शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

कुपनलिकेतील दुर्दैवी मृत्यू !

गत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शिर्डी नजीकच्या कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर गावी बोअरवेलमध्ये पडलेल्या सात वर्षीय साई बारहाते या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तत्पूर्वी पुणे येथून बोलाविण्यात आलेल्या एनडीआरएफच्या पथकाने, सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला बोअरवेलच्या दोन्ही बाजुनी खड्डा खोदून बाहेर काढले. बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठीही हलवले परंतु तिथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशात सतत ठराविक अंतराने कुठे-ना-कुठे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. सुरुवातीच्या काळात या प्रकारांना ‘प्रिन्स’ प्रसिद्धीही मिळाली, परंतु कुपनलिका (बोअरवेल) खोदल्यानंतर तिला पाणी न लागल्यास ती मुजविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना आणि गावागावात जबाबदार ‘शासनप्रतिनिधी-लोकप्रतिनिधी-नेते-कार्यकर्ते’ वगैरे असताना या घटना थांबत नाहीत, ही बाब समाजाच्या बोथट  मानसिकतेवरही बोट ठेवते आहे.     

पिण्याच्या पाण्यासाठी, शेती किंवा अन्य वापरासाठी विंधनविहीरी, कुपनलिका खोदल्या जातात. त्यातील  अयशस्वी व वापरात नसलेल्या विंधन विहीरी, कुपनलिका या उघडया राहिल्यामुळे अपघात घडतात.  बोअरवेल खोदण्याची कृती करण्यापूर्वी परिसराच्या मालकाने त्या-त्या भागातील प्रशासकीय अधिकारी यांना लेखी स्वरूपात कळविणे, खोदकाम करणाऱ्या एजन्सीjजची जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी असणे, बांधकामाच्या ठिकाणी सूचनाफलक लावणे, बोअरवेलभोवती काटेरी कुंपण, योग्य अडथळा तयार करणे आदि उपाय वास्तविक करायला हवेत. नव्याने खणण्यात आलेल्या कुपनलिका, विंधनविहीरी वापर होईपर्यंत योग्य आकाराची झाकणे लावून बंद करण्याची गरज असते. वापरात नसलेल्या कुपनलिका, विंधनविहीरीच्या निकामी खडड्यामध्ये वाळू व दगडगोटे भरुन कोणतीही पोकळी राहणार नाही, अशा पध्दतीने सिमेंट कॉन्क्रीटने भरण्याची वा बुजविण्याची दक्षता संबंधित मालकाने घेणे गरजेचे असते. अशा कुपनलिका, विंधनविहीरीमुळे दुर्घटना घडू नये यासाठी नागरिकांनी जागरुक व सावध असणे गरजेचे आहे. आपल्या गावात, परिसरात अशा धोकादायक विहीरी, कुपनलिका आढळून आल्यास एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायत यांचेशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. आवश्यकता वाटल्यास ग्रामसभा, विभागसभा याद्वारे या संदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्याचा पर्यायही उपलब्ध असतो.

अलिकडेच गेवराई भागातही कूपनलिकेमध्ये अडकलेल्या, शेतविहिरीवर काम करणाऱ्या नागू मस्के या मजुराचा दोन वर्षांचा मुलगा संतोष यास तब्बल सोळा तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले, पण तोपर्यंत तो मृत झालेला होता. संतोषचा मृत्यू गुदमरून झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनानंतर जाहीर केले.  या प्रकरणी मुलाच्या वडीलांच्या फिर्यादीवरून शेतमालक जानकीराम रंगनाथ जोशी यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे कुपनलिकेचे झाकण उघडे ठेवून मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हाही पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. मे २०१६ मध्ये शिरुर तालुक्यातील जुनामळा येथे बोअरवेलमध्ये अडकलेल्या सुनिल मोरे या चिमुरड्यालाही एनडीआरएफ, अग्निशामक दल, वैद्यकिय पथक यांच्या प्रयत्नांनी तब्बल ३१ तास ३५ मिनिटानंतर बाहेर काढण्यात यश आले, मात्र उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याची प्राणज्योत मालवली. शेतात खेळत असताना सुनिल मोरे हा पाय घसरुन वीस फुट खोल असणा-या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याचवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील करसगढ गावात एका ४ वर्षाचा मुलगा ५०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. त्याचवर्षी मार्च महिन्यात गिरगावातील फणसवाडी भागात जव्हार मॅन्शनमधील ४० फूट खोल बोअरवेलमध्ये दोन व्यक्ती पडल्या असताना, त्यांना प्रयत्नपूर्वक बाहेर काढल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मध्यंतरी दौंड तालुक्यातील mस्वामी चिंचोली येथेही कूपनलिकेत पडलेल्या ऊसतोडणी कामगाराच्या चार वर्षांच्या मुलाला वाचविण्यात सुदैवाने ग्रामस्थांना दोन तासांच्या प्रयत्नानंतर यश आले. यापूर्वी देशात ग्वाल्हेरमध्ये तीन वर्षांचा मुलगा, कानपूरमध्ये अल्पवयीन मुलगी, नालगोंडामध्ये बालिकामेडकमध्ये बालक, वारांगण-आंध्रप्रदेशमध्ये दीड वर्षाच्या महेशचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.  सन २०१४ साली फेब्रुवारी महिन्यात श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव गावातील बोअरवेलमध्ये अडकलेल्या, विलास निकम या ऊस तोडणी कामगाराच्या १८ महिन्यांच्या चिमुरड्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला खूप प्रयत्नांती यश आले होते. त्याचवर्षी डिसेंबर महिन्यात औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथील अवघ्या चार वर्षांचा ऋतुराज ढंगारे खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते. याचा विचार करून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंगसुळीत भागात तरुणांनी ७५ बिनकामी कुपनलिका बूजविल्या, याचा दुसरा अर्थ इतक्या मोठ्या प्रमाणात त्या अनेकांनी तशाच उघड्या टाकल्या होत्या.

अशा साऱ्या प्रकरणांत अनेकदा लहान मुलांचा निष्कारण जीव तर जातोच आहे, परंतु त्या मुलांना बाहेर काढण्यासाठी जे बचाव कार्य शासनाला करावे लागते त्यामध्ये फार मोठी धावपळ होत असते. अशी घटना घडल्यानंतर संबंधित मालकाविरुद्द गुन्हा दाखल करतानाच असे अपघात टाळण्यासाठी कुपनलिकेला झाकण बसविण्याची जबाबदारी सक्तीने कुपनलिका खोदून देणाऱ्या एजन्सीवर सोपविण्याची गरज आहे, कुपनलिका घेणारे शेतकरी अशिक्षित, कायद्याविषयी अनभिज्ञ असू शकतात. त्यामुळे याबाबतीत बोअरवेल्स एजन्सीज्ना हे झाकण बसविण्याची सक्ती करणे आवश्यक आहे. विविध विकासकामे होत असताना गावातील स्थानिक नेत्यांचे त्या कामांकडे ‘बारीक’ लक्ष असते. गावागावात खोदल्या गेलेल्या निकामी बोअरवेल बुजविण्यासाठी स्थानिक नेते, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांना सहज लक्ष ठेवणे सोपे आहे. आपल्या देशाला विकसित देश बनव्याचे असेल तर आपल्याला सर्वांनाच छोट्या-छोट्या विषयांत कायदा पाळावा लागेल.


धीरज वाटेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...