मे महिन्याच्या
शेवटच्या आठवड्यात, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील काळवली गावात अवघ्या अडीच
वर्षांच्या चिमुरडया ‘श्रावणी राजेश पार्टे’चा विंचूदंशानंतर उपचाराविनाच दुर्दैवी
मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे घरात आनंदाने वावरणाऱ्या श्रावणीला अचानक काहीतरी चावले
आणि वेदनांमुळे ती जोरजोरात रडू-ओरडू लागली. घरातील लोकांना तिच्या शरीरावर विंचूदंशाच्या
खुणा दिसल्या, तातडीने तिला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले गेले.
तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये
डॉक्टरांच्या कमतरतेमुळे उपचारार्थ प्रवासात असताना उपचाराविनाच तिचा मृत्यू झाला आणि
अवकळा आलेल्या आरोग्यव्यवस्थेवर समाजमनाने आसूड ओढायला सुरुवात केली. विंचूदंशावर
प्रतिलस उपलब्ध असताना निव्वळ निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या या शोकांतिकांना जबाबदार
कोण ? त्यावर कारवाई कधी आणि काय होणार ? असे प्रश्न त्यामुळे निर्माण झालेत.
या घटनेत पोलादपूर
येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये तिच्यावर उपचार करण्यासाठी विंचूदंशावरील प्रतिलस इंजेक्शन
उपलब्ध नव्हते. महाड येथील डॉक्तरांनी ‘वयाने व प्रकृतीने खुपच लहान असल्याचे कारण
देऊन एवढया लहान बालिकेवर विंचूदंशाचे उपचार करण्यासंदर्भात असमर्थता दर्शवित
माणगाव उपजिल्हा रूग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. माणगावला जात असतानाच उपचाराविनाच तिचा मृत्यू झाला. शासकीयस्तरावर
सर्वदूर डॉक्टरांची वानवा आहे आणि त्यामुळे बोगस डॉक्टरांचे फावते, म्हणूनच कदाचित
स्थानिकांना अनेकदा बोगस डॉक्टरांची बाजू घ्यायला आवडत असावे. दुर्गम भागातील
आरोग्यकेंद्रात जर विंचूदंशावर उपचार होऊ शकत नसतील तर या केंद्रांची आवश्यकता ती
काय ? अर्थात या साऱ्याला नागरिकांचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षही तितकेच
कारणीभूत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेसंदर्भात सर्वसामान्यांत कमालीची चीड आहे.
गोरगरीबांकडून अधिक पैशाची इथे नेहमीच लुट होत असल्याची ओरड होत असते. वर्षानुवर्षे
हे असेच सुरु आहे. भारतात ब्रिटीश राजवटीपासून आरोग्य सेवा पद्धती सुरु झाली,
तत्पूर्वी आयुर्वेदीय ‘वैद्य’ परंपरा होती, आजही आहे. ब्रिटीशकालीन आरोग्य
यंत्रणेचे उद्दिष्ट सैनिक आणि युरोपियन नागरिकांना सेवा देणे हे होते. दरम्यान
त्यांनी भारतातील प्लेग, कॉलरा, देवी या साठींवर उपचार सुरु केले. हे औषधोपचार
पाश्चात्य पद्धतीचे होते.कालांतराने देशात सन १९४० साली आरोग्यसेवा सुरु झाली आणि
सन १९४२ साली पश्चिम बंगाल राज्यात कलकत्याजवळ ‘शिंगुर’ गावी देशातील पहिले
प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले. तेव्हापासून देशभर प्राथमिक आरोग्य
केंद्रांच्या माध्यमातून काम सुरु आहे, तरीही ही केंद्रे मानवी चुकांनी ग्रासलेत,
आणि त्यामुळे आजही सक्षम नाहीत. वास्तविकत: प्राथमिक आरोग्य केंद्रांना रोज ४ तास सकाळी व २ तास संध्याकाळी
वैद्यकीय बाहयरुग्ण सेवा, आंतररुग्ण सेवा (६ बेड) पुरविणे बंधनकारक आहे. जखमा व
अपघात यांचे योग्य व्यवस्थापन व प्रथमोपचार, संदर्भसेवेपूर्वी रुग्णाला जीविताचे धोक्याबाहेर आणणे, श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंश
व इतर स्थितीत २४ तास तातडीची सेवा देण्याचे बंधन आहे. तरीही हे घडत नाही, कोणी
काही बोलत नाही, या साऱ्यांत नाहक बळी जात आहेत.
याचवर्षी
फेब्रुवारी महिन्यात घराच्या शेजारी मैत्रिणीकडे
अभ्यासासाठी गेलेल्या १४ वर्षे वयाच्या श्रध्दा विठ्ठल गुरव या मुलीचा घरी परतत
असताना अंधारात पायवाटेवर विंचूदंश झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर
पालकांनी सर्वप्रथम प्रथमोपचार आणि नंतर तिला अधिक उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संगमेश्वर
तालुक्यातील २५८ लोकांना एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत विंचूदंश
झाल्याची नोंद देवरुखच्या ग्रामीण रुग्णालयात आहे. गेल्या वर्षी
ऑक्टोबर महिन्यात, पालघर जिल्ह्यातील आदिवासी
आश्रमशाळेतील गत दहा वर्षांत झालेल्या तब्बल ७४३
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूत ‘विंचूदंश’ हे एक प्रमुख कारण होते. यातील ६०
टक्के विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नव्हते. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात लावणीसह शेतीची
कामे सुरू झाल्याच्या काळात सर्प व विंचूदंशाचे प्रमाण अधिक वाढते. जिल्हा परिषद
आरोग्य विभागातील माहितीनुसार जिल्ह्यात २०१३-१४ यावर्षी विंचूदंशाचे ३४०५ रुग्ण,
तर सर्पदंशाचे १२१३ रुग्ण दाखल
झाले होते. सन २०१४ साली जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक
आरोग्य केंद्रात १७६ विंचू, १३६ श्वानदंश, तर १० जणांना सर्पदंश
झाल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने एकही रुग्ण दगावला नाही. सन २०१५ मध्ये मे ते जून या कालावधीत
बिरवाडी-महाड भागात ५१ जणांना विंचूदंशाची बाधा झाली होती. विंचूदंश, सर्पदंश
झाल्यानंतर आवश्यक असणारे उपचार ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याची ओरड होत होती, रुग्ण
दगावण्याचे प्रमाण तेव्हाही वाढले होते.
महाराष्ट्रात बहुतेक
ठिकाणी सापडणाऱ्या काळ्या विंचूपेक्षा कोकणात सापडणारा लाल विंचू जास्त घातक असून
रुग्ण त्यामुळे दगावू शकतो. एप्रिल, मे
आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये या विंचूदंशाचे प्रमाण कोकणात सर्वाधिक आहे. सातत्याने
बदलत जाणारे हवामान, वाढता उष्मा यामुळे विंचू बाहेर पडण्याच्या प्रमाणात वाढ होऊन
दंशाचे प्रमाणही वाढते. कडक उष्मा वातावरणात विशेष काळजी घेण्याची गरज असते. ग्रामीण भागातील परिसरात होणा-या विंचूदंश, श्वानदंश व सर्पदंश अशा
रुग्णांवर वेळेत उपचार करून रुग्णांचा जीव वाचवावा लागतो. अलिकडच्या संशोधनामुळे विंचवाचा
दंश म्हणजे यमाचीच भेट अशी खात्री असणाऱ्या कोकणात विंचूदंशाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चाळीस टक्क्यांवरून एक
टक्क्यापर्यंत आले आहे. मात्र तरीही निव्वळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे विंचूदंश
व सर्पदंशाने आजही रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत, ही बाब खूपच चिंताजनक आहे, यावर
स्थानिक पातळीवर जबाबदार समाजघटकांनी ठोस मार्क काढायलाच हवा.
धीरज वाटेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा