बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

वेगवान विचारांचा कोकणी ‘प्रवाह’ : स्वर्गीय नानासाहेब जोशी

चौकट मोडून काहीतरी नवं घडविणारा माणूस विचार, शोध आणि बोध यामुळे समृद्ध होत असतो. अशी व्यक्ती सततच्या आत्मचिंतनाने प्रगल्भ होत, साठलेल्या ज्ञानाचा भार न वाटता अधिक विनम्र होत जाते. सर्वसामान्यपणे माणूस हा अनुकरणप्रिय असतो आणि ते राहणे सोपेही असते. अनुकरण करणे म्हणजे स्वतः समजून घेण्याच्या श्रमांपासून पलायनवाद स्विकारणे असते, जबाबदारीपासून दूर राहणे असते. ते टाळून आलेल्या प्रत्येक समस्येवर आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर, वेगवान विचारांच्या सहाय्याने स्वतःच समाधान शोधत समाजातील धार्मिक, पत्रकारिता, समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक, साहित्य, वैचारिक क्षेत्रात आपल्या अनुभवसमृद्ध जाणीवांनी, ‘सुवर्णमहोत्सवी’ दैनिक सागरच्या माध्यमातून अवघ्या समाजमनावर प्रवाही अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर्गीय निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी यांचे अचानकचे जाणे (३ जून), विविध क्षेत्रात समाजसुधारणेचा वसा घेवून काम करणाऱ्या त्यांच्या असंख्यांना चाहत्यांना चटका लावून गेले आहे.

महाराष्ट्राला लाभलेला तर्कनिष्ठ आणि बुद्धिवादी विचारांचा ‘प्रवाह’ नानांनी पुढे नेला. नानांचे मानवी मन मोठे विलक्षण होते. एकाच वेळी काय काय चालत असेल त्या मनात ? स्वतःशी संवाद अन् कधी-कधी वादविवादही ! तरीही समोर बसलेल्याशी कोणत्याही विषयावर तासंतास शतप्रतिशत बौद्धिक गप्पा मारण्याची क्षमता असलेल्या नानांशी संवाद साधताना कोणालाही, ‘हिमनगाचा एक दशांश भाग पाण्यावर असतो आणि उर्वरित पाण्याखाली’ या उक्तीची सहज जाणीव होऊन जावी, अशा विचारांची वेगवान झेप घेणाऱ्या, विलक्षण व्यक्तिमत्वाचे ते धनी होते. तालुकास्तरावर सुरु झालेल्या देशातील पहिल्या, कोकणातील असंख्य लेखक-पत्रकारांना पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी देणाऱ्या, दैनिकाचे नाना संस्थापक-संपादक होते. पाच-पंचवीस-पन्नास वर्षांपूर्वी आयुष्यात घडलेली, अनुभवलेली, पाहिलेली, जगलेली घटना सांगताना नानाजे बिनचूक बारकावे सांगायचे ते ऐकताना अक्षरशः मती गुंग व्हायची ! नाना गांधीवादी होते, परंतु सध्यस्थितीत तरुणांनी काय केले पाहिजे ?  यावरही ते तासंतास बोलत. नानांसोबतचे वैचारिक जगणे हा बौद्धिक आनंदाचा भाग असायचा.

कोकण विकासाचा ध्यास घेतलेल्या नानांनी, ‘मुंबईसह कोकणाचे सागरी राज्य झाले तरच कोकणचा विकास होऊ शकतो’ अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या बरोबरीने मांडली होती. कोकणातून दैनिक सुरु करण्यामागे ‘कोकणाचा भरीव विकास’ हाच त्यांचा दृष्टीकोन राहिला. ‘साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी’ नाना जगले. कोकणला झुकते माप देणाऱ्या घटनांचे भरभरून कौतुक नानांनी जसे केले तसे कोकणाच्या उपेक्षेबाबतच्या अनेक गंभीर, इतरांच्या नजरेतून सुटलेल्या प्रश्नांची, मुद्द्यांची मांडणीही अनेकदा केली. पर्यावरणाचे संतुलन साधूनच कोकणाचा विकास होणे आवश्यक आहे, या मताशी नाना कायम राहिले. सनसनाटी बातम्या म्हणजे ‘वृत्तपत्र’ ही नानांची पत्रकारीता कधीही नव्हती. ५२ वर्षांपूर्वी कोकणात वृत्तपत्र सुरू करणे हे अतिशय धाडसाचे काम होते. नानांनी दळणवळणाची अत्यंत तुटपुंजी साधने असताना, अनेकदा वीज, तांत्रिक बाबी नसताना त्याकाळी जनरेटर आणून वृत्तपत्र चालवले. मृत्यूपूर्वी दोन आठवडे अगोदर नानांनी, ‘कोकणातील नेत्यांची राज्यातील इतर राजकारणी नेते कोंडी करीत आहेत त्याचा कोकणातील सर्वांनी एकमताने धिक्कार करावा’ असे लिहिले होते.

चिपळुणातील परशुराम येथे प्राथमिक शिक्षण, मुंबई-गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. ख्यातनाम समीक्षक राम मनोहर यांच्याकडे काही काळ लेखनिक म्हणून काम करणाऱ्या नानांच्या मनात इथेच पत्रकारितेची बीजे रुजली. बी.ए.बी.एड. झाल्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये ‘शिक्षक’ म्हणून काम करताना ‘उष:काल’ नावचे भित्तीपत्रकही त्यांनी चालवले होते. खिशात अवघे दोनशे रुपये असताना २० जून १९६५ रोजी त्यांनी कोकणचे मुखपत्र दैनिक सागर सुरु केले. सागरमधील एन.एम.या टोपण नावाने तेच लिहित असलेला प्रवाहहा स्तंभ म्हणजे त्यांच्या अव्याहत विचारांचा वाहता प्रवाह होता. नानांनी दैनिकातल्या तपशिलातील वैविध्य जपले. अखंड वाचन आणि देश-विदेशातली डोळस भ्रमंती यातून कमावलेला व्यासंग हे नानांचं मुख्य भांडवल होतं. आखाती देशांसह जगभरात वावर, तेथील मराठी आणि कोकणी माणसांशी सततचा संपर्क, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयाचं वाचन यामुळे अनेक संदर्भ ते सहज देत. एखाद्या गोष्टीचा सखोल मागोवा घेणारा आणि अवतीभवतीच्या वातावरणाबद्दल संवेदनशील असणारा त्यांच्यातला संपादक त्यांनी सदैव जागा ठेवला होता.
कोकणचा चालता बोलता इतिहास असलेले नाना `परशुराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होते. या देवस्थानचा कायापालट त्यांच्याच काळात झालेला आहे. कोकणातील अनेक सामाजिक संस्था उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आमदार म्हणूनही त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. चिपळूण तालुक्यातील गावागावात रस्ते, धरणे, शाळा अशा विकासकामांचा वेगही तेव्हा जोरात होता. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, एमआयडीसीचे संचालक, रोजगार हमी योजनेचे कार्यकारिणी सदस्य, कोकण सिंचन अभ्यास मंडळाचे सदस्य, राज्य व केंद्र सरकारच्या माजी सैनिक सल्लागार समिती सदस्य अशा विविध जबाबदाऱ्यावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. चिपळूणला अखिल भारतीय मराठी पत्रकार संमेलन, पहिलं कोकण मराठी साहित्य संमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, साहित्य संमेलन, कोकण सांस्कृतिक अकादमीतर्फे १६ वर्षे कुमार गंधर्व संगीत संमेलने यांमुळे ‘कोकणाची सांस्कृतिक राजधानी’ असे अभिमानास्पद बिरूद त्यांच्याच काळात प्राप्त झाले. अभिजात कलेची आवड असणाऱया, अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेल्या नानांच्या भाषणांचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांची कायम गर्दी होत राहिली. चिपळूणात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील त्यांची भाषणे म्हणजे बौद्धिक मेजवानीच होती.
कोकण सांस्कृतिक अकादमीचे संस्थापक, अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे उद्गाते, विविध सामाजिक संस्थांचे आश्रयदाते, दैनिक सागरचे संपादक असे नानांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू होते, डोळस पत्रकारिता हा त्यातला मूळ पैलू होता, पत्रकारितेचं ते चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या सानिद्ध्यात घालवलेला क्षणनक्षण मौलिक आहे. कोकणच्या सांस्कृतिक, साहित्य, कला, पत्रकारिता, राजकीय क्षेत्रांत त्यांच्या जाण्याने कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अभ्यासोनि प्रकटावे... हे समर्थ रामदासांचे वचन शैक्षणिक आयुष्यात वाचनात, ऐकण्यात आल्यानंतर ते जगण्याचा प्रयत्न करीत असतानाच्या वाटेवर तेच वचन तंतोतंत जगणारे, आभाळाएवढ्या उंचीचे, कोकणचे बुद्धिवैभव ठरलेल्या स्वर्गीय नानांचे व्यक्तिमत्व जवळून तासंतास अभ्यासायला, अनुभवायला मिळाले, त्यांच्यासोबत जगता आले. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकालाच त्यांच्या वेगवान विचारांच्या प्रवाही सागरात, पवित्र जीवन जगण्याची प्रेरणा मिळालेय हे मात्र नक्की ! 

धीरज वाटेकर


३ ऑगस्ट : द्वितीय मासिक स्मृतिदिन अभिवादन !!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...