण्यापेक्षा वरवरच्या तात्कालिक व्यथा-वेदनांबद्दल बोलले जाते, उपाय करणारेही मूळ रोग बरा करण्यापेक्षा वरवर मलमपट्टी करून मोकळे होतात, यामुळे असंतोष वाढतो आहे. शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश करू पाहणारा युवक कोणत्या हेतूने उच्चशिक्षणाकडे वळतो, यावर सखोल चिंतन व्हायला हवे. विद्यापीठाने उच्चशिक्षणाचे उद्दिष्ट कोणते मानले आहे ? शासनाला काय मान्य आहे ? पालक आणि विद्यार्थी काय समजतात ? हे अभ्यासता गोंधळ समोर येतो.  स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतात कारकून तयार करण्यासाठी आखलेली शिक्षणपद्धती आजही तशीच आहे. नोकरी मिळवण्यासाठी पदवी आवश्यक आहे याच कारणासाठी युवक उच्चशिक्षणाकडे धावतात. उच्चशिक्षणाबद्दल समाजात आकर्षणही आहे. उच्चशिक्षणाचे नेमके प्रयोजन आणि त्यानुसार शैक्षणिक क्रांतीचे स्वरुप निश्र्चित करण्याची वेळ आलेली आहे.शिक्षणपद्धती अधिकाधिक समाजाभिमुख व्हायला हवी आहे. कारण एखाद्या शिक्षणाची फलश्रुती ही जीवनात दृगोचर व्हायला किमान एका पिढीचा काळ जावा लागतो. आपल्या उच्चशिक्षणाने जो सुशिक्षित वर्ग निर्माण केला आहे तो स्वत:ला पांढरपेशा आणि बुद्धिजीवी मानत  श्रमजीविंविषयीची तुच्छता-उपहासाची भावना मनात निर्माण करून घेतो. त्यामुळे ‘श्रम आणि बुद्धी’ यांचा वियोग भूषणावह मानणारी पिढी राष्ट्रविकास आणि राष्ट्रनिर्माण करायला कशी समर्थ ठरेल याची शंका वाटते. बुद्धी, श्रम यांचा समन्वय आणि दोन्हींतील मूलभूत प्रतिष्ठेवर आधारित समता प्रस्थापित करणारेशिक्षण मिळायला हवे ! महात्मा गांधींनी "जीवनशिक्षण' असा शब्द वापरला होता. जीवनातून शिक्षणाचा, ज्ञानाचा उगम होतो ही त्यांची कल्पना होती, आपण ते सारे विसरलो आहोत. आपल्यावर भाषेने गारुड केले आहे. सर्वसाधारणपणे उच्चशिक्षणाचा हेतू विद्यार्थ्याला व्यवसाय-नोकरी मिळवून देण्यासाठी आवश्यक पात्रता निर्माण करणे हा आहे. जर चरितार्थ सुरळीतपणे चालेल असा व्यवसाय शिक्षणातून मिळणे शक्य होत नसेल तर अनेक समस्या निर्माण होतील. त्यापुढे जाऊन समाजात युवक उपयुक्त' ठरावा अशी पात्रता त्याच्या ठायी उत्पन्न करीत, त्या युवकातील सुप्तशक्तींना जागवून, त्याच्या सामाजिक जाणीवांचा विकास घडविणारे शिक्षण मिळायला हवे.

पदवी प्राप्त करुन प्रत्यक्ष ‘प्रॅक्टिकलवर्क' मध्ये आपले ‘थिरॉटिकल' ज्ञान अपूर्ण आहे असे आढळून येते. विद्यापीठाच्या पदव्या जीवनात नोकरी-व्यवसाय मिळवायला पात्र ठरू शकत नाहीत, तरीही त्यांचा हव्यास कमी होत नाही. आजची आपली परीक्षापद्धती विद्यार्थ्यांच्या आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या अध:पतनाला कारणीभूत आहे. भ्रष्टाचार आणि गैरप्रकार यांनी बरबटलेल्या या परीक्षा पद्धतीची विश्र्वासार्हता अनेक कारणांनी नेहमीच शंकास्पद ठरत असते, औरंगाबाद प्रकरणाने ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


धीरज वाटेकर


बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

वेगवान विचारांचा कोकणी ‘प्रवाह’ : स्वर्गीय नानासाहेब जोशी

चौकट मोडून काहीतरी नवं घडविणारा माणूस विचार, शोध आणि बोध यामुळे समृद्ध होत असतो. अशी व्यक्ती सततच्या आत्मचिंतनाने प्रगल्भ होत, साठलेल्या ज्ञानाचा भार न वाटता अधिक विनम्र होत जाते. सर्वसामान्यपणे माणूस हा अनुकरणप्रिय असतो आणि ते राहणे सोपेही असते. अनुकरण करणे म्हणजे स्वतः समजून घेण्याच्या श्रमांपासून पलायनवाद स्विकारणे असते, जबाबदारीपासून दूर राहणे असते. ते टाळून आलेल्या प्रत्येक समस्येवर आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर, वेगवान विचारांच्या सहाय्याने स्वतःच समाधान शोधत समाजातील धार्मिक, पत्रकारिता, समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक, साहित्य, वैचारिक क्षेत्रात आपल्या अनुभवसमृद्ध जाणीवांनी, ‘सुवर्णमहोत्सवी’ दैनिक सागरच्या माध्यमातून अवघ्या समाजमनावर प्रवाही अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर्गीय निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी यांचे अचानकचे जाणे (३ जून), विविध क्षेत्रात समाजसुधारणेचा वसा घेवून काम करणाऱ्या त्यांच्या असंख्यांना चाहत्यांना चटका लावून गेले आहे.

महाराष्ट्राला लाभलेला तर्कनिष्ठ आणि बुद्धिवादी विचारांचा ‘प्रवाह’ नानांनी पुढे नेला. नानांचे मानवी मन मोठे विलक्षण होते. एकाच वेळी काय काय चालत असेल त्या मनात ? स्वतःशी संवाद अन् कधी-कधी वादविवादही ! तरीही समोर बसलेल्याशी कोणत्याही विषयावर तासंतास शतप्रतिशत बौद्धिक गप्पा मारण्याची क्षमता असलेल्या नानांशी संवाद साधताना कोणालाही, ‘हिमनगाचा एक दशांश भाग पाण्यावर असतो आणि उर्वरित पाण्याखाली’ या उक्तीची सहज जाणीव होऊन जावी, अशा विचारांची वेगवान झेप घेणाऱ्या, विलक्षण व्यक्तिमत्वाचे ते धनी होते. तालुकास्तरावर सुरु झालेल्या देशातील पहिल्या, कोकणातील असंख्य लेखक-पत्रकारांना पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी देणाऱ्या, दैनिकाचे नाना संस्थापक-संपादक होते. पाच-पंचवीस-पन्नास वर्षांपूर्वी आयुष्यात घडलेली, अनुभवलेली, पाहिलेली, जगलेली घटना सांगताना नानाजे बिनचूक बारकावे सांगायचे ते ऐकताना अक्षरशः मती गुंग व्हायची ! नाना गांधीवादी होते, परंतु सध्यस्थितीत तरुणांनी काय केले पाहिजे ?  यावरही ते तासंतास बोलत. नानांसोबतचे वैचारिक जगणे हा बौद्धिक आनंदाचा भाग असायचा.

कोकण विकासाचा ध्यास घेतलेल्या नानांनी, ‘मुंबईसह कोकणाचे सागरी राज्य झाले तरच कोकणचा विकास होऊ शकतो’ अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या बरोबरीने मांडली होती. कोकणातून दैनिक सुरु करण्यामागे ‘कोकणाचा भरीव विकास’ हाच त्यांचा दृष्टीकोन राहिला. ‘साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी’ नाना जगले. कोकणला झुकते माप देणाऱ्या घटनांचे भरभरून कौतुक नानांनी जसे केले तसे कोकणाच्या उपेक्षेबाबतच्या अनेक गंभीर, इतरांच्या नजरेतून सुटलेल्या प्रश्नांची, मुद्द्यांची मांडणीही अनेकदा केली. पर्यावरणाचे संतुलन साधूनच कोकणाचा विकास होणे आवश्यक आहे, या मताशी नाना कायम राहिले. सनसनाटी बातम्या म्हणजे ‘वृत्तपत्र’ ही नानांची पत्रकारीता कधीही नव्हती. ५२ वर्षांपूर्वी कोकणात वृत्तपत्र सुरू करणे हे अतिशय धाडसाचे काम होते. नानांनी दळणवळणाची अत्यंत तुटपुंजी साधने असताना, अनेकदा वीज, तांत्रिक बाबी नसताना त्याकाळी जनरेटर आणून वृत्तपत्र चालवले. मृत्यूपूर्वी दोन आठवडे अगोदर नानांनी, ‘कोकणातील नेत्यांची राज्यातील इतर राजकारणी नेते कोंडी करीत आहेत त्याचा कोकणातील सर्वांनी एकमताने धिक्कार करावा’ असे लिहिले होते.

चिपळुणातील परशुराम येथे प्राथमिक शिक्षण, मुंबई-गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. ख्यातनाम समीक्षक राम मनोहर यांच्याकडे काही काळ लेखनिक म्हणून काम करणाऱ्या नानांच्या मनात इथेच पत्रकारितेची बीजे रुजली. बी.ए.बी.एड. झाल्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये ‘शिक्षक’ म्हणून काम करताना ‘उष:काल’ नावचे भित्तीपत्रकही त्यांनी चालवले होते. खिशात अवघे दोनशे रुपये असताना २० जून १९६५ रोजी त्यांनी कोकणचे मुखपत्र दैनिक सागर सुरु केले. सागरमधील एन.एम.या टोपण नावाने तेच लिहित असलेला प्रवाहहा स्तंभ म्हणजे त्यांच्या अव्याहत विचारांचा वाहता प्रवाह होता. नानांनी दैनिकातल्या तपशिलातील वैविध्य जपले. अखंड वाचन आणि देश-विदेशातली डोळस भ्रमंती यातून कमावलेला व्यासंग हे नानांचं मुख्य भांडवल होतं. आखाती देशांसह जगभरात वावर, तेथील मराठी आणि कोकणी माणसांशी सततचा संपर्क, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयाचं वाचन यामुळे अनेक संदर्भ ते सहज देत. एखाद्या गोष्टीचा सखोल मागोवा घेणारा आणि अवतीभवतीच्या वातावरणाबद्दल संवेदनशील असणारा त्यांच्यातला संपादक त्यांनी सदैव जागा ठेवला होता.
कोकणचा चालता बोलता इतिहास असलेले नाना `परशुराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होते. या देवस्थानचा कायापालट त्यांच्याच काळात झालेला आहे. कोकणातील अनेक सामाजिक संस्था उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आमदार म्हणूनही त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. चिपळूण तालुक्यातील गावागावात रस्ते, धरणे, शाळा अशा विकासकामांचा वेगही तेव्हा जोरात होता. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, एमआयडीसीचे संचालक, रोजगार हमी योजनेचे कार्यकारिणी सदस्य, कोकण सिंचन अभ्यास मंडळाचे सदस्य, राज्य व केंद्र सरकारच्या माजी सैनिक सल्लागार समिती सदस्य अशा विविध जबाबदाऱ्यावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. चिपळूणला अखिल भारतीय मराठी पत्रकार संमेलन, पहिलं कोकण मराठी साहित्य संमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, साहित्य संमेलन, कोकण सांस्कृतिक अकादमीतर्फे १६ वर्षे कुमार गंधर्व संगीत संमेलने यांमुळे ‘कोकणाची सांस्कृतिक राजधानी’ असे अभिमानास्पद बिरूद त्यांच्याच काळात प्राप्त झाले. अभिजात कलेची आवड असणाऱया, अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेल्या नानांच्या भाषणांचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांची कायम गर्दी होत राहिली. चिपळूणात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील त्यांची भाषणे म्हणजे बौद्धिक मेजवानीच होती.
कोकण सांस्कृतिक अकादमीचे संस्थापक, अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे उद्गाते, विविध सामाजिक संस्थांचे आश्रयदाते, दैनिक सागरचे संपादक असे नानांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू होते, डोळस पत्रकारिता हा त्यातला मूळ पैलू होता, पत्रकारितेचं ते चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या सानिद्ध्यात घालवलेला क्षणनक्षण मौलिक आहे. कोकणच्या सांस्कृतिक, साहित्य, कला, पत्रकारिता, राजकीय क्षेत्रांत त्यांच्या जाण्याने कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अभ्यासोनि प्रकटावे... हे समर्थ रामदासांचे वचन शैक्षणिक आयुष्यात वाचनात, ऐकण्यात आल्यानंतर ते जगण्याचा प्रयत्न करीत असतानाच्या वाटेवर तेच वचन तंतोतंत जगणारे, आभाळाएवढ्या उंचीचे, कोकणचे बुद्धिवैभव ठरलेल्या स्वर्गीय नानांचे व्यक्तिमत्व जवळून तासंतास अभ्यासायला, अनुभवायला मिळाले, त्यांच्यासोबत जगता आले. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकालाच त्यांच्या वेगवान विचारांच्या प्रवाही सागरात, पवित्र जीवन जगण्याची प्रेरणा मिळालेय हे मात्र नक्की ! 

धीरज वाटेकर


३ ऑगस्ट : द्वितीय मासिक स्मृतिदिन अभिवादन !!!


सोमवार, १२ जून, २०१७

जंगलांचे आक्रंदन आणि मानवी मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात आकुर्डे गावातील अनिल पोवार आणि पत्रकार रघुनाथ शिंदे या दोघा उमद्या व्यक्तीमत्वांचा रानगव्याच्या हल्ल्यात अलिकडेच दुर्दैवी मृत्यू झाला आणि जंगलांचे आक्रंदन आणि मानवी मृत्यू हा जुनाच प्रश्न नव्याने समाजासमोर पुन्हा एकदा उभा ठाकला. अपुरा पाणीसाठा, चा-याच्या कमतरता यामुळे या भागातील रानगवे वाड्यांवस्त्यांवर येवून पोहोचले आहेत. परिसरात गव्यांची दशहत निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग एकटा-दुकटा शेतात जाण्यास टाळाटाळ करू लागला आहे. भुदरगड तालुक्यातील हे वनक्षेत्र रांगणा किल्ल्यापासून विस्तारलेले असून, दाजीपूर गवा अभयारण्याला संलग्न आहे. घनदाट जंगल असणारा हा वनचरांचा स्वर्ग म्हणून ओळखला जाणारा हा परिसरही वृक्षतोडीने ग्रासला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवनावर अतिक्रमण होवून अखेर ते मार्ग मिळेल तिकडे सैरभैर जावू लागल्याने हे सारे देशभर सर्वत्र घडते आहे. या साऱ्याचे मूळ अर्थातच वृक्षतोडहेच आहे, आम्ही मात्र आक्रंदणाऱ्या जंगलांचा आवाज ऐकण्याच्या मनस्थितीत आजही नाही, हेच सततच्या दुर्दैवी घटनांतून जाणवते.    


आपल्या देशात कर्म करतो कोण ? नुकसान सोसतो कोण ?’ अशी विचित्र स्थिती आजही कायम आहे. बेसुमार जंगल तोडीमुळे आपल्याकडे पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, होत आहेत, होणार आहेत. परंतु जो समूह या साऱ्यापाठी आहे त्याचे काहीही बिघडल्याचे एकही उदाहरण वाचनात, ऐकण्यात, पाहाण्यात नाही. भुदरगड तालुक्याच्या कडगाव-पाटगाव ते रांगणा किल्ला, मठगाव ते आंबोली परिसरातील वनक्षेत्रात अनेक वन्यप्राणी स्थिरावलेले आहेत. निर्ढावलेले रानगवे तर रात्री पोटभर खाऊन गाव-गल्लीतून पाणवठयाकडे ये-जा करताहेत. या उपद्रवी जनावरांना बेशुद्ध करून दाजीपूर अभयारण्यात नेऊन सोडणे इतकाच काय तो पर्याय आज उपलब्ध आहे. हे प्रकार बळावूच नयेत म्हणून आम्ही काहीही करत नसल्याने घटन घडल्यानंतर शासन जागे होते आहे. जंगलांच्या सीमा ओलांडून येणाऱ्या बिबट्यांचे हल्ले आणि त्यात होणारे मानवी आणि बिबट्यांचे मृत्यू ही देशभरातील मोठी समस्या आहे. त्यात बिबट्यांची संख्याही कमालीच्या वेगाने घटते आहे. मानव आणि बिबट्या यांच्या संघर्षात अनेकदा बिबट्यांना ठार करावे लागले आहे. त्याची अधिकृत आकडेवारी ऐकून निसर्गप्रेमी व्यथित होतात. आसामसह कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हत्तींचा उपद्रव असाच आहे. गीरच्या जंगलातील सिंहांचे कळप नजीकच्या गावात पोहोचलेत, काझीरंगातील गेन्ड्यांनाही शहराची सवय झाली आहे. वन्यजीवांचा अधिवास संपल्याने समस्या तीव्र बनली आहे. यातील बऱ्याचश्या घटना ह्या विशेषतः तीव्र  उन्हाळ्यात, पाणीटंचाई काळात घडतात. जगभरातील हा चर्चेचा मुद्दा आहे.

निसर्गातील प्रत्येक घटक माणूस, प्राणी, पक्षी, वनसंपत्ती, जलसंपत्ती, शेती हे सारे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यात माणूस हा जरासा बुद्धिजीवी असल्याने अन्नसाखळीसाठी निसर्गातील प्रत्येक घटकांचा समतोल राखणे आवश्यक आहे, याची त्याला जाणीव झाली आहे. पृथ्वीतलावरील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकावर एकमेकांना जगवण्याचीही जबाबदारी आहे. कारण जे-जे जीवंत असते, ते एक दिवस नष्टही होणार आहे. पर्यावरणाच्या अन्नसाखळीतील अनेक घटक एकमेकांना भीत असतात. वन्यप्राणी जंगल सोडून लोकवस्तीत घुसले की हे जाणवते. वन्यप्राणी शेती नष्ट करतात,त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त  शेतक-यांना वन्यप्राण्यांचे हल्ले त्यांच्या जगण्यावर आघात करणारेच वाटतात. सापांना लोकवस्तीतून पकडून जंगलात नेऊन सोडल्यानंतर तेत्यांच्या मूळ जागी न सोडता कुठेही नेऊन सोडले तर साप, नाग नंतर मृत्यू पावतात. पर्यावरणात असे अनेक विषय येतात. आपल्याकडे प्राणी आणि  मनुष्य यांच्यातील इंटरॅक्शन वाढविण्याची खूप मोठी गरज आहे. मानव स्वत:च्या हक्कासाठी भांडतो, परंतु पशु-पक्ष्यांचेही हक्क वगेरे असू शकतात, हे मात्र माणूस मानायलाच तयार नाही. यात दुर्दैवाने जे पर्यावरण तत्व मानतात, जगतात, त्यात वावरतात त्यांचाच नाहक बळी जातो, हे अतिशय दुर्दैवी आहे.   
शेती-बागायतीत घुसून वन्यप्राण्यांकडून शेतक-यांचं मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. आंबोली ते मांगेली या सहय़ाद्रीच्या पट्टय़ात गवारेडे, रानडूक्कर, माकड, हत्ती आदि वन्यप्राण्यांकडून दरवर्षी लाखो रुपयांचं नुकसान होते. सरकारदरबारी वेळोवेळी कैफियत मांडून देखील ठोस काही घडत नाही. वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ नये, यासाठी धोरण राबवायला हवंय. वन्यप्राण्यांचा उपद्रव केवळ आपल्यालाच सहन करावा लागतो असं नाही. जगात अनेक देश आहेत, वन्यप्राण्यांनी मानवी वस्तीत येऊन नुकसान करू नये यासाठी, या देशांनी उपाययोजना केल्या आहेत, याबाबत आपल्याकडे उदासीनता आहे. वन्यप्राण्यांना जंगलात खाद्य शोधण्यासाठी दीर्घकाळ पायपीट करावी लागते. तुलनेत लोकवस्तीत मुबलक पाणीसाठा व शेती, बागायती असल्यामुळे सारेच सहज उपलब्ध होते. पाणी व खाद्याची पायाभूत गरज लोकवस्तीत सहज पूर्ण होत असल्यानेच वन्यप्राणी निव्वळ लोकवस्तीत अतिक्रमण करू लागले आहेत. वन्यप्राण्यांच्या या अतिक्रमणामुळे शेती-बागायतींची नासधुस होऊन शेतक-यांचं अतोनात नुकसान झालेले  आहे, प्रसंगी मृत्यू होत आहेत. वनविभागाकडे वन्यप्राण्यांचं अतिक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना नाही. नुकसान टाळण्यासाठी शेती  बागायतींना सौरकुंपण घालण्याची तरतूद मात्र आहे. तिचा किती प्रभावी उपयोग होतो ? हा प्रश्नच आहे.  

फारपूर्वी जंगली प्राणी लोकवस्तीत येत नसत. त्यांना जंगलात खाद्य मिळत होतं. आज पोल्ट्रीसारखे अनेकविध पदार्थ नदीकिनारी, वस्तीजवळ दूरवर कोठेही कसेही टाकले गेल्याने त्याच्या वासाने वन्यप्राणी लोकवस्तीत घुसतात. वन्यप्राण्यांना लोकवस्तीपासून दूर करण्यासाठी शेकोटी पेटवून त्यात मिरचीपूड किंवा मिरची घालून प्राण्यांना तीव्र वास येऊन ते लोकवस्तीपासून दूर जातील, असेही प्रयत्न करता येतील. या वन्यप्राण्यांना लोकवस्तीपासून दूर ठेवण्यासाठी शासनाने झपाटून सौरऊर्जा कुंपण, वनक्षेत्राच्या हद्दीत चर मारणे अशी कामं मनापासून करायला हवीत. एखाद्या वन अधिकाऱ्याने दिवस-रात्र एक करून, अशाच एखाद्या क्षेत्रातील वन्यप्राण्यांचे हल्ले प्रयत्नपूर्वक कमी करून दाखवायला हवेत, असे प्रयोगशील उमदे काम इतर अनेकविध क्षेत्रात होते, इथेही व्हायला हवे, म्हणजे त्याचा कित्ता इतर ठिकाणी गिरवता येईल.

धीरज वाटेकर

रविवार, ४ जून, २०१७

विचारांना गती देणारे ‘मार्गदर्शक नानासाहेब जोशी’

“आनंदी राहण्यासाठी सतत काहीतरी नवीन करायला हवं आणि नवीन करण्यासाठी ‘कल्पकता’ हवी !” ह्या विचाराची नुसतीच पेरणी न करता, प्रत्येक वेळेच्या तासंतास भेटीत ‘त्या’ विचारांची नांगरणी करून विचारांना सतत ‘कल्पक’ गती देणाऱ्या ‘मार्गदर्शक नाना’ यांना कायमचा मुकलोय !!! कोकणचे ‘बुद्धिवैभव’, दैनिक 'सागर'चे संपादक, माजी आमदार निशिकांत तथा नानासाहेब जोशी यांचे वृद्धापकाळाने, वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी (दिनांक ३ जून २०१७, दुपारी ३.२० वा.) कळली आणि धक्काच बसला, काही सुचेनासंच झालं होतं...!!!

कोकणातील असंख्य लेखक-पत्रकारांना पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी देणाऱ्या, सुवर्णमहोत्सवी दैनिकाचे नाना संस्थापक-संपादक होते. दिनांक ७ सप्टेंबर १९९८ ला मला दैनिक सागरनेच पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी दिली, त्या दैनिकाचे संपादक असलेल्या नानांची प्रत्यक्ष भेट घडायला मात्र पुढे १० वर्ष जावी लागली. सन २००८ साली गुढीपाडव्याला ‘चिपळूण तालुका पर्यटन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले, तेव्हापासून शक्य होईल तेव्हा विशेषतः हातून काहीतरी नवनिर्मिती घडल्यानंतर ती भेट घेऊन माझे नानांकडे आवर्जून जाणे होई. प्रत्येक भेटीत नानांचे व्यक्तीमत्व माझ्यासमोर नव्याने उलगड़े. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विषयावर मला माहित नसलेले परंतु आवश्यक असे मार्गदर्शन मिळत असे. गेल्या १० वर्षातील प्रत्येक भेटीत नानांकडून जे काही विचारांना गती देणारे मार्गदर्शन मिळालेय, त्याला आजच्या दुनियेत खरंच तोड नाही. पाच-पंचवीस-पन्नास वर्षांपूर्वी आयुष्यात घडलेली, अनुभवलेली, पाहिलेली, जगलेली घटना सांगताना ‘नाना’ जे बिनचूक बारकावे सांगायचे ते ऐकताना अक्षरशः मती गुंग व्हायची ! मी अनेकदा त्या पद्धतीने ‘डायरी’ लिहिण्याचाही प्रयत्न केला. चर्चेला कोणताही विषय समोर आला तरी नानांचे काहीसे खास वेगळे मार्गदर्शन हमखास ठरलेले ! याच मार्गदर्शनाने आम्हाला ‘सतत वेगळा विचार करण्याचे बळ पुरविले’ हे मात्र नक्की. नाना, चांगल्या कामाचे मनापासून भरभरून कौतुक करायचे, सूचना करायचे. आमच्या अनेक प्रकारच्या विशेषांक, दीपावली अंक, स्वत: लिहिलेली पुस्तके, कोकण पर्यटन प्रचारपत्रके, कोकण नकाशा आदि विविध प्रकाशित उपक्रमांची आवर्जून पाहणी करताना बारीकसारीक माहिती मोठ्या उत्सुकतेने जाणून घेत आणि आमचा विचार कुठेतरी गडबडतोय म्हटल्यावर लगेच तो सुधारित, पटवून देत. फोनवर बोलताना आवर्जून अलिकडे आम्ही लिहिलेला, कुठेतरी दूरच्या नियतकालिकातला लेख वाचल्याचे सांगीत, हा सारा मार्गदर्शनाचा अनुभव आमच्यासाठी आयुष्यभराचा अनमोल ठेवा राहणार आहे.

नानांसोबतच्या ओळखीच्या अगदी सुरुवातीला, २००८ साली 'चिपळूण तालुका पर्यटन' नंतर आम्ही 'श्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन' पुस्तिकेसाठी नानांकड़े शुभसंदेश मागायला गेलो होतो तेव्हा 'किती लिहू?' या आम्हाला न समजलेल्या त्यांच्या प्रश्नावर आम्ही, 'पुस्तिका खूप छोटी आहे, चार ओळी तरी लिहून द्या' असे सहजच म्हटले...परतच्या भेटीत मोजक्या चार ओळीतील नानांचा संदेश हाती आला होता...! पुस्तिका भेट द्यायला जेव्हा गेलो तेव्हा मात्र नानांकड़ून तब्बल दोन तास आम्ही 'भगवान परशुराम' या विषयावरील श्रवणानंद घेतला होता. अगदी मागील वर्षी आमचे 'प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी' हे चरित्र लेखन प्रसिद्ध होत असताना नानांकडेच आम्ही हक्काने प्रस्तावना मागितली आणि नानांनी मनापासून भरभरून लिहून दिलीही...! त्यावेळी खरेतर नानांनीच त्या पुस्तक प्रकाशनाला यावे, अशी इच्छा होती. पण नेमके तेव्हाच नानांचे आजारपण-ऑपरेशन आदि विषय पुढे आल्याने ते राहिले.

सततचे नवनवीन उपक्रम नानांसमोर ठेवायचे, त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, प्रेरणा घ्यायची आणि नवीन काहीतरी करायला बाहेर पड़ायचे... असाच गेल्या दहा वर्षांचा आमचा नियमित क्रम राहिला... नानांच्या जाण्यामुळे हे सारं आता थांबलय ही जाणीव जगण्यासाठी बळच देईनाशी झाली... इतकी की, 'काय लिहू?'  तेच सुचेना...! नानांचे मार्गदर्शन आठवून सतत कार्यरत राहणे एवढेच आता हाती शिल्लक राहिलेय...!!!

विनम्र श्रद्धांजली !!!

धीरज वाटेकर चिपळूण.

स्वर्गीय नानासाहेब जोशी यांना
चिपळूणातील पत्रकारांनी श्रद्धांजली अर्पण केली 











चिपळूणातील पत्रकारांच्या श्रद्धांजली सभेत
स्वर्गीय नानांविषयी आठवणी सांगताना धीरज वाटेकर









आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...