सोमवार, १३ एप्रिल, २०२०

हा डाव साधलेला...!


करोना लॉकडाऊन मधील सायंकाळ (१२ एप्रिल). सूर्यास्त होऊन गेलेला. पक्ष्यांच्या कर्कश्श कलकलाटाने लेखनातली तंद्री भंगली. बाहेर पाहिलं तर जवळच्या चाफ्याच्या झाडावर शेजारचं मांजर चढलेलं. काळजाचा ठोकाचं चुकला. ताड्कन खुर्चीतनं उठलो नि मांजराच्या दिशेने सरसावलो. मांजर काही खाली उतरेना. मिजाशीत असलेलं. इच्छा नसताना काठीनं एक फटका दिल्यावर पळालं खरं ! पण तोवर खूप उशीर झालेला. रेड व्हेंटेड बुलबुलची (लाल बुडाचा बुलबुल) तीन अंडी त्याच्याकडून फस्त झालेली. अतीव दु:ख झालं. लेखनातल्या तंद्रीनं पक्ष्यांचा कलकला समजायला मलाच उशीर झालेला. गेल्यावर्षी कावळ्याने आणि यावर्षी मांजराने, हा डाव साधलेला...! 

       खूपसं उंचीवर गेलेलं म्हणून गेल्या पावसाळ्यात पाच फुटांवर चाफा तोडलेला. तिथूनच लगेच तो चारही दिशांना फुटला. नववर्षी चांगला वाढून एव्हाना हिरव्यागार पानांनी गच्च भरलेला. त्याच्या बेचकीतल्या जागा बघून बुलबुलनं बहुदा याला निवडलेलं. न राहवून रात्री चाफ्याच्या झाडाकडं पाहिलं. पाच फुटाचं ते झाडंही आता मेल्यागत झालेलं. पानंही स्तब्ध ! लालबुड्या बुलबुलच्या (याच्या शेपटीच्या बुडाखाली लाल रंगाचा डाग असतो) वेदना त्यांनाही जाणवल्या असतील. लवकरच चाफ्याच्या अंगाखांद्या-फांद्यांवरच्या घरट्यात छानसं बालपण नांदणार होतं. चाफ्यानंही त्यांच्यासाठी म्हणून स्वप्न पहिली असतीलं. गेल्यावर्षी जास्वंदाची आणि यंदा चाफ्याची सारी स्वप्न एका क्षणात मातीमोल झालेली. अंडी उबवायला लागणाऱ्या १४ दिवसांपैकी पहिल्या ४/५ दिवसातच सगळं संपलेलं. धावणाऱ्या जगासोबत धावताना गेल्यावर्षी भावना शब्दबद्ध करायला उसंत नव्हती. यंदा नियतीनं ‘करोना’ नावानं ती पदरात टाकलेली. म्हणून हे खरडायला झालं. साधारण तीन/चार वर्षांपूर्वी अश्याच उन्हाळ्याच्या दिवसात रेड व्हेंटेड बुलबुलची नुकतीच घरट्या बाहेर आलेली इवलीशी पिल्लं उंबराच्या फांद्यांवर बसलेली दिसलेली. त्यांचे आई-बाबा जवळपास वावरत होते तेव्हा. ते दृश्य पाहून फार आनंद झालेला. खरतरं पिल्लांच्या जन्मानंतर नर आणि मादी बुलबुलांचे हावभाव बदलतात. क्वचित चिंता, खाण्यासाठीची धावपळ आणि आनंदाचा कल्लोळ दिसतो. बुलबुल, पिल्लांना चोचीतून चोचीत भरवतात. पिल्ले तेव्हा माना उंच करतात. ते दृश्य पाहाणे अवर्णनीय सुखकारक असते. माता, पिता आणि पिल्लांच्या ममतेचा झरा वाहत असतो तेव्हा घरट्य़ात. मादी बुलबुल रात्री पिल्लांना पंखांच्या उबेत घेऊन बसते. पिल्लांना रात्री भूक लागली तर इकडेतिकडे फिरते. आठ / दहा दिवसांत पिल्लं बाळसं धरतात. त्यांना पंख फुटू लागतात. निसर्गात भरारी घेण्याची त्यांची धडपड चालू होते हे सारं नजरेला पुन्हा टिपायचं होतं. बुलबुल आपल्या पिल्लांसमोर स्वत:चे पंख फडफडवून, उडून दाखवतात. मग पिल्लं त्यांचं अनुकरण करतात. मातापित्याच्या अनुकरणात पिल्लांचा उडायला शिकतानाचा हा रोमांच पूर्वी पाहिलेला.

गेल्यावर्षी २०१९ला याच मोसमात पाचचं फुट उंचीच्या जास्वंदावर रेड व्हेंटेड बुलबुलनं घरटं केलेलं. बुलबुल फिमेल एकावेळी २ ते ५ अंडी देते. गेल्यावर्षीही तिनं तीन अंडी दिलेली. दुर्दैवाने कावळ्यानं ते पाहिलं. त्याला बघवलं नसावं. सर्वपित्री आमावस्येला बोलवूनही न येणारा कावळा घरट्याच्या वासानं मात्र न बोलविता आला. त्याचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्नही केलेला. घरट्याला नारळाच्या झावळ्यांचा आडोसाही करून पाहिला. पण उपयोगशून्य. घरट्यात अंडी आहेत की पिल्लं ? हेही नीटसं माहित नसलेल्या कावळ्यानं, मी घरात नसतानाची वेळ साधली. आपल्या चोचीनं रागारागानं प्रहार करून सारं घरटंचं उद्ध्वस्थ केलं. घरी आल्यावर सायंकाळी पाहिलं तेव्हा अंड्यांची फिकट गुलाबी आणि त्यावर जांभळट रंगाचे ठिपके असलेली कवचं फुटून खाली पडलेली. काय मिळालं असेलं कावळ्याला असं वागून ? खूप राग आलेला तेव्हा मला त्याचा. यंदा पुन्हा बुलबुलनं घरच्या ऑफिसच्या दारापासून पाच/सात फुटांवरच्या चाफ्यावर घरटं करायला घेतलेलं. चिरंजीवानं ते पहिल्यांदा पाहिलं. मला दाखवलं. परसदारी त्याचं लक्ष छान असल्याचा हेवा वाटलेला. बघताबघता कुठल्याश्या गवताच्या छोट्या डहाळ्या, पानं आणि वाळलेल्या काड्या एकात एक गुंफून वाटग्याच्या क्वचित द्रोण आकाराचं घरट साकारलेलं. सहसा न दिसणाऱ्या दाट झुडपांत साधारणत १ ते ३ मी. उंचीवर हे घरट असतं, तसंच होतं. पण तरीही मनात धाकधूक होतीच. तेव्हापासून रेड व्हेंटेड बुलबुलच्या घरट्यावर दुरून नजर ठेवून होतो. आपण जवळ जावं तर शत्रूंना कळण्याचा धोका. अशातच गेल्या आठवड्यात सायंकाळी शेजारच्या या मांजराला झाडाजवळ घुटमळताना पाहिलेलं. मी समोरचं उभा असल्यानं जवळ यायची त्याची हिंमत झाली नव्हती. माझ्या मनात शंकेची पाल तेव्हाचं चुकचुकलेली. सायंकाळी वाईट का चिंतावं ? म्हणून विचार सोडून दिलेला. नि आज सायंकाळी हे घडलं. बुलबुल सारख्या छोट्या पक्षांच्या अंड्यांवर कावळा, भारद्वाज यांच्यासह उंदीर, मांजर, साप, पाल हे शत्रू नजर ठेवून असतात. परसदारी या सर्वांचीच उपस्थिती असलेली.  

आदल्या दिवशी सायंकाळी (११ एप्रिल) चिपळूणात पाऊस शिंतडलेला. इवल्याश्या घरट्यात आपल्या तीन अंड्यांसह रेड व्हेंटेड बुलबुल सावरून बसलेली. घरट्यात अंडी घातल्यापासून जवळपास वावरणारी रेड व्हेंटेड बुलबुलची फिमेल आता गायब झालेली. मांजरानं हल्ला चढविल्यावर मदतीसाठी रेड व्हेंटेड बुलबुलनं आक्रोश केला असेलं.  नवागतांचा जन्मोत्सव साजरा करण्याची इच्छा बाळगणारा मी अभागी, लेखनात बुडालेला ! पत्नी आणि चिरंजीव अन्यत्र बॅडमिन्टन खेळत असलेले. बुलबुलला काय वाटलं असेलं ? विचार करत असतानाच डोळ्यांसमोर अंधार पसरला. रेड व्हेंटेड बुलबुलला मी वेड्यासारखा शोधत राहिलो...!

धीरज वाटेकर
चिपळूण.
मो. ९८६०३६०९४८
ई-मेल : dheerajwatekar@gmail.com    

दैनिक सकाळ रत्नागिरी २० एप्रिल २०२०

साप्ताहिक कोकण मिडिया रत्नागिरी १७ एप्रिल २०२० 

दैनिक महासत्ता इचलकरंजी/कोल्हापूर/सांगली/बेळगाव १७ एप्रिल २०२०

दैनिक प्रहार रत्नागिरी १७ एप्रिल २०२० 
दैनिक उद्याचा मराठवाडा नांदेड १६ एप्रिल २०२०

दैनिक जनमाध्यम अमरावती २० एप्रिल २०२०

पवना समाचार पुणे १६ एप्रिल २०२० 

दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस १६०४२०२० 


दैनिक लोकमत

(रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आवृत्ती)

लोकमंच पुरवणी

११ जून २०२०


'दैनिक महासत्ता' इचलकरंजी च्या दिनांक १७ एप्रिल २०२०
च्या अंकात हा लेख छापून आला. लेखावर मोबाईल नंबर
नव्हता. मूळ हिंदी भाषिक, गेली ३० वर्षे महाराष्ट्रात
स्थायिक असलेल्या अनिलजी गोयल यांचा सकाळी ११.०० वाजता
या लेखाबद्दलच्या भावना सांगणारा हा मेसेज आला. 

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

‘कोरोना’त भेटलं शिवलं !


आज २२ मे ! जागतिक जैवविविधता दिन ! सध्याच्या ‘कोरोना’स्थितीत अनेकांना जैवविविधतेचे विविध नजारे पाहायला, कॅमेऱ्यात टिपायला, शब्दबद्ध करायला मिळत आहेत. असाच एक नजारा लॉकडाऊन एकमधील चैत्र पौर्णिमेच्या (७ एप्रिल) पूर्वसंध्येला अनुभवलेला ! सन १९९३ पासून जगभर जैवविविधतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. ज्या भूप्रदेशाची जैवविविधता जास्त, तिथले लोक जगात सर्वात जास्त आनंदी आणि समाधानी असतात. हे जगाने मान्य केलेलं तत्त्व, मागे २०१८ च्या दीपावली सुट्टीत ‘भूतान’मध्ये आंतरराष्ट्रीय निसर्ग आणि पर्यावरण अभ्यास दौऱ्यादरम्यान अनुभवलेलं. आर्थिकदृष्ट्या गरीब आणि जैवविविधतेच्या दृष्टीने श्रीमंत असणारं भूतानी जगणं ‘कोरोना’मय जगाला स्वीकारावं लागणार आहे. हे अनेकांना कळलंय ! आजच्या दिनी आपण निसर्गातल्या एका जैवविविधतेची सफर करू यात !

 

...तर लॉकडाऊन एकमधील चैत्र पौर्णिमेची पूर्वसंध्या ! सायंकाळचे सात वाजून गेलेले. ठिकाण कोकणातल्या खेड तालुक्यातील सोनगाव भोईवाडी धक्का (बंदर) ! ‘अत्यावश्यक सेवा’ कारणांन्वये अचानक जाणं झालेलं. गेल्या १२/१५ वर्षांत खाडी किनाऱ्यावरच्या लोकांच्या हाताला फारशी न लागलेली शिवलं (तिसऱ्या / शिंपले) तुलनेने मोठ्या प्रमाणावर मिळू लागलेली. ‘कोरोना’ संचारबंदीत त्या शिवल्यांच दर्शन घेऊन निघालेलो. सायंकाळच्या प्रवासात वाशिष्ठी खाडी किनाऱ्यावरून, ५/६ किलोमीटरची पैदल झालेली. चैत्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चंद्राच्या शीतल छायेतील पदभ्रमणाने, शिवल्यांच्या ताज्या दर्शनाने माझ्यातल्या ‘शाकाहारी’ अंतर्मनालाही नैसर्गिक उभारी मिळाली.

 

सकाळी पावणेअकरा वाजता शहरातील ग्लोबल चिपळूण टुरिझम पर्यटन संस्थेचे चेअरमन आणि एसआर. रेडिज पेट्रोल पंपाचे मालक श्रीरामशेठ रेडिज यांचा फोन आलेला. बरचसं बोलणं व्हाट्सअपवर किंवा व्हाया होत असल्यानं रामशेठ यांचा थेट फोन महत्वाच्या कामाशिवाय येत नाही. भेटी नियमित असूनही त्यांचा शेवटचा फोन मागच्यावर्षी ६ नोव्हेंबरला आलेला. फोनवर ३/४ मिनिटं बोलणं झालं. म्हणाले, ‘अरे धीरज ! पंपावर माणसं कमी झालीत. अत्यावश्यक सेवेचा पास आहे माझ्याकडे. काही मुलांना भेटायला धामणदेवी, सोनगाव भागात जाऊ यात. विलास महाडिक गुरुजींना बोललोय. बरेच दिवस चालणंही झालेलं नाही. खायला चटणी-भाकरी नेऊ. कामही होईल. तू सायंकाळी ४ वाजता तयार राहा.’ फोन कट झाला. त्यानंतर अवघ्या ७/८ मिनिटात, घरगुती गरजेपोटी दुचाकी घेऊन बाजारात आलेल्या मला ‘कोरोना निमित्त पोलिसी दंड प्रसाद’ मिळालेला. घरी आलो तर चिरंजीवाचं अंग किंचित गरम जाणवू लागलेलं. ताप व्हायरल असला तरी जाहीर ‘शिंकणं’ धोकादायक असल्याच्या काळात तोही भितीदायकच ! जाव की नको ? असं झालेलं. सायंकाळी रामशेठ आणि विलास महाडिक गुरुजींचे फोन यायला लागले. ३/४ वेळा फोन येऊन गेल्यावर गुरुजींशी बोललो. म्हणाले, ‘तू फोन उचलला नाहीस. शेठ घरी यायला निघालेत. तयार राहा.’ इतक्यात शेठ दारात ! आता निघायलाच हवं. हावऱ्यासारखी कॅमेऱ्याची बॅग सोबत घेतलेली. पण उगाच अडचण नको म्हणत शेठनी ठेवायला सांगितली. खेंडीतल्या घरातून गुहागर बायपासमार्गे कोल्हेखाजण लेणी, लाईफकेअर हॉस्पिटलमार्गे फरशीवर आलो. वाटेत बायपास, उक्ताड, गोवळकोट सीमा कमान आणि फरशी तिठ्यावर पोलिसी पहारा. रस्त्यावर वर्दळीचा पूर्ण अभाव. शेठच्या दुचाकीवर पुढे ‘अत्यावश्यक सेवा’ असं ठळक शब्दात लिहिलेला कागद चिकटवलेला. मी त्यांच्या सोबत आल्यानं प्रवास जमून आलेला. पेढ्यात श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्रात महाडिक गुरुजींकडे पोहोचलो. पाणी-पोटपूजेसाठी काही साहित्य पिशवीत घेतलं. पुढे निघालो. वाटेतल्या पिंपळपार दत्तमंदिराजवळ मदतीचा पहिला थांबा घेतला. पुढे निघालो.

 

वाशिष्ठीच्या किनारवर्ती भागात असलेल्या पेढे-धामणदेवी-सोनगावच्या ‘सीमा’ खरंतर समजून न याव्यात इतक्या एकमेकांत मिसळलेल्या. पण आज रस्त्यात काठ्या आडव्या टाकून बंद करण्यात आलेल्या. आपण निसर्गाचे हाल-हाल केले, म्हणून हे असलं ‘कोरोना’ जीणं आपल्या नशीबी आलं असावं. निसर्गमार्गांवरून मुक्त विहरण्याची सवय असल्यानं काठ्यांनी बंद केलेल्या रस्त्याकडे पाहावेना. त्यातून वाकून पुढे सरकलो. वाटेत दुतर्फा मोजके ‘गाववाले’ शेतीच्या, सुकलेला लाकूडफाटा गोळा करण्याच्या गडबडीत. काही उत्साही मंडळी खेकड्यांच्या मागावर आलेले. सोनगाव हद्दीत आल्यावर एका पडक्या झोपडीजवळच्या रिकाम्या जागेत दुचाकी पार्क केल्या. चालायला सुरुवात केली तेव्हा सायंकाळचे सव्वापाच वाजून गेलेले. वाटेतल्या निरोपाची कामं पूर्ण करीत सव्वासहा वाजता सोनगाव भोईवाडी धक्क्यावर पोहोचलो. आता खाडीपलिकडील समोरच्या डोंगरात भिले गावातील ब्राह्मणवाडी, भुवडवाडी, सुतारवाडी दिसू लागलेली. शहरातल्या वातावरणात वीजेच्या तारेवर एका सरळ रेषेत दिसणारी वेडाराघूची वसाहत पूर्वेकडच्या एका पर्णहीन झाडावर किलबिलाट करत होती. चालून तासभर झाल्यानं पोटात किंचित भूक असलेली. तशी खाण्याची आवश्यकता नव्हती. पण... कल्पना करा ! कोकणात खाडीकिनाऱ्यावरच्या धक्क्यावर तुम्ही उभे आहात. खाडीत दूरवर २/४ होड्या विहरताहेत. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणाने बाधित झालेला हा परिसर असला तरी कोरोना लॉकडाऊनमुळे हवा-पाण्यातल्या प्रदूषणाची पातळी कमालीची घसरलेय. त्याच्या आनंदछटा निळ्याशार आकाशात पसरल्यात. पश्चिमेला सूर्यदेव अस्ताला निघालेत. बरोबर विरुद्ध दिशेस चंद्रमा पूर्णांशाने भेटीस आलेला. किंचित दमलेल्या जीवाला बसायला सांगणारी छानशी कॉक्रींटची दोन बाकडी वाट पाहताहेत. अगदीच नाही म्हणायला ४/२ तरुण मंडळी हातात मोबाईल घेऊन उगाचच इकडं-तिकडं करणारी. अशा वातावरणात जवळ असलेली चटणी-भाकरी कुणाला गोड नाही लागणार ? शेठनी हाक मारून तिथल्या कुणा ओळखीच्याला बोलावलंनी. निसर्गानं ओढल्यानं मी १५ मिनिटं मोबाईलचा कॅमेरा चालवत राहिलेलो. पिशवीतनं या दोघांसाठी भाकरीसोबत अंडा-मसाला आणलेला आणि मला भेंडीची भाजी, लसणीची चटणी. अर्थात अचानकच्या या अन्नाला यावी तशी उत्तम चवही आलेली.

 

झालं ! निरोपाची कामं, चालणं आणि आता रम्य ठिकाणी बसून खाणं उरकलेलं. पावणेसात वाजता सूर्य अस्ताला गेला तशी चंद्राची माया अधिक जवळची वाटू लागलेली. आता परतीचं अंतर कापताना तिचाच आधार असलेला ! जेमतेम सात वाजले असतील. मगाच दूरवर खाडीत विहरणाऱ्या २/४ होड्या जवळ येऊ लागलेल्या. धक्क्यावरची लगबग वाढलेली. तिथल्या चर्चेचा कानोसा घेतला तेव्हा कळलं या बोटी शिवलं पकडायला गेलेल्या. गेल्याप्रमाणे त्यांना शिवल्या मिळालेल्या. माझी उत्सुकता पाहून कोणीतरी तरुण आपणहून सांगायला पुढं आला. म्हणाला, ‘पूर्वी १२/१५ वर्षांपूर्वी या खाडीत आम्हांला शिवल्या भरपूर मिळायच्या. नंतर बंद झालेल्या. पण गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा मिळू लागल्यात.’ त्याचं हे वाक्य ऐकून मी एकदम चमकलो. कोरोना लॉकडाऊनमुळे निसर्ग चक्रातील जैवविविधता सध्या आनंदली आहे. निर्मनुष्य वातावरणात विहरते आहे. याची अनेक उदाहरणे ऑनलाईन/पीडीएफ वर्तमानपत्रातून वाचनात, चॅनेल्सवर पाहाण्यात येताहेत. हे तश्यातलं ! या साऱ्या घटनाक्रमात आवर्जून नोंदवून ठेवावं असं काहीसं उमगलेलं. मगं शिवाल्यांकडं थोडं त्या दृष्टीनं पाहिलं. गावात, शिमग्याला आलेले चाकरमानी मुंबईला परतलेले. मात्र आज-उद्या जाऊ म्हणणारे इथेच अडकलेले. अशांची संख्याही बरीच. समोरच्या बोटीत यांचीच उपस्थिती. एव्हाना होड्या धक्याला लागल्या. प्रत्येक होडीतली ४/२ माणसं बाहेर येऊ लागली. येताना त्यांच्या खांद्यावर शिवल्यानं भरलेली पोती होती. काहींच्या हातात शिवलं पकडायला लागणारं गोलाकार जाळं होतं. पोतं / पिशवी कमी पडल्यानं कोणी बोटीतच ठेवलेल्या शिवल्या घमेल्यातून धक्यावर आणण्यात व्यस्त. बाहेर आणलेल्या शिवल्या धक्क्यावर पसरल्या गेल्या. यातल्या तुटलेल्या हुडकून बाजूला काढण्याचं काम सुरु झालेलं. उरलेल्या किलोवर विकायच्या असलेल्या. किंवा घरात संपेपर्यंत खायच्या ! आमच्या ३ किलो हव्या असताना कुणाच्या खिशात सुट्टे पैसे नाहीत म्हणून १० किलो घेतलेल्या. त्यांचा धंदा झाला. मला दृश्य न्याहाळण्यासाठी किंचित अधिक वेळ मिळाला.

 

...तर या शिवल्या खाडीतल्या खोल पाण्यात किंवा किनाऱ्याला मिळतात. धक्क्यावर आणलेल्या किनाऱ्याला मिळालेल्या. शिवल्या मातीत असतात. गोलाकार जाळ्यानं पाण्यातून मातीसकटं पाण्यावर आणायच्या. माती चाळवून नेमक्या बाजूला गोळा करायच्या. शिवल्या सुरुवातीला पाण्यात उकळतात. त्यामुळे त्या सुट्ट्या होतात, उघडल्या जातात. दोनपैकी एका बाजूला अधिक माष्ट (मांस) असते. दुसऱ्या बाजूचे माष्ट खरवडून घेतले जाते. काही ठिकाणी जास्त माष्ट असलेल्या शिवल्यांचं तसंच कालवण करतात. काही ठिकाणी त्यातलं फक्त मांस (फ्लेश) कालवणासाठी, सुकं करण्यासाठी वापरतात. क्वचित वेळा शिवल्याच्या आत छोटे खेकडेही मिळतात. पाण्यात उकडल्यानं शिवल्यांमधील प्रोटीन वाया जातात. पण तशाच कापणं जिकिरीचं काम. काही लोक त्यांना स्वच्छ धुवून अर्धा तास पॅक डब्यात घालून डीप फ्रिझरमध्ये ठेवतात. अर्ध्यातासाने त्यांची तोंडे आपोआप उघडतात. ज्या शिवल्यात माती असते त्यांचे तोंड उघडले जात नाही म्हणे. या शिवल्या बाहेरून जितक्या ओबडधोबड तितक्या आतून सुरेख निळसर, गुलाबी, पांढरी झाक असलेल्या असतात. शिवल्यांचा हंगाम तसा बारमाही. पण कधीकधी एप्रिल / मे महिन्यात किंवा ऑक्टोबरात इतक्या मिळतात की घरोघरी याच शिजाव्यात. इथल्या भोईवाडीची सध्याची अवस्था तशी. शिवल्या पोत्यांनी आणून, उकडून, सुकवून पावसाळ्याची बेगमी म्हणूनही ठेवल्या जातात. यांच सुकवलेलं माष्ट बाजारात विकत मिळतं. शिवल्या शक्यतो वजनावर घेऊ नयेत म्हणतात. पण इथं तशाच विकल्या जात होत्या. २० रुपये किलो दरानं ! शिवल्यातून कॅल्शिअम मिळत असलं तरी त्याला मांसाहारात मानाचं पान मिळालेलं नाही. लोटे-परशुराम हे दाभोळच्या वाशिष्ठी खाडी किनाऱ्यावरचं कोकणातलं रासायनिक औद्योगिकीकरण झालेलं महत्त्वाचं केंद्र. रासायनिक कंपन्यातून निर्माण होणारं सांडपाणी याच खाडीत सोडलं जातं. किनाऱ्यावरच्या मच्छिमार समाजाचा मासेमारी हाच मुख्य व्यवसाय. सध्या प्रदूषणाने ग्रासलेला. रसायन मिश्रित पाण्यामुळं माशांच्या प्रजननशक्तीवर परिणाम होऊन आता खाडीत मासळी मिळेनाशी झालीय. औद्योगिकीकरण यशस्वी करताना कंपन्यांनी प्रदूषित पाणी खाडीत सोडताना किमान मासे जीवंत राहातील अशा स्थितीत सोडायला हवं. मच्छिमारांची ही अपेक्षा रास्तचं ! या पार्श्वभूमीवर हे चित्र दिसलेलं.

 

पृथ्वीवरील थक्क करणाऱ्या जैवविविधतेच्या जनजागृतीसाठी जगभर हा दिवस साजरा होतो. भारत सरकारने सन २००२ मध्ये याबाबत कायदा बनवला. महाराष्ट्रात सन २००८ पासून जैवविविधता नियम लागू झालेत. सन २०१२ मध्ये जैवविविधता मंडळ स्थापन झाले आहे. सध्या जैवविविधतेतील स्वच्छता वेगवेगळ्या रुपात मानवाला अनेक गोष्टींचे दर्शन घडवते आहे. लॉकडाऊन ३ मध्ये दिनांक १० मेला चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील ताम्हाणे-तांबी तलावात मगरीच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडली. वाशिष्ठी खाडीतील ‘क्रोकोडाईल टुरिझम’मध्ये आम्ही खाडीकिनारी विसावलेल्या मगरींच्या शेजारी ५/७ फुटांवर निवांत चरणाऱ्या म्हशी पहिल्यात. त्यामुळे ही घटना अनेक अर्थाने विचार करायला लावणारी. याच काळात पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून ३८८ गावे वगळण्याचा राज्यसरकारचा निर्णय समोर आला. कोरोना काळात आम्हाला असे निर्णय घ्यायला सुचतात, हे अनाकलनीय आहे. खाडी किनाऱ्यावरची ही सफर आम्हांला शिवल्यांवर लिहायला प्रवृत्त करून गेली. जैवविविधता संदर्भात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला तर अनेक अडचणी समजतील. जैवविविधता साक्षर होणं ही ‘कोरोना’युक्त काळाची गरज बनणार आहे. असो ! जागतिक जैवविविधता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

 

धीरज वाटेकर, चिपळूण.

मो. ९८६०३६०९४८.

ईमेल : dheerajwatekar@gmail.com

सोनगाव भोईवाडी धक्का 

सोनगाव भोईवाडी धक्क्याकडे जाणारी पाऊलवाट  

सोनगाव भोईवाडी धक्का : सूर्यास्ताकडे 

सोनगाव भोईवाडी धक्का 

सोनगाव भोईवाडी धक्का : 'कोरोना' सूर्यास्त 

‘कोरोना’त भेटलेल्या याच त्या शिवल्या !

शिवल्या घेऊन आलेले 'भोई'बांधव 

शिवल्यातलं माष्ट (मांस) 

शिवल्या निवडताना... 

चैत्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येचा नजराणा 

अचानक योगावर शिवल्यांचे दर्शन झालेल्या धक्यावर 
दोन ज्येष्ठ सहकारी श्रीरामशेठ रेडिज आणि विलास महाडिक 
यांच्यासोबत 'ब्लॉग'लेखक धीरज वाटेकर      


मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

कोरोना प्रसाद !



दिनांक ७ एप्रिल २०२० ! वेळ सकाळी १० वाजून ५७ मिनिटे ! ठिकाण चिंचनाका, चिपळूण ! दिनांक १६ मार्चच्या सायंकाळनंतर आज पहिल्यांदा अगदी नाईलाजास्तव घराबाहेर पडलेलो. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ए.टी.एम. मधून पैसे काढणे अत्यावश्यक बनलेले. पत्नीला किराणा खरेदी करायची घाई झालेली. तिची घाई नाही म्हटलं तरी लेखनात व्यत्यय आणू लागलेली. मनात म्हटलं, या ग्राह्य कारणांचा माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार होईल का ? प्रश्न मनात ठेऊन घराबाहेर पडलेलो. कोरोना संचारबंदीत दुचाकी / चारचाकी वाहन चालविण्यास बंदी असताना ते चालविल्याबद्दल दोनशे रुपयांचा दंडरुपी ‘पोलिसी’ प्रसाद प्राप्त करूनच घरी परतलो.


घराजवळच्या किराणा दुकानात शुकशुकाट पसरलेला. दूरच्या दुकानात पत्नीला चालत पाठवावं तर किराणा आणायला रस्त्यांवर रिक्षांचा अभाव. इतक्या लांबून पिशव्या हातातून आणाव्यात तर तेही जीवावर आलेलं. बरं ! हे सगळं नंतर ! आधि पैसे असलेलं ए.टी.एम. मशीन शोधायची आवश्यकता...? आता करायचं काय ? सगळा विचार करून रामायण संपताच, नशीबावर हवाला ठेऊन घर सोडलेलं. वास्तव्याला असलेल्या खेंडीतून जाखमाता मंदिर, पिंपळपार गणेश मंदिर मार्गे नगर परिषदेच्या कार्यालयासमोरून पुढे जाताना चिंचनाक्यात पोलिसांना सापडलो. त्यांच्याकडून तत्परतेने ‘POLICE MANUAL SIGNAL VIOLATION’ असा शेरा असलेली २०० रुपये दंडाची पावती हातात ठेवली गेली. ‘पैसे ऑनलाईन भरा’ असंही सांगितलं गेलं. आता दंड भरायचाच आहे तर ज्या कामासाठी बाहेर पडलोय ते उरकून घेऊ म्हणून ए.टी.एम. मशीन शोधलं. पैसे काढले. एका सुपर मार्केटच्या मागच्या दारामधून आत जाऊन तिथे सध्या शिल्लक असलेल्या किराणा मालातून आवश्यक खरेदी केली. जे मिळालं ते घेतलं. एवढ्या काळात, ‘जास्त वेळ घालवू नकोस’ म्हणून पत्नीवर २/३ वेळा वैतागलोही. परत फिरलो तेव्हा आजुबाजूने प्रवास करणाऱ्यांचे चेहरे न्याहळू लागलो. त्यांच्यातल्या संवादाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं, पोलिसांसमोरही पर्याय नाही. कितीही नको म्हटलं तरी सहज फिरणाऱ्यांचं प्रमाण आजही रस्त्यांवर जाणवत होतचं. म्हणूनच कालपर्यंत (६ एप्रिल) रत्नागिरी जिल्ह्यात ५ हजारांवर गाड्यांवर कारवाई करीत सुमारे २० लाखांवर दंड वसुली केली गेली. नाही म्हणायला मेडिकलच्या दुकानात शिस्तीत रांगा लागलेल्या दिसल्या. जीव वाचवायला धडपडणारे जीवावर उदार तरी कसे होतील म्हणा ? ए.टी.एम. मशीनची आवश्यकता सोडली तर मीही आजचा ‘प्रसाद दंड’ टाळू शकलो असतो. पण ते घडलं.

साधारणपणे १९९८ पासून, अर्थात सज्ञान झाल्यापासून मी दुचाकी आणि २०११ पासून चारचाकी चालवतोय. पोलिसी दंडाची पावती स्वतःच्या नावावर फाडून घेण्याची वेळ कधी आलेली नव्हती. नाही म्हणायला २०१०-११ साली सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या तळेरेहून वैभववाडीच्या दिशेने महिंद्रा मॅक्स जीपने प्रवास करताना रेल्वेफाटकानजीक गाडी अडवली जाऊन १०० रुपयांच्या दंडाची पावती माझ्या हातावर टेकवली गेली होती. मला तर तीही झेपलेली नव्हती. तेव्हा मी लोकसत्तेत वार्ताहर होतो. चेकपोस्टवर विनंती करून पाहिली. पण पावती फाटलेली होती. आता दंड भरावा लागेल, असं सांगितलं गेलेलं. नाखुशीने पैसे भरताना हातात टेकवलेली पावती निरखून पहिली. नवी दिल्लीतील कुठल्यातरी संस्थेच्या नावे तिथल्या एड्सग्रस्तांना मदतनिधीची ती पावती होती. मी क्षणभर चक्रावलो. मला काही कळेना. पावतीत किंचित अधिक डोकावल्यावर मला त्यात ‘बातमी’ दडलेली दिसली. मग काय ? वैभववाडीतील काम आटोपून पुन्हा तळेरेमार्गे कणकवलीहून कुडाळला आलो. लॉजवर फ्रेश झालो. बॅगेतून कागद, पेन, पॅड काढला नि लिहायला सुरुवात केली. ‘सिंधुदुर्ग पोलीस जमा करताहेत नवी दिल्लीतील एड्सग्रस्तांसाठी निधी ; कोकणातील रुग्ण वाऱ्यावर’ अश्या मथळ्याची लिहिलेली बातमी जवळून मुंबई ऑफिसला फॅक्स केली. लोकसत्ताने सुदैवाने दुसऱ्या दिवशी ती प्रसिद्ध केली. त्यावेळी मी ती बातमी जपूनही ठेवली होती. आता  ऑफिसमध्ये शोधावी लागेल. त्या घटनेनंतर आजपर्यंत त्या रस्त्याने मी अनेकदा प्रवास केला पण तिथे पोलिस कर्मचारी उभे असलेले मला तरी दिसलेले नाहीत.

असो ! पण आजचा विषय ‘कोरोना’चा होता. परवानगी नसताना आगाऊपणा करून आपण बाहेर पडलेलो असल्याचं माहिती होतं. त्यामुळे आजचा दिवस स्वतःच्या तोंडावर बांधलेला रुमाल काढून ओळख सांगण्याचा, आपली गरज समजावण्याचा, स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्यांशी अधिक बोलण्याचाही नव्हता. प्रवास पुरेशा खबरदारीने झालेला. पत्नी सोबत असल्याने किमान इथून पुढची माझी ‘संचारबंदी’ तरी घरात निवांत जाईल याची खात्री पटवून घेऊन तासाभरात मी घरी पोहोचलो.

धीरज वाटेकर

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

बुरखा हळद्याची कावळे अंघोळ !

जगप्रसिद्ध कोरोना लॉकडाऊनमधली सोमवारची (३० मार्च २०२०) सकाळ. परसदारातल्या फुल-फळझाडांना पाणी पाजून नुकताच घरगुती ऑफिसात पाय ठेवलेला. ऑनलाईन पेपर वाचण्यासाठीची विंडो संगणकावर ओपन करणार इतक्यात जवळच्या बकुळाच्या पानांत कुणाच्यातरी पंखांच्या फडफडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर दारातल्या उंबराच्या झाडावर सध्या मुक्कामी असलेला बुरखा किंवा काळटोप हळद्या (ब्लॅक हूडेड ओरीयल) ५/७ फुट उंचीवरच्या बकुळाच्या झाडाच्या पानांवरचं पाणी आपल्या अंगाखांद्यावर खेळवत होता. बुरखा हळद्याच्या कावळेअंघोळ उपक्रमाला अगदी ५/७ फुटांवरून निरखण्यात, ‘रामायण’ सुरु होईपर्यंतचा माझा आणि चिरंजीवाचा वेळ सुखनैव सरला.  

मागच्या गुढीपाडव्याला, गुढी उभी करायला हा जोडीनं आलेला. त्यानंतर दोन दिवसांनी रात्री उंबराच्या झाडावर एकटाच बसलेला दिसला. याला पहिल्यांदा दुरून पाहिलं तेव्हा क्षणभर वाटलं, ‘हा पिवळ्या रंगाचा चेंडू इथं वर कुणी नेऊन ठेवला ?’ साधारण रात्रीचे पक्षी असेच बसतात म्हणे ! आज सकाळी सकाळी उठल्यावर उंबराच्या झाडावर हा आपल्याच चोचीनं आपलीचं पिसं साफ करत बसलेला. जवळच्या बकुळावर आणि त्या शेजारच्या पांढऱ्या कांचनवर बुलबुल आलेले दिसताच त्वरेने आपलं हातातलं काम थांबवून हा तिकडे धावला. पंख फडफडताना दिसला तो बकुळीच्या पानांत. हळूहळू हा बकुळसह तिथल्या पेरू, चाफा, कांचनवर विहरू लागला. सगळ्या झाडाच्या पानांवर असलेले पाण्याचे थेंब जणू याच्याच अंगावर पडायला हवे असल्यासारखा ! एव्हाना हळद्यानं आपल्या अंगावरची जवळपास सारी पिसं पानांवरच्या पाण्यानं भिजवलेली. सध्याच्या या गर्मीत काय फिल आला असेलं ना त्याला ? त्याच्या बागडण्यावरून त्याच्या आनंदाचा अंदाजही आलेला. आमच्या लहानपणी कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या अलोरे (ता. चिपळूण) वसाहतीतील शाळेला जाणाऱ्या जवळच्या रस्त्यावरच्या बागेत पाणी सोडले असताना फुटलेल्या पाईपच्या फवाऱ्यावर चिवचिवाट करत अंघोळ करणाऱ्या चिमण्या पहायला मिळायच्या. खूप मजा यायची त्यांना पाहायला तेव्हा ! आता हे घराजवळ असं चित्र पाहताना मेंदू कामात ‘लॉकडाऊन’ झालेला नसला म्हणजे आजच्यासारखं जुनं आठवतं. तेव्हा छान वाटतं.
उंबराच्या झाडावर आपल्याच चोचीनं
आपलीचं पिसं साफ करणारा हळद्या 

जैवविविधतेत भर घालणारा
हा चमकदार काळ्या- पिवळ्या रंगाचा हळद्या फळं खातो म्हणून याच्यावर हल्लेही होतात. आदिवासी समाजबांधव तर याला सूर्याचे प्रतिक मानतात म्हणे. त्यांच्या काही नाच-गाण्यांत याचा उल्लेख येतो. फळांसह फुलांमधील मध आणि कीटक हे याचं खाद्य. म्हणूनच कदाचित अंघोळ झाल्यावर पिसं भिजवलेला हा कांचनवर विसावला. मला तेव्हा छानसा क्लिकही करायला मिळाला. एप्रिल ते ऑगस्ट हा याचा प्रजननाचा काळ सध्या जवळ येतोय. कदाचित सुरक्षेचा विचार करून हा इकडे फिरकला असावा. आमच्या परासबागेतल्या हिरव्यागार वातावरणात पक्षी आपल्या उदरनिर्वाहासाठी, बागडण्यासाठी येत असतात. त्यातला हा एक लक्षवेधी पक्षी. त्याचं आगमन आम्हांला एखाद्या सेलिब्रेटीसारखं वाटतं. पूर्वी एखादा क्लिक द्यायला हा जाम भाव खायचा. याच्यावर कॅमेरा धरला की हा उडालाच दुसऱ्या फांदीवर ! आत्ताही तसं करतो, पण प्रमाण कमी झालंय. किंचित अधिक माणसाळलायं. किंवा त्याला इथल्या आंब्याचा, उंबराचा मोह जडला असावा. कदाचित म्हणून रात्रीचा चेंडूसारखा आकार करून उंबरावर झोपलेला दिसतो. घरात आमच्या चिरंजीवाला सध्या त्याची अंघोळ त्यालाच करायला आवडते. तर ही अंघोळ तरी कशी ‘भडा भडा’ चार तांबे (‘जग की मग’ MUG तो !) पाणी अंगावर इकडून तिकडून दोनदा, मध्येच साबण लावून ओतून घ्यायचं इतकंच. गंमत म्हणून त्याच्या या असल्या अंघोळीला कावळ्याची अंघोळ म्हणताना आज त्याला हळद्याची कावळे अंघोळ दाखवायला मिळाली. निसर्गातली गंमत सारी ती ! त्याला म्हटलंही, कावळाही असंच करतो. थोडफारं पाणी कुठं दिसलं की त्यात आपले पंख ओले करतो. इकडून तिकडून स्वत:च्या अंगावर थोडेसे पाणी उडवून घेत असतो. असो..!

झाडांना पाणी घालताना कधीकधी थोडंस पाणी पानांवर शिंतडण्याची आम्हाला खूप जुनी सवय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर पाणी शिंतडलेल्या या पानांत कोणनाकोण कायमचं कावळे अंघोळ करताना भेटतात. आज हळद्याला अंघोळ करताना, कोरोना लॉकडाऊनमुळं निरखणं झालं. कदाचित पाण्यात डुबकी मारायला आवडत असणाऱ्या या हळद्याला ही कावळे अंघोळ जितकं समाधान देऊन गेली तितकीच आम्हालाही !

धीरज वाटेकर
चिपळूण

मो. ९८६०३६०९४८    


दैनिक महाराष्ट्र टाईम्स ३ एप्रिल २०२० 

दैनिक प्रहार रत्नागिरी १ एप्रिल २०२० 
दैनिक उद्याचा मराठवाडा नांदेड १ एप्रिल २०२०
दैनिक जनमाध्यम अमरावती ४ एप्रिल २०२०

दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस ३ एप्रिल २०२० 

गुरुवार, २६ मार्च, २०२०

कोरोना ! सोशल डिस्टन्सिंग !! ...आणि गुढीपाडवा !!!


गुढीपाडवा २०२० ! नववर्षाच्या प्रारंभी असं ‘घरबैठी’ जगणं, इतिहासात कधी ? कुठे ? नोंदवलं गेलं असेलं ? माहित नाही. यंदा मात्र ते अनुभवलं. ‘सोशल डिस्टन्सिंग’ वातावरणातला यंदाचा गुढीपाडवा अनोखा ठरला. ‘कोरोना’ संसर्गजन्य विषाणूच्या जागतिक प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेक गोष्टी इतिहासात पहिल्यांदा घडल्यात. अजूनही घडताहेत. पुढेही घडणार आहेत. पाडव्याच्या आदल्या दिवशी (२४ मार्च २०२०) सायंकाळपर्यंत, ‘उद्या गुढी उभी करता येणार नाही !’ असं चित्र मनाच्या कॅनव्हासवर तयार होऊन पर्यायी शोध घेत असताना नियतीनं अचानक गुढी उभारायची संधी देऊ केली. पाडव्याला गुढी उभारल्यावर थोडं मागं भूतकाळात डोकावलं. वर्तमानात आलो. उद्याचा विचार करू लागलो. २१ दिवसीय सोशल डिस्टन्सिंग वातावरणाबाबतची, गुढीपाडव्यादिनी जाणवलेली विचारांची आवर्तनं नोंदवून ठेवावीशी वाटली.

आपल्या राज्यात पूर्वीच सर्वत्र संचारबंदी सुरु झालेली. त्यामुळे नेहमीप्रमाणे ‘गुढीपाडवा’ साजरा करणं शक्य नसल्याचं लक्षात आलेलं. ‘घरातच राहून सुरक्षित गुढीपूजन कसं करता येईल ?’ याबाबतची तज्ज्ञांची मत २४ मार्चला सोशल मिडीयावरून मिळू लागलेली. त्यात पारंपारिक पद्धतीऐवजी घरच्या देव्हाऱ्यात कागदावर किंवा रांगोळीने गुढी काढून पूजन करण्याचा उत्तम सल्ला दिला गेलेला. त्याबाबत विचार करताना मन भूतकाळात गेलं. चिपळूणात, या वास्तूत आल्यापासून गेली १०/१२ वर्षे मिरजोळीतील श्रीदेवी महालक्ष्मी साळूबाईची शिमगा पालखी अंगणात येऊन गेली की लगोलग येणारा पाडवा खरतरं त्याचं आनंदात नि उत्साहात साजरा होणारा. लहानपणी कळायला लागल्यापासून, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या अलोरे (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) वसाहतीत आई-वडिलांना, आजूबाजूच्या शेजाऱ्यांना दारात उंचचउंच गुढ्या उभारताना पाहिलेलं. जणू उंचीबाबत एकमेकांत स्पर्धा लागलेली असावी. थोडा मोठा झाल्यावर तिथल्याचं देवरेमार्केट जवळच्या वाडीतून गुढीसाठी बांबूची काठी आणायला आदला अर्धा दिवस स्वतः खर्चीही घातलेला. लांबच लांब काठी लांबून ओढत आणताना मजा वाटायची. काठी आणायला लहान भावाचा खांदा मदतीला आल्यावर गुढीची उंची आणखी वाढत नेलेली. तेव्हा ‘उंच’ गुढ्या पाहायला गंमत वाटायची. ती कॉलनी जलविद्युत प्रकल्पाची असली तरी सारे सण-समारंभ दणक्यात साजरे व्हायचे. त्या प्रकल्पाच्या वसाहतीतील चाळीतही आम्ही ग्रामदैवत श्रीदेव शंकर-महादेव आणि श्रीदेवी गंगादेवी यांची पालखी घरात बसवायचो. बाकी काही नाही... वर्षभर जगायला लागणारं टॉनिक मिळायचं त्यातून, ही श्रद्धा ! कालांतराने जगण्याच्या या सवयी चिपळूणातही कायम राहिलेल्या. खेन्डीत वास्तव्याला आल्यावर सुरुवातीला काठी आणायला कुठं जावं लागायचं नाही. कोणीतरी आणून द्यायचा. त्याचे पैसे दिले की झालं. काठीची उंची थोडी कमी असायची. पण तसंही दारात ४०/५० वर्ष जुनं कलमी आंब्याचं ‘सावली’ देणारं झाडं असल्यानं उंच गुढी दिसायला कठीण. नंतर-नंतर काठी दारात येणंही बंद झालं. आता ‘काठी’ शहरातल्या गाढवतळ्याजवळ विकत मिळू लागलेली. गेल्या ४/५ दिवसांपूर्वी त्या भागातून येतानाही काठ्या पाहिलेल्या. पण तेव्हा ‘संचारबंदी’ नव्हती. आता काठीअभावी नेहमीप्रमाणे गुढी उभी करणं अवघड बनलं !

मागच्या महिन्यातल्या शिवजयंती-महाशिवरात्रीला तुळजापूरला जाताना वाटेत भरपूर भगवे झेंडे पाहायला मिळालेले. न राहावून चिरंजीवाच्या आग्रहापोटी एक राजांचे चित्र असलेला नि एक पूर्ण भगवा झेंडा आणलेला. शिमगा पालखीला, गेल्यावर्षीच्या काठीत, आंब्याच्या झाडाजवळ तो उभा केलेला. अजून तसाच होता. ठरलं ! उद्या गुढीऐवजी हाच ‘ब्रम्हध्वज’ उभारायचा. परिसर स्वच्छता करताना झेंड्याला उतरवलं. पत्नीला, झेंडा स्वच्छ धुवायला सांगितला, सकाळी लागणार म्हणून ! पाडव्याच्या आदल्या दिवशी सायंकाळचे साडेसहा वाजून गेलेले. ‘संचारबंदी’ मनापासून पाळत असल्याने बाहेर जायचा प्रश्नच नव्हता. हे लिहीपर्यंतही गेल्या अनेक दिवसांत आलेला नाही. माध्यमांच्या चॅनेल्सवरून देशभरातल्या वार्ता समजत होत्याच. पण चिपळूणात गुढीची काठी मिळत असल्याचे कोण सांगणार ? सगळीकडे ‘कोरोना’ ! जीवनावश्यक वस्तूंच्या कारणाने छोटा भाऊ तोंडाला रूमाला बांधून घराबाहेर पडला नि काही वेळात परतला तो ‘मी काठी घेऊन येतो !’ सांगायला. गावात अनेकांना काठी मिळालेली. आता ‘काठी आल्यावर काय ?’ हा विचारही सुरु झालेला नव्हता तोवर काठी दारात हजर झाली. काठीला पाहून पाडव्याचा उत्साह संचारला. चला ! काठी मिळाली म्हणजे गुढी उभी करता येणार तर !

बाजारात फुलं मिळणार नव्हती. घरच्या बागेतील घ्यावी लागणार, रोजच्या देवपूजेला पुरवून गुढीला वापरायची म्हणजे..? म्हटलं बघू उद्या सकाळी ! पाडव्याचा सूर्योदय झाला तो कोकीळ गायनाने ! आम्हाला सकाळी लवकर गुढी उभारता येत नाही. पाणी सकाळी सात वाजता पाणी येतं. बरं अशा उत्सवी वातावरणात, पाणी आलं की जी झाडं परसदारी आपल्याला फुलं देतात त्यांना पहिलं ते पाजावं लागतं. त्यातचं गुढीपाडवा, मकरसंक्रांत, दीपावली, विजयादशमी, शिमगापालखी सोहोळ्यासारख्या उत्सवी दिवसांत दारातल्या त्या जुन्या कलमी आंब्याच्या झाडाला अंघोळ घालायचा कार्यक्रम असतो. घरच्या चोहोबाजूला उंबरांच्या झाडांची उपस्थिती. पण ती पूजनीय हवी, घेतलं तेव्हा तशी दिसेना. त्यावर्षी, (सन २००९) पहिल्याचं पावसात उत्तरेकडच्या भागात आणखी एक उंबर उमलला. मूळात मनातून हवा असलेला, त्यात स्वतःहून उमलून आलेला, वाढवला त्याला. आता तोही इतका वाढलायं की दोन हातांच्या साधारण कवेत न यावा. तर सांगायचं हे की त्यालाही अंघोळ घालतो. पाडव्याला घातली. केरकचरा, अंगणातील स्वच्छता करून फुलांकडे वळण्यापूर्वी आम्हांला टेरेसवर घेऊन जाणारा घरचा जिना पाहायला गेलो. कारणही तसंच होतं. या जिन्यात कालपर्यंत मागच्या सलग दोन रात्रीत दोन उंदरांच्या विकेटी मांजरीनं पाडलेल्या. आज मांजर शांत झालेली. आज पाडवा म्हणून की तिकडे चीनमध्ये ‘हन्ता’ विषाणू आल्याचं तिलाही कळलेलं ते तिचं तिलाचं माहित.

आज तर कधी नव्हे ती दारातल्या अनंतानं तीन फुलं दिलेली. त्याला पाणी घालताना चक्क चौथं दृष्टीस पडलं. खूप आवडते म्हणून लावलेली डबल तगारीही नेहमीपेक्षा भरपूर फुललेली. दारातला बकुळ सारखा वीजेच्या तारांना भेटायला जातो म्हणून त्यांच्यातल्याच कुणीतरी भयानक तोडलेला. तो जो घाबरला तो आजही घाबरलेलाचं ! सणासुदीला घरात येणारे झेंडूच्या फुलांचे हार उगाचंच खतासाठी झाडांत टाकलेले. तर कधी नव्हे ते दिवाळीत टाकलेल्यातून एक छानसं झेंडूचं रोपट उमललेलं. आता उमललं आहेच तर त्याला जगवायला हवं म्हणून थोडं खत-पाणी घालून जगवलेलं ! परवाच्या पालखी सोहोळ्याला नि आजला आवर्जून छोटीशी का होईना, पण गोंड्याची म्हणून सहा फुलं दिलनं त्या झाडांनं, तरीही तरीही शिल्लक ठेवली. अक्षय्यतृतीयेला होतील म्हणून ! मोठी गंमत वाटली फुलझाडाची. कडूनिंबही लावलेला. पण उगाच वरवर जात राहातो. अजिबात हाताला गावत नाही, अगदी पाडव्यालाही. म्हणून गेल्यावर्षी तोडलेला. तर तोही रागावलेला, जीवंत असून नसल्यासारखा, पर्णहीन ! नाही म्हणायला सध्या दोन प्रकारची कांचनाची फुलं उपयोगी येतात अधून मधून ! कवठी चाफा मागचे तीन दिवस एकेक करून फुललेला पण नेमका आज नाही. मागं एकदा राळेगणसिद्धीहून पर्यावरण संमेलन आटोपून अहमदनगरला जेष्ठ स्नेह्याकडे आग्रहापोटी गेलेलो. सूर्यास्तानंतर बंगल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो तर रातराणीच्या सुगंधानं दिवानं केलनं. म्हणून देवखोली बाहेरच्या खिडकीत बहरणारा कुंदा कमी करून म्हटलं रातराणीही लावूयात. म्हणून कुंदा इतरत्रही लावला. पण झालं उलटं ! देवखोलीबाहेरच्या खिडकीत रातराणीसोबत कुंद्याचं जमलं नाही. त्यानं आपलं अस्तित्वचं संपवलं. नशीबाने दुसरीकडे लावलेला जगला, पण बहुदा तोही रागात असलेला. कालपरवाच्या शिमग्यात देवीच्या पालखीच्या स्वागताला पहिल्यांदा प्रसादाएवढाचं फुलला. बहुतेक हजर असल्याचं देवीला दाखवायला. अर्थात सगळं कुठून आलंय एकदम मिळायला. सोनचाफाही तसाचं ! सोनटक्का तर पावसाळी सोबती. नाही म्हणायला मागच्या फेब्रुवारी अखेरीस आंबोली (सावंतवाडी) भेटीत तिथे छान ६/७ फुट वाढलेला, फुललेला बघीतला. ...शेवटी नेहमी उमलणारी जास्वंदी पूजेला नि उरलेली गुढीला असं नियोजन केलं. त्यातही डबललेयर जास्वंदीचं एक फुलं गुढीला ! गावठी आंब्याची डहाळी लागते, म्हणून तोही काही वर्षांपासून दारात हजर झालेला. या ‘संचारबंदी’च्या काळात घेवडीच्या वेलीनं अर्धा किलोभर शेंगा दिलनं. खरतरं गुरुवारी काढायच्या त्या, पण आज गुढीसाठी नैवेद्याला म्हणून काढलेल्या. प्रत्यक्ष गुढी उभी करायला, ‘ब्लॅक हूडेड ओरीयल’ जोडीनं कधी नव्हे इतका जवळ आलेला. विशेषत त्याच्या आणि खारूताईंच्या आवाजी उपस्थितीत गुढी उभारली. दरवर्षी पाडव्याला, पालखी घेऊन हजर होणारी परिसरातली चिमुकली मुलंही आज घराघरात अडकून पडलेली. ‘काहीही दोष नसताना आपापल्या घरात बसून आज ती नक्की कोणता विचार करत असतील !’ याचा विचार करताना अस्वस्थ व्हायला झालं. ‘कोरोना’ला पर्यावरणीय समस्या मानावं तर त्यात या लहानग्यांचा दोष तो काय ? चुका कोणाच्या ? फळं कोणाला ?

दारातली फुलं रोजचं मिळतात ! पण आज विकतची नसल्यानं त्यांच्याकडे जरा मायेनं बघणं झालं. मग लिहावं की नको या विचारात दिवस गेला. म्हटलं, लिहू यातं ! गुढीपाडव्यापासून ‘सोशल डिस्टन्सिंग’ जगताना भरपूर वेळ हाताशी आलायं. कोरोना हे आजवरचे, स्वातंत्र्योत्तर भारतावरचे सर्वात मोठे, भीषण संकट आहे. ‘पावश्या’ जसं आपल्याला ‘पेरते व्हा !’ सांगतो तसं कॉलेजयीन मित्र-मैत्रीणींना सोशल मिडीयाच्या धबडग्यात, संपूर्ण लॉकडाऊन परिस्थितीत घरात बसून ‘लिहिते व्हा’ असंही आवर्जून सांगावसं वाटतं. न जाणो, आपलं आजचं लिहिलेलं उद्याच्या काळात संकटांवर मात करण्याची शिदोरी म्हणून आपल्यालाच उपयोगी पडेल !

सोशल डिस्टन्सिंग’ पाळू यात !
देशावरील ‘कोरोना’चे संकट पळवू यात !!
सर्वांना निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करू यात !!!

धीरज वाटेकर
दैनिक नागपूर तरुण भारत (विदर्भ आवृत्ती) ३० मार्च २०२० 

गुढीपाडवा सन २०१३ @ खेंड चिपळूण 

बुधवार, १८ मार्च, २०२०

दोडामार्गच्या वनवैभवात..!

दोडामार्ग ! महाराष्ट्रातील दक्षिणेकडचा अखेरचा ६२ गावांचा तालुका. कोकणातील जवळपास जैवविविधता एकहाती सांभाळणारा. गवारेडे, टस्कर हत्तींच्या प्रभावाखाली असलेला. मराठीसह कोकणी आणि मालवणी बोलणारा. एका सीमेला कर्नाटक, पश्चिमेला गोवा राज्याशी जोडलेला. बिचोली (गोवा) तालुक्याशी सतत तुलना होणारा. सन १९९९ ला निर्मिती होऊनही आजतागायत महाराष्ट्र सरकारकडून आरोग्य, रोजगार, उद्योग व्यवसाय, पर्यटन सुविधांत सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याच्या भावनेने अलीकडच्या काळात संपूर्ण तालुका गोव्यात विलीन करावाअशी चळवळ उभी झालेला. होऊ घातलेल्या मोपेआंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळचा. कदाचित मायनिंगसाठी गोव्यातल्या उद्योजकांचे बारीक लक्ष असलेला तालुका. यातल्या वनवैभवाशी जवळीकता असल्यानं दोडामार्गात रममाण होण्याची संधी शोधत होतो, मागच्या फेब्रुवारी महिन्यात (२०२०) ती मिळाली. मग काय ? दोडामार्गच्या वनवैभवात मनसोक्त भटकलो. निसर्ग अनुभवाच्या अनेक गोष्टी पोतडीत भरूनच बाहेर आलो..! आजच्या जागतिक वनदिनी त्यातल्या काहींचा उलगडा..!

२८ फेब्रुवारीला दोडामार्गात पोहोचलो तेव्हा सायंकाळचे ६ वाजलेले. सूर्य मावळतीला आलेला. अजून अंधार व्हायचा होता. साध्याश्या लॉजमध्ये टी.व्ही. की गरम पाणी असा विचित्र पर्याय विचारल्यावर गरम पाणी स्वीकारलं. मुक्कामाची इथली पहिलीच वेळ. मित्र यायला अजून अवधी होता. लॉज बुक करून फेरफटका मारायला बाहेर पडलो. रस्त्यावरची हॉटेल्स ८ नंतर बंद होणारी. नाही म्हणायला चायनीजयुक्त हॉटेल किमान ११ पर्यंत सुरु असणारे. मग जवळच्या खाणावळीचा शोध घेतला. दीडेक तासांनी मित्र पोहोचला. डोक्यातील नेहमीची कामे बाजूला केली. आता हाताशी असलेला क्षण अन क्षण महत्त्वाचा. पुढच्या ४० तासांचं नियोजन केलं, लॉजवर गेलो. खोली उघडली नि आत झोप कमी नि झुरळंच जास्त भेटणार याची जाणीव झाली. याबाबत लॉजच्या मॅनेजरला बोललो तर, ‘काय म्हणता ? मी तर रोज झोपतो या खोलीत ? आम्हाला एकही नाही दिसतं ?’ असं म्हणाला तो ! शेवटी काही झुरळंं त्याला दाखवून, आवरून जेवायला बाहेर पडलो. तसंही जंगल फिरायचं असल्यानं फारसा झोपण्याचा प्रश्न नव्हता. एका साध्या खाणावळीत हलका आहार घेतला. शहरातून आता अशा घरगुती खाणावळी कमी होत चालल्यात.

रात्रीचे साडेनऊ वाजलेले. सर्वत्र मस्त अंधार पसरलेला. दिवसा दिसणारे जंगल रात्री अक्षरशः भयाण वाटते. त्यात रात्र आमावस्येच्या जवळची असेल तर अधिकच. जवळच्या तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या वनपरिक्षेत्र संशोधन केंद्राचा परिसर धुंडाळण्याचं ठरवलेलं. रात्री १० वाजता नाईट ट्रेलला सुरुवात केली. दोडामार्ग बेळगाव मार्गावरील हे जवळचं उत्तम संरक्षित जंगल. सांबर, गवे, खवलेमांजर, बिबट्या, साळींदर, रानडुक्कर, काळमांजर दिसण्याची शक्यता. बॅटरीच्या उजेडात चालायला सुरुवात केली नि रातकिड्यांचा आवाज कानात शिरला. काहीतरी दिसावं म्हणून बॅटरी झाडाचे शेंडे धुंडाळू लागली. निशाचर कुत्र्यांचे भुंकणे सुरु झालेले. वाटेवरती एका सुकलेल्या पानावर बसलेल्या ‘कॉमन ट्री फ्रॉग’ने दर्शन दिले. तिलारी नदीपात्राच्या खळाळत्या आवाजाच्या दिशेने सरसावलो तेव्हा वॉचटॉवर आणि बसण्याची व्यवस्था दिसली. बॅटरीच्या उजेडात नदीचे दोनही तीर चाचपण्याचा प्रयत्न केला. या परिसराला भेट द्यायला येणाऱ्यांसाठी शासनाने २ ठिकाणी वॉच टॉवर आणि बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यातल्या जंगलात जाताना लागणाऱ्या पहिल्याच ठिकाणाजवळ एका आंब्याच्या झाडाच्या खोडावर रात्रींचर असलेला बिनविषारी ‘कॉमन वोल्फ स्नेक’ (कवड्या) दिसला. दिसला तेव्हा तो जमिनीपासून ७/८ फुट उंचीवर पोहोचलेला. कदाचित कुठलाश्या भक्ष्याच्या शोधात वर चढला असावा. त्याला चांगली ग्रीप भेटलेली. मूळ तपकिरी मात्र क्वचित काळ्या रंगाचा दिसणारा कवड्या आम्ही पाहिला. बराचवेळ त्याच्याजवळ घालवला पण हा काही जागचा हालला नाही. मग शेवटी आम्हीच हाललो. बऱ्याच दिवसांनी, बॅटरीच्या प्रकाशात समोर काय चमकेल याचा नेम नसताना काळोख्या अंधारात केलेली रात्रीची पायपीट अविस्मरणीय होती. किर्रर्र अंधारात जंगलवाटा तुडवण्यात वेगळी मजा असते. घुबड आणि नाईटजार सारखे निशाचर शोधण्यासाठी भरपूर अट्टाहास केला. रात्रीच्या अंधारात दोनेक तास इथे घालवले. रात्रीचं हे जंगल वेगळचं भासलं. महाराष्ट्र शासनाने सन १९७९-८० साली येथे हे संशोधन केंद्र स्थापन केलेले. इथला उन्नेयी बंधारा हा तिलारी प्रकल्पांतर्गत येणारा. दोनही प्रकल्पांत गोवा सरकारचा सहभाग. पर्यटनस्थळ म्हणून पहिले जात असले तरी उत्तम ‘पक्षी अभयारण्य’ होण्याची क्षमता या ठिकाणात असल्याची जाणीव झालेली. सकाळी पहिलं इथचं यायचं ठरलं. झुरळवाल्या लॉजवर परतलो तेव्हा रात्रीचे १२ वाजून गेलेले. जाताना विनंतीवजा बोललो असलो तरीही कोणी दरवाजा उघडेना. या लॉजवर आल्यापासून कोकणात पर्यटन वाढीसाठी काय काय करायला हवंय ? याचे जणू धडेच मी मनातल्यामनात गिरवित होतो. इतक्यात दार उघडलं गेलं. सुटकेचा निश्वास टाकला. सव्वाएक वाजता उद्याचा विचार करत अंथरुणावर पडलो.

झोपेतून जागा झालो तो पहाटे (२९ फेब्रुवारी) पाचच्या गजराने. पटापट आवरलं. साडेसहाला लॉज सोडला. कालच्याच ठिकाणी जायला निघालो. दोडामार्ग चौकात पिंपळपाराजवळ चहा घ्यायला थांबलो. पिंपळावर दोनेकशे बगळ्यांची वसाहत बसलेली. त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची जाणीव रस्त्यावरील नक्षीकाम पाहून आलेली. त्यांच्या खाली म्हणूनचं कोणी दुकानं घालत नसावं. मी सावरलो. वैभव उपहारगृहाच्या दिशेने निघालेलो. तर त्या बगळ्यांनी नको-नको म्हणताना मलाही खांद्यावर थोडासा प्रसाद दिलाचं ! चहा घेताना गळ्यातले कॅमेरे पाहून मालकाने जवळच्या कसईनाथ डोंगरावर जायला सुचवलं. सकाळी ७ वाजता दोडामार्ग सोडलं. बेळगाव रस्त्याला आता कसईनाथाचा डोंगर उजवीकडे दिसत होता. रस्त्यात तिलारी धरणाचा कालवा आडवा आला. आकाशातून मलबार पाईड हॉर्नबिल उडत गेला. भेडशीच्या बाजारपेठेत असलेलं घोटींगचं मोठं झाड पाहिलं. अशा मोठाल्या झाडांच्या ढोलीत धनेशसारख्या पक्ष्यांचे वास्तव्य असते. पूर्वी २०१५ साली झाडावरच्या मधमाश्यांनी बांधलेल्या पोळ्यावर त्याच झाडाची फांदी पडल्याने चवताळलेल्या मधमाश्यांनी नागरिकांवर अचानक हल्ला चढवून लोकांना जखमी केलं होतं. तेरवण-मेढे बंधाऱ्याच्या दिशेने उजवीकडे वळलो तेव्हा डावीकडे छोटंसं श्रीपाताडेश्वरांच देवस्थान दिसलं. ही देवराई असल्याचं लक्षात आलं. कालच्या रात्रीच्या अंधारात हे छोटंसं मंदिर दिसलं नव्हतं. सकाळी ते पत्र्याची शेड असलेलं मंदिर, तिथला भगवा झेंडा, तुळशीवृंदावन नीटसं पाहिलं. सोबतचे दोघे मित्र वन्यजीव अभ्यासक असल्याने त्यांच्यात मी तसा अनाडीचं ! शक्यतो आपल्यापेक्षा विद्वानांच्यात वावरलं की थोडाफार आपल्यालाही कळतं तशातलं आमचं अरण्यवाचनं ! वेड्यासारखा मी पहिला कुठं गेलो असेन तर तो कालचा ७/८ फुट उंचीवरील कवड्या बघायला. अर्थात सकाळी तो तिथे थोडाच असणार होता. तो नव्हताच. आता उजाडलेलं. कोवळं उनही अजून पडायला नव्हतं. निसर्ग नुकताच खुलू लागलेला. जंगल जागं झालेलं. पक्षांची किलबिल आनंद देत होती. तिलारी नदीच्या वाहत्या पात्राचा आताचा आवाज मनात निर्झराचा नाद गुणगुणवत लागला. एका ठिकाणी गाडी उभी केली नि वाट तुडवायला सुरुवात केली. बऱ्यापैकी दाट जंगल. झाडांच्या फांद्या एकात एक गुंतलेल्या. सूर्यप्रकाश किंचित जमिनीवर पडू लागलेला. इतक्यात एका झाडाच्या शेंड्यावर हालचालीची चाहूल लागली. जागेवरच थांबलो. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एका झाडाच्या टॉपला महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू (उडती खार; Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विरल) दिसलं. पण...! नजरेची पापणी लवायच्या आत या फांदीवरुन त्या फांदीवर टुणकन उड्या मारत गेलं सुद्धा. माणसाची साधी चाहूलही लक्षात यावी इतकं शेकरू संवेदनशील. जागेवर शांत उभा राहून कानोसा घेतला. तेव्हा अर्धा डझन शेकरू इथेच भेटले. वेळ सकाळची असल्याने आम्हाला फोटोजनिक पोझ देण्यापेक्षा त्यांना आपल्या पोटापाण्याची चिंता अधिक सतावत असावी. त्यात त्यांच्या मागून पुढून फिरणारे आम्ही ! बऱ्याच वेळानंतर त्यातलं एक शेकरू कुठल्याश्या रानबिब्याच्या पानाचा मागचा कोवळा देठ खाताना दृष्टीस पडलं. एव्हाना आमच्या पाठलागाला तेही सरावलं असावं. जागचं अजिबात हलेनाचं. जमेल तेवढे फोटो टिपले. मित्रानी स्टँड लावून छानसा व्हिडीओ बनवला. शेकरुंच्या सान्निध्यात तासभर कसा गेला ते कळलंच नाही. इथल्या झाडांवर उंच ठिकाणी, बारीक फांदीवर झाडाच्या काटक्या, मऊ पानं यांचा उपयोग करून सहसा अवजड परभक्षी पोचू शकत नाही अशा ठिकाणी शेकरुने बांधलेली घुमटाकार आकाराची घरटी पाहिली. सकाळी आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वी शेकरू सक्रीय असतं हे अनुभवायला मिळालं. मधल्याकाळात ते आराम करतं म्हणे. पूर्वी आपल्या राज्यात भीमाशंकर आणि फणसाड अभयारण्यात शेकरूंचा आढळ असायचा. नंतर डोंगररांगा, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबासह पश्चिमघाटात, विदर्भातील जंगलात दर्शन घडू लागलं. त्यांचं आजचं दर्शन आमच्यासाठी सर्वोत्तम. शेकरूंनी नाष्ट्याला काय खाल्लं असावं ? म्हणून विचार करताना झाडाचं वरून लालसर आवरण असलेलं फळ रस्त्यावर पडलेलं दिसलं. ताजं होतं. फळाला नीटसं फोडून आतला गर फस्त करून झालेला. तो नक्की शेकरुनेच केला असेल का ? शेकरुही नंतर खूपसा माणसाळल्याने हा प्रश्न मनात तसाच राहिला.  

पुढच्या तिथल्याच किमान दोन तासाच्या भटकंतीत एरव्ही चुकून दिसला तर नशीब असं म्हणायला लावणारे असंख्य पक्षी पाहायला मिळाले. त्यात यलो ब्रोड बुलबुल, व्हाईट रम्प्ड शामा, टिकेल्स ब्ल्यू फ्लायकॅचर, डार्क फ्रंटेड वारब्लर, ग्रेट होर्नबिल, लेसर फ्लेम ब्लॅक, स्मॉल ब्ल्यू किंगफिशर होते. सुतारपक्षाची ठोकाठोकी विलक्षण आणि गूढ वाटली. रॅकेट टेल्ड ड्रॉन्गो आणि कॉमन ड्रॉन्गो एकमेकांना भेटले. आम्हांला क्लिक करायला मिळाले. स्वर्गीय नर्तक (एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर) हा विहंग जमातीतला एक सुंदर जीव. १५ वर्षांपूर्वी शिरवलीच्या जंगलात पहिल्यांदा पाहिलेला, तेव्हा कॅमेरा नव्हता. रूपेरी पांढरा रंग, चकाकणारे काळे डोळे, काळ्या रंगाचा तुरा, लांबलचक फितीसारखी पिसं असलेली शेपटी. सुंदर तर आहेच, पण तो हवेतल्या हवेत उडणारे कीटक फस्त करतो म्हणून फ्लायकॅचर! उडताना वेगाने गिरक्या घेतो. त्याचे हे उडणे एखाद्या नृत्यासारखे वाटते म्हणून तो स्वर्गीय नर्तक’! त्याला भरभरून पाहिलं, कसंतरी क्लिक केलं. कोणत्याही जंगलातून पायी फिरण्याचा अनुभव अनुपम असतो. तो अनुभव जगण्याचा कार्यक्रम सुरु असताना तिलारी नदीपलिकडच्या भागात ‘चेनसॉ’ने झाडं तोडल्याचा कर्णकर्कश आवाज आला. मित्र म्हणाला, ‘पलिकडे खाजगी जंगल आहे ते तोडताहेत !’ ‘चेनसॉ’च्या आवाजाने तोंड पडलेल्या अवस्थेत पुढे चालत असताना एका झाडावरून किंचित मोठासा पक्षी उडालेला दिसला. उडताना पाहिल्यावर कळलं की तो ‘मलबार ग्रे हॉर्नबिल’ होता. धनेश पक्ष्याच्या (hornbill) प्रजाती खूप आहेत. सह्याद्रीत मोठा अबलक धनेश (Great Hornbill), मलबारी कवड्या धनेश (Malabar Pied Hornbill), मलबारी राखी धनेश (Malabar grey hornbill), राखी धनेश (Indian grey Hornbill) हे चार प्रकार आढळतात. हा त्यापैकीच एक, मी पहिल्यांदा पाहिला. पण फोटो न मिळाल्याने, त्यातूनही नीटसा पाहाता न आल्याने मनाला चटका लागून राहिलेला. मोठाली शेवर पाहिली. बांबूचं जाळलेलं बेट भेटलं. एका पांथस्थाला विचारलं तर म्हणाला, ‘रस्त्यात आडवं येत होतं म्हणून जाळलंनी.’ उन्नेयी बंधाऱ्याच्या दिशेने जाताना रेड स्पर हेन, सर्पंट ईगल, बार्बेट दिसला. बंधाऱ्यावर पोहोचलो, पलिकडे जायला निघालो. एकावेळी अनेक विषय डोक्यात घेऊन चालण्याचा जसा फायदा होतो तसा कधीकधी तोटाही होतो. इथे तोटा झाला. धरणाचे पाणलोट क्षेत्र टिपण्यासाठी कॅमेऱ्याची लेन्स बदलली तेवढ्यात प्रौढ आकारमान असलेला मलबार पाईड हॉर्नबिल मोकळ्या आकाशातून इकडून तिकडे जाताना दिसला. लेन्स चेंज करेपर्यंत तो झाडीत विसावला होता. त्याला आकाशातून उडताना इतक्या जवळून पाहाणे संस्मरणीय होते. मगाचचा ‘मलबार ग्रे हॉर्नबिल’ बाबतचा मनाला लागलेला चटका पाऊण तासांनी दूर झाला जेव्हा एका अनामिक वळणावर अचानक ‘मलबार ग्रे हॉर्नबिल’ सामोरा आला नि क्लिक करायला मिळाला. या निमित्ताने एकाच ठिकाणी रात्री आणि दिवसा जंगल निरीक्षणाचा सलग अनुभव मिळाला. चहा-बिस्कीट पोटात ढकलून बाहेर पडलेल्याला आता ४ तास होत आलेले. पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी पोटपूजा मस्ट होती. जवळच्या कोनाळकट्टा मुख्य वसाहतीतील एका ‘आँटी’च्या हॉटेलात आलो, चांगला डोसा मिळतो म्हणून. पण पीठ संपलेलं. इडली सांबारावर ताव मारला. मन प्रसन्न असलं की चव समजत नाही, सगळंच छान लागतं. तसं झालं.

पुढचा जंगल थांबा देवराईत होता. तेरवण-मेढे गावाच्या हद्दीत सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन श्रीनागनाथ मंदिराच्या देवराईच्या दिशेने निघालो. मंदिराच्या आवारात ‘नागकेशर’चं (नागचाफा/सुरंगी/ Mesua ferrea) झाड पाहिलं. भारतात पश्चिम किनारपट्टीत आढळणारं सुरंगी दुर्मीळ तितकंच औषधी आहे. देवराईत शिरतानाच असंख्य विशाल वृक्ष दिसले. मंदिराचा जीर्णोद्धार नियोजित असल्याने अजून किती दिवस ते या स्वार्थी विश्वाची सोबत करतील देव जाणे. त्यांच्याकडे मनसोक्त पाहिलं. कुशीत जाऊन स्वतःचेच फोटोही काढून घेतले. फोटोंकडे पाहिल्यावर कालपरवा जन्मलेल्या मला तो विशाल वृक्ष आपल्या जुन्या-जाणतेपणाची जणू जाणीवच करून देत असल्याचा भास झाला. देवराईत बहरलेल्या ‘सीता-अशोक’नं स्वागत केलं. त्याच्या दर्शन भेटीने प्रसन्न व्हायला झालं. भारत-श्रीलंकेतील हा ‘सीता अशोक’ वृक्ष सुंदर व सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो. हिंदू आणि बौद्ध धर्मात पवित्र मानला जातो. अशोकाचे खरं वैभव म्हणजे त्याची फुले. या फुलांचा बहर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातला. मंद सुगंधी फूल चार गोलाकार पाकळ्यांचे असून लांब-लांब पुंकेसर फुलाच्या बाहेर आलेले. फुले उमलताना पिवळ्या रंगाची, मग केशरी आणि शेवटी गडद नारिंगी-लाल होत निघालेली. एकाच गुच्छात छटा क्लिक केल्या. शेकरुसह मलबार पाईड हॉर्नबिलचं पेअर इथेही भेटलं. पण गर्द वनराईत आमच्या सोबतच्या लपाछपीत ते विजयी ठरलं. आम्ही त्याला भेटण्याच्या नादात छोट्याश्या देवराईतल्या पाऊलवाटा नुसत्याच तुडवत राहिलो. त्यातही एक वेगळी मजा असतेच म्हणा ! वेताच्या काठीचं बेट पाहिलं. आणखी कशाकशाची ओळखता न येणारीही फुलंही दिसली.

तिलारी जलविद्युत प्रकल्प क्षेत्रामध्ये वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगल आणि इको टुरिझम निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिलेल्या. मग विशेष काही नसताना तिलारी घाटाचा प्रवास केला. जाताना रस्त्यात केरळीयनांनी मोठ्या प्रमाणात केलेली रबर लागवड, अननस लागवड पहिली. ह्या लागवडीचे प्रमाण इतके की कोकणाच्या निसर्ग सौंदर्यात आणि कृषीअंतर्गत शेती उपक्रमात झपाट्याने बदल दिसणार असं वाटलं. लागवडीसाठी पाण्याचे स्रोत असणाऱ्या डोंगर कपारीतल्या जमिनीवर झालेली बेसुमार वृक्षतोड वेदनादायी वाटली. धरणांमुळे इथले पाणी वाढले, शेती वाढली. जंगल कमी होऊ लागले. त्याचा फटका वन्यजीवांना बसू लागलाय. या विचाराने रबर लागवडीतून कोकणात आर्थिक क्रांती घडवण्याची मांडली जाणारी गणितं आमच्यातल्या निसर्गाप्रेमाला अस्वस्थ करून गेली. वाटेत आशियाई हत्तीची माहिती देणारे फलक पाहायला मिळाले. हे फलक पाहून क्षणभर आपण कर्नाटकात तर नाही ना ? असं वाटून गेलं. फलकावर हत्ती-मानव संघर्ष टाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रांची माहिती होती. आता अत्यंत नागमोडी वळणे आणि अती तीव्र उतारामुळे वाहतुकीसाठी अवघड अशी ओळख असलेला तिलारीचा रामघाट सुरु झाला. सोबतीला नदी होतीच. तिलारी जलविद्युत प्रकल्पाचे काम करताना यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हा घाट तयार केलेला. सन २०१८ साली पाटबंधारे विभागाने बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यानंतर जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची डागडुजी, संरक्षक कठड्यांचे मजबुतीकरण, रुंदीकरण झाल्याने सध्या वाहतूक वाढलेला, आंबोली घाटाला पर्याय असलेला घाट. तिलारीतली रम्य सायंकाळ ही स्वच्छ आणि सुंदर हवेसाठी प्रसिद्ध. तिलारी हे कोकणपट्टीतलं सर्वात मोठं मातीचं धरण तिलारी नदीवर बांधलेलं. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक भागातील सीमावर्ती भाग धरणामुळे सुजलाम् सुफलाम्बनलायं. याने उन्हाळय़ात कोरडय़ा पडणाऱ्या विहिरींची पाणीपातळी वाढवली आहे. इथे ६६ मेगावॅटच्या एका जनित्रामधून जलविद्युत निर्मिती केली जाते. खूप ऐकलेलं या घाटाविषयी...! इन्शुरन्स नसलेला महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या या घाटातील प्रवासाचा अनुभव शब्दातीत. घाटातून खाली उतरलो तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेलेली. पोटात काहीतरी ढकलायला हवं म्हणून साटेली भेडशी येथील घरगुती खाणावळीत जेवलो.

पुढच्या जंगल प्रवासाला लागलो. आजचा मुक्काम आंबोलीला ठरलेला. जायचा रस्ता दोडामार्ग-सावंतवाडी-आंबोली ऐवजी दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोली असा ठरवलेला. हा बराचसा कच्चा, तीव्र चढ-उतारांचा रस्ता जवळपास जंगलातून जातो. वाटेत २/३ गावं लागतात, इतकंच. हाही अनुभव संस्मरणीय. एखादं-दुसऱ्या मोटारसायकलीचा अपवाद वगळता रस्त्याला वाहतूक नव्हती. मित्र म्हणाला, अगदीच नाही म्हणायला दुधवाले, पोल्ट्रीवाले, जवळपासचे दुचाकीस्वार इथून जात-येतात. आम्ही दोडामार्गवरून सासोलीफाटा सोडून कुडासे-कुंब्रलच्या दिशेने निघालो तेव्हा सायंकाळचे ४ वाजलेले. सुपारी पिकासाठी कुंब्रल, तळकट, कोलझर प्रसिद्ध आहे. कुंब्रलच्या पुढे आकाश ढगाळ झालेले. इतक्यात गाडीच्या काचेवर पावसाचे थेंबही जमा झालेले. आणखी थोडं पुढं आल्यावर रस्ता ओला झालेला दिसला. दिवसभर बराचसा प्रवास झालेला. वाटेत अवकाळी पावसाची भेट झालेली. मग काय ? त्याला अंगाखांद्यावर खेळू दिलं. मातीचा सुगंध रंध्रात भरून घेतला. पाऊस थांबला, पुढे निघालो. आंबोली घाटाला पर्याय म्हणून गेली दशकभर, आम्ही प्रवास करीत असलेल्या या मार्गाची चाचपणी सुरु आहे. ब्रिटीशांनी सन १८५६ साली बांधलेला सावंतवाडी आणि बेळगाव या व्यापारी पेठांना जोडणारा आंबोली घाट वाहतुकीला धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात या घाटमार्गावर दरडी कोसळतात. त्याला दाणोली-केसरी-फणसवडे-नेनेवाडी या मार्गाचा पर्याय आहे. पण कुठूनही गेलो तरी वनजमीन असणार आहे. तिला नख लावणं म्हणजे...? पण याही स्थितीत आंबोली घाटाला पर्याय किंवा त्यांची उत्तम डागडुजी व्हायला हवी. आम्ही प्रवास केलेल्या तळकट-चौकुळ-आंबोली या रस्त्याची मागणी पुढे आली आहे. इथेही वाटेत वनखात्याची बरीच जमीन आहे. तळकट-कुंभवडे रस्त्यात गवे, हरिण, भेकरे, बिबट्या, ससे, रान मांजरे काळवीट दिसतात. नेचर ट्रेलसाठी हा मार्ग सर्वोत्तम आहे. मात्र दोन गावांच्या जंगलांमधले असे कॉरीडोरवन्यश्वापदांच्या मृत्यूस, त्यांच्याकडून होणाऱ्या मानवी हल्यांना कारण ठरतात. याचा विचार इथे व्हायला हवा, असं प्रवासात वाटतं राहिलं. 

सायंकाळचे साडेपाच वाजून गेलेले. पार करायचं अंतर कमी राहिलं असणारं ! जंगलातली रानपाखरं, जनावरं सारी आपापल्या मुक्कामाला निघालेली. आता कोणीतरी दर्शन देईल असं वाटत असतानाचं त्या दहाफुटाच्या कच्च्या रस्त्याशेजारील झाडावर पुन्हा मलबार पाईड हॉर्नबिलनं दर्शन दिलचं. याला इतक्या जवळून पहिल्यांदा पाहायला मिळालं. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर असल्यानं फोटोत कमाल साधता आली नाही. पण खूप जवळून पाहण्याचा आनंद मात्र घेता आला. दुपारी त्यानागनाथाच्या देवराईत लपाछपीचा खेळ अर्ध्यात टाकून परतलेल्या आम्हाला मी जिंकलो, मी जिंकलो !असं खिजवायला तर हा आला नसेल ना ? क्षणभर असं वाटावं इतक्या जवळून भेटला. (तसं तांत्रिकदृष्ट्या आम्ही अजूनही दोडामार्गच्या हद्दीतच होतो ना !) थोड्या अंतरावर गेल्यावर खडपडे-कुंभवडे गावची पक्की सडक लागली. कुंभासारख्या आकाराचं म्हणून कुंभवडे. गावात सुमारे पाचशेच्या जवळपास लोकवस्ती असावी. बहुतेकजण शहरात राहतात. कुंभासारखा आकार असणाऱ्या या गावात विलोभनीय निसर्ग, अचंबित करून टाकणारे दोन नद्यांच्या संगमावर वाहणारे धबधबे आहेत. कुंभवडेच्या बोरीयेथून कळणेनदी उगम पावते. कुंभवडेपासून कुंब्रलपर्यंत ती न्हयखोलम्हणून ओळखली जाते. दोडामार्ग जंगल प्रदेशातून मार्गक्रमण करीत ही गोव्यात प्रवेश करते. गोवा हद्दीत ओझरी / मेणकुरे भागात शापोरा ब्रीजजवळ तिलारीत विलीन होते. न्हयखोलच्या पात्रावर भेकुर्ली येथे जलविद्युत धरण प्रकल्पाचे सर्वेक्षण झाले आहे. या भागात आजही नाचणीची शेती होते.

छोट्याश्या घाटीतील वळणावर गाडी थांबवली जेव्हा समोरच्या झाडाच्या उंच फांदीवर यलो फुटेड ग्रीन पिजन बसलेला दिसला. त्याला कॅमेराबंद करून पुढे निघालोच होतो तर वळणावरच्या पुढच्याच झाडाच्या शेंड्यावर चेस्टनट हेडेड बी इटर (मुरलीचरा) बसलेला दिसला. बराचवेळ तो तसाच बसलेला होता. कुणाचीतरी वाट पाहात असावा. थोड्यावेळाने जिची वाट पाहात होता ती येऊन गेलीच. पण हा काही तिच्या मागून गेला नाही. आम्हाला फोटोपोझ देत बसला. शेवटी आम्ही जसे त्याच्याजवळ जाऊ लागलो तसा सतर्कतेने उडाला. काळी घार (Black Kite), सातभाई (Jungle babbler), शिपाई बुलबुल (Red-whiskered bulbul), लहान पाणकावळा (Little Cormorant), पाँड हेरॉन, रानधोबी (Forest wagtail), Yellow-browed bulbul, वेडा राघू (Green bee-eater), व्हाईट-चीक्ड बारबेट, Indian scimitar babbler आदि पक्षीही पहिले. खडपडे-कुंभवडे गाव हद्दीतही नुकताच पाऊस पडून गेलेला. चहा कोठेच उपलब्ध नसताना अंगातला शीणवठा घालवण्यासाठी इतकं उत्तम वातावरण शोधूनही सापडणार नाही. निवांत व्हायला रस्त्याच्या एका बाजूला आलो. ज्या छोट्याश्या घाटीने आम्ही प्रवास करणार होतो तिचं रम्य चित्र समोर दिसत होतं. पायथ्याशी छोटासा ब्रीजही दिसला. चला ! आता निघू यात !असं आमच्यातला कोणीतरी म्हटला इतक्यात समोरच्या पर्णहीन झाडावर पुन्हा एक मलबार पाईड हॉर्नबिल येऊन बसला. आज बहुदा यांच्याच दर्शनाचा दिवस असावा. तसंही घरून निघताना प्रवासात ओणी (राजापूर), माडखोल (सावंतवाडी) जवळ आणि आज सकाळी दोडामार्ग सोडल्यावर लागणाऱ्या अगदी पहिल्या ब्रीजच्या परिसरातही याने दर्शन दिलेले. आत्ताच्या दर्शनाने त्यांची गेल्या २/३ दिवसातील सारी दर्शने आठवली. विचारचक्रात असताना त्याचं झाडाच्या दुसऱ्या टोकाच्या फांदीवर आणखी एक मलबार पाईड हॉर्नबिल येऊन विसावला. बहुदा ही पेअर असावी. तो तिच्याकडे पाहात होता. ती मात्र दुर्लक्ष करीत होती.असे काहीशे दृश्य होते ते ! १० मिनिटं गेली असतील. शेवटी दोघेही उठून उडून गेले त्या ब्रीजनजीकच्या झाडांत. या पक्ष्यांनी आम्हांला आम्ही खऱ्या अर्थाने जंगलातून प्रवास केल्याची साक्ष दिली.

घाटी उतरून खाली आलो तर इंग्रजी ‘T’ जंक्शनवर एक मार्गफलक दिसला. त्यावर आम्ही आलो त्या रस्त्यावर गोवा, बांदा, दोडामार्ग, तळकट, समोर कुंभवडे तर उजवीकडे आंबोली २० किमी. दाखविले होते. काजूच्या बिया अन् लाल-पिवळ्या बोंडांवर पावसाच्या अस्तित्वाच्या खुणा खुणा आम्हाला चटकन दिसल्या. सध्याचा कुंभवडे-चौकुळ रस्ता उत्तम असल्यानं चौकुळ लवकर आलं. ग्रामीण कोकण कृषी पर्यटनात चौकुळचा समावेश आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कडव्या सैनिकांचा गाव म्हणून चौकुळ प्रसिद्ध आहे. गावात ३५/४० लहान-मोठ्या गुहा, विविध रंगी फुलांचे सडे पाहाता येतात. आजही गावातील किमान ६० टक्के घरातील मंडळी लष्करी सेवेत आहेत. चौकुळ ते आंबोली हे दहा कि.मी. अंतर पूर्वी घनदाट जंगल होते. भणभणता वारा, अहोरात्र धुकं, जंगली श्वापदांचा वावर यामुळे कधी कोणत्या स्थितीला सामोरे जावे लागेल याचा पत्ता नाही. जगण्यातला हा बेडरपणा इथल्या माणसात दिसतो. पावसाळी पर्यटनाचा आकर्षणबिंदू असलेले धबधबे, रंगीबेरंगी रानफुलांनी बहरणारी विस्तीर्ण पठारे आदि असल्याने व्हिलेज टुरिझम, अ‍ॅडव्हेन्चर टुरिझम, मान्सून टुरिझम, कौटुंबीक सहल सारे उद्देश येथे सफल होतात. चौकुळला हरतऱ्हेच्या दुर्मीळ वनस्पती आहेत. इथल्या ग्रामदेवतेच्या प्रांगणात धुपाचे झाड आहे. महाराष्ट्राच्या अन्य भागात धुपाचे झाड नाही.

आंबोलीला जाताना रस्त्याच्या डाव्या हाताला घटप्रभा नदी भेटली. वर्षानुवर्षे घटप्रभा नदीपात्रात लोकं शेती करतात. त्यामुळे एका सरळ रेषेत शेती आणि मध्येच पाणी, चिखलं त्यातली जैवविविधता आपल्याला दिसते. घटप्रभा सहयाद्रीच्या कुशीने चंदगडमार्गे कर्नाटककडे रवाना होते. विजापूर जिल्ह्यात कृष्णेला मिळते. घटप्रभेवर गोकाकचा धबधबा आहे. चौकुळच्या शाळेजवळ थांबलो. मस्त चहा मागवली. कशीही मागवली तरी मिळणार तिथल्या पद्धतीचीच हा अस्सल ग्रामीण कोकणी रिवाज इथेही होताचं. त्यामुळे ‘तलफ’ तशीच राहिली. याच चौकुळला आम्ही सन २०१३ साली निसर्गातल्या दिवाळीचे फटाके उडवायला आलो होतो. पहाटे टेंटमध्ये साखर झोपेत असताना सांबराची बेफाम किंचाळी ऐकून त्या दिशेने धावताना वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या सांबराचे झालेले दर्शन, नंतर सांबराच्या पिल्लाच्या केलेल्या शिकारीवर ताव मारणारे वाईल्ड डॉगचे अख्खे कुटुंब भेटलेले. जंगलातल्या त्या दिवाळीवर लिहायचं मात्र अजूनही राहिलंय ! आजच्या दिवसभरात सूर्यास्तापर्यंत न थांबणारा पक्षांचा आवाज अनुभवला. जिथेजिथे क्षणभर विश्रांती घेतली तिथे वाळलेल्या पानावर पाय पडून भंग झालेली शांतता अनुभवली. असंख्य पक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटकांनी श्रीमंत बनवलेले जंगल, बऱ्याच दिवसांनी सहज न दिसणारे असंख्य पक्षी पहिले, काही क्लिक केले. आंबोलीत आलो तेव्हा वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर भेटले. त्यांच्याकडून, आंबोलीत डॉ. वरद गिरी सर आल्याची माहिती मिळाली. त्यांनाही भेटलो. डॉ. गिरी सरांसोबतच्या भेटीबाबत पुन्हा कधीतरी लिहिनं ! पोलीस चौकीजवळच्या हॉटेलात जेवून रात्री पुन्हा चौकुळ रोडवर नाईट ट्रेलला निघालो. रात्रीचं जंगलं अनुभवलं. बॅटरीच्या प्रकाशात दूर झुडुपात इंडियन पाम सिवेट आणि सांबराच्या चमकणाऱ्या डोळ्यांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. दिनांक १ मार्चची सकाळ. हाताशी वेळ कमी होता. सकाळी आवरून जवळच्या रेशीम संचालनालयाच्या बेसीक सिडफार्म इमारतीनजीक असलेल्या फाकणीच्या देवराईत निघालो. देवराई फक्त फिरणं झालं. फारसं साईटींग झालं नाही. जरवेलची बिळे, बिबट्याची विष्ठा (लेपर्डस्कॅट), कोणीतरी शिकार केलेल्या (बहुधा शिक्रा पक्ष्याने) रानकोंबडीची पिसं दिसली. काही पक्षी पाहिले. या देवराईतून परतताना एक स्थानिक भेटले. तसा कुठल्याही देवराईत सतत वावर असणारा माणूस हा श्रद्धा असलेलाचं असणार ! त्यांनी फाकणीच्या देवराईची माहिती देताना जे काही सांगितलं तो स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. आंबोलीत परतलो. रुचिरात तिथली स्पेशल मिसळ खाल्ली. परतीला लागलो. शेवटचा हॉर्नबिल सायं. ६.३० वा मानसकोंडच्या (संगमेश्वर) अलिकडे दिसला. या साऱ्या प्रवासात सोबत असलेल्या सर्पमित्र अनिकेत चोपडेने तो दाखवला. गंमत वाटली.

सृजन हो ! वर्तमान मानवी जीवनात ‘बी कलरफुल’ संकल्पनेचा शिरकाव झालेला आहे. पूर्वीच्या पिढ्या चाकोरीबद्ध जगल्या. सध्याच्या पिढीला विविधांगी विश्व सतत खुणावत असतं. प्रत्येकाला आपलं असं काहीतरी वेगळं म्हणून करायला मिळतं. ‘बी कलरफुल’ संकल्पनेनुसार जगायला भरपूर बळ देण्याचं काम अरण्याभ्रमंती करते. जंगल थोडंस समजून घ्यायला सुरुवात केली की त्यातली गंमत कळायला लागते. मग त्याच्या संवर्धनासाठी आपली पाऊलं आपसूक वळतात. वळणारी ही पाऊलं जितकी अधिक तितकी जैवविविधता अधिक खुलत जाते. आपलं आयुष्य कलरफुल बनविते. आपल्याला आनंदी बनवते. आनंदी जीवनशैली रोगराईंपासून बचाव करते. ‘दोडामार्गच्या वनवैभवात’ील ही अक्षर भ्रमंती आपल्याला निसर्गाकडे सतत वळवणारी ठरो !

धीरज वाटेकर
@विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.   ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com


(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटनपर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)


आपण वाचत असलेल्या दोडामार्गच्या ज्या वनवैभवात आम्ही
सव्वा महिन्यापूर्वी भटकलो तिथली 'कोरोना लॉकडाऊन' मधली
दिनांक ६ एप्रिल २०२० ची दैनिक सकाळ मधील बातमी  
बॅटरीच्या उजेडात दिसलेले तिलारी नदीचे पात्र 

कॉमन ट्री फ्रॉग 

 कवड्या (कॉमन वोल्फ स्नेक)

दोडामार्ग सूर्योदय

दोडामार्ग चौक : पिंपळपार येथील बगळ्यांची वसाहत

तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या वनपरिक्षेत्र संशोधन केंद्राचा परिसर 

   बांबूच्या बेटाला लावण्यात आलेली आग

    शेकरू (Indian giant squirrel

  यलो ब्रोड बुलबुल

तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या वनपरिक्षेत्र संशोधन केंद्राचा परिसर

   स्वर्गीय नर्तक (एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर)

व्हाईट रम्प्ड शामा

मलबारी राखी धनेश (Malabar grey hornbill)

तेरवण-मेढे येथील प्राचीन श्रीनागनाथ मंदिराच्या देवराईतील वृक्ष 

तेरवण-मेढे येथील प्राचीन श्रीनागनाथ मंदिराच्या
देवराईतील वृक्षाच्या छायेत ब्लॉगलेखक 

बहरलेला सीता-अशोक 

तिलारी नदी पात्र 

तिलारी घाटातून दिसणारे दृश्य 

तिलारी घाट 

तिलारी घाट 

कुंब्रलतळकट मार्गावर अवकाळी पावसाचे दर्शन
खडपडे हद्दीत दृष्टीस पडलेला गाव नामफलक



दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोली कच्चा जंगलमार्ग

फाकणीच्या देवराईतील बिबट्याची विष्ठा (लेपर्डस्कॅट)

फाकणीची देवराई

   दोडामार्गच्या वनवैभवातून परतताना ब्लॉगलेखक
(छायाचित्र : अनिकेत चोपडे)

फाकणीची देवराईतील पाण्याचा झरा

चौकुळ नाईट ट्रेलमध्ये बॅटरीच्या प्रकाशात डोळे चमकलेले इंडिअन पाम सिवेट

चौकुळच्या घटप्रभा नदी पात्रातील शेती 

अवकाळी पावसात न्हाऊन निघालेली काजूची बोंडं 

चौकुळ गाव 

पर्णहीन झाडावर मलबार पाईड हॉर्नबिल पेअर

कुंभवडे घाटीतून दिसणारे दृश्य 

कुंभवडे ‘T’ जंक्शनवरील नामफलक 

चेस्टनट हेडेड बी ईटर (मुरलीचरा)

यलो फुटेड ग्रीन पिजन

जंगलात रस्त्याशेजारच्या झाडावर येऊन
दर्शन दिलेला मलबार पाईड हॉर्नबिल

(सर्व छायाचित्रे : धीरज वाटेकर)


THIS BLOG PUBLISH LINKS / PAPER CUTTINGS



आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...