शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

नियोजनशून्य ‘ऑनलाईन’ पेपर तपासणी निकालांच्या मुळावर !

मागच्या १८ जुलैला १६० वर्षे पूर्ण केलेल्या (स्थापना १८५७), भारतातल्या सर्वात जुन्या विद्यापीठांच्या यादीमध्ये तिसरे असलेल्या, जगप्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थान मुंबई विद्यापिठाचे बहुतेक सर्व  निकाल यावर्षी रखडलेत ! विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंट, पेपर तपासणी उशिरा सुरु केल्याने तृतीय वर्ष बीए, बीएससी, कॉमर्स, व्यावसायिक पदवी परीक्षेचे, साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर होणारे निकाल उशिरा जाहीर होणार आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यापीठातल्या लाखो विद्यार्थ्यांना बसला असून  नियोजनशून्य ‘ऑनलाईन’ पेपर तपासणी निकालांच्या मुळावर आली आहे.

राज्याचे कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनाही या विषयात लक्ष घालून सूचना द्याव्या लागल्या, झटपट निकालांसाठी विद्यापीठाने यावर्षीपासून उचललेले "ऑनलाईन' तपासणीचे "टेक्‍नोसॅव्ही' पाऊल स्वागतार्ह असले तरीही परंतु ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासणी यशस्वी झाली नसल्याने हे घडले आहे. एकूण १७ लाख उत्तरपत्रिकांपैकी सुमारे नऊ लाख उत्तरपत्रिका तपासून झाल्या असून उर्वरित ८ लाख उत्तरपत्रिका तपासण्यासाठी नागपूर विद्यापीठाचीही मदत घेतली जात आहे. वाणिज्य अभ्यासक्रमातील दोन लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ करून देत आहे. वास्तविकत: निकालाला होणारी दिरंगाई, प्रक्रियतील गोंधळ टाळण्यासाठीच विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिल २०१७ मध्ये सर्व शाखांच्या उत्तर पत्रिकांची तपासणी ऑनलाईन करण्याचे जाहीर केले होते. परंतु दुर्दैवाने या पेपर तपासणी पद्धतीचा बोजवारा उडाला आणि निकाल रेंगाळले. उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेच्या सुरुवातीला उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण न झाल्याने, इतर तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीपासूनच उशीर होत गेला आहे. ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासणी कार्यपद्धतीचा अभ्यास न केल्यानेच मुंबई विद्यापीठ नापास झाल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. नवीन पद्धत आणताना सर्वसाधारणपणे सहा महिने आधीपासून केली जाणारी तयारी, पडताळणी न करता घेतलेले थेट निर्णय यामुळे हे घडले आहे.


या विद्यापीठातून दरवर्षी सरासरी १७ लाख विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडतात. पेपर तपासणीचे कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवातीला प्रतिसादच न मिळाल्याने दोनदा राबवावी लागली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी उशिरा सुरू झाली. पुढे पेपर तपासणीचे काम ज्या कंपनीला दिले गेले त्यांनी ‘टेस्ट पेपर चेकिंग’ प्रक्रिया घाईघाईत पूर्ण केल्याने, प्राध्यापकांना ऑनलाईन पेपर तपासणीबाबतचे नीटसे ज्ञान नसल्याने रोज नवनवीन समस्या उद्भवत असल्याचीही चर्चा आहे. राज्यासह बाहेरील विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या आहेत. काही विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. तरीही मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे पदवीचे निकाल जाहीर झालेले नसल्याने आता वर्ष वाया जाते की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई विद्यापीठातल्या काही शिक्षकांनी ‘प्रॉक्सी अटेंडन्स’ टाकून चक्क पीएचडीच्या विद्यार्थ्यांवर पेपर तपासणीचे काम सोपवल्याचाही नवा आरोप होतो आहे. भारतातील सगळ्या विद्यापीठांचे निकाल लागले तरीही मुंबई विद्यापीठ अजूनही पेपर तपासते आहे. यंदा विद्यापीठाने ‘ऑन स्क्रीन मार्किंग’ प्रणाली (ओ.एस.एम.) अवलंबिली, काहीतरी वेगळे घडविण्याच्या प्रयत्नात यंदा समस्या अधिक जटील बनली आहे. एकतर्फी निर्णय, ऑनलाईन पेपर तपासणीचा प्रयोग न करणे, प्राध्यापकांच्या प्रशिक्षणात त्रुटी यांचा फटका विद्यापीठाला बसला आहे.  

एकंदर परिस्थिती पाहाता निकाल जाहीर व्हायला ऑगस्ट / सप्टेंबर महिना लागण्याची भीती आहे. त्यामुळे नियोजन केलेल्या काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाला मुकावे लागेल, पदव्युत्तर शिक्षणाचे उशीरा प्रवेश, नोकरी करू पाहणाऱ्यांचे हाल, निकालाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. वास्तविकत: ही पेपर तपासणी पद्धत पूर्वीपेक्षा चांगली आहे, यात पुनर्मुल्यांकनाचे निकाल लवकर लागण्याची अधिक शक्यता आहे, उत्तरपत्रिका तपासताना होणाऱ्या मानवी चुका यात होणार नाहीत हे फायदे आहेत, पण या साऱ्याच्या नियोजनात गफलत झाल्याने विद्यार्थी मात्र पुरते हैराण आहेत.   

धीरज वाटेकर                                                                              dheerajwatekar@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...