स्वर्गीय निसर्गसौंदर्याची
आणि साधनसंपत्तीची मुक्तहस्ते उधळण केलेला, विकासाची झेप घेण्याची प्रचंड क्षमता
असलेला कोकणाचा संपूर्ण प्रदेश आजही उपेक्षित, अविकसित
आहे. रोजगारासाठी मुंबईकडे डोळे लावलेल्या कोकणाची गेल्या १० वर्षांत सर्वदूर
चर्चाही होते आहे. चर्चेतून निघणाऱ्या मंथनानुसार चिंतन करून कोकणाचा पर्यटन विकास
करण्याचा प्रयत्नही होतो आहे, पण होत असलेला आणि होऊ घातलेला ‘विकास’ पाहाता
‘मंझील अभी बहोत दूर है’ असंच म्हणावंस वाटतंय ! विकास ही निरंतर चालणारी
प्रक्रिया असली तरी तिचा मुळातून प्रारंभ
करताना, विकसित होत असताना विचारात घ्यावीत अशी अनेक दालने ‘कोकण पर्यटन’ म्हणून
उपलब्ध आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला कोकणातील
पर्यटनाच्या काही नव्या - काही जुन्या, परंतु अजूनही पुरेसे लक्ष न दिलेल्या,
सक्षम दालनांचा हा अभ्यासपूर्ण वेध !
जाहिरातींवर करोडो रुपये उधळून आपल्याच विकासाचे गोडवे
गाताना सरकारने कोकण पर्यटनासारख्या
शाश्वत विकासाच्या जाहिरातींवरही खर्च करायला हवा. इतिहासाचे
साक्षीदार असलेले अनेक प्राचीन वाडे जिल्ह्यात आहेत, आपल्या परंपरा, संस्कृती उलगडतात, नव्या पिढीला प्रेरणा देत असतात. आपल्याला महत्व न कळलेल्या कितीतरी गोष्टी आहेत. ज्याच्या
नीटश्या मार्केटिंग मधून आपण पर्यटन वाढवू शकतो. हेमाडपंथीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेलं जिल्ह्यातील श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे १९०० वर्षानंतर आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतं. सुमारे ४०० चौ. मीटर क्षेत्रात संपूर्ण काळ्या पाषाणात कोरीवकाम केलेलं असं हे मंदिर आजही कसब्याचं पौराणिक महत्त्व टिकवून आहे. ही माहिती अगदी सहज फलकांद्वारे पर्यटकांपर्यंत जायला हवी. आपल्याकडील संकासूर, जाकडी, कोळी नृत्य आदींसाठी लागणाऱ्या
पेहेरावातील ‘कलाकार’ निवडक पर्यटनस्थळी उभारून त्यातूनही पर्यटनवृद्धी आकाराला
येऊ शकते, याकरिता शिस्तबद्ध प्रयत्न गरजेचे आहेत. केळशी, ता. दापोलीतील, निश्चित
कालमापन असलेल्या त्सुनामी निर्मित जगातील एकमेव वाळूची टेकडीची हानी झाली आहे. जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये ‘नॅरो गेज’ नेरळ-माथेरानची ‘टॉय ट्रेन’ वगळता, हजारों वर्षांचा इतिहास असलेल्या कोकणातील एकाही स्थळाचा समावेश नाही. कोकणचे पर्यटन जागतिक
नकाशावर नेण्याचा हा खूप सामर्थ्यशाली मार्ग आहे, ज्यातून परदेशी पर्यटक सहज आपल्याकडे
आकर्षित होईल. कोकणात अलीकडच्या काही वर्षांत झालेल्या संशोधनातून असंख्य
पुरातत्त्वीय उलगडे होऊ लागले आहेत. त्यासाठी “कोकण पर्यटन” म्हणून प्रयत्न व्हायला
हवेत ! कोकणचा
इतिहास तसा अजूनही पूर्णत: उजेडात आलेला नाही. मात्र गेल्या काही वर्षांत झालेले संशोधन मात्र बारकाईने अभ्यासले
की कोकणचे जागतिक महत्त्व सहज लक्षात येते. या स्थळांना आंतरराष्ट्रीय ‘मानके’ मिळवून देण्यासाठी काम करावे लागेल.
येथे येणाऱ्या
पर्यटकाला नक्की काय हवे ? ते आम्ही नीट समजून घेण्याची गरज आहे. शांतता, चांगले
खाद्य, स्वच्छता, करमणूक, राहाण्याची उत्तम व्यवस्था त्याला हवी असते. खरतर पर्यटन
हा शंभर टक्के नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. केरळ, गोवा, हिमाचल, उत्तराखंड,
अंदमान आदि देशी ठिकाणी फेरफटका मारला तर याची जाणीव व्हावी. या तुलनेत कोकण
कोठेही कमी नाही.
आज कोकणात
प्रत्येकजण त्याला हवा असलेला कोकणाचा पर्यटन विकास करू पाहतो आहे, ज्यांच्यासाठी
आणि ज्यांच्या बळावर पर्यटनाचे हे सारे काही सुरु आहे, त्या पर्यटकांना नक्की काय
हवे आहे ? याचा फारसा विचार होताना दिसत नाही, कोकण पर्यटन समृद्धीची अनेक नवी
दालने आपल्याला पर्यटकांकडे भेटतील !
अर्थात कोकण पर्यटनात कुठेच काही चांगले घडत नाही, असेही नाही ! मार्लेश्वर,
गणपतीपुळे, तारकर्ली, दिवेआगर, काशीद, जव्हार येथे पर्यटन म्हणून खूप काही चांगले
सुरु आहे. पण एवढ्याने ओकण पर्यटन पुढे जाणार नाही. आपल्या शेजारच्या कर्नाटकत आपण
राज्यभर कुठेही फिरा, आपल्याला काही महत्वाच्या ठिकाणी, मुख्य मार्गावर ‘आपण येथे
आहात ; u are here’ असे
सांगणारी आणि तिथून आजूबाजूला साधारणतः ५०-१०० किलोमीटरच्या परिघात किती भरगच्च पर्यटन
समृद्धी आहे ? याची जाणीव करून देणारी अगदी मोठी होर्डींग्स दिसतील ! ती
होर्डींग्स पाहाताना आपल्या मनात सहजच पर्यटक म्हणून अनेक विचार येऊन जातील, बरच
काही पाहायचं राहून गेलं म्हणून आपले मन चुकचुकेल, आपण पुन्हा इथे आल्यावर काय-काय
पाहायचं ? याचे नियोजनही करू. आज पर्यटकांना असे सारे सहज हवे आहे, आपल्याकडे
‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ’ नावाने
पर्यटन विकास काम वगेरे चालते, असे म्हणतात. त्यांना अशी होर्डींग्स उभारण्यासाठी कोणी
अडवलंय ? त्यांनी पुढाकार घ्यायला काय हरकत आहे ? पण मग आपल्याकडे यात शासनाच्या
इतर अनेक विभागांच्या परवानगीची, सहकार्याची गरज वगेरे लागते, त्यात कामे नीट होत
नाहीत, मग चिखलफेक सुरु होते, अखेर ‘पर्यटन विकास’ हा मूळ मुद्दाच बाजूला राहतो.
कोकणात विकास कामाची अंदाजपत्रके कोट्यानुकोटींची उड्डाणे घेत आहेत, हे आपण पाहतो,
परंतु जी यंत्रणा, व्यवस्था प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी ही विकासकामे पूर्ण करते,
तिला ‘पर्यटन दृष्टी किती असते ?’ की आम्ही फक्त ‘ठेकेदारी काम’ म्हणून याकडे
पाहतो ? पुढेही पाहणार आहोत ? समुद्रकिनाऱ्यावरील कामे, किल्ल्यांची, हेरीटेजची डागडुजी करताना काम
करणारा आणि करून घेणारा त्याकडे फक्त ‘ठेकेदारी काम’ म्हणून पाहतो, मग अशा पर्यटन
विकासाच्या कामांचा पुढे अल्पकाळात पुरता बोजवारा उडतो, पर्यटन दालन म्हणून विचार करून काम करण्याची नवी संधी इथे
आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्याचे सक्षमीककरण करताना कल्पकतेने,
पर्यटकांच्या रस्त्यावरील गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून काही नियोजन वगेरे करण्याचा
विचार आम्ही या शतकात करणार आहोत की नाही ? एखाद्या ठिकाणी ते करून यशस्वी झाल्यास
कोकण पर्यटन विकासाला नवे दालन उपलब्ध होईल. कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग
म्हणजे आपला ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६’ अजूनही तो पूर्ण होतो आहे, या
राष्ट्रीय महामार्गावर आपण किमान सध्या, एखाद्या गावात शे-पाचशे वर्षांपूर्वीचे
प्राचीन कोकण अगदी जसेच्या-तसे, धूळ उडविणाऱ्या मातीच्या रस्त्या-बैलगाडीसह
पर्यटकांना अनुभवायला दिले तर किती मज्जा येईल ! त्या गावात, खानपान, जगण्याच्या
काही सवयी, मनोरंजनाची साधनेही तेव्हाचीच असतील ! काय हरकत आहे ? अशा नव्या
दालनांचा विचार करायला ? हा विचार पुढे नेणाऱ्या गावाला शासनाने विशेष ‘प्रोत्साहन
योजना’ जाहीर करायला काय हरकत आहे ? कोकणात कुठेही फिरा, अगदी एका हाताच्या बोटावरही
मोजता येणार नाहीत इतकी कमी हॉटेल्स कोकणी खाद्यसंस्कृती जपताना आढळतील, त्यासाठी
आम्ही पर्यटकांना ‘कोकणी कृषी पर्यटन केंद्र’ असा पर्याय सुचवितो, महामार्गावरील
हॉटेलात कोकणच्या पदार्थांचे ब्रॅडिंग करायला काय अडचण आहे ? कोकणाचे पदार्थ खपत
नाहीत, हे फारसे पटणारे नाही. जगभरात सर्वत्र त्या-त्या ठिकाणाचे पदार्थ मिळतात.
लांब कशाला पुणे-सोलापूर मार्गावर शेंगापोळी, शेंगाचटणी, भरलं वांग - बाजरीची
भाकरी, कोल्हापुरात कुठेही जा तांबडा-पांढरा रस्सा सहज मिळतो. स्थानिक पदार्थांचे
उल्लेख अनेकदा स्वतंत्रपणे मेन्यूकार्डवरही असतात. आम्हाला कोकणात सर्वत्र असं
काही सांगायला मिळणार आहे का ? त्याला अजून किती वर्षे वाट पाहावी लागणार आहे
? प्रयत्न मनापासून केले तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळते, आम्ही एकत्र येत
नाही, आम्हाला नवीन काही करायची, शोधायची गरज वाटत नाही, आम्ही आळशी आहोत, बहुधा हेच
उत्तर असावे.
‘निसर्ग
वाचवा’, म्हणून कोकणात आम्ही नेहमी बेंबीच्या देठापासून ओरडतो, आणि त्याच कोकणात
रोज काळोख्या रात्री विविध घाटांतून किमान ४० ते ४५ ट्रक भरून लाकूड तोडून नेले
जाते. आम्ही हे सारे गेली १५ हून अधिक वर्षे, पत्रकारितेत वावरायला लागल्यापासून
पाहातो आहोत. आमच्याकडे ‘वन’ नावाचे ‘खाते’ आहे. अलिकडे आम्ही वृक्ष लागवडीची
‘कोट्यानुकोटी’ उड्डाणे घेत आहोत आणि तोडणाऱ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहोत.
याच दुर्लक्षामुळे ‘लागवड उपक्रम’ यशस्वी होत नाहीत, कुंपणाबाहेरचे लोक
आमच्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींची थट्टा उडवितात, आम्हाला ट्रकभर
वृक्षतोडीची रसभरीत वर्णने ऐकवतात, आणि आमचे मायबाप सरकार ‘कोट्यानुकोटी’ उड्डाणे
घेण्यात धन्यता मानते. जेव्हा हे काळोख्या रात्रीतील ट्रक पुराण संपेल, त्या नंतर
वृक्ष लागवड मोहिम सहज वेग घेईल. कोकण अजून हिरवे गार होईल, पर्यटक-पर्यटन वाढेल नवे
दालन उपलब्ध होईल. रत्नागिरी जिल्ह्यात ५०० हून अधिक
कातळशिल्पे आढळून आली आहेत, यातली बरीचशी खाजगी जागेत आहेत. पर्यटन म्हणून शासनाची
भूमिका इथे महत्वाची आहे. अजिंठा,
वेरूळ
दर्जाची देखणी, अप्रतिम लेणी दापोली
तालुक्यात पन्हाळेकाजी येथे आहेत, या लेण्यांकडे जायला आजही चांगला पक्का डांबरी
रस्ता नाही. पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत.
कोकणातील बंदरांच्या माध्यमातून पूर्वी मुंबई, जयगड, रत्नागीरी, मुसाकाझी, विजयदूर्ग, देवगड
आणि पणजी या प्रमुख बंदरांतून ही प्रवासी वाहतूक चालत असे. सन १९८८ ला बंद झालेली,
प्रवासी वाहतूक आणि व्यावसायिक शिप वाहतूक हे दोन स्वतंत्र विषय आहेत, त्यांच्या
विकासाकरीता स्वतंत्र नियोजन करायला हवेय ! दाभोळ हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली
बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच
लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून
असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत
एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३००
वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील
बोस्टन येथे ‘विश्व गॅझेटिअर’ प्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक
वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. आम्ही आमच्या विकासासाठी हे संदर्भ वापरणार केव्हा ?
यावर नीट विचार झाला तर कोकणचे पर्यटन कोठे जाईल? वेगळे सांगायला नको. या बंदरात
शेकडो मगरी आहेत, इथे ‘मगर विकास-पर्यटन प्रकल्प’ साकारता येईल. या खाडीत अनेक
नैसर्गिक बेटे आहेत, तिच्यावर आज नियमानुसार अनेकांनी मालकीहक्क वगेरे सांगितला
असेलच ! तो आपला राजकीय स्थायीभाव आहे. परंतु यातील काही गूढरम्य बेटांवर उत्खनन
केले तर पुरावशेष मिळू शकतात, पण याकडे पाहतो कोण ? सारी प्राचीनता ज्यांनी विचारपूर्वक
अभ्यासाला हवी, त्या पुरातत्व खात्याला, तो विषय शिकविला जाणाऱ्या व्यवस्थांना
स्वतःहून काहीही करायचे नाही आणि जे कोणी हौशी अभासक-संशोधक स्वत:ची पदरमोड करून
हे सारे करू पाहात आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतेच असेही नाही. याच खाडीत श्रीपरशुराम
मंदिर परिसर ते गोवळकोट असा रोपवे तयार व्हावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत, त्याच्या
अभ्यासासाठी शासनाने १५ लाखांचा निधी दिला आहे, हे यशस्वी झाले तर एक नवे दालन
सुरूच होईल.
गोव्यात ‘मांडवी’ आणि ‘झुआरी’ नदीवर पर्यटन उद्योगाचा डोलारा उभा आहे, मग
चेरापुंजी खालोखाल पर्जन्यमान असलेल्या आम्हाला काय अवघड आहे ? एकटय़ा रत्नागिरी
जिल्ह्यात पाच प्रमुख नद्या असून त्यांच्या शेवटला दाभोळ, बाणकोट, भाटय़ेसारख्या
मोठय़ा खाडय़ा आहेत. गोव्याप्रमाणे पर्यटन व्यवसाय आणि व्यावसायिक बंदरांकरीता
नियोजनबद्ध पद्धतीने यांचा वापर केल्यास कोकणाच्या विकासाला वेळ लागणार नाही. कोकणच्या
मागील पन्नास वर्षाच्या इतिहासाचा अभ्यास, आगामी पन्नास वर्षाचा वेध घेवून
परिपूर्ण नियोजन करणे अत्यावश्यक आहे. पांढरी वाळू आणि निळाशार
समुद्र हे आपल्या समुद्राचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे, त्याचे योग्य मार्केटिंग
व्हायला हवे, देश-विदेशातील पर्यटक आला पाहिजे, संधीचे दालन इथे उपलब्ध आहे. संस्कृती, निसर्ग, इतिहास, देवालये यांचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात अवघ्या
६० ते १०० किमीच्या पट्यात ‘समुद्र, डोंगर, हिलस्टेशन, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरीटेज’ अशी
जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. याची नीट प्रसिद्धी केली, जागतिक दर्जाच्या पर्यटन
सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून गावागावात निर्माण केल्या तर कोट्यवधी
पर्यटक कोकणात येतील. सागरी पर्यटन, डॉल्फिन सफारी, स्नॉर्कलिंग, बिच टुरिझम, बॅकवॉटर टुरिझम, कृषी व ग्रामीण पर्यटन, सह्यादीतील इको टुरिझम, अॅडव्हेंचर टुरिझम, जंगल सफारी सारखी दालने
कोकणाला खुणावत आहेत. कृषीच्या दृष्टीने कोकण समृद्ध आहे. इथल्या हापूसची १०००
कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल आहे, योग्य माकेर्टिंग, तंत्रज्ञान, प्रशिक्षणाची जोड दिली तर
यात प्रचंड वाढ होऊ शकते. कोकणच्या किनारपट्टीत वालुकामय परंतु खडकाळ बीचेसची संख्या खूप म्हणजे
शंभरच्यावर आहे, अशा ठिकाणी काही वेगळे पर्यटन प्रकल्प राबविता येतील का ? यावर
विचार व्हायला हवा. ‘कोकणात येवा, मेवा चाखून जावा’, नारळ, मसाले, काजू, कोकम, केळी, अननस, वनौषधी ही श्रीमंत पिकेही पर्यटनपूरक आहेत, सर्वाना एकत्रित येऊन काम करावे
लागेल.
कोकणात पर्यटन क्षेत्रात क्षमता असूनही मागासलेपण आहे, रस्ते, रेल्वे,
विमान, बंदरे आदी पायाभूत सुविधांचीही वानवा आहे, हवाई, बंदर प्रवास हा आमचा विषयच
नाही असे मुळात आमचेच वागणे आहे. कोकणातून सर्वत्र हवाई, बंदर प्रवास सुरु व्हावा
म्हणून आम्ही कोकणवासियच आग्रही नाही, आम्हाला त्याची गरजच वाटत नाही, आम्ही जिला
‘कोकण रेल्वे’ म्हणतो, ती आम्हालाच हवी होती, म्हणून झाली का ? मला प्रश्नच आहे.
नावात ‘कोकण’ काय आले आम्ही सुखावलो, इतकच ! कोकणात पायाभूत सोईसुविधा मिळाल्या तर
पर्यटन विकासाची अनेक नवी दालने सहज खुलतील, इतकी समृद्धी ठासून भरलेली आहे.
धावत्या युगात काळही धावतोय, जगाची समीकरणे रोज
बदलताहेत, वेगेवेगळे प्रवाह येताहेत, या साऱ्या प्रवासात, लालमातीचा टिळा कपाळी
लावून पराक्रमाची, मांगल्याची, सृष्टिसौंदर्याची,
इतिहासाची ज्योत तेवत ठेवणारा माझा कोकण या साऱ्या दालनांच्या माध्यमातून आम्हा
सुजाण कोकणवासियांना खुणावतोय, त्याच्या आवाजाची गाज ऐकून आम्ही कार्यरत झालो, तर
‘कोकण पर्यटन’ दालन एक स्वतंत्र ब्रॅन्ड बनेल !
धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
(३५ वर्षे जुने साप्ताहिक "किसान साद" यांच्या १५ ऑगस्ट २०१७ रोजी प्रकाशित होणाऱ्या "स्वातंत्र्याची सप्तपदी" या विशेषांकासाठी 'कोकण पर्यटन' या विषयावर लिहिलेला लेख !)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा